पालखी मंदिरातून निघून जवळपास तीन तास झाले होते. पालखी निघाली ती देखील भर दुपारची. डोक्यापासून नखापर्यंत तो भंडाऱ्यात न्हाला होता. अंगातून निघणाऱ्या घामासोबत ओघळत भंडारा थोडा खाली सरकत होता. अनवाणी पायांना रस्त्यावरचे खडे टोचत होते. पण ती देवाची पालखी, ढोलाच्या तालावर, टाळाच्या चालीवर नामघोषसोबत पुढे सरकत राहिली. मानकरी आलटून पालटून पालखी घेत होते. पालखी पुन्हा एका चौकात येऊन थांबली, तसा देवाच्या नावाचा मोठा जयघोष झाला. ढोलाचा आवाज अजून वाढला, भंडारा आभाळाला भिडला. पुन्हा एकदा त्याला पालखी घ्यायचा मान मिळला. डोक्यावर टोपी घातली , देवाचा नाव घेतला आणि पालखीच्या मागे राहून पालखी खांदयावर ठेवली . त्याला खात्री होती ह्या वेळेस त्याची अपेक्षा पूर्ण होणार. तो उत्सुकतेनं त्या क्षणाची वाट पाहात राहिला.
पालखी थांबली तशी गल्लीतल्या बायका-पुरुष घागरी-कळश्या , ओवाळायच्या आरत्या-ताटं घेवून पुढं सरकली. पालखीच्या पुढच्या भोईच्या पायावर हातावर धार धरून पाणी ओतलं सगळ्यांनी लगबगीनं. मग प्रत्येकानं तेच ओले हात भोईच्या डोळ्याला लावले. त्याला कुंकवाचा नाम ओढला गेला आणि पायावर फुलं वाहिली . मग त्याला आरतीनं ओवाळलं . हा विधी उरकला कि लोक पालखी सोबत चालणाऱ्या पुजाऱ्याकड वळत आणि पायावर पाणी ओतण्यापासून ओवाळण्यापर्यंत सगळं मान सन्मान पूजारींना दिला जाई. मग भक्तिभावानं लोक पालखीतल्या पादुकाला हात लावून नमस्कार करत आणि पुजाऱ्या कडून भंडारा कपाळाला लावून घेत आणि एक चिमूट भंडारा हातात घेऊन सोनं मिळाल्याचं समाधान चेहऱ्यावर ठेवून घरी जात.
पण ह्या वेळेस देखील आलेल्या पंधरा वीस लोकातलं एकजणबी पाणी ओतायला मागं आलं नाही. तसही पालखीच्या मागच्या भोईच्या पायावर पाणी ओतायला कमीच लोक येत पण त्याच्याव्यतिरिक्त पालखीला मागं आधार देणाऱ्या प्रत्येकाच्या पायावर एकदोन वेळेस तरी कुणी ना कुणी पाणी ओतलं होत .
डोक्यावर निराशेचं ओझं आणि खांद्यावर पालखी घेऊन तो पुढे चालत राहिला. पाय पुढं जावू लागले तसं मन मात्र मागं जाऊ लागलं - "माझ्याच वाट्याला ही उपेक्षा का?" ह्याचं उत्तर शोधत. आणि ते थांबला ते आठ दिवस मागे जाऊन .
घरी आल्यावाबरोबर त्याने वर्दी दिली - " आई मी आज मंदिरात गेलो होतो तिथं समजल की उद्यापासून आठ दिवस पारायण आहे. मी ह्या वर्षी पारायणाला जायचं ठरवलं आहे. " "मोठा पुण्यवान आहेस बाबा , पारायणाला जातोयस ते " हे आईचं उत्तर मनाला सुखद गुदगुल्या करून गेलं. सकाळी आठ ते दहा पारायण , मग नाष्टा उरकून दोन तास नामस्मरण , भजन आणि मग प्रसादाचं जेवण हा रोजचा कार्यक्रम.
पारायणाचा पहिला दिवस . सगळ्यांना पोथीची एक एक प्रत देण्यात आली. पुजाऱ्यानी त्यांच्या प्रतीची गंध-हळद-कुंकू लावून पूजा केली , फुले वाहिली आणि अगरबत्ती ओवाळली . तिचा मंद सुगंध देऊळभर दरवळत राहिला. पुजाऱ्यानी ती पोथी आपल्या कपाळाला आणि नामघोष केला. त्याबरोबर आलेल्या सगळ्यांच्या कपाळांना पोथी चिकटली आणि मुखातून नामाचा गजर चालू झाला . पुजार्याने हात वर केला तसा नामघोष थांबला. मग जवळ ठेवलेल्या तांब्यातलं एक घोट पाणी पिऊन पुजारी बोलू लागले - " आज सगळे पारायणाला जमलोय खरे , पण आपण इथं का आलोय ? ह्याच कारण एकदा मनात शोधून पाहा. " तशी त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची एक रेष उमटली - " मी पुण्यवान आहे म्हणून " हे उत्तर त्याच्या डोक्यात घुमत राहिले ".
एक दोन मिनिटं थांबून पुजाऱ्यांनी दुसरा प्रश्न विचारला - " मगासच्या प्रश्नाचं उत्तर काहीही असेल. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पारायणाला बसण्याची आपली योग्यता तरी आहे का ?" तो पुजाऱ्यांचं प्रश्न ऐकून त्याचं डोकं चक्रावला. चेहऱ्यावरची आनंदाची ती रेष आता वर सरकून कपाळावर आठी बनून स्थिरावली होती. आपला अपमान होतॊय की काय ह्या शंकेची पाल मनात चुकचुकत राहिली .
पुजारी पुढे बोलत राहिले - " अहो प्रत्येक जण इथं आपली काही तरी इच्छा पूर्ण करून घ्यायला आला आहे. कुणाला बंगला- गाडी पाहिजे, कुणाला नोकरी पाहिजे, कुणाला लग्न जमावून पाहिजे, कुणाच्या घरात पाळणा हालायायला पाहिजे , कुणाला नोकरीत बढती पाहिजे तर कुणाला अजून मोठ्या पगाराची नोकरी, आणि हे सगळं आधीपासून असल तरी मोठेपणा पाहिजे अशी काही ना काही अपेक्षा मनात ठेवून आपण आलोय. पारायण करून आपण देवावर उपकार करणार आणि त्याला ठणकावून सांगणार - बघ मी पारायण केलयं , आता माझं काम झालं पाहिजे. अहो देवाबरोबर व्यवहार करणारी जात आपली . त्याच्या पायाशी जागा मिळावी, त्याचं प्रेम मिळावं म्हणून कुणी इथं आलं नाही. इतके नालायक आपण आहोत. म्हणजेच आपली योग्यता नाही . तरी पण त्यानं इथं आपल्याला जागा दिली आहे. हिच त्याची कृपा. पुढच्या आठ दिवसात आपली योग्यता नाही ह्याची खरोखर जाणीव तुम्हाला होईल आणि तरीही त्याने तुम्हाला जवळ केलाय ह्याचा प्रत्यय देखील तुम्हाला येईल. हीच त्याची कृपा आणि पारायणाचं खरं फळ असेल. "
कुणी तरी तोफेत घालून उडवून द्यावा तसं त्याच मन आठ दिवस पुढं फेकलं गेलं - " आपली योग्यता नाही !" -विजेच्या कानठळ्यासारख कानात घुमत राहिलं - " आठ दिवस पारायण करायला मिळालं , आज पालखीचा मान देखील मिळाला , केवढी मोठी हि कृपा . त्याबद्दलचा कृतज्ञता भाव मनात पुसटसा देखील उमटला नाही आणि वर लोकांनी आपले पाय धुवावेत, आपल्याला ओवाळवं ही हाव मनात धरून ठेवली. खरंच आपली योग्यता नाही. "
पालखी थांबली तसे यंत्रवत चालणारे त्याचे पाय आपोआप थांबले. शरमेनं मान खाली घातली आणि डोळे मिटले. " देव मला माफ तरी करेल का?" असं मनातल्या मनात तो पुटपुटला . ते वाक्य संपलं तोच पायावर सुखद ओलावा त्याला जाणवलं . एक ओला हात त्याच्या त्या मिटलेल्या डोळ्यांवरून देखील फिरला होता.
प्रतिक्रिया
28 Oct 2022 - 7:39 pm | विजुभाऊ
छान आहे कथा.
28 Oct 2022 - 7:55 pm | मुक्त विहारि
छान आहे
28 Oct 2022 - 7:56 pm | सस्नेह
छान.
28 Oct 2022 - 8:11 pm | कंजूस
नेमकं .
29 Oct 2022 - 11:06 am | श्वेता व्यास
कथा आवडली. कमी शब्दात परिणामकारक.
29 Oct 2022 - 8:13 pm | चौथा कोनाडा
व्वा खुप सुंदर...
आटोपशीर शब्द आणि परिणामकारक!
आवडली कथा
+१
29 Oct 2022 - 8:13 pm | चौथा कोनाडा
व्वा खुप सुंदर...
आटोपशीर शब्द आणि परिणामकारक!
आवडली कथा
+१
29 Oct 2022 - 9:44 pm | प्रचेतस
मस्त, आवडली कथा.
30 Oct 2022 - 12:13 pm | भीमराव
शब्दांमध्ये ताकद असते.
1 Nov 2022 - 11:42 am | स्वधर्म
कथा म्हटली की ती थरारक ट्विस्ट असलेलीलच पाहिजे, असे काही नाही, हे जाणवून देणारी कथा. कमी शब्दात जबरदस्त परिणााम साधणारी. अजून लिहा.
1 Nov 2022 - 12:08 pm | श्वेता२४
सुखद कथा. कथेचा आवाका छोटा तरी या कथेचा परीणाम व्यापक आहे. थोडक्यात कीती काही सांगून जाते ही कथा.खूपच आवडली.
2 Nov 2022 - 10:13 am | पॉइंट ब्लँक
उत्साहवर्धक , सुंदर प्रतिक्रियांसाठी सर्वांचे आभार _/\_
2 Nov 2022 - 10:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कथेतून तो सर्व प्रसंग चलचित्रासारखा डोळ्यासमोर उभा झाला.
लेखन शैली, जबरा आहे. कथा आवडली.लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
2 Nov 2022 - 3:54 pm | मालविका
अगदी छान आहे. आवडली