परिणती असो वा नियती
पानगळीत पाने गळती
पण, झाड उन्मळून पडता
हा दोष कुणाच्या माथी?
बहरून सळसळणारे
झाड आपुल्या ताली
जमिनीवर पडते तेव्हा
ना त्याला उरतो वाली
कोमेजून करपून जातील
कोवळी फुले त्यावरची
वेळीच छाटणी करवून
रूजवात करा फुटव्यांची
वादळ नवे येण्यापूर्वी
मोकळ्या करा पखाली
रूजणाऱ्या अंकुरांना
घ्या मायेच्या हाताखाली
- संदीप चांदणे (मंगळवार, ११/०५/२०२१)
प्रतिक्रिया
3 Dec 2021 - 7:36 pm | चांदणे संदीप
खूप आधीच ही कविता लिहीली होती. पण प्रकाशित करायला मनच होत नव्हते. का हे असे शब्द मनावर घिरट्या घालून मला लिहायला भाग पाडतात असेही वाटते कधीकधी. अतिशय दु:खद अशी पार्श्वभूमी या कवितेला आहे ही सल आयुष्यभर बोचत राहणार आहे. पण शेवटी, एक समाज म्हणून आपण काय करायला पाहिजे किंवा काय करू शकतो हेही न विसरणे तितकेच आवश्यक आहे म्हणून हा कविता प्रकाशनाचा प्रपंच.
- सं - दी - प
3 Dec 2021 - 7:48 pm | राघव
काय बोलणार. भावनांशी सहमत.
दुसर्या लाटेत काय काय झाले हे वळून बघतांना देखील त्रास होतो, इतके ओळखीतले गेलेत. :-(
अवांतरः अर्थाला जेव्हा आपोआप शब्द स्फुरतात, तेव्हा जे लेखन होते ते नेहमीच खास असते. लिहिते रहा.
8 Dec 2021 - 2:31 pm | अत्रुप्त आत्मा
++++++++++++1111111111111
9 Dec 2021 - 6:08 pm | तुषार काळभोर
अर्थाला जेव्हा आपोआप शब्द स्फुरतात, तेव्हा जे लेखन होते ते नेहमीच खास असते.
>> वा!! याला पण +१ :)
3 Dec 2021 - 8:56 pm | Bhakti
आपल्या काळजाचे आपणच माळी ,छान रुजलीय कविता!
3 Dec 2021 - 9:48 pm | अनन्त्_यात्री
"रूजवात करा फुटव्यांची" ऐवजी "रुजवणी करा फुटव्यांची" योग्य वाटते (रुजवात = समक्ष भेट/वार्तालाप घडवून आणणे)
4 Dec 2021 - 7:15 am | प्रचेतस
सुरेख एकदम
4 Dec 2021 - 1:25 pm | ज्ञानोबाचे पैजार
त्या अर्थाने कविता आवडली,
पैजारबुवा,
9 Dec 2021 - 7:28 pm | गणेशा
भारी...
-------
दुःख नाही.. खंत नाही.. स्पुर्ती साठी प्रवास असतो
केंव्हा तरी मिटण्यासाठीच काळजामधील श्वास असतो..
- वि. वा.
11 Dec 2021 - 4:42 pm | ॲबसेंट माइंडेड ...
कविता आवडली.
11 Dec 2021 - 8:53 pm | कुमार१
कविता आवडली.
12 Dec 2021 - 1:29 am | श्रीगणेशा
खूप छान!
कविता आवडली.
19 Dec 2021 - 10:28 am | माहितगार
चांदणे ते चांदणे कविता त्यांच्या भारी
आम्हा सुचती केवळ विडंबने तरी
12 Jul 2023 - 6:33 pm | चित्रगुप्त
'विशिष्ट पार्श्वभूमि असलेली' कविता - ती पार्श्वभूमि नेमकी काय हे ठाऊक नसूनही भावली.