रस्त्यावरचे टिमटिमणारे दिवे रात्रीच्या प्रवासात घाट उतरताना दिव्यांचे पुंजके दिसतात तशा दिसणार्या छोट्या वाड्या वस्त्या.... असं काहीच नाही. चित्रकलेच्या वर्गात रंगकाम करताना अगोदर कागदाला रंगाचा वॉश देतात ना तसा तपकिरी काळपट धूरकट रंगाचा वॉश दिल्यासारखं. क्षितीजाच्या खालचं जग त्या धुरकट तपकिरी रंगाच्या वॉश ने झाकून टाकलंय.
मागील दुवा ध्रांगध्रा - ६ http://misalpav.com/node/49739
क्षितीजापासून अगदी डोंगरापर्यंत. मुंबई नाशीक पुण्याचं ठीक आहे. तिथे कारखान्यांच्या धूराचे प्रदूषण असते.हे इथे कसलं प्रदूषण? पण हे प्रदूषण माझ्या अगदी जवळपर्यंत आहे.समोर उजवीकडे वळत डोंगरमाथ्याकडे जाणारी वाट स्पष्ट दिसतेय अगदी शेवटच्या वळणापर्यंत. डावीकडे खाली उतरणारी वाट मात्र वीस एक फुटापर्यंत कशीबशी दिसतेय. त्यापुढेही उतरतेय.पण त्या धुक्यात कुठेतरी मधाच्या बाटलीत चमचा बुडवल्यावर चमच्याचा पुढचा भाग अदृष्य होऊन फक्त दांडीच दिसावी तसा.
" मायला शिवा..... हे बघ, कसलं भारी दिसतय्,आपण ढगांच्या वर आहोत. हॉलिवूडच्या पिक्चरमधे असल्यासारखे " महेशचा उत्साह त्याच्या बोलन्यातून जाणवतो." आपण इतक्या वर आलो असू वाटले नव्हते"
" अरे ते ढग नाहीत. प्रदूषण आहे" माझ्या मनात शंकेची पाल जागी आहे." ढग कुठे असे तपकिरी कुठे असतात. ढग एकदम करकरीत पांढरे असतात"
" ह्या ! इथे कसलं आलंय प्रदूषण! हे ढगच आहेत . चंद्राच्या प्रकाशामुळे ते तसं वाटतय. आणि ही पांढरीला जाणारी वाट बघ कशी ढगात चाललीये.या वाटेने जाणारा माणूस ढगातच जाणार.आपण लहानपणी म्हणायचो ना " गेला ढगात" तसा. अगदी ढगात." जितेंद्रचा एक सिनेमा होता त्यात तो स्वर्गात जातो. तिथे असले ढग दाखवले होते, जमिनीवर . त्या ढगांवर असेल की चंद्राच्या उजेडाच परीणाम" महेशला एक एक कल्पना सुचायला लागल्यात.
" मग जा या वाटेने . तुला ढगात गेल्यासारखं वाटेल." हे वाक्य माझ्या तोंडून का आलं कोण जाणे. महेशचा उत्साह एकदम दुणावला.मघाशी थकलेला महेश आणि आत्ताचा उत्साही महेश हे एकच आहेत हे साम्गून खरे वाटणार नाही कोणाला. अर्थात इथे सांगणार कोणाला हे आहेच.
" चल रे आपण जरा ढगातून जाऊन येवूया."
"अरे थांब आपण ठरवलंय ना इथून परत फिरायचं, म्हणून" मी महेशला थांबवतो. माझ्या डोक्यात इथून परत फिरून निदान पहाटपर्यंत तरी नाशीकला पोहोचायचे वेध लागलेत. अर्थात माझ्या बोलण्याचा तसाही उपयोग होणार नाहिय्ये. अरे थांब म्हणेपर्यंत महेश पायवाटेवरून पुढे जात कमरेइतक्या धुक्यात पोहोचलाय.तो पुढे जातोय. नदीच्या पाण्यात पुढे पुढे जाताना पाण्यात जसं अगोदर पाऊल बुडतं, मग पाणी घोट्यापर्यंत येतं.गुढग्या पर्यंत येतं कमरेपर्यंत येतं. प्रत्यक्षात पाणी वर येत नाही. तर आपण खाली जात असतो. महेश त्या धुक्यात खाली खाली जातोय.आता त्याचे हात कोपरापर्यंत धुक्यात आहेत.हे म्हणेपर्यंत तो खांद्यापर्यंत धुक्यात बुडालाय.आता तर त्याचे फक्त डोकं दिसतय. महेश दिसेनासा व्हायला लागलाय. त्याच्या मागे जाउन त्याला थांबवायला हवं
माझी पावलं महेशच्या मागोमाग त्या उताराच्या वाटेवर पडायला लागलीत.खरं तर धुकं असं दाट शाईसारखं नसतं शाईत जिथपर्यंत बोट बुडवतो तिथपर्यंत ते दिसेनासं होतं धुक्यात अस्म होत नाही. अस्पष्ट का होईना तुम्ही थोडे थोडे दिसत रहाता निदान काही अंतरापर्यंत तरी.
मी त्या धुक्यात पोहोचलो. एक पाऊल उचलून धुक्यात टाकणार ..... मनात कोणीतरी जोरात ओरडून सांगतय. नको...... पुढे जाऊ नकोस.... मनात कसलीशी एक भिती. .....एक अनामिक संवेदना. पुढे काहितरी वेगळ आहे.... नक्कीच........ पण काय ते समजत नाहिय्ये. महेश आता पूर्ण दिसेनासा झालाय. आपण त्याला आता तर हाताला धरून ओढत परत आणायचा. आधीच वाट उताराची ...त्यात हे धुकं. उगाच कुठेतरी तोल जाऊन पडायचा.
माझी पावलं निर्णयाची वाट पहात नाहीत.पुढे सरळ चालायला लागली आहेत. हे एक बरं आहे. उगाच द्विधा मनस्थितीत तिथे उभे रहाण्यापेक्षा त्या उताराच्या पायवाटेवर मी चालतोय.अंगणात पावसाचं पाणी वळचणीला साठावं . उंबर्याच्या उंचीमुळे ते पाणी तिथेच थांबुन रहावं तसं ते धुकं एका ठरावीक रेषेच्या पुढे येत नाहिय्ये.
माझं पाऊल त्या धुक्यात पडलं. रस्त्यात साठलेल्या पाण्यात पाय पडल्यावर पाणी ढवळून निघावं, त्यात जोरदार तरंग उठावेत तसं होतय. दुसरं पाऊलही धुक्यात पडलं माझी दोन्ही पावलं धुक्यात दिसेनाशी झालीत. मी अंदाजाने पुढे पुढे चाललोय. धुकं आता घोट्या पासून गुढग्या पर्यंत आलंय.जसजसा पुढे पुढे जातोय तसतसा मी धुक्यात बुडत चाललोय.कमरेपर्यंत ........ छाती पर्यंत ...... खांद्या पर्यंत. धुकं माझ्या गळ्यापर्यंत आलंय. थोडा दोन पावले पुढे चाललो की हे धुकं माझ्या तोंडाच्या वर जाणार. पुढे जायचं की नाही.... एक विचार मनात चमकून गेला. नीट शब्दात सांगता येणार नाही. अशी कसलीशी एक अनामीक जाणीव मन भरून राहिली. हे सगळं समजायच्या आतच पावलं पुढे पडली आहेत. धुकं माझ्या नाकात पर्यंत आल्यावर ते श्वासात आत जायला लागलंय. त्या धुक्याने माझे आख्खे शरीर व्यापून टाकलंय.
एक मन म्हणतय.पळून जा इथून. इथे काहितरी वेगळं आहे...... घशाला कोरड पडलीये.पण आता उशीर झालाय. पायाखालचा रस्ता दिसत नाहिय्ये.पावलं माझं न ऐकता पुढे पुढे चालली आहेत. आणि त्यांच्या सोबत मी,धुकं आता माझ्या डोळ्यात.माझ्या डोक्यावरचं आकाश नाहीसं होत चाललंय.. माझ्या डोळ्यासमोर तपकिरी पांढरट धुकं पसरत चाललंय. सगळीकडे धुकं धुकं. तपकिरी धुकं. आंधळ्या लोकांना असंच वाटत असेल ना?
मी आजूबाजूला हातानं चाचपडतोय. हाताला काही लागत नाही. उतारावर पावलं पडताहेत.म्हणून पुढे चाललोय असे म्हणायचं. या धुक्यात सगळ्या दिशा संपल्या आहेत. गुरुत्वाकर्षण आहे म्हणून खाली वर तरी समजतय हे नशीब. कुठे धडपडू नये म्हणून मी प्रार्थना करतोय.तेवढंच काय ते हातात आहे. वाट सरळ आहे की कशी ते ही कळत नाहिय्ये.
मी पुढे चाललोय. धुकं आता थोडे थोडे विरळ व्हायला लागलंय. पण अजूनही आजूबाजुला काही दिसत नाही.
धुकं आता आणखी विरळ झालंय. माझी हात दिसायला लागलेत. .
धुकं संपलं. मी आजूबाजूला पहातो.पाऊलवाट समोर स्पष्ट दिसतेय. थोडे पुढे जाऊन ती एका मोठ्या पिंपळाच्या झाडामागे वळतेय.सिनेमाच्या पडद्यावर दृष्य बदलत जावं तसं माझ्या समोर एक छोटं गाव दिसतय. खेडंच म्हणूया. उतरत्या छपरांची मातीची बैठी घरं. गावातून जाणारा कच्चा रस्ता.
सगळ्या घरांना एकसारखा पांढरा रंग. वर मातीची कौलं , गवताने शाकारलेली. कुठे कुठे घराच्या पांढर्या रंगात नीळीची झाक. इतकाच काय तो फरक.
अंधारात घरांचे आकार दिसताहेत.आणि निळसर पांढरा रंग चमकतोय.जवळ जवळ प्रत्येक घरात टिमटिमणारा पणती कंदीलाचा उजेड दिसतोय.डोंगरावरून येणारी पायवाट थेट गावात जातेय.अर्थात पायवाटेला कोण अडवणार...... नाही ..नाही ती वाट अडली आहे. गावाच्या अगदी सीमेवर खंदक असावा तसा एक छोटासा नाला ,ओढा दिसतोय. वात तिथे संपतेय. आणि तो ओढा ओलांडल्यावर नवीन वाट दिसतेय.ओढ्याच्या काठाशी वात संपतेय तिथे महेश उभा आहे.. दिसला बाबा एकदाचा. मी झपझप पावले उचलत महेशपर्यंत पोहोचतो.
प्रतिक्रिया
6 Jan 2022 - 10:16 am | सौंदाळा
वाचतोय
कथा कुठे जाणार? अजून काहीच अंदाज येत नाहीये.
6 Jan 2022 - 10:44 am | ज्ञानोबाचे पैजार
जरा मोठे भाग टाकलेत तरी चालेल.
पैजारबुवा,
6 Jan 2022 - 11:41 am | विजुभाऊ
धन्यवाद पैजारबुवा, सौंदळाभाऊ
मोझ्ठे भाग टाकायचा प्रयत्न करेन. कल्पना आहे लहान भाग पटकन वाचून संपतो. कथा रोज लिहतून लगेच टाकतोय त्यामुळे तसे होतय. मोठे भाग लिहायचा प्रयत्न करतो. मात्र रोज लिहायचे हा संकल्प कायम राहील. प्रत्येक वर्किंग डे ला नवा भाग येईल.
सौंदळाभाऊ कथा पुढे कशी सरकते; ही तुमच्या इतकीच मलादेखील उत्सुकता आहे. पाहुया.
तुमच्या प्रतिसादांमुळे मला लिहिण्सायाठी प्रोत्साहन मिळते. सुधारणेला संधी मिळते
प्रतिसाद देत जा.
7 Jan 2022 - 7:44 am | विजुभाऊ
पुढील भाग ध्रांगध्रा -८ http://misalpav.com/node/49751
9 Jan 2022 - 5:18 pm | चौथा कोनाडा
बाबौ .... कसलं भन्नाट वर्णन आहे ढगांचं !
उत्सुकतेने मी वाचत राहिलो.