ऑटोग्राफ -- भुतकाळाला सामोरे जाताना ---------
या कथेतील नायक आपल्या जीवनामधे अनेक टप्प्यांवर भले बुरे अनुभव घेउन आता आयुष्यात स्थिरावला आहे . त्याचे लग्नही ठरले आहे . आपल्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका घेउन तो जिथे त्याचे शाळेतील शिक्षण झाले त्या गावी निघाला आहे . गावाकडे जाणा-या कॅनॉल रोडवरुन चालताना त्याच्या मनात या गावातील शालेय जीवनातील आठवणी उलगडत आहेत .
गावातील यात्रेतील उत्सव , देवाला गर्दीमधेच लांबवरुन भक्तीभावे केलेला नमस्कार , वडीलांनी घेउन दिलेली नवी सायकल , याच रस्त्यावरुन मित्रांबरोबर सायकलवरुन शाळेत जाणे , शाळेतील मारकुटे मास्तर , शाळेत झालेली अक्षर ओळख , टूरिंग टॉकीजमधे पाहिलेले सिनेमे , गॅदरींग मधले नाटक , विहिरिमधे मित्रांबरोबर केलेली धमाल , अकस्मात एका मित्राचा विहिरीत बुडुन झालेला मॄत्यु , त्या मित्राचे विहिरीतुन काढलेले निचेष्ट कलेवर पाहुन बसलेला धक्का आणी फोडलेला टाहो , वर्गातल्या मुलीला दिलेले मोरपिस , मोरपिस पाहुन तिला झालेला आनंद , शाळेतील शेवट्च्या वर्षी मित्रांबरोबर घेतलेल्या आणाभाका अशा अनेक आठवणींमधे तो हरवुन जातो .
शाळेतील एके काळचा आपला जवळचा मित्र , आपले मास्तर आणी तो मोरपिसवाली मैत्रीण यांना तो भेटतो . त्याची शाळेतील मैत्रीण आता ३ मुलांची आई झाली आहे . आपल्या एका मुलाचे नाव तिने त्याच्याच नावावरुन ठेवले आहे . या सर्वांना तो आठवणीने लग्नाला येण्याचे निमंत्रण करतो .
आता त्याला जायचे आहे आपल्या जीवनात आलेल्या पुढल्या टप्प्याला . केरळला . परत एकदा . काही खास जिवलगांना निमंत्रण करायला . तेथील भुतकाळातील आठवणींना सोबत घेउन .
त्याचे वडील पोस्टात असल्यामुळे त्याचे शालेय शिक्षण संपल्यांनतर त्यांची बदली केरळमधील एका गावी होते . गावाजवळील कॉलेजला रोज बोटीने जावे यावे लागते . भाषेचा अडसर , स्थानीक तरुणांबरोबर उडणारे खटके यांना तोंड देत तो या नव्या आयुष्याशी आणी कॉलेज जीवनाशी जुळवुन घेतो . यामधे त्याला मदत होते ती त्याच्याच वर्गातील एका स्थानीक मुलीची . त्याच्याबद्दल तिला वाटणारी सहानुभुती हि अखेर प्रेमात बदलते .
या चुकीची शिक्षा म्हणुन त्याला स्थानिकांकडुन मारहाण होते . आणी तिचे लग्न तिच्या मनाविरुद्ध गावातीलच एका श्रीमंत तरुणाशी होते .
हे दु:ख पचवता न आल्याने तो व्यसनाच्या आहारी जातो . त्याची हि दुरावस्था पाहुन हवालदिल झालेले त्याचे वडील त्या ठिकाणाहुन आपली बदली करुन घेतात .
दु:ख , व्यसनाधिनता यातुन बाहेर पडण्यात त्याची दोन वर्षे निघुन जातात . आपल्या पुढच्या भविष्यासाठी तो नोकरीच्या शोधात शहरामधे येतो . बेकारीचे चटके सोसत नोकरीसाठी त्याचा संघर्ष सुरु होतो . यामधे त्याला सोबत असते ती त्याच्यासारख्याच बेरोजगार रूममेटसची , मित्रांची .
एके दिवशी , सुदैवाने त्यांची धडपड एका तळमळीच्या समाजसेविकेला जाणवते . आपल्या प्रयत्नांनी ती त्याला आणी त्याच्या मित्रांना एका जाहिरात कंपनीमधे नोकरी मिळवुन देते . आपल्या जिद्दीने , आणी मेहनतीने तो लवकरच या क्षेत्रामधे नाव आणी पैसा कमावतो . त्याच्या आजपर्यंतच्या संघर्षमय जीवनाला स्थिरता येते .
त्याचे आई वडील त्याच्यासाठी वधु शोधतात . त्याचे लग्नही ठरते . आपल्या आयुष्यात आजपर्यंत महत्वाच्या टप्प्यांवर भेटलेल्या व्यक्तींनी आपल्या लग्नाला उपस्थित रहावे हि त्याची मनापासुनची इच्छा आहे . तो या सर्वांना भेटुन निमंत्रण करायचे ठरवतो . आणी त्यासाठी परत एकदा भुतकाळाला , आयुष्यातील चांगल्या वाईट आठवणींना सामोरा जातो . त्याच्या या भुतकाळाला सामोरे जाण्याच्या प्रवासाची हि कथा आहे .
हि कथा आहे २००४ साली प्रदर्शीत झालेल्या " ऑटोग्राफ" या तामिळ चित्रपटाची . चेरन या कलाकाराने या फिल्ममधील प्रमुख भुमिका साकारली आहे . निर्मीती आणी दिग्दर्शनही त्याचेच आहे . मनाचा ठाव घेणा-या या चित्रपटाला प्रेक्षकांनी आणी समिक्षकांनी मनापासुन उचलुन घेतले . हा चित्रपट सुपरहिट ठरला . अनेक राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाले . या चित्रपटाचे पुढे तेलुगु आणी कन्नड भाषेमधे रीमेक झाले .
-----------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
9 Jun 2020 - 6:42 pm | टवाळ कार्टा
वा
9 Jun 2020 - 6:50 pm | सतिश गावडे
वाह.. अगदी वास्तववादी कथानक वाटते. इंग्रजी उपशिर्षक असतील तर नक्की पाहीन हा चित्रपट.
9 Jun 2020 - 7:10 pm | सतिश गावडे
इंग्रजी उपशिर्षकांसहीत तमिळ चित्रपट युट्युबवर इथे उपलब्ध आहे.
9 Jun 2020 - 9:16 pm | चौथा कोनाडा
व्वा, अतिशय सुरेख ओळख ! भारी लिहिलंय.
सगादादांनी दिलेल्या लिंकवर झलक पाहिली याची, उत्सुकता खुप चाळवलीय, बघणार आता हा सिनेमा !
10 Jun 2020 - 4:46 pm | सिरुसेरि
छान .
10 Jun 2020 - 4:51 pm | अभ्या..
भारी आहे पिक्चर.
ओळख आवडली सिरुदा
11 Jun 2020 - 11:32 am | रातराणी
छान ओळख करून दिलीत. अजून अशा आवर्जून पाहण्यासारख्या चित्रपटांबद्दल वाचायला आवडेल.
11 Jun 2020 - 3:00 pm | मराठी कथालेखक
हिंदीमध्ये डब झालाय का ?
11 Jun 2020 - 11:42 pm | Prajakta२१
चांगली ओळख
कालच दृश्यम (मूळचा मल्याळम पण हिंदीत डब केलेला-मोहनलाल असलेला ) पाहिला
मल्याळम दृश्यम मध्ये मोहनलाल सामान्य माणूस म्हणून एकदम परफेक्ट कास्टिंग वाटते
त्या मानाने हिंदीत अजय देवगण रोल मध्ये काम चांगले केले पण सामान्य माणूस वाटत नाही
बाकी फ्रेम टू फ्रेम कॉपी आहे त्यामुळे एवढा फरक नाही
तसेच सध्या चॅनेल्स वर दक्षिण भारतीय चित्रपट -एक डिटेक्टिव्ह चा पिक्चर(नाव आठवत नाही-शेरलॉक होम्स वर ) ,ध्रुवा ,फिदा हे डब केलेले सारखे लावतात
अजून एक आहे ज्यात हिरो सगळ्या शहरावर नजर ठेवत असतो आणि त्यात त्याच्या बायकोला होणारे ब्लॅकमेल कळून त्याच्यावर action घेतो अशी
साधारण कथा आहे नाव आठवत नाही पण इंग्लिश सिरीयल पर्सन ऑफ इंटरेस्ट सारखी कल्पना वापरली होती लोकांवर नजर ठेवायची
काही काही दक्षिण भारतीय चित्रपट मनोरंजात्मक आहेत
12 Jun 2020 - 3:44 pm | सिरुसेरि
आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद .
25 Nov 2020 - 8:07 pm | उपयोजक
ही सिनेअोळख सुद्धा आवडली!! अजून येऊ द्या.
25 Nov 2020 - 8:09 pm | उपयोजक
ही सिनेअोळख सुद्धा आवडली!! अजून येऊ द्या.
25 Nov 2020 - 8:09 pm | उपयोजक
ही सिनेअोळख सुद्धा आवडली!! अजून येऊ द्या.
26 Nov 2020 - 12:24 pm | टर्मीनेटर
नाही पाहिलाय हा चित्रपट आणि मेलोड्रामा, प्रेमभंग असल्या विषयांचा तिटकारा असल्याने कदाचित पहाणारही नाही 😀
कॉमेडी, अॅक्शन, रोमकॉम असे चित्रपट आवडत असल्याने विजय सेतुपतीचा '96' हा अनेकांनी शिफारस केलेला चित्रपटही मला फार बोरिंग वाटला.
तसेच विजय सेतुपतीच्याच 'Seethakaathi' ह्या वेगळ्या विषयावरील, मध्यंतरा पर्यंत प्रेक्षकांच्या मनाची चांगली पकड घेणाऱ्या चित्रपटाची कथा पुढे भरकटत गेल्याने कशी वाट लागू शकते हा ही अनुभव गाठीशी जमा झाला आहे. ह्या चित्रपटात इतक्या चांगल्या अभिनेत्याला अक्षरशः वाया घालवल्या सारखे वाटले.
असो, अशीच तुम्हाला आवडलेल्या चित्रपटांची ओळख करून देत रहा वाचायला नक्कीच आवडेल 👍
28 Dec 2020 - 4:03 pm | नीलकंठ देशमुख
छान. समिक्षा वाचून चित्रपट पाहाण्याची उत्सुकता लागली आहे.
दाक्षिणात्य चित्रपट..
काही खूप तरल असतात
काही मात्र एकदम बटबटीत.
10 May 2023 - 3:52 pm | सिरुसेरि
ऑटोग्राफ याच नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शीत होत आहे .