तू समोरून अलवार चालत यायचीस
मी उगाचंच रानफुलं वेचत रेंगाळायचो
पैंजणांची रुणझुण पुढे निघून जायची
मागे खच पडायचा पाऊलभर स्वप्नांचा
तू पावसात आडोसा पाहून थांबायचीस
मी मुद्दामचं भिजत पुढे निघून जायचो
काकणांची किणकिण कानाआड व्हायची
मागे ढीग पडायचा सकवार निःश्वासांचा
तू जराही वळून न पाहता निघून जायचीस
मी नुसताच थिजून पाहत राहायचो शून्यात
डोळ्यांच्या कडांवर मळभ दाटून यायचे
मागे सडा पडायचा ओंजळभर आसवांचा
मी धीटपणे कधी पाहू शकलोचं नाही तुला
आताशा तुझा चेहराही नीटसा आठवत नाही
नाकातील चमकी मात्र चमकत राहते अधे-मध्ये
आणि नुसताच गंध येत राहतो कडवट रानफुलांचा
#चक्कर_बंडा
प्रतिक्रिया
20 Jul 2022 - 1:28 am | राघव
आवडली. :-)
21 Jul 2022 - 7:14 pm | चक्कर_बंडा
धन्यवाद.....
20 Jul 2022 - 10:20 am | चांदणे संदीप
छानच. आवडली.
सं - दी - प
21 Jul 2022 - 7:15 pm | चक्कर_बंडा
धन्यवाद.....
20 Jul 2022 - 10:51 am | कर्नलतपस्वी
आमच्याच जमान्यातलं दिसतायं!
घराच्या समोर ,दगडी कट्ट्यावर बसायची
कितीही येरझारा घातल्या
तरी नाही कधी बोलायची
आता नाना नानी पार्क मधे भेटतेस
तोंडभरून हसतेस
जुन्या आठवणी बद्दल
अजुनही बोलत नाही
मनाची किवाडं खोलत नाहीस
तेवढचं मनाला बर वाटतं
माझ्या मनात जे आहे
तेच तुझ्या मनात आहे
अजुनही हेच मला खर वाटतं
21 Jul 2022 - 7:20 pm | चक्कर_बंडा
:-) वयाने माहीत नाही पण मनाने म्हणा हवं तर....
20 Jul 2022 - 12:04 pm | ज्ञानोबाचे पैजार
आवडली
पैजारबुवा,
21 Jul 2022 - 7:20 pm | चक्कर_बंडा
धन्यवाद....
20 Jul 2022 - 7:27 pm | Bhakti
वाह, खुप सुंदर
तू मनमुराद बोलायचा तेव्हा काळच थांबायचा
मी मुकी अबोली सारखी फक्त हसायचे
निघून गेले किती क्षण आठवणींच्या नावेत
शब्दांच्या लाटेत आजही चेहरा तुझा तराळतो
-भक्ती
21 Jul 2022 - 7:21 pm | चक्कर_बंडा
मनापासून आभार
चारोळी ही अप्रतिम....
22 Jul 2022 - 7:40 am | तुषार काळभोर
कविता करणाऱ्या, त्यातही अशी उत्तम कविता, मला नेहमीच आश्चर्य वाटतं.
त्याहून जास्त हेवा वाटतो, असं काही आपल्याला जमत नाही त्याचा!
22 Jul 2022 - 1:09 pm | बाजीगर
एकतर्फी प्रेमाच्या तरल हळूवार भावना .....
सुंदर व्यक्त केल्यात आपण.
खूप छान खूप छान.
22 Jul 2022 - 1:36 pm | ज्ञानोबाचे पैजार
मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात मुलगी वडिलधार्यांना नमस्कार करायला उठली की "सगळ्यांमधे एकच नमस्कार कर, प्रत्येकाला वेगळा नमस्कार करायची गरज नाही" असे कोणीतरी मोठा सांगत असे आणि मग बाकीचे सगळेही त्याला माना डोलवत असत...
सांगण्याचा मुद्दा एवढाच की तोच नियम इथे मिपावरही पाळला तरी चालेल.
पैजारबुवा,
22 Jul 2022 - 2:16 pm | चक्कर_बंडा
:-) समजलं पैजार बुवा..... नियम तर पाळायलाचं हवेत !
मिपा काही तसं मला नवीन नाहीये, फक्त खात जरा उशिरान घेतलं.....
23 Jul 2022 - 10:50 am | संजय पाटिल
सुंदर!
खुप दिवसनी एक छान कविता वाचायला मिळाली...
बाकिच्या विटा पण सुंदर!
24 Jul 2022 - 1:13 am | श्रीगणेशा
खूप छान कविता! आवडली!!
----
"#चक्कर_बंडा" नाव मात्र गूढ वाटतंय, अर्थ समजून घ्यायची उत्सुकता आहे :-)
4 Aug 2022 - 1:18 pm | चक्कर_बंडा
गूढ वगैरे काही नाही, स्वभाव वैशिष्ट्यांच्या मूल्यमापनाची नावाशी सांगड घालून मित्रमंडळींनी केलेलं बारसं म्हणा हवं तर....