भटियार चे स्वर मनामधे रुंजी घालत रहातात. त्यापासून एकदम बाजूला होता येत नाही. स्वरांना असं झट्कून टाकता येत नाही.
आरोह अवरोहाच्या वेलबुट्ट्या मनात गुंजतच रहातात.
बासरी ओठाला लागलेलीच आहे. मी त्यात स्वरांची फुंकर घालतो.
मागील दुवा
सा ध प म , प ग रे सा.
पंचम गंधार घेत कोमल ऋषभावरुन षड्जावर येताना काही वेगळेच रंग डोळ्यासमोर उभे करतो हा राग. कोणी शोधला असेल. ज्या कोणी शोधला असेल त्याने तो अनुभव घेतला असेल. सामवेदात उल्लेख आहे याचा. पण संगीत हे अपौरुषेयच. अमूर्त. अनुभवायचेच. स्वर कानावाटे ऐकू येतात पण ते अंगात भिनतात. मग अलौकीक अनुभव देतात. बासरीचा नाद अनहत. तो तुमच्या रोमारोमात जातो. वाजवतानाच नव्हे तर ऐकतानाही श्वास काही क्षण थांबतो.कुठेतरी आत छातीचे ठोके लय पकडतात. आणि तुम्ही तादात्म्य पावता. स्वर्गीय स्वरांशी एकरूप होतानाचा तो अनूभव अलौकीक.
आपण कितीदातरी घेतलाय. सर्वात अगोदर याची यमुनेच्या काठावरच्या शंकराच्या देवळात. गाभार्यात बासरी वाजवताना. किती वेळ वाजवत होतो ते समजलेच नाही. संध्याकाळ झाली , गाईना परत न्यायचे म्हणून आपल्याला बोलवायला आलेल्या पेंद्याला शोधायला निर्मीक आला तेंव्हा कळाले. ते देखील त्याने आपल्याला हलवून जागे केले.
बासरीचा लळा लागला तो कधी सुटलाच नाही. यमुनेच्या डोहाशेजारच्या कदंबाच्या खाली बसलोय. आसपास कुरणावर गाई चरताहेत त्यांच्या घंटांचा आवाज येतोय आणि बासरीचे स्वर वाजायला लागतात. सगळे सवंगडी खेळ सोडून बासरी ऐकायला येतात. काहीतरी विलक्षण ऐकतोय असे त्यांचे चेहरे सांगत असतात.आजही ते डोळ्या समोर येतंय.
मी हातातल्या बासरीकडे पहातो. कुरुक्षेत्रावर असतानाहीच काय ते आपण बासरी आपल्यापासून दूर ठेवली होती. त्या रणधुमाळीत बासईला काही व्हायला नको म्हणून अन्यथा ती नेहमीच सोबत असते. अगदी शिष्ठाईसाठी हस्तिनापूरला गेलो होतो तेंव्हाही घेऊन गेलो होतो. अंगराज कर्णाकडे राहीलो होतो. त्याचा मुलगा वृषसेन किती मोहीत झाला होता बासरी ऐकून . हस्तिनापूरच्या युद्धाचा इतिहास मला आठवायचा नाहिय्ये. पण पुन्हा पुन्हा तो आठवत रहातो. भळाळत्या जखमेसारखा.
काही क्षण विचारशून्य जातात. एक जाणवतं त्या युद्धाने आपल्यातलं लहानपणंच संपवून टाकलं. बालसुलभ आनंदी असणारा तो कृष्ण युद्धानंतर पुन्हा सापडलाच नाही.
त्या नकोशा कडवट आठवणीं मुळे तोंडातही कडवटपणा आला. मंचकाशेजारी ठेवलेल्या चषकातून घड्यातले पाणी पितो. पाण्याचा तो थंडगार स्पर्ष घशातून छातीपर्यंत जाणवतो. पाण्यात टाकलेल्या केशरामुळे जिभेवरचा कडवटपण कमी होतो.
मनातले विचार थांबवण्यासाठी पुन्हा एकदा बासरी मधे फुंकर घालतो. एका एका स्वरावर लयकारी घेत खर्जातल्या सप्तकातल्या पंचमावरून सुरवात करत गंधार पंचम धैवत वरचा षडज गाठतो. प्रत्येक स्वर काहीतरी सांगत असतो. वाजवणार्याला आणि ऐकणार्यालाही. येताना पुन्हा कोमल ऋषभ तोच अनुभव देतो. मी डोळे मिटून वाजवतोय. प्रत्येक स्वरासोबत एकेक चित्रे डोळ्यासमोर नाचताहेत. अवघं गोकूळ पुन्हा जिवंत होतंय नंदबाबा ,यशोदामाई ,बलरामदादा , गवळीवाड्यातले सवंगडी, वृंदावनातले पिसारा फुलवत नाचणारे मोर, संध्याकाळी येताना सोबत धुळीचे लोट उडवत येणारे गाई बैल. यमुनेचा डोह , गोवर्धन पर्वतावरचा हलका वारा आणि त्या सोबत डोलणारे गवत. सगळंच..... यमुनेच्या डोहावर केलेला दंगा, पाणी भरायला येणार्या , मथुरेला दूध दही नेणार्या गवळणींची केलेली थट्टा. त्यांच्या डोईवरच्या घड्यावर छोटा दगड मारला की कित्ती घाबरायच्या त्या. स्वरा बरोबर एकेक चित्र पलटत जाते. कोमल ऋषभ आला तसा डोळ्यासमोर एक रिकामे आकाश आले. त्यापाठोपाठ आली तीरंगांची उधळण. आणि त्या रंगा मधून डोकावतो एक चेहरा. प्रथमदर्शी प्रकर्षाने जाणवणारे सुंदर रेखीव डोळे., काजळाने त्यांच्या रेखीवपणात आणखीच भर टाकली आहे. त्या नजरेत बरेच काही आहे. खिळवून टाकणारे निरागसपण , लहान मुलाचे असतात ना तसे आर्जवी , प्रश्न विचारणारे भाव. गोर्यापान चेहेर्यावर तितकेच मोहक हसू आहे.
तो चेहेरा दिसताच माझ्यात काहीतरी बदल होताना मला जाणवतोय. ते मोहक हसू माझ्या ही चेहेर्यावर पसरत जाते. मघा बासरी वाजवताना ऐकू आलेल्या पैंजणाच्या आवाजाची ओळख पटते.
क्रमशः
प्रतिक्रिया
19 Mar 2022 - 6:37 am | कर्नलतपस्वी
वाचतोय, लिहीत रहा
19 Mar 2022 - 7:47 am | सुखी
छान लिहिलं आहे विजुभाऊ __/\__
19 Mar 2022 - 9:51 am | सुरिया
तीन भाग झाले. नुसताच शब्द फुलोरा फुलतो आहे.
.
.कथा कहा है?
.
.
असेही कृष्ण राधेचा नामांकित पासून नवोदित पर्यंत सर्वांनीच चिपाड सुध्धा कंटाळले इतका चोथा केला आहे. तुमचया कडून जरा तरी अपेक्षा होत्या. नवीन काय तुमचे?
21 Mar 2022 - 7:44 am | विजुभाऊ
स्पष्ट मताबद्दल धन्यवाद.
कथा लिहीताना ती कशी पुढे जाईल याची मलाही तुमच्या इतकीच उत्सुकता आहे.
मात्र काही वेगळा विचार मांडायचा नक्कीच प्रयत्न करेन.
3 May 2022 - 9:29 am | विजुभाऊ
नवे काय असेल ते आत्ता नक्की सांगू शकत नाही. पण कथेत नक्की नवे काहितरी द्यायचा प्रयत्न करतोय.
21 Mar 2022 - 7:00 am | विजुभाऊ
मागील दुवा http://misalpav.com/node/49971
22 Mar 2022 - 5:53 am | धनन्जय मोरे
कृष्णाच्या ऊत्तर काळातले विचार मांडने , नवीन पध्दतीने विचार आहे. कृष्णावर बरेच लिखान हे बालपन,तरुनपन, युध्द यावर आहे. पन सगळ संपल्यावर कृष्ण ऊत्तरार्धात backflash मध्ये जाऊन काय विचार करतो हे नवीन वाटतय. लिहीत राहावे.
30 Apr 2022 - 6:17 am | विजुभाऊ
माझी राधा - ४ http://misalpav.com/node/50080
31 May 2022 - 8:46 am | विजुभाऊ
माझी राधा http://misalpav.com/node/50296
अंतीम भाग लिहीलाय .
काही वेगळा विचार मांडलाय की कसे ते सांगा