ध्यान- लाखमोलाचं लक्ष!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
30 Jul 2022 - 3:43 pm

IMA- परभणीद्वारे ध्यान सत्र

सर्वांना नमस्कार. परभणीमध्ये इंडियन मेडीकल असोशिएशन अर्थात् 'आयएमएच्या' वतीने ध्यान सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. ते सत्र घेतानाचा अनुभव आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहे. मला हे सत्र घेण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम आयएमए परभणी व डॉ. अनील दिवाण सर, डॉ. जी. एम. चांडक सर, आयएमए परभणीचे अध्यक्ष डॉ. अनील कान्हे सर, श्री. कारेगांवकर सर व सर्वांना धन्यवाद. त्याबरोबर ह्या आयोजनामध्ये अनेक प्रकारे सोबत असलेल्या निरामय परिवाराचेही धन्यवाद. जे ह्या सत्रासाठी येऊ शकले नाहीत त्यांना व इतरांनाही त्या अनुभवाची माहिती व्हावी, म्हणून हे लिहून आपल्यासोबत शेअर करत आहे.

✪ ध्यान = Watchfulness. जे काही होत आहे ते बघणे, फक्त बघणे
✪ विचारांच्या व भावनांच्या ट्रॅफिकचा भाग बनून नाही तर रस्त्याच्या कडेला उभं राहून ते तटस्थपणे बघणे
✪ प्रॉब्लेम्स, त्रास, दु:ख असतातच. पण दु:खी होणं किंवा न होणं हा आपला पर्याय व निवड असते
✪ आपण आपली सजगता कशावर देतो हे महत्त्वाचं; आपण ज्याला ध्यान देऊ ते मोठं होतं
✪ स्थिर आणि आरामदायक स्थितीतील शरीरासह खोलवर मन शांत झाल्याचा अनुभव
✪ सर्व टेन्शन्स, काळज्या, ताण हे एक तर भूतकाळाशी किंवा भविष्यकाळाशी संबंधित
✪ आजचा दिवस- वर्तमानाचा क्षण सजग होऊन बघणे म्हणजे ध्यान
✪ मनाचं तादात्म्य न होऊ देणं आणि तटस्थतेचं अंतर राखणं म्हणजे ध्यान
✪ ध्यान काढून घेण्याची कलाही आवश्यक. काही वेळेस काही गोष्टींवरून ध्यान काढून योग्य ठिकाणी देणं.

ध्यान- Deconditioning

३० जुलै रोजी ठरल्याप्रमाणे ६.३० ला कार्यक्रम सुरू झाला. ज्या आयएमए हॉलमध्ये योग गुरू प्रशांत पटेल सरांच्या धाकामध्ये लहानपणी योगासनांचा परिचय झाला, त्या ठिकाणी आज ध्यान सत्र घेण्याचा योग आहे! आणि डॉ. अनील दिवाण सर म्हणजे माझ्याच लहानपणीचे नाही तर माझ्या मुलीचेही लहानपणीचे डॉक्टर! उपस्थित डॉक्टर मंडळींपैकी अनेक जण जुने परिचित आहेत आणि अनेकांच्या वैद्यकीय कारकिर्दीचा अवधी माझ्या वयाहून जास्त आहे. अशा दिग्गजांसमोर ध्यान सत्र घेण्याची मला संधी मिळाली आहे. सुरुवातीला निरामयचे श्री. श्रीधर कारेगांवकर ह्यांनी प्रार्थना आणि शरीराला वॉर्म अप करणा-या पवन मुक्तासनाच्या हालचाली घेतल्या. सकाळी लवकर उठून आल्यानंतर ह्या हालचालींमुळे शरीर थोडं मोकळं झालं.

सुरुवातीला ध्यान ही संकल्पना, त्यातील घट ह्यांबद्दल बोललो. ध्यान म्हणजे एकाग्रता, पॉझिटीव्ह थिंकिंग, धारणा नाही. ध्यान म्हणजे फक्त बघणे. विपश्यना शब्दाचाही अर्थ खोलवर बघणे व स्वत:ला बघणे हा आहे. ध्यानाचे अनेक प्रकारचे अनुभव आपल्या सर्वांना येतात. मैदानामध्ये आवेशात खेळणा-या मुलाच्या पायातून रक्त वाहात असतं, पण त्याला त्याची जाणीवच नसते. इतरांना कळतं की, त्याला लागलं आहे, पण तो मस्त खेळत असतो. जेव्हा तो खेळ थांबवून घरी जातो, त्याचं जेव्हा लक्ष खेळातून बाहेर पडतं, पायांकडे जातं, तेव्हाच त्याला जखमेची जाणीव होते. जेव्हा मन त्या वेदनेसोबत align होतं, तेव्हाच त्या वेदनेची जाणीव होते. आपण जर वेदना- दु:खासोबत मन align होऊ दिलं नाही, तर त्या वेदनेची- दु:खाची तीव्रता कमी होते. एक उदाहरण- खूप जास्त वेळ रनिंग करणं ही वैद्यकीय दृष्टीने आपत्ती आहे- वाढलेली हृदय गती, लागलेली धाप, तीव्र वेगाने खर्च होणारी ऊर्जा, थकवा. पण जे सवयीने हळु हळु रनिंग करतात, त्यांचं मन इथे align होत गेलेलं असतं. त्यांना ते आवडत असतं, इतर लोकही पळतात हे बघून मन सहकार्य करतं. शरीराच्या वेदनेवर असलेली सजगता तिथून हललेली असते. त्यामुळे शारीरिक पातळीवर इतकी बिकट स्थिती असूनही सजगता तिथे align नसल्यामुळे ताण असा वाटत नाही. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर मनाच्या conditioning मुळे शरीराच्या वेदनेची जाणीव होत नाही.

ध्यान म्हणजे वस्तुत: अशा conditioning च्या बाहेर येणं. कोणी मला शिवी दिली तर मी संतापणार, तीव्र राग मला येणार हे माझं conditioning आहे. पण ध्यानाच्या सरावाने हे बदलता येऊ शकतं. सजगता स्वत:वर टिकवून ठेवणं म्हणजे ध्यान. मी रस्त्यावरून जाताना एखाद्या दारुड्याने मला शिवीगाळ केली तर माझ्या मनामध्ये लगेचच संताप आणि तीव्र प्रतिक्रिया येते. पण मी जर त्या वेळी माझी सजगता स्वत:वर टिकवू शकलो- माझ्या मनात जे काही सुरू असेल, काही नियोजन सुरू असेल, काही विचार असेल, काही भाव असेल- त्यावर मी माझी सजगता टिकवू शकलो तर मला तितका जास्त त्रास होणार नाही. आणि जरी माझ्या मनामध्ये प्रतिक्रिया आली, राग आला, तरी मी माझा रागसुद्धा तटस्थपणे बघू शकेन. जर माझं अजिबातही ध्यान नसेल, तर मी १००% रिएक्ट करेन आणि मला खूप त्रास होईल, तीव्र प्रतिक्रिया येईल. पण माझं १% जरी ध्यान असेल, तरी माझी किंचितशी सजगता स्वत:वर असल्यामुळे तटस्थतेचं थोडं अंतर तयार होईल आणि मला इतका जास्त त्रास होणार नाही. ९९% मन असेल आणि ध्यान किंवा तटस्थ सजगता १% जरी असेल, तरी हे अंधा-या खोलीमध्ये लावलेल्या पणतीसारखं आहे.

सतत बाहेरच्या गोष्टी, भूतकाळ- भविष्यकाळ अशी सतत बहिर्गामी असलेली सजगता स्वत:कडे वळवण्याची सवय मनाला लावता येऊ शकते. त्यासाठी ध्यानाच्या काही पद्धती- काही अभ्यास करता येऊ शकतात. त्याद्वारे हळु हळु ही सवय स्वत:ला लावता येऊ शकते. आणि योग किंवा व्यायामाप्रमाणे सराव जरी अर्धा- एक तास असला तरी त्याचं application आपण सतत करू शकतो. आणि मग कितीही आणीबाणीची स्थिती आली, तरी आपलं ध्यान तिथे आपल्या उपयोगी पडतं. मग कितीही disturbing situation असली तरी आपण स्वत:ला डिस्टर्ब होण्यापासून थांबवू शकतो. अशा थोड्या चर्चेनंतर प्रत्यक्ष ध्यानाला सुरुवात केली.

(ध्यान व त्याचा उपयोग ह्याबद्दल आधी केलेला संवाद- https://drive.google.com/file/d/1cfsy6WHQ0nkaWFX7El4V05gh00BvZ3uL/view?u... कोरोनामध्ये अनेकांना उपयोगी पडलेलं ध्यानाचं रेकॉर्डिंग- https://drive.google.com/file/d/1VIdQ2AtUMbdkJVdnPyGgg58YyIx0EnX8/view )

स्थिर शरीर आणि शांत होणारं मन

शरीर आणि मन एकमेकांना खोलवर जोडलेले आहेत. शरीराचे काही विकार मनाद्वारे सोडवता येतात, मनाचे काही त्रास शरीराच्या माध्यमातून हाताळता येतात. त्यामुळे मन शांत होण्यासाठी शरीराची मदत घेता येते. शरीर स्थिर होतं तसं मन हळु हळु शांत होण्यासाठी मदत होते. सुरुवातीला आरामदायक व स्थिर स्थितीमध्ये सगळ्यांनी बसून घेतलं. कम्फर्टेबल वाटेल, शरीर स्थिर व रिलॅक्स राहील अशी स्थिती घेतली. शरीर स्थिर आहे व सर्वांची श्वासावर सजगता आहे. ध्यानासाठी अनुकूल वातावरण आहे. बाहेर पक्ष्यांचं गुंजारव, सकाळचं आल्हाददायक वातावरण ध्यानासाठी मदत करत आहे. त्याबरोबर तिबेटी पद्धतीचं ध्यानासाठी बनवलं गेलेलं इन्स्ट्रुमेंटल संगीतही सुरू केलं. आणि एक खोलवर रिलॅक्स होण्याचा अनुभव सर्वांना मिळतोय. अगदी थोड्या सूचना, शांत व सौम्य संगीत, आजूबाजूचं शांत वातावरण ह्यासह सगळ्यांना ध्यानाचा अनुभव घेता येतोय.

मनामध्ये जे काही विचार येत असतील, त्यांच्याकडे तटस्थपणे फक्त बघायचं आहे. Good/ bad असं लेबल न लावता शांतपणे बघायचं आहे. विचारांच्या ट्रॅफिकचा भाग न बनता रस्त्याच्या कडेला उभं राहून बघायचं आहे. सजगता श्वासावर व विचारांवर ठेवायची आहे. अनेकदा आपण दु:ख किंवा प्रॉब्लेम्स avoid करतो किंवा नाकारतो. ती नाकारल्यामुळे जास्त तीव्र होतात. पण जेव्हा आपण दु:ख स्वीकारतो, सजग होऊन त्यांना उघड्या डोळ्यांनी बघतो, तेव्हा ते हलके होतात. ह्यासाठी अतिशय दु:खद आठवणी डोळ्यांपुढे आणून काही काळ त्या सजगपणे बघण्याची सूचना सांगितली. जेव्हा आपण वेदना किंवा दु:ख स्वीकारतो आणि सजग होऊन बघतो, तेव्हा ते हलकं होतं.

सगळे टेंशन्स- ताण- दु:ख एक तर भूतकाळामध्ये जे वाईट घडलं होतं, त्यामुळे येतात किंवा भविष्यकाळाबद्दल असलेल्या भितीमुळे किंवा काळजीमुळे येतात. मनातले विचार- भावना तटस्थपणे बघताना जाणीव होते की, वर्तमानाच्या आत्ताच्या क्षणात तर कोणतंही दु:ख- ताण नाहीय. हे करताना शरीर पूर्ण रिलॅक्स आहे. कुठे ताण वाटत असेल तर शरीर ढिलं करून तो दूर करायचा आहे. सजगता श्वासावर व विचारांवर आहे. ध्यानामध्ये कळतं की, आपले सर्व दु:ख किंवा वेदना एक तर भूतकाळाशी किंवा भविष्यकाळाशी संबंधित आहेत. वर्तमान काळात- ह्या क्षणात कोणतंच दु:ख किंवा ताण दिसत नाही. ध्यानातून ही जाणीवही होते की, समस्या असल्या, प्रॉब्लेम्स असले तरी त्यांच्याशी तादात्म्य करून दु:खी होणं किंवा तादात्म्य न करून दु:खी न होणं, हा पर्याय नक्की आपल्या हातात असतो- तो आपला चॉईस आणि निर्णयही असतो.

लाखमोलाचं लक्ष!

आपण ज्या कशावर लक्ष देऊ, ध्यान देऊ, ते मोठं होतं. अगदी रडणा-या लहान बाळाकडे नुसतं लक्ष दिलं, नुसतं बघितलं, तरी त्याला ऊर्जा मिळते, ते शांत होतं. त्यामुळे आपण कशावर लक्ष द्यायचं- ध्यान द्यायचं हे लक्षपूर्वक ठरवलं पाहिजे. जर आपण दु:खावर- वेदनेवर लक्ष दिलं तर ती मोठी होते. त्याउलट शांतीवर- सजगतेवर लक्ष दिलं तर तीही मोठी होते. ध्यानातली ही सजगता आपल्याला सांगते की, आपलं दु:ख किंवा आपला आनंद, ह्यासाठी आपणच जवाबदार आहोत, इतर कोणीही नाही. दु:ख, वेदना, समस्या, त्रास काहीही असले तरी तादात्म्य करणं न करणं हे फक्त आपल्यावरच असतं. ही जाणीव ध्यान करताना होते. अशी जाणीवही होते की, एका दिवसात जर आपण अनेक गोष्टींबद्दल तक्रारी करत असू तर फार कमी गोष्टींबद्दल आपण कृतज्ञ असतो. ध्यानामुळे ही गोष्ट आपल्या सजगतेच्या रेंजमध्ये येते. आणि आपलं "लक्ष" सतत भूतकाळ किंवा भविष्यकाळाकडे असल्यामुळे आपल्याला हा जो आजचा दिवस मिळाला आहे- जो वर्तमानाचा क्षण मिळाला आहे, त्याची आपल्याला जाणीव नसते. ध्यान करताना आपल्याला ही जाणीव होते आणि आपली सजगता- आपला awareness वर्तमानात येतो, आजच्या दिवसावर व आत्ताच्या क्षणावर येतो. अशा स्वरूपाच्या काही सूचनांसह हे सत्र पुढे गेलं. हे आयुष्य, हे शरीर व आजचा दिवस देणा-या निसर्गाला धन्यवाद देऊन कृतज्ञतेसह हळु हळु ह्या ध्यानाचा समारोप झाला. ध्यानामध्ये स्थिर झालेलं शरीर व शांत झालेलं मन ह्यांचा काही क्षण अनुभव घेऊन अगदी हळुवार जेव्हा ठीक वाटेल तेव्हा शरीराची स्थिती सोडून हळु हळु हा ध्यानाचा अभ्यास पूर्ण झाला. सगळ्यांसोबत माझंही छान ध्यान झालं. इतकं शांत शांत वाटत होतं की, मध्ये मध्ये डोळे मिटले तर अनेक मिनिट गेले तरी कळणार नाही जाणार असं वाटत होतं. अनेकांना वाटलं की, सत्र १०- १५ मिनिटांमध्ये संपलं. पण ध्यानामध्ये ४५ मिनिटांहून जास्त वेळ झाला होता.

कृपया लक्ष द्या!

त्यानंतर थोडी चर्चा झाली. ध्यान किंवा आपलं लक्ष ही इतकी मोठी गोष्ट आहे की, आपण खूप काळजीपूर्वक कुठे लक्ष द्यायचं ते ठरवलं पाहिजे. जिकडे आपण लक्ष देऊ, ती गोष्ट मोठी होते. दु:खावर- वेदनेवर लक्ष दिलं तर ती अजून मोठी होते. त्याउलट छोट्या आनंदावर लक्ष दिलं, तर तेही मोठे होतात. असं हे लाखमोलाचं लक्ष आहे. ध्यानाच्या प्रक्रियेचं एक उदाहरण काळ्या फळ्यावर काढलेला बिंदू हे आहे. सामान्यत: आपण काळ्या फळ्यावर काढलेला बिंदू बघताना शक्यतो फक्त बिंदूच बघतो. पण थोडं "लक्षपूर्वक" बघितलं तर रिकामा कोरा फळाही दिसू शकतो. आणि आणखी लक्षपूर्वक किंवा "ध्यानपूर्वक" बघितलं तर तो बिंदू, कोरा फळा हे तर दिसतीलच पण "बघणारा" सुद्धा दिसेल. दृश्य, दर्शन आणि द्रष्टा अशी ही स्वत:कडे येणारी सजगता. ह्या सजगतेमुळे माझ्या सवयी, माझे विचार, माझा आहार- विहार, माझी जीवनशैली अशा गोष्टींचा कसा परिणाम होतोय, ही जाणीव होते. सजगतेची रेंज जशी वाढत जाते, तसं "माझं शरीर", "माझा अहंकार" ह्याहून पलीकडे जाऊन मी निसर्गाचा एक घटक मात्र आहे, अशी जाणीव होते. अशा प्रकारे हे सत्र आणि नंतरची चर्चा सुंदर झाली. गटामध्ये एकत्र ध्यान केल्यामुळेही सगळ्यांचं ध्यान छान झालं. न पडलेला पाऊस, आल्हाददायक सकाळ, न भुंकलेले कुत्रे व न चावलेले डास ह्यांनीही सहकार्य केलं, त्यांच्याबद्दल मनामध्ये कृतज्ञता आहे. पुन: एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. हे सविस्तर वाचल्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद!

(सेशन आयोजित करण्यासाठी व त्यातील घटकांसंदर्भात माहितीसाठी संपर्क: निरंजन वेलणकर 09422108376, www.niranjan-vichar.blogspot.com हौशी फिटनेस व ध्यानप्रेमी. व्यवसायाने अनुवादक व मनाने लेखक. ध्यानावरील सेशनव्यतिरिक्त आकाश दर्शन सेशन आणि मुलांसाठी fun- learn सेशनचं आयोजन. मोठ्यांसाठी फिटनेस वर्कशॉपचंही आयोजन.)

जीवनमानतंत्रलेखअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

30 Jul 2022 - 4:02 pm | मुक्त विहारि

वाखूसा

शाम भागवत's picture

30 Jul 2022 - 6:22 pm | शाम भागवत

छान.

मार्गी's picture

1 Aug 2022 - 5:08 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद आणि नमस्कार!

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Aug 2022 - 5:42 pm | ज्ञानोबाचे पैजार

नेहमी प्रमाणे हा लेखही मनापासुन आणि प्रामाणीक पणे लिहिलेला.

पुस्तके वाचून ध्यान म्हणजे काय ते उमगत नाही त्याचा अनुभवच घ्यायला लागतो

पैजारबुवा,

मुक्त विहारि's picture

1 Aug 2022 - 6:24 pm | मुक्त विहारि

+1