अलक अर्थात अति लघुकथा
अलक 1
प्लॅन्चेटविषयी ऐकलं तेव्हा पासून करून बघण्याची इच्छा होती. पण भिती पण वाटायची. आज मात्र ठरवलं. अन्या आज घरी एकटाच होता त्यामुळे त्याच्याकडेच जमायचं ठरवलं. मी, विन्या, चारू,दिपू नि अन्या. अन्या त्यातल्या त्यात माहितगार. आम्ही काळोख करून मेणबत्ती पेटवली. त्या खाली अक्षरांचा बोर्ड आणि नाणं ठेवलं. सर्वानुमते एका माहितीच्या माणसाच्या आत्म्याला बोलावलं. पाच मिनिटं शांततेत गेली आणि नाणं थरथरलं. सगळ्यांच्या अंगावर काटा आला. धीर करून अन्याने पहिला प्रश्न विचारला. मग भीड चेपली गेली नि सगळे बोलायला लागले. प्रश्न संपले नि मेणबत्ती पण संपली. सर्वांना एकदम भारी वाटत होतं. पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला होता. त्या उत्साहात एकमेकांशी गप्पा मारायला लागलो.
आणि अचानक मगाचाच आवाज घुमला. आम्ही एकदम स्तब्ध झालो. हा तर त्या आत्म्याचा आवाज. परत कसा आला हा इथे? सगळ्यांच्या चेहर्यावर एकच प्रश्न.
काहीतरी आठवून अन्या ताडकन् उठला. त्याला एकदम घाम फुटला. एकच वाक्य कसाबसा पुटपुटला," मेणबत्ती विझायच्या आत आत्म्याला परत पाठवायचं असतं." आणि आमच्या पायाखालची जमीन सरकली.
अलक 2
लग्नाला बारा वर्षे होऊनही त्यांना अजून बाळाची चाहूल लागली नव्हती. त्याने तर आशाच सोडली होती. पण ती मात्र बेचैन असायची. दोघांचेही रिपोर्ट नाॅर्मल असताना असं का व्हावं? म्हणून दुःखी असायची. तिच्या जावेच्या हि गोष्ट कितीतरी वेळा लक्षात आली होती. पहिल्या मुलानंतर परत जावेला दिवस गेले तेव्हा एकिकडे आनंद तर दुसरीकडे आपली झोळी रिकामी याबद्दल वाईट वाटणं अशा द्विधा मनस्थितीत होती ती. जावेची मनापासून काळजी घेत होती.
आणि नऊ महिने पूर्ण झाल्यावर जावेला छान गुटगुटीत मुलगा झाला. हि जेव्हां बघायला आली तेव्हा रडूच कोसळलं. बारशाच्या दिवशी नाव ठेवायची वेळ आली तेव्हा जावेने हिला पुढे केलंन. हिला समजेना काय चाललंय. जावेने अगदी जपून आपलं तान्ह्य पोर हिच्या पदरात घातलं. "आजपासून तू या बाळाची आई!", असं म्हणत जावेने आपले 'देवकी ' हे नाव सार्थ केले.
--धनश्रीनिवास
प्रतिक्रिया
25 Jul 2022 - 10:57 am | मुक्त विहारि
छान आहेत ...
एकाच वेळी, रामसे आणि अलका कुबल...
25 Jul 2022 - 1:42 pm | वामन देशमुख
+१
25 Jul 2022 - 1:00 pm | कर्नलतपस्वी
मुवींचा प्रतीसाद सुद्धा भारी.
25 Jul 2022 - 1:08 pm | सुखी
अलक आवडल्या