एस.टी.एक आठवण!

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
23 May 2022 - 12:00 pm

॥ एस.टी., एक आठवण..॥
'माजलगाव पुरुषोत्तमपुरी,
'माजलगाव पुरुषोत्तमपुरी,गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक ६वर लागली आहे.माजलगाव पुरुषोत्तमपुरी,गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक ६वर लागली आहे.माजलगाव पुरुषोत्तमपुरी.'
  बसस्टॅन्डच्या मधोमध असलेल्या जाळीच्या खोकेवजा खोलीतल्या स्पिकरवरून,खाकी कपड्यातल्या
कंट्रोलर नामे इसमाने केलेली घोषणा,ऐकली की तिथल्या सिमेंटच्या बाकांपैकी काही बाकांवर बसून कंटाळलेल्या,आणि इकडे तिकडे हिंडणा-या बाया,बाप्ये,तरणे,म्हातारे,अंगात चैतन्य आल्यासारखे,एकदम उठून आपापल्या पिशव्या,बॅगा,बोचकी घेवून,त्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने धावायला लागत.त्यात कुणाचा तरी नवरा,पोरगा,भाऊ,बाप,कुठेतरी रसवंतीत ,हाटलीत, मुतारीत,नाहीतर भटकायला गेल्याने गायब असे.मग यष्टी कडे धावायचे की त्याला शोधायचे हा यक्षप्रश्न असे.कुणी त्या 'गायबाच्या 'नावाचा पुकारा करत;कुणी ,'कुठं कडमडलयं की आयत्या टायमाला'
,म्हणत;कूणी त्रागा करत;कुणी शोधायला पळत,असे आपापल्या परीने तो प्रश्न सोडवत ;आणि शेवटी बसकडे धावत.
जदीद जवळा,गुंजथडी ,मंजरथ अशा नावाच्या कुठल्यातरी जवळपासचे गावाची ट्रीप मारून तिथे आलेली,धुळीने माखलेली,काही खिडक्या फुटलेली,काही सीटे तुटलेली, 'लालपरी'; तिथून,पुरुषोत्तमपुरी किंवा अशाच कुठल्यातरी गावी जाण्यासाठी आता तयार असे.सीटावरची धुळ,पाशिंजरांचे कपड्याने,आणि आतला कचरा,त्यांच्या जाण्यायेण्याने आपोआप झाडून निघत असल्याने बस स्वच्छ करण्याचा नसता उपद्व्याप करण्याची गरज नाही यावर एस.टी.वाले आणि पाशिंजर असे सगळ्यांचेच एकमत असे.कंडक्टरच्या ,फुर्र फुर्र अशा  शिट्टीचे तालावर ;बस ड्रायव्हर,'लालपरीला 'मागे घेवून प्लॅटफॉर्मला लावत असतानाच,तिच्या भोवती लोकांची झुंबड उडालेली असे.त्यातली धटिंगण,तरणी मंडळी,दोन्ही बाजूच्या खिडक्यांना लटकून आतल्या सीटांवर ;आपल्या हातातले रुमाल,गमचे,पंचे,पिशव्या,पेपर,जे काही असेल ते टाकून सीटा रीजर्व करत.एखादा वीर तर,चक्क हातातल्या पोराला,त्याच्या रडण्या,ओरडण्याकडे लक्ष न देता,खिडकीतून आत सरकवे.एवढ्यात कुणीतरी चालत्या बसचा दरवाजा उघडून आत शिरलेले असे.खालचे सगळेच ,एकदम त्या दरवाजातून आत शिरायच्या प्रयत्न करत.
ओढाताण,चेंगराचेंगरी,झोंबाझोंबी,शिवीगाळ,आपापल्यामाणसांना आत ओढणे,मुलांचे रडणे,पिशव्यांचे बंद तुटणे,सामान खाली पडणे,आदी नीत्याचे प्रकार होवून बस खचाखच भरे.
क्वचित कंडक्टर,ड्रायवर,कंट्रोलर,आणि हजर असले तर पोलीस;त्या गर्दीला शिस्त लावायचा प्रयत्न करत. आणि नंतर सगळे लोकांच्या भरवशावर सोडून देत.बाहेरचे आत शिरल्यावर; रीजर्व केलेल्या सीटावरून,
पुन्हा ओढाताण,शिवीगाळ ,धक्काबुक्की वगैरे नाट्य पुन्हा घडे.एकाच सीटवर दोघे,तिघे हक्क सांगत.त्यात ज्याचे बळ भारी तो सीट बळकावे.
बस भरेपर्यंत कंडक्टर- ड्रायवर ;कंट्रोलर साहेबाचे खोलीत जावून हातातला कागद दाखवून,कशाची तरी 'एंट्री'करून घेत ,व कॅटिनमधे जाऊन चहा फराळ करत.नंतर कंडक्टर,बसकडे येवून  तिकीटे देण्याचा
कार्यक्रम सुरू करे.बस वेळेत असली तर ठीक,नाहीतर,तिकीटवाटप पूर्ण होण्याआधीच,ड्रायव्हर बस बाहेर काढे,आणि गावाबाहेर नेवून थांबवे.
आतल्या लोकांना या वेळेचा उपयोग ,आधी सुरु  झालेली पण अर्धवट राहिलेली आपसातली शिवीगाळ,भांडणे ,पूर्ण करण्यासाठी होई.त्या गोंधळात तिकीट वाटप पूर्ण झाल्यावर कंडक्टर डबल बेल देई.मग पुढचा प्रवास सुरू होई.
  तालुक्याचे गावाहून जवळपासच्या खेड्यांनाजाणा-या यष्ट्या',मधे,
आठवडी बाजार,सुट्ट्या,लगीनसराईचे,सणांचे,दिवस असले की असेच दृश्य असे.
लांबपल्ल्याची एक्स्प्रेस बस,बसआल्यावर पण वेगळे चित्र नसे.फरक एवढाच की गाडी बसस्टॅडमधे येवू लागली की आतल्या उतारूंना,खाली उतरण्याची संधी द्यायच्या आधीच खालचे 'चढारू'चढाई करून,बस सर करायचा प्रयत्न करत.त्यातून होणा-या गोंधळाचा,प्रकार वेगळा असला तरी शिवीगाळ,खेचाखेची, ओढाताण इत्यादी मधे फारसा फरक नसे.स्टॅडमधून बस निघून बरेच अंतर गेल्यावर,कुणीतरी मधल्या थांब्याच्या तिकीटाची मागणी करे.कंडक्टर आणि इतर प्रवाशी,चिडून,ही एक्स्प्रेस गाडी आहे कळत नाही का,वगैरे म्हणत त्याचा उध्दार करत.तो उतरायला तयार नसे.कधी पुढच्या मोठ्या थांब्याचे तिकीट देवून,त्याला त्याचे 'नथांब्यावर ',उतरवण्याची तडजोड होई.तर कधी त्याला वाटेतच उतरवून बस पुढे निघे.हे सगळे पाहायला,गम्मत वाटे. .
हल्ली मात्र खाजगी वाहने,जीप,रिक्षा,आदी वाहतुकींची साधने मोठ्या प्रमाणावर असल्याने,गावाकडे एस.टी.बसेस रिकाम्याच धावताना दिसतात.
  पण त्या काळी,म्हणजे तीस पस्तीस वर्षापुर्वी एस.टीला
,टेम्पो किंवा,
टपअसलेला मिनिट्रक,सारख्या मालवाहू
वाहनांची स्पर्धा होती.ग्रामीण भागात ते महत्वाचे प्रवासी वाहन होते.ड्रायव्हरच्या केबीन मधे पाचसहा माणसे,
मधल्या भागात खचाखच भरलेल्या सामानाचे,पोत्यांचे
आजूबाजूस भरलेली माणसे,किंवा नुसतीच खचाखच भरलेली माणसे,वर टपावरही जमतील तेवढे माणसे घेवून,अनेक टेम्पो,तालुक्याचे गावाहून खेड्यात व तिथून परत अशा चकरा मारत असत.बाजाराचा दिवस असेल तर विचारायलाच नको.बसस्टॅडचे बाहेर अनेक टेम्पो
ओळीने उभे असत.किन्नर (क्लिनर,म्हणजे ड्रायव्हरचा सहाय्यक) बसस्टॅन्ड मधे जाऊन ज्या गावी टेम्पो जाणार त्या गावाचे नाव पुकारून,'सवा-या'गोळा करायचा.बसची वाट पाहून कंटाळलेले लोक टेम्पोत जाऊन बसायचे.पुरेशा सवा-या मिळाल्या शिवाय टेम्पो निघायचा नाही.लोक कंटाळून उतरायच्या तयारीत दिसले की ,ड्रायव्हर इंजीन सुरू करून 'चला चला' असे ओरडायचा.टेम्पो निघतोय म्हणून उतरलेले ,पुन्हा बसायचे.काही वेळ फुर्र फुर्र झाल्यावर टेम्पो बंद व्हायचा.लोक वैतागायचे.
काही जण किन्नर -ड्रायव्हरशी हुज्जत घालायचे.दोन तीन वेळा अशी फुरफुरी झाल्यावर,शेवटी खचाखच भरलेला टेम्पो निघायचा.
या टेम्पोवाल्यांचे काही अलिखित नियम होते.पहिला टेम्पो गेल्याशिवाय दुसरा टेम्पो 'पाशिंजर' घेत नसे.निघत नसे.टेम्पोवाले शक्यतो एकमेकांचे पाशिंजर पळवत नसत.पोलीस,काही एस.टीवाल्यांशी त्यांनी 'जमवलेले'
असे.त्यामुळे त्यांची भिती नसे.पण बाहेरचे आर.टी.ओ.किंवा वरिष्ठ
पोलीस अधिकारी, अचानक तपासणीसाठी आल्यास,टेम्पोवाले समोरून येणा-या टेम्पोला सावध करत.बसच्या वेळेच्या पाचदहा मिनिटे आधी थांब्यावर पोहचून तिथले पाशिंजर गोळा करून पुढे निघायची कला त्यांना अवगत होती.टेम्पोची वाहतुक सेवा,तुलनेने कमी दरात,मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने, लोकांचा ओढा तिकडे वाढला होता.
तालुक्याला आणि तालुक्यातील काही गावी ठराविक दिवशी आठवडी बाजार भरे.त्यासाठी त्या,त्या दिवशी,त्या,त्या गावासाठी स्पेशल बाजार गाडी सुटे.वाटेवरच्या गावांच्या थांब्यावर,बाजाराला जाण्यासाठी,आणि बाजारानंतर,तिथल्या थांब्यावर ,परतीसाठी 'बाजार' भरलेला असे.बसची क्षमता ,पन्नास पंचावन्न सीट अन बारा उभे अशी फारतर साठ पासष्ट लोकांची असे!पहिल्या थांब्याला बस भरलेली असली की पुढील थांब्याला डबलबेल देवून,बस न थांबवता पुढे हाकायची सुचना कंडक्टर करे.त्यामुळे थांब्यावरचे लोक वैतागत,शिव्या घालत.एस.टी पेक्षा टेम्पो बरा म्हणत.अशा गोष्टींचा एस.टी.च्या सेवेवर विपरीत परिणाम झाला नाही तरच नवल! एस.टी.चे कांही आधिकारी,कर्मचाऱ्यांना याची खंत वाटत असावी.कांबळे ड्रायव्हर त्यातलाच एक! कांबळेची नियुक्ती नेहमी बाजार गाडीवर असे.
कंडक्टरच्या डबलबेल कडे दुर्लक्ष करत,भरलेली बससुध्दा ,थांब्यावर  थांबवून,कांबळे खाली उतरे.थांब्यावरची पब्लिक 'कांबळ्या डायवर' दिसला की ,आता 'काही घोर नाही 'म्हणून निश्चिंत होई.आता कांबळे सगळी सुत्रे हाती घेई.आतल्या पासिंजराना ,'पुढे सरकून घ्या,आपल्याला कुठं मुंबईला जायचंय?खालच्या लोकांना येवू द्या.'म्हणत समजावे.लोक पण त्याचे ऐकत.दोनच्या सीटवर तिघे,तीनच्या सीटवर चौघे,मधल्या रिकाम्या जागेत,सीटच्या दांड्यावर,जमेल तिथे,जमेल तसे लोक आपापली  बुडं टेकवत.ड्रायव्हर केबीनमधे,त्याचीसीट सोडून बाकी सगळीकडे
दाटीवाटीने लोक बसत.एवढे होवून ही राहिलेल्या पैकी काहींची रवानगी टपावर होई.ही 'भरवाभरवी'सुरू असताना,कंडक्टर बसच्या बाहेरून,खिडक्यातून तिकीट देण्याचे काम सुरू असे.आतले पाशिंजर बाकींच्याकडून पैसे घेवून, कंडक्टर कडे देवून ,त्याला सहकार्य करत.
गच्च भरलेल्या बसमधे तिकीट तपासणीस येणार कसा,अन तपासणार काय?हे माहिती असल्याने काही महाभाग संधीचा फायदा घेवून मोफत प्रवासाचा लाभ निश्चिंतपणे घेत.बसमधे पायाचे बोट ठेवायलाही जागा शिल्लक नाही,अशी अवस्था येई तेव्हाच कांबळेचे समाधान होई.मग तो सीटवर बसून इंजिन सुरू करे.कंडक्टर कसातरी आत शिरून दार बंद करे.त्याच्या वतीने कुणीतरी बेल देई,आणि बस सुरू होई.
साखर कारखान्यात जादा उसाचा प्रश्न आला की राजकीय नेते जसे ,'शेतात उसाचे एक पण टिपरू शिल्लक राहणार नाही 'अशी  घोषणा करतात,तसं ,' फाट्यावर एक पण प्रवासी शिल्लक राहणार नाही अशी कांबळेची घोषणा असावी.आणि तो ती कसोशीने अमलात आणायचा प्रयत्न करे.खचाखच भरलेली बस पुढील थांब्यावर पोहचे,तेव्हा मात्र त्याचा नाईलाज असे.तिथले पब्लिक घेणे शक्य नसे.तरीही बसचा वेग कमी करून,लोकांना;'दम धरा एवढी ट्रीप करून आलोच ',असा दिलासा देई.लोकांचा त्याच्यावर विश्वास असे.दुरून येणा-या एस.टी.च्या टपावर लोक दिसले की थांब्यावरचे लोक,आज 'कांबळ्या डायवर 'आहे हे
ओळखायचे.एस.टी.येण्याआधी व येवून गेल्यावर पण,'कांबळ्यानं ,मागच्या सोमवारी,राजेगावच्या बाजार गाडीत लोक कसे भरले होते',वगैरे गप्पा व्हायच्या.
किरकोळ शरीर यष्टी,आत गेलेली गालफाडं ,चेह-यावर वाढलेले दाढीचे खुंट,अशा अवतारातला,पस्तिशीचा कांबळे,रेघाचा किंवा बारीक चौकटीचे डिझाईनचा चुरगाळलेला सदरा,मळकट पॅट अशाच वेषात असे. गणवेषाचे खाकी कपडे त्याच्या अंगावर कधी दिसले नाहीत.ही बेशिस्त असली तरी ,टेम्पोच्या प्रवासी वाहतुकीला पायबंद घालून एस.टीचा फायदा करतो  प्रयत्न करतो, म्हणून ,एस.टी.ने,त्याला गणवेषातून सुट दिली असावी.
आठवडय़ातील सातही दिवस बाजारगाडीवर असल्याने,
त्याचा तालूक्यात सगळीकडे संचार असे.त्यामुळे त्याच्या सगळीकडे ओळखी होत्या .त्याच्याशी ओळख आहे असे सांगण्यात लोकांना मोठेपणा वाटे.थांब्यावरचे हॉटेलवाले त्याला चहा देवू करत.एकंदरीत तो ब-यापैकी लोकप्रिय होता.
ग्रामीण भागात अशा लोकप्रियतेच्या लाटा नेहमी येत असतात.बदलून आलेला कडक शिस्तीवाला,पुढाऱ्यांना
पण रस्त्यावर ठोकून काढणारा पोलीस आधिकारी,
अचानक तपासणी करून कर्मचाऱ्यांवर कारवाई करणारे जिल्हाधिकारी,गुप्त वेषात कोर्टात फिरून लोकांच्या प्रश्नांची दखल घेणारे न्यायाधीश, असे अनेकजण,पब्लिक साठी काही काळ नायक बनतात.लोकांना गप्पा मारायला काहीतरी विषय हवे च असतात.दुसरा नवीन विषय मिळाला की आधीचे  विसरले जाते.आपली विस्मरणशक्ती दांडगी असते. कांबळे पण केव्हाच विस्मरणात गेला.
मागील काही वर्षात,तर माझे ,एस.टी.शी नाते,संपल्यात जमा झाले आहे.एस.टी.प्रवास ही विस्मरणात गेलाय!
  काही दिवसांपूर्वी एस.टी.कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ संपाच्या बातम्या येवू लागल्या तेव्हा एस.टी,प्रवास,कांबळे ड्रायव्हरची आठवण आली.तेंव्हा त्याच्या कामाची वरीष्ठांनी दखल घेतली होती का,त्याला बढती मिळाली होती का,तो निवृत्त झाला असेल का?असे प्रश्न कांबळेच्या यष्टीत दाटीवाटीने उभ्या पासिंजरा सारखे डोक्यात दाटीवाटीने उभे राहीले.

                        नीलकंठ देशमुख
   
   

समाजजीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

मलाही उत्सुकता आहे.

नीलकंठ देशमुख's picture

25 May 2022 - 11:41 am | नीलकंठ देशमुख

मला पण उत्सुकता आहे.खावाकडे माहिती असेल. आता चौकशी करणार आहे.

नीलकंठ देशमुख's picture

25 May 2022 - 2:10 pm | नीलकंठ देशमुख

मला पण उत्सुकता आहे.खावाकडे माहिती असेल. आता चौकशी करणार आहे.

प्रसाद_१९८२'s picture

23 May 2022 - 12:38 pm | प्रसाद_१९८२

तुम्ही केलेले लोकांच्या दाटिवाटीचे वर्णन जरी तीस-पस्तीस वर्षापुर्वीचे असले तरी आजही खेड्यापाड्यात एसटीबाबतचे चित्र फार काही वेगळे नाही. इतकेच काय, एस फलाटावर लागल्यावर चढण्या-उतरण्यासाठी काय प्रकारची भांडणे, शिवीगाळ होते हे पाहायचे असेल तर कल्याण एसटी स्थानकात जाऊन, कल्याण-भिवंडी किंव्हा कल्याण-वाडा एसटी लागल्यावर पाहावे.

नीलकंठ देशमुख's picture

25 May 2022 - 3:03 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिसादाबद्दल आभार. आपण म्हणता ती परिस्थिती खरी आहे. समाधान
एवढेच की आता स्वतःला फारसे सामोरं जावं लागत नाही.

वामन देशमुख's picture

23 May 2022 - 12:54 pm | वामन देशमुख

असे प्रश्न कांबळेच्या यष्टीत दाटीवाटीने उभ्या पासिंजरा सारखे डोक्यात दाटीवाटीने उभे राहीले.

+१

नीलकंठ देशमुख's picture

25 May 2022 - 3:01 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल

balasaheb's picture

23 May 2022 - 1:42 pm | balasaheb

छान लिहिलय

नीलकंठ देशमुख's picture

25 May 2022 - 3:01 pm | नीलकंठ देशमुख

आभारी आहे, प्रतिसादाबद्दल.

सुजित जाधव's picture

23 May 2022 - 4:58 pm | सुजित जाधव

बसस्टॅडचे बाहेर अनेक टेम्पो
ओळीने उभे असत.किन्नर (क्लिनर,म्हणजे ड्रायव्हरचा सहाय्यक) बसस्टॅन्ड मधे जाऊन ज्या गावी टेम्पो जाणार त्या गावाचे नाव पुकारून,'सवा-या'गोळा करायचा.बसची वाट पाहून कंटाळलेले लोक टेम्पोत जाऊन बसायचे.पुरेशा सवा-या मिळाल्या शिवाय टेम्पो निघायचा नाही.लोक कंटाळून उतरायच्या तयारीत दिसले की ,ड्रायव्हर इंजीन सुरू करून 'चला चला' असे ओरडायचा.टेम्पो निघतोय म्हणून उतरलेले ,पुन्हा बसायचे.काही वेळ फुर्र फुर्र झाल्यावर टेम्पो बंद व्हायचा.लोक वैतागायचे.

सध्या जीप/वडाप यांची परिस्तिथी याहून वेगळी नाही... खेडेगावात २०१०-२०१२ पर्यंत लोक वाडपला पाठीमागे लटकून प्रवास करायचे आता शिटांचा नियम आल्यापासून हा प्रकार बंद झाला..
पण काहीही म्हणा एसटी प्रवासाची मजाच न्यारी....

नीलकंठ देशमुख's picture

25 May 2022 - 3:00 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिसादाबद्दल आभार. आपण म्हणता ती परिस्थिती खरी आहे. फक्त आता स्वतःला फारसे सामोरं जावं लागत नाही.

मुक्त विहारि's picture

23 May 2022 - 6:08 pm | मुक्त विहारि

ST हा जीवनावश्यक भाग आहे ...

नीलकंठ देशमुख's picture

25 May 2022 - 2:58 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल.

कर्नलतपस्वी's picture

24 May 2022 - 5:20 pm | कर्नलतपस्वी

कधीकाळी एस टी महाराष्ट्राची लाडकी परी होती. आता लालपरीला वार्धक्य आले आसे वाटते.
इमान काढुन डायवर बरोबरच रीटार (रीटायर) झालय त्यामुळे लालपरीचे पुनर्जीवन होणार का नाही?
लेख आवडला छान लिहिलय.

नीलकंठ देशमुख's picture

25 May 2022 - 2:58 pm | नीलकंठ देशमुख

छान वाटले प्रतिक्रीया वाचून. धन्यवाद

आपले गावाकडच्या जीवनाबद्दलचे नेहमीप्रमाणेच लेखन असते, ते येथेही नेहमीप्रमाणे छान . यावेळेस एखादा जास्त परिचयाचे असल्याने थोडे रटाळ वाटले.कारण लाल डबा वालिचा रटाळ कंटाळवाणाा प्रवास व अति थकव्याच्या अनुभवांनी अजूनही अंगावर काटा येतो . आता आम्ही असे प्रवास शक्यतो टाळतो व आराम दायीच पसंत करतो, कंटाळलो त्या प्रवासांना वत्या वेळेच्या गरीबिला म्ह णून आरामाचे बिनागर्दीचे व इतर वाहने ट्रेन , टॅक्सी ,स्वतंत्र रिक्शा, विमान, आरक्षण असेच पर्याय घेतो. बाकी बारकाव्यानिशी वर्णन छान!!

नीलकंठ देशमुख's picture

25 May 2022 - 2:57 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल.

चौथा कोनाडा's picture

25 May 2022 - 11:08 am | चौथा कोनाडा

छान लेख, चित्रदर्शी वर्णन.

परिस्थिती फार बदललेली नाही, म्हणून लोक खासगी बसेस कडे वळले. पण सामन्यासाठी लाल परी हीच खरी.
एस टी प्रवासाच्या अडचणी सोडवून लोकांना दिलासा द्यावा असं कुणालाच वाटत नाही.
एस टी त बदल करायची कुणाचीच इच्छा नाही.
घरातील एखाद्या ज्येष्ठाला कचरा म्हणून ट्रीट करतात तसे आताच्या लाल परी कडे बघून वाटतं, दुःख होतं!

चौथा कोनाडा's picture

25 May 2022 - 11:08 am | चौथा कोनाडा

छान लेख, चित्रदर्शी वर्णन.

परिस्थिती फार बदललेली नाही, म्हणून लोक खासगी बसेस कडे वळले. पण सामन्यासाठी लाल परी हीच खरी.
एस टी प्रवासाच्या अडचणी सोडवून लोकांना दिलासा द्यावा असं कुणालाच वाटत नाही.
एस टी त बदल करायची कुणाचीच इच्छा नाही.
घरातील एखाद्या ज्येष्ठाला कचरा म्हणून ट्रीट करतात तसे आताच्या लाल परी कडे बघून वाटतं, दुःख होतं!

नीलकंठ देशमुख's picture

25 May 2022 - 2:57 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिसादाबद्दल आभार. आपण म्हणता ते खरं आहे. परिस्थितीत बदल करायची इच्छा कुणाची नाही .आपले संवेदनशील मन कळले

कंजूस's picture

25 May 2022 - 11:12 am | कंजूस

कर्नाटकात मात्र चांगली आहे.

श्रीगणेशा's picture

27 May 2022 - 8:12 am | श्रीगणेशा

चित्रदर्शी वर्णन!
कदाचित मिपावरील बऱ्याच वाचकांसाठी एस टी प्रवास आता मागे पडला आहे.

चौथा कोनाडा's picture

27 May 2022 - 10:40 am | चौथा कोनाडा

खरे आहे.
मी नोव्हें २०१९ ला बर्‍याच वर्षांनी गावी जाण्यासाठी लाल परीने गेलो. नंतर नाहीच.
त्या आधी कधी गेलो होतो ते आठवत नाहीय !

नीलकंठ देशमुख's picture

28 May 2022 - 8:07 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल

सिरुसेरि's picture

28 May 2022 - 5:20 pm | सिरुसेरि

चित्रदर्शी लेखन .

नीलकंठ देशमुख's picture

29 May 2022 - 9:28 am | नीलकंठ देशमुख

आभारी आहे आपल्या प्रतिसादाबद्दल