स्मरण चांदणे५

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
28 Mar 2022 - 1:54 pm

स्मरण चांदणे ५.
    आषाढ महिना सुरू झाला की पावसाची वाट पाहाणे सुरू होई.आषाढातच चातुर्मास सुरूहोई.आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्यात,
विशेषत:,बायकांचे वेगवेगळे उपवास,व्रतवैकल्ये सुरू होत.नित्याचे उपवास,वार असत ते वेगळेच.या काळातील ,धार्मिक महत्वाचे दिवस(तिथी)सांगण्यासाठी
भटजी घरी येवून पंचांगानुसार तिथ्या,सण इ.ची माहिती सांगत.त्यांना नमस्कार करून,दक्षिणा,धान्य,आणि चहा/ दुध दिले जाई.
चातुर्मासात अनेक जण ,कांदा- लसूण न खाण्याचे व्रत पाळतात.ते सुरू होण्यापूर्वीआषाढनवमीला (कांदेनवमी) कुणाचे तरी घरी किंवा शेतात,गल्लीतील बायकांची अंगतपंगत होई.जेवणात कांद्याचेचपदार्थ!कांद्याचेभजे,थालीपीठ,धपाटे,भाजी,कांदवणी,कांदेभात,कांद्याचे पिठले आणि काय काय.लिहितानाही तोंडाला पाणी सुटतंय.मज्जा असायची. व्रतस्थां पेक्षा,
इतर मंडळीच कांद्याचे चटपटीत पदार्थावर ताव मारायचे.
चातुर्मासाचे शेवटी,वैकुंठ चतुर्दशीला(कार्तिक शुध्द चतुर्दशी)पून्हा असाच 'कांदादिन' होई.तेव्हापासून  कांदा लसूण खायला मोकळीक .
     चातुर्मासात आदीतवारी म्हणजे रवीवारी,काकू (माझीआई) सकाळी 'कहाणी' सांगत असे.गल्लीतल्या बायका ऐकायला येतअमूक व्रत केल्याने कुठल्यातरी स्त्रीचे सर्वार्थाने भले झाले व न केल्याने कशी संकटे आली  अशा प्रकारच्या कहाण्यातून व्रत महात्म्य सांगणाऱ्या त्या कहाण्या , माझी आई ,विशिष्ट लयीत व सुरात सांगत असे.बायका त्या श्रध्देने ऐकत.
.प्रत्येक वारांची,व्रताची वेगवेगळी कहाणी असे.
चातुर्मासात श्रावण महत्वाचा.श्रावणी सोमवार,म्हणजे
महादेवाचा वार .दिवसभर उपवास,म्हणजे उपवासाचे पदार्थ(भगर,साबुदाणा,राजगिरा इ.चे)खायचे व संध्याकाळी जेवण करून उपास सोडायचा.याच महिन्यात अनेकजण दिवसभर कडकडीत उपवास,फक्त संध्याकाळी जेवणअसे'नक्त' नावाचे व्रत पाळतात.
मंगळवारी मंगळागौर.नवीन लग्न झालेल्या मुलींनी  करायची पुजा.एक उत्सवच.धामधुम असे.पहिली मंगळागौर तर विशेष.घरातील बायका उत्साही,अन हौशी असतील तर विचारूच नये.
बुधवारी बुधब्रृहस्पतीची पुजा.शुक्रवारी आपल्या मुलाबाळांवर देवीचा कृपाआशिर्वाद असावा यासाठी 'जिवतीची 'पुजा.ही पुजा झाल्यावर काकू आमच्या अंगावर अक्षता टाकत असे.दुपारी  पुरणपोळी अन संध्याकाळी गुळ फुटाण्याचा नैवेद्य असे.
श्रावणात नागपंचमी,जन्माष्टमी,श्रावणी पोर्णीमा,पोळा, अशा अनेक सणांची गर्दी,त्यामुळे बायकांची लगबग असे.
नागपंचमीला,काकू ओसरीवरच्या कोप-यातील भिंत चुन्याने रंगवून त्यावर काव/गेरूने नागाची चित्रे काढत असे.आगकाडीला कापूस लावला की तीचा ब्रश तयार होई.काळ्या गंधाने डोळे काढायचे.नागदेवतेला वस्त्रमाळ,फुले,आघाडा,वाहून पुजा होई .दुध लाह्याचा
नैवेद्य दाखवला जाई.त्या दिवशी भाज्या चिरणे,कापणे निषिध्द असे .जेवणात पुरणाचे दिंड हा मस्त पदार्थ हमखास असे.
त्या दिवशी गारुडी बायका कुठून कुठून येत.गावभर फिरत.हातातल्या वेताच्या टोपलीचेझाकण ऊघडून मरगळलेला सुस्त साप दाखवत.डोक्यावर टपली मारून त्याला उठवत .मग तो फणा काढायचा.उत्सुक बाया पोरे घाबरून जात.लांबूनच पाहून दहा पाच पैसे देत.
काही बायका त्याला हळदीकुंकू वाहून पूजा  करून
गारुड्याला दूध देत.
   झोके बांधावे अशी मोठी झाडे गावात फारशी नव्हती.
गल्लीत तर नाहीच.गावाबाहेर झाडांना झोके बांधलेले असत.धाडसी मुले,मुली,बायका उंच उंच झोके घेत.मला उंच झोका घ्यायचीच काय,इतरांनी घेतलेला पाहायची,
पण भिती वाटायची.वरती गेल्यावर दोर तुटला तर काय असे वाटायचे.घरात ओसरीवर बैठकीतल्या सरांच्या कड्याला दोर टांगून माफक झोके घ्यायचे एवढेच.
ओसरीवर कायम टांगलेला लाकडी प्रशस्त झोपाळा होता.बसल्यावर पाय जमीनीला टेकायचे.त्यामुळे
बसायला अन झोपायलाही झोपाळा आवडे.सुटीत मुले
जमली की कायमची बैठक त्यावरच असे.वर्षानुवर्षे
हलून हलून त्याच्या लोखंडी कड्या झिजून गेल्या होत्या .
एकदा सगळ्यांचे ओझ्याने कड्या तुटल्या ,झोपाळा
सटकला अन मोडला.जमिनीपासून फारसा उंचावर नसल्याने कुणाला लागले नाही.पण तेव्हापासून तो जायबंदी झोपाळा ओसरीवरून कायमचा गायब झाला.काही दिवस ओसरी झोपाळ्याविना ओकीबोकी दिसत होती .नंतर सवय झाली.झोपाळा विस्मरणात गेला.झोका काय,झोपाळा काय  मुळ जागेपासून भटकवतो.आता भटकवले मुळ विषया
पासून.असो.
  श्रावण पोर्णीमेला श्रावणी होई.जुने यज्ञोपवित(जानवे )
बदलून नवीन धारण करण्याचा सामुहिकविधी आमच्या माडीवर  होई.गल्लीतील सगळे लोक येत.मुंज झालेली मुलेही असत.गायत्री मंत्राचा जप करत ,जानवे सुर्याला दाखवून ते धारण केले जाई.त्या विधीचे तपशील लक्षात
नाहीत.होमासाठी पेटवलेल्या गोव-यांचा धूर डोळ्यात जाई अन गोमुत्र प्राशन करावे लागे हे आठवते.दोन्ही ही नकोसे वाटे. बाबा (आजोबा) श्रावणीसाठी जाणवे घरीच तयार करत. पेन्सीली सारख्या  काडीत गोल चाती खोचलेली असे. एका वाटीत ती भोव-या सारखीफिरवली की कापसाचा धागा निघे . फिरवल्याने पीठ पडून  तो धागा बारीक होत जाई. असे सुत वळायचे, आणि त्याचे 'जाणवे' करायचा कार्यक्रम अनेक दिवस चाले.वाटीत चाती फिरताना पाहायला मजा येई. मी  पण चाती  फिरवायचा प्रयत्न करी पण सुताचा गुंता होई.तो सरळ करता येत नसे.गुंता सुताचा असो की नात्याचा,सोडवणे अवघड असते.
याच दिवशी रक्षाबंधन.बहिणी तर हक्काने राख्या बांधायच्याच पण भटजी आणि गावातील मारवाडी ब्राम्हणही घरी येऊन रेशमी दो-याची राखी बांधत.
बहिणींना ओवाळणी अन ब्राम्हणाना दक्षिणा म्हणून दिली जाणारी रक्कम; पैसे,आण्यात असे.चार आणे,आठ आणे फारतर रुपाया. बस्स.
  गोकुळ अष्टमीला,आई ,लाकडी पाटावर मातीचे गोकुळ तयार करत असे,चिकणमातीला आकार देवून,यशोदा,
नंद,पाळणा ,त्यात झोपलेला बाळकृष्ण,गोप ,गौळणी,
गायी ,वासरे,झाडे असे सारे तपशीलाने  साकारले जाई.छोट्या पुतळ्यांचे तोंडावर,ज्वारीचे दोन दाणे लावले की डोळे तयार.गोकुळ जीवंत व्हायचे.या गोकुळात मध्यरात्री कृष्णजन्म होई.प्रसादाच्या सुंठवड्याची गोड खमंग चव तोंडात घोळवत झोपी जायचे.
पोळ्याचे (श्रावणी अमावस्या)महत्व,गावी खूप जास्त.
श्रावण सुरू होताच तालुक्याला अनेक दुकानांचे दर्शनी भागात;सुत,लोकर ,बैलाच्या साजाचे सामान मांडले जाई.त्याचे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होई.
पाऊस चांगला पडलेला असला तर शेतकऱ्यांचा उत्साह जास्त.या काळात शेतीची फारशी कामे नसत. आणलेले सूत रंगवले जाई.गावात हातातील लाकडी चक्रीवर सुत वळताना अनेक जण दिसत.काहींची चक्री तर चालता चालता पण सुरू असे.सुताचा गुंता काढणे,सुत वळणे,मग त्याचे दोर,कासरे,दावे करणे,अशी वेळखाऊ  किचकट कामे सुरू होत.आंबाडीच्या साली सोलून त्याचे दोर ,कासरे,दावे बनवायचे काम पण सुरू असे.
बैलाचे कपाळावर बांधण्यासाठी सुताचे सर आणि रंगीत लोकरीचे गोंडे तयार केले जात.दिवसभराचे काम संपवून रात्री,दिव्याचे उजेडात ही कामे करत बैठकीत बसलेल्या गड्यांचे दृश्य अजूनही डोळ्यासमोर दिसते.या सगळ्या
तून वेळ काढून मुलांसाठी सुत किंवा आंबाडीचे कोरडे अथवा आसूड तयार केले जात.ते हवेत फिरवून फटकले की मोठा आवाज होई.कुणाचा फटका जोरात वाजतो याची मुलांची स्पर्धा सुरू.त्यातून भांडाभांडी ही होई.
प्रत्येक फटक्यानंतर आसूडाच्या टोकाची वीण सूटे.मग पुन्हा ते टोक वळायचे आणि फटकवायचा.हात दुखेपर्यंत हा कार्यक्रम सुरू राही.सूत वळता वळता,तयारी करता करता पोळा केव्हा आला ते कळायचे नाही.
वर्षभर जू मानेवर बाळगत काम करताना बैलांच्या मानेला काय त्रास ,वेदना होत असतील कल्पनाही करू शकत नाहीत. म्हणून पोळ्याचे आदल्या दिवशी खांदे मळणी असते .जोखडाच्याओझ्याने जाड ,चरबट खरबडीत झालेल्या बैलांच्या खांद्याला लोणी हळदीचा लेप लावून मसाज करुन त्यांचे दुःख शमवण्याचा छोटासा प्रयत्न !
घरा शेजारच्या गायवाड्यात,गायी म्हशींसोबत सातआठ
बैलजोड्या  दावणीला असत.भाळ्या-मो-या,सुदाम्या-पिल्या,हि-या -मोत्या,अशी नावे असलेल्या अनेक बैलाजोड्यां होत्या.पावसाने चिखल झालेलाअसे.त्या चिखलात जनावरांचे शेणमुत मिसळून,त्या राड्याचा उग्र वास सगळीकडे पसरे.अंधारलेल्या संध्याकाळी,चिमणी,
कंदिलाचे उजेडात,त्या राड्यातून बैलांच्या मधून वाट काढत जायचे.
खांदेमळणी करताना बैलांच्या थरथरणा-या खांद्याचा झालेला 'स्पर्श'आज ही जाणवतोय.त्या राड्याचा उग्र वास,आजही नाकात आहे.चिखलात भिजलेले पायअजूनही ओलेचिंब आहेत.बैलांचे हंबरणे आताही कानात घुमतेय .असे वाटते.
   पोळ्याचे दिवशी सकाळपासूनच गडबड सुरू असे.
बैलांना धुण्यासाठी तळ्यावर किंवा विहीरीवर नेले जाई.
त्यांना घासून घासून धुतल्यावर,चा-यासोबत,भाकरी, पोळ्या चारायच्या.तेल पाजायचे.अन चरायला न्यायचे.वैरणपाणी झाल्यावरथोडी विश्रांती द्यायची.
दुपार नंतर सगळ्या गावातली गुरे गावाबाहेर मैदानावर एकत्र येत तिथे त्यांना सजवले जाई. शिंगांना वॉरनीश लावायचे,कपाळावर लोकरी गोंडे बांधायचे. बैलांचे साज म्हणजे , वेगवेगळ्या आकाराच्या पितळी घुंगरांच्या माळा,
कवड्याच्या ,रंगीत काच मण्यांच्या माळा एरवी बैठकीत आणि माडीवरच्या खुंट्यांना लटकवलेल्या असत.त्या  काढून स्वच्छ करून ,बैलांच्या ,गायींच्या गळ्यात घालायच्या.त्यांचे अंगावर रंगीत छापे मारायचे,झुली घालायच्या.रंगीबेरंगी,छान चित्रे कलाकुसर असलेल्या झुली विकत मिळत.आमच्या कडे तयार झुली नव्हत्या.
मानाच्या दोन बैलजोड्यांचे अंगावर चक्क आई,आजीच्या
जरीच्या साड्याच झुलीसारख्या टाकल्या जात.त्या
निसटू नयेत म्हणून त्यांचे टोकांना दो-या लावून बांधायचे.
शिंगांना गोंडे कागदी फुलांच्या माळा बांधायच्या.
सजवलेले .मग पोळा फुटे.म्हणजे बैलाची मिरवणुक सुरू होई. त्यांना मंदिरा समोरून नेवून,देवदर्शन घडवून,गावाचे वेशीतून घरी नेले जाई.वेशीत नारळ फोडले जाई.बैल घरी आल्यावर,त्यांच्या पायावर पाणी घालून,पुजा करून.पुरणाच्या पोळ्या खावू घातल्या जात.एखादा बैल पोळी न खाता तोंड फिरवत असे.तो बैल रुसला असे समजत.काही वेळा बैलाची मिरवणूक निघाली की पाऊस येई.पोळ्याला बैलाच्या पाठीवर पाऊस पडणे हा  शुभशकुन समजला जातो.
पोळ्याला घरी पण गडबड असे.शेतातून आणलेल्या चिकणमातीचे बैल,गाय,वासरू बनवायचे.त्याला चुना गेरूने रंगवायचे.राखी पोर्णीमेच्या राख्या त्यांच्या भाळी बांधून,पाठीवर चमकीचा कागद(बेगड)चिकटवून सजवायचे देवघरात पाटावर मांडून, फुले ,आघाडा, दुर्वा, वस्त्रमाळा,हळदीकुंकू,गुलाल वाहून त्यांची पुजा होई.
देवासोबत,त्यांनाही नैवेद्य दाखवून ,आरती केली जाई.
  घरातील बायका सकाळपासूनच कामात व्यस्त असत.
सकाळची कामे आटोपली की पोळ्यासाठी लागणारे सामान काढून द्यायचे.पुजेची तयारी करायची.मग  संध्याकाळीचे जेवणाची तयारी.पुरणपोळी,वरण भात,कढी भजे,भाज्या,कोशिंबीर असा बेत असे.तो स्वयंपाक करायचा.कामावर असणा-या सगळ्या गड्यांना,बलुतेदारांना रात्री जेवण दिले जाई.त्यात पुरणपोळी सोबत गुळवणी असे.त्या स्वयंपाकासाठी गड्यांच्या बायका येत.त्यांना लागणारा शिदा,साहित्य द्यायचे,हवे नको पाहायचे,अशी अनेक कामे  घरातील बायकांना असत.
संध्याकाळी पोळ्याचे  बैल घरी आल्यावर त्यांची पुजा झाली की घरातील पुरुषांची पंगत बसे.ब्राह्मण-सवाष्ण असत.नंतर गॅसबत्तीचे प्रकाशात अंगणात गड्यांची पंगत बसे.पत्रावळीवर जेवण वाढले जाई.वरण गुळवणी
साठीचे द्रोण लवंडून सांडू नयेत म्हणून भाताचा आधार असे.आम्ही जेवायला वाढत असून.वाढताना पुरणपोळीचा आग्रह होई.गड्यांचे आपसात हास्यविनोद होत.जेवणानंतर सुपारी, तंबाखू ,बिडी काडी ,ज्याला जे लागते ते,दिले जाई.जे पंगतीला नसत,ते आणि इतर अनेक पोळ्याचे'वाढण'घेऊन जात.त्यासाठी रात्री घरासमोर गर्दी होई.दुसरे दिवशी सकाळीपण !
   एका पोळ्याचे रात्री,बैलांना वैरण घालण्यासाठी,
गायवाड्यात गेलो.अंगावरचा साज उतरवलेले,बैल दावणीला बांधलेले होते.हा 'दिवस'आपला असतो,
आपल्यासाठी 'खास' असतो.माणसं आपल्याशी नेहमीपेक्षा वेगळे वागतात,हे त्यांना कळत असेल का असा विचार मनात आला. बैल मुकाट्याने समोरचा कडबा खात होते.रवंथ करत होते.कांही ऊभ्याने,कांही बसून!
बत्तीस वर्षापूर्वी गाव सुटले. त्यानंतर किती चातुर्मास,किती श्रावण,किती सण आले.गेले.पोळ्याला बाजारातून मातीची बैलजोडी आणून पुजा होते.पण हे सगळे उपचारापुरते उरलेआहे असे वाटते. गावाकडचा चातुर्मास,ते सण,ते दिवस आणि ते लोक,त्यांच्या श्रध्दा,भाबडेपणा सहित,केव्हाच इतिहास जमा झालेत!
       
                         नीलकंठ देशमुख

 

  

संस्कृतीअनुभव

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

29 Mar 2022 - 12:19 pm | सौंदाळा

हे वाचायचे राहूनच गेले.
छान स्मरणरंजन. गावतले जीवन / श्रावण महिना कधी अनुभवला नाही.
पण शहरात आमच्या घरीही श्रावणात व्रत, वैकल्ये, कहाण्या वाचणे, श्रावणी सोमवारी ब्राह्मण आणि शुक्रवारी सवाष्ण जेवण असे (अजूनही असते)
सोमवारी लहान मुले सोडून सगळ्यांचे कड्कडीत उपवास आणि संध्याकाळचे जेवण मात्र लवकर ६.३० च्या आसपास असे. आम्ही शाळेतुन यायचो तेव्हा आई, आजीची स्वयंपाकघरात जेवण, नैवेद्याचे ताट बनवणे वगैरे गडबड चालू असे.
राखी पौर्णिमेला (आणि भाउबीजेला सुद्धा) खो खो असे. माझी बहिण, वडीलांची बहिण, आईचा भाऊ, आजीचा भाऊ (आ त्याच्या नवरर्‍याची बहिण, बहिणीच्या नवर्‍याची बहिण हे पण) सगळे एकाच शहरात असल्यामुळे खतरनाक प्लॅनिंग करावे लागे (अजूनही लागते) त्यामुळे एकदम झंझावाती दौरे आणि भरपूर गाठीभेटी व्हयच्या. २५/३० वर्षांपूर्वी फोन वगैरे नसताना असे भेटणे म्हणजे अप्रूप वाटायचे.
पोळ्याला मात्र विशेष काही नसायचे. रादर पोळा आला / गेला हे आमच्या लक्षात सुध्दा नसायचे.
नागपंचमीला गारुडी दारावर यायचा, टोपलीत नाग दाखवून आणि पैसे, दुध घेऊन जायचा. त्याची मात्र एकदम आतुरतेने वाट बघायचो. नंतर तो कधीतरी यायचा बंद झाला आणि परत कधी आलाच नाही. कुठुन यायचा, ईतर वेळी पोटापाण्यासाठी काय करायचा असे प्रश्न तेव्हा कधी पडले नाहीत.

नीलकंठ देशमुख's picture

29 Mar 2022 - 1:04 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल. या निमित्ताने तुमच्याही बालपणीच्या स्मृतींना उजाळा मिळाला.मला छान वाटले.

नगरी's picture

30 Mar 2022 - 10:15 am | नगरी

यातल्या काही गोष्टी आठवतात

नीलकंठ देशमुख's picture

1 Apr 2022 - 10:19 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल

नगरी's picture

30 Mar 2022 - 10:15 am | नगरी

यातल्या काही गोष्टी आठवतात

कर्नलतपस्वी's picture

30 Mar 2022 - 10:34 am | कर्नलतपस्वी

बायकांसाठी खास महिना. साहित्य सृजन, खासकरून कवीता खुपच भारी लिहिल्यात.

सिरुसेरि's picture

30 Mar 2022 - 3:09 pm | सिरुसेरि

जुन्या काळातील ग्रामीण जीवनातील निसटलेल्या आठवणींची छान उजळणी या लेखामधुन मांडली आहे .

नीलकंठ देशमुख's picture

31 Mar 2022 - 9:00 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल

चौथा कोनाडा's picture

1 Apr 2022 - 1:02 pm | चौथा कोनाडा

छान स्मरणरंजन ! गावात असताना श्रावण महिन्यातले असे काही प्रसंग बालपणी अनुभवले होते त्याची आठवण झाली !
झकास लेखनशैली !

आषाढात नदीला बक्कळ पुर यायचा, श्रावणात कमी व्ह्यायचा, नदीतला मऊ चिखल किनार्‍यावर येऊन साचायचा, मग त्या चिखलातून, बैलं, हत्ती, माणसं, देवाच्या मुर्ती असं कायबाय करत रहायचो आम्ही, हाताला चांगलं वळण लागलं, मोठेपणी शिल्पकला कराविशी वाटत होती पण योग नाही आले !

नीलकंठ देशमुख's picture

1 Apr 2022 - 11:12 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल. तुम्हाला बालपण आठवले.हे वाचून छान वाटले.