तिसरी घंटा

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
30 Oct 2021 - 2:04 am

आपण रोजचं वर्तमानपत्र वाचायला शेवटच्या पानापासून सुरुवात करणारी लोकं. आजकाल पहिल्या पानावर असतात त्या माणसाला मनुष्य "प्राणी" का म्हणतात याचा प्रत्यय देणार्‍या बातम्या. पण शेवटच्या पानावर असतात त्या माणसाच्या विजिगीषु वृत्तीच्या, अपार कष्टांच्या, लढवय्या बाण्याच्या गोष्टी. आणि त्यानंतरचं - शेवटून दुसरं किंवा तिसरं पान म्हणजे समाजाच्या सृजनाचं, कलात्मकतेचं, संवेदनशीलतेचं दर्पण - नाट्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जाहिरातींचं पान.

कितीतरी महिन्यांनी - जवळपास पावणेदोन वर्षांनंतर ते पान पुन्हा रंगीबेरंगी जाहिरातींनी भरायला लागलं आहे. गेल्या आठवड्यापेक्षा ह्या आठवड्यात कार्यक्रम जास्त आहेत. जणू खडका - कातळांमध्ये अंकुर फुटायला लागले आहेत. कुठल्याही "स्क्रीन" चा उबग आल्यामुळे असेल कदाचित, पण नाट्यगृहात जाऊन एखादं नाटक किंवा गाण्याचा कार्यक्रम बघायची आस लागलेली आहे. अर्थातच २२ तारखेला नाट्यगृह पुन्हा उघडण्याची घोषणा झाल्यानंतर गेली दीड-दोन वर्षं भयानक परिस्थितीतून गेलेले प्रतिभावंत कलाकार आधीच कामाला लागले असतील. येणार्‍या दिवसांमध्ये ह्या जाहिराती पूर्ण पान व्यापतील. आणि दिवाळीच्या निमित्तानं बालगंधर्व, यशवंतराव, भरत, शिवाजी मंदीर, प्रबोधनकार ठाकरे, कालिदास, गडकरी, काशिनाथ घाणेकर, विष्णुदास भावे वगैरे आमची रंग / नाट्य"मंदिरं" पुन्हा एकदा उजळून निघतील. पुन्हा एकदा त्या पहाटेच्या गारव्यात आणि रात्रीच्या अंधारात रंगमंदिर परिसरातल्या रातराणी अथवा चाफ्याचा गंध मन धुंद करेल. पुन्हा एकदा रांगोळ्यांच्या पायघड्या रसिकांचं स्वागत करतील. सनईचे मंजुळ सूर पुन्हा एकदा ऐकू येतील. खात्री आहे, ह्या वेळी डोअरकीपर सुद्धा आवर्जून हसत स्वागत करतील.

प्रेक्षागृहातला माहौल तर विचारू नका. तो मखमली पडदा... त्यावर झेपावलेले ते फूटलाईट्स.... पडद्याच्या मध्ये लावलेला तो हार... रंगमंचाच्या वर प्रत्येक नाटक आणि संगीतप्रेमी रसिकाच्या मनात घर करून राहिलेले ते शब्द - "प्रज्ञाविधृष्ट प्रतिभामणिदीप प्रकाशितं | संसारालेख्य भांडारं पश्येदं रंगमंदिरम||", किंवा "आषाढघनांसम खुली दाद रसिकांची, अन उधळण व्हावी अविरत उन्मेषांची|." किंवा "नाट्यं भिन्नरुचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम|" धुपाचा तो मंद दरवळ आणि सर्वांत वेड लावणारी गोष्ट म्हणजे पडद्यापलिकडून ऐकू येणारी लगबग! लेव्हल्स लावतानाचा किंवा लाइट्स अ‍ॅडजस्ट करताना होणारा घोडी सरकवण्याचा आवाज.... गाण्याचा कार्यक्रम असेल तर साउंड चेक चालू असताना तबल्याच्या नुसत्या "तिरकिट धा" नी तयार होणारा माहौल... एखादा व्हायोलिन किंवा सतारीचा पीस ऐकू आल्यावर कुठलं गाणं असेल ह्याचा लावला जाणारा अंदाज. नृत्यांगनाच्या घुंगरांच्या आवाजाचं सळसळतं चैतन्य.

तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा एक सीटचं अंतर ठेऊन का असेना पण कलाकारांच्या सृजनाचा, त्यांच्या प्रतिभेचा, त्यांच्या कष्टांच्या परिपाकाचा आस्वाद घेण्यासाठी लोकं "एकत्र" येतील. मंदिरातल्या घंटेइतकाच गंभीर आणि पवित्र वाटणारा तिसर्‍या घंटेचा नाद घुमेल... प्रेक्षागृहातले दिवे विझतील आणि "रंगदेवता, रसिक प्रेक्षक आणि श्री गणरायाला वंदन करून..." ह्या मंत्रोच्चारात पडदा बाजूला सरकत असताना रंगमंचावर फक्त कलेच्या नाही तर आशेच्या, अपेक्षांच्या, उमेदीच्या लक्ष लक्ष ज्योती पेटतील.

आम्ही मराठी लोकं मुळातच वेडी. आम्हाला तुमच्या ७० एम एम पडद्याचं कौतुक नाही. पण एखादा कसलेला नट जेव्हा त्या प्रखर स्पॉटला नजर भिडवून आपल्या बुलंद आवाजात "हे स्वर्गस्थ शक्तींनो - द्या खडकाची अभेद्यता माझ्या मनाला" किंवा "जिंदगीत कैक प्रसंगी सामोरा आलेला मृत्यू आबासाहेबांना पाहून ओशाळला - आल्या पावली माघारी गेला" म्हणतो किंवा एखादी मंजुळा साळुंखे जेव्हा"तुझ्या पापाचा भरलाय घडा, तुला शिकविन चांगलाच धडा." ऐकवते तेव्हा आमचं काळीज गलबलतं. तुमची डॉल्बी डिजिटल स्टीरिओफोनिक सराउंड साउंड सिस्टिम तुम्हाला लखलाभ. पण आमचं मन हलतं ते विट्ठलाच्या देवळातल्या टाळ मृदुंगाच्या नादानं... ताशाच्या कल्लोळानंतर पोटात खड्डा पाडणार्‍या २५-३० ढोलांच्या एकत्रित निनादानं आणि नाटकाच्या सुरुवातीला साध्या तबला पेटीच्या साथीत गायलेल्या नांदीच्या स्वरांनी. तुम्हाला कोण्या चिमुरड्याच्या स्वरांनी स्टेज वर "आग लगा दी" असं वाटंत असेल.. पण आमच्या समेवरच्या एका "क्या बात है" ची दाद मिळवण्यासाठी एखादा कसलेला कलाकार सुद्धा आपली आयुष्यभराची मेहनत पणाला लावायला तयार असतो. आणि म्हणून आमचे लाडके कलाकार सुद्धा स्टेजवर पाऊल टाकताच आकाशाला हात घालून प्रेक्षकांच्या पुढ्यात एक एक नक्षत्र टाकणारे. तेव्हा आमचं खरंखुरं रंजन करणं ही कुठल्याही आकाराच्या LED स्क्रीनच्या आवाक्यापलिकडली गोष्ट आहे.

आणि म्हणूनच गेली दोन वर्षं आमचा जीव तुटत होता. पेटला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग अशी परिस्थिती झाली होती. आता आम्ही पुन्हा तयार आहोत. धरणाचे दरवाजे उघडावेत तसा तो मखमली पडदा पुन्हा उघडण्याची आणि आमच्या नटरंगाने पुन्हा एकदा नभाला ललकारण्याची वाट बघत.

जे.पी.मॉर्गन

कलानृत्यनाट्यसंगीतप्रकटनविचारसद्भावना

प्रतिक्रिया

सुरिया's picture

30 Oct 2021 - 7:11 am | सुरिया

अहाहा. सुरेख.
अस्सल नाट्यवेड्याची आर्त आळवणी.
आवडले. आवडले काय भिडलेच.
बघुयात आता दीर्घ काळानंतर कोणत्या प्रयोगाने नारळ फुटतो. आम्हीही वाट पाहत होतोच.

अनन्त्_यात्री's picture

30 Oct 2021 - 10:20 am | अनन्त्_यात्री

नाट्यरसिकाचे हृदयंगम स्वगत!

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Oct 2021 - 10:58 am | ज्ञानोबाचे पैजार

मनोगत आवडले,
फारच मनापासून लिहिले आहे.
बघू नाट्यगृहात कधी पाउल टाकायला मिळते ते
पैजारबुवा,

मदनबाण's picture

30 Oct 2021 - 11:56 am | मदनबाण

कुठल्याही "स्क्रीन" चा उबग आल्यामुळे असेल कदाचित, पण नाट्यगृहात जाऊन एखादं नाटक किंवा गाण्याचा कार्यक्रम बघायची आस लागलेली आहे.
अगदी, मला पुन्हा :- पुन्हा सही रे सही बघायची खूप इच्छा आहे. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Duniya Bhula Doonga... :- Aashiqui

मदनबाण's picture

30 Oct 2021 - 1:51 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Duniya Bhula Doonga... :- Aashiqui

मोहन's picture

30 Oct 2021 - 1:23 pm | मोहन

रुला दिया यार !

सौंदाळा's picture

30 Oct 2021 - 4:49 pm | सौंदाळा

उत्कृष्ट आणि समयोचित लेख
परवाच महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये पण याच विषयावर एक प्रवेश होता.
नाटकं बघायला आतुर आहे.