पुस्तक परिक्षण-टेलिकॉम क्रांतीचे महास्वप्न -माझा प्रवास (सॅम पित्रोदा)

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
10 Jan 2023 - 8:27 pm

नमस्कार मंडळी
आपण जवळपास सगळयांनीच नव्वदच्या दशकात झालेली टेलिकॉम क्षेत्रातील क्रांती अनुभवली आहे. त्या दशकात साधारण घरोघरी टेलिफोन आला, आणि जागोजागी एस टी डी/ पी सी ओ उघडले. तोवर गल्लीत/आसपास एक दोन जणांकडे टेलिफोन असे आणि सगळ्यांचे निरोप त्यावरच दिले/घेतले जात. शेजारधर्म म्हणून ते सरसकट मान्यच होते. त्यात फोनधारकालाही आपण काही विशेष करतोय असे वाटत नसे. फारतर त्याची कॉलर जरा टाईट असे इतकेच. फक्त हे फोन कधी कधी दहा दहा दिवस बंद असत तर कधी कधी रॉंग नंबर लागून पैसे वाया जात असत. मुंबईहून मद्रास कलकत्ता बंगलोर अशा ठिकाणी फोन करायला प्रथम ट्रंक कॉल बुक करावा लागे आणि टेलिफोन एक्स्चेंजमधील ऑपरेटर तो मॅन्युअली जोडून देत असे. एकूणच घरात टेलिफोन आणि दारात बजाज स्कुटर असणारे कुटुंब जरा सधन समजले जाई.तर ह्या प्रस्तावनेची गरज म्हणजे आज जेव्हा आपण ५ जी च्या गप्पा मारतो , त्याची पायाभरणी ९० च्या दशकातील टेलिकॉम क्रांतीमुळे झाली आहे आणि त्या क्रांतीमागे असणारे एक महत्वाचे नाव म्हणजे सॅम पित्रोदा हे ही बऱ्याच जणांना माहित असेल. तर या सॅम पित्रोदांचे आत्मचरित्र म्हणावे असे पुस्तक वाचनात आले आणि त्याची ओळख इथे करून देत आहे.

पहिलेच स्पष्ट करतो की सॅम यांचे काँग्रेस प्रेम, राजीव गांधी आणि एकूणच गांधी कुटुंबियांशी जवळीक, टेलिकॉम क्रांतीचे श्रेय काँग्रेसचे की बी जे पी चे की गांधी कुटुंबाच्या दूर दृष्टीचे, त्यातून झालेला कथित किंवा उघड भ्रष्टाचार हे विषय तूर्तास बाजूला ठेवूया. एका सामान्य कुटुंबातील मुलाने ६० च्या दशकात आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर उच्च शिक्षणासाठी अमेरिका कशी गाठली आणि पोटापाण्याची व्यवस्थित तरतूद झाल्यावर आणि कुटुंबातील अनेकांना तिकडे स्थायिक व्हायला मदत केल्यावर काही कारणास्तव भारतात आला असताना इथली टेलिकॉम क्षेत्रातील दुरावस्था बघून आपल्या त्या क्षेत्रातील ज्ञानाचा फायदा आपल्या देशाला का करून देऊ नये या विचाराने भारावून जाऊन आणि तत्कालीन सरकारची मदत घेऊन त्याने एक महास्वप्न कसे प्रत्यक्षात आणले यावरच मी जास्त भर देत आहे.

तर पुस्तकातील गोष्ट सुरु होते गुजरातमधील कछच्या रणाजवळच्या एका सामान्य खेड्यात ज्याचे नाव आहे टिकार. दोन छोटी मुले मातीत उकीडवी बसून अनोळखी पाहुण्यांच्या गप्पा ऐकत आहेत आणि त्यांना "आगगाडी " नावाच्या एका विचित्र वस्तूविषयी बोलताना पाहत आहेत. ही वस्तू काय असावी याचा काही त्यांना तर्क करता येत नाहीये. ती म्हशी एव्हढी मोठी असेल? की चार बैलांनी ओढायच्या गाडी एव्हढी असेल? शेवटी कमालीच्या उत्सुकतेपोटी दुसऱ्या दिवशी ही तिसरीतील मुले शाळा बुडवून सात मैल चालून टीकारच्या दक्षिणेकडे हलवाड गावी पोचतात. स्टेशनवरून दूरवर एक काळा ठिपका त्यांच्याकडे येताना ते बघतात. डोक्यातून धूर ओकणारा आणि आपोआप पुढे येणार तो ठिपका जवळ आल्यावर एक भयानक किंकाळी मारतो तेव्हा मात्र ते सपाटून घाबरतात आणि धूम पळत सुटतात कारण आगगाडी अशी भयंकर आवाज करते हे त्यांना कोणी सांगितलेलेच नसते. तर ह्यातील एक मुलगा म्हणजे सॅम चे बाबा गंगाराम पित्रोदा. त्यांचे पूर्वज लोहारकी करत असल्याने आणि मुख्यतः: पितळ (पित्र) वर काम करत असल्याने आडनाव पडले पित्रोदा. गंगारामचे लग्न थोड्याफार शिकलेल्या शांताशी झाले. पण दुष्काळी परिस्थितीमुळे संसारात नीट भागेना. गंगारामचा एक चुलतभाऊ गाव सोडून ओडिशात गेला होता आणि आपल्या कुटुंबासह सुखाने राहत होता. तिथे रेल्वे बांधायचे काम सुरु असल्याने भरपूर मजुरांची आवश्यकता होतीच. तेव्हा १६ वर्षांचा गंगाराम आणि १४ वर्षांची शांता यांनी एक खूप मोठा निर्णय घेऊन आपले गाव सोडले आणि १००० किलोमीटर दूर ओडिशाला तितीलगढ नावाच्या गावी स्थायिक झाले. महिना २० रुपये पगारावर नोकरी सुरु झाली.

यथावकाश या दंपतीला मुले झाली मंजुळा ,मणेक आणि सत्यनारायण(सॅम). आता मात्र तुटपुंज्या पगारात भागेना आणि मालक पगार वाढवेना. शेवटी गंगारामने तिरीमिरीत नोकरी सोडली. पुढे काय करावे माहित नव्हते. खेडेगावात रोजगाराच्या संधीही फार नाहीत. एका मित्राने सल्ला दिला की तू खिळे बनव , रेल्वेला सारखे खिळे लागतात. गंगारामला कल्पना आवडली. नाहीतरी त्याचे पूर्वज लोहारच होते. लवकरच उधार उसनवार करून त्यांनी टोपलीभर खिळे बनवले आणि विकायला ब्रिटिश ठाण्यावर गेले. मिळाले ते पैसे घेऊन परतले. हा क्रम सुरूच राहिला. हळूहळू ८ मुले जन्मली. दरम्यान गंगारामने लाकडाचा व्यवसायही चालू केला आणि त्यात बऱ्यापैकी कमाईही होऊ लागली. त्याने रेल्वेलाईन जवळ एक बऱ्यापैकी मोठे घर बांधले. काही काळाने एक सॉ मिल सुरु करून लाकूड कापायचा धंदाही सुरु केला. पण आता मुले मोठी झाली होती आणि त्यांच्या पुढच्या शिक्षणाची सोय गावात नव्हती. पण स्वतः: चौथी पास असल्याने शिक्षणाचे महत्व शांताला चांगलेच ठाऊक होते. तिने मन कठोर करून अकरा वर्षांचा मणेक आणि आठ वर्षांचा सॅम यांची गुजरातच्या एका बोर्डिंग स्कुलमध्ये रवानगी केली. ठेचून भरलेल्या आगगाडीत बसून अनेक तासांचा प्रवास करून मणेक आणि सॅम आनंदच्या शारदा मंदिर बोर्डिंग स्कुलमध्ये पोचले. पहिले काही दिवस स्थिरस्थावर होण्यात गेल्यावर शाळेतील गमती जमाती सुरु झाल्या आणि मुले तिथे रुळली. यथावकाश तिथले शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी बडोद्याच्या शाळेत दाखल झाली.आणि पुढे सयाजीराव विद्यापीठात विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन अभ्यास करू लागली. हळूहळू इथली श्रीमंती आणि आपल्या घराची गरीबी यातील तफावत सॅमच्या लक्षात येऊ लागली आणि घरून पैसे मागवत राहण्यापेक्षा आपणच थोडेफार पैसे का मिळवू नये? या विचाराने त्याने इतर मुलांच्या फिजिक्स आणि मॅथ्सच्या शिकवण्या घ्यायला सुरुवात केली. दरम्यान एका मित्राच्या लग्नाच्या निमित्ताने सॅमला आपली सहचारी अंजना म्हणजे अनु भेटली आणि तिच्याशीच लग्न करायचे ह्याचा विचार त्याच्या डोक्यात पक्का झाला. अर्थात ह्यात जात पात, सांपत्तिक स्थिती असे अनेक अडसर होते, शिवाय सॅम चे एमएससी आणि अनुचेही शिक्षण चालू होते. सॅमची इतर भावंडेही शिकायला तिथे आली होती त्यांची जबाबदारी होती. शिकवण्या चालू होत्या. एकीकडे ही प्रेमकहाणी चालू असतानाच सॅमचा पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जायचा विचार चालू होता. शिवाय तिकडून परतल्यावर स्वतःची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी चालू करायचे स्वप्न होते. त्यापायी एक जमीनही खरेदी करून ठेवली होती. या सगळ्यापायी आता खिशात दमडीहि शिल्लक नव्हती. पण तरुणाईच्या अफाट स्वप्नांच्या जोरावर आणि मित्रांकडून मिळालेल्या माहितीवर सॅम ने खटपट सुरु केली आणि इलिनॉईस विद्यापीठात प्रवेश मिळवला. पुन्हा झपाटल्यासारखा शिकवण्या करून आणि काही कर्ज घेऊन प्रवासाला आणि फी साठी लागणारे पैसे जमवले आणि बोटीने मजल दरमजल करीत सॅम आणि त्याचा मित्र भूपेन शिकागोला पोचले. पुस्तकातील मुंबई ते शिकागो हा सगळा प्रवास मुळातूनच वाचण्यासारखा आहे. त्या प्रवासातील गमती जमती, आलेले चित्र विचित्र अनुभव हे प्रत्येकाला आपापल्या पहिल्या वहिल्या प्रदेशवारीची नक्कीच आठवण करून देतील.

तर सॅम तिथे दाखल झाला आणि फिजिक्स मध्ये काय संशोधन करता येईल यासाठी त्याने समुपदेशकांचा सल्ला विचारला . पण फिजिक्समध्ये पी.एच.डी साठी ६-७ वर्षे लागू शकतील हे ऐकल्यावर मात्र तो गडबडला .कारण लवकर सेटल होऊन अनुशी लग्न करून तिला इथे आणणे हे त्याच्यासाठी जास्त महत्वाचे होते. त्यामुळे १ वर्षात पूर्ण करता येईल अशा इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगच्या मास्टर्स डिग्रीचा अभ्यास त्याने सुरु केला, वर थोडे पैसे मिळवण्यासाठी प्रो. ट्रॅप यांच्या इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेझोनन्स लॅबमध्ये असिस्टंट म्हणून काम करायला सुरुवात केली. बाहेर प्रवास करताना ,टी.व्ही. बघताना सॅम ला गोरे आणि काळे, आपले आणि "ते" यातील तफावत जाणवू लागली. १९६५ चा सुमार. एकीकडे व्हिएतनाम युद्ध चालू होते आणि सॅमचे शिक्षणही. जगाचा अनुभव येत होता त्याबरोबरच नवनवीन कल्पनाही डोक्यात घोळ घालत होत्या.

१९६६ मध्ये त्याचे मास्टर्स पूर्ण झाले आणि शिकागोपासून ५० मैलांवर इलिनॉईसमधील क्रिस्टल लेक येथे नोकरी मिळाली. ही टी. व्ही.चे ट्युनर बनविणारी ओक इलेक्ट्रीक नावाची कंपनी होती. दुसरीकडे लॉकहीड मार्टिन ,जनरल डायनॅमिक्स अशा संरक्षण उद्योगातील कंपन्या इंजिनियर्सना मोठं मोठ्या पगारावर खेचून घेत होत्या. काही काळानंतर न्यूक्लियर मशिनरी बनविणाऱ्या व्हिक्टरीन इन्ट्रुमेन्ट या कंपनीत नोकरी लागली आणि त्याबरोबरच अनुच्या घरी आपल्या प्रेमाबद्दल कळवून , तिच्या पालकांची परवानगी घेऊन, अनुला अमेरिकेत आणून सॅम आणि अनुचा विवाह पार पडला. त्या विवाहात आलेल्या अडचणी , त्यावर सॅम आणि मित्रांनी काय काय अतरंगी उपाय योजून केलेली मात, अमेरिकन लोकांच्या नजरेतून दिसणारे भारतीय लग्न, जेवणाची पंगत, होमकुंड, भटजी मिळवण्यासाठी केलेली धडपड आणि सर्वात शेवटी कहर म्हणजे एन बी सी चॅनलने या सोहळ्याचे केलेले प्रक्षेपण हि सगळी धमाल वाचण्यासारखी आहे.

तर अनु आणि सॅमचे वैवाहिक जीवन सुरु झाले आणि कंपनीने शिकागोहून क्लिव्हलॅंडला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. दोघेजण थोडे दिवस तिथे गेलेही, पण सगळी मित्रमंडळी शिकागोला असल्याने त्यांना करमेना आणि अखेर सॅमने नोकरी सोडून शिकागोला परतायचा निर्णय घेतला. पुन्हा नोकरीच्या शोधात असताना मित्राच्या ओळखीने त्याला ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक या कंपनीत नोकरी मिळाली. ही कंपनी जनरल टेलिफोन इलेक्ट्रॉनिक्स (जी टी इ) चा भाग होती जी बेल टेलिफोनची प्रतिस्पर्धी होती आणि जी आता व्हेरिझॉन नावाने ओळखली जाते. तर ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक कंपनी टेलिफोन इन्स्ट्रुमेंट बरोबरच इलेक्ट्रॉनिक स्विचेसही बनवत असे. डिजिटल ऑटोमॅटिक टेलिफोन एक्स्चेंज तयार करायच्या प्रयत्नात असलेल्या एका गटात सॅमचा ज्युनियर म्हणून प्रवेश झाला.

आता ज्यांनी इलेक्ट्रॉनिक्स,कॉम्प्युटर किया तत्सम इंजिनियरिंग मध्ये शिक्षण घेतले असेल त्यांच्यासाठी महत्वाचा आणि अर्थातच पुस्तकातील माझा आवडता भाग सुरु होतो.
सोप्या शब्दात सांगायचे तर सॅम्पलिंग टेक्निक्स, व्हॉइस मॉड्युलेशन टेक्निक्स (पल्स कोड मॉड्युलेशन, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, अँप्लिटयूड मॉड्युलेशन वगैरे), नायकविस्ट क्रायटेरिया ,ब्रूट फोर्स टेक्निक, टेलिफोन सिग्नलिंग , ट्रान्समिशन या सगळ्या गुंतागुंतीच्या कामाशी सॅमची ओळख होऊ लागली. लवकरच या टीमने छोटे स्विचबोर्डस ज्याला प्रायव्हेट ऑटोमॅटिक ब्रँच एक्स्चेंज (पी बी एक्स) म्हणतात ते विकायला सुरुवात केली, त्याबरोबरच त्याचे मार्केटिंग करण्यासाठी सॅमने अमेरिकेत आणि परदेशातही फिरायला सुरुवात केली. पण त्याबरोबरच सॅमच्या हेही लक्षात येऊ लागले की कितीही मेहनत केली तरी जी टी इ मध्ये आपण एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त कमावू शकणार नाही, शिवाय आपण शोधलेल्या गोष्टींचे पेटंट आपण स्वतःच्या नावे घेऊ शकणार नाही, पण त्या पेटंटवर कंपनी मात्र प्रचंड कमावते आहे. या सगळ्या मानसिक लढाईवर शेवटचा घाव पडला जेव्हा सॅमचे अशिक्षित आई वडील तितीलगढ हुन त्याला भेटायला अमेरिकेत आले. एक दिवस सॅम वडिलांना आपले ऑफिस दाखवायला घेऊन गेला. सॅम दिवस रात्र मेहनत करतोय हे तर वडिलांना दिसत होतेच. त्यांनी त्याला विचारले , हे सगळे तू कंपनीसाठी का करतोयस? स्वतः:साठी का नाही करत? सॅमने त्यांना समजावले की हे सगळे उभारायला प्रचंड कष्ट आणि पैसे लागतात आणि एकटा माणूस ते नाही करू शकत. पण दुसरीकडे सॅमला या गुलामगिरीचा कंटाळा आला होता आणि ८ वर्षात या क्षेत्रातले ज्ञानही पक्के झाले होते. अशातच त्यांच्याकडे एक ऑफर आली ज्यात वेसकॉम इंक या कंपनीने सॅमला डिजिटल स्विचेस बनविण्यासाठी आमंत्रित केले आणि त्या बदल्यात भागीदारी देऊ केली. वेस कॉमचे मालक क्लिंट पेनी फार शिकलेले नव्हते पण त्यांच्याकडे दूरदृष्टी होती आणि डिजिटल स्विचिंगला असलेले उज्वल भविष्य त्यांना दिसत होते. जी टी इ च्या तुलनेत ही कंपनी खूपच लहान होती, आणि त्यामुळे प्रत्येकाला स्वातंत्र्य होते. दोन हजार टेलिफोन एका वेळी चालतील असा डिजिटल स्विच बनविण्याचे त्यांचे ध्येय होते. यात बरेच अडथळे होते, सगळ्यात महत्वाचा अडथळा म्हणजे त्यावेळी इलेक्ट्रो मॅकेनिकल रिले वापरले जात आणि २०० लाईन्सचा स्विच बनवायला 2000x2000 म्हणजे ४ दशलक्ष रिले लागले असते म्हणजे तो डिजिटल स्विच एका बिल्डिंग एव्हढा झाला असता. त्याचवेळी इंटेलसारख्या कंपन्या ट्रान्झिस्टरच्या पुढे जाऊन ८०८० सारख्या मायक्रो प्रोसेसरची (म्हणजे आजच्या इंटेल आय ५ आणि आय ७ प्रोसेसरचा खापर खापर पणजोबा) निर्मिती करण्यात गुंतल्या होत्या. तर सॅमने ही गोष्ट हेरली की आपल्या डिजिटल स्विच मध्ये जर स्विचिंग साठी हा मायक्रो प्रोसेसर वापरला तर अतिशय कमी जागेत आपले मशीन तयार होईल आणि त्यानुसार आराखडे बनवायचे काम सुरु झाले. साल होते १९७४. सॅमने त्यावेळापर्यंत चालणारी केंद्रीय (सेंट्रलाइज्ड) पद्धत सोडून विकेंद्रित (डिस्ट्रीब्युटेड) डिजिटल स्विच बनवायचे ठरवले आणि एकामागून एक पेटंटही फाईल करत गेला. आता पुढची मोठी लढाई म्हणजे प्रोजेकट प्लॅन बनवणे. किती माणसे लागतील , किती पैसे लागतील, जागा किती, मनुष्यबळ भरती वगैरे.

ते झाल्यावर पुढे मॅकेनिकल डिझाईन कसे असेल, इलेक्ट्रिकल पार्ट कसे असतील,सॉफ्टवेअर कसे असेल, लॉजिक सर्किट,पॉवर सप्लाय, त्यांची एकमेकांशी जोडणी असे एक ना अनेक. सगळ्यात मोठी अडचण होती सॉफ्टवेअरची. त्यावेळच्या लॅंग्वेज फार प्रगत नव्हत्या आणि ऑपरेटिंग सिस्टीमही बेताचीच होती. मग सॅमने बडोद्यामध्ये परतलेल्या आपल्या मित्राची आणि त्याच्याकडे काम करणाऱ्या तरुण इंजिनियर्स लोकांची मदत घेऊन त्यावर उपाय शोधायला सुरुवात केली. अशा तर्हेने स्वतःची कंपनी चालवायला ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व सॅम इथे शिकला. त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आपले जीवन घडले आणि ज्यांचा आदराने उल्लेख करावा अशी अनेक माणसे सॅमला या प्रवासात भेटली. त्यांचा कृतज्ञता पूर्वक उल्लेख पुस्तकात आला आहे.

पुढे सॅम ला पहिली ऑर्डर फिलिपाइन्स मधून मिळाली, पण इकडे अमेरिकेत त्यांचा २००० लाईन्सचा डिजिटल स्विच कुठे तयार होता? मात्र वेस कॉम चा मालक क्लिंट पेनी खमक्या होता. त्याने सॅम ला कळवले तू बिनधास्त ऑर्डर घे, एक माणूस तिथे नेम, त्याला सतत तैवान,मनिला,अमेरिका अशा फेऱ्या मारून बरेच काम चालले आहे असा देखावा निर्माण करायला सांग तोवर आपण इथे स्विच बनवू. पुढे योगायोगाने सुपरमार्केटमध्ये हिंडताना सॅम ला एक भारतीय माणूस भेटला जो इलेक्ट्रिकल इंजिनीयर होता पण जॉब शोधत होता. सॅम ने त्याला या कामासाठी घेतले आणि थोडे ट्रेनिंग देऊन फिलिपाईन्सला पाठवले. त्यानेही पुढे काही महिने ही बाजू सांभाळली आणि अखेर काही लाख डॉलर्सची ही ऑर्डर पूर्ण झाली. या दरम्यान सॅम ला क्लायंट मॅनेजमेंटचे महत्वाचे धडे क्लिंट पेनीकडून शिकायला मिळाले.

पण आता परत आयुष्य एका नव्या वळणावर येऊन उभे राहिले. सॅम वेस कॉम चा १०% मालक होता तर इतर दोघे मिळून ९०% मालक होते.त्यांनी सॅम ला विश्वासात न घेता स्वत; कडील कंपनीचा हिस्सा रॉकवेल इंटरनॅशनल कंपनीला २७ दशलक्ष डॉलर्स ला विकला. मात्र सॅमने याचा जाब विचारल्यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मग सॅम ने यावर वेगळाच पवित्रा घेतला आणि रॉकवेलशी बोलून माझा हिस्सा तुम्हाला देणार नाही असे सांगून टाकले. शिवाय दुसरीकडे हनीवेल , इमर्सन आणि लॉरेल सारख्या कंपन्यांची ऑफर पडताळून पाहायला सुरुवात केली, आणि हनीवेलने सर्व चर्चे अंती ४० दशलक्ष डॉलर्स पर्यंत कंपनी विकत घ्यायची ऑफर दिली. क्लिंट पेनी आणि इतर याला तयार झाले. पण गोष्ट इथेच संपली नाही

पुढे शिकागोच्या विमानतळावर विमानाची वाट बघताना सॅम ला एक माणूस भेटला जो सौदी अरेबियाच्या राजासाठी काम करत होता. त्याने स्वत: होऊन कंपनी विकत घ्यायचा विषय सॅम कडे काढला आणि त्या साठी सौदीच्या राजाची भेट घ्यावी असे सुचवले. सौदी राजानेही ४० दशलक्ष डॉलर्सची ऑफर दिली पण पुढे काहीच झाले नाही, आणि मग सॅम पुन्हा हनीवेलकडे गेला आणि नवीन ऑफर मॅच करून घेतली. पण तोवर त्याला सरळ रॉकवेलच्या सी इ ओ चा फोन आला आणि त्याने सॅम ला त्याला किती पैसे हवेत असे सरळच विचारले. सर्व परिस्थिती बघता सॅम ला अंदाज आला होताच, त्याने ५० दशलक्ष मागितले आणि रॉकवेलने झटपट व्यवहार होण्याच्या अटीवर ते कबूल केले . लवकरच व्यवहार झाला आणि सॅम ला त्याच्या वाट्याचा पहिला हप्ता म्हणून २० लाख डॉलर मिळाले. शिवाय पुढील ३ वर्षे रॉकवेलमध्ये आर एन्ड डी विभागात प्रमुख राहण्यासाठी वार्षिक ५ दशलक्ष डॉलर्स पगार. तर अशा तर्हेने १९८० साली वयाच्या ३७ व्या वर्षी सॅम लखपती झाला होता. आणि आता पुढच्या आयुष्यात काहीही न करता तो कुटुंबासहित सुखाने राहू शकत होता.

आता आयुष्याचा नवा अध्याय सुरु झाला.रॉकवेल ही अतिशय प्रचंड आणि प्रोफेशनल कंपनी होती. आणि सॅम तिकडे चांगलेच रुळले , अनेक नवीन गुण त्यांनी तिकडून उचलले आणि तिथेच राहिले असते तर तिथल्या एखाद्या विभागाचा प्रमुख म्हणून निवृत्त होऊ शकले असते. पण एकीकडे घरी मित्रमंडळी आणि इतर भारतीयांबरोबर होणाऱ्या चर्चेतून (इंडिया फोरम) त्याला भारतातील विविध समस्यांची जाणीव होत होती. अशातच एकदा काही कामासाठी दिल्लीला आलेले असताना त्यांनी एक विचित्र अंत्य यात्रा बघितली जी बंद पडलेल्या टेलिफोनची लोकांनी काढलेली वरात होती. ज्या क्षेत्रात सॅम तज्ज्ञ होते. ही गोष्ट त्यांच्या मनात रुतून बसली. भारतातील टेलिकॉम क्षेत्राची दुरावस्था आपण सुधारली पाहिजे हे त्यांच्या मानाने घेतले. परत आल्यावर रॉकवेलच्या सी इ ओ कडे हा विषय त्यांनी काढला आणि त्यांनी सुद्धा सॅम ला परवानगी दिली. फक्त त्याने रॉकवेलचे काम करत राहावे या अटीवर. मग घरीही सांगितलं आणि इंडिया फोरम मध्ये मित्रांना सुद्धा कळवले. पुढची १० वर्षे भारतातील टेलिकॉम क्षेत्र सुधारायचे आहे हे ते स्वप्न होते. पण त्यासाठी काय करायचे , कोणाला भेटायचे, कुठून सुरुवात करायची, काहीच माहित नव्हते.(क्रमशः)

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

पुस्तकाबद्दल पहिल्यांदाच ऐकले. छान परिक्षण लिहिले आहे. वाचनालयातून मिळवून वाचतो.

कपिलमुनी's picture

10 Jan 2023 - 9:41 pm | कपिलमुनी

धागा राजकीय वळण कधी घेतो याची वाट बघत आहे

टर्मीनेटर's picture

11 Jan 2023 - 6:25 pm | टर्मीनेटर

@ कपिलमुनी

धागा राजकीय वळण कधी घेतो याची वाट बघत आहे

खुप छान माहीतीपुर्ण मालिका वाटत असल्याने धाग्याला राजकिय वळण लागेल कि नाही ते माहीत नाही, पण शेवटच्या भागावर दिल्या जाणाऱ्या माझ्या भावी प्रतिसादात 'पार्टी विथ द डिफरन्स' च्या एका 'India Shining' सुपरस्टारने सॅम पित्रोदा ह्यांनी घडवलेल्या 'टेलिकॉम क्रांती'ची माती करत 'दुनिया मूठठीमें' कशी केली ह्यावर मी टिप्पणी मात्र नक्की करीन 😀

कर्नलतपस्वी's picture

11 Jan 2023 - 10:46 am | कर्नलतपस्वी

काही कारणास्तव भारतात आला असताना इथली टेलिकॉम क्षेत्रातील दुरावस्था बघून आपल्या त्या क्षेत्रातील ज्ञानाचा फायदा आपल्या देशाला का करून देऊ नये या विचाराने भारावून जाऊन आणि तत्कालीन सरकारची मदत घेऊन त्याने एक महास्वप्न कसे प्रत्यक्षात आणले

मानाचा मुजरा

पुस्तक बघीतले होते पण आपण करून दिलेल्या ओळखी मुळे बकेट लिस्ट मधे टाकून ठेवतो. मिळेल तेव्हा नक्कीच वाचेन.

पुढचा भाग येऊ द्यात.

राजकीय वळण लागून चांगल्या लेखाच्या चिंधड्या होऊ नयेत अशीच इश्वर चरणी प्रार्थना.

मनो's picture

11 Jan 2023 - 11:45 am | मनो

Sam Pitroda यांना प्रत्यक्ष भेटून पाच दहा मिनिटे बोललो आहे, पण हे सगळं माहीत नव्हते.

मस्त लिहिले आहे.नवीन भागाची उत्सुकता आहे.

योगी९००'s picture

11 Jan 2023 - 2:49 pm | योगी९००

मस्त ओळख या पुस्तकाची.. सॅम पित्रोदा हे ग्राउंड लेवलवर काम करून वर आलेत हे माहित नव्हते.

हे पुस्तक मराठीत आहे का?

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Jan 2023 - 11:20 am | राजेंद्र मेहेंदळे

मराठी

मला तसेही ईंग्लिश वाचायला वेळ लागतो त्यामुळे कंटाळा येतो, मरठी कसे जाता येता कधीही वाचले तरी लिंक लागते.

क्रमशः वाचून पहील्यांदाच आनंद झाला 👍
खुपच रोचक सुरुवात, अशाच माहीतीपुर्ण पुढील भागाची प्रतिक्षा आहे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jan 2023 - 7:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय. पुभाशु.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

11 Jan 2023 - 7:46 pm | श्रीगुरुजी

उत्तम व रोचक माहिती आहे.

पित्रोदा राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने तसे काही संदर्भ आल्यास राजकीय वळण लागू शकते.

मित्रहो's picture

12 Jan 2023 - 9:57 am | मित्रहो

बरीच रोचक आणि नवीन माहिती आहे. पुस्तक वाचायला हवे

कुमार१'s picture

12 Jan 2023 - 5:38 pm | कुमार१

छान परिक्षण लिहिले आहे.
पुढील भागाची प्रतिक्षा..

तुषार काळभोर's picture

29 Jan 2023 - 4:13 pm | तुषार काळभोर

हा पहिला भाग सुटला होता. दुसरा भाग वाचून मग हा पहिला भाग वाचला :)
रोचक आयुष्य आहे. ब्रिटीश काळात एक गुजराती तरुण गाव सोडून ओरिसात जातो, तिथे रेल्वेच्या कामावर मजूरी करतो, आणि पुढे त्याचा मुलगा आधी अमेरिकेत आणि नंतर भारतात इतक्या मोठ्या गोष्टी करतो... अमेझिंग!

राजकीय वळण - १. उगाच चिखलफेक न करता, माहिती वाढवणारे राजकीय प्रतिसाद आल्यास काय हरकत आहे?
२. (अवांतर) - ( चंद्रसूर्यकुमार यांचा या विषयावरील प्रतिसाद आता तोंडपाठ झाला आहे ;) त्यामुळे (अजूनही) त्यांचा प्रतिसाद आला नसला तरी त्यांच्या मनातील विचार आणि भावना समजू शकतो... )