बायोलॉजीत जसे स्पेसिज-फायलम-सब फायलम असं वर्गीकरण असतं तसेच सेवानिवृत्त काकांचे फायलम असतात.त्यापैकी सहज आढळणारा म्हणजे - फायलम पासबुकीया ! या फायलममधले काका विविध देशी-विदेशी -सहकारी नागरी बँकांची पासबुकं सक्काळपासून अपडेट करण्यासाठी फिरत असतात. म्हणजे त्यांच्या खात्यात पैशाचा पूर आलाय वगैरे असं काहीच नसतं. दोन चार लाभांश-एखादा अॅन्युइटी प्लॅन - मासिक व्याज इतकंच काय ते जमा होत असतं पण त्यानिमित्ताने 'मेरीआवाज सुनो'हा कार्यक्रम त्यांना करता येतो. या पासबुकीयांच्या छळवादाला कंटाळून बँकानी पासबुकं छापायचं मशिन लावल्याची अशीही एक अफवा आर्थिक जगतात आहे. पासबुक मशिनच्या बाईचा आवाज भयंकर 'थ्रेटनींग' आहे असं मला शेजारच्या रामकृष्ण अय्यरने एकदा सांगितलं होतं. आता त्यानं मला सांगायचं कारण असं की मी पण त्याचाय फायलममधला माणूस आहे. फरक इतकाच आहे की माझा सब फायलम थोडा वेगळा आहे म्हणजे 'अंकल सरक्यास्टीया' आहे.
************
म्हणजे कसा ?
तर उदाहरणार्थ आमच्या बँकेचं एटीएम वारंवार बंद पडायचं म्हणून मी वारंवार तक्रार केली पण काही उपयोग नाही.बंद म्हणजे बंद ! मग मी एक दिवस बँकेत जाऊन मॅनेजर बाईंना म्हटलं 'अहो आपल्या नाक्यावर आता बेटींग घेतात'
माझ्या या बोलण्यावर शक्य तितका राग आणि तिरस्कार दाखवून त्या ताई म्हणाल्या 'सर, प्लीज बी रेलेव्हंट'
मग मी म्हट्लं 'अहो, रेलेव्हन्स आहे ना !
त्या म्हणाल्या काय आहे ? मी म्हटलं 'तुमच्या बँकेचं एटीएम मशिन आज चालू असेल की बंद यावरच बेटींग घेतात आजकाल !
त्या दिवसापासून आजतगायत आमचं एटीएम अखंडीत चालतं आहे.
*********
एक मोठ्ठा प्रॉब्लेम असा आहे की सब फायलम 'अंकल सरक्यास्टीया'ची माणसं घरच्यांना काहीवेळा म्हणजे बर्याचवेळा लाज आणतात.
मग त्यांच्यावर 'कुठ्ठे कुठ्ठे म्हणून न नेण्याच्या लायकीचा माणूस' असा टिळा लावला जातो.म्हणजे नेमकं काय घडतं ? ते तर साण्गितलंच पाहिजे !
म्हणजे त्याचं असं झालं की बँकेच्या पे-इन स्लीपवर चेकचे विवरण लिहिताना तळाशी एक प्रश्न असायचा तो असा की 'हा चेक कसा मिळाला ? लाभांश ? पेन्शन ? सेल ? इन्हेरिटन्स ? अदर ? वगैरे वगैरे .आता हा प्रश्न बँकेने का विचारायचा तर तसा नियम आहे म्हणून पण हा नियम फक्त १० लाख किंवा जास्त रकमेसाठी लागू होतो. पण नेमकी ती सूचना पे इन स्लीपवर नव्हती. आता काय करावं म्हणून मी त्या स्लीपवर अदर् पुढे NOYB लिहून चेक जमा करायला सुरुवात केली.
पाचव्या चेकच्या वेळी क्लिअरिंगवाल्या काकूंनी मला विचारलं ' ये NOYB क्या है ?
'मी म्हटलं NOYB म्हणजे None Of Your Business'
काकूंनी कपाळावर आठ्या आणून हात मारून घेतला !
********
आता 'अंकल सरक्यास्टीया' सब फायलमचे काका शक्यतो सुटे सुटे फिरतात. बायकोला सोबत घेऊन फिरणं म्हणजे त्यांना 'बेबी सिटींग' केल्यासारखं वाटतं. पण काहीवेळा केवळ अपघाताने बायको सोबत असल्यावर काय होतं हे सांगितलं म्हणजे आजचा अध्याय संपेल.
त्याचं झालं असं की बँकेत NOYB म्हणून नाव कमावल्यनंतर एक दिवस मी आणि बायको बँकेत गेलो होतो. तेवढ्यात क्लियरिंगवाल्या काकूंनी मला बोलावून घेतलं 'चार दिन पैले आपका बड्डे था ना' असं म्हणत आणि एक टी शर्ट दिला. त्यावर छानपैकी मोठ्ठ्या अक्षरात NOYB छापलं होतं.
आता आश्चर्य मला वाटलं आणि मी म्हणालो मी तर रोजच येतो बॅकेत , माझ्या बड्डेला द्यायचा ना ?
त्यावर काकू म्हणाल्या ' रोज आपकी मिसेस आती नही साथमे, आज है साथमे तो सोचा दे दू आजही, वो भी तो पुछे NOYB क्या है ?
***
वेगळं काय सांगायचं त्या दिवसापासून बायकोनं मला 'कुठ्ठे कुठ्ठे म्हणून न नेण्याच्या लायकीचा माणूस' या वर्गात टाकलं आहे.
प्रतिक्रिया
27 Aug 2022 - 3:42 pm | जेम्स वांड
कुठंही न नेण्याच्या लायकीचा पस्तीशितला हा माणूस सारकास्टिकिया काकांना प्रणाम करतोय.
संजोप राव, तुम्ही, बिपिन कार्यकर्ते वगैरे लोकांनी एकेकाळी मिसळपाव सजवलेत, आज परत तुमचे लेखन वाचून फ्रेश वाटले, कृपया लेखन चालू ठेवा ही विनंती.
27 Aug 2022 - 3:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह ! बेटिंग वालं नंबर एक तर, NOYB अनुक्रमे दूसरे पायदान पर. बाकी गुण विभागुन दिले आहेत. ;)
रामदास काका पुन्हा स्वागत आपलं नाव आणि लेखन दिसलं. धावत आलो. येत राहा काका. _/\_
-दिलीप बिरुटे
27 Aug 2022 - 3:54 pm | नंदन
अगदी असेच म्हणतो. पुढील फायलम्सच्या प्रतीक्षेत!
27 Aug 2022 - 4:09 pm | प्रचेतस
नंदनशेठ, तुम्ही पण या भो :)
27 Aug 2022 - 4:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत.
-दिलीप बिरुटे
27 Aug 2022 - 3:56 pm | गवि
रामदासकाकांचा लेख आला, सुखद धक्का. हल्ली लिहीणे पार कमी झाले होते इथे.
लेखाने पूर्वीचे दिवस पुन्हा जागे झाले. आता आणखी येऊ द्या कृपया.
27 Aug 2022 - 4:14 pm | सतिश गावडे
लेख आवडला काका.
या धाग्याच्या निमित्ताने नंदनची मिपावरील हजेरी हा सुखद धक्का आहे. :)
27 Aug 2022 - 5:03 pm | शाम भागवत
👌
27 Aug 2022 - 5:19 pm | सोत्रि
रामदास काकांचं नाव वाचून लेखाची तारिख बघितला आणि कोरा करकरीत लेख अधाशासारखा वाचून काढला!
रामदासकाका आता नियमित लिहीते रहा ईथे, प्लीज!
- (रामदासी) सोकजी
27 Aug 2022 - 6:23 pm | ज्ञानोबाचे पैजार
मी पण आधी लेखाची तारीख तपासली,
काका आता नियमित लिहित जा इथे
पैजारबुवा,
27 Aug 2022 - 7:24 pm | सस्नेह
सेम सेम !
डोळे चोळून चोळून पहिले नाव आणि मग लेखाची तारीख नीट चेकवली.
लेख फर्मास खुसखुशीत आहे हेवेसांनल.
27 Aug 2022 - 9:58 pm | अनन्त अवधुत
मी पण आधी लेख नवा आहे का जुना ते पाहिले.
बाकि लेख खुसखुशीत. आवडला!
28 Aug 2022 - 10:42 am | तुषार काळभोर
रामदास काकांचं नाव वाचून लेखाची तारिख बघितला आणि कोरा करकरीत लेख अधाशासारखा वाचून काढला!
27 Aug 2022 - 5:26 pm | सुनील
नवीन लेखन या सदरात रामदास यांचे नाव वाचून प्रथम तारीख पाहिली!
नेहमी प्रमाणे मस्त!
27 Aug 2022 - 5:33 pm | कानडाऊ योगेशु
फारा दिवसांनी रामदास काका लिहिते झाले. ले.आ.हे.वे.सां.न.ल.
27 Aug 2022 - 5:39 pm | प्रदीप
तुमचं नाव वाचून उत्साहाने वाचायला घेतला, पण बरीच निराशा झाली. तुमच्या अगोदरच्या सर्वच लिखाणाच्या पातळीच्या जवळपास कुठेही जात नाही, हा लेख.
27 Aug 2022 - 6:17 pm | उग्रसेन
मिसळपाववर विरजण घालाय कोणतरी लागतय म्हंजे लागतंय.
बाबुराव
[दह्यावाले]
27 Aug 2022 - 6:29 pm | Trump
मिपावर एक खास आंनदावर विरजण टाकणारे काका होते. ज्यांनी जुना काळ बघितला आहे त्यांना ते माहिती असेल.
28 Aug 2022 - 7:03 am | कंजूस
एका पिढीचे अंतर पडले.
27 Aug 2022 - 5:45 pm | कंजूस
चेक कसा मिळाला ? लाभांश ? पेन्शन ? सेल ? इन्हेरिटन्स ? अदर ? वगैरे वगैरे .आता हा हे मात्र गैरलागू.
चेकच्या पुढचा आकडा / नंबर सांगतो तो कुठल्या पद्धतीच्या अकाउंटमधला आहे. एकदा बरेच वर्षांपूर्वी मुलीला एक कमिशन चेक मिळाला होता. तो मी पीपीफमध्ये भरला. चार दिवसांनी परत आला. तिकडे डिपॉझिट घेतात पण सेविंग अकाउंट मधलेच. आताही तसेच असेल.
बाकी पन्नास हजाराच्या वरच्या रकमेचा चेक भरताना pan no अत्यावश्यक असतो.
बाकी पहिल्या फायलमशी सहमत. वेळ घालवायला येतात पांढरे केसवाले माझ्यासारखे
यावर बँक कर्मचारी ठाम असतात. पण मी फारसा जात नाही.
27 Aug 2022 - 5:49 pm | चौथा कोनाडा
अंकल सरक्यास्टीया एकदम झकासच ...
बोले तो फर्मास !
टी शर्ट मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
... आणि पुढील टी शर्ट साठी दणकून शुभेच्छा!
थोडा अपूर्ण वाटलं लेख !
आणखी किस्से येऊ द्यात या अंकलचे, रामदास जी!
27 Aug 2022 - 6:13 pm | उग्रसेन
सुस्वागतम् लेखन पाहुनशान आनंद जाहला.
बाबुराव
[फाइलम आंजालिया]
27 Aug 2022 - 6:47 pm | Bhakti
वाह,एकदम खुसखुशीत!
बायोलाजी, बॅंक,सरक्याझिम भिन्न संकल्पना एकत्र जोडून खुपचं मस्तच लिहिलंय.भारी.
27 Aug 2022 - 6:53 pm | ॲबसेंट माइंडेड ...
छानच लिहीलय.
27 Aug 2022 - 9:48 pm | Jayant Naik
अजूनही असे अनुभव येऊ द्यात मिसळपाव वर
27 Aug 2022 - 11:05 pm | धर्मराजमुटके
रामदास साहेबांचा लेख म्हटल्यावर त्याची तारीख १८५७ च असणार असे समजून लेख उघडला पण अगदी ताजा लेख पाहून दिल गार्डन गार्डन हो गया. इथे नियमित लिहायचं काय घ्याल ?
तुमच्यासारखे आजोबा आणि अंकल लोक्स एस्बीआय मधे खाते उघडणार तर ऑंटी लोकच भेटणार ना.
जरा आयशीच्या आयशीच्या बँकेत जावा, हेचडीएफ्सीत जावा, त्यांच्या एटीएमवर बेट घ्यायची वेळ येत नाही.
28 Aug 2022 - 12:24 pm | शशिकांत ओक
रामदास काका, पुन्हा एकदा मिपाकरांचा कट्टा समजवणार कि नाही?
मी 'हो' कडून बेटींग केले आहे. पाहुया निकाल पुढील ७ दिवसात काय येतोय ते.
28 Aug 2022 - 1:14 am | अपूर्व कात्रे
हाहा
लेख आवडला.
बँकेचं (घराच्या बाजूला असलेलं) ATM वारंवार बंद पडणं आणि त्यामुळे दुसरं लांबचं किंवा दुसऱ्याच बँकेचं ATM फिरत बसणं [किंवा पैसे काढताना हव्या त्या denomination च्या नोटा नसल्याने पूर्ण transaction रद्द होऊन परत पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागणं (आणि हे सर्व पाठीमागे रांग असताना किंवा आपल्याला घाई असताना)] हे प्रकार माझ्याही बाबतीत वारंवार घडलेले असल्याने त्याबाबतीत तुमच्याबद्दल सहानुभूती आहे.
बँकर मोड ऑन
बँकेच्या नोकरीतील माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो हा जो फायलम पासबुकीया प्रकार तुम्ही वर्णन केलाय तो काउंटर स्टाफसाठी फार वैतागवाणा प्रकार असतो. पहिल्यांदा पासबुक update करून घेऊन मग बँकेतून (कॅशियर काउंटरवरून पैसे काढून/भरून झाल्यावर किंवा मुदत ठेव बनवून किंवा PO/DD काढून झाल्यावर) परत एकदा पासबुक update करून ते तिथेच tally करत बसने हे फायलम पासबुकीया लोकांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यात एखाद्या नोंदीचा संदर्भ लागला नाही की त्याचं निवारण उभ्या उभ्या झालंच पाहिजे असाही प्रचंड आग्रह असतो अशा लोकांचा.
असा पासबुक काउंटरवर बसवलेला स्टाफ म्हणजे बँकेच्या resource चा अपव्यय आहे अशी (योग्य) धारणा बँक अधिकाऱ्यांच्या मनात असते. सहसा या काउंटरवर बसणारा स्टाफ (पदाने जुनिअर आणि) निवृत्ती जवळ आलेला किंवा नवीनच बँकेत लागलेला किंवा प्रचंड कामचोर आणि त्यामुळे बाकी कुठे फिट होत नसलेला असतो बऱ्याचदा....
हल्ली पासबुक छापायची मशीन आल्यामुळे बँकेचं हे unproductive काम बऱ्यापैकी कमी झालेलं असलं तरी संपलेलं नाही आणि संपणार ही नाही.
बँकेचं ATM बंद असण्याची कारणे यावर तर एक वेगळा लेख लिहिता येईल अशा गमती जमती असतात.
मी सहकारी बँकेत branch banking ला असताना ATM व्यवस्थित चालू आहे ना ते बघण्याची जबाबदारी आलटून पालटून माझ्यावर यायची. तेव्हा आमच्या branch चं ATM बंद पडण्याची मुख्य कारणं म्हणजे भरलेले पैसे संपणं किंवा ATM चं बँकेच्या server ची असलेली जोडणी खंडित होणं. जर पैसे संपले असतील तर मग पुन्हा भरायचे म्हणजे सर्वात आधी कॅशियरला ATM मध्ये भरण्यालायक नोटा बाजूला करून ठेवायला सांगणं (पैसे काढायला/भरायला किती गर्दी आहे त्यावर नोटा केव्हा मिळतील हे अवलंबून असायचं) मग ATM ची जबाबदारी असलेले २ अधिकारी एकाचवेळी मोकळे असणं जुळून यायला हवं मग कुठे पैसे परत भरून ATM चालू होतं. हल्ली बऱ्याच बँकांनी हे काम outsource केलं असल्याने branch मध्ये बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या हातात ATM बंद झाले तर काय यावर उपाय नसतो. फुकट शिव्या खायला लागतात मात्र.
जर server शी संपर्क तुटलेला असेल तर कधी कधी ATM मशीन पुन्हा चालू करून काम भागतं. पण पुन्हा चालू व्हायलाही वेळ लागतो. शिवाय तेवढ्या वेळात serverशी संपर्क परत झालेला असावा लागतो.
ATM वापरणाऱ्यांनी वापर करताना घातलेला गोंधळ (manhandling) हा अजून एक वैतागवाणा प्रकार आहे. ATM मध्ये चुकीच्या प्रकाराने कार्ड घालणे (उलटं कार्ड/फाटलेलं, मोडलेलं कार्ड) transaction चालू असताना जबरदस्ती कार्ड काढण्याचा प्रयत्न करणे, कार्ड slot मध्ये असताना काढण्याच्या प्रयत्नात वाकडे करणे, slot मध्ये coins, प्लॅस्टिक किंवा धातूच्या पट्ट्या टाकणे, कागद/पुठ्ठा टाकण्याचा प्रयत्न करणे, number pad वर जोरजोरात बटणं दाबणे, चापटी/बुक्का मारणे, touch screen ATM असेल तर screen बडवणे, deposit cum withdrawal machine असेल तर deposit करताना खोट्या नोटा, फाटलेल्या किंवा चिकटवलेल्या नोटा, प्रचंड चुरगळलेल्या नोटा भरणे, stapler pin मारलेल्या नोटा भरणे, नोटांच्या बंडलात कधी कधी धातूचे किंवा प्लास्टिकचे तुकडे असणे अशा बऱ्याच कारणांमुळे ATM मशीन बंद पडू शकते. असं मशीन जर बंद पडलं तर त्याचा बिघडलेला/तुटलेला भाग बदलेपर्यंत मशीन बंद राहतं. तो भाग मिळायलाही हवा. ATM vendor किंवा maintenance agency कडे तो भाग लगेच उपलब्ध असेल असं नाही. शिवाय त्याचा खर्च नक्की कोण करणार (बँक की vendor) हा उपप्रश्न आहेच.
ATM चोरायचा असफल (किंवा सफलही) प्रयत्न झाल्यामुळे किंवा skimming चा असफल प्रयत्न झाल्यामुळे किंवा रात्री ATM guard ला AC मध्ये झोपायचे असल्याने "ATM बंद आहे" असा बोर्ड लावून शटर ओढून घेतल्याने ATM बंद आहे असे प्रकार ऐकले असले तरी अनुभवले नसल्याने त्यावर काही लिहीत नाही.
हल्ली RBI ने ATM downtime जास्त असणाऱ्या बँकांवर ताशेरे ओढले आहेत तसेच दंडही केला आहे. त्यामुळे आणि ATM बंद असेल तर कॅशियरवर येणाऱ्या भारामुळे (जास्त कामामुळे किंवा कमी वेळात जास्त लोकांना serve करण्याच्या pressure मुळे कामात चुका होऊन बँकेला/कॅशियरला आर्थिक भुर्दंडही बसत असल्याने) आणि negative publicity टाळण्यासाठी बऱ्याच (खासगी) बँक ATM २४ तास चालू ठेवण्यावर भर देतात हल्ली.
सब फायलम 'अंकल सरक्यास्टीया' या प्रकारचे खातेदार मी फार कमी वेळा अनुभवलेत (sarcasm कळलाच नाही असं झालेलं नसावं :P )
पण जवळपास असाच एक किस्सा मी अनुभवलेला आहे. एकदा एक वृद्ध खातेदार एक PO बनवायचा फॉर्म भरून घेऊन आला. तो खातेदार वरचेवर येत असल्याने counter स्टाफच्या ओळखीचा होता. तेव्हा साधारण PO application दिल्यावर दोन तासांनी किंवा दुपारनंतर PO द्यायचो. पण खातेदाराच्या वयाकडे बघून counter वरच्या मुलीने सांगितले पाच मिनिटं बसा लगेच बनवून देते. त्यावर त्या माणसाने " अरे वा, आज काही काम दिसत नाहीये" असा खोचक प्रश्न केलाच.
बँकेच्या pay in slip वर बरीच माहिती विचारतात. त्यातली काही माहिती आता त्यावर लिहिलेली नसली तरी चालते (उदा PAN वगैरे). बरेच जण तर अर्धवट माहिती भरतात. तुमच्या-माझ्यासारखे पूर्ण माहिती भरणारे फार कमी.... उदाहरणार्थ आता प्रत्येक खात्यात PAN link असतो. तो परत परत लिहायची गरज नाही. पण जास्त रकमेचे व्यवहार असतील (cash deposit/withdrawals/cheque deposits वगैरे) तर त्याचं कारण लिहिलेलं बरं असतं. ठराविक रकमेच्या वरचे रोख व्यवहार आणि चेकचेही व्यवहार बँकेच्या Anti Money Laundering Deptच्या नजरेखालून जातात. काही अनियमित आढळलं तर त्या शाखेकडे त्याचा खुलासा मागवला जातो (RBI च्या AML/KYC normsनुसार बँकेकडे अशा व्यवहाराची माहिती असणे (व्यवहाराचे कारण माहित असणे) बंधनकारक आहे. शिवाय बँकेचा वापर money laundering, terrorism financing, वगैरे समाजविघातक कारणांसाठी होऊन त्याद्वारे बँकेची पत ढासळू नये म्हणूनही बँकेला ही माहिती खातेदारांना विचारणे बंधनकारक आहे.
बँकर मोड ऑफ
28 Aug 2022 - 8:42 am | तिमा
रामदासांना कडक सलाम! मिपा पुन्हा पूर्वीची पातळी गाठणार असे लेख आले तर!
28 Aug 2022 - 8:58 am | विवेकपटाईत
आमच्या सौ चे ही असेच मत आहे. "यांना काम सांगणे म्हणजे डोक्याला ताप. "
29 Aug 2022 - 2:03 am | चामुंडराय
छान धागा.
ह्या धाग्याच्या निमित्ताने फायलम नोस्टॉल्जिया होऊन जुने जाणते फायलम मिपाकरस् (मिपा सेपीएन्स) धावून आले असे निरीक्षण नोंदवतो.
29 Aug 2022 - 8:14 am | अथांग आकाश
झक्कास! खुसखुशीत!! मस्त!!!
29 Aug 2022 - 8:59 am | लॉरी टांगटूंगकर
फार काळाने आलेला मोठ्या लेखकाचा लेख!
29 Aug 2022 - 11:03 am | चित्रगुप्त
झक्कास आणि फर्मास लेख आवडला.
29 Aug 2022 - 12:16 pm | टर्मीनेटर
बोले तो... एकदम झकास 👍
प्लिज लिहिते रहा हो रामदास काका! ह्या वर्षीच्या दिवाळी अंकातही तुमचे लेखन वाचायला मिळेल अशी अपेक्षा करतो.
29 Aug 2022 - 12:33 pm | विजुभाऊ
झकास.
परवा च्या फोन मधे हे काही बोलणे झाले नव्हते.
इथे पुन्हा लिहिते झालात खूप आनंद झाला.
आता एन वाय ओ बी चा टी शर्त घातलेला फोटो टाका एक
29 Aug 2022 - 12:34 pm | विजुभाऊ
झकास.
परवा च्या फोन मधे हे काही बोलणे झाले नव्हते.
इथे पुन्हा लिहिते झालात खूप आनंद झाला.
आता एन वाय ओ बी चा टी शर्ट घातलेला फोटो टाका एक
30 Aug 2022 - 9:21 am | मुक्त विहारि
धन्यवाद
30 Aug 2022 - 1:23 pm | राजेंद्र मेहेंदळे
वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे "रामदास" हा आय डी आणि लेखाची तारीख पुनःपुन्हा बघुन खात्री करुन घेतली. पण "काटेकोरांटीची फुले" आठवुन हा लेख तितका फिका वाटला. असो. त्या निमित्ताने काका पुन्हा लिहिते झाले हेही नसे थोडके. लिहिते राहा.
रामदास यांचे समग्र लेखन https://www.misalpav.com/user/185/authored
30 Aug 2022 - 6:40 pm | चाणक्य
हे भारिये
31 Aug 2022 - 11:04 pm | वामन देशमुख
रामदासकाकांचा नवाकोरा लेख वाचून छान वाटलं.
काटेकोरांटीच्या फुलांची व शिलाईची मशीनीची सर मात्र नाही आली.
1 Sep 2022 - 10:16 pm | जव्हेरगंज
झकास आहे लेख!!