ए ! " तांब्यात पाणी घेऊन ये जरा, ह्या गाठीने नाकात दम आणलाय माझ्या. ह्या कुऱ्हाडीची धार बोथट करून टाकली तिने ".
अहो! निदान आज तरी लाकडं फोडू नका, अजयचा मॅट्रिकचा रिझल्ट आहे. शाळेत गेला आहे तो, येईल थोड्या वेळात मित्रांबरोबर घरी, तेव्हा दारात असा पसारा बरोबर दिसणार नाही.
तुझा लेक काय दिवे लावणार आहे माहीत आहे मला. आणि उद्या बंबात काय घालू? तुझ्या लेकाची लाकडं?
अहो असं अभद्र तरी बोलू नका आपल्या लेकराबद्दल.
अजय लहानपणापासून खोडकर. अभ्यासात फार गती नव्हती. शाळेतून आला की मित्र गोळा करून खेळायला जात असे. त्याचे मित्रही त्याच्यासारखे उनाड आणि खोडकर, रोज काहीतरी उपदव्याप केल्याशिवाय घरी येत नसे. त्याच्या तक्रारी त्याच्या बाबांच्या कानावर व्यवस्थित पोचवायचे काम शेजारचे पाजारचे करायचे. घरी आल्यावर अंगावरची खाकी वर्दी उतरवली तरी पोलिसी खाक्या उतरत नव्हता. अजयला अंगावरचे कपडे काढून गुरासारखे बदडून काढायचे, ते बघून धाकट्या विनयची चड्डी ओली व्हायची. परंतु अजय गुपचूप मार खात असे.
अजयला व्यायामाची आणि खेळाची आवड होती. उंचापुरा, पिळदार शरीर आणि गोरापान रंग. शाळेच्या कबड्डी संघाचा कर्णधार होता. कबड्डीच्या अनेक जिल्हा आणि राज्यपातळीवरील स्पर्धा जिंकून शाळेला पारितोषिके मिळवून दिली त्याने. संघाचे प्रशिक्षक त्याला सगळे शशी कपूरच म्हणायचे. परंतु त्याच्या बाबांनी कधीच त्याचे कौतुक केले नाही. बालपणापासून अजयला परीक्षेत कमी मार्क मिळाले की बाबांचा मार हा ठरलेला. मिसरुट फुटली तरी त्याची ह्या शिक्षेतून सुटका झाली नाही. मॅट्रिक परीक्षेला त्याला शुभेच्छा देणे दूर उलट " नापास झाला तर तोंड दाखवायला येऊ नको, आलास तर तंगड्या तोडून हातात देईल तुझ्या " अशी धमकी दिली त्याला बाबांनी. तरी त्याने कधीच बाबांबद्दल तक्रार केली नाही किंवा त्यांना उलटून बोलला नाही.
तो बघा! पुलावरून अजय येतोय, नक्कीच पास झाला असणार. पण तो एकटाच दिसतोय. मित्र नाही दिसत सोबत. नुकतीच धार लावलेली कुऱ्हाड खांद्यावर घेऊन अजयचे बाबा उभे राहिले. अजय जागेवरच थबकला आणि पुन्हा पुलावरून माघारी वळून निघून गेला, एकदाही मागे वळून बघितले नाही त्याने.
त्याच्या मित्रांकडे चौकशी केली. नापास झाला होता अजय. रात्र झाली तरी तो काही आला नाही. पोलिस स्टेशनला तक्रार केली. सकाळपर्यंत काहीच पत्ता लागला नाही. त्याच्या बाबांनी आणि पोलिसांनी संपूर्ण शहर पिंजून काढले, हॉस्पिटल, शवागारे बघून झाली, पण त्याचा शोध लागला नाही. नक्कीच कधीतरी शाळेचा दाखला घ्यायला येईल,परंतु अद्याप आला नाही. अधून मधून कोणीतरी म्हणायचे त्याला अमूक गावात बघितले , तमूक बाईसोबत दिसला, पण त्याने ओळख नाही दिली. लोकांवर विश्वास नव्हताच पण आशा अजूनही आहे तो भेटेल ह्याची.
मला खरंच माहीत नव्हते अजयला भाऊ आहे ते, पत्रिकेत बघितले म्हणून मी विचारले तुम्हाला. माझ्या आजीने गावडे आजींची माफी मागितली. तुम्हालाच काय सोसायटीत कोणालाच माहिती नाही. मीच नातीच्या पत्रिकेत अजयचे नाव टाकायचा आग्रह केला. ह्यांनी मला वेडेच ठरवले, पण विनयने अजिबात विरोध केला नाही. देवाला पत्रिका ठेवली आणि अजयला आमंत्रण देण्याचे साकडे घातले त्याच्याकडे. आज पन्नास वर्ष होतील अजयला पुलावर शेवटचे बघितल्याचे. काय सांगावे येईलही तो कदाचीत पुतनीच्या लग्नाला.
आशीर्वाद देऊन नातीचे डोळे पुसले आणि गाडीत बसवून हसत निरोप दिला गावडे आजींनी. विनयला घट्ट मिठी मारून ओक्साबोक्शी रडू लागल्या. देवावर खूप विश्वास होता, आज तो अजयशी आपली भेट नक्कीच घडवून आणेल अशी खात्री होती. घरी येईपर्यंत आजी रडत होत्या.
त्याच रात्री अचानक गावडे आजींची तब्येत बिघडली. अजय अजय करत त्यांची नजर इकडे तिकडे भिरभिरत होती. पहाटे तब्येत जास्तच बिघडली. गावडे आजोबांनी " हा बघ अजय आला तुला भेटायला " असे म्हणून विनयला पुढे केले. आजींनी एक हात वर केला. विनयने आपल्या आईचे डोके मांडीवर ठेवले, तिने त्याच्या गालावर हात फिरवला आणि डोळे मिटले.
गावडे आजींचे अंत्यसंस्कार झाले. गावडे आजोबांचे अश्रू थांबत नव्हते. इतके भावूक झालेले अद्याप त्यांच्या घराच्यांनी कधी बघितले नव्हते. आईच्या मायेच्या धारेने गाठीचे तुकडे तुकडे झाले होते. तीन महिन्याने सरपनाचीही राख झाली.
***
प्रतिक्रिया
16 Feb 2023 - 6:24 am | कर्नलतपस्वी
संवाद साधला नाही की गाठी वाढतात. हल्ली गाठीचीच झाडे जास्त झालीत. कुणीच कुणास समजून घेत नाही. हळुहळू स्वतःच स्वतःच्याच भोवती अभेद्य असा कोश विणतात व एकमेकां पासून दुर जातात.
कवीवर्य वसंत बापट यांची बाभुळगाव ही कवीता आठवली.
अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभुळझाड उभेच आहे ll१ll
आठवते ते भलते आहे
उरात माझ्या सलते आहे
आत काही कळते आहे
आत फार जळते आहे ll६ll
16 Feb 2023 - 6:27 am | कर्नलतपस्वी
शेवट फार सुंदर आहे.
आईच्या मायेच्या धारेने गाठीचे तुकडे तुकडे झाले होते. तीन महिन्याने सरपनाचीही राख झाली.
कविता मला फार आवडतात. चार सहा ओळीत एक कथा,पुस्तक सामावलेले असते.
16 Feb 2023 - 6:36 pm | भागो
कविता मला फार आवडतात>>मला ही. एका ओळीत कथा सांगून जातात.
कथा आवडली आणि प्रतिसाद पण.असे प्रतिसाद कवितेचे भाव द्विगुणीत करतात.
कथेच्या भावना जाणून प्रतिसाद देणारे विरळाच.
16 Feb 2023 - 10:44 am | सौंदाळा
सुंदर भावस्पर्शी कथा
16 Feb 2023 - 11:41 am | राजेंद्र मेहेंदळे
"सदा तुम ने ऐब देखा, हुनर को न देखा" . असे किती तरी अजय जळून गेले असतील नाही?
मलातर कधी कधी प्रश्न पडतो. फक्त शिक्षणातच चमकलेली मुले आयुष्यात प्रगती करतात का? तर तसे काही दिसत नाही. मग करु दे ना त्यांना काय करायचे ते. डॉक्टरकीची डिग्री घेउन अभिनेता झालेले, ईंजिनीयर होउन चहा/ वडापाव विकणारे, बी. टेक्/एम. टेक होउन शेतीत प्रगती केलेले, सी. ए होउन गायक झालेले (आणि जे करताहेत त्यात यशस्वी झालेले) लोक दिसतातच की आजुबाजुला.
16 Feb 2023 - 3:54 pm | श्वेता व्यास
गोष्ट आवडली.
वडिलांच्या तापट स्वभावाने घर सोडून गेलेला मुलगा, आई-वडील गेले तरी न भेटलेला, असे उदाहरण पाहीले आहे.
16 Feb 2023 - 9:22 pm | चौथा कोनाडा
छान कथा आहे. दुर्दवी गाठ होती ती. शेवट अ ति श य परिणामकारक.
पण लेखनात आणखी सुसुत्रतेचा हवी होती असं मला वाटतं.
16 Feb 2023 - 10:03 pm | चित्रगुप्त
कथेच्या सुरुवातीचे पाच परिच्छेद समजले पण नंतर आलेल्या खालील दोन परिच्छेदांचा संदर्भ समजला नाही.
या गावडे आजी कोण ? त्यांचा अजयशी काय संबंध होता? 'पुतनीचे लग्न' यातली पुतनी म्हणजे कोणाची कोण ? 'माझ्या' आजीनी 'गावडे आजींची' माफी मागितली, ती कशाबद्दल ??? काही उलगडा झालेला नाही. धागाकर्त्याने कृपया खुलासा करावा. कदाचित फक्त मलाच समजले नसेल, किंवा माझ्यासारखे आणखी वाचकही असतील.
17 Feb 2023 - 10:26 am | कर्नलतपस्वी
वाचकांवर सोडलेले आसले की कथा लेखक वाचक यांचे ज्वाईटं व्हेन्चर वाटते.
1 Jun 2023 - 10:35 pm | चौथा कोनाडा
@चित्रगुप्त की
अगदी हेच लिहिणार होतो.
म्हणुनच "लेखनात आणखी सुसुत्रतेचा हवी होती" असे म्हटले.
1 Jun 2023 - 1:33 pm | कुमार१
सुंदर कथा