झोप येईनाच आज
झोप हवी असताना
जांभयाच्या येती लाटा
वर तारे मोजताना
काय आणून वहावे
निद्रादेवीच्या चरणी
झोप येऊन निवांत
उद्या उजाडेल झणी
किती थकून भागून
देह दिला पसरून
डोळ्यात बाहुल्यांना
काय दिसते अजून?
दिसे कालचा प्रकाश
अन्, तम भेसूर उद्याचे
त्यांच्या मध्ये भांबावले
पाऊल हळव्या झोपेचे
एक मायेचा, माथ्याला
हवा सांगणारा हात
सोड उद्यावर, नीज
खूप झाली आहे रात
- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, २१/१२/२१)
प्रतिक्रिया
22 Dec 2021 - 11:04 am | प्रसाद गोडबोले
बैलाचे शेण हे शीर्षक शोभून दिसेल =))))
22 Dec 2021 - 12:05 pm | पाषाणभेद
"मोबाईल बंद नसतांना" हे शिर्षक ठेवा.
22 Dec 2021 - 12:12 pm | राघव
"आई""माय" हे शीर्षक शोभेल बहुदा. भापो. होतं असं कधी कधी!
22 Dec 2021 - 1:56 pm | नि३सोलपुरकर
रतीबाच्या कविता ?????
23 Dec 2021 - 6:13 pm | चांदणे संदीप
विशेष काय प्रेरणा नव्हती म्हणून आणि लिटरली झोप येत नव्हती म्हणून खरडली कविता...म्हणून रतीबाची म्हटलं.
सं - दी - प
22 Dec 2021 - 2:28 pm | ज्ञानोबाचे पैजार
"फिकर नॉट ... हे दिवसही जातील" असे शिर्षक द्या
अचूक शब्दात भावना मांडल्या आहेत
पैजारबुवा,
22 Dec 2021 - 3:04 pm | कर्नलतपस्वी
म्हणून म्हणतो.......
जीव आहे तोवर जगून घ्या
डोळे आहेत तोवर बघून घ्या
काय माहिती.......
तेलात तळत्याल का अप्सरा भेटत्याल
म्हणून म्हणतो
चिंता खंती खुट्टीवर टांगून द्यायाच हाय
राती अर्ध्या राती जागं रहायच नाय
23 Dec 2021 - 6:14 pm | चांदणे संदीप
तेलात तळत्याल का अप्सरा भेटत्याल.... हे भारीच!
सं - दी - प
22 Dec 2021 - 3:42 pm | अनन्त्_यात्री
कविता.
अशी अवस्था अनुभवताना जवळपास असेच विचार येतात.
22 Dec 2021 - 5:21 pm | श्रीगणेशा
कविता आवडली. विशेषतः वरील कडवे!
22 Dec 2021 - 5:46 pm | चौथा कोनाडा
छान आवडली रचना. आधी अस्वस्थता आणि आर्त अपेक्षा !
+१
"हवा सांगणारा हात" हे शिर्षक कसे वाटते ?
22 Dec 2021 - 5:58 pm | प्रचेतस
एकदम सुरेख रचना.
22 Dec 2021 - 6:14 pm | Bhakti
एक मायेचा माथ्याला,
मायेचा हात माहिती होता,हे नवीन छान वाटले.सगळं नीट होईल, शीर्षक :)
23 Dec 2021 - 6:16 pm | चांदणे संदीप
एक मायेचा, माथ्याला असं पाहिजे होतं ते.
सं - दी - प
22 Dec 2021 - 7:27 pm | बाजीगर
कवितेच्या प्रसव वेदना
कशी येईल झोप सदना |
पोस्ट ली कविता मिसळपाव
चला आता येईल झोपेचा गाव |
आता स्वप्नांचा डाव मांडणे..
मालवा हो (सं )दीप चांदणे ||
22 Dec 2021 - 9:55 pm | चामुंडराय
हा हा ... भारीच बाजीगर सर.
मूळ कवितेबरोबर हे देखील आवडलं.
मालवा हो (सं )दीप चांदणे - हे खासंच.
23 Dec 2021 - 12:18 pm | बाजीगर
धन्यवाद चामुंडाराय जी.
23 Dec 2021 - 6:16 pm | चांदणे संदीप
मालवून कसं चालेल!
सं - दी - प
23 Dec 2021 - 2:37 pm | चौथा कोनाडा
बाजीगर साहेब, मस्त हो मस्त !
🤝
22 Dec 2021 - 9:45 pm | चित्रगुप्त
'शीर्षक सुचवा' असे शीर्षक नसून 'शीर्षक सुचले
नाही' असे आहे.
बाकी कविता आवडली.
23 Dec 2021 - 1:01 pm | तुषार काळभोर
सही पकडें हैं!
23 Dec 2021 - 2:38 pm | चौथा कोनाडा
ते ठिकाय हो चित्रगुप्त साहेब, पण सल्ला द्यायला आसूसलेल्या आम्हां मिपाकरांच्या हे नाय लक्षात आलं तर ठीक समजा !
22 Dec 2021 - 9:59 pm | चामुंडराय
छान
आजकाल रात्री झोपताना मोबल्या नेटाने नीट नंद ... स्वारी ... बंद करावा लागतो झोप येण्यासाठी !!
22 Dec 2021 - 11:24 pm | मित्रहो
कविता आवडली बाकी नावांत काय आहे
23 Dec 2021 - 6:18 pm | चांदणे संदीप
शेक्सपियर का कोणतरी हेच्च सेम म्हटलाय बहुतेक.
सं - दी - प
28 Dec 2021 - 8:25 am | प्राची अश्विनी
वाह!