अरे तुझी पहीली भजी अजून संपली नाही? आईने गरमागरम कांदाभजीचा दुसरा घाना काढून माझ्या प्लेट मध्ये टाकताना प्रश्न केला. मी प्लेट फ्रिजवर ठेवून कांदाभजीचा एकच तुकडा खाऊन भजांमध्ये बोट फिरवत होतो. अरे कसला विचार करतोय ? तब्येत ठीक आहे ना? आईने विचारले. अगं आई अमिषा सोडून गेली. आई एकदम गोंधळून गेली.
हातातील झारा ताटात ठेवला आणि गॅस बंद केला. काय झालं नेमके तुमच्यात सोडून जाण्यासारखे?
रविवारचा दिवस, फोर्टमध्ये थोडीफार भटकंती करून स्टेशनवर आलो. रात्रीचे नऊ साडेनऊ झाले असतील, ठाणे लोकल बरीच रिकामी होती. मी ज्या डब्यात चढलो त्यात जेमतेम दहा बारा प्रवासी असतील. मी दारात उभा होतो. पांढरा टॉप आणि जीन्स घातलेली एक सुंदर मुलगी समोरून येताना दिसली. ती पटकन शेजारच्या लेडीज डब्यात शिरली. संपलं ! फक्त ओझरते दर्शन झाले. इतक्यात लोकल निघाली आणि ती मुलगी लेडीज डब्यातून खाली उतरली , मी उभ्या असलेल्या डब्याकडे धावत निघाली. विद्यार्थीदशेत स्त्री सौंदर्याच्या माझ्या ज्या कल्पना होत्या त्या माझ्याकडे उसळत जवळ येत होत्या. गाडीने फार वेग घेतला नसला तरी ती दारापर्यंत पोहचेपर्यंत बराच वेग घेतला होता. तिने माझ्याकडे बघून हात पुढे केला आणि भुवया उंचावून चक्क ओळखीचे स्मित केले. मीही लगेच तिचा हात पकडून तिला डब्यात खेचले. तिने स्वतःला सावरले आणि माझा हात न सोडता मला खेचत खिडकीच्या बाजूने सीटवर बसली. समोरच्या किंवा आजूबाजूच्या सीटवर कोणीच प्रवासी नव्हते. तिने अजूनही माझा हात सोडला नव्हता. तिचा उजवा हात माझ्या उजव्या हातात गुंफलेला असल्याने आणि तिने तो तिच्या मांडीवर दाबून ठेवल्याने मला तिरके बसावे लागले. मला हे सर्व स्वप्नवत वाटत होते. तिच्या नाजुक बोटांचा स्पर्श आणि शरीराचा सुगंध अगदी हवाहवासा वाटत होता. मी भानावर येईपर्यंत तिने माझ्यावर बॉम्ब टाकला, तुझे नाव xxx ना? मी हो म्हटले पण तुला कसे माहीत ? तू आज ऑडिशनला आला होतास ना तिथे मी तुला बघितले. वडिलांच्या ओळखीने मला तिथे अनुभवासाठी पार्टटाइम काम करायला मिळाले. उमेदवारांच्या लिस्टचे काम माझ्याकडे होते. त्यात तुझे नाव बघितले. नाव जरा वेगळे वाटले म्हणून आज ऑडिशनला पाठवताना उत्सुकेपोटी बाहेर येऊन तुला बघितले. नावामुळे चेहराही लक्षात राहिला असं म्हणून तिने खळखळून हसून हात दाबला.
पुढच्या स्टेशनवर थोडे प्रवासी डब्यात चढले. समोरच्या सीटवर दोन प्रवासी बसले. मला थोडे अवघडल्यासारखे वाटत होते परंतु हात सोडायची इच्छा होत नव्हती. ती तर फार जुनी ओळख असल्यासारखी माझ्याशी बोलत होती. आता मी बराच सावरलो होतो म्हणून मी तिला म्हटले तुला तर माझा अख्खा बायोडाटा माहीत आहे पण मला तर तुझे साधे नावही माहीत नाही. ती माझ्याकडे खट्याळपणे बघून म्हणाली " तुला माझे फक्त नांव पाहिजे की पूर्ण बायोडाटा ? इतक्या जवळून तिच्या चेहऱ्याचा पूर्ण बायोडाटा मी वाचत होतो. तिच्या सौंदर्याला नाव ठेवायला जागाच नव्हती. मी म्हटले दिला तरी चालेल. तिनेही वेटर जसे उपलब्ध मेनूची लिस्ट वाचतो त्याप्रमाणे अमिषा भोजवानी, सेंट झेवियर बी. ए. प्रथमवर्ष , ठाणे ..... अशी आपली माहिती देऊन खट्याळपणे हसली. तू सिंधी असूनही इतकी छान मराठी कशी बोलतेस ? मी विचारले. माझी आई मराठी लेखिका आहे आणि वडिलही मराठी चांगले बोलत असल्याने घरी आम्ही मराठीतच बोलतो. घरी कोण कोण असतं ? मी विचारले. सध्या माझी धाकटी बहीण आणि मीच असते. सातवीत आहे ती . आई सध्या तिच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पुण्याला गेली आहे . एक एनजीओ चालवत असल्याने सतत बाहेरच असते. बाबा बिझिनेस निमित्ताने कलकत्त्यात असतात. महिन्यातून एखादी चक्कर मारतात घरी. परंतु आई आणि बाबांशी रोज रात्री फोनवर बोलणे होते.
प्रत्येक स्टेशनवर प्रवासी गाडीत चढत होते. हळूहळू प्रत्येक सीट भरत होती परंतु आम्ही आपले हातात हात गुंफून गप्पा मारत होतो. आता आजूबाजूला काय चालले ह्याचे आम्हाला भान नव्हते. आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. ठाणे कधी आले हे कळलेच नाही. स्लो लोकलही खूप फास्ट आली असे वाटले. आम्ही उठलो, उतरताना आमचे हात हातातच होते फक्त ह्यावेळी माझा डावा हात तीच्या उजव्या हातात होता. ठाण्यात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी रहात होतो तरी आम्ही एकाच रिक्षात बसलो. तिने मला आमच्या सोसायटीबाहेर सोडले. पुन्हा भेटू असे म्हणून त्याच रिक्षाने तिच्या घरी गेली.
रविवारी सकाळी दहा वाजता घराची बेल वाजली.शेजारचे काका दारात उभे. अरे खाली एक मुलगी तुला हाका मारतेय, जा लवकर. आमच्या सोसायटीतील सगळे पूर्वाश्रमीचे चाळकरी असल्याने असे निरोप देण्याचे काम तत्परतेने आणि आस्थेने करत. मी पटकन खाली आलो. अमिषा लाल रंगाच्या नूडल स्ट्रॅप टॉप आणि शॉर्ट जीन्स ह्या पेहरावात आपल्या स्कुटीवर बसून माझी वाट बघत होती. समोरच्या सोसायटीतील आणि आमच्या सोसायटीतील गॅलरी फुल्ल भरल्या होत्या. मी तिरक्या नजरने शेजारच्या काकांच्या गॅलरीकडे बघितले. शेजारच्या काकूंनी आपला शेजारधर्म पाळून आमच्या आईलाही "दर्शनाला" बोलावले होते. समोर माझी आई बघतेय आपल्याला असे मी तिला खुणावले. तिने स्कुटीवरून उतरून आईकडे हात हलवून हाय काकू कशा आहात? असे खालूनच विचारले. आईने फक्त हात हलवून प्रतिसाद दिला. चल जरा फिरून येऊ आपण असे म्हणून तिने स्कूटी चालू केली. मी म्हटले थांब जरा मी कपडे बदलून येतो. घरात आता बाबाही गायब झाले होते. मी पटकन कपडे बदलले आणि खाली आलो. तिने स्कूटी माझ्याकडे दिली आणि ती मागे बसली.
बाहेर हायवेवर आल्यावर थोडे तक्रारीच्या सुरात तिला विचारले अशी कशी अचानक आलीस तू ? मला तुझ्या घरचा फोन नंबर दिला असतास तर फोन करून आले असते, असे म्हणत तिने माझ्या पोटावर चापट मारली. मी मनातल्या मनात म्हटले हे प्रकरण आपल्याला जड जाणार असे दिसतेय. आपण नक्की कुठे चाललोय? मी विचारले. तू सांगशील तिथे जाऊ ती म्हणाली. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. मी म्हटले चल तलावपाळीला जाऊ. रविवारी संध्याकाळी आम्ही मित्र मैत्रीण तिथे जमा व्हायचो म्हणून पटकन तेच आठवले.
तिच्याशी गप्पा मारताना बारा कधी वाजले हे कळलेच नाही. मी म्हटलं चल आता निघू , घरी आई बाबा जेवणासाठी माझी वाट बघत असतील. कशाला त्यांना वाट बघायला लावतो ? आपण बाहेर जेवू असे त्यांना सांग. दे घरचा फोन नंबर मी बोलते वाटल्यास. असं म्हणून तिने खिशातून मोबाईल बाहेर काढला. अगं बाई तू नको करू फोन. दे इकडे मीच लावतो. मी घरी फोन लावला. बाबांनी उचलला. मी xxx बोलतोय, मला घरी यायला उशीर होईल तुम्ही जेऊन घ्या. आम्ही बाहेर जेवण करू. माझ्या हातातून तिने मोबाईल कधी घेतला हेही मला कळले नाही. तिने तो नंबर xxx Home असा सेव्ह केला. आता तुझ्याकडे येताना फोन करूनच येईन असे खट्याळपणे हसत म्हणाली. आम्ही जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये जायला निघालो. मी म्हटले अगं आपण बाहेर जेवू पण तुझ्या बहिणीचे काय? आम्ही दोघींनी सकाळीच स्वयंपाक केला आहे. एरवीही सकाळी लवकर उठून आम्ही स्वयंपाक करून टिफीन घेऊन जातो. ती म्हणाली.
बिल तिनेच भरले. आम्ही बाहेर आलो. तिला थोडी खरेदी करायची होती. नौपाड्यात तिने भरपूर पायपीट करून कपड्यांची खरेदी केली. पुन्हा आम्ही तलावपाळीवर आलो. संध्याकाळचे चार वाजले होते. मी म्हटलं चल दुसरीकडे जाऊ. थोड्याच वेळात कॉलेजचे माझे मित्र येतील इथे. येऊ दे की, तेवढीच त्यांची ओळखही होईल. ठीक आहे मी म्हणालो. थोड्याच वेळात आमचा मित्र मैत्रिणींचा ग्रुप जमा झाला. अमिषाशी त्यांची ओळख करून दिली. आमच्या गप्पा रंगल्या होत्या परंतु अंधार पडायला आला आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेऊन निघालो. आज आमच्या ग्रुपमध्ये एक मेंबर वाढला होता. पुढच्या रविवारी अमिषाने आमच्या ग्रुपला तिच्या घरी आमंत्रित केले होते.
अमिषा आणि तिच्या बहिणीने डायनिंग टेबल छान सजवले होते. एखाद्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये गेल्यासारखे वाटत होते. समोरील सुबक कढईतून खमंग वास दरवळत होता. मटर पनीर, भेंडी मसाला, वरण भात, कोशिंबीर सगळेच फक्कड जमले होते. सगळ्यात हटके म्हणजे हिल्सा करी. आम्ही पहिल्यांदाच खात होतो हिल्सा. परंतु इतका चविष्ट मासा आतापर्यंत कधीच खाल्ला नव्हता ह्यावर सर्वांचे एकमत झाले. सर्वात जास्त कौतुक झाले ते अमिषाच्या बहिणीच्या हातच्या सुबक आकार आणि लुसलुशीत चपात्यांचे. दहा बारा लोकांचा स्वयंपाक दोघींनी बनवला होता परंतु काहीच कमी पडले नाही. इतके करूनही दोघी फ्रेश वाटत होत्या. सगळ्यांची मनं जिंकली होती दोघींनी.
टेबल आवरायला आणि साफसफाई करायला सगळ्यांनी मदत केली. सगळं आवरून आमच्या गप्पा रंगल्या. विषय कोणताही असो अमिषा संदर्भ देऊन विनोदी अंगाने त्यात रंगत आणायची. पोटभर जेवण झाल्यामुळे काहींना थोडी सुस्ती आली होती. तिने घरातील चार प्रशस्त बेडरूममध्ये आरामाची सोय करून दिली. मला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली. तिचाही बेडरूम प्रशस्त होता. काचेची भलीमोठी शेल्फ पुस्तकांनी सजली होती. एक शोकेस तिच्या क्रीडा, नृत्य, अभिनय ई. प्रकारात मिळालेल्या पारितोषिकांनी भरली होती. टेबलावर डिजिटल फोटो फ्रेममध्ये तिचे फोटो स्क्रोल होत होते. फोटो ग्लॅमरस होते. एक नऊवारी साडीतील फोटो समोर आला मी तो पॉज केला. खूपच सुंदर दिसतेस ह्या फोटोत, अगदी माझ्या आईसारखी. माझ्या आईचा तरुणपणीचा नऊवारीतील असाच फोटो आहे. खरंच! माझा हात हातात घेऊन तिने थँक्स म्हटले. चार वाजता चहापाणी झाले आणि आम्ही निघालो.
आता दर रविवारी आम्ही तिच्या घरी जमायचो. सुरुवातीला सिनेमा, क्रिकेट, गॉसिप असे आमच्या गप्पांचा विषय असे. त्यात अमिषाही सामील होत असे. परंतु खुबीने ती एखाद्या सामाजिक , राजकीय ,सांस्कृतिक विषयावर किस्से सांगून त्यावर चर्चा घडवत असे. मैत्रिणींनी तिच्याकडून खाद्य रेसिपी शिकून घेतल्या. तिच्याकडील पुस्तके आम्हाला वाचायला दिली. त्यावर ती चर्चा घडवून आणत असे. आता आमच्या ग्रुपला विचारांची दिशा मिळाली होती. तिच्याबरोबर सामाजिक कार्यात भाग घेतल्याने शहराच्या बाहेरील जग कळाले होते. बाहेर लोकांना पाण्यापासून शिक्षणापर्यंत किती समस्या असतात हे प्रत्यक्ष बघितल्यावर जाणीव झाली.
ऑडिशनमध्ये मी सिलेक्ट झालो होतो तेव्हा तिने त्या शोमध्ये भाग घेऊ नको असा सल्ला दिला होता. शोच्या टीमशी तिने ओळख करून दिली त्यांनीही तेच सांगितले. खरंच तिचे ऐकले नसते तर त्या चकचकीत, आक्रमक विश्वातून बाहेर पडणे सहज शक्य झाले नसते.
माझी परीक्षा असल्याने महिनाभर तिच्याकडे जाणार नव्हतो. तिची परीक्षा आटोपली होती. माझी परीक्षा संपण्यापूर्वी दोन दिवस अगोदर अमिषा आणि तिची बहीण १५ दिवस कुलू मनालीला जाणार होत्या. तिचे वडील कलकात्याहून तिथे जाणार होते. आईचे नक्की नव्हते. त्यामुळे आमची भेट मे अखेरीसच होणार होती.
माझे तीन पेपर झाले होते. पुढचा पेपर चार दिवसांनी होता. दोन दिवसात पेपरची सगळी तयारी करू आणि रविवारी अमिषाला भेटून येऊ असा प्लॅन केला. शनिवारी रात्री तिला तसा फोन केला. नको नको तू येऊ नकोस मीच येते तिकडे उद्या सकाळी. सकाळी बरोबर ११ वाजता ती चक्क नऊवारी साडी आणि डोक्यावर पदर घेऊन दारात हजर. घरात येताच हातातील डबा माझ्याकडे दिला आणि माझ्या आई बाबांच्या पाया पडली. आम्ही सगळे अवाक होऊन बघत राहिलो. तिने माझ्या हातातून डबा घेतला आणि आईला घेऊन किचनमध्ये गेली. डब्यातून गरम गरम उकडीचे कळीदार सुबक मोदक आणि ओल्या नारळाची चटणी चार प्लेटमध्ये वाढून बाहेर घेऊन आली. काकू मी बनवले मोदक. मोदक खूपच चवदार होते. आई बाबांनी तिचे तोंडभरून कौतुक केले. आज आईच्या हातचेच मोदक खाल्ल्यासारखे वाटले, मी म्हटले. नाही माझ्यापेक्षा चवदार आणि सुबक आहेत अमिषाचे मोदक .आईने तिला जवळ घेऊन तिची पाठ थोपटली. नऊवारीत खूप सुंदर दिसतेस असे म्हणून आईने तिची दृष्ट काढली. हा म्हणत होता तरुणपणी तुम्हीही नऊवारीत माझ्यासारख्याच दिसत होत्या म्हणून आज मी नऊवारी नेसुनच आली बघायला असे आईचा हात हातात घेऊन म्हणाली आणि पिन काढून डोक्यावरचा पदर खाली घेतला.
मोदक खाल्याने लगेच जेवण जाणार नसल्याने आम्ही गप्पा मारत बसलो. गप्पा इतक्या रंगल्या दीड कधी वाजला ते कळालेच नाही. अमिषाच म्हणाली चला जेवून घेऊ. मी मदत करते वाढायला. आम्ही किचनमध्येच जेवायला बसलो. आई आणि अमिषा पाटावर बसले. अमिषा आम्हाला आग्रहाने वाढत होती जणू काही ती ह्या घरचीच आहे असे वाटत होते. परकेपणा कुठेच जाणवत नव्हता तिच्या बोलण्यात. जेवण झाल्यावर आईने नको म्हणत असताना देखील तिने किचन आवरायला मदत केली. भांडी घासायची पावडर कुठे असे तिने आईला विचारले. कामवाली घासेल भांडी. आज रविवार असल्याने थोडी उशीरा येईल. तू दमली असशील. जरा आराम कर असं म्हणत आई तिला बेडरूममध्ये घेऊन गेली.
आमिषाने मला बोलावले. आईचे नऊवारीतील फोटो बघायचे मला. मी कपाटातून अल्बम बाहेर काढला व त्यातील आईचे नऊवारीतील फोटो दाखवले. खरंच किती साम्य आहे आमच्यात. माझ्या आईला दाखवला तर ती नक्कीच फसेल. काकू तुम्ही थोडी विश्रांती घ्या. चहा घेऊन फ्रेश झाल्यावर तुम्हीही नऊवारी साडी नेसा. आपल्या दोघींचा फोटो काढू. आज उलट मला खूपच फ्रेश वाटतेय. तुझ्याबरोबर फोटो काढायला मला नक्कीच आवडेल पण माझ्याकडे नऊवारी साडी नाही. तुम्ही फ्रेश व्हा मग बघू असे म्हणून ती मला घेऊन खाली आली आणि डिकितून पिशवी आणि पर्स काढली.
आई फ्रेश होऊन आली. अमिषाने पर्समधून छोटा मेकअप बॉक्स काढला. आईला छानपैकी हलकासा मेकअप केला. स्वतःही फ्रेश होऊन आली आणि हलकासा मेकअप केला. पिशवीतून नऊवारी साडी आणि ब्लाऊज काढून आईला नेसायला दिले. माझेच ब्लाऊज आहे, तुम्ही सडसडीत असल्याने फिट बसेल. मी बाहेर गेलो पंधरा मिनिटात तिने आईला नऊवारी साडी चापून चोपून नेसवली. आईला घेऊन ती बाहेर आली. बाबांचा डोळ्यावर विश्वास बसला नाही हे त्यांनी बोलून दाखवले. तिने पर्समधून डिजिटल कॅमेरा काढला आणि मला दोघींचे फोटो काढायला सांगितले. दोघींचे बरेच फोटो काढले. पिशवीतून तिने डिजिटल फोटो फ्रेम काढली त्यात कॅमेरातील कार्ड टाकून दोघींचे काही फोटो टाकले आणि आईच्या हातात ती फोटो फ्रेम दिली. तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून ही छोटीशी भेट म्हणत आईला मिठी मारली.
अमिषा कुलू मनालीवरून मला रोज फोन करायची. दोन दिवसांनी ती परत येणार होती. दुपारी अमिषाचा फोन आला. फोनवर तिची बहिण बोलत होती. काल रात्री अमिषाला अस्थमाचा अटॅक आला आणि तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. हॉस्पिटल मध्ये नेले परंतु त्या अगोदरच ती गेली होती. उद्या सकाळपर्यंत विमानानी मुंबईला येतो. आल्यावर फोन करते. मी फक्त ऐकत राहिलो. फोन ठेवला आणि मित्राकडे जातो असे सांगून घराबाहेर पडलो. मित्रांना हि बातमी ऐकून धक्काच बसला.
..... अगं आई तशी सोडून नाही गेली ती. कायमची सोडून गेली. मी सर्व एका दमात सांगून मोकळा झालो. चार दिवस झाले तुला सांगायला धीर होत नव्हता.
मृगाच्या पावसाने भर दुपारी अंधारून आले होते. जोरदार वाऱ्यासह सोसाट्याच्या पाऊस पडून गेला. आता वातावरण स्वच्छ झाले होते. आई मी जरा पाय मोकळे करून येतो. चालत चालत खाडीच्या विसर्जन घाटावर आलो. आकाशात काळया ढगातून सूर्याची किरणे बाहेर यायचा प्रयत्न करत होते. काळया ढगांच्या कडा चमकत होत्या. मी हातातील चांदीचे ब्रेसलेट खाडीला अर्पण केले. ढगातून सूर्य बाहेर आला आणि सगळीकडे स्वच्छ प्रकाश पडला.
घरी आलो आई फोटो फ्रेम मधील दोघींचे फोटो स्क्रोल करून बघत होती.
xxx
प्रतिक्रिया
7 Aug 2022 - 5:31 pm | प्रमोद देर्देकर
कथा आवडली.
8 Aug 2022 - 12:10 am | गामा पैलवान
देवू,
कथा चांगली खुलवलीये. अमिषा डोळ्यासमोर उभी राहते. मी ठाण्याचा. त्यामुळे सगळं वर्णन अधिक ओळखीचं ( रिलेटेड ) वाटलं. उत्कृष्ट मराठी बोलणारी एक सिंधी मुलगी मित्राच्या ओळखीची आहे. अगदी मराठी वक्तृत्वस्पर्धांत भाग घ्यायची. लोकप्रिय होती. तीच आठवली. ती सुंदरबिंदर नव्हती, पण जाम धडाडीची ( ड्याशिंग ) होती. कॉलेजातल्या कुठल्याशा निवडणुकीसाठी उभी राहिलेली असतांना प्रतिस्पर्ध्याने त्याची पोरं आणून हुल्लडबाजी केली. तर दुसऱ्या दिवशी हिने हिची पोरं नेऊन राडा घातला. कोपरी ( ठाणे पूर्व ) च्या मराठी मध्यमवर्गास झेपणारं प्रकर्ण नव्हतं. मित्र चाळीत राहायचा. ती चाळही लगेच डोळ्यापुढे आली.
अमिषा जशी अकाली गेली, तशी ही गेलेली नाही. देव तिला सुखात ठेवो.
बाकी, सिंधी सोसायटीतनं तलावपाळी म्हणजे लांबचा पल्ला झाला. पण सोबत हवीहवीशी वाटंत असेल तर चलता है. ;-)
आ.न.,
-गा.पै.
8 Aug 2022 - 10:35 am | विजुभाऊ
छान आहे कथा.
शेवट धक्कादायक वाटला
9 Aug 2022 - 9:05 am | सुजित जाधव
छान आहे कथा..
9 Aug 2022 - 9:46 am | जेम्स वांड
छान आहे, आवडली कथा ! अशी आयुष्याने रसरसलेली माणसे अकाली सोडून गेली का खूपच जास्त सूनं वाटतं सगळं, पण जगरहाटी सुरूच राहते आपणही त्यात वाहत राहतो, बाकी काही नाही.
10 Aug 2022 - 6:40 pm | कर्नलतपस्वी
दुनियासे जानेवाले जाने चले जाते है कहा,
कथा आवडली.
13 Aug 2022 - 7:42 pm | धर्मराजमुटके
कथा आवडली. लिहिते रहा !