मराठी वृत्तबद्ध कवितेत एखादे अक्षर लघु आहे का गुरु यामध्ये संदिग्धता नसते, पण त्याचा कधीकधी जाचही होऊ शकतो. उर्दूमध्ये "हर्फ गिराना" या सवलतीमुळे त्यात लवचिकता, कधी कधी संदिग्धता आणि म्हणूनच रोचकता आली आहे.
.
या लघुलेखात आपण २ गोष्टी पाहणार आहोत
१. हर्फ गिराना काय प्रकार आहे
२. तो कधी कधी नीट न समजल्यामुळे चित्रपट संगीतात कसा घोटाळा होतो
.
या लेखाच्या व्याप्तीच्या बाहेर:
१. उर्दू शायरीचा गण परिचय (माफाइलुन, फाइलातुन, इत्यादी. त्याच्यावर पुढे लिहिण्याची इच्छा आहे)
२. गझलचा आकृतिबंध आणि पारिभाषिक माहिती. https://www.maayboli.com/node/21889 इथे बरीच माहिती मिळेल.
.
सोप्या शब्दांत "हर्फ गिराना" म्हणजे "गुरु अक्षर लघु करणे"
"है अपना दिल तो आवारा न जाने किस पे आएगा" या ओळीचे वृत्त बघूया. गाण्याची चाल डोक्यातून तात्पुरती काढून टाका.
खरंतर हे वृत्त असं आहे: लगागागा लगागागा लगागागा लगागागा, पण सहज वाचलं तर तसं भासत नाही कारण जितका वेळ सामान्यतः बोलताना आपण है, तो आणि पे ला लावतो त्याहून काहीसा कमी वेळ या वृत्तात बसवण्यासाठी आपण घेतो. ही अक्षरे थोडी झर्रकन उच्चारतो. त्यालाच हर्फ गिराना म्हणतात.
.
अशी:
१. है अप ना दिल (सामान्यतः दीर्घ/गुरु असणारा है गिराके लघु म्हणून लगागागा)
२. तो आ वा रा (सामान्यतः दीर्घ/गुरु असणारा तो गिराके लघु, म्हणून लगागागा)
३. न जा ने किस (लगागागा)
४. पे आ ए गा (सामान्यतः दीर्घ/गुरु असणारा पे गिराके लघु म्हणून लगागागा)
.
स्वाध्याय: या ओळींमधला कुठला "हर्फ गिराया" है तो ओळखायचा प्रयत्न करून बघा:
१. ये एक टूटा हुआ तारा न जाने किस पे आएगा
२. बहोत भोला है बेचारा न जाने किस पे आएगा
----
हे अरिष्ट उर्दूमध्ये नियमित कोसळतं. आता याचे काही ढोबळ नियमही आहेत. सगळे काही इथे देता येणार नाहीत, पण आपली सज्जता असावी इतपत उपयोगी होतील:
१)अंत्य वर्ण आ ई ऊ ए ओ असतील तर ते लघु केले जाऊ शकतात.
उदा:
सारे जहाँ से अच्छा हिन्दुस्ताँ हमारा
(गागालगालगागा गागालगालगागा)
या मध्ये से ला लघु गणलं गेलं आहे.
तेरा आणि मेरा ला तिरा आणि मिरा असं लिहिण्यामागे हाच प्रकार आहे. उदा दिलावर फ़िगार यांचा शेर:
न मिरा मकाँ , ही बदल गया, न तिरा पता, कोई और है
मिरी राह फिर, भी है मुख़्तलिफ़, तिरा रास्ता, कोई और है
(ललगालगा ललगालगा ललगालगा ललगालगा)
(तिरा आणि मिरा व्यतिरिक्त ही, को, री, भी, है अश्या दीर्घ/गुरु अक्षरांनाही लघु मानले आहे)
.
२) एखादा गुरु वर्ण “हर्फ गिराके” लघु बनून त्याआधीच्या लघु वर्णात लोप पावू शकतो. त्या दोघांना लघु + गुरु न मानता लघु + लघु मानायचा प्रघात आहे. सोदाहरण देतो:
उलटी हो गयीं सब तदबीरें कुछ न दवा ने काम किया
देखा इस बीमारी-ए-दिल ने आखिर काम तमाम किया
मीर तकी मीर
हा गागागागा गागागागा असा आहे, पण यातली सूक्ष्मता थोडी फोड करून बघूया:
उल टी हो गयीं सब तद बी रें, कुछ न-द वा ने का म-कि या
(गागागागा गागागागा)
दे खा इस बी मा री-ए दिल ने, आ खिर का म-त मा म-कि या
(गागागागा गागागागा)
दोन लघु अक्षरांना एक गुरु मानण्याची पद्धत आहेच. उदा: उल, सब, तद इत्यादी. न-द, म-कि आणि म-त सुद्धा याच प्रकारात मोडतात.
पण गयीं आणि री-ए कडे विशेष लक्ष देऊया.
गयीं: अन्यथा आपण ह्याला लघु-गुरु असं मानलं असतं, पण यीं ला लघु करून ह्याला लघु-लघु अथवा गुरु मानले आहे. त्याला जवळजवळ "गै" असं उच्चारलं जातं.
री-ए: अन्यथा ह्याला आपण गुरु-लघु मानलं असतं (हिंदी उर्दू मध्ये ए लघु असतो), पण री ला लघु करून ह्याला लघु-लघु अथवा गुरु मानले आहे. ह्याचा उच्चार जवळजवळ "र्ये" असा होतो.
३) कधी कधी पुढचा स्वर किंवा महाप्राण आधीच्या व्यंजनात मिसळून टाकणं सोयीचं असेल तर तसंही करतात. वृत्तात बसवायला काहीही!
कल चौदहवी, की रात थी, शब् भर रहा, चर्चा तेरा
कुछ ने कहा, ये चाँद है, कुछ ने कहा, चेहरा तेरा
इब्ने इंशा
(गागालागा गागालागा गागालागा गागालागा)
यामध्ये चौदहवी चा उच्चार जवळजवळ चौधवी असा होतो. हापण हर्फ गिरण्याचाच भाग आहे.
----
आता थोडं बघूया याचा परिणाम गायनावर कसा होतो. अनेक वेळा आपल्याला आवडणाऱ्या गाण्यांच्या चाली छंदःशास्त्रानुसार सदोष असतात. ह्यात अनुचित काही नसलं तरी हे लक्षात येणं रोचक होऊ शकतं.
१) उदा "उमराव जान" मधलं हे गाणं:
ये क्या जगह है दोस्तों ये कौनसा दयार है
हदे निगाह तक यहाँ गुबार ही गुबार है
इथे लगालगालगालगा x२ असा वृत्त आहे. म्हणून पहिल्या ओळीतली ये, है ही दीर्घ/गुरु अक्षरं लघु केली गेली आहेत. पण https://www.youtube.com/watch?v=QdxyXKsWEMs जर ऐकलंत तर ही अक्षरं लांबवली जातात, म्हणून ही चाल छंदःशास्त्रानुसार सदोष आहे.
२) "बाझी" मधलं दुसरं उदाहरण:
तदबीर से बिगड़ी हुई, तकदीर बना ले
अपने पे भरोसा है तो एक दाँव लगा ले
(गागालगा गागालगा गागालगा गागा)
आता दुसऱ्या ओळीत गागालगा गागालगा गागालगा गागा मध्ये बसण्यासाठी पे चा हर्फ गिरवायला लागतो, म्हणजे तो लघु करायला लागतो. इतकंच नव्हे तर भरोसा मधल्या भ वर बल देऊन तो दीर्घ/गुरुही करायला लागतो. पण गाण्याच्या चालीमध्ये पे लघु नसून गुरु आहे.
----
यापुढे हिंदी चित्रपट संगीत ऐकताना आपले कान काहीसे आणखी तीक्ष्ण झाले असतील अशी आशा करत:
धष्टपुष्ट
प्रतिक्रिया
20 Nov 2021 - 2:32 pm | चित्रगुप्त
खूप अभ्यासपूर्ण रसिक धागा. मराठी साहित्यातील 'वृत्त' वगैरेंची जुबुबी ओळख असली, तरी त्यात हे असले लगागागा... वगैरे काही असते हेही ठाऊक नव्हते.
असा काही धागा आला की छान वाटते. अनेक आभार आणि असेच अजून जरूर लिहावे ही विनंती.
21 Nov 2021 - 12:32 am | शेखरमोघे
छान महितीपूर्ण लिखाण. शेवटावरून अणखीही याच सन्दर्भात अपेक्षित. लेख "जे न देखी रवि....." खाली आल्यामुळे कविता समजून बाजूला ठेऊन देणार होतो, पण तसे केले नाही ही चान्गली गोष्ट झाली.
एक शन्का जी कदचित उर्दू पेक्षाही तालाशी सम्बन्धित. उदा. "सौदागर" चित्रपटामधल्या एका गीतात तोच मुखडा दोन तर्हेने म्हटला जातो. एकदा "हर हसीं चीज़ का मैं तलब्गार हूँ , रस का फूलों का गीतों का बीमार हूँ" तर एकदा ".... रस का फूलों फूलों का गीतों गीतों का बीमार हूँ ..." असा. हे शक्य करताना देखील "गुरु" च्या ठिकाणी "लघु" होते, का हे सन्गीतकाराचे कौशल्य म्हणावे?
21 Nov 2021 - 3:11 pm | धष्टपुष्ट
धन्यवाद. मला हे गाणं ठाऊक नाहीये पण इथेही मला हर्फ गिराना दिसतंय.
हर हसीं, चीज़ का, मैं तलब,गार हूँ , रस का फू,लों का गी,तों का बी,मार हूँ
गालगा, गालगा, गालगा, गालगा, गालगा, गालगा, गालगा, गालगा
अशा वृत्तामध्ये बसवण्यासाठी अधोरेखित अक्षरं जाणून-बुजून लघु करायला लागतात
जर संगीतकाराने गीतों या शब्दाची दुसऱ्या ओळीमध्ये द्विरुक्ती केली असेल तर ती वृत्तात मात्र बसत नाही, पण त्यामुळे गेयता वाढली असेल तर ते संगीतकाराचे कौशल्य असेल. हे गाणं तू-नळीवर शोधून ऐकेन एकदा - ज्यामुळे नवीनतम प्रकाशनिका बघायचा मोह होईल असे विधिक्रम मी माझ्या भ्रमणध्वनीवरून पार उचकटून फेकून दिले आहेत.
21 Nov 2021 - 11:25 am | चांदणे संदीप
लेख आवडला. वाखूसा.
सं - दी - प
22 Nov 2021 - 8:06 am | शेखरमोघे
"...संगीतकाराने गीतों या शब्दाची दुसऱ्या ओळीमध्ये द्विरुक्ती केली असेल तर ती वृत्तात मात्र बसत नाही......"
द्विरुक्ति आहेच पण वृत्तामध्ये बसो किन्वा ना बसो, "मीटर" मध्ये बसल्यामुळे गेयता थोदीही कमी झालेली नाही.
प्रत्येक भाषेचे असेच आपापले खास प्रकार असतात - जसे आपल्या पोवाड्यातले "जी जी र जी".
आणखी एक बन्गालीतून हिन्दीत आलेला प्रकार - सन्चारी - देखील एकूण गाण्यातले भाव प्रकट करण्यास मदत करतो. जास्त माहिती करता पहा https://anitamultitasker.wordpress.com/2021/10/09/sanchari-bengals-inval...
22 Nov 2021 - 10:15 am | तुषार काळभोर
वृत्त या गोष्टीत फारशी गती नसली तरी काव्य आणि गाणी गेय आणि श्रवणीय होण्यात वृत्तांचा महत्वाचा भाग असतो, याची कल्पना आहे.
मराठीतील वृत्तांतील जास्त काळात नसल्याने उर्दूचा प्रश्नच नाही.
एक शंका शब्द जसाच्या तसा ठेवून, आणि केवळ उच्चार बदलून लघु-गुरू असा बदल करता येतो का? (मला वाटतं शेखर मोघे यांनी दिलेले उदाहरण त्याच प्रकारचं आहे)
23 Nov 2021 - 3:12 pm | धष्टपुष्ट
मराठीमध्ये साधारणपणे असं करता येत नाही
काय करता येतं त्याची उत्तरं दोन:
1. लघु अक्षर हेतुश: गुरू करता येतं. उदा - सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी
2. गुरु अक्षर हेतुश: लघु करता येतं. उदा - तुजविण शिण होतो धांव रे धांव आता
पण लेखन शुद्ध राखून हवं तेव्हा एकच अक्षर लघु किंवा गुरु गणता येईल अशी सुविधा मला माहिती नाही.
25 Mar 2022 - 3:24 pm | सुशान्त
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी
हे खरं तर भुंजगप्रयातात बसणारे नाही.
गागागा लगागा लगागा लगागा असे होते. पहिला लघु गुरू लिहिला आहे. मराठीत ऱ्हस्व ए लिहिण्याची सोय नाही. त्यामुळे देमधला अकार वृत्तसुखार्थ लघु उच्चारावा लागतो. आणि देह ह्या शब्दाला उगाचच एकार जोडावा लागला आहे. देह त्यागिता असे म्हटलेले पुरले असते. संयोग ऱ्हस्वास गुरुत्व देतो ह्या नियमाला जरा ताणून (हा नियम मोरोपंती काव्यात बराच ताणलेला आहे)
देह त्यागिता कीर्ति मागे उरावी
लगा गालगा गाल गागा लगागा
असे करता आले असते. पण देहे हे व्याकरणदुष्ट रूप उगाचच वापरलेले आहे असे दिसते.
असो.
तुमचा लेख फारच आवडला. ह्या विषयाकडे कुणी तरी लक्ष ठेवून आहे ह्याचा आनंद वाटला.
28 Mar 2022 - 4:34 am | पुष्कर
खूप छान उदाहरण दिलंत
22 Nov 2021 - 4:22 pm | गवि
उत्तम विषय..
अस्मानी रंगकी आंखोंमें..बसनेका बहाना ढूँढते है
अस्मानी ? या आसमानी? :-)
23 Nov 2021 - 4:27 pm | धष्टपुष्ट
हे कुठल्या वृत्तात आहे हे बघण्यासाठी दुसऱ्या एखाद्या ओळीचा संदर्भ घेऊ.
(गा गा ल ल गा, गा गा गा गा, गा गा ल ल गा, गा गा गा गा)
तर हे अक्षरगणवृत्त नसून मात्रावृत्त आहे. गुरूच्या दोन मात्रा आणि लघुची एक असं धरून गागाललगा किंवा गागागागा मध्ये 8 मात्रा येतात. (अधोरेखित रे चा हर्फ गिराया हुआ है!)
"असमानी रंग की आँखों में" हेच योग्य आणि अष्टमात्रिक होईल. आसमानी च्या मात्रा अधिक होतील.
23 Nov 2021 - 4:31 pm | धष्टपुष्ट
वरून प्रश्न: "बसनेका बहाना ढूँढते है" हे 8 मात्रांमध्ये बसण्यासाठी कुठलं गुरू अक्षर लघु करायला लागतं?
23 Nov 2021 - 4:42 pm | गवि
ने ??
23 Nov 2021 - 5:02 pm | धष्टपुष्ट
बसनेका बहाना ढूँढते है
गा गा ल ल गा, गा गा ल ल गा
टाळी वाजवून ठेका धरून बघा.
23 Nov 2021 - 5:16 pm | गवि
हो की.
अजून जरा नीट लक्ष द्यावे लागेल. विषय नवीन आहे. धन्यवाद.
23 Nov 2021 - 4:44 pm | गवि
मुद्दामच ती ओळ उल्लेखिली.
बाय द वे.. त्या गाण्यातच नायिकेच्या तोंडी प्रश्न आहे, अस्मानी या आसमानी? आणि उत्तर ऑफ कोर्स 'अस्मानी'.. :-)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
24 Nov 2021 - 6:22 am | पुष्कर
छान समजावले आहे. 'कोई पत्थर से ना मारे मेरे दीवाने को' - हे चालीत म्हणून पाहिलं तर को, ई, से, ना, मे, रे, ने - एवढ्या ठिकाणी हर्फ पाडला आहे. अबब!!!
24 Nov 2021 - 11:44 am | धष्टपुष्ट
हे गाणं मी पहिल्यांदाच ऐकतोय म्हणून मी शब्द शोधून बघितले.
गालगागा, गालगागा, गालगागा, गागा असं साधारण धृपदाच आवर्तन दिसतंय.
बक्श दो इस, को मई तै,यार हूं मिटजा,ने को
गालगागा, गालगागा, गालगागा, गागा
हुस्न हाजिर, है मुहब्बत,की सजा पा,ने को
गालगागा, गालगागा, गालगागा, गागा
तसं असेल तर माझ्या मते असे हर्फ गिरवले असतील -
कोई पत्थर, से ना मारे, मेरे दीवा, ने को
(गालगागा, गालगागा, गालगागा, गागा).
माझ्या भ्रमणध्वनीवर तू-नलिका न हे गाणं नंतर कधीतरी ऐकायला हवं.
24 Nov 2021 - 12:15 pm | पुष्कर
तुम्ही कदाचित हे ऐकलं. ह्यानुसार तुमचं बरोबर आहे. मला पडोसन चित्रपटातली ही चाल आठवली. त्यानुसार बरेच हर्फ पतित झालेले दिसले. :)
24 Nov 2021 - 12:22 pm | पुष्कर
तुम्ही ऐकलेल्या गाण्यात पण मला लगावली अशी वाटते -
ललगागा, ललगागा, ललगागा, गागा
इथे ६ मात्रांचा ताल आहे. त्यामुळे ललगागा - ६ मात्रा होतात. त्यात सम ही शेवटच्या गा वर आहे. शेवटचे ३ जे गा आहेत (म्हणजे तिसर्या ललगागा मधला शेवटचा आणि पुढचे २) त्यात मात्रा-विभागणी ३-३-२ अशी आहे.
24 Nov 2021 - 3:30 pm | धष्टपुष्ट
केवळ त्या गाण्याची शब्दावली आणि इतर ओळींचा संदर्भ घेऊन जी लगावली मला गावली ती लावली! कधी कधी गाण्याच्या चालीमुळे मात्रावृत्तांची आवर्तनं धूसर होतात.
मात्रा मात्र ललगागा अशी वाटत नाहीये.
हुस्न हाजिर, है मुहब्बत,की सजा पा,ने को
गालगागा, गालगागा, गालगागा, गागा असं खणखणीत आहे की राव. बाकीच्या ओळी पण बघायला लागतील कधीतरी.
तुमचं लगावलीचं विश्लेषण पण बघायला आवडेल.
24 Nov 2021 - 3:38 pm | धष्टपुष्ट
आत्तापर्यंत हा प्रकार केवळ फारसीमध्ये मी ऐकलेला आहे. त्याला overlong syllable असं म्हणतात. माझ्या माहितीप्रमाणे त्याच्याही दोनच मात्र मोजतात, पण एखाद्या वेळेला तीन असतील ही.
https://en.m.wikipedia.org/wiki/Persian_metres
फारसी मधली वृत्तं माझ्या आवडीचा विषय आहे. त्याच्यावरही लिहीन पुढे कधीतरी.
https://youtube.com/playlist?list=PL4gaYD60JBAZva6ccSEq2uad_B_vns3MY
25 Nov 2021 - 5:19 am | पुष्कर
मी वरती गाण्यातली लगावली म्हणालो; काव्यातली नाही. काव्यात तुम्ही म्हणता तशी अगदी चपखल गालगागा आहे.
मी आत्ता गाणं पुन्हा ऐकलं आणि लक्षात आलं की माझंही चुकलंच. दोन्ही गाण्यात दोन वेगळे ताल आहेत.
१. लता मंगेशकरच्या व्हर्जनमध्ये केरवा आहे (४ किंवा ८ मात्रा धरा). त्यात को-ई-पत्-थ-र-से-ना-मा-रे-मे-रे-दी-वा-ने-को हे १-२-२-१-१-२-२-२-३-१-२-२-४-४-३ (बेरजेला ८ ने भाग जातो, त्यामुळे तालात बरोबर आहे). ह्या चालीत को आणि मे - हे १-१ मात्रा घेतात, त्यामुळे काव्यात नसला तरी चालीत हर्फ गिराया हय.
२. किशोर कुमारच्या व्हर्जनमध्ये (जे तसंही विनोदीच आहे) दादरा किंवा खेमटा आहे (६ मात्रा). त्यात को-ई-पत्-थ-र-से-ना-मा-रे-मे-रे-दी-वा-ने-को हे १-१-२-१-१-१-१-२-२-१-१-२-३-१-४ (बेरजेला ६ ने भाग जातो).
आता ह्यात ३/४ मात्रांचे जे गा आहेत, ते केवळ चालीत बसावेत म्हणून. मूळ वृत्तात तसे नाहीत.
काव्यात इतर ओळींत खरोखर तुम्ही म्हणता तसा गालगागा आहे (कोई पत्थर - ह्या ओळीत नाही. त्यात जरा पाडापाडी करायला लागेल), म्हणजे ७ मात्रा होतात. त्यानुसार रूपक वगैरे ताल जास्त चांगला वाटेल असं वाटतंय. सरफरोशी की तमन्ना मध्ये गालगागा आहे आणि गद्य (? चाल-विरहित) गाण्यात तालही ७ मात्रांचा आहे (रेहमानने मात्र ६ मात्रांचा ताल वापरला आहे भगतसिंग चित्रपटात - त्यात गालगागाच्या शेवटच्या गा ला पाडून ल केलाय ६त बसवायला). त्याचा शेवट गालगा होतो, तर ह्यात गागा होतो आहे एवढाच फरक. तसंही गाल-गा-गा, म्हणजे ३-२-२ हे खंड रूपकाशी जुळतात.
25 Nov 2021 - 7:06 am | धष्टपुष्ट
मीही आता तालाकडे लक्ष देईन. चर्चेत खोली आणल्याविषयी धन्यवाद.
एका प्रभृतींनी आर्या वृत्ताला (12,18,12,18 मात्रा) रूपक लावलेला ऐकला होता, पण माझ्या अल्पमतीला झेपलं नाही ते. पाडापाडी केली असेलही. केहेरवा किंवा त्रिताल लावून आम्ही मोकळे झालो असतो.
28 Mar 2022 - 4:54 am | पुष्कर
एका प्रभृतींनी आर्या वृत्ताला (12,18,12,18 मात्रा) रूपक >> हेच का ते आपले ... हृदयनाथ मंगेशकर? तिन्ही सांजा सखे मिळाल्या (बहुधा चंद्रकांत वृत्त - २६ मात्रा) त्यांनी दादऱ्यात बसवल्या आहेत (६च्या पटीत).
24 Nov 2021 - 5:13 pm | धष्टपुष्ट
खुली रंगवू या आकाशात नक्षी
गुजे सावकाशीत सांगायची
मराठीत पण हर्फपतन होतं याचं उदाहरण मिळालं! पण अश्या उदाहरणांचं दुर्भिक्ष्यच आहे.
25 Nov 2021 - 3:56 am | पुष्कर
शेरलॉक होम्स! इतक्या वर्षानंतर माझी पाडापाडी पकडली जाईल असं वाटलं नव्हतं. :)