कारपोरेटातली विंग्रजी

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
12 Oct 2021 - 4:15 pm

मी मूलतः गाढव आहे, चुकुन मनुष्य योनीत आलो असे वाटते. गाढवपणा फक्त रक्तात नाही तर मांसल पेशींच्या रंध्रारंध्रापर्यंत पोहचलेला आहे. असे हे गाढव आयटीत चिकटले म्हणून त्याचा तेनालीराम होत नाही. माझ्या सोबतीची मंडळी सुद्धा गाढव असावीत असा माझा समज होता. आम्हा गाढवांमधे एक सुंदर, हुषार मुलगी होती. बऱ्याच मंडळींना त्या कारणाने आमचा हेवा वाटायचा. आम्ही लिनक्सवर काम करीत होतो. ती डिस्ट्रो, रेडहॅट, डेबियन अशा माझ्यासारख्या गाढवांना न समजनाऱ्या भाषेत बोलत होती. मला ती मुलगी जादुगार वाटत होती. काहीतरी टाईप करायची दोन सेकंदात सार गायब, परत काहीतरी टाईप करायची तर धडधड सारी अक्षरे वर जात होती. हळूहळू काळ लोटला थोडी समज आली तेंव्हा लक्षात आले की त्या बिचारीचे सुद्धा लिनक्सचे ज्ञान फार नव्हते. ती ls, more, clear अशा अगदी मूलभूत कमांड देऊन सारा चमत्कार करीत होती. मूळ समस्या होती अज्ञानाने तिच्या छोट्या कमांडला चमत्कार समजणारा माझा गाढवपणा. हे सारं सांगण्याचा खटाटोप याचसाठी कि कॉरपोरेट जगतात काही पोकळ, निरुपयोगी इंग्रजी शब्द ज्याला इंग्रजी भाषेत जार्गन म्हणतात, वापरुन काही मंडळी मीच ही कंपनी चालवतो असे बोंबलत फिरत असतात आणि माझ्यासारख्या गाढवांना ते खरे वाटत असते. अशा व्यक्तींचे बोलणे म्हणजे व्याकरणाला कोंबडं समजून त्याला उभे आडवे कापून बिर्याणीसोबत शिजवून वरुन मसाला म्हणून जार्गन पेरायची. बरीच वर्षे तरखडकर या मराठी माणसानेच इग्रजी व्याकरणाचे नियम लिहिलेत असे मला वाटत होते. आता वाटते ज्याने कुणी लिहिले असेल त्याला त्याच्या व्याकरणाचे असे घिंडवडे काढलेले बघून स्वतःची ओळख दाखवायची लाज वाटली असेल.

अशा प्रकारची कॉर्पोरेट इंग्रजी बोलण्यासाठी तीन गोष्टींची गरज असते उत्तम कपडे, जार्गन आणि अतिआत्मविश्वास. बोलता बोलता काही सुचले नाही तर Whatever हा शब्द सुद्धा अशा आत्मविश्वासाने बोलायला हवा की ऐकनाऱ्याला वाटायला हवे याला पुढचे सुचत नाही ही त्याची नाही तर ऐकनाऱ्याची चुकी आहे. समोरचा कोणत्या विषयात किती गाढव आहे हे समजून जार्गन फेकता आले पाहिजे. कॉलेजमधून पास होऊन नुकतेच नोकरीला लागलेल्या पोरांसमोर Vision, Mission, Leadership फेकायचे परंतु कंपनीच्या सीईओला मात्र हे शिकवायचे नाही. तिथे Competitive advantage, Value Add, Core Competencies असे काही फेकायचे असते. पूर्वी मुंबईत बोस्टन नावाची संगणक प्रशिक्षण देणारी संस्था होती. आय़टी कंपन्या मुल निवडायची, त्या निवडलेल्या मुलांना ती संस्था प्रशिक्षण द्यायची. तेंव्हा बांद्रयाला अंड्रयूज कॉलेजच्या सभागृहात कॉरपोरेट जगतातील मंडळी येऊन जोरदार भाषण ठोकून जायचे. कॉलेजमधे एसी सभागृह हेच माझ्यासाठी नवीन होते आमच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात बऱ्याचदा कांपुटर लॅबचा एसी बंद आहे म्हणून कांपुटरचे प्रॅक्टीकल होत नव्हते. त्या सभागृहात एका व्यक्तीने तो कसा गरीबीतून वर येऊन आज या पदावर पोहचला वगैरे सांगितले. त्याने Leadership, Accountability, Big Picture या शब्दांचा भडीमार करुन असे काही भाषण ठोकले की तो व्यक्ती कंपनी नाही तर भारतातली अख्खी आयटी इंडस्ट्री चालवतो असा माझा समज झाला. NASSCOM वगैरे कुछ नही सबकुछ ये ही बंदा है. माझा चुलत भाऊ त्याच कंपनीत कामाला होता. मी त्याच्याशी त्या व्यक्तीविषयी भक्तीभावाने बोललो तर तो मला म्हणाला

“फालतू माणूस आहे तो. त्याला कंपनीत कोणी विचारत नाही.”

कालांतराने मी जेंव्हा कॉरपोरेट जगतात स्थिरावलो तेंव्हा लक्षात आले की कंपनीच्या मिडिया प्रतिनिधीचा कंपनीच्या निर्णयप्रक्रियेत फारसा सहभाग नसतो. त्या व्यक्तीने केलेले भाषण माझ्यासाठी कॉरपोरेट इंग्रजीची पहिली ओळख होती. नंतर लक्षात आले की कॉरपोरेट विश्वात अंतर्गत संवादाचा डोलारा हा जार्गनवर उभारलेला असतो. Performance Appraisal मधे इतर गोष्टींसोबत मॅनेजर जार्गन काउंट सुद्धा मोजत असतील. मी जॉइन झाल्यावर एक दिवस Release नावाचा विधी होता. खरतर महिन्याला सत्यनारायण घालावा तशा या Release होत असतात परंतु घरात लग्न असल्यासारखे सारे आव आणतात. माझ्या टिम लीडने मला बोलावले.

“तुझा प्रोग्राम रेडी आहे?”

“क्रॅश होत आहे सेमीकोलन किंवा #ifdef चा घोळ असेल.” मी सहज उत्तर दिले.

“Do you know today is release deadline?” त्याने आवाज चढवून विचारले. फालतू सेमीकोलनसाठी हा इतका का भडकला हे न समजल्याने मी गप्प होतो. थोड्या वेळाने त्याने त्याच्या घरच कुणी गेल्यासारखा सुतकी चेहरा करुन टेबलवर डोके ठेवले. काही वेळ भयाण शांतता होती. Deadline मुळे मनुष्याची अवस्था Dead झाल्यासारखी होते याचा मी जिवंत अनुभव घेत होतो. तेंव्हा हे Deadline प्रकरण नवीन होते आता तर कामवाली बाई सुद्धा सांगते त्या बाईसाहेबांनी नऊ वाजताची deadline दिली आहे. काही वेळानंतर टिम लीड चिरनिद्रेतून बाहेर आला आणि मला म्हणाला

“You should know today is deadline.”

मला वाटत होते Release या शब्दानंतर Deadline ची गरज नाही today is release हे पुरेसे होते पण टिम लीडच्या बोलण्यावरुन समजले Release नसली तरी चालेल पण Deadline महत्वाची आहे. तो मला मोठ्या माणसांच्या मिटिंग मधे घेऊन गेला. तिथे आणखीन टिम लीड बसले होते. माझ्या टिमलीडने Process हा केमीकल इंजिनियरींगमधला शब्द वापरुन त्या क्रॅशचे खापर एका टुकार डॉक्युमेंटवर फोडले. मी आ वासून बघत होतो असे कोणते डाक्युमेंट असते हेच मला माहित नव्हते. Process या शब्दाचा वापर करुन आपल्या चुका दुसऱ्यावर ढकलण्याचे Innovation माझ्यासाठी नवीन होते. मला वाटले हे ऐकल्यावर मॅनेजर भडकेल पण त्याने Accountability या विषयावर भाषण द्यायला सुरवात केली. Accountability चा कॉमर्समधील Account किंवा बँकेतील Account शी सबंध नाही हे मला माहित होते परंतु Process शी काय संबंध असावा हा विचार मी करीत होतो. तेवढ्यात कुणीतरी मॅनेजरच्या अवघड जागेचे दुखणे असल्यासारखे Responsibility या प्रकरणाला हात घातला. मॅनेजर भडकला आणि मग Accountability विरुद्ध Responsibility या विषयावर घमासान चर्चा सुरु झाली. Leadership, Big Picture, Holistic view, Stakeholders, Buy in, Leverage असे कितीतरी शब्दबाँब माझ्या कानावर आदळत गेले. साधारण चाळीस मिनिटे चर्चा झाल्यानंतर मॅनेजर म्हणाला

“Can we find some creative ways?”

आयटीत सुद्धा Creativity असते यांनी मी भारावून गेलो नाहीतर ज्यांना आयुष्यात वेगळं करता येत नाही अशी मंडळी आयटीत जाऊन नऊ ते पाचचा जॉब सकाळी नऊ ते रात्री दहापर्यत करतात असाच माझा समज होता. दीडतास वाया गेल्यावर मी जागेवर आलो परत एकदा कोड बघितला एका ठिकाणी सेमीकोलन द्यायचे राहून गेले होते. ती चूक दुरुस्त करताच सारे व्यवस्थित झाले. तेंव्हापासून माझी मिटिंग बाबत अशी समजूत झाली की मिटिंग म्हणजे आपल्याला कोणत्या विषयाचे ज्ञान असो वा नसो फक्त जार्गन फेकून आपल्यासोबत इतरांचा वेळ वाया घालवून स्तवःचे बौद्धिक मनोरंजन करुन घेण्याचे उत्तम साधन. मी अनावधानाने का असेना पण ज्या creative पद्धतीने विसरलेले सेमीकोलन आणि Accountability चा संबंध जोडण्याचे जे Innovation केले होते त्याबद्दल मला Employee of the month असा पुरस्कार मिळाला. इथेही सारा पोकळच कारभार होता मिळालं वगैरे काही नाही फक्त मोठ्या रंगीत फाँटमधे एचआरचे मेल आले.

अशा प्रकारे कॉरपोरेट इंग्रजी छाताडावर झेलून घेण्याची ऐतिहासिक कामगिरी माझ्या हातून घडली. त्यावेळी बाहुबली यायचा होता परंतु भावना अमरेंद्र बाहुबलीच्या एंट्रीसारख्याच होत्या, मी अमरेंद्र बाहुबली, माझा टिम लीड शिवगामी Release च्या दिशेने जातोय आणि तो हत्ती म्हणजे कॉरपोरेट इंग्रजी. मात्र त्या बाहुबलीसारखा मी हत्तीवर विजय मिळवू शकलो नाही उलट आजही तो हत्ती मला सोंडेत धरुन पटकत असतो. मनासारखी पगारवाढ मिळाली नाही म्हणून मॅनेजरला सांगावे तर तो म्हणतो Look at the big Picture. त्याच्या ऑफिसमधे त्याच्या बायकोचे चित्र असते कसे बघनार तिकडे. किती जाड भिंगाचा चष्मा लावायचा म्हणजे big Picture माझ्या सारख्या तुच्छ प्राण्याच्या डोळ्यात मावू शकेल. काम मोठे आहे वेळ लागेल असे सांगितले तर सांगतात Focus on Low Hanging Fruit first. असे म्हटले तर मला लहानपणी दाजी पाटलाच्या वाडीतली खाली लटकलेली संत्री तोडली म्हणून अंगावर धावलेली डॉबरमॅन कुत्री आठवतात. तेंव्हापासून माझ्या मनात Low Hanging Fruit म्हणजे अंगावर धावनारी डॉबरमॅन कुत्री असे भयप्रद चित्र तयार झाले आहे. एकदा कुणीतरी कंपनीतल्या जेवण, चहा याबद्दल तक्रार करीत होतो तेव्हा एचआरने सांगितले We need to have holistic view on all Freebies. त्यानंतर कितीतरी दिवस मी हा holistic नावाचा कोण मनुष्य कंपनीत आहे ज्याचे मत प्रत्येक बाबतीत महत्वाचे असते याचा शोध घेत होतो.

Circle म्हणजे वर्तुळ त्यात मागे पुढे असे काही नसते तरी त्याला मागे ओढण्याचे काम कॉरपोरेटवाले Please Circle back म्हणून करीत असतात. आणखीन एक अति वापरातला शब्द म्हणजे Let’s take it Offline साऱ्या गोष्टी जर ऑफलाइनच करायच्या होत्या मिटिंग काय आमच्या शर्टाच्या बटन मोजायला बोलावली. Urgent असे म्हटले तर आपले मागासपण दिसेल म्हणून सर्वांना सर्व गोष्टी As of Yesterday हव्या असतात. मॅनेजर लोकांना NASA मधे जरी नेऊन बसविले तर तिथे जाऊन सुद्धा जाऊन सांगतील This is not Rocket Science. बहुतेक कॉरपोरेटमधील मंडळींचे चाकाच्या शोधाशी वाकडे असते Do not reinvent wheel. आता परत जर का कोणी चाकाचा शोध लावला ते काय चौकोनी असनार आहे. Deep dive करनाऱ्या मंडळींना अजिबात पोहता येत नाही हे सत्य आहे. फक्त Envelope का push करायचा इनलँड किंवा पोस्टकार्ड का push करायचे नाही हे कुणी सांगत नाही. कुणी I will touch base with you म्हटले की कोण कुणाच्या base ला touch करनार असा प्रश्न मला पडतो. नको त्या विधीला कागद वापरनाऱ्या इंग्रजांच्या या इंग्रजी भाषेत कुणी जेंव्हा Let’s be On Same Page म्हणतो तेंव्हा माझी कल्पनाशक्ती भटकायला लागते.

कॉरपोरेट इंग्रजीत फक्त शब्दच असतात असे नाही तर त्यात +, ++ याला सुद्धा अर्थ प्राप्त झाला आहे. हल्ली तर इमोजी सुद्धा आल्या आहेत. तुम्ही जर कुणाला इमेल करुन काही विचारले तर त्याचे उत्तर ९० टक्के वेळा + किंवा ++ हेच असते. एकदा मी माझ्या टिमलीडला प्रश्न विचारला. त्याने + असे करुन अमेरीकेतील माणसाला विचारले. बघता बघता तो प्रश्न + आणि ++ चा वापर करुन अमेरीका, फ्रांस, नेदरलॅड, परत अमेरीका मग भारत असा प्रवास करुन आला. शेवटी ज्या व्यक्तीने त्या प्रश्नाचे उत्तर दिले ती व्यक्ती माझ्या टिमलीडच्या बाजूलाच बसत होती. हा आहे +, ++ चा महिमा याने माणसे इतकी जवळ आली की आपल्या बाजूचा काय करतो हे माहित करायलाही आम्ही जगात भ्रमंती करुन येतो.

सुरवातीच्या काळात साधे मेलसुद्धा पाठवायच्या आधी मॅनेजर वाचायचा. काम करनारा एक आणि लक्ष ठेवनारे दहा असतात. त्याउलट तो जापानी व्यक्ती बेधडक मेल पाठवायचा Thank you for working hardly. माझ्या मॅनेजरला मेल एका विशिष्ट पद्धतीने लिहिलेलेच आवडत होते. जर मी लिहिले File is attached तर ते तो बदलून हमखास त्याचे Please find attach herewith असे लिहायचा. मला आजतागायत या वाक्यरचनेचा अर्थ कळाला नाही. herewith म्हणजे नक्की काय? तो इमेल म्हणजे काय अमेरीकेतल्या वॉलमॉर्टचे पार्किंग लॉट ज्यात ती फाईल शोधावी लागनार आहे. आपण जर एकेक मुद्दा मांडत लिहिले तर शेवटल्या मुद्दयाला तो हमखास लिहायचा last but not least. अरे बाबा मी मुद्दयांना नंबर दिले आहे तेंव्हा हा मुद्दा शेवटला आहे इतकी अक्कल त्या जपानी व्यक्तीला आहे. हा मुद्दा जर खरच एवढा महत्वाचा होता तर मग तो शेवटी का लिहायचा आधी का नाही.

कॉरपोरेट इंग्रजी संवादा मधला आणखीन एक महत्वाचा भाग असतो तो म्हणजे Abbreviation किंवा Short form. बऱ्याचदा याचा वापर नवीन माणसाला घाबरवून टाकण्यासाठी सुद्धा केला जातो. OOO, OOTO, ILT, LET आणि आताच्या WFH मुळे आलेले OOW या साऱ्याचा अर्थ लागता लागता घाम घाम फुटुन तुम्हालाही OOO NFW लिहायची पाळी येते. एकदा एकाने WAH असे लिहिले होते मी शहाणपणा करीत त्याला विचारले तुला WFH म्हणायचे आहे का तर तो म्हणाला मला Work at Home असे म्हणायचे आहे. त्या परदेशी गृहस्थाला त्याच्या घरी काम आहे याच्याशी माझा काय संबंध ? असे विचारले तर तो त्याचे उत्तर Just FYI असे देईल. IMO समजू शकतो पण IMHO कशाला हवे. याचे काय ते प्रामाणिक मत इतरांची काय पॉलिटिकल मत असतात का. BTW म्हणजे मूळ मुद्दयाला बगल देऊन उगाचच फाटे फोडण्याची मुजोर सूचना असते. KT म्हटले की मला कॉलेजमधली ATKT (आता तरी काढून टाक) आठवते. हे जगतमान्य शॉर्ट फॉर्म झाले परंतु प्रत्येक कंपनीत तिथले स्वतःचे वेगळे शॉर्ट फॉर्म असतात. हे सारे शॉर्ट फॅर्म जर ASAP शिकले नाही तर कॉरपोरेटमधे टिकाव लागने शक्य नाही.

हळूहळू मला या कॉरपोरेट इंग्रजी भाषेतील काही वाक्यप्रचाराचा अर्थ कळायला लागला. त्यातले Key takeaways तुम्हाला सांगतो म्हणजे Going forward तुम्ही त्याचा खरा अर्थ समजून वागू शकाल. मॅनेजरने Look at Big Picture म्हटले तर इकडे तिकडे बघायची गरज नाही तुम्ही प्रमोशन किंवा पगारवाढ किंवा जे काही मागत असाल ते मिळणार नाही असे समाजायचे. कुणी तुम्हाला अडचणीत टाकनारा प्रश्न विचारला त्याला उत्तर द्यायचे असे Piecemeal fashion मधे विचार करुन भागनार नाही आपल्याला Holistically विचार करायला हवा. थोडक्यात काय फालतू प्रश्न विचारु नको. Back to drawing board म्हणजे पुढे फार मोठा काळ मला आता त्रास देऊ नको. असो साराच Secret sauce (याचा अर्थ यापलीकडे मला येत नाही) तुम्हाला मी सांगत बसत नाही तुम्ही तुमचा शोधा आणि अर्थ लावा. प्रत्येकाला समजलेला कॉरपोरेट इंग्रजीच्या अर्थाचा इंग्रजी भाषेषी काही संबंध नाही तर तो अर्थ तुम्हाला आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतो. कितीही नाकारले तरी कॉरपोरेट इंग्रजीमधे जार्गनचा वापर कमी होत नाही तर उलट नवीन जार्गन येतच राहतात. तुम्ही ते वापरा किंवा नको वापरा त्याच्या नावाने बोटं मोडण्यापेक्षा त्याचा खरा अर्थ समजून घेउन वागणे अधिक उचित ठरते.

P.S. (कॉरपोरेट म्हटले की हे आलेच)

एका पुस्तकात चर्चिलच्या भाषणाचे कॉरपोरेट वर्जन वाचले होते आता ते आठवत नाही पण मी माझ्यापरीने ते लिहायचा प्रयत्न केला.

दुसऱ्या महायुद्धात चर्चिलचे हे भाषण अत्यंत महत्वाचे होते असे मानले जाते

we shall fight in France,
we shall fight on the seas and oceans,
we shall fight with growing confidence and growing strength in the air, we shall defend our Island, whatever the cost may be,
we shall fight on the beaches,
we shall fight on the landing grounds,
we shall fight in the fields and in the streets,
we shall fight in the hills;
we shall never surrender,

याच परिस्थितीत जर कुणी कॉरपोरेटवाला असता तर त्याने कदाचित असे भाषण ठोकले असते.

I understand Germans are bombing us all around please look at the big picture. We had multiple deep dive sessions with friendly nations. We got buy ins from them. This will definitely provide us a competitive edge. We are taking holistic view of situation on the ground, soon we will initiate combating process in France. We will be fully invested in running our attack campaign with all bells and whistles. We will invest in strategic measures to fight on seas and oceans. We will invest in creating robust and integrated combating framework to fight in island, beaches, field, hills and ground. We will move towards achieving our goals.

मित्रहो
https://mitraho.wordpress.com

विनोदप्रकटन

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

12 Oct 2021 - 4:47 pm | कुमार१

छान लिहिले आहे.

सुरिया's picture

12 Oct 2021 - 5:01 pm | सुरिया

खूप छान आणि समर्पक लिहिले आहे.
आवडले

श्रीगुरुजी's picture

12 Oct 2021 - 5:03 pm | श्रीगुरुजी

मस्त लिहिलंय. वाचताना नॉस्टॅल्जिक झालो.

चांदणे संदीप's picture

12 Oct 2021 - 5:11 pm | चांदणे संदीप

हहपुवा झाली. =))

(कार्पोरेटलेला)
सं - दी - प

टर्मीनेटर's picture

12 Oct 2021 - 5:14 pm | टर्मीनेटर

You Wrote 'Out of the Box' 'Over here'
वरचे ठळक अक्षरातले शब्द राहिले कि....😀 😀 😀
मस्त लिहिलंय, मजा आली वाचायला 👍

श्वेता व्यास's picture

12 Oct 2021 - 5:37 pm | श्वेता व्यास

तंतोतंत !

श्रीगुरुजी's picture

12 Oct 2021 - 5:42 pm | श्रीगुरुजी

Taking organization into next orbit, things will go down the tubes, when the rubber hits the road, you should be ahead of the curve, inform your coordinates, AWOL, AWOD अशा अनेक संज्ञा व लघुरूपे या विश्वात वारंवार वापरतात.

सोत्रि's picture

12 Oct 2021 - 5:57 pm | सोत्रि

क ड क!

दिवाळी अंकाला साजेसा खुसखुशीत लेख झालाय.

- (कॅारेपोरेट जगताला कंटाळलेला) सोकाजी

सोत्रि's picture

12 Oct 2021 - 5:57 pm | सोत्रि

क ड क!

दिवाळी अंकाला साजेसा खुसखुशीत लेख झालाय.

- (कॅारेपोरेट जगताला कंटाळलेला) सोकाजी

शेर भाई's picture

12 Oct 2021 - 6:15 pm | शेर भाई

CTC राहीलच की......
मजा आली

पाषाणभेद's picture

12 Oct 2021 - 6:36 pm | पाषाणभेद

जमलंय. काही पंचेस भन्नाट जमलेत. अगदी चड्डीच ओढली की कार्पोरेट कल्चरची. अन त्याला आयटीची फोडणी मिळाली.

मित्रहो's picture

12 Oct 2021 - 7:25 pm | मित्रहो

धन्यवाद कुमार१, सुरिया, श्रीगुरुजी, चांदणे संदीप, टर्मीनेटर, श्वेता व्यास, सोत्रि, शेर भाई, पाषाणभेद,
@शेर भाई हो ते CTC राहिल
@ टर्मीनेटर Out of box लिहू की Creative ways याचा विचार करीत होतो मग दुसरा पर्याय निवडला. Over here राहिलं.
@श्रीगुरुजी धन्यवाद things will go down the tubes, when the rubber hits the road माहित नव्हते.
@पाषाणभेद आपण सारेच त्या कॉरपोरेट कल्चरचा भाग असतो.
@सोकाजी खर आहे कंटाळा येतो पण कॉरपोरेट जगताला कंटाळून भागत नाही कारण पैशाच सोंग आणता येत नाही . If you can't avoid it accept it.

खूप दिवस Close of business आणि close of the day समजत नव्हते

श्रीगुरुजी's picture

12 Oct 2021 - 7:39 pm | श्रीगुरुजी

Agree to disagree, Best practices, empower, delegation, BoB (best of best), boil the ocean, core competencies, low hanging fruits, comfort zone, thought process, thirty thousand feet view, due diligence, on the money, drill down, KPAs, key takeaways, bucket list, moving goalpost, chasing a moving target, game changer, WOW moment, low bandwidth, my plate is full, keep me in the loop, trim the fat, cutting the corners, hard stop, reinvent the wheel, this is not the rocket science, piece of cake, strawman हे अनेकदा वापरून झिजून गुळगुळीत झालेले शब्द.

चंद्रसूर्यकुमार's picture

12 Oct 2021 - 7:41 pm | चंद्रसूर्यकुमार

मस्त खुसखुशीत लेख.

कॉलेजमधून पास होऊन नुकतेच नोकरीला लागलेल्या पोरांसमोर Vision, Mission, Leadership फेकायचे परंतु कंपनीच्या सीईओला मात्र हे शिकवायचे नाही. तिथे Competitive advantage, Value Add, Core Competencies असे काही फेकायचे असते.

कधीकधी disruptive technology हा सुध्दा शब्द असतो.

मॅकिन्झी, बीसीजीचे वगैरे कन्सल्टन्ट्स येतात ते एकदम फ्ल्युएंट इंग्लिशमध्ये गॅस देतात. तसे इंग्लिश बोलता आले नाही तर तिथे निवडच व्हायची नाही :)

डाम्बिस बोका's picture

12 Oct 2021 - 8:18 pm | डाम्बिस बोका

छान खुसखुशीत लेख. तुमची लेखन शैली खूप आवडली

अमर विश्वास's picture

12 Oct 2021 - 9:00 pm | अमर विश्वास

खुशखुशीत ....

IT मध्ये मॅनेजर म्हणून दोन वाक्य महत्वाची

Lets do it together ... म्हणजे तुम्ही करा ... मी आहेच

आणि

lets take it offline ... म्हणजे आत्ता गप्प बस ... अडचणीचे प्रश्न विचारू नकोस

श्रीगणेशा's picture

13 Oct 2021 - 12:54 pm | श्रीगणेशा

:-) हे अगदी खरं.

तुषार काळभोर's picture

12 Oct 2021 - 9:55 pm | तुषार काळभोर

चार दोन शब्द इकडे तिकडे केले तर आमच्या उत्पादन क्षेत्रात असच असतं.

रंगीला रतन's picture

12 Oct 2021 - 9:59 pm | रंगीला रतन

Lol मजा आली.

सौंदाळा's picture

12 Oct 2021 - 9:59 pm | सौंदाळा

त्रिवार दंडवत
काय मस्त लिहिलयं

मित्रहो's picture

12 Oct 2021 - 10:23 pm | मित्रहो

धन्यवाद चंद्रसूर्यकुमार, डाम्बिस बोका, अमर विश्वास, तुषार काळभोर, रंगीला रतन, सौंदाळा

@श्रीगुरुजी जबरदस्त. तुम्ही पूर्ण पिटारा उघडला. वापरा यातले काहीही.

@ चंद्रसूर्यकुमार हो Disruption मग ते कधी Business Model किंवा कधी Technology असे काही सांगितल्या जाते. तसेच Killer app किंवा Killer Feature असे जो तो फेकत असतो. कन्सलटंसी वाल्यांची इंग्रजी आणि त्यांच्या स्लाईडस हा वेगळाच विषय आहे.

@अमर विश्वास हो Lets do it together म्हणजे तुम्हीचा करा. कधी कधी तेही योग्य असते. माझा एक मित्र तर मॅनेजर जातपर्यंत त्याच्या तोंडाकडे बघायचा. तो गेला की मग कोड डिबग करायचा.

सतिश गावडे's picture

12 Oct 2021 - 10:35 pm | सतिश गावडे

काय लिहीलंय काय लिहीलंय, कडक एकदम. आवडलं.
यातले बरेचसे दैनंदिन कामकाजीय जीवनाचा भाग आहे.

Low Hanging Fruit मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा अर्थबोध झाला नव्हता, खूप जोर द्यावा लागला होता मेंदूवर :)

श्रीगुरुजी's picture

12 Oct 2021 - 10:44 pm | श्रीगुरुजी

Leverage हा सुद्धा कॉर्पोरेट जगताचा अत्यंत आवडता शब्द.

बापूसाहेब's picture

12 Oct 2021 - 11:37 pm | बापूसाहेब

मस्तच.. हसुन हसुन फुटलो...

हे अगदी कुटुंबांंथही चालू असते. शब्द निराळे पण हेतू एकच. गाढवाकडून काम करून घेणे. त्यावर बसून पुढे जाणे. योग्य ठिकाणी योग्य वेळेल गाढवास सोडून 'आत'/ 'वर' जाऊन या गाढवाकडून काम करून घेताना माझी कशी सुजली तरी मी कसा पुढे जात होतो हे बिग पिक्चर सांगून बाहेर येणे. मग गाढवाच्या पाठीवर /डोक्यावर योग्य ठिकाणी थाप मारून मी कसं संभाळून घेतलं आहे हे त्याला सांगणे. त्यामुळे आता काही आणखी देऊ शकत नाही, उकिरडे फुंकत राहा.
"अरे, चल पुढे."
.
.
.
मग एक दिवस हा वरचा माणूस आपल्यात येतो.
"बाहेरून एक घोडा घेण्यासाठी जाहिरात दिली आहे."
"मला म्हणाले उकिरडे शोधायला जा."
"कुठे असतात हे उकिरडे?"

सुधीर कांदळकर's picture

13 Oct 2021 - 6:12 am | सुधीर कांदळकर

मस्त पॉपकॉर्न फुललेत. छान प्रसन्न, खुसखुशीत. अगदी ताजेतवाने वाटले. धन्यवाद.

मस्त लेख आणि प्रतिक्रिया. बहुतांश उल्लेख कव्हर झालेले दिसतात.

Let's take it offline सदृश आणखी एक म्हणजे let's park it here / let's park it for now.

शिवाय,
"क्रक्स ऑफ द स्टोरी",
"Right sizing the organization" (अनेकांना हाकलणे),

"Where I'm coming from is.."

"टीम्स आर वर्किंग इन सायलोज, वी नीड टु वर्क इन सिंक"

"अनालिसिस पॅरालिसिस"

चावटमेला's picture

13 Oct 2021 - 8:30 am | चावटमेला

Multitasking, wearing multiple hats, strategic initiative, mitigation plans bla bla bla

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2021 - 8:52 am | श्रीगुरुजी

अजून काही -

Thresholds, pros and cons, ballpark figure, paradigm shift

योगी९००'s picture

13 Oct 2021 - 9:56 am | योगी९००

हहपुव... एकदम जबरदस्त लेख झाला आहे. शब्दा शब्दाशी सहमत. मलाही खरे तर ही भाषा अजिबात जमत नाही.

ते shortforms डोक्याचा भुगा करतात. काही shortforms असे असतात की ते परंपरेने वापरात असतात व वापरणार्‍याला त्याचा full form माहीतही नसतो. हल्ली गेल्या काही वर्षात PFA फार वापरला जातो. मला पहिल्यांदा कळले नव्हते पण नंतर लक्षात आले की PFA म्हणजे Please find attached.

मित्रहो's picture

13 Oct 2021 - 11:02 am | मित्रहो

धन्यवाद सतिश गावडे, सुचिता१, बापूसाहेब, कंजूस, सुधीर कांदळकर, गवि, चावटमेला, योगी९०० सर्वांना मनापासून धन्यवाद. उत्साहवर्धक प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद.

@ सतिश गावडे हो हे आज दैनदिन व्यवहाराचा भाग झाले आहेत.
@ श्रीगुरुजी, Leverage ला आता जार्गन म्हणावे की नाही इतका त्याचा वापर होत असतो. तीच गोष्ट pros and cons ची. मला सुरवातीला ballpark estimates म्हणजे नक्की काय समजत नव्हते. आता मीच खूपदा ते विचारतो. काही मंडळी रोज paradigm shift वापरतात तरी त्याला paradigm shift म्हणतात.
@ कंजूस ज्याच्या कडून सर्व काम करुन घ्यायचे, त्याच्यावर बसून आपण पुढे जायचे पण त्याला क्रेडिट न देता गाढव म्हणून हिणवायचे. गाढवाची परिभाषाच हि आहे.
@ गवि मी तरी Lets park it here म्हणजे त्या मुद्दयाचे लोणचे घाला असाच त्याचा अर्थ घेतो. right sizing भयंकर प्रकरण. Where I'm coming from हे मुद्दाम अं/आं लपविण्यासाठी वापरले जाते असे मला माझ्या एका मॅनेजरने सांगितले होते. Organization Restructuring होते तेंव्हा हमखास एक कारण Working in Silos असे असते.
@ चावटमेला हो असे बरेच शब्द आहेत. ते blah blah blah हे पण त्या Whatever सारखे आहे. अतिआत्मविश्वासाने बोलायचे.
@ योगी९०० लघुरुपं खूप त्रास देतात. नवीन कंपनी जॉईन केली की आधी ते शिकावे लागतात.

मला काही उलट अनुभव सुद्धा आले. मधल्या काळात Built to Last या पुस्तकामुळे की आणखीन कशामुळे ते माहित नाही पण BHAG (Big Hairy Audacious Goal) चे फॅड आले होते. इतके काही लोक त्यासाठी केस सुद्धा वाढवत होते. Andy Grove ने चार वर्षात 2x Productivity वाढविण्याचा प्रयोग यशस्वी करुन दाखविला होता म्हणून जो तो त्याच्या मागे लागला होता. मग सारे एका वर्षात 5x, 10x, 15x असे Productivity वाढविण्याच्या मागे लागले होते.(BHAG) एका दुसऱ्या देशाचा मुख्य माणसाने सांगितले होते. तुम्हाला जर वाटत असेल की एका वर्षात 12x Productivity वाढू शकते याचा अर्थ तुम्ही काय म्हणताय हे तुम्हाला माहित नाही किंवा तुम्ही आधी काहीच करत नव्हता असा होतो.

कुणी तरी नुकतेच Blue Ocean Strategy हे पुस्तक वाचले असेल. त्याने CEO ला प्रश्न विचारला
All these look like red ocean strategy. What is you blue ocean strategy. सीईओला कळले नाही त्याने त्याला विचारले.
Pardon त्याने मग परत तोच प्रश्न विचारला. त्यावर सीईओने उत्तर दिले.
I thought you guys speak english.
सीईओ आजही त्या कंपनीचा सीईओ आहे. प्रश्न विचारनाऱ्याने काही वर्षांनी कंपनी सोडली. कंपनीचा शेअर २००८ च्या पडझडीत $7 पर्यंत उतरला होता. आता स्प्लिट होऊनही तो $700 च्या वर आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

13 Oct 2021 - 5:30 pm | चंद्रसूर्यकुमार

कुणी तरी नुकतेच Blue Ocean Strategy हे पुस्तक वाचले असेल. त्याने CEO ला प्रश्न विचारला
All these look like red ocean strategy. What is you blue ocean strategy. सीईओला कळले नाही त्याने त्याला विचारले.
Pardon त्याने मग परत तोच प्रश्न विचारला. त्यावर सीईओने उत्तर दिले.
I thought you guys speak english.

जबराट. हार्वर्ड बिझनेस स्कूलचे प्रोफेसर लोक असली पुस्तके लिहित असतात आणि हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये असे वेगवेगळे लेख येत असतात. वाचायला छान असतात. पण यशस्वीपणे बिझनेस सांभाळणार्‍या किती सीईओंना ते स्वतः ती गोष्ट अंमलात आणत असले तरी ते जार्गन माहित असते कोणास ठाऊक. हा पण कन्सल्टन्ट लोकांना हे सगळे शब्द नक्कीच माहित असतात :)

मित्रहो's picture

13 Oct 2021 - 7:48 pm | मित्रहो

जार्गनचे स्त्रोत कन्सल्टन्ट किंवा B School असतात. माझा एक मित्र गंमतीने म्हणायचा. After MBA you may or may not get knowledge but you definitely get to know jargons to throw.

तर्कवादी's picture

14 Oct 2021 - 12:01 am | तर्कवादी

त्यावर सीईओने उत्तर दिले.
I thought you guys speak english.

CEO चा हजरजबाबीपणा आणि समोरच्याला थेट घेण्याचा अ‍ॅटिट्युड एकदम भन्नाट आणि म्हणूनच तो यशस्वी CEO असला पाहिजे

योगेश कोलेश्वर's picture

13 Oct 2021 - 11:40 am | योगेश कोलेश्वर

लेख आवडला ...

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Oct 2021 - 12:42 pm | राजेंद्र मेहेंदळे

एकदम भारी निरिक्षणे मांडली आहेत. कॉर्पोरेट ईंग्रजी शिवाय प्रत्येक कंपनीची सुद्धा एक एक भाषा/जार्गन असतात हे मात्र खरे. त्यातही सर्विस कंपनी(ईंफोसिस्/विप्रो), प्रॉडक्ट कंपनी(सिस्को,चेक पॉईंट), आय एस पी/एस पी(व्हेरिझोन्/एटी अ‍ॅन्ड टी), फायनान्स(बँक्/इन्शुरन्स),मॅन्युफॅक्चरिंग(मर्सिडीझ्,वोल्वो) हे ठळकपणे समजतात.

त्यात पुन्हा यु एस ईंग्लिश (एलिवेटोर, बॉल पार्क फिगर), यु के इंग्लिश(लिफ्ट, अप्प्रॉक्सिमेट), चायनिज्(आय यु गोंग तो लंच?),जापनिज, ईझरएल, इस्टर्न युरोप्,वेस्टर्न युरोप,आफ्रिकन असे आहेच. पण शेवटी भाषा हे केवळ संपर्काचे साधन आहे. माणसाचे स्वभाव, त्याची वृत्ती, ही साधारण सगळीकडे सारखीच असते. आणि आपल्याला कामापुरते बोलता आले की झाले. नाहीतर गुगल ट्रास्लेटर आहेच.

बबन ताम्बे's picture

13 Oct 2021 - 1:42 pm | बबन ताम्बे

मस्त लेख. सगळेच कव्हर केलेय. मस्त खुसखुशीत शैली. आमचा एक सहकारी मीटिंगमधे बोलताना प्रत्येक वाक्यामागे लाईक आणि अ‍ॅक्चुली इतक्या वेळा जोडतो की विचारू नका.
अजून एक - टॉप प्रॉयॉरीटी प्रोजेक्ट्/टास्क असेल तर सांगताना इट्स अ हॉट पोटॅटो नाउ .

तर्कवादी's picture

14 Oct 2021 - 12:09 am | तर्कवादी

आमचा एक सहकारी मीटिंगमधे बोलताना प्रत्येक वाक्यामागे लाईक आणि अ‍ॅक्चुली इतक्या वेळा जोडतो की विचारू नका.

दाक्षिणात्य (तमिळ) आहे का ?

चौथा कोनाडा's picture

14 Oct 2021 - 5:17 pm | चौथा कोनाडा

माझेही निरिक्षण आहे दक्षिणी लोक संभाषणात लाईक आणि अ‍ॅक्चुली हे शब्द बर्‍याचदा च्वापरत असतात !

श्रीगुरुजी's picture

14 Oct 2021 - 6:49 pm | श्रीगुरुजी

Basically आणि actually हे दोन शब्द अनेक जण सढळ हाताने वापरतात.

अनन्त अवधुत's picture

14 Oct 2021 - 10:56 pm | अनन्त अवधुत

हे सुद्धा सढळहस्ते वापरले जाणारे शब्द.
त्यात also हे लिखाणात जास्त येते, only बोलण्यात.

बबन ताम्बे's picture

14 Oct 2021 - 5:28 pm | बबन ताम्बे

नाही. मराठीच आहे.

चौथा कोनाडा's picture

16 Oct 2021 - 11:57 am | चौथा कोनाडा

दक्षिणेचे पाणी लागलेलं दिसतंय ! :)
ज्योक्स अपार्ट, जे मराठी इंग्रजी बोलतात, व्यवस्थित बोलतात, actually, likely असे टेकू क्वचित घेतात असं माझ्या पाहण्यात आहे.

श्रीगणेशा's picture

13 Oct 2021 - 2:00 pm | श्रीगणेशा

खूप छान लिहिलं आहे!

हे वाक्य जोडता येईल कॉर्पोरेट corporate jargon मधे:
Can you please little 'r' me?

वामन देशमुख's picture

13 Oct 2021 - 3:24 pm | वामन देशमुख

मित्रहो, लै भारी लिहिलंय, लेख आणि त्याखालचे प्रतिसाद्स एकाहून एक आहेत!

बहुतांशी जार्गन्स कव्हर झालेच आहेत. "at the end of the day" चा उल्लेख कुणी केलाय का?

माझा एके काळाचा एक तेलगू सहकारी "end of" म्हणायचा आणि इतरांनी ते "at the end of the day" असं समजून घ्यावं अशी त्याची अपेक्षा असायची.

---

बाकी मूळ धाग्याशी संबंधित नसलं तरी IT मधलं माझंच एक निरीक्षण इथे नोंदवतो -

"'Hello world' is like the first kiss of a girlfriend; what follows is merely exploring details!"

उन्मेष दिक्षीत's picture

13 Oct 2021 - 4:23 pm | उन्मेष दिक्षीत

>> मी अनावधानाने का असेना पण ज्या creative पद्धतीने विसरलेले सेमीकोलन आणि Accountability चा संबंध जोडण्याचे जे Innovation केले होते त्याबद्दल मला Employee of the month असा पुरस्कार मिळाला.

लॉल !!

WAH वाल तर व्वाच होतं एक्दम !

कालच self assessment झाली आणि KPI Objectives वगैरे Measure झाले !

Peter's principle . त्याच्या काही नवीन आवृत्या आल्या का?

मित्रहो's picture

13 Oct 2021 - 8:30 pm | मित्रहो

नवीन आवृत्ती बद्दल माहित नाही. असेलच मार्केटमधे.
इंटरेस्टींग प्रकरण आहे. People rise to maximum level of incompetency. कदाचित त्यामुळे लवकर वर गेलेले तिथेच अडकून राहत असतील. पटो वा न पटो एक वेगळा विचार आहे.

चौथा कोनाडा's picture

13 Oct 2021 - 5:21 pm | चौथा कोनाडा

मस्त, फर्मास !
😄

सेमीकोलन ; चा किस्सा वाचून धमाल आली !

अभिजीत अवलिया's picture

13 Oct 2021 - 5:55 pm | अभिजीत अवलिया

छान लेख.

मित्रहो's picture

13 Oct 2021 - 7:41 pm | मित्रहो

धन्यवाद योगेश कोलेश्वर, राजेंद्र मेहेंदळे, बबन ताम्बे, वामन देशमुख, श्रीगणेशा, उन्मेष दिक्षीत, चौथा कोनाडा, अभिजीत अवलिया

@राजेंद्र मेहेंदळे हो अमेरीकन इंग्लिश, ब्रिटिश इंग्लिश हे वेगळ प्रकरण असतं.

@ श्रीगणेशा Can you please little 'r' me? नाही माहिती मी आजवर ऐकले नाही काय अर्थ आहे.

@बबन ताम्बे हॉट पोटॅटो खूप वापरात येतं.

@वामन देशमुख, COB or COD सुद्धा तेच. बाकी Hello World मस्त.

@उन्मेष दिक्षीत शुभेच्छा !!

अनन्त अवधुत's picture

13 Oct 2021 - 9:19 pm | अनन्त अवधुत

म्हणजे रिप्लाय ऑल न करता (ईमेल मधील सीसी लाईन ला जे आहेत त्यांना वगळून) मला एकट्यालाच रिप्लाय करा.
AFAIK आउटलूक पूर्वी लोटस नोट्स ईमेल्स साठी वापरले जायचे, little 'r' हा त्यातला शॉर्टकट आहे.

तर्कवादी's picture

14 Oct 2021 - 12:12 am | तर्कवादी

AFAIK वा वा ,, बोलता बोलता तुम्ही हे कव्हर केलंत :)

अनन्त अवधुत's picture

14 Oct 2021 - 12:22 am | अनन्त अवधुत

.

मित्रहो's picture

14 Oct 2021 - 10:47 am | मित्रहो

माहितीबद्दल धन्यवाद

तर्कवादी's picture

14 Oct 2021 - 12:19 am | तर्कवादी

@मित्रहो,
अतिशय मनोरंजक आणि तरीही वास्तववादी धागा. काही वेळा काही जॉर्गन्स हे वीट आणतात
उदा: I don't have bandwidth. हे मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा मला वाटले त्याच्याकडचे नेट स्लो असेल किंवा खूप काही डाउन्लोडिंग चालू असेल (मी पूर्वी काहीकाळ एका engineering outsourcing च्या IT support मध्ये काम केल्याने असेल कदाचित)...

आणखीन एक अति वापरातला शब्द म्हणजे Let’s take it Offline साऱ्या गोष्टी जर ऑफलाइनच करायच्या होत्या मिटिंग काय आमच्या शर्टाच्या बटन मोजायला बोलावली

हे मस्त होतं. खास करुन आता WFH च्या काळात कुणी म्हंटलं की "Let's discuss it offline" तर "पण सध्या तरी माझा ऑफिसला यायचा काही विचार नाहीये तर offline कस काय discuss करायचं?" असं विचारायचा मोह होतो.

रात्रीचे चांदणे's picture

15 Oct 2021 - 9:31 am | रात्रीचे चांदणे

bandwidth
हा शब्द कालच संध्याकाळी माझ्या ऑफिस च्या मेल मध्ये वाचला, हिथे तो कशासाठी वापरला जातो ह्याचा अंदाज आलेला म्हणून बर झालं नाहीतर माझपण समज नेट स्लो आहे असाच झाला असता.

तर्कवादी's picture

14 Oct 2021 - 12:23 am | तर्कवादी

फायनान्स मधले जॉर्गन्स पण कधी कधी डोक्यात जातात.. सरळसोट रेवेन्यू आणि प्रॉफिट म्हंटलं तर अगदी सामान्य माणसालाही कळेल आणि मग कंपनी दिवाळखोरीत जाईल या भितीने ते "टॉप लाइन" / "बॉटम लाईन" अशा लाईनी मारत राहतात.

तर्कवादी's picture

14 Oct 2021 - 12:27 am | तर्कवादी

IMOH हे मी प्रथम वाचलं ते एका मॅनेजरने मला पाठवलेल्या ईमेल मध्ये .. काही कळालं नाही पण म्हंटलं त्यालाच पुन्हा विचारुन माझं अज्ञान उघड करण्याआधी गुगल करु.
अरे बाबा तू लिहितोय तर तुझंच मत असणार ना.. त्यात पुन्हा ते प्रामाणिक मत आहे हे सांगायची काय गरज आहे म्हणजे इतर वेळी तु अप्रामाणिक मत देत असतोस काय ?

नचिकेत जवखेडकर's picture

14 Oct 2021 - 8:25 am | नचिकेत जवखेडकर

sorry for the inconvenience caused हे अजून एक परवलीचं वाक्य. हे एक फेकलं की झालं, कोणी विचारत नाही मग का उशीर झाला काम करायला वगैरे.

मित्रहो's picture

14 Oct 2021 - 10:50 am | मित्रहो

धन्यवाद तर्कवादी, नचिकेत जवखेडकर

सध्या तरी माझा ऑफिसला यायचा काही विचार नाहीये तर offline कस काय discuss करायचं?

हे मस्त

sorry for the inconvenience

हे तर दूरदर्शनने गाजवलेले वाक्य आहे.

चौकस२१२'s picture

14 Oct 2021 - 12:34 pm | चौकस२१२

I don't have bandwidth. हे मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा
एक खाजगी उद्योगातील नोकरी सोडून एकाने नवीन कन्सल्टन्सी सुरु केलि होति .. काम होते त्याला देण्यासारखे म्हणून त्याला विचारले कि करशील का त्यावेळेस " बॅण्डविड्थ नाही" म्हणाला.. कळलं नाही .. मीही अभियांत्रिकी दोन्ही मेकॅनिकल क्षेत्रातील .. मग हे रेडिओ संधर्बातील काय उपटले हा विचार माझ्या मनात आलं आणि गोंधळलो होतो ... दोन क्षणात मग प्रकाश पडला ! कि याची कन्सल्टन्सी १माणूसच आहे .. असो

चौकस२१२'s picture

14 Oct 2021 - 12:38 pm | चौकस२१२

बांधकाम क्षेत्रात किंवा खाणीच्या क्षेत्रात "ग्रीन फील्ड साईट " ब्राउन फील्ड साईट " हे वकप्रचार वापरतात

बोका's picture

14 Oct 2021 - 8:07 pm | बोका

ऑटोमेशन प्रोजेक्ट बिझनेस मध्ये पण वापरतात.
उदा. नवीन प्लांट बनताना त्याचे ऑटोमेशन -ग्रीन फील्ड , जुन्या प्लांट च्या ऑटोमेशन चे नुतनीकरण -ब्राउन फील्ड

मित्रहो's picture

14 Oct 2021 - 9:25 pm | मित्रहो

धन्यवाद हे माहित नव्हते. कधी ऐकले नव्हते

सर्वसाक्षी's picture

14 Oct 2021 - 4:06 pm | सर्वसाक्षी

बॉसला जेव्हा टीमला सांगायचे असते की जास्त शहाणपणा करू नका:
Let's discuss with open mind
जेव्हा एखाद्याला नको ते काम द्यायचे असते:
This job needs a person with your expertise and experience
जेव्हा बॉसला टाईमपास करायचा असतो:
Ok guys let's brainstorm
जेव्हा एखाद्याला वाजवलं जातं:
Take it in right spirit
जेव्हा समोरच्याला कुणाचातरी पत्ता फोन नंबर वगैरे पाठवायचा असेल:
I will send you his coordinates

जेव्हा बॉसला सांगायचं असतं की मी सांगतो ते ऐका:
Let's align to the organization's objectives

असो. वाचायला मजा आली

भीमराव's picture

14 Oct 2021 - 4:07 pm | भीमराव

या उताऱ्याबद्दल एक e clapping.

कपिलमुनी's picture

14 Oct 2021 - 7:01 pm | कपिलमुनी

कुथवायचे असल्यास walking extra miles , initiative, pro-active इत्यादी शब्दांचा वापर होतो.

मित्रहो's picture

14 Oct 2021 - 9:30 pm | मित्रहो

धन्यवाद चौकस२१२, बोका, सर्वसाक्षी, भीमराव, कपिलमुनी
सर्वसाक्षी खूप मस्त अर्थ दिले. brainstorm म्हणजे खरच टाइमपास प्रकरण असते.
कपिलमुनी हो walking extra miles हा भयंकर त्रासदायक प्रकार आहे. काही सुचले नाही तर एक फिडबॅक ठरलेला असतो You need to be Pro active. का म्हणून त्याचा काय जास्त पगार मिळनार आहे. उगाचच

श्रीगुरुजी's picture

14 Oct 2021 - 11:05 pm | श्रीगुरुजी

Touch base, Piece of cake, Cherry on the ice cream हे सुद्धा वारंवार वापरण्यात येणारे शब्द.

सतिश गावडे's picture

14 Oct 2021 - 11:39 pm | सतिश गावडे

कामानिमित्त परदेशी किंवा परगावी खूप काळ राहून कायमचा परत येणार असेल तर तो for good परत येत असतो :)

किल्लेदार's picture

15 Oct 2021 - 1:27 am | किल्लेदार

धमाल लिहिलंय. आवडलं.

"डू यू अंडरस्टॅंड व्हेअर आय ऍम कमिंग फ्रॉम" आणि "कम अगेन " ही वाक्यं नेहमी फसकन हसवून जातात.

सतिश गावडे's picture

15 Oct 2021 - 1:26 pm | सतिश गावडे

"डू यू अंडरस्टॅंड व्हेअर आय ऍम कमिंग फ्रॉम"

याची अजून एक आवृत्ती: आय अंडरस्टॅंड व्हेअर यु आर कमिंग फ्रॉम

आनन्दा's picture

15 Oct 2021 - 9:33 pm | आनन्दा

मला पाहिले वाटलं की *तुला माहितेय माझा बाप कोण आहे* याचे हे इंग्रजी रूप आहे.
पण तसे दिसत नाही ते..

मदनबाण's picture

15 Oct 2021 - 12:36 pm | मदनबाण

सुरेख लेखन...

[ Agile नक्की कशासाठी व्हावे यासाठी Outside the Box विचार करुन Deep Dive साठी तयार असलेला ]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rama Ashtakam (Ameya Records) Bhaje Visesha Sundaram!!! श्री रामाष्टकम्

मित्रहो's picture

15 Oct 2021 - 2:41 pm | मित्रहो

धन्यवाद किल्लेदार आणि मदनबाण

सर्वांना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा!!

Agile या प्रकरणापासून मी अजूनतरी दूर आहे.

@सतीश गावडे भारतात परत आला तर For Good हे चांगले आहे.

@श्रीगुरुजी मी ते Cherry on cake ऐकले होते.

आयटीतल्या मंडळींनी त्यांच्यासाठी खास जार्गन बनवावे. मला सुचलेली काही उदारहणे देतो.
It is not just miss, you miss the bracket. (ही छोटी नाही फार मोठी चूक आहे)

Lets get out of semicolon era. (नवीन तंत्रज्ञानाकडे वळू या)

You might be in infinite while loop but small if can break you. (छोटी गोष्ट त्रासदायक ठरु शकते)

श्वेता व्यास's picture

15 Oct 2021 - 4:17 pm | श्वेता व्यास

अजून एक - 9 women cannot/can make baby in a month

श्रीगुरुजी's picture

15 Oct 2021 - 10:08 pm | श्रीगुरुजी

It will go for a toss हे अजून एक लोकप्रिय वाक्य.

सुक्या's picture

15 Oct 2021 - 11:50 pm | सुक्या

आमच्या कुंपनीत सदा न कदा "Use best judgment in all situations" असे बोंबलत फिरत असतात लोक.
ते झालं की मग "customer first"
काम करत उशीर झाला की मग "try to reduce your waste" असला काहीतरी पाचकळ सल्ला देतात . . . "Kaizen" नावाचा प्रयोग चालु आहे गेले काही दिवस. फुकाचा त्रास . . .

इरसाल's picture

16 Oct 2021 - 11:30 am | इरसाल

"यु नो" कोणीच वापरत नाही कां? (वाक्यात जवळपास ४ / ५ वेळा)
किंवा वी शुड बी ऑन द सेम प्लॅटफॉर्म वगैरे वगैरे.

मित्रहो's picture

16 Oct 2021 - 6:44 pm | मित्रहो

धन्यवाद सुक्या Kaizen भारी प्रकरण आहे. जपानी लोकांनी त्याचा व्यवस्थित वापर केला आपल्याकडे फक्त हम भी उनमे है हे दाखविण्यासाठी त्याचा वापर होतो. उत्पादन क्षेत्रात वापर जास्त होतो.

धन्यवाद इरसाल आमच्या कॉलेजात एक इंग्रजीचे प्रोफेसर यु नो वापरायचे. मी त्यांच्या वर्गात यु नो मोजायचे काम करत होतो.

श्रीगुरुजी तुमच्याकडे कॉरपोरेट जार्गनचा खजिना आहे

सुक्या's picture

17 Oct 2021 - 1:00 am | सुक्या

हो .. Kaizen हे उत्पादन क्षेत्रात जास्त परीणामकारक आहे. आइटी मधे ते काही कामाचे नाही ... त्यातही जर कोअर सर्विस असेल तर ते अजुन बिनकामाचे ठरते. कोडींग करताना वेस्ट कसे काय कमी कारायचे ? सगळा भोंगळ कारभार.

कोडींग करताना वेस्ट कसे काय कमी कारायचे ?
>> वेळ

सुक्या's picture

18 Oct 2021 - 10:08 pm | सुक्या

तेच म्हणतो मी ... एक प्रोग्राम लिहायला १ दिवस (८ तास) लागत असेल तर तेच ४ तासात कसे करायचे ? म्हणजे दोन हात आहेत तर दोन कीबोर्ड लावायचे का? कायझेन नक्की चांगली कोन्सेप्ट आहे. पण ती उत्पादन क्षेत्रात जात परीणामकारक आहे. उद्या नासा मधे तेच कराल तर काय होईल?

श्रीगुरुजी's picture

16 Oct 2021 - 11:44 pm | श्रीगुरुजी

Gamechanger, Guesstimate, Hand Holding, New normal, Raise the bar, Swimlane, Thought leadership, Value add, Flavor of the month, Reinventing the wheel हे अजून काही लोकप्रिय शब्द.

Corporate Jargon template

मस्त लेख. यावरुन हा भन्नाट मेस्सेज आठवला.. :)