सकाळची वेळ. बंडू शाळेत जाताना माझे लाड केल्याशिवाय पुढे जातच नाही. मालकही रोज पाठीवर थाप मारणारच, दिमतीला गडी ठेवलाय.मी माझ्या बापासारखाच शर्यतीचा बैल आहे.या मालकाला माझ्या बापाने भरपूर बक्षिसे मिळवून दिली म्हणे.
पण बरेच दिवस झाले नेहमीसारखा खुराक मिळत नाहीये. मालक कायतरी बोलत होते. बैलगाडा शर्यत ,कोर्टाचा निर्णय, औताला जुंपूया.
संध्याकाळची वेळ.मालक मला शेतात घेऊन आलेत. मस्त वारा वाहतोय. अरेच्चा!!हे काय?चारी पाय बांबूला बांधून मला खाली पाडले. अचानक खाट खाट आवाज आले. सण्णकन डोक्यात कळ गेली आणि डोळ्यापुढे अंधारी आली. मोठ्याने ओरडायचे होते, पण तोंडातून शब्दच फुटले नाहीत. फक्त डोळ्यातून पाणी वाहत राहिले. सगळे संपले होते. आता मी राहिलो फक्त औताचा बैल.
प्रतिक्रिया
27 Jan 2023 - 8:39 pm | कर्नलतपस्वी
माणूस पहिली चार पाच वर्ष सोडली तर पुढची बारा ते सोळा आठरा वर्ष शर्यतीचा बैल व पुढे साठ,सत्तर किंवा मरेपर्यंत औताचा बैल.
कथा आवडली.
27 Jan 2023 - 9:53 pm | चित्रगुप्त
छान लिहीले आहे, परंतु शीर्षकामुळे कथा 'औताच्या बैला'बद्दल असल्याचे आधीच ठाऊक झाल्याने शेवटी 'धक्का' लागला नाही.
'शर्यतीचा बैल' आणि 'औताचा बैल' यात तांत्रिक फरक काय असतो हे आम्हा ठावे नाही.
म्हणजे शर्यतीचा 'बैल' हा प्रत्यक्षात 'सांड' असतो का? 'वळू', 'बैल' आणि 'सांड' हे तिन्ही वेगवेगळे असतात का?
बाकी कोंबड्यांच्या झुंजी, बैलांच्या शर्यती, माकडांच्या कसरती, सर्कशीतले प्राणी वगैरेंवर बंदी घालायची आणि दररोज लाखो कोंबड्या, बकरे, गायी वगैरेंची खाण्यासाठी कत्तल करायची, हे काही पचनी पडत नाही राव.
ती मनेका का कोण, भाषण वगैरे देऊन झाल्यावर चिकन -कबाब वगैरेवर ताव मारत असेल.
28 Jan 2023 - 5:44 am | राजेंद्र मेहेंदळे
वळू-- देवाला सोडलेला बैल, याला कोणी मारत नाही उलट पूजा करतात
सांड- पुनरुत्पादनासाठी उपयोगी बैल
औताचा बैल-- याची वृषणे फोडली जातात, म्हणजे तो बंडखोरी करत नाही आणि जन्मभर निमूट्पणे काम करतो. पण प्रजोत्पादन करु शकत नाही.
28 Jan 2023 - 2:51 pm | टर्मीनेटर
छान! शशक आवडली 👍
शर्यतीचा बैल आणि औताचा बैल म्हणजे रेसचा घोडा अणि टांग्याच्या घोड्या सारखाच प्रकार आहे 😀
थोड्याफार अशाच पद्धतीने बोकड आणि डुकरांनाही 'खच्ची' केले जाते. त्यामागे त्यांच्या शरिराची उर्जा विर्योत्पादनात खर्च न होता, त्यांचे वजन वाढुन मांसविक्रितुन अधिक उत्पन्न मिळवणे हा उद्देश असतो. हे सर्व अघोरी वाटते पण "सब गंदा है पर धंदा है ये..."
"एखाद्याचे खच्चीकरण करणे" ह्या वक्यप्रयोगाचा जन्म ह्यातुनच झाला आहे.
28 Jan 2023 - 4:55 pm | चित्रगुप्त
म्हणजे शर्यतीचा बैल 'खच्चीकृत' नसतो ? मग त्याला शर्यतीचा वळू किंवा शर्यतीचा सांड का म्हणत नाहीत ?
यावरून आठवले, आम्ही चित्रकलेच्या तिसर्या वर्गात आल्यावर शिक्षकांनी आम्हाला तैलरंग, पॅलेट, ऑइल पेपर आणि 'हॉग हेयर' ब्रश आणायला सांगितले. hog म्हणजे नेमके काय, हे कुणालाच ठाऊक नव्हते. मग मी घरी जाऊन इंग्रजी शब्दकोषात हुडकल्यावर hog म्हणजे 'अण्ड बडवलेला डुक्कर' असे होते.
या घटनेनंतर आज बावन्न वर्षांनंतर गूगल ट्रान्स्लेट मधे बघता खालील अर्थ दिलेले दिसले:
hog = स्वार्थी. आपमतलबी मनुष्य. दुष्ट मनुष्य. (... दुष्ट माणसाच्या केसांचा ब्रश ? कमाल आहे)
आणखी भाषांतराच्या साईटांवरः
स्वतःकडे ठेवा, वर्चस्व ठेवा, ताब्यात घ्या, कोपरा, नियंत्रण करा, , पेरणे, स्वाईन, पोर्क, पिगलेट, डुक्कर,
--- अन्यायकारक किंवा स्वार्थी मार्गाने स्वतःसाठी सर्व (काहीतरी) ठेवा किंवा वापरा.
(जहाजाच्या संदर्भात) त्याच्या लांबीच्या बाजूने वाकणे किंवा वाकलेले उत्तल बनणे परिणामी एकतर हुल मध्यभागी समर्थित आहे आणि टोकांना नाही (जड समुद्राप्रमाणे) किंवा जहाज अधिक टोकावर लोड केले जात आहे .
पाळीव डुक्कर, विशेषत: 120 पौंड (54 किलो) पेक्षा जास्त आणि कत्तलीसाठी पाळले जाते.
एक मोठी मोटरसायकल, विशेषतः हार्ले डेव्हिडसन.
पहिल्या काटण्याआधी एक तरुण मेंढी.
HelloEnglish: India's no. 1 English Learning Apphttps://helloenglish.com ›
hog meaning in marathi: स्वार्थी
तात्पर्यः कितीही गूगल, ट्रान्सलेशन अॅप वगैरे नवनवीन प्रकार आले, तरी जुन्या पुस्तकंना पर्याय नाही.
29 Jan 2023 - 8:18 am | राजेंद्र मेहेंदळे
केव्हढा तो अभ्यास!! शशक लिहिताना मी एव्हढा विचार केला नव्हता बुवा. आता मिपावर लिहिताना अजुन जास्त अभ्यास करुन लिहावे लागणार असे दिसतेय :)
29 Jan 2023 - 4:46 pm | चौथा कोनाडा
छान शशक.... आवडली.
अधून मधून आपण औताचे बैल आहोत अशी भावना नैराश्यात नेते.
शशकचे नाव बदलून फक्त औत असे करावे.
30 Jan 2023 - 12:22 am | श्रीगुरुजी
दुर्दैवाने खरे आहे. बैल या मुक्या प्राण्यावर जिवंतपणी अत्यंत क्रूर अत्याचार केले जातात. भूल न देता त्याचे वृषण दगडाने किंवा दांडक्याने ठेचून नष्ट करतात. हे करताना बैलाला किती यातना होत असतील या कल्पनेने सुद्धा अंगावर काटा येतो. वृषण नष्ट करून त्
त्याचा नैसर्गिक आनंदही हिरावून घेतला जातो. आडवे पाडून पाय बांधून त्यात लोखंडी खिळे ठोकून नाल बसविताना होणाऱ्या वेदनांमुळे बैलाच्या डोळ्यातून पाणी वाहत असते. पण माणसाला त्याची दया येत नाही. नंतर आयुष्यभर नाकात वेसण घालून भर उन्हात नांगराला जुंपून राबवितात आणि गाडीला जुंपून अमाप ओझे ओढायला लावतात. हे करताना चाबकाचे फटके मिळतातच. शेवटी बैल म्हातारा झाला की कसायाला विकतात.
शर्यतीच्या किंवा जालिकट्टू मध्ये पळविणाऱ्या बैलांचेही अतोनात हाल करतात. कानात लाल मुंग्या सोडणे, दारू पाजणे, काटेरी टोकदार चाबकाने मारणे, शेपटी पिरगाळणे हे अत्याचार या बैलांवर होतात.
आपल्या स्वार्थासाठी माणूस इतका क्रूर व निर्दयी का होतो हे समजत नाही. हीच माणसे भजन वगैरे करतात, वारी करतात, बैल आमच्या कुटुंबातील सदस्य आहे वगैरे सांगतात, पण थंडपणे बैलाला आयुष्यभर यातना देतात. हा विरोधाभासच समजत नाही.
मिपावर मी पूर्वी या विषयावर एक लेख लिहिला होता. दुर्दैवाने बरेच मिपाकर बैलांवर केल्या जाणाऱ्या क्रूर अत्याचारांचे समर्थन करीत होते.
30 Jan 2023 - 11:59 am | राजेंद्र मेहेंदळे
मिपावर मी पूर्वी या विषयावर एक लेख लिहिला होता
लेखाची लिंक देता येईल का?
30 Jan 2023 - 11:59 am | राजेंद्र मेहेंदळे
मिपावर मी पूर्वी या विषयावर एक लेख लिहिला होता
लेखाची लिंक देता येईल का?
30 Jan 2023 - 1:41 pm | श्रीगुरुजी
कधी थांबणार हा क्रूरपणा?
या लेखाचा मूळ उद्देश समजून न घेता किंवा समजूनही मुद्दाम दुर्लक्ष करून स्कोर सेटलिंग, वैयक्तिक पातळीवर घसरणे, उपहास अश्या स्वरूपाचे प्रतिसाद दिले गेले.. काही जणांनी बैलांवर अत्याचार करण्याचे जोरदार समर्थन केले.
30 Jan 2023 - 4:03 pm | राजेंद्र मेहेंदळे
काही प्रतिक्रिया वाचुन धाग्याचे काश्मीर केल्याचे जाणवले.पण लेखाशी मी सहमत आहे.
एकुणातच सहज जाता येता कुत्र्यांना दगड मारणे, मांजरांना काही होत नाही म्हणुन उंचावरुन फेकणे, चतुर वगैरे किड्यांच्या पायाला किवा गोगलगायींना दोरा बांधुन त्यांची मजा बघणे, बुल फाईट, कोंबडे/बकरे झुंजवणे वगैरे प्रकारांचा तिटकारा आहे.
30 Jan 2023 - 1:46 pm | श्रीगुरुजी
हा अजून एक उत्कृष्ट लेख
संस्कृती की संविधान?
30 Jan 2023 - 3:33 pm | श्वेता व्यास
आधी शशक समजली नव्हती, बैलावर कसायाने वार केले असं वाटलं.
पण प्रतिसादांमधून अर्थ समजला.
कथा आवडली म्हणवत नाही.
30 Jan 2023 - 5:50 pm | हणमंतअण्णा शंकर...
हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला असल्याने त्यावेळेस अंगावर आलेला काटा पुन्हा आला.
नेमकी शशक. इतरांप्रमाणेच म्हणेन, शीर्षक दुसरे हवे.
30 Jan 2023 - 6:27 pm | चित्रगुप्त
'शर्यतीचा बैल' हे शीर्षक दिले असते तर जास्त चपखल झाले असते, म्हणजे पिच्चरांमधे वगैरे 'असली कातिल' कौन है, कत्ल किसने किया ... वगैरे जसे अगदी शेवटी समजते, तसे. पण मग एवढा उहापोह पण झाला नसता बहुतेक.
एवढा सगळा उहापोह होऊनही आम्हाला 'शर्यतीचा बैल 'खच्चीकृत' असतो की नाही ? या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही ते नाहीच.