किल्ला ( चित्रपट - २०१५ )

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in जनातलं, मनातलं
16 Jul 2022 - 6:43 pm

चित्रपट तब्बल सात-आठ वर्षे जुना आहे, हे लिहून ही आता बरीच वर्षे झालीत. मला या चित्रपटात काय दिसलं ते मांडायचा छोटासा प्रयत्न !

गच्च भरून आलेलं आभाळं, त्यातून डोकावणारी माडांची दाटी, वाडीला असणाऱ्या चिऱ्यांच्या दोन कुंपणांमधून जाणारी तांबडी पायवाट, खडकाळ समुद्रकिनारा, त्यापलीकडे घनगंभीर गाजेनं आसमंत भारून टाकीत समोर येणारा सिंधुसागर रत्नाकर.....

अशी नजरबंदी करणारी, प्रेमात पाडणारी सुरवात असणारा २०१५ साली प्रदर्शित झालेला "किल्ला" हा अविनाश अरुण या दिग्दर्शकाचा स्वर्गीय अनुभव देणारा चित्रपट.

किशोरवयीन चिनू आणि त्याची एकल पालक आई, लहानपणीच आईबाप गमावलेला अवली बंड्या, वर्गातील मुलीकडे सतत एकटक पाहत राहणारा अंड्या, युवराज, उमेश हे चिनूचे होऊ घातलेले नवे मित्र, निवते व त्याची बायको, चिनूला समुद्रावर भेटलेला दारुडा मच्छीमार, शाळेतील शिक्षक, दामले आजी, किल्ला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक फ्रेममधून समोर येणारा कोकणातील नितांतसुंदर निसर्ग आणि पाऊस हे ही जणू चित्रपटातील पात्रेच, ह्या सर्वांचा मिळून बनणारा एक अप्रतिम कोलाज म्हणजे हा चित्रपट !!!!!

खरं सांगायचं तर निव्वळ पाहण्यापेक्षा हा अनुभवण्याचा चित्रपट आहे, कोकणच्या निस्सीम सौंदर्याच्या पार्श्वभुमीवर समोर येणारी ही मानवी भावभावनांची गुंतवळ कॅमेऱ्याचा टिपकागद अगदी गरजेपुरत्याचं संवादांच्या जोडीनं अलगद टिपत जातो व आपण नकळत चित्रपटातील पात्रांच्या आयुष्याशी जोडले जातो. गोष्ट उलगडून सांगण्यापेक्षा, शब्दबंबाळ करण्यापेक्षा दिग्दर्शक ती फक्त आहे तशी दाखवतो. काय घ्यायचं ही जबाबदारी प्रेक्षकांची......

पुण्यातून कोकणच्या खेड्यात अनिच्छेने आलेला चिनू, वर्षभरापुर्वी पती गमावलेली व आता चिनू हाच आयुष्याचा केंद्रबिंदू असलेली चिनूची आई, आईवडिलांच्या मृत्यूच्या घटनेचं वर्णन शिळोप्याच्या गप्पांच्या थाटात करणारा सुहास उर्फ बंड्या, त्याच धाटणीतले अंड्या आणि युवराज, एकट्या राहणाऱ्या व त्यातील माहीत असलेल्या आव्हानांमुळे चिनूच्या आईचं कौतुक वाटणाऱ्या, तिला जमेल तशी मदत करू पाहणाऱ्या दामले आजी. चिनूच्या आईच्या कार्यालयातील सहकारी निवते, समुद्रावरचा दारुडा मच्छीमार व या सर्वांना एकत्र जोडणारा दुवा म्हणजे चिनूच्या भावविश्वाचा "किल्ला"..…

चिनूच्या आईची नुकतीच बदली झालीय आणि पुण्याच्या मामा आणि मामेभावाच्या आसपास विणलेल्या सुरक्षित भावविश्वातून निघून तो कोकणातील एका छोट्याश्या गावात येऊन पडलाय. जिथे रुजलो, वाढलो तिथून मनाविरुद्ध मुळापासून उखडले जाऊन नावडत्या अनोळखी जगात येऊन पडणे, अशा परिस्थितीत आपसूकचं येणाऱ्या एकाकीपणाचा सामना करावा लागणे, हे सर्व चिनूच्या आयुष्यात प्रथमच घडतं आहे. तो भांबावलाय, नाराज आहे, इथे जुळवून घेणं त्याला जड जातंय तरीही मुळच्या समजूतदार स्वभावामुळे तो प्रयत्न करतोय पण काहीवेळा त्याचा तोल जातोय व राग स्वतःवर, आईवर निघतोय. त्याची आई ही तिच्या नव्या गावातील कार्यालयीन अडचणींशी झगडतेय. तणावात आहे, एकाकी आहे. दोघांनाही या परिस्थितीशी जुळवून घेणे अवघड जातंय पण पर्यायही नाहीये.

स्वभावाने काहीसा थंड पण अतिशय शांत, संवेदनशील व समजूतदार असणारा चिनू आसपासच्या निसर्गाचे, माणसांचं मात्र सतत निरीक्षण करतोय, समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, या त्याच्या प्रयत्नांमधून दिग्दर्शक प्रेक्षकांना अनायसे कोकणची रमणीय सफर ही घडवतोय.

आसपास चालणारे बंड्या आणि कंपनीचे उद्योग पाहून त्यांच्या मैत्रीबद्दल चिनू द्विधा मनस्थितीत आहे. एका भटक्या कुत्र्याला त्यांच्या त्रासापासून वाचवण्यासाठी त्याने त्या कुत्र्याला स्वतःच्या घरात लपवून ठेवलंय, वर्गात शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यास मदत करून त्याने या मुलांच्या कंपूत प्रवेश मिळवलाय खरा पण मैत्री अजून दुरचीच गोष्ट आहे.

एक दिवस त्या मुलांवर विश्वास टाकून सायकल शर्यतीच्या निमित्ताने तो त्यांच्यासोबत समुद्रकिनारी असणाऱ्या एका
किल्ल्यावर जातो, किल्ल्यावर गेल्यावर खेळाच्या नादात व त्यादरम्यान येणाऱ्या वादळी पावसापासून वाचण्यासाठी चिनू किल्ल्यातीलचं एका निर्जन भुयारात आसरा घेतो
किल्ल्यातल्या भुयारात असताना चिनू प्रकाशाच्या दिशेने जायला निघतो पण विजेच्या कडकडाटाला घाबरून पुन्हा मागे पळतो आणि मग मित्रांपासून दुरावतो. थोड्या वेळाने चिनू त्यांना किल्लाभर शोधायचा आटोकाट प्रयत्न करतो, जोरजोरात आवाज देतो पण प्रतिसाद मिळत नाही. वादळी पावसात ते मित्र घाबरून त्याला किल्ल्यावर एकटं सोडून निघून जातात व हे चिनूला जेव्हा समजतं तेव्हा या प्रकाराने तो पुरता हादरून जातो, घाबरतो, हा त्याला विश्वासघात वाटतो. मित्रांनी नाकारल्यासारखं वाटतं, तो कोशात जातो. रागाच्या भरात मित्रांशी भांडून होते नव्हते ते संबंधही तोडून टाकतो व एकटेपणाच्या गर्तेत अजून खोल रुतत जातो. चिडचिडा होतो, आईबरोबरच्या नात्यात ही ताण प्रचंड वाढतो, नेमकं यावेळेसच कार्यालयीन कामाच्या दबावामुळे त्याची आई ही तणावात असते, चिनूची मनस्थिती, त्याच्या इच्छा-अपेक्षा, समजत असूनही परिस्थितीपुढे ती हतबल असते. पण यामुळे चिनूमध्ये मात्र आपण कोणासाठीच महत्त्वाचे नाही आहोत ही भावना मूळ धरू लागते.

अशा एकटेपणात समुद्र हाच त्याचा सोबती होतो. असाच एकदा त्राग्यातून, अंगावर येणारा वेळ घालवण्यासाठी एका मासेमाराबरोबर त्याच्या छोट्याशा नावेतून तो खोल समुद्रात जातो. लाटांचा, नावेच्या हेलकाव्यांचा, खोल समुद्रातील शांततेचा अनुभव घेतो. त्या नावेत आणि परत आल्यावर किनार्‍यावर शेकोटीपाशी त्या मासेमारासोबत चिनूचा वरवर पाहता अगदीच तुटक, त्रोटक पण एका वेगळ्याच पातळीवरचा हृदय संवाद होतो.

समुद्रात आपण बुडून मेलो असतो तर ह्या चिनूच्या भाबड्या प्रश्नावर तो त्याला घरी कोण कोण असतं तुझ्या असा उलट प्रश्न विचारतो आणि जेव्हा चिनू "आई" असं उत्तर देतो तेव्हा तुला काहीचं नसतं झालं असं त्याच्याकडून ऐकून घरी एकटी असलेली आई ही फक्त आणि फक्त आपल्यासाठीचं तिथे आहे, आपलं सगळंच काही हरवलेलं नाही याचा त्याला साक्षात्कार होतो.

चिनू घरी येऊन आईला घट्ट मिठी मारतो व तेव्हाच बंड्या व युवराज हे त्याला गेली कित्येक तास शोधत होते हे ही त्याला कळतं आणि मग अनेक गाठी अलगद सुटतात, नात्यातील पीळ सैलावतो. शाळेत परीक्षा संपता संपता मैत्र पक्के होत जाते व दिवस मजेत जाऊ लागतात. पण नेमके तेव्हाच चिनूच्या आईची पुन्हा बदली होते. रंगत चाललेला खेळ पुन्हा विस्कटतो.

चित्रपटाच्या सुरुवातीला अजिजीने आईला पुण्याहून कोकणात झालेली "ही बदली रद्द नाही का होणार?" असे विचारणारा चिनू पुन्हा तोच प्रश्न विचारतो. मात्र यावेळी तो उदास नाही. आपल्याला सतत असेचं विस्थापित आयुष्य जगावे लागेल, सतत नवा डाव मांडत राहावं लागेल हे कदाचित त्याने स्वीकारलं असावं. आधीच समजूतदार असलेला चिनू आता प्रगल्भ होत चाललेला दिसतो. मित्रांना ही बातमी सांगताना पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर किल्ल्यावर जायची इच्छा तो व्यक्त करतो.

चित्रपटात एक प्रसंग आहे दीपगृह पाहण्याचा. त्याचे वर्णन चिनू नंतर त्याच्या मित्रांकडे करतो. दीपगृहाच्या पायर्‍या चढताना खूप त्रास होतो पण मध्ये मध्ये खिडक्या असतात, आपण तिथे बसू शकतो, वाराही तिथे मस्त येतो. वर पोचल्यावर मात्र छान वाटते, एखादी बोटही दिसते, रात्री चांदण्याही सुंदर दिसू शकतात असं वर्णन तो करतो. यातून जणू काही तो त्याच्या स्वतःच्या आयुष्याचंच वर्णन करतोय असं वाटतं. दिपगृहाच वर्णन करता करता तो स्वतःलाही समजावतोय असं वाटत राहतं.

आईच्या बदलीच्या गावी जाताना चिनू त्याने माया लावलेला भटका कुत्रा आणि त्याची सायकल बंड्यापाशी सोडून देतो. एरवी कुत्र्यांना त्रास देणारा बंड्या आता मात्र त्या कुत्र्याच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवताना दिसतो. हा बदल कदाचित चिनूमुळे झालाय. कुत्रा आणि सायकल हे दोन दुवे मित्रांसोबत कायम ठेवून चिनू जातो. सुरुवातीला ज्या किल्ल्यावर वादळ-पावसात त्याचे मित्र त्याला एकटा सोडतात त्या किल्ल्यावर पुन्हा त्यांच्यासोबत चिनू जाऊ शकत नाही पण त्याच्या आधीच्या आठवणींमधे आता किल्ला आणि गावातले मित्र यांची भर पडली आहे. मित्रांसोबत विहिरीच्या कठड्यावर बसून पाण्यात उडी मारावी की नाही अशा मनस्थितीत असलेला चिनू, शेवटी उठून आत्मविश्वासाने पाण्यात उडी घेतो. त्याचं आयुष्य आता त्याने आहे तसं स्वीकारलंय ह्याच ते निदर्शक आहे.

चित्रपट संपतानाच्या दृश्यात चिनूच्या मनातल्या किल्ल्यावर मात्र वादळाचा मागमूस नाही. वादळाच्या वेळेस किल्ल्यावर असताना विजेच्या कडकडाटाला घाबरून ज्या पायऱ्या चढून येण्याचं तो टाळतो यावेळी मनात मात्र तो या पायऱ्या चढून येतो त्यावेळी फुलं, पक्षी आणि लख्ख ऊन असलेल्या किल्ल्यात त्याचे मित्र मजेत बसलेले दिसतात. कदाचित आपल्याशिवाय त्यांचे आयुष्य पुन्हा पहिल्यासारखेचं सुरू राहील याची जाणीव त्याला होते. वास्तवात जरी आयुष्य पुढे निघून गेलं तरी आपल्या मनातले आपले मित्र मात्र तिथेच तसेच असतील, ते तसे ठेवणे हे आपल्याच हातात आहे हे ही त्याला उमजते.

आयुष्यातल्या अनेक तात्पुरत्या मुक्कामांवर, थांब्यांवर आपण आपल्या आठवणी अशाच कोणाजवळ तरी ठेवून पुढे जात असतो, किंबहुना आपल्याला जावं लागत आणि त्यांच्याही फक्त आठवणीचं आपली सोबत करत असतात. आठवणींच्या किल्ल्यात पुन्हा प्रत्यक्ष जाऊन यावेसे ही बऱ्याचदा वाटते, पण काळाच्या निष्ठूर वरवंट्याखाली भरडून त्या किल्ल्यात झालेले बदल आपल्याला झेपतील की नाही याची भीतीही वाटते. स्वप्नातून जागे होण्यापेक्षा आठवणींचा किल्ला मनात जसा आहे तसाच तिथे राहू द्यावा आणि वास्तवात समोर येणाऱ्या आव्हानांना तोंड देत, जुने डाव निगुतीने मोडत आणि नवे डाव जबाबदारीनं मांडत आयुष्य जगत राहावे हे "किल्ला" आपल्याला शिकवून जातो.

जमलं तर एकदा नक्की पहा हा चित्रपट !!!!!

चित्रपटविचारआस्वादमत

प्रतिक्रिया

धन्यवाद

चक्कर_बंडा's picture

19 Jul 2022 - 2:55 pm | चक्कर_बंडा

आभार.....

छान लिहिले आहे. एकदा पहिला होता. त्या आठवणींना उजाळा मिळाला. आता पुन्हा पाहावा लागणार.
धन्यवाद.

चक्कर_बंडा's picture

19 Jul 2022 - 2:43 pm | चक्कर_बंडा

नक्की पहा...धन्यवाद....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jul 2022 - 11:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान लिहिलंय. सिनेमा पाहिलाय. आवडला होता. आठवण करुन दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार.
लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

चक्कर_बंडा's picture

19 Jul 2022 - 2:45 pm | चक्कर_बंडा

धन्यवाद.....

पाषाणभेद's picture

18 Jul 2022 - 9:17 am | पाषाणभेद

छान परिचय आहे.

चक्कर_बंडा's picture

19 Jul 2022 - 2:54 pm | चक्कर_बंडा

धन्यवाद...

सस्नेह's picture

18 Jul 2022 - 9:30 am | सस्नेह

सुरेख परीक्षण. अलिकडे असे चित्रपट विरळाच.

चक्कर_बंडा's picture

19 Jul 2022 - 2:47 pm | चक्कर_बंडा

मनापासून आभार...

पूर्ण चित्रपटभर कॅमेरा बोलतो.मात्र काही शॉट्स सुंदर आहेत मात्र ते उगाचच घेतल्यासारखे वाटतात. उदा: खेडक्यांचे वाळूत चालणे . याचा चित्रपटाशी काहीच संबन्ध नाही.
एक शॉट " मुले तळ्यात उडी मारतात" हा ऑस्कर लेव्हलचा शॉट आहे. या एका शॉट्साठी चित्रपट थेटरात पहावा. पैसा वसूल......

चक्कर_बंडा's picture

19 Jul 2022 - 2:44 pm | चक्कर_बंडा

कमाल छायाचित्रण, मोठ्या पडद्यावर पाहायची मजाच वेगळी....

चौथा कोनाडा's picture

18 Jul 2022 - 4:01 pm | चौथा कोनाडा

चित्रपटाची अतिशय समर्पक ओळख. सुंदर लिहिलंय!

किल्ला पाहिलेला नाही, पण हा लेख वाचून किल्ला पाहण्याची इच्छा निर्माण झालीय ! असे सिनेमे खास वेळ काढून "फुरसतके टाईममें" बघायला हवा !

चक्कर_बंडा's picture

19 Jul 2022 - 2:46 pm | चक्कर_बंडा

नक्की पहा...

श्वेता व्यास's picture

18 Jul 2022 - 4:38 pm | श्वेता व्यास

सुंदर रसग्रहण!

चक्कर_बंडा's picture

19 Jul 2022 - 2:47 pm | चक्कर_बंडा

मनःपुर्वक धन्यवाद

खुपदा पाहिलाय.दरवेळी पाहते.सुंदर सिनेमा आहे.

स्वप्नातून जागे होण्यापेक्षा आठवणींचा किल्ला मनात जसा आहे तसाच तिथे राहू द्यावा आणि वास्तवात समोर येणाऱ्या आव्हानांना तोंड देत, जुने डाव निगुतीने मोडत आणि नवे डाव जबाबदारीनं मांडत आयुष्य जगत राहावे हे "किल्ला" आपल्याला शिकवून जातो

.
+१११

चक्कर_बंडा's picture

19 Jul 2022 - 2:53 pm | चक्कर_बंडा

वेगळ्याच पातळीवरचा चित्रपट, मी अनेकांना आज ही पाहायला सुचवत असतो....

सिरुसेरि's picture

21 Jul 2022 - 2:16 pm | सिरुसेरि

+१. शांत सुंदर सिनेमा आहे . २०१४ च्या आसपास विहिर , शाळा , सायकल , राजवाडे अ‍ॅन्ड सन्स , देऊळ , गुलाबजाम असे अनेक चांगले मराठी चित्रपट आले होते .

VRINDA MOGHE's picture

21 Jul 2022 - 2:58 pm | VRINDA MOGHE

खुपदा टिव्हीवर थोडा थोडा पाहिलाय. संपूर्ण असा एकदा बसून पाहिला नाही. पण तुमचं रसग्रहण वाचून परत नक्की पाहिन. खुप छान.

सविता००१'s picture

22 Jul 2022 - 5:10 pm | सविता००१

मी पाहिलाय हा सिनेमा. खूप आवडलेल्या चित्रपटांपैकी एक नक्की आहे

अनन्त अवधुत's picture

22 Jul 2022 - 8:18 pm | अनन्त अवधुत

सध्या अशाच एका स्थित्यंतरातून जात असल्याने वाक्य अन् वाक्य रिलेट करता येतेय.
शेवटचा परिच्छेद खूप खास.