छोटा कृष्णा मित्रांसोबत वाड्याच्या अंगणात खेळण्यात गुंग होता. "कृष्णा गौरव्वा आहे का रे घरात ?" ह्या प्रश्नाने त्याचे मन खेळातून बाहेर आले, त्याची मान आवाजाच्या दिशेने वळली - सत्तरी ओलांडून गेलेल्या आज्जी काठी जमिनीला टेकवून उभ्या होत्या. त्याने होकारार्थी मान हलवली . पळत आत जाऊन वर्दी दिली - "आई स्वामी आज्जी आल्या आहेत. " गौरव्वा हातातलं काम टाकून डोक्यावरचा पदर सावरत स्वयंपाक घरातुन बाहेर आली. तोपर्यंत स्वामीनबाई सोप्यातल्या आरामखुर्चीत येऊन विसावल्या होत्या. गौरव्वानं त्यांच्या पायावर डोकं टेकवलं. स्वामीनबाईंनी तिला अभय मुद्रा दाखवत आदेश सोडला - "उद्या तुला महाप्रसादाच्या तयारीला यायचं आहे. तुला माहीत आहेच की मठातल्या मंदिराच्या शिखराचं बांधकाम झालं आहे , त्यानिमित्त उद्या सकाळी सात वाजता एका मोठ्या पीठाच्या थोर महाराजांच्या हस्ते महाभिषेक होणार आहे. त्यानंतर स्वयंपाकाची तयारी होईल. खीर बनायाची तयारी महाराजांच्या हस्ते आज रात्री होईल . मी तर म्हणते तू आज रात्री देखील ये आणि उद्या अभिषेक बघायला सुद्धा ये . अशी संधी परत कधी मिळेल माहिती नाही . येते मी आता . "
स्वामीनबाई निघून गेल्या . स्वामीनबाईंचे पती मठाधीश होते, एक सात्विक व्यक्तिमत्व अशी त्यांचीं ओळख होती. त्यांची मुलं चौदा-पंधरा वर्षाचे असतानाच त्यांना देवाज्ञा झाली . त्यांच्या मृत्यूपश्चात, मठाच्या कामात हस्तक्षेप करण्याचा बराच प्रयत्न बाहेरच्या लोकांनी केला, पण स्वामीनबाईंनी खंबीरपणे ते सगळे प्रयत्न हाणून पडले. मोठ्या मुलाला हाताशी धरून , बुद्धीचातुर्याने त्या मठाचा कारभार चालवू लागल्या . चार प्रतिष्ठित आणि श्रीमंत मंडळी आपल्या सोबत आहेत असा केवळ आभास जरी निर्माण केला तर समाज आपल्याला आदर देतो हे त्या जाणून होत्या. तो मिळवण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली होती. मठाच्या शिखराचं बांधकाम हेही ह्याच कलेचा एक नमुना होता. पतीच्या पुण्याईचा जोरावर बांधकामासाठी आणि महाप्रसादासाठी मोठी वर्गणी आणि साहित्य जमा केले. महाराजांना देखील पूजेसाठी मनवले. हा एक कार्यक्रम मठाची पुढची एक पिढी जगवण्यासाठी पुरेसा आहे हे त्या चांगलंच जाणून होत्या. ह्या एका कार्यक्रमानंतर मठाचे पंचक्रोशीत नाव होईल , पूजेची -अभिषेकाची- लग्नकार्याचीची सारी कामे त्यांच्या मुलांना मिळणार ही त्यांची दूरदृष्टी होती.
संध्याकाळी आपल्या शिष्यांसह महाराज मठात पोचले. तेजस्वी चेहरा , भगवी कफनी , डोक्याला भगवा फेटा , कपाळावर त्रिपुंड्र , गळ्यात -मनगटात रुद्राक्षाच्या माळा आणि पायात खडावा - पाहणार्यांची मान आदराने आपोआप झुकावी असं त्यांचं रूप . स्वभाव मात्र अत्यंत शांत. मठात त्यांचा प्रवेश होताच स्वामीनबाईंनी मुलाकरवी त्यांची पाद्यपूजा केली . ते विधी आवरताच महाराज मठातील मंदिराकडे वळले . अत्यंत आदराने शंभू महादेवाला नमस्कार केला . पुढे स्वामीनबाईंनी कार्यक्रमाची रूपरेखा सांगितली. महाराजांनी फक्त मान हलवून प्रतिसाद दिला. महाराज रात्री फक्त दूध व फलाहार घेणार असल्याची माहिती त्यांच्या शिष्याने दिली. महाराज ध्यानस्थ झाले.
मठाच्या परड्यात खिरीची तयारी सुरु झाली . एक थोडा उथळ खड्डा खणला गेला . त्याच्या तीन बाजूना विटा रचून त्यावर भली मोठी लोखंडी कायली ठेवली गेली. पुरुष मंडळी आडातून घागरीने पाणी उपसून कायलीमध्ये आणून ओतू लागले . कायलीत पुरेसे पाणी ओतल्यावर , मोठी लाकडे कायली खाली सरकवली गेली . अशाप्रकारे चूल मांडून झाली. थोड्या वेळाने महाराज आपल्या शिष्यांसह तिथे पोचले. महाराजानी गणेश वंदना चालू केली . एका शिष्याने भस्माने कायलीवर ओम , स्वस्तिक आणि त्रिपुंड्र बनवले . गणेश वंदना संपवून महाराजांनी , चुलीच्या विटांना भस्म -गंध- हळद-कुंकू लावून त्यावर फुले वाहिली . मग कायलीवर बनवलेल्या त्रिपुंड्रच्या मधोमध गंध- हळद-कुंकू लावले . त्यानंतर कायली खालच्या लाकडांवर बऱ्याच ठिकाणी कापूर ठेवला. महाराजांनी अग्नीला आवाहन केले आणि शिष्याने तो सर्व कापूर प्रज्वलित केला . मग महाराजांनी त्यांच्या शिष्यांसह अन्नपूर्णा स्तोत्राचे स्तवन केले आणि तिला प्रार्थना केली- "हे अन्नपूर्णा माते उद्या शंभू महादेवाचा महाप्रसाद आहे त्यासाठी ही खीर बनवली जात आहे. ह्या कार्यास तुझे आशिर्वाद लाभू देत. उद्या येणाऱ्या प्रत्येक भक्तांची मने तृप्त होतील अशी कृपा कर ".
कृष्णाने गौरव्वाकडे हट्ट धरला - "मलाही अभिषेक पाहायला आणि प्रसादाची तयारी पहायला यायचं आहे. " तो दिवसभर आपल्यासोबत असलेलाच बरं असा विचार करून तिने होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या आधी ते दोघे मठात पोचले . मंदिरात अभिषेकाची जय्यत तय्यारी चालू होती . गावातील बरीच मंडळी तो सोहळा पाहण्यासाठी मठात जमा झाले होते. जमलेल्या सर्व मंडीळीना स्वामीनबाईनी सूचना दिली - महाअभिषेक सोवळ्यात होणार आहे तेव्हा फक्त महाराज आणि त्यांचे शिष्यच गाभाऱ्यात प्रवेश करतील . इतर कोणालाही आत प्रवेश करता येणार नाही. ठीक सात वाजता महाराज धीरगंभीर स्वरात महादेवाचा जयजयकार करत तिथे पोचले . महाराज आणि त्यांचे शिष्य गाभाऱ्यात शिरल्यावर स्वामीनबाई एक खुर्ची घेऊन गाभाऱ्याच्या दारात बसल्या. महाराजांनी पूजेची सुरवात विघ्नहर्त्याच्या प्रार्थनेने केली. पुढे गुरुवंदनाही करण्यात आली - "सदाशिव समारम्भाम् शंकराचार्य मध्यमाम्अस्मद् आचार्य पर्यन्ताम् वंदे गुरु परम्पराम्त्यानंतर". महाराज अभिषेकासाठी पाणी जमा केलेल्या तांब्याच्या घंगाळाकडे वळले . त्या घंगाळाला भस्म-गंध-हळद-कुंकू लावलं. घंगाळाच्या पाण्यात सुद्धा एक एक चिमट हळद-कुंकू टाकण्यात आलं . त्यानंतर पाण्यामध्ये काही बेलपत्र आणि निशिगंधाची फुले वाहण्यात आली. "गंगाम आवाहयामि " असे अभिषेकासाठी गंगेला आवाहन करण्यात आले आणि "हर हर गंगे भागीरथी " च्या जयघोषात उदबत्ती आणि तुपाच्या दिव्याने त्या घंगाळाला ओवाळण्यात आलं . गंगा पूजन आटोपल्यावर महाराजांच्या शिष्यानी शंखनाद केला आणि महाराज डमरू वाजवू लागले.
"हे काय चालू आहे" अशा प्रश्नार्थक नजरेने कृष्णाने गौरव्वाकडे पाहिले. "महादेवाच्या अभिषेकासाठी गंगेला आवाहन केलय आणि डमरू वाजवून महादेवाला जागं केलंय . आता पूजा केलेल्या पाण्याने त्याचा अभिषेक सुरु होईल " हे गौरव्वाच वाक्य संपताच कृष्णाने आईच्या हाताला हिसका दिला. " मीसुद्धा करणार महादेवाला अभिषेक" अशी आरोळी देत त्याने गाभाऱ्याकडे मुसंडी मारली . कृष्णा गाभाऱ्यात जाणार हे लक्षात येताच स्वामीनबाईंनी आपली काठी गाभाऱ्याच्या चौकटीला आडवी लावली , पण कृष्णा मोठ्या चपळाईने वाकून त्या काठीखालून आत शिरला. घंगाळाजवळ ठेवलेला चांदीचा एक रिकामा तांब्या पाण्याने भरला आणि "हर हर महादेव" अशी गर्जना करत त्तो पिंडीवर ओतू लागला. स्वामीनबाईंनी "घोर अमंगळ !" अशी किंचाळी फोडली. ती ऐकून महाराजांच डमरू वादन खंडित झालं . त्यांचं लक्ष पिंडीवर पाणी ओतणाऱ्या लहानग्या कृष्णाकडे गेले. झाला प्रकार त्यांच्या लक्षात आला . बाहेर स्वामीनबाई गौरव्वावर खेकसल्या - " काही वळण आहे की नाही तुझ्या लेकाला. लहान मुलाला इथे घेऊन आलीस ते आलीस , वर लक्ष नाही देता येत का तुला . किती तो बेजाबदारपणा " जमलेल्या सर्व मंडळींच्या कुत्सित नजारा गौरव्वाला काट्यासारखी बोचू लागल्या. तिच्याकडे पाहून बायका कुजबुजू लागल्या . तिने शरमेनं मान खाली घातली . दोन्ही डोळ्यातून गंगा-यमुना मुसंडी मारू पाहत होत्या.
स्वामीनबाई गाभाऱ्याकडे वळल्या - " महाराज मला क्षमा करा , ह्या खोडसाळ मुलांमुळे घोर अमंगळ घडलं आज . कृष्णा ताबोडतोब बाहेर ये . " महाराजांनी कृष्णाला जवळ घेतलं . त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत ते स्वामीनबाईना म्हणाले - " ह्या जगात एक पान सुद्धा महादेवाच्या इच्छेशिवाय हलत नाही , मग इथं ह्या गाभाऱ्यात जिथं आपण त्याच वास्तव्य आहे असं मानतो, तिथे त्याच्या इच्छेविरुद्ध काही घडू शकेल का? ह्या कृष्णाच्या हातून त्याचा अभिषेक व्हावा ही परमेश्वराचीच इच्छा होती . आणि जो सदा शिव आहे त्याची इच्छा अमंगळ कशी असू शकेल . " स्वामीनबाई काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीमध्ये नव्हत्या - " महाराज , अभिषेकाची सर्व तयारी सोवळ्यात केली होती आणि हा कृष्णा... " . तिचं बोलणं खंडित करत महाराज म्हणाले - " पहा ह्याच्या निरागसतेकडे एकदा . आपण फक्त शरीराचं सोवळं पाळतो . पण लहान मुलांचं तर मन सोवळ्यात असतं. मग काय शरीराच्या सोवळ्याची गरज आहे त्याला "स्वामीनबाईंचे तर्क खोडून निघाले तसं त्यांना आपण हारतोय , आपला अपमान होतोय अशी त्यांची भावना बळावत गेली . मग त्यांनी त्यांचा हुकमी एक्का बाहेर काढला - " महाराज हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे . ह्या अभिषेकाचा मान तुम्हालाच मिळावा अशी आमच्या सर्वांची इच्छा होती. पण अभिषेकाची सुरुवात करून ह्या कृष्णाने तुमचा अपमान केलाय. हो की नाही मंडळी? " सर्व मंडळींनी मान हलवून होकार दिला . आता महाराज काही जनमताविरुद्ध जाणार नाहीत आणि थेट त्याच्या अभिमानावरच बोट ठेवल्यामुळे ते कृष्णाला नक्की बाहेर पाठवतील ह्याची तिला खात्री होती. त्यावर महाराज तिला म्हणाले - " आपण ठरलो महादेवाचे दास , आपलं सारं काही त्याच्या चरणी वाहिलेलं . मग अशा परिस्थितीत मान सन्मानाच्या मोहात अडकुन त्याच्याच इच्छेचा अनादर करणं योग्य होणार नाही . जे काही झालं ते त्याचीच इच्छा होती त्यामुळे आजचा संपूर्ण अभिषेक कृष्णाच्याच हातून होईल. " ते कृष्णाला म्हणाले - "अजून तासभर तरी अभिषेक चालेल, थांबणार ना तू इथे ?" मोठ्या उत्साहाने कृष्णा म्हणाला - "हो आजोबा. "
बाहेर स्वामीनबाईंची प्रचंड चरफड चालू होती. मनातला राग चेहरऱ्यावर दिसणार नाही ह्याची काळजी त्या घेत होत्या . काही तरी करून परिस्थिती सांभाळणे गरजेचं आहे असा विचार करत त्या जमलेल्या मंडळींना म्हणाल्या - " पाहिलात का स्वामींचा मोठेपणा , त्यांनी अहंकारावर सुद्धा विजय मिळवला आहे . उगाच नाही मी ह्या कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रण दिला. " मग गौरव्वाकडे पहात त्या म्हणाल्या - " नशीब काढलं ग तुझया लेकाने. स्वामी संपूर्ण अभिषेक त्याच्या हातून करवून घेणार आहेत " इतक्या वेळ तिच्यावर रोखल्या गेलेल्या कुत्सित नजरांमधून अचानक कौतुकाचा वर्षाव होऊ लागला . काय होतंय नेमकं हे काही तिला उमगेना.
गाभाऱ्यात महाराजानी कृष्णाच्या हस्ते अभिषेक चालू केला. कृष्णाला त्यांनी सतत "ॐ नमः शिवाय" चा उदघोष चालू ठेवायला सांगितलं. आधी पाण्याने अभिषेक घातला गेला. त्यानंतर दुधाचा अभिषेक झाला. पिंडीवरच दूध एका पात्रात जमा करण्यात आलं . पिंड पुन्हा पाण्याने धुतली गेली . मग पिंडीवर दही ओतण्यात आलं . पिंडीवर एक बेलपत्र आणि धोतऱ्याचं फुल ठेवून तुपाच्या दिव्याने ओवाळण्यात आलं. मग बेलपत्र, फुल बाजूला करून पिंडीवरच दही पुन्हा एकदा पात्रात जमा करण्यात आलं . पिंड पाण्याने धुतली. आता पिंडीवर मध ओतण्यात आला , त्यानंतर तूप आणि मग साखर ओतण्यात आली. केळाचे काप पिंडीवर दाबून चिकटवण्यात आले . मग पुन्हा तुपाच्या दिव्याने ओवाळण्यात आले. त पिंडीवर जमा झालेल्या सर्व गोष्टी पुन्हा एका पात्रात जमा केल्या गेल्या . पिंड पुन्हा गरम पाण्याने धुण्यात आली . मग पिंडीवर आधी गंधाचं पाणी आणि नंतर भस्माचा पाणी ओतण्यात आलं . त्यानंतर पिंडीला हळद कुंकू लावून बेलाच पान आणि धोतऱ्याचं फुल चढवलं गेलं . मग तुपाच्या दिव्याने ओवाळत आरती म्हंटली गेली . पिंड पन्हा पाण्याने धुतली गेली . एका कळशीमध्ये सुगंधी फुले पाण्यात सोडण्यात आली होती . त्या कळशीतल पाण्याने पुहा एकदा अभिषेक झाला . अभिषेकाचं पाणी एका छोट्या पात्रात जमा केले . महाराजांच्या एका शिष्याने कृष्णापासून सुरुवात करत फुलाने गाभाऱ्यातील सर्वांवर शिंपडले. मग ते पाणी गाभार्यातून बाहेर आणून इतर लोकांवर शिंपडले .
कृष्णाला घेऊन महाराज बाहेर आले , गाभाऱ्याचा पडदा ओढला गेला . आत आरास सुरु झाली . बाहेर आल्यावर स्वामीनबाईकडे पाहत महाराज म्हणाले - " हा कृष्णा मोठा चोर आहे हं . आता त्यांना तूम्ही मला देऊ केलेलं मानरूपी लोणी चोरलं आहे. सावध राहा बरं का. नाही तर तुमचं ही काही तरी महत्वाच चोरेल तो आज! ". महाराजांचे बोल एकूण उपस्थित लोकांना हसू आलं. पण स्वामीनबाईंची करडी नजर जशी फिरली तशी हसू दाबलं गेलं .
अभिषेक संपल्यावर स्वामीनबाई महाराजांना म्हणाल्या - "महाराज भात आणि भाजी साठी चुली मांडून तय्यार आहेत आपण त्यांची पूजा करून अग्नी प्रज्वलित करावा . " "अवश्य" असे उत्तर देऊन महाराज त्यांच्यासोबत परड्याकडे चालू लागले. त्यांचा हात धरून कृष्णा म्हणाला - "आजोबा , मी देखील येणार तुमच्या सोबत ". बाकीची मंडळीही मागोमाग आली .
पाच-सहा चुली मांडून तयार होत्या . त्यापॆकी दोन चुलीवर पितळेची मोठी पातेली ठेवून त्यात पाणी भरण्यात आलं होतं . सर्व चुलींची विधिवत पूजा झाल्यावर पाणी उकळवण्यासाठी दोन चुली प्रज्वलित करण्यात आल्या . मग महाराज खिरीच्या कायलीकडे वळले . रात्रीच गहू शिजायला घातल्यामुळे तो नीट शिजला होता. सकाळी घातलेला गूळही विरघळला होता. दोन पुरुष कायली भोवती फिरूनफिरून खीर घोटवत होते. महाराज तिकडे येताक्षणी त्या दोघांनी महाराजांना नमन केले . महाराजांच्या हस्ते एक छोटी कळशीभर दूध त्या खिरीत अर्पण करण्यात आले. महाराजांनी विनम्रपणे दोन्ही हात जोडून कायलीला नमस्कार केला . मग दोन मोठ्या घागरी भरून दूध खिरीमध्ये ओतण्यात आलं . आणि खीर घोटवणं पुन्हा चालू झालं .
महाराजांनी स्वामीनबाईंना विचारलं - " किती लोक प्रसादासाठी येतील ?" , "महाराज एक हजारभर लोक तरी येतील " स्वामीनबाईनी अभिमानाने सांगितलं . तो आकडा ऐकून कृष्णा म्हणाला - " इतके सारे लोक !! मग ही खीर कशी पुरणार ?" स्वामीनबाईंच्या तळपायाची आग मस्तकाला गेली , त्या कृष्णावर खेकसल्या -" अरे अशा शुभ प्रसंगी कशाला अभद्र बोलतोस ? महाराजांच्या पुण्याईमुळे प्रत्यक्ष अन्नपूर्णा अवतरली आहे इथे . पुरून उरते की नाही बघच तू !" महाराजांनी नजरेनं खुणावत स्वामीनबाईना शांत केलं. कृष्णाला जवळ घेत ते बोलले - " खीर पुरली नाही तर लोक उपाशी परत जातील अशी काळजी वाटते ना रे तुला? मग आपण एक काम करू . आपण दोघे मिळून माता अन्नपूर्णेला प्रार्थना करू . मी म्हणेल ते माझ्यामागून म्हण ." कृष्णाने होकारार्थी मान हलवली , आणि दोघानीं हात जोडून प्रार्थना केली -" अन्नपूर्णे माते , शंभू महादेवाच्या ह्या महाप्रसादात इथं येणाऱ्या प्रत्येक भक्ताला पोट भरून खीर मिळू दे ."
" स्वामीनबाई आरास पूर्ण होत आली असेल, आरतीच्या तयारी केली पाहिजे " असे बोलून महाराज आत निघाले . कृष्णा ही त्यांच्या मागे निघताच स्वामीनबाईंनी गौरव्वाला डोळ्याने खुणवून त्याला थांबवायला लावाले . " महाराज तुम्ही व्हा पुढे, स्वयंपाकाच्या सूचना देऊन मी आलेच " असं बोलून स्वामीनबाईंनी सर्व स्त्रियांना एकत्र केले.
सर्वाना त्यांची कामे वाटून देण्यात आली . गौरव्वाला बाजूला घेऊन स्वामीनबाई म्हणाल्या - " नीट लक्ष ठेव तुझ्या मुलावर. तो आत येता कामा नये, आज पुन्हा जर त्याने काही आगाऊपणा केला तर गाठ माझ्याशी आहे हे विसरू नकोस ." ही धमकी ऐकून गौरव्वाच्या छातीत धस्स झालं. कृष्णाच्या हाताभोवतीची तिची पकड अजून घट्ट झाली . स्वामीनबाई आत निघून गेल्या. कडीपत्ता चुरणे , कोथिंबीर , कांदे , टोमॅटो , वांगी कापणे , भाजलेले शेंगदाणे ,खोबरे खवणने ही कामे वाटून दिल्याप्रमाणे दोन तीन बायका घोळका करून करू लागल्या . गौरव्वाकडे वांगी कापण्याचं काम आलं होतं . चार बायका विळतीवर वांग्याच्या फोडी करून परातीत टाकत होत्या . परातीत जमलेल्या फोडी उचलून जवळ्च्या पातेल्यातल्या पाण्यात टाकण्याचं काम कृष्णाला देण्यात आलं होतं .
इकडे मंदिरात शंभू महादेवाची आरास पूर्ण झाल्यावर आरती सोहळा संपन्न झाला व सर्वाना अभिषेक वाटण्यात आला . अभिषेक झाल्यावर महाराजांनी अध्यात्म-धर्म या विषयावर प्रवचन दिले आणि उपस्थित मंडळींच्या शंकांचे समाधान ही केले . स्वयंपाक झाल्याची वर्दी मिळाली , तसं स्वामीनबाईंनी नैवेद्याचे ताट बनवून घेतलं आणि शंभू महादेवाला नैवद्य दाखवण्यात आला .
"आता सर्वजण प्रसादाचा लाभ बाहेर मांडवामध्ये घेऊ शकतात" अशी घोषणा स्वामीनबाईंनी केली . प्रवचनाला झालेले बहुतांश मंडळी मांडवा कडे वळली . पण जवळपास तीस एक खास मंडळी आत माजघराकडे वळवण्यात आली . तिथे पाट मांडून तय्यार होते, महाराजांसाठी एक पाट सोडून बाकी पाटांवर मंडळी आसनस्थ झाली . स्टीलच्या ताटात सर्व पदार्थ वाढले गेले . पानं तयार होतासरशीच स्वामीनबाई महाराजांना घेऊन माजघरात आल्या आणि त्यांना उद्देशून त्या म्हणाल्या -" महाराज, ही सर्व आपल्या भागातील प्रतिष्ठित आणि दानशूर मंडळी आहेत. शिखराच्या बांधकामासाठी आणि आजच्या महाप्रसादासाठी ह्या सर्वानी सढळ हाताने मदत केली आहे , तरी आपल्या सहभोजनाचा लाभ त्यांना मिळाला तर खूप आनंद होईल . " त्या सर्वांना उद्देशून महाराज म्हणाले -" ह्या शुभ कार्यासाठी हातभार लावण्याची संधी, प्रेरणा आणि शक्ती तुम्हाला मिळाली ही खरोखर महादेवाचीच कृपा होय . धर्म आणि समाज कार्यासाठी निरपेक्ष भावनेने आणि सढळ हाताने दान करण्याची प्रेरणा तुम्हाला सतत मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना " . त्यानंतर स्वामीनबाईकडे वळत महाराज म्हणाले - " बराच उशीर आम्ही आत गर्दी मध्ये बसून आहोत , त्यामुळे मला थोडं अस्वस्थ वाटतंय, तेव्हा मी जेवण बाहेर मांडवातच करेन . ही मंडळी पाटावर बसली आहेत तर ह्यांचं जेवण इथंच होऊ दे ." स्वामीनबाई होकार देत म्हणाल्या - "जशी तुमची इच्छा . पण जेवण झाल्यावर तुम्ही परत इथंच येऊन ह्या मंडळींना तुमच्या दर्शनाचा लाभ द्यावा माझी विनंती आहे . कारण तसा शब्दच दिलाय मी त्यांना . "
थोड्याश्या नाराजीच्या सुरातच "ठीक आहे " असे बोलत महाराज मांडवाकडे निघून गेले. मांडव मंदिराबाहेर रस्त्यावरच घालण्यात आला होता. कुठे ताडपत्री , कुठे चटई , तर कुठे बस्कर अंथरून लोकांची बसण्याची सोय करण्यात आली होती . पहिली पंगत जवळपास पूर्ण भरली होती . तिच्या एका टोकाला एक जास्तीच बस्कर अंथरुवून महाराजांच्या बसण्याची सोय केली . लागोलाग पत्रावळी , द्रोण आणि पाण्यासाठी वाटी लावण्यात आल्या , वाढपी एक एक करून सर्व जिन्नस पानात वाढू लागले . सर्व पदार्थ वाढून झाल्यावर महाराजांनी "हरहर महादेव " चा जयघोष केला आणि सर्वांनी जेवायला सुरुवात केली . जेवण संपवून महाराज माजघरात पोचले. सकाळपासून स्वयंपाकाचं काम करून दमलेल्या लोकांनी सुद्धा दुसऱ्या पंगतीत प्रसादाचा लाभ घेतला. ती सर्व मंडळी पुन्हा परड्यात येऊन विसावली. कृष्णा मात्र खिरीच्या कायली समोर ठाण मांडून बसला. खीर पुरते की नाही ह्याची मोठी उत्सुकता होती त्याला. एका मागून एक पंगती उठत गेल्या .
इकडे माजघरात स्वामीनबाई एकेक प्रतिष्ठित मंडळींना बोलवून महाराजांसमोर त्यांच्या मोठेपणाच व प्रतिष्ठेचं गुणगान गाऊ लागल्या. त्यानंतर समोर आलेल्या मंडळींनी महाराजांना नमस्कार केल्यावर महाराजांनी फक्त- "शुभं भवतु " असा आशीर्वाद दिला. मग महराजांच्या हस्ते स्वामीनबाईंनी प्रत्येकाला एकेक श्रीफळ दिलं . प्रत्येकानं महाराजाना काही ना काही भेटवस्तू देऊ केली , पण महराजांनी काहीही न स्वीकारता आशीर्वाद म्हणून ज्याच्या त्याला परत दिल्या .
शेवटची पंगत उठली तशी कायलीतील खीर एका पातेल्यात ओतण्यात आली . जवळपास दोनशे लोकांना पुरेल इतकी खीर शिल्लक होती. बाकीचे पदार्थ बऱ्यापैकी संपले होती. इतकी खीर उरलेली पाहून कृष्णाला मोठा आनंद झाला. गौरव्वाची नजर चुकवून तो महाराजांना शोधत माजघराच्या दाराशी पोचला . महाराजांना पाहताच त्याने आरोळी ठोकली - "स्वामी आजोबा खूप सारी खीर शिल्लक राहिली आहे . " ते ऐकताच स्वामीनबाई बढाई मारत म्हणाल्या - " काय सांगितलं होतं तुला सकाळी? पुरून उरली की नाही , साक्षात अन्नपूर्णा अवतरली होती स्वामींच्या कृपेने. ती खीर संपूच शकत नाही . " त्यांच्या चेहऱ्यावर सकाळपासून होत आलेल्या अपमानाचा बदला घेतल्याचं समाधान होतं . कृष्णा मात्र एका वेगळ्याच विचारात हरवून गेला होता. जणू काही एखादं कोडं सोडवत होता तो . अचानक तो ओरडला - "मी संपवून दाखवतो ही खीर !"
स्वामीनबाईंना परत दडपण -"आता अजून काय आगाऊपणा करणार हा ? नाही . ह्याला आत्ताच रोखायला हवं . " त्या काही बोलणार इतक्यात महाराज म्हणाले - "नक्की ना कृष्णा ?" कृष्णाने होकाराथी हलवल्यावर महाराज म्हणाले - "मलाही पाहायचं आहे खीर कशी संपते ते. ह्याला कुणीही अडवू नका !" महाराजांच्या चेहर्यावर एक गूढ हास्य होतं . आणि स्वामीनबाईंच्या चेहऱ्यावर एक भलं मोठं प्रश्न चिन्ह - " नक्की कोण जास्त वेडं आहे - कृष्णा कि महाराज?"
" लहान मूल आहे हो ते. काय त्याची बडबड इतकी मनावर घेता . या आमच्या सोबत . आम्हाला सर्वांना काही तरी सांगायचं आहे " अशी प्रतिष्ठित मंडळींपैकी एका व्यक्तीची विनंती ऐकून स्वामीनबाई तिकडे वळल्या . ती मंडळी बोलू लागली - " स्वामीनबाई , खरं तर आम्हाला तुमचे आभार मानायचे आहेत . पण नेमके शब्दच सापडत नाही . पतीच्या अकाली निधनानंतर एक विधवा स्त्री असून खंबीरपणे मठ चालवलात . आता उतार वयात वणवण करून, शिखराचं बांधकाम, आजचा हा महाप्रसादाचा सोहळा अगदी लीलया पार पाडलेत , अगदी शिवधनुष्यच पेलल असं म्हंटल तरी ती अतिशयोक्ती होणार नाही . ह्या कर्तृत्वामुळे मठाची प्रतिष्ठा नक्कीच दूरवर पसरली आहे , तुमच्यामुळेच आम्हाला इतक्या दिव्य महाराजांच्या आशीर्वादाचा त्यांच्या सानिध्याचा लाभ झाला , ह्याची परतफेड फक्त शब्दाने कौतुकाने होऊ शकत नाही ." खरं पाहता हे शब्द ऐकून त्यांच मन सुखावत होतं पण ते भुलणार नाही ह्याची त्या काळजी घेत होत्या . कारण कौतुक करणारा पक्का राजकारणी होता आणि आपल्याकडे त्याच्या कामाचं काही तरी आहे ते त्याला हवं आहे , पण त्या बदल्यात त्याच्याकडूवून आपल्याला काय मिळवता येईल ह्या विचारात त्यांचं मन गुंतलं . एक डाव मांडला जातोय हे त्यांनी हेरलं होतं. त्यांनी आपली चाल खेळली- " अहो खरं तर ह्या कौतुकाचीही गरज नाही , तुम्ही कार्यक्रमाला इतक सहकार्य दिलंत आणि आज स्वतः जातीने उपस्थित राहिलात हेच खूप आहे . अजून काय हवे ?" पटावर पुढची खेळी खेळत गृहस्थ म्हणाले - " खरे कर्तृत्व माणसाला विनम्र बनवते ह्याचा प्रत्यय आज आला . पण तुमच्यासाठी , मठासाठी खरंच काही तरी करायची इच्छा आहे . नाही म्हणू नका " , त्यांना उत्तर देत स्वामीनबाई म्हणाल्या तुमची फारच इच्छा असेल आठवडयातून एकदा तरी मंदिरात दर्शनाला येत जा , जशी इच्छा असेल तशी पूजा,अभिषेक स्वरूपात सेवा करत जा , तुमच्या सवंगड्यानही आणत जा दर्शनाला " थोडंफार अशीच चर्चा बऱ्यापैकी सर्व प्रतिष्ठित मंडळींशी करण्यात स्वामीनबाई व्यस्त झाल्या. कुठे धर्माने प्रतिष्ठेशी हातमिळवणी केली तर कुठे सत्तेशी तर कुठे पैशाशी .
इकडे कृष्णा धावतपळत त्याची वर्गमित्र नायकू आणि बिऱ्या राहात होते त्या गावाबाहेरच्या वस्तीत पोचला. मठात प्रसादाची खीर आहे ती न्यायला या असं तो सर्वाना सांगू लागला . मठातून आपल्याला कुणी तरी बोलावणं धाडलं आहे हे काही त्यांना खरं वाटेना . कृष्णावर विश्वास ठेवून नायकू आणि बिऱ्या मात्र दोन भांडी घेऊन त्याच्या सोबत आली . कृष्णाने त्यांना भांडी भरून खीर दिली. ते दोघे ती खिर घेऊन वस्तीवर पोचले . त्यांची खिरीने भरलेली ती भांडी पाहून, वस्तीवरच्या मंडळींनी हाताला लागेल ते भांडं घेऊन मठाकडे धाव घेतली . मठाच्या अंगणात गर्दी झाली. आणि त्यांचा कलकलाट माजघरात पोचला . इतका काय गोंधळ चालू आहे पाहायला सर्व मंडळी बाहेर आली . बाहेरचं दृश्य पाहून स्वामीनबाईनी उर बडवत हंबरडा फोडला - " इतकी वर्ष तळहाताच्या फोडासारखी जपलेली प्रतिष्ठा आज ह्या कृष्णाने धुळीला मिळवली . सगळा म्हारुडाच आज मठात घुसवला कृष्णाने . कुणी तरी हाकला रे ह्या लोकांना इथून"
त्यांना थांबवत महाराज म्हणाले - "घेऊ दे त्यांना खीर " . "पण महाराज मठाची प्रतिष्ठा आणि पावित्र्य ...." असा प्रश्न स्वामीनबाईंनी उभा केला . त्यावर महाराज म्हणाले - " बाई , सकाळी तुम्हीच म्हणाला होतात ना , खीर बनवायला प्रत्यक्ष अन्नपूर्णा प्रकटली आहे. मग ती खीर जर चार लोकांच्या तोंडात न पडता वाया गेली तर तो अन्नपूर्णेचा अपमान नाही का होणार . गोरगरीबांची भूक जर खीर खाऊन तृप्त झाली तर अन्नपूर्णा प्रसन्नच होईल की . खरं पाहता खीरीची योग्य विल्हेवाट लावायची जबाबदारी तुमची होती , पण तुम्ही दुसरीकडेच व्यस्त होतात. ह्या छोट्या कृष्णाने लाज राखली माझ्या अन्नपूर्णेची . "स्वामीनबाई काही मागे हटायला तय्यार नव्हत्या - " पण हे सगळे गलिच्छ लोक मठात गुसले , प्रतिष्ठा धुळीला मिळाला आणि विटाळ ही झाला. "
महाराज मात्र स्थितःप्रज्ञ होते , अत्यंत शांत सुरात ते म्हणाले - " त्याचं काय आहे ना बाई , खरं पाहता ही मंडळी फक्त अंगणातच आलीत , मंदिरापर्यँत तर गेली नाहीत ना . मग तुमचा तथाकथित विटाळही झाला नाही. आपण जो महादेव रोज पुजतो , त्याला थोडं समजावूनही घेतलं पाहिजे . वैभवभूषित श्रीहरी विष्णू जितके त्याला प्रिय आहेत , तितकेच प्रिय भूत-पिशाच्च गण ही आहेत . ज्याच्या मनाला महादेव खरोखर उमजला त्याच्या मनात भेदभावाला थारा मिळत नाही . "
महाराजांचे विचार सर्वजण थक्क होऊन ऐकत होते . त्यांचे तर्क पटत असले तरी एक धर्मगुरू असं काही तरी सांगतिल हे त्यांना अनपेक्षित होते . महाराज पुढे बोलत राहिले - " राहिला प्रश्न प्रतिष्ठेचा . एक मठाला त्याचाशी का देणं घेणं असावं ? मठ हे परमार्थाचा , सात्विक भक्तीच आणि वैराग्याचं स्फूर्तीस्थान बनायला हवं. "
इकडे कृष्णाने खीर वाटून संपवली . मोठ्या उत्साहाने तो ओरडला - " स्वामी आजोबा खीर संपली " . पळत येऊन महाराजांना तो बिलगला . महाराजांनी प्रेमाने डोक्यावर हात ठेवला . स्वामीनबाईंकडे पाहात ते बोलले - " मी सकाळीच तुम्हाला सावध केलं होतं हा काही तरी चोरणारं म्हणून . तुम्ही तिकडे प्रतिष्ठा जपत राहिलात पण तुमच्या महाप्रसादाचं पुण्य मात्र ह्याने चोरलं "
प्रतिक्रिया
4 Jan 2023 - 6:45 pm | कर्नलतपस्वी
कथा आवडली.
4 Jan 2023 - 9:19 pm | सस्नेह
सुंदर कथा !
वर्णन सुद्धा आवडले .
4 Jan 2023 - 11:20 pm | जेपी
कथा आणी वर्णन दोन्ही आवडले.
असे एक खेडेगाव पाहिलेले आठवले. बहुतेक हिपलनेर. लातूर जवळ.
5 Jan 2023 - 8:04 am | शलभ
खूप सुंदर कथा.
5 Jan 2023 - 5:31 pm | आनन्दा
छान कथा..
6 Jan 2023 - 12:27 am | सुखी
आवडली कथा
6 Jan 2023 - 10:35 am | योगी९००
सुंदर कथा... गोष्टीतले महाराजही आवडले. खरोखर महाराज असलेलेच असे वागतात नाहीतर भोंदू स्वामीन बाईसारखे वागतात.
6 Jan 2023 - 11:08 am | Bhakti
वाह!स्वामी महाराज आणि कृष्णा, सुंदर कथा!
शेवटची ओळ मस्तच आहे.
6 Jan 2023 - 12:14 pm | आंबट गोड
खूपच सुरेख.
विशेषतः लेखनातले बारकावे पाहता तुम्ही हे सगळं अनुभवलं असल्याची खात्री पटते.
किती नीट्स वर्णन!
शिवाच्या अभिषेकाचं वर्णन तर फारच सुरेख. नुसते वाचताना आम्हालाही पुण्य घडलं.... शब्दांजली वाहिल्या सारखी!
6 Jan 2023 - 6:24 pm | Nitin Palkar
छान कथा.
9 Jan 2023 - 9:58 am | पॉइंट ब्लँक
9 Jan 2023 - 11:21 am | टर्मीनेटर
छान आहे कथा! वर्णन पण एकदम चित्रदर्शी 👍 आपण स्वत: गाभाऱ्यात बसुन महादेवाचा अभिषेक बघत आहोत असे वाटले!