जंगल (२०१७)

चिमी's picture
चिमी in जनातलं, मनातलं
20 Dec 2021 - 9:23 am

आमच्या बाबांना survival story based सिनेमे आणि डॉक्युमेंटरीजची भारी आवड. बाबांजवळ बसून The Edge, The Poseidon Adventure सारखे कित्येक सिनेमे मी रात्री जागू जागू पाहिलेले. पुढचे २-४ दिवस त्यातले अस्वल किंवा भेसूर चेहरे स्वप्नात येऊन दचकवून परत जागरण घडवायचे तो भाग वेगळा. कितीही घाबरीफाईड झालं, तरी परत पुढचा सिनेमा बघायला मी मोठ्या उत्साहाने तयार असायचे. कारण बाबांच्या मागे लपून बसून तर बघायचे असायचे. तेव्हा सर्वांत सेफ जागा म्हणजे बाबांच्या मागे. तिकडे टीव्हीवर एखाद्या अस्वलाने किंवा मगरीने कोणावर तरी हल्ला करण्यासाठी आ.. केला की दुसरा आआआं.. माझा असायचा. अगदी किंचाळत वगैरे बाबांच्या मागे लपायचं आणि ‘बाबा, गेली का ती मगर? गेली ना नक्की ?’ असा चार चार वेळा विचारून हळूच बाबांच्या खांद्यावरून टीव्हीकडे एक नजर टाकून कन्फर्म करून मग पुढे बघायला परत सुरु.

परवा फेसबुक व्हिडीओ स्क्रॉल करता करता अचानक एका व्हिडीओवर नजर खिळली. डॅनियल रॅडक्लीफच्या २०१७ साली आलेल्या ‘Jungle’ चे ट्रेलर होते. म्हणलं हे काय तरी भारी दिसतय, बघू तरी काय आहे. ट्रेलर बघता बघता माझे मन झरझर भूतकाळात गेले.

२००४ – २००५ च्या दरम्यान डिस्कव्हरी चॅनेलवर “I shouldn’t be Alive” नावाचा एक भन्नाट कार्यक्रम लागायचा. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये, कोणाच्याही मदतीशिवाय अक्षरशः मृत्युशी सामना करून तरलेल्या लोकांच्या survival stories वर बनवलेल्या शॉर्ट फिल्म आणि मधून मधून खुद्द त्या लोकांचे अनुभव कथन असे साधारण या कार्यक्रमाचे स्वरूप होते. त्यातला पहिला-दुसराच भाग होता “Escape from The Amazon”. अमेझॉनच्या जंगलामध्ये तब्बल ३० दिवस अडकलेल्या यॉस्सी गिन्झबर्ग, केविन गेल आणि मार्कोस या तीन मित्रांची ही कहाणी.

अमेझॉनच्या जंगलामध्ये संशोधनासाठी एका वाटाड्याला बरोबर घेऊन हे तिघे निघतात. भयंकर पाउस, दलदल, जंगलात लागणारे चकवे, पुढे घाबरून पळून गेलेला वाटाड्या(हा मुळातच एक बदमाश माणूस असतो), अमेझॉनच्या जंगलातले प्राणी – मगरी, अजगर वगैरे सोडाच पण तिथली मुंगी - बुलेट अँट - हीपण किती भयंकर असू शकते, हा विचारही आपण करू शकत नाही. विशेषत: Antman चित्रपट पाहिलेल्यांना एक डायलॉग आठवत असेल – बुलेट अँटके काटने पे इन्सान पाणी मांगना भी भूल जाता है..

तर २-३ दिवसांच्या प्लॅनिंगने गेलेल्या या मित्रांची पुढे ताटातूट होते. त्यांच्यापैकी मार्कोस हा जंगलातच बेपत्ता होतो. केविन २०-२१ दिवसांनी एका वस्तीजवळ पोहोचतो आणि पुढे तोच अमेझॉनच्या भुलभुलैय्यामधून यॉस्सीला बाहेर काढतो. तब्बल ३० दिवसांनी मरणास्सन अवस्थेमध्ये यॉस्सी बाहेर येतो ते जगण्याची नवी उमेद घेऊनच. डिस्कव्हरीवरची ही डॉक्युमेंटरी तेव्हा इतकी आवडली होती की कधी एकदा बाबा ऑफिसमधून येणार आणि कधी आपण त्यांना ही सगळी स्टोरी सांगतो असं झालं होतं. बाबा ऑफिसमधून आल्यावर रात्री १०-११ ला त्यांच्यासोबत परत एकदा रिपीट टेलिकास्ट बघितले होते.

रिपीट टेलिकास्टच्या वेळी वही पेन घेऊन एपिसोडच्या शेवटी यॉस्सी आणि केविनचे दिलेले वेबसाईटचे नाव, एमेल आयडी वगैरे लिहून घेतले आणि मोठ्या उत्साहाने यॉस्सीला “तुमचा एपिसोड पाहून आम्ही खूपच भारावून गेलो. तुमची इच्छाशक्ती आणि जिद्द आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल.” अशा आशयाचा इमेलपण करून टाकला. यॉस्सीचा रिप्लायपण आलेला. त्याने आणि त्याच्या बायकोने लव्ह आणि ब्लेसिंग्ज पाठवले होते. आता मागे वळून पाहताना गंमत वाटते. काहीही गरज नसताना नसते उपद्व्याप.

पुढे यॉस्सीने लिहिलेल्या ‘Jungle’ या पुस्तकावरूनच त्याच नावाचा चित्रपट आला आहे. बाकी ‘Jungle’ च्या ट्रेलरवरून तरी दिग्दर्शकाने काही cinematic liberty घेतली असावी असे वाटत नाही. एकूण एक scene वरून मला डिस्कव्हरीची डॉक्युमेंटरी आठवत होती. जणू गेल्या काही महिन्यांपूर्वीच पाहिली असावी इतकी लख्ख. फक्त आता इतक्या वर्षांनंतर advanced technology आणि VFX चा पुरेपूर वापर केलेला आहे. Graphics च्या माध्यमातून केलेले अमेझॉनच्या जंगलामधले horror, haunted आणि hallucination scenes पाहून परत एकदा घाबरीफाईड व्हायला झालं. बाबांना ट्रेलरचा व्हिडीओ पाठवला आणि फोन करून सांगितलय, की “हा सिनेमा तुमच्यासोबत पहायचा आहे, तुमच्या मागे लपून.”

चित्रपटलेख

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Dec 2021 - 11:06 am | ज्ञानोबाचे पैजार

हा सिनेमा बघायला आवडेल, कुठे पहायला मिळेल?

"घाबरीफाईड" हा शब्द विशेष आवडल्या गेला आहे

पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

20 Dec 2021 - 5:32 pm | तुषार काळभोर

"घाबरीफाईड" हा शब्द विशेष आवडल्या गेला आहे

चिमी's picture

22 Dec 2021 - 10:07 am | चिमी

सध्या तरी कोणत्याही ओटीटी वर नाही. टोरंटवरून डाऊनलोड करूनच बघावा लागेल.

अजून एक उपद्व्याप म्हणून त्या पुस्तक लेखकाला तुमचा लेख भाषांतर करून पाठवा.

चौथा कोनाडा's picture

20 Dec 2021 - 5:36 pm | चौथा कोनाडा

+१०१
भारी सुचवणी.
सद्गतीत होऊन जातील ते !

चौथा कोनाडा's picture

20 Dec 2021 - 5:37 pm | चौथा कोनाडा

एक नंबर लिहिलंय !
+१
ज ब री

चिमी's picture

22 Dec 2021 - 10:08 am | चिमी

धन्यवाद

Bhakti's picture

20 Dec 2021 - 8:21 pm | Bhakti

छान!

चिमी's picture

22 Dec 2021 - 10:09 am | चिमी

धन्यवाद

कंजूस's picture

21 Dec 2021 - 4:36 am | कंजूस

गंमत आवडली. तर तुम्हाला घाबरवण्यात यशस्वी झाली ती मालिका.

प्रचेतस's picture

21 Dec 2021 - 6:59 am | प्रचेतस

भारी लिहिलंय

चिमी's picture

22 Dec 2021 - 10:10 am | चिमी

धन्यवाद _/\_

श्रीगणेशा's picture

21 Dec 2021 - 8:01 am | श्रीगणेशा

ओघवतं लिहिलं आहे.
आठवणी लिहिणं सोपं असतं पण त्यात वाचकाला खिळवून ठेवणं अवघड. खूप छान.

चिमी's picture

22 Dec 2021 - 10:09 am | चिमी

धन्यवाद _/\_

जेम्स वांड's picture

21 Dec 2021 - 9:54 am | जेम्स वांड

उत्तम परिचय, घाबरीफाईड शब्द आवडल्या गेला आहे एकदमच.

आम्हाला तसला नाद ऍपोकॅलिप्टिक अँड रिसरेक्शन स्टोरीड सिनेमाचा आहे,

द परफेक्ट स्टॉर्म
द डे आफ्टर टुमारो
२०१२

हे त्या सिरीजमधले आवडते पट, डे आफ्टर मधला कवळा जेक गिलेनहॉल पाहून हाच तो प्रिन्स ऑफ पर्शिया असल्यावर भरवसा बसत नाही राव.

बाकी तुमचे परीक्षण पाहून आता जंगल पहावा लागेलच.

उत्तम लेखन, पुढील लेखनास शुभेच्छा

टर्मीनेटर's picture

22 Dec 2021 - 12:52 pm | टर्मीनेटर

मस्त लिहिलंय 👍

सौन्दर्य's picture

19 Jan 2022 - 12:29 am | सौन्दर्य

“हा सिनेमा तुमच्यासोबत पहायचा आहे, तुमच्या मागे लपून.” हे वाक्य वाचताना गलबलून गेलं.

कानडाऊ योगेशु's picture

19 Jan 2022 - 10:00 am | कानडाऊ योगेशु

+१
हेच म्हणतो.
बाप लेकीचे नाते सुरेख उतरले आहे. परिक्षण करता करता ललित लेखच झाला आहे.

sunil kachure's picture

19 Jan 2022 - 9:27 am | sunil kachure

लेख आवडला .