दिल का रिश्ता.
इसवी सन- २००३
जय मेहता- अर्जुन रामपाल
टीया- ऐश्वर्या रॉय
जयचा बाप- परेश रावळ
अनिता- ईशा कोप्पीकर
टीयाची आई- राखी
सुरूवात.
जय आफ्रिकेतून आंघोळ वगैरे करून घाईगडबडीत त्याच्या मुंबईतल्या घरी येण्यासाठी निघतोय. आणि त्याचवेळी रावळपापा लंडनहून घराकडे निघालेत.
रावळपापा अत्यानंदाने घरात घुसून मीच आधी पोचलो अशी आरोळी ठोकतात. परंतु जय त्यांच्याआधीच पोचलेला असतो.
दर वर्षी एका विशिष्ट दिवशी जयच बापाच्या आधी घरी पोचत असतो, हे आपल्याला त्यांच्या संवादातून कळते.
दुर्दैवाने रावळपापांची फ्लाईट लंडनला दोन तास लेट झाल्यामुळे पापांचा चान्स याही वेळी हुकलाय..!
पण काय हरकत नाय बरं का पापा.. फुडच्या वर्षी ट्राय करा..आम्हालाबी तसं काय काम नसतं. आम्ही अंपायर म्हणून बसतो इथं तुमच्यासाठी.
इकडे रावळपापा बेडरूममध्ये आपल्या मृत बायकोच्या फोटोपुढे उभं राहून तिला बड्डे विश करतायत..!
तिकडे शेजारच्या रूममध्ये जय आईच्या पैंजणाशी पॅरानॉर्मल संवाद साधत तिला बड्डे विश करतोय..!
आईचा पूर्वीच कधीतरी विमान अपघातात वगैरे मृत्यू झालाय..! परंतु जयला हे मान्य नाहीये..! त्याला वाटतंय की त्या पैंजणाच्या रूपात आई सदैव त्याच्याबरोबर आहे..!
तर जय असा निरागस आहे, भावनाशील वगैरे आहे..
बाकी आई फोटोतूनसुद्धा मंद मंद मायाळू मायाळू हसताना दिसते.
रावळपापा पोराला उद्देशून पूर्णवेळ 'अरे यार अरे यार' असेच म्हणतात. त्यांचे पोराशी अत्यंत दाट मैत्रीचे संबंध आहेत.
शिंगं मोडून वासरांमधी शिरण्याची बॉलिवूडच्या बापांची जी परंपरा असते; रावळपापा ती वाट मोडू इच्छित नाहीत..!
मैत्रिण अनिता थेट समाजसेविकाच आहे. समाजसेवेसाठी तिने एक विशिष्ट फील्ड निवडले आहे. त्यामुळे जयला घेऊन ती एका मूकबधिर मुलांच्या शाळेत जातेय.
आणि आश्चर्य म्हणजे टीया तिथेच शिक्षिका आहे.
तिथे ती शाळकरी मुलांबरोबर हसतहसत बास्केटबॉल खेळत असते. तर मग तिला बघून जय गार पडतो..!
ऐश्वर्याचं 'ते' स्माईल पुढे १५-२० वेळा पहायला मिळतं. म्हणजे कबूल आहे की आहात तुम्ही अतिसुंदर..! आणि तुमचं ते स्माईलही फारच जगप्रसिद्ध वगैरे..! पण म्हणून किती वेळा हसून दाखवणार ना.! म्हणजे त्यातून समजा नंतर जबड्याचे स्नायू आखडण्याचाही त्रास होत असेल ना..! तर त्या त्रासाचं कसं काय करता? म्हणजे काळजीपोटी विचारतोय.. सहजच.. बाकी तसं काय नाय.
बाकी त्या शाळेतल्या ओरिजनल शिक्षिकाही त्या सीनमध्ये दिसतात. ऐश्वर्याच्या उपस्थितीचा एक स्पष्ट दबाव त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वांवर दिसतो. त्यांनी हा दबाव घेण्याचं काहीच कारण नव्हतं खरं तर.. पण आता असो.
रावळपापा हुबेहूब अब्जाधीश बिझिनेसमन. जय प्रेमात पडल्याचं समजल्यावर पापाच एक्साईट होतायत..! टणाटण उड्याच मारतायत..!
इथे हे बापलेक जरा काही झालं की एकमेकांना मिठ्या मारतात. माराव्यात मिठ्या त्यांनी. काय प्रॉब्लेम नाही.! परंतु अगदी गैरसमज होईल इतक्या वेळा नको..!
आणि हाच तर फरक असतो ना त्यांच्यात आणि आमच्यात..!
कारण एकेकाळी आमच्या प्रेमविषयक हालचाली माझ्या वडीलांच्या कानावर गेल्या होत्या.. तर त्याप्रसंगी वडीलांच्या आवाजात एक हिंस्र धग होती की, "का रं ss.? लव झालंय गा तुला ? आं ss?.. लय लव करू वाटतंय गा ? व्हय रं ?? "
तर त्यांच्या सवालांमधली ती दहशत बघूनच आमी हबका खाल्ला..! जाग्यावं गोठून गेलो..! आनी आमच्या लवचा इशय तिथंच सपला..!
तर मग जयकडून मूकबधिर मुलांसाठी चॅरिटी शोचे नियोजन..!
शिक्षिकेलाही त्या शोमध्ये एक आयटेमसॉंग करावे लागते. कारण ती शिक्षिका अर्थातच ऐश्वर्या रॉय आहे..!
दय्या दय्या दय्या रे..! हेच ते गाणं..! जे आमच्या रसिक ट्रॅक्टर ड्रायव्हरांनी आमाला बेसुमार वेळा ऐकवलंय.
बाकी मग जय टीयाला प्रपोज करतो परंतु तिथेच चिमुटभर ट्विस्ट आहे. टीयाच्या बॉयफ्रेंडची एंट्री होते. म्हणजे प्रियांशू चॅटर्जी..! ऊर्फ राज..!
तिकडे जयची अवस्था मोडलेल्या फांदीसारखी..! दर्देदिल जय आईचे पैंजण काढून पुन्हा एकदा पॅरानॉर्मल संवाद साधायला लागतो की मी हार मानणार नाही वगैरे..!
आरे बाबा ती पोरगी सरळसरळ नाही म्हणालीय..! आनी ऑलरेडी तिचं जमलंय एकाबरोबर..! आता उगाच त्या मॅटरमध्ये खेटत बसण्यात काही अर्थ है का.! पण पैंजण हे असलं काही सांगू शकत नाही..!
राज आणि टीयामध्ये घट्ट बॉंडींग आहे, हे सरळसरळ दिसतंच मग आपल्याला..! आणि त्यांना राखीमाँचा आशिर्वादपण आहे.! बास की मग.! आनी काय लागतं? मग लग्न, माप ओलांडणे आणि हुंड्याच्या स्वरूपात राखीमाँ जावयाच्या घरी..! कारण जावई राज अनाथ वगैरे असतो. आणि त्याला राखीमाँमध्ये थेट आईच सापडते.
तसा एका गाण्याच्या माध्यमातून दोघांचा रोमान्स दिसतो. आणि गाणं संपल्यावर लगेचच टीयाला मुलगा होतो..!
इकडे जय दारू पिवू पिवून टाईट..!
जगभरातले सगळे टॉपचे सीईओ, बिझनेसमेन वगैरे माझ्या भेटीसाठी तरसतायत आणि मी टीयासाठी तरसतोय, असा एक जय मनुष्याचा डायलॉग ऐकायला मिळतो..!
असाच एकदा जय फुल्टू फकाट होऊन ॲक्सिडेंट करतो. जयची गाडी आणि राजची गाडी यांच्यात धडाम्मधूम् ठोकर..! दोन्ही गाड्या स्लो मोशनमध्ये उलट्यापालट्या..! म्हणजे खरोखरच उलट्यापालट्या..! अगदी घोडे वगैरे सगळे बंधमुक्त..!
तिकडच्यापैकी राज ऑन दी स्पॉट खलास..! इकडच्यापैकी अनिता ऑन दी स्पॉट खलास..!
उरले दोघेच..!
जय आणि टीया..! ऐश्वर्या आणि रामपाल..!
जय होss!!
राज हा या पिच्चरमधला एकमेव सेन्सीबल माणूस..! त्याला डायरेक्टरनं हकनाक मारून टाकलं..! जयला मात्र काहीच झालं नाय. तो जसाच्या तसा फूल पीसमध्ये शिल्लक राह्यलाय. आपल्याला छळायला..!
पुढचा सीन हॉस्पिटमधला. बेडवर जखमी स्वरूपातली टीया. शेजारी चिंताग्रस्त डॉक्टर्स. टीया हळूहळू डोळे उघडतेय. डॉक्टर्स एकमेकांकडे पाहून आशादायकपणे मान हलवताय.
ओह् शिट..! आता हे काय झालं.! टीयाबेटी राखीमाँलासुद्धा ओळखत नाहीये..! अवघडच्चे आता..! आता डॉक्टर्स एकमेकांच्या कानांत कुजबुजत मान हलवताय..! उगाच कॉरीडॉरमधनं टाईमपास पळापळ करतायत नेहमीसारखीच..!
राखीमाँ चिंताग्रस्त..! परंतु डॉक्टर्स म्हणतायत की अशा क्रिटीकल केसेसमध्ये काहीही होऊ शकतं. मी आता ताबडतोब न्यूरोसर्जनला बोलावतो. तुम्ही पैशाचा जुगाड करा.
तिथे रावळपापा दबा धरून उभे असतात. ते म्हणतेत पैशांचा काईच विषय नाय. पयले टीयाला बरं करा.
बाकी मग डॉक्टरांचं म्हणणं असं पडतं की टीयाची याददाश्त मिटून गेलीय. कधी माघारी येईल काईच सांगता येत नाय. आता तुम्ही तिला कसल्याच जुन्या आठवणी करून दिऊ नका. नायतर तिच्या मेंदवावर दबाव येऊन ती पागलबिगल होईल..! तर आता तिला जुनं काय सांगत बसू नका उगंच..! आता निसर्गाला स्वतःचा मार्ग स्वतःच निवडू द्या..! लेट द नेचर टेक इट्स ओन कोर्स..! डू यू गेट माय पॉईंट??
मोठा बाका प्रसंग गुदरला आहे..! आता हितं भारतात राह्यले तर टियाला जुनं कायतरी आठवून तिच्या मेंदूच्या नाजूक नसा फाटणार..! त्येच्यानं ती येडी बिडी झाली तर कुठं बगत बसता.! म्हणून मग जय, रावळपापा, राखीमाँ, टीया आणि टीयाचं बाळ, असा सगळा बारदाना आता विमान पकडून थेट दक्षिण आफ्रिकेला निघालाय..! आता तिकडं काय हुतंय ते बगाय पायजे..!
*****
तर रावळपापांनी राखीमाँला घोळात घेऊन पटवून दिलंय की कार ॲक्सिडेंटमध्ये इतर लोक पैशे चारून केस दाबून टाकतात.. परंतु माझ्या भाबड्या पोरानं तिची सगळी काळजी घेतली. त्यामुळे आता तुमी त्येला माफ केलं पायजेल.
राखीमाँ टियाला विमानातच ब्रीफींग देतायत की तुझ्या बेस्टफ्रेंड अनिताचा कार अपघातात मृत्यू झालाय. अनिता म्हणजे जयची बायको होती.! आणि आता त्यांच्या मुलाला, अंशूला सांभाळणं हे तुझं कर्तव्यच आहे. आता तू अंशूची मावशी हो..! बाय द वे, त्यासाठीच आपण आता आफ्रिकेच्या दिशेने निघालोय.
जय-टिया केपटाऊन दर्शनास निघत्येत..! आणि त्यातून समजा जाताजाता आफ्रिकन संस्कृतीच्या विविध पैलूंना स्पर्श वगैरे..! आणि आपल्याला तरी ते प्रत्यक्ष कधी बघायला मिळणार ना..! त्यासाठी पैसा लागतो..! आहे का तुमच्याकडे? पैसा वगैरे? नाही ना? मग सध्या भागवा पिच्चरवरच..!
कारण केपटाऊन तिकडं आफ्रिकेत है.! लय लांब है ते..! मागे शाळेत असताना भूगोलाच्या पुस्तकातला वास्को द गामा आला होता वळसा घालून..! आणि त्यानंतर मग थेट आपले जय-टियाच गेलेत तिकडे आता..!
तर समुद्राच्या दिशेने कुठेतरी बोट दाखवत जय सांगतो की तिथे अटलांटिक आणि हिंदी महासागर मैलोनमैल प्रवास करून एकत्र आलेत..!
यावर टिया विचारते की, तुला पण या समुद्रांप्रमाणे मागचा सगळा भूतकाळ विसरून एक नवीन प्रवास सुरू करण्याची इच्छा आहे का रे?
बाकी इथे कन्सेप्ट थोडासा चुकला आहे..! कारण प्रवास तर नद्या करतात ना..! समुद्र तर फक्त जागच्या जागीच वरखाली डुचमळत उभा असतो ना..!! पण ही तशी मायनर मिस्टेक आहे..! त्यामागची भावना महत्त्वाची.! नवनवीन प्रवासाची ओढ तर अतिमहत्वाची..!
बाकी मग टणाटण रावळपापांच्या अंगात आता लव्हगुरूचा संचार झाला आहे.. त्यामुळे ते जयला पटवण्यासंबंधी टियाला टिप्स देतायत..! ज्या दयनीयच आहेत..!
आणि आपला गुणी जय टियाला बिलकुल प्रतिसाद देत नाहीये..! त्याची मजबूरी आपण समजून घेतली पाहिजे..!
कारण जयच्या मनात एक प्रकारचा गिल्ट आहे की आपण राजला अपघाती मारले..!
आता हे असं होतंच ना म्हणजे..! म्हणजे समजा तुम्ही टुन्न होऊन गाड्या उडवता..! त्यात समजा चुकून माणसं वगैरे मरतात..! आणि त्याचा नंतर त्रास होतो तुम्हाला..! तुमचं मन तुम्हाला खातं वगैरे..!
आणि मग तुम्ही समजा आजून तीन-चार वेळा पैंजण घेऊन बडबडत बसता..! ते बघून तुम्ही पार सटकलाय म्हणत प्रेक्षक जबडातोड जांभया द्यायला लागतेत समजा..! पण तरीही तुम्ही एक भावनाशील सज्जन माणूस असताच ना..! कारण शेवटी तुम्ही या पिच्चरचे हिरोच आहात ना..!
"बीता हुआ कल. गुजरा हुआ कल. जिंदगी फिर से शुरू करना. हादसे तो होतेईच रह्यते हय. जो गया वो गंगा कू मिळ गया... आनी जे गेलं ते कायमचंच गेलं.. आता काय ते म्हागारी येनार नाय. आणि शिवाय अपघात म्हणल्यावर त्यात माणसं मरणारच..! त्येचं काय एवढं..! आता नवी सुरुवात कराय पायजे..! ते महत्वाचं"
या प्रकारची वाक्यं मग उरलेला एक तास सगळेजण एकमेकांना सांगत राहतात..!
कोणत्या क्षणी नेमकं कोण कुणाची समजूत घालतंय, हे समजून घेण्यात आपलाच गोंधळ उडायला लागतो..! कारण सगळेच आळीपाळीने एकमेकांचे काऊन्सेलिंग करत सुटतात..!
करारी बाणेदार राखीमाँचेसुद्धा मूड्स प्रचंड स्विंग व्हायला लागतात..! कारण शेवटी असं आहे की आसपास सदैव सगळे मेंटल लोक वावरत असताना राखीमाँ तरी किती काळ अलिप्त राहणार ना..!
ह्या डायरेक्टरची क्षमता बाकी असाधारण आहे. तो काहीही करू शकतो. म्हणजे जयच्या हातातून पैंजण खाली पाडून टियाला पटाकदिशी पाय पुढे करायला लावतो की घाल ना आता ते माझ्या पायात वगैरे..!
किंवा समजा केपटाऊनच्या मार्केटमध्ये एखाद्या तंतोतंत भारतीय ज्योतिषाला स्टॉल लावून बसवू शकतो..!
किंवा समजा टणाटण रावळपापांना बेंटेक्स हर्ट ॲटॅकचा झटका देऊन त्यात पंधरा मिनिटं शुद्ध टाईमपास करू शकतो..!
किंवा समजा जयला परराष्ट्रमंत्र्यांची अपॉइंटमेंट धुडकावून लावायला सांगू शकतो..!
कारण असं आहे की पिच्चरची लांबी वगैरे भानगडी असतात.. त्येच्यासाठी मोकळ्या जागा जमेल तशा भराव्या लागतात आपापल्या परीने.. शिवाय सगळ्या वयाच्या प्रेक्षकांना थोडं थोडं समाधान द्यावं लागतं..! काय एक ताप है का?
प्रतिक्रिया
22 Feb 2022 - 8:50 am | ज्ञानोबाचे पैजार
मस्त चिरफाड शिणुमाची
पैजारबुवा,
23 Feb 2022 - 9:15 am | सुखी
Lol
23 Feb 2022 - 10:04 am | श्रीरंग_जोशी
दिल का रिश्ता चित्रपटावरचा हा लेख म्हणजे थेट स्टेडियमबाहेर मारलेला षटकार.
या चित्रपटातले एक दृष्यच मी पाहिले होते. प्रियांशू चॅटर्जी हुंड्यामधे आई हवी म्हणून सासूबाईंना विनंती करणारा.
चित्रपट कसाही असो याची दोन गाणी मला खूप आवडतात. दिल का रिश्ता बडा ही प्यारा है, दिल चुरा ले. कारण ९०च्या दशकाच्या संगीताचा तो पुढच्या दशकात संपत आलेल्या परिणामाचा काळ होता. अलका याज्ञिक व कुमार सानूची गाणी ऐकायला मला आजही आवडते.
बादवे या चित्रपटाची निर्मिती ऐश्वर्या राय व तिचा भाऊ आदित्य राय यांनी केली होती. पटकथा लेखकांपैकी एक नाव वॄंदा राय यांचे आहे (ऐश्वर्या रायची आई).