मी आणि माझी बहीण गाडी चालवत असलो तर रस्त्यावर अन्य चालकांना शिव्या घालत आमचा प्रवास सुरु असतो. अर्थात, असे चालक दरवेळी आम्हाला काही त्रास देतात असे नव्हे, मात्र त्यांचे वागणे अन्य लोकांच्या अपघातास कारणीभूत ठरू शकते म्हणून आम्ही त्यांना शिव्या घालतो, आमच्याच गाडीच्या बाहेर ऐकू जाणार नाहीत एवढ्याच आवाजात. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, चुकीच्या पद्धतीने रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या करणे (गर्दीने भरलेल्या बाजारात नव्हे; महामार्गावर, घाटात वगैरे), उजवीकडे वळताना उजव्या मार्गिकेत येऊन उभे राहणे आणि डावीकडे वळणाऱ्या गाडीचा मार्ग अडवणे, चुकीच्या मार्गिकेतून उजवीकडे वळणे (डावीकडे वळताना तसा प्रश्न येत नाही), इंडिकेटर न लावणे, राष्ट्रीय महामार्गावर सोडलेली कानाला टॅग असलेली गुरे सोडणारे त्यांचे मालक अशी काही उदाहरणे सांगता येतील.
(१) दोन दिवसांपूर्वी पुणे-बंगळुरू महामार्गावरून घर - पुणे - घर असा प्रवास केला. दोन्ही वेळा उजव्या मार्गिकेतून जाणाऱ्या अवजड वाहनांनी आम्हाला हैराण केले. हा आमचा वैयक्तिक त्रास म्हणून समजू नये. पोलिसांनीही या समस्येची दखल घेतली आहे. एक वर्षापूर्वीची बातमी आहे, फरक पडलेला दिसत नाही.
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/state-to-crack-down-on-h...
(२) आंबा घाटात एका ट्रक चालकाने सिगारेट घेण्यासाठी आपला मोठ्ठा मल्टी-ऍक्सल ट्रक वळणात उभा करून ठेवला. एका कार चालकाला त्या वळणात रिवर्स गिअर मध्ये चढावात गाडी मागे घ्यावी लागली एका चढून येणाऱ्या ट्रकला जागा करून देण्यासाठी.
(३) खंबाटकी घाट चढायला सुरुवात होते त्याच्या आधी एका ठिकाणी हॉटेलमध्ये थांबलेल्या गाड्या तर डावीकडच्या लेन मध्ये महामार्गाच्या कुंपणाच्या आत मध्येच पार्क केलेल्या होत्या.
यातील काही गोष्टी आमच्याकडूनही अजिबात होत नसतील अशी मी शाश्वती मी देत नाही. पण त्या गोष्टी टाळण्यावर आमचा भर असतो.
या गोष्टी केवळ लिखित नियमांविरुद्ध आहेत म्हणून केवळ त्याचा आग्रह धरावा असे नव्हे. रस्त्यावर वाहतूक सुरळीत चालण्यासाठी सर्वच वाहनांनी काही संकेतांचे पालन करणे हे सर्वांच्याच सुरक्षेसाठी हितावह आहे. असे संकेत न पाळण्याचे दुष्परिणामही आपल्या देशातील लोकांना भोगावे लागतात.
भारतात जगातील एकूण वाहनांपैकी १% वाहने असूनही रस्ते अपघातात मृत्यूंपैकी ११% मृत्यू भारतात घडतात. भारतात २०१५-२०१९ या काळात दरवर्षी साधारण दीड लाख लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले. राष्ट्रीय महामार्गांची लांबी एकूण रस्त्यांच्या लांबीच्या २% असूनही एकूण मृत्यूंपैकी ३६% मृत्यू तिथेच होतात. एकूणच अपघातांचा आर्थिक फटका हा दीड लाख कोटी रुपयांचा असल्याचा रस्ते वाहतूक मंत्रालयाचा अंदाज आहे.
रस्त्यावरील अपघात हे वाहने, रस्ते, चालक आणि पादचारी (एकूण मृत्यूंपैकी १७% पादचारी असतात) यांच्यातील संबंधांतून घडत असतात.
५४ देशातील साडेतीन लाख किमी रस्त्यांच्या अभ्यास करण्यात आला. त्यात असे दिसले कि गरीब देशातील ९५% रस्त्यांवर पदपथ नाहीत, ९६% रस्त्यांच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती आहे, ५०% पेक्षा अधिक रस्त्यांवर रस्ता ओलांडण्याची रास्ता क्रॉस करण्यास सुविधा नाही असे दिसून आले. श्रीमंत देशात हेच प्रमाण अनुक्रमे ५०%, ७३%, ५% असे आहे. आपल्या आजूबाजूला आपण रस्ते पाहत आहोतच त्यामुळे आपण यात कुठे आहोत याची आपल्याला कल्पना आहेच.
दुसरा महत्वाचा घटक म्हणजे चालक म्हणजेच आपण लोक. संशोधनात असे दिसून आले आहे की अपघाताच्या भीतीपेक्षा वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणीचा चालकांवर जास्ती चांगला परिणाम होतो. सीट-बेल्ट आणि हेल्मेट यांचा वापरही अपघाती मृत्यू रोखण्यात महत्वाचा आहे. चालकांना परवाना देताना त्यांचे प्रशिक्षणही अपघात रोखण्यास आवश्यक आहे. Graduated Driver Licensing (GDL) नावाची परवाना देण्याची पद्धत ऑस्ट्रेलिया मध्ये सुरु झाली. आता ती पद्धत अमेरिका, कॅनडा, न्यूझीलँड इथेही वापरली जात आहे. या पद्धतीत लेखी परीक्षा, १२० तासांचे निरीक्षणाखाली ड्रायविंग, तसेच नंतरही ओव्हर स्पीडींग, मद्यपान याकरता जिरो-टॉलरन्स असे नियम आहेत. कायमचा परवाना मिळवण्यात या मध्ये १ वर्षाचा काळ लागू शकतो. पण यामुळे नवीन चालकांमध्ये अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले आहे. नियमांची अंमलबजावणी आणि प्रशिक्षण याही बाबतीत आपण कमी पडतो असे वाटते.
मी २०१९ मध्ये जर्मनीत गेलो होतो. तिथे वाहतुकीची शिस्त अगदी लक्षात येण्यासारखी होती. माझ्या एका मैत्रिणीला भेटायला मी चालत निघालो होतो. तिच्या घराजवळ पोहोचलो तर ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तिच्या इमारतीखाली उभी होती. मधला रास्ता मोकळा होता. अर्थात, मी इथल्या सवयीने होतो तिथूनच रस्ता ओलांडायला गेलो, पण मला तिने थांबवले आणि योग्य ठिकाणाहून ओलांडायचा सल्ला हातानेच दिला. मी तेव्हा PhD विद्यार्थी होतो आणि २-४ दिवस राहून आणि तिथला फरक पाहूनही वाट्टेल तसा रस्ता ओलांडण्याची सवय टाळू शकलो नाही. हा प्रसंग आठवला तर मला लाज वाटते.
जोसेफ हेन्रिक यांच्या पुस्तकातील खालील वाक्य जसेच्या तसे देऊन थांबतो.
“During the five years leading up to the end of immunity in 2002, diplomats from the UK, Sweden, Canada, Australia, and a few other countries got a total of zero tickets. Meanwhile, diplomats from Egypt, Chad, and Bulgaria, among other countries, got the most tickets, accumulating over 100 for each member of their respective diplomatic delegations. Looking across nations, the higher the international corruption index for a delegation’s home country, the more tickets those delegations accumulated. The relationship between corruption back home and parking behavior in Manhattan holds independent of the size of a country’s UN mission, the income of its diplomats, the type of violation (e.g., double-parking), and the time of day.”
संदर्भ
[1] Road Accidents in India - 2019, Ministry of Road Transport & Highways
[2] Road Safety opportunity and Challenges: Low and Middle Income country profiles,
World Bank, 2020
[3] https://www.vaccinesforroads.org/how-safe-are-the-worlds-roads/
प्रतिक्रिया
25 Apr 2022 - 10:32 pm | कर्नलतपस्वी
पुण्यात फिरल्यावर या सर्व गोष्टी दिसतात. रोड रोजच्या केसेस पावलो पावली दिसतात इलाज नाही.
आपला लेख माहितीपूर्ण व डोळ्यात अंजन घालणारा आहे.
25 Apr 2022 - 11:03 pm | sunil kachure
नजर नीट नसताना पण सर्रास ड्रायव्हिंग लायसेन्स दिली जातात.
गंभीर पने डोळ्यांची तपासणी केली जात नशी.
कित्येक चालकांना लांबचे किंवा जवळ चे स्पष्ट दिसत नाही..
अंदाज नी गाडी चालवतात...
त्यांनी त्याच्या ओळखितील एक उदाहरण सांगितले त्या व्यक्ती चालक अक्षरशः आंधळा होता.
आवाज आणि अंदाज ह्याचा आधार घेवून गाडी चालवायचा.
25 Apr 2022 - 11:04 pm | सुक्या
माझा एक मित्र नेहेमी म्हणतो "गाडी तो ५० लाख की लोगे लेकिन वो चलाने की अकल कहासे लाओगे"
बेशिस्ती / नियम माहीती करुन न घेणे / माहीती असलेली नियम "झुकेगा नही साला" म्हणत पायदळी तुडवणे वगेरे जो पर्यंत चालु राहील तो पर्यंत हे असेच चालणार.
ह्या गोष्टी अगदी लहाणपणापासुन शिकवाव्या लागतील. समोरच्याने माती खाल्ली म्हणुन मी खाल्ली तर काय बिघडले वगेरे पळवाटा आता नियम झाल्यात.
बाकी भारतीय रस्ते व त्यावरची राहदारी हा चेष्टेचा विषय आहे सगळीकडे.
26 Apr 2022 - 10:54 am | सौंदाळा
बरेच अपघात गाड्यांचे अपघात हे चालकाच्या दुराग्रही, हट्टी स्वभावामुळे पण होतात. समोरुन गाडी येत आहे तो साईडला जाईल, मी का ब्रेक मारु, हा मला कट मारुन जोरात पुढे गेला आता त्याला बघ पुढे जाउन कसा कट मारतो, राँग साईड येतोय मग तो बघेल मी सरळच जाणार (राँग साईडने चालवणे हे बरोबर आहे असे म्हणायचे नाही) यामुळे कित्येक अपघात होतात.
गलथान पणे पार्किंग करणे, रस्ता माहीत नसेल, समोर फाटा आला की जागच्या जागी गाडी उभी करुन रस्ता विचारणे आणि अर्थातच प्रचंड वाढलेला वेग ही पण अन्य कारणे.
रच्याकने मी पण शिव्या (हळू आवाजात) घालत गाडी चालवतो. तेवढाच भावनांचा निचरा होतो.
26 Apr 2022 - 11:55 am | सर टोबी
हा लोकांच्या प्रचंड बेदरकार वृत्तीमुळे पायाभूत सुविधांची कशी वाट लागते याचं उत्तम उदाहरण ठरावे. महामार्गावरील गाव आणि रस्ता यांच्यामध्ये पुरेसे अंतर ठेऊन, कुंपण घालून वाहतूक वेगवान ठेवली नाही. गावाजवळ उन्नत रस्ता बांधून खाली गावातील वाहतूक सुरळीत राहील असे पाहिले नाही. परिणामी मैलोन मैल उलट्या बाजूने चालणारी वाहतूक, गावाजवळच दररोजचा बाजार, महाराष्ट्राचं वैशिठ्या ठरावं अशी फ्लेक्सबाजी आणि टाइमपास करणाऱ्यांची गर्दी यामुळे प्रवासाला जवळपास दुप्पट वेळ लागतो. आता तर पुण्यापासूनच रस्ता उन्नत करण्याचा विचार आहे. म्हणजे पूर्वीचा सगळा खर्च वाया गेला. याच रस्त्यावर सूप्याच्या जवळपास एका गावात भुमिसंपदान करता आलं नाही असे दिसते. तिथे हा चारपदरी महामार्ग एकदम चिंचोळा होतो. अशावेळेस तिथे उड्डाण पुल बांधता आला नसता का? असाच प्रकार नाशिक महामार्गावर देखील पहावयास मिळायचा. तेथे काही ठिकाणी उड्डाण पुल बांधले. पण हा सर्व खर्च केवळ स्थानिकांच्या शिस्त न पाळणे या एका गुणामुळे करावा लागतो.
26 Apr 2022 - 12:14 pm | sunil kachure
अगदी सामान्य असणाऱ्या ,विचारी असणाऱ्या लोकांना पण वेगाची धुंदी चढते.
अगदी मी पण कधी खूप वेगात गाडी चालवतो.
इथे पण विचारी ,संयमी लोक आहेत त्यांनी पण वेगाच्या प्रेमात पडून .खूप वेगात गाड्या
चालवल्या असतील.
एक लहान चूक थोडक्यात मोठ्या अपघात मधून वाचने.
आणि नंतर आपल्या वागण्याचा पश्र्चाताप होणे.
असे प्रतेक व्यक्ती बाबत घडते.
आणि परत तीच चूक करायला लोक तयार होतात.
26 Apr 2022 - 12:33 pm | केदार भिडे
अतिवेगामुळे ६७% अपघाती मृत्यू होतात असा मंत्रालयाचा अहवाल म्हणतो. मात्र याबद्दल मी साशंक आहे कारण अपघात आल्यानंतर पोलीस तिथे पोहोचल्यावर केवळ वेगामुळेच अपघात घडला हे ठामपणे कसे काय सांगतात बुवा?
विरुद्ध दिशेने चालवणारे अन्य गाडीवाला, मध्येच आलेली गुरे, बिनधास्त पणे रास्ता ओलांडणारे पादचारी, खड्डा इत्यादींमुळे अपघात झालेलाच नसेल हे कसे काय सांगतात? याकरता त्यांची methodology तपासावी लागेल.
अतिवेग हा महत्वाचा भाग आहे खरेच आहे. एकूणच नियमबाह्य वागणूकही महत्वाचा भाग आहे.
26 Apr 2022 - 12:40 pm | sunil kachure
रस्ते हे फक्त गाड्या साठी च नसतात.
रेल्वे ट्रॅक सारखे रस्ते बंदिस्त नसतात.
कोणी व्यक्ती,कोणता ही प्राणी, रस्त्यात येण्याची शक्यता गृहीत धरूनच वेग ठेवावा लागतो.
किंवा लेफ्ट बाजूला थांबण्या साठी गाडी घेवून right साईड चा दरवाजा उघडणे भारतात नॉर्मल आहे.
हे कधी ही ,कुठे ही घडू शकते
वेग मर्यादित असेल तर अपघात ची तीव्रता कमी होते
26 Apr 2022 - 1:34 pm | केदार भिडे
रस्ता सर्वांसाठी असतो याच्याशी एक तत्व म्हणून असहमत. झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्याना ओलांडणाऱ्यांसाठी आहे, सिग्नल लाल-हिरवा तेव्हा रस्ता त्या त्या वाहनासाठी असतो, एक दिशा मार्ग त्या दिशेत जाणाऱ्या वाहनांसाठी असतो, मोकाट गुरांसाठी रस्ता नसतो.
मात्र स्वतःची आणि अन्य लोकांची काळजी म्हणून वेग नियंत्रणात ठेवावा हा योग्य सल्ला आहे.
29 Apr 2022 - 9:44 am | पाषाणभेद
रस्ता पब्लीकचा हाय हो
म्हस यील नाय तर रेडा यील
26 Apr 2022 - 1:58 pm | कानडाऊ योगेशु
ह्याबाबतीत माझा अनुभव मांडतो. इंदोर भोपाळ हायवेवरुन साधारण १०० कि.मी प्रतितास ह्यावेगाने जात होतो. पुढे चार्टर्ड बस चौपदरी रस्त्याच्या उजव्याबाजुने म्हणजे आतल्याबाजुने जात होती व त्याच्यामागे एक स्कॉर्पिओ व मग मागे मी असे जात होतो. प्रत्येक वाहनाचा वेग जवळपास १०० च्या पुढेच होता. स्कॉर्पिओ बसला ओवरटेक करत होती व मी ही स्कॉर्पिओ मागे असल्यामुळे त्याबसला ओवरटेक करायला गेलो. स्कॉर्पिओच्या पुढे काय आहे हे मला दिसत नव्हते. स्कॉर्पिओने बसला वेगात ओवरटेक केले व मग मला दिसले कि त्याचवेळेला एक सायकलस्वार ही रस्त्याच्या अगदी डाव्या बाजुने जात होता. म्हणजे स्कॉर्पिओ जेव्हा बसला ओवरटेक करत होती तेव्हा सायकलस्वार दूर असावा व स्कॉर्पिओला व्यवस्थित जागा मिळाली ओवरटेक साठी. पण जेव्हा माझी गाडी ओवरटेक करु लागली तेव्हा सायकलस्वार,मी व बस तिघेही एकाच ओळीत आलो. उजवीकडे बस. डावीकडे रस्त्याचा उतार व सायकलस्वार आणि गाडीचा वेग १०० अश्या भयानक स्थितीत मी आलो होतो. अक्षरशः जीव मुठीत धरुन सेकंदात ब्सला ओवरटेक केले गेले कारण माझ्या हातात तेव्हा काहीच नव्हते. सायकलस्वार थोडक्यात बचावला. त्यानंतर पुन्हा अशा ब्लाईंड स्पॉट असणार्या परिस्थितीत ओवरटेक करायचे नाही ही खूणगाठ बांधली.
29 Apr 2022 - 11:31 pm | sunil kachure
अगदी विचारी,संयमी लोक पण अविचारी वागतात(विचारी,संयमी म्हणजे मी )
ह्याचे उदाहरण.
मी बायको सहित स्कूटर वर पाहुण्या कडे जात होतो.
समोर एक वाळू चा डंपर चालला होता .
बाकी रस्ता तरी मोकळा होता.
डाव्या बाजूने डंपर ल ओव्हरटेक करावे हा विचार आला .
आणि गाडीला वेग दिला.
पुढे डंपर आणि डंपर पुढे रस्त्याला तीव्र उतार होता.
मला समोरून चढून येणारे वाहन दिसण्याची बिलकुल शक्यता नव्हती.ना समोरून येणाऱ्या वाहनाला आम्ही दिसण्याची शक्यता.
ओव्हरटेक करताना डंपर च्य तोंडपर्यंत पोचलो आणि समोरून पण मोठे वाहन वेगात आले.
रस्ता जास्त रुंद नव्हता.
सावरायची वेळ निघून गेली होती.
कोणाच्याच हातात काही नव्हत.
७० पर्यंत वेग असेल.
Accelator पूर्ण पिळला आणि गाडी नी झटका देवून वेग घेतला.
एक सेकंद,काहीच वेग वाढला.
तिन्ही वाहनात एकमेका पासून जास्तीजास्त ६ इंचाचे अंतर राहिले असेल .
आणि गाडी पुढे निघून गेली.
बायको पाठी होती तिने ज्या डंपर ला ओव्हरटेक केले त्याचे चाक काहीच इंच अंतरावर बघितले .
माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले.
पुढे जावून थांबलो दहा वीस minit लेक्चर ऐकले.
आणि पुढे संयम आणि विचारी पना सोडला नाही.
26 Apr 2022 - 12:18 pm | चौथा कोनाडा
दुचाकीवरून जात असताना तळेगाव-चाकण रस्त्यावर नाक्यासमोर खड्डा चुकवताना पाठीमागून येणार्या गॅस टँकरची दुचाकीला धडक बसून दुचाकी वरील दोघांचा ही मृत्यू !
26 Apr 2022 - 2:06 pm | sunil kachure
गाडी चालक नेहमीच गाडी चालक नसतात ते पादचारी पण असतात.
पादचारी नेहमीच पादचारी नसतात ते गाडी चालक पण असतात.
व्यक्ती एक पण स्थिती बदलत असते.
पादचारी असताना गाडी चालक बेशिस्त वाढतात आणि तीच व्यक्ती गाडी चालक असेल तर पादचारी बेशिस्त वाटतात
प्रत्येकाचा स्वार्थी विचार.
कॅमेरे लावल्या मुळे बरेच प्रश्न कमी होत आहे.
मशीन कधी खोटे बोलत नाही.
शक्य होईल तितके वाहतुकीचे नियम यंत्र वापरून अमलात आणावेत.
माणसांना त्या पासून दूर ठेवावे.
शिस्त लागेल.
प्रगत देशात हीच पद्धत आहे..
वाहतूक पोलिस हा माणूस आहे त्याच्यावर अवलंबून राहून शिस्त निर्माण होणार नाही.
Satellite, कॅमेरे ह्यांचा जास्तीतजास्त वापर करावा.
26 Apr 2022 - 11:31 pm | कासव
कॅमेरे वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि एकंदरीतच सुरक्षे साठी लावले जातात. पण आपल्याकडे वेगळंच आहे. हे कॅमेरे केवळ चलन करण्यासाठी वापरले जातात. परवाच एक बातमी होती. सातारा शहरात एक सिग्नल २-४ वर्षापासून बंद आहे तरी तो सिग्नल तोडला म्हणून एकाला नोटीस आली. आणि ह्याहून भारी म्हणजे संबंधित चालक आजारी असलेने त्याने वाहन बाहेरच काढले नाहीय.
27 Apr 2022 - 12:31 pm | कानडाऊ योगेशु
बहुदा डुप्लिकेट नंबर कोणीतरी वापरली असावी.
29 Apr 2022 - 11:15 pm | sunil kachure
हवं तर विदेशी तज्ञ लोकांची मदत घेवून तंत्र ज्ञान मध्ये सुधारणा करावी .खूप लोकांच्या अशा तक्रारी आहेत . ह्याचा अर्थ सदोष यंत्रणा आहे..
26 Apr 2022 - 2:30 pm | sunil kachure
आता जशा दोन चाकी वाहनांच्या head लाईट कायम स्वरुपी चालू असतात.
तसेच नियमात बदल करून..मानवी हस्तक्षेप बंद करावा
Gps सिस्टीम कायम स्वरुपी प्रतेक वाहनात on असेल.
आणि ट्रॅफिक ,सिग्नल ,no entery, पार्किंग .
पिक अप,सर्वोच्च वेग ह्याचा निर्णय मशीन घेईल.
ड्रायव्हर नाही.
हाच योग्य उपाय आहे.
आणि हे अशक्य पण नाही.
26 Apr 2022 - 2:43 pm | अंतु बर्वा
थोड्याशा अंतरावरचा यु टर्न वाचवण्यासाठी राँग साईडने जाणे, चालत्या गाडीतुन खाद्यपदर्थांची वेष्टने बाहेर फेकणे, ट्रॅफिकमधे अगणित लेन तयार होणे आणि ज्याठिकाणी बॉटलनेक असेल तिथे सगळ्या लेन कन्वर्ज झाल्यावर प्रत्येकाने स्वतःची वाहने पुढे दामटवण्याचा प्रयत्न करणे आणि त्यामुळे आधीच हळु असलेलं ट्रॅफिक अजुनच संथ होणे. फोर वे स्टॉप असलेला चौक तर भारतात ट्रॅफिक पोलिस किंवा सिग्नल शिवाय बापजन्मात सेल्फ सस्टेन होणे शक्य नाही. राईट ऑफ वे म्हणजे काय आणि ते कशाशी खातात, हेच अर्ध्या लोकसंखेला ठाउक नाही. माझ्या मुलाच्या शाळेबाहेर शाळा सुटण्याच्या वेळेस एवढे ट्रॅफिक होते की सांगता सोय नाही, कारण प्रत्येकाला गाडी घेउन गेट च्या जेवढं जमेल तितकं जवळ थांबायचं असतं मग ते डबलच काय ट्रिपल पॅरालल असलं तरी चालेल आणि त्यामुळे फक्त एकच लेन बाकिच्या रहदारीसाठी मोकळी राहते. बरं मुलाला घेउन आल्यावर जन्माची घाई असल्यासारखं सर्वात आधी निघयचंही असतं. रिक्शावाले तर वेगळ्याच प्लॅनेटवर राहतात असं वाटतं, सर्वसधारण नियम त्यांना लागुच होत नाहीत बहुतेक.
यातल्या ८०% गोष्टी भारतीयांच्या डीएनए मधे फिक्स झाल्या आहेत. मला वाटतं आत्ताची जनरेशन आता काही झालं तरी सुधरणार नाही. आपल्याला नेक्स्ट जनरेशन टारगेट करायला हवी. वेळ जाईल, पण नक्की फरक पडेल. लहान मुलं, जेवढं लहानपणापासुन शिकतील तेवढं त्यांच्या डोक्यात हे बिंबवलं जाईल. पालकांनी मुलांसमोर कटाक्षाने या सर्व गोष्टी टाळायला हव्यात. आपण पुढारलेल्या देशांमधे पाहतो लहान मुलंसुद्धा कचरा पेटीत टाकताना दिसतात. मला वाटत नाही त्यांना हे वेगळं शिकवायला लागत असेल...दे आर सिंपली कॉपिंग व्हॉट देअर पॅरेंट्स आर डुईंग!
29 Apr 2022 - 11:09 pm | चौथा कोनाडा
अगदी खरंय !
निराश व्हायला होतं हे पाहिलं की !
.
अवघड आहे, मागच्या पिढीचे बघून ती बेशिस्त त्यांच्या अंगी आपोआप भिनते !
13 May 2022 - 4:17 pm | सामान्यनागरिक
वरील मताशी सहमत. आताची पिढी तर असं समजते की जर चौकार पोलीस उभा असेल तर त्याला पन्नास रुपये देउनच पुढे जावे. त्याची वाहतुकीच्या नियमांशी संबंध नाही. जसं आपण देवळात गेल्यावर पाच-दहा रुपयांची फुलं वहातो तसंच. तेवढंच महत्वाचं आणि केलंच पाहिजे असं.
सीसीटीव्ही कमेरे आणि माहिती तंत्रज्ञान वापरुन दंड आपोआप होईल याची व्यवस्था केली पाहिजे. त्या आधी लोकांना वाहतुकीच्या नियमांबद्दल जागरुक केले पाहिजे. हल्ली बायका/मुली दुचाकी चालवतात. आपणच स्वत: आठवुन बघा आपल्या प्रियेला किंवा परीला दुचाकी देण्ञापूर्वी आपण तिला वाहतुकीच्या नियंमांबद्दल समजावुन सांगीतले होते का ? वाहन चालवण्याचा परवाना मिळवायची द्यावी लागणारी परीक्षा हा एक विनोदच आहे.
पण शेवटी लोकांना व्यवस्थीत चालणारी वाहतूक हवी आहे का हा एक प्रश्नंच आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुठे एकदिशा मार्ग बनवल्यास तो सर्रास मोडला जातो आणि त्याविरुद्ध आंदोलन वगैरे करुन तो निर्णय बदलायला भाग पाडले जाते.
सध्या एकच वाहतूकीचा नियम आहे. दिसली फट की घाल गाडी आणि ज्याची गाडी मोठी त्याचं राज्य !
26 Apr 2022 - 3:38 pm | मधुका
चांगला झाला आहे लेख.
गम्मत म्हणून मी पूर्वी केलेली एक कविता आठवली : Click here
हे पुण्यात मला जास्त जाणवले तरी इतरत्रदेखील तसे आढळते.
26 Apr 2022 - 5:00 pm | पाषाणभेद
विषय पुण्याचा आहे म्हणून लिहीतो.
पुण्यात तसेच पुण्याला जोडणारा आजूबाजूचा 100 किमी चा भाग.
येथील दुचाकीस्वार अगदी पहिल्या लेनमध्ये (वेगवान लेन) आरामत जात असतात. मागे येणार्या वेगवान चारचाकी त्यांच्या खिजगणतीत नसतात.
27 Apr 2022 - 1:07 pm | sunil kachure
तेव्हा सर्वात जास्त लक्ष माझे दोन चाकी वाहनांवर असते.
तुलना केली तर दोन चाकी ही जमात सर्वात जास्त बेशिस्त.
रस्ता ओलांडताना ह्याच्या वर च बारीक लक्ष देणे गरजचे असते.
आणि सर्वात जास्त धोकादायक झोन मध्ये हेच दोन चाकी वाले असतात.
तरी बेफिकीर.
गाडी जितकी महाग तितकी ती सांभाळून चालवली जाते.
गाडी जितकी स्वस्त तितकी ती बेधुंद चालवली जाते.
असे माझे निरीक्षण आहे.
ह्या पाठी चालकाची काय मानसिकता असते हा संशोधनाचा विषय आहे.
27 Apr 2022 - 1:15 pm | sunil kachure
सर्वात टॉप ल.
दोन चाकी वाहन चालवणारे सर्वात जास्त बेशिस्त.
दोन नंबर लं.
रिक्षा,टॅक्सी ड्रायव्हर जे ड्रायव्हर असतात गाडी चे मालक नसतात ती जमात.
तीन नंबर का.
Tourist वाहन, BMC ची कचरा उचलणारी वाहन, अंबुलान्स वाले,आणि सरकारी वाहन.
चार नंबर ल .
खासगी वाहन धारक second hand गाडी वाले.
आणि सर्वात शेवटी .
स्वतःचे नवीन वाहन असणारे,कष्ट करून पैसे जमा करून वाहन घेतले आहे ती लोक.
बाकी भ्रष्ट मार्गाने संपत्ती लुबाडले ली लोक 1 नंबर chya पण पुढे .0 लं अर्थ नसला तरी greater sankhya समजावी.
27 Apr 2022 - 3:48 pm | असंका
या मुद्द्यांवर अधिक स्पष्टीकरण करता आलं असतं, आणि महत्त्वाचं म्हणजे लेख आणखी जास्त मुद्देसुद बनला असता....
पीएच डी झाली की व्हायचीये हे तरी कमीत कमी सांगायलाच हवं होतंत...
(कृ. हलकेच घ्या हो. )
27 Apr 2022 - 8:19 pm | चेतन सुभाष गुगळे
नक्कीच झाली असणार.
अन्यथा (म्हणजे प्रयत्न अयशस्वी झाले तर) तसा उल्लेख कोणी समाज माध्यमावर / सामाजिक संकेत स्थळावर करणार नाही.
27 Apr 2022 - 9:43 pm | केदार भिडे
PhD पूर्ण झाली मार्च २०२२ मध्ये.
२०१९ मध्ये जर्मनीला गेलो होतो. तिथे राहण्याच्या ठिकाणापासून मैत्रिणीच्या घरी चालत निघालो होतो तेव्हाच प्रसंग आहे तो.
लेखात विस्कळीतपणा आहेच. पूर्वी वसतिगृहात होतो तसे वातावरण घरी नाही त्यामुळे तसे झाले. इकडची सवय झाली कि पुन्हा नीट होईल.
27 Apr 2022 - 8:53 pm | राजेंद्र मेहेंदळे
दर वर्षी चालकांची परीक्षा घेतली तर अर्धे चालक नापास होतील, सिग्नल न देता गाडी वळवणे, कुठेही थुंकणे, अचानक उजव्या बाजुने दार उघडणे, बेशिस्त पार्किंग, लेनची शिस्त न पाळणे, घाटात चालवताना किमान सौजन्य न पाळणे, सिग्नल तोडणे एक ना दोन. बोलावे तेव्ह्ढे कमीच आहे.
28 Apr 2022 - 12:49 pm | खेडूत
>> दर वर्षी चालकांची परीक्षा घेतली तर अर्धे चालक नापास होतील..!
सहमत. पण दरवर्षी वेगवेगळे अर्धे नापास होतील!
पण तसं पाहू गेलं तर आपले बहुतेक सगळे आयटी इंजिनियर सुधा दरसाल नापास होतील नाय का? (ह. घ्या! :) )
2 May 2022 - 5:16 pm | सामान्यनागरिक
तसंही आपल्याकडे जी काही वाहन चालविण्याची परीक्षा होते ती पास झाल्यावर चालक वाहन नीट चालवील याची खात्री देता येत नाही.
परिक्षा हास्यास्पद असते. फार क्वचित लोक नापास होतात.
पण परवाना न मिळवता गाडी चालवणारे काही कमी नाहीत. पोलिस लोक त्यांच्याकडुन चिरीमिरी घेतात अन सोडुन देतात. खरंतर अश्या लोकांची गाडी जप्त व्हायला हवी.
मध्यंतरी वाहतुकीचे नियम न पाळल्यास जबरदस्त दंड द्यावा लागेल असे नियम बनविले होते. ते सुद्धा लोकांनी दबाव टाकुन वंद करायला लावले.
जर लोकांनाच बेशिस्त गाडी चालवायची असेल तर सरकार तरी काय करणार ?
27 Apr 2022 - 9:51 pm | केदार भिडे
दुचाकीस्वार हा प्रकार एक vulnerable प्रकार आहे रस्त्यावर. एकूण मृत्यूंपैकी ३७% मृत्यू हे दुचाकीवरील लोकांचे होतात
गरीब देशात त्यांची सुरक्षितता हा महत्वाचा प्रश्न आहे
अर्थात पुणे बंगळुरू मार्गावर दुचाकींसाठी वेगळी मार्गिका आखून दिलेली असूनही अनेकजण बाहेरच्या मार्गिकेतून गाडी चालवत असल्याचे पहिले.
28 Apr 2022 - 2:47 pm | sunil kachure
अपघात झाल्या नंतर गाडी दुरुस्त करण्याची परवानगी फक्त सीसीटीव्ही मध्ये दिसणारे दृश्य बघूनच द्यावी.
चूक असेल तर गाडी ची लिलाव करावा आणि पैसे सरकार जमा करावेत.
Lane कटिंग,सिग्नल jump,वेगाची मर्यादा न पाळणे .
ह्या कृत्याचा योग्य पुरावा असेल तर ती फौजदारी गुन्हा असावा आणि कमीत कमी दहा वर्ष शिक्षेची तरतूद असावी.
2 May 2022 - 5:15 am | फारएन्ड
चांगला लेख. तुम्ही पुण्यात असलात तर सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेण्ट च्या बरोबर काम करू शकता. मी २०११-१२ मधे काही काळ केले आहे (त्यानंतर पुन्हा अमेरिकेत आलो म्हणून पुढे काही केले नाही). आपण यावर उपाय काढण्याबद्दल थोडेफार काही केले याचे समाधान मिळते. तुमच्या सोयीने, वेळेनुसार काम करू शकता. कोणी मागे वगैरे लागत नाही. हे लोक वाहतूक पोलिस खाते, मनपा व आरटीओ तिन्ही बरोबर काम करतात.
सर्वसामान्य माणसे आठवड्यातून २-३ तास देउन करू शकतील अशी कामे असतात. उदा: ४-५ ठिकाणच्या ट्रॅफिक सिग्नल्स मधे जे पादचार्यांकरता सिग्नल्स असतात ते बरोबर चालत आहेत की नाही हे चेक करून पोलिसांमार्फत किंवा स्वतंत्रपणे जबाबदार व्यक्तींना कळवणे (नक्की कोणत्या खात्याला ते विसरलो). चौकात उभे असलेले पोलिस जर वाहनांकरता असलेले सिग्नल्स चालू नसतील तर त्याबद्दल कंत्राटदाराला कळवतात पण पादचारी सिग्नल्स कडे सहसा कोणाचे लक्ष जात नाही. पादचार्यांचेही.
ही एक गोष्ट झाली. असे अनेक उपक्रम ते राबवतात. कोठे रस्त्यामधे अडथळे असतील तर त्याची नोंद/तक्रार जवळच्या मनपा वॉर्ड ऑफिस मधे जाउन करणे वगैरे. एरव्ही व्यक्तिगतरीत्या आपण गेलो तर कदाचित कोणी विचारणार नाही. पण संस्थेकडून आलो आहे सांगितले की दखल घेतात.