भारतीयांचे अपमानास्पद पराभव:- प्रकरण -१ खडकीची लढाई :- भाग - ३ (परिसमाप्ती)

kvponkshe's picture
kvponkshe in जनातलं, मनातलं
12 Sep 2021 - 9:19 pm

पेशव्याचे सेनानी विठ्ठल नरसिंह विंचूरकर (पानिपतावर झालेल्या लढाईतले ते विठ्ठल शिवदेव विंचूरकर वेगळे आणि हे वेगळे) हे ब्रिगेडियर स्मिथ च्या बरोबर काही दिवस होते. त्यांनी इंग्रजी फौजेतील शिस्त जवळून पहिली होती. त्यांनी पेशव्यास "इंग्रजांशी आता बिघाड न करण्याचा सल्ला दिला ". पण रावबाजीने तो ऐकला नाही. तरीहि विंचूरकर पेशव्याची आज्ञा मानून ससैन्य हजर झाले होते.
गोविंदराव काळे या बारभाईतील तत्कालीन एकमेव हयात सेनानींचे म्हणणेही युद्धाच्या विरोधात होते. मराठ्यांच्या लढायांचा इतिहास या पुस्तकात त्यांचे म्हणणे दिले आहे. " तूर्त इंग्रजांशी लढाईचा प्रसंग आणू नये. तुमचा सरंजाम नवा. काल चाकर झालेला आज लढून मरतो असे नाही. वर्षे दोन वर्षे फौज अशी बाळगावी व इंग्रजांशी सख्यआहे तेच चालवावे. दुसरे लढाईचा प्रसंग शहराजवळ करू नये. एखादी मोहीम परराज्यात सरकारची बाहेर काढावी आणि इंग्रजांस समागमे घेऊन जावे आणि तिकडे गेल्यावर लढाईचा प्रसंग काढावा तो करता येईल. सध्या लढाई उभी केली असता इंग्रज म्हणजे हटला जातो असे घडत नाही" पुढे जे काही झाले ते या भाकिताशी किती तंतोतंत जुळते ते पाहून या गणेशपंतांची मसलत नाकारून पेशव्याने युद्धाची घाई केली काय अशी शंका मनात येते.

गणपतराव पानसे हे मराठा तोफखान्याचे प्रमुख होते. विंचूरकर घराण्याचा इतिहास या पुस्तकात त्यांचा रावबाजीस दिलेला जबाब दिला आहे तो असा :- "सरकारांनी तोफखान्यात सुद्धा इंग्रजी कवायती फौज आपले जवळ ठेवल्यामुळे आजपर्यंत प्रसंगोपात जी कामे पडली ती त्यांच्या कडूनच बजावण्यात आली. खालसा तोफखान्यास मुळीच काम पडत नसल्यांमुळे हल्ली दारुगोळा वगैरेची तयारी अगदी नाही. आता नवीन करायची ठरली तर श्रीमंतांनी जी मुदत दिली आहे, त्या मुदतीत पाहिजे तशी तयारी होणे अशक्य आहे. तथापि मजकडून होईल तितकी तयारी करण्यास मी बिलकुल कसर करणार नाही ". यावरून मराठा सैन्य संख्यने जास्त असले तरी तयारीच्या बाबतीत किती मागे होते हे कळते. इंग्रजांनी तैनाती फौज भारतीय राजांच्या गळी मारून त्यांचे क्षात्र तेजही कसे झोकाळून टाकले ते ही वाचकांनी लक्षात घ्यावे.
इंग्रजांवीरुद्ध समशेरीस हात घालण्यास आतुर होते ते म्हणजे बापू गोखले. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे कुणीही माणूस रावबाजीकडे मसलतीसाठी आला तर पेशवा त्यास "तुम्हास जे काही कळवणे असेल ते बापूस कळवा " असे सांगे. त्यामुळेच वर उल्लेखित काळे विंचूरकर यांचे सल्ले पेशव्याने ना ऐकता बापू कडे पाठवले आणि बापूने ते उडवून लावले. उपलब्ध सैन्य संख्येच्या बळावर इंग्रजी फौज आपण सहज उधळून लावू असा त्यांना विश्वास होता. वास्तविक बापू गोखले हे वेलस्ली बरोबर असाये च्या लढाईत इंग्रजांच्या बाजूने उपस्थित होते. जास्त सैन्य संख्या असूनही असायेच्या लढाईत भोसले - शिंदे यांच्या कवायती फौजांचा पराभव झालेला त्यांनी पहिला होता. पण महादजींनी जसे वडगावच्या लढाईत दग्दभू धोरण आणि गनिमी कावा वापरून इंग्रजांना शरण आणले तसेच डावपेच वापरून आपण इंग्रजास हरवू अशी त्यांची योजना असावी. शेवटी पेशव्याने बापू गोखले यांचीच योजना स्वीकारली. २८ ऑक्टोबर १८१७ रोजी पुण्यात सैन्याची मोठी धामधूम उडाली. तोफांचे बैल जोडले गेले. बहुदा बापूने पेशव्याकडे हल्ल्याची परवानगी मागितली असणार. पण युद्ध करावे की नाही, करावे तर आज की नंतर या द्विधा मनस्थितीत रावबाजी असावा. हल्ल्याची परवानगी मिळालीच नाही. २९ तारखेस हल्ला न करण्याची चूक फार गंभीर होती.
एकतर मुंबई आणि नगर येथील पलटणी अजून पुण्यास पोहोचल्या नव्हत्या. एकट्या कॅप्टन फोर्ड आणि कर्नल बर्र ची पलटणे पुण्यात होती . त्यातील बर्र ची पलटण गारपिरवर होती . आणि मराठा फौजांनी वेढलेली होती . हल्ला करून त्यांचा पराभव करणे बरेच सुलभ होते. जर एलपीस्टन हाती लागला असता तर मराठ्यांस व्यूहात्मक फायदा ही मिळाला असता. शिवाय आपण इंग्रजांस हरवू शकतो असे सैनिकांचे नैतिक मनोधैर्यही उंचावले असते. २९ ऑक्टोबर ला हल्ला न करून मराठ्यांनी विजयाची सुवर्ण संधी दवडली असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. २८ ची रात्र एलपीस्टन ने जागून काढली.  ग्रँड डफ त्याच्या बरोबर होता. हल्ला न झाल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असणार यात शंका नाही. २९ ऑक्टोबर ला एलपीस्टनने पेशव्यास निरोप पाठवला की गारपिरवर मराठा फौज त्याच्या फौजेच्या अगदी हद्दीवर आहेत त्या काढून घ्याव्या. पण पेशव्याने काही एक हालचाल केली नाही. तेव्हा युद्ध अटळ आहे हे एलपीस्टन समजून चुकला.
नोव्हेंबर १ रोजी गारपिरवरील बर्र ची फौज त्याने हटवली आणि मुळा नदी पार करून तो खडकीच्या दिशेने वाट धरली. १ - २ नोव्हेंबर ला खडकीत त्याने छावणीची व्यवस्था लावली. इंग्रजी सैन्याची डावी बगल आज जिथे होळकर पूल आहे तिथे पसरली होती तर उजवीकडे आजच्या खडकी गावापर्यंत पसरली होती. या रांगेच्या पिछाडीस मुळा नदीचा प्रवाह वाहत होता. मुख्य फायदा हा होता की कॅप्टन फोर्ड ची पलटण जी नदीच्या पलीकडे दापोडीस होती ती गरजेनुसार नदी ओलांडून पटकन बर्र च्या पलटणीस मिळू शकत होती. तशी नदीपार करण्याची जागाही शोधून ठेवण्यात आली होती. बर्रच्या फौजेने गारपीराची छावणी सोडल्यावर मराठ्यांनी छावणी लुटूली.
२ नोव्हेंबर रोजी गणेश खिंडीत पेशव्याच्या विश्रामसिंग नामक नाईकाची ले. शॉ याच्याशी बाचाबाची झाली आणि विश्राम सिंगने त्यास भाल्याने जखमी केले. एलपीस्टनने ताबडतोब याचा जाब विचारला. पेशव्यानेही लगेच तपासाचे नाटक केले. या सर्व प्रकारचा जाब विचारण्याची जबाबदारी एलपीस्टने फोर्ड वर सोपवली. फोर्ड आणि मोरो दीक्षित यांची भेट ५ नोव्हेंबर १८१७ ला सकाळी झाली. याच वेळी फोर्ड आणि त्याची बटालियन मराठ्यांच्या बाजुने लढावी म्हणून मोरोपंतांनी प्रयत्न केला. फोर्ड मानेना तेव्हा निदान त्याने निष्क्रिय राहावे यासाठीही प्रयत्न केला. पण प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी फोर्ड आणि त्याची पलटण इंग्रजांकडून लढली.

५ रोजीच दुपारी विठोजी गायकवाड नावाचा इसम संगमावरील रेसिडेन्सीत राहत असलेल्या एलपीस्टनला भेटण्यास आला. त्याने रावबाजीचा निरोप म्हणून सांगितले की "तुम्ही जे इंग्रजी सैन्य जमा केले आहे ते दूर कोठेतरी पाठवून द्यावे आणि जे नेटिव्ह सैन्य आहे ते पेशवे सांगतील तिथे पाठवून द्यावे नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील". एलपीस्टन ने अर्थातच ही मागणी फेटाळून लावली. एलपीस्टन ऐकत नाही हे पाहून बापू गोखले वगैरे सेनानींनी हल्याचा विचार पक्का केला. (याच कालावधीत मराठ्यांच्या निशाणाची काठी मोडल्याचा आणि अपशकुन झाल्याचा उल्लेख येतो. पण नक्की तारीख मला मिळत नाही). ५ नोव्हेंबर ला सकाळी रावबाजीने हल्ल्याचा आदेश दिला. बापूने पेशव्याच्या पायावर डोके ठेवले. रावबाजीने त्याला "बाळाजी विश्वनाथाचे पुण्य तुम्हास तारो" आशीर्वाद दिला . पेशव्यांनी युद्ध नेतृत्व करण्याचे दिवस केव्हाच संपले होते. बापू सेनापती होता आणि तोच लढाईचे नेतृत्व करणार होता. पेशवे ५००० घोडदळ आणि २००० पायदळ घेऊन पर्वतीवर गेले. तेथून ते युद्ध पाहणार होते. पेशव्याचे सैन्य (बहुदा लकडी पूल ओलांडून?) खडकीच्या दिशेने इंग्रजी सैन्यावर चढाई करण्यासाठी निघाले. मराठा सैन्याची डावी बाजू चतुःशृंगी च्या मंदिराच्या पासून सुरु होऊन संगमावरील रेसिडेंसीच्या मधील सर्व मैदानात ते पसरले होते. एलपिस्टनने सर्व रागरंग पाहून रेसिडेन्सी सोडून खडकीच्या छावणीत जाण्याचा निर्णय घेतला. जाण्या आधी त्याने अनेक महत्वाची कागदपत्रे जाळून टाकण्याची दक्षता घेतली. पळून जात असताना तो विचूरकरांच्या पथकाच्या टप्प्यात होता. पण आश्चर्यकारक रित्या त्यास कोणताही अटकाव केला गेला नाही. तो सहीसलामत खडकीच्या छावणीत पोहोचला. दुपारी ३ वाजता मराठ्यांनी रेसिडन्सीवर हल्ला चढवला आणि ती जाळून टाकली.मराठा डावी बगल मोरो दीक्षित , विंचूरकर सांभाळत होते. मध्य भागी मराठ्यांचा तोफखाना होता. आणि उजवी कडे बापू गोखले यांचे सैन्य होते. मराठ्यांचे निशाण बहुदा इथेच असावे. अगदी उजवीकडे फादर पिंटो आणि त्याचे सैन्य होते. गोसावी सैन्यही मराठ्यांच्या उजव्या बगलेवर होते.

मराठ्यांकडून प्रथम तोफांचा मारा करण्यात आला. पहिले पाच गोळे पडल्यावर इंग्रजी तोफ़ानीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. उजवीकडून मोरोदिक्षित कॅ. फोर्ड च्या पलटणीस भिडले. त्यांचे उद्दिष्ट फोर्डच्या सैन्याचा बर्र च्या पालटणीशी मिलाफ टाळणे हा होता. तत्पूर्वी त्यांची बापुशी वादा वादी झाली होती. त्या रागाच्या भरात मोरो दिक्षित इंग्रजी फौजांना भिडले  व तोफेच्या माऱ्यात सापडून ठार झाले. नेतृत्वहीन मराठा डावी बगलेची फौज मागे हटली.  विंचूरकरांच्या फौजेनेही फोर्ड ला अडवण्याचा प्रयत्न केला पण फोर्ड सहज पणे रात्रीपर्यंत खडकीच्या बर्र च्या पलटणीस मिळाला होता.
मराठ्यांच्या उजव्या बगलेवरील फादर पिंटो च्या अरब तुकडीने आणि गोसावी सैन्याने इंग्रजी डाव्या बगलेवर हल्ला चढवला. पण इंग्रजी बंदुकांच्या माऱ्यापुढे त्यांचे काही चालले नाही. पण यामुळे इंग्रजी मध्य आणि डावी बगल यांच्यात पोकळी निर्माण झाली. या धुमश्चक्रीत बहुदा फादर पिंटो मारला गेला. ही संधी साधून बापू गोखले यांनी आपले ६००० घोडदळ त्या पोकळीत घुसवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रयत्न हा इंग्रजी पायदळाची पिछाडी गाठण्याचा होता. सर्व साधारणपणे अशा युद्धात शत्रूचे पायदळ पथक आपल्या पायदळाकडून रोखून मग बगलेकडून घोडदळ हल्ला करून त्या पायदळास घेरून मग त्यांची कत्तल केली जाते.
मात्र मराठ्यांचे दुर्दैव आडवे आले. बापूच्या घोड्यास गोळी लागून तो पडला आणि काही वेळ दिसेनासा झाला. नेताच दिसेनासा झाल्याने चढाई करणाऱ्या मराठा घोडदळात काही काळ गोंधळ माजला. इतर मराठा सरदारांनी चढाई नेटाने रेटली. पण वाटेतील एका खोल नाल्यात अनेक घोडेस्वार पडले. हा नाला नेमका कोणता ते आज सांगणे अशक्य आहे. कदाचित आता  तो बुजवलाही गेला असेल. इंग्रजी पालटणी या घोडदळाच्या हल्ल्याला उत्तर म्हणून पायदळ चौकोन बनवून ते उभे राहिले. अशा पायदळावर झालेला घोडदळाच्या हल्ल्यास प्रतिकार करण्यासाठी  पायदळ चौकोनि आकार बनवून  उभे राहते. बंदुकाना संगिनी लावून त्या बाहेच्या बाजूने रोखून धरल्या जातात. साहजिकच घोडे टोकदार संगिनी पाहून बिथरतात आणि मग पायदळाच्या आतील  रंगातील सैनिक बंदुकांच्या फैरीवर फैरी घोडेस्वारावर झाडतात.  एलपीस्टन ने या हल्ल्या संबंधी लिहिताना म्हटले आहे की "I own I thought there was a good chance of our losing the battle". बापू गोखल्यांनी दुसरा  घोडा घेऊन चढाई चालू ठेवली. मराठ्यांच्या तोफांचा प्रभाव कितपत झाला हे सांगणे कठीण आहे. पण इंग्रजी तोफानी मराठ्यांच्या मध्य बाजूची खूप हानी केली. इंग्रजी पायदळ बंदुकांच्या फैरी मागून फैरी झडत मराठा फौजेच्या तोंडाशी येऊन ठेपले. इथपर्यंत संध्याकाळचे ७ वाजले होते. अंधार पडल्याने मराठा सैन्य माघार घेऊन पुण्याकडे परंतु लागले. आश्चर्य कारक रित्या इंग्रजी फौजांनी त्यांचा पाठलाग केला नाही. बहुदा नगर च्या फौजा येईपर्यंत थांबण्याचा त्यांनी विचार केला असावा.या लढाईत मराठ्यांचे ५०० सैनिक मारले गेले. शिवाय मोरो दीक्षित, सरदार कोकरे हे सेनानी सुद्धा पडले. हे सरदार कोकरे कोण आणि कसे पडले ते समजत नाही. अगदी ५०० सॆनॆक गमावले तरी अजूनही किमान २३-२४००० सैन्य शाबूत होते. इंग्रजांकडील ८६ लोक पडले. एकूण पाहता ही काही खूप हानी म्हणता येत नाही. खरे तर मराठ्यांनी चढाई चालू ठेवायला हवी होती. पण इंग्रजी सैन्याचे मनोधैर्य पाहूनच मराठे खच्ची झाले. पर्वतीवरून दुर्बिणीतून लढाई पाहणाऱ्या रावबाजीचे मन सुद्धा डळमळीत झाले असावे. पेशव्याच्या बखरीत "खावंदांचे मनात इंग्रज मोडायचा नाही " असे एक बोलके वाक्य आहे. त्याने बापूस लढाई थांबवण्याचा आदेश दिला . लढाई न थांबवता दुसरे दिवशी चालू ठेवली असती तर इंग्रज कितपत टिकले असते हे सांगणे कठीण आहे. पण लढाई मधेच सोडून देणे नक्कीच योग्य नव्हते. इंग्रजांनी या लढाईत निर्विवाद विजय जरी मिळवला नसला तरी त्यांनी मराठ्यांवर मानसिक विजय नक्कीच मिळवला. रावबाजीने पुढचे १० दिवस असेच वाया घालवले. पुढची लढाई येरवड्यात झाली.  तिची चर्चा आपण नंतर कधीतरी करूयात. हा लेख खडकीच्या लढाईपुरता मर्यादित आहे आणि आपण तेवढाच तो ठेउयात. ही लढाई पाहून सर्वात जास्त निराशा जर कोणाची झाली असेल ती रावबाजीची. आपली २५-३० हजार फौज इंग्रजांच्या ३००० फौजेला नेस्तनाबूत करू शकत नाही हे पाहून तो नक्कीच निराश झाला असणार. कदाचित बापूच्या नेतृत्वा विषयीही तो नाराज असणार . शिंदे, होळकर, भोसले यांची कमतरता त्यास निश्चितच जाणवली असेल. म्हणूनच त्याचा पुढचा पळ होळकर , शिंदे , भोसले यांची मदत मिळवण्याच्या दृष्टीने सुरु झालेल्या दिसतात.
अपयशाची करणे :-
१. रावबाजीचे द्विधा, डळमळीत आणि भिडस्त धोरण .
२. २९ ऑक्टोबर ची गमावलेली संधी
३. मराठा सेनानींतील युद्ध कौशल्याचा अभाव - मराठे जरी शूर असले तरी युद्ध कौशल्यात ये इंग्रजांपेक्षा कमी पडले हे सत्य मान्य करावेच लागेल . बापू गोखले , पानसे किंवा या लढाईत भाग घेतलेल्या कोणतेही सेनानीचे युद्ध कौशल्य छ . शिवाजी , बाजीराव इतके नव्हते . मोरो दीक्षित , कोकरे यांची पूर्वीची लष्करी कामगिरी कितपत उल्लेखनीय होती ते शोधावे लागेल .
४. मराठ्यांचा नवीन युद्ध पद्धतीच्या अभ्यासाचा अभाव५. मराठ्याच्या सैन्यातील शिस्तीचा अभाव.
६. मराठ्यांच्या तोफखान्याचा आधुनिकतेचा अभाव
७ . मराठा सैन्याच्या नैतिक मनोधैर्याचा अभाव.
 ८ . मराठ्यांचा सैन्याच्या गुणवत्ते पेक्षा सैन्य संख्येवर भर.
९. इंग्रजांची कवायती फौजांची युद्ध करण्याची पद्धत मराठ्यांना कधीच अंगवळणी पडली नाही .( शत्रूच्या पलटणीवर आपले घोडदळ घालण्याच्या जुन्याच जुन्याच तंत्राने ते गेले . )
१०. पहिल्या - दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धातून मराठा/देशी नेतृत्व काहीच शिकले नाही .
११. जाज्वल्य राष्ट्राभिमानाचा अभाव .

संदर्भ :- (कोणत्याही विशिष्ट क्रमाने नाही )
१. मराठी रियासत - सरदेसाई 
२. मराठ्यांच्या लढायांचा इतिहास -परांजपे 
३. भूतावर भ्रमण -य. न. केळकर 
४. सरदार बापू गोखले - आठवले 
५. विंचूरकर घराण्याचा इतिहास - गाडगीळ 
६. Battles of Honorable East India Company - नरवणे 
7. Bajirao And The_East India_Company 1796-1818- गुप्ता 
8. http://www.kaustubhkasture.in/…/08/blog-post_1694.html
9. मराठे व इंग्रज -केळकर न. चिं . 
१०. मराठ्यांचा युद्धेतिहास - पित्रे 
११. संजय क्षीरसागर यांचा ब्लॉग 

इतिहासप्रकटन

प्रतिक्रिया

या लढाईचा नकाशा आधुनिक गुगल मॅप्सवर सुपरइम्पोझ करून मागे एक चित्र मी टाकले होते. ते वापरून लढाईच्या सर्व जागा आज कुठे आहेत ते सहज कळते. तो नाला, लढाईच्या जागा यातील थोडेफार आजही शिल्लक आहे कारण भोसलेनगरच्या आसपासचा तो भाग कॅन्टोन्मेंट हद्दीत असल्याने बराचसा अविकसित राहिलेला आहे. हा नकाशा वापरून त्या जागेला शक्यतो लढाईच्या महिन्यात/त्या वेळच्या सुमारास भेट देण्याचा कार्यक्रम मी आणि शशिकांत ओकजी ठरवत होतो. पाहूया कधी जमेल ते.

कंजूस's picture

13 Sep 2021 - 6:52 am | कंजूस

विजयातून सावध आणि पराभवातून शिकायचं असतं.

गॉडजिला's picture

13 Sep 2021 - 11:38 am | गॉडजिला

धाग्यात अवश्य अ‍ॅडवाव्यात म्हणजे वाचकाना जास्त सोयीचे होइल.

ते पाचशे विरूद्ध पाच हजार/ पंचवार्षिक हजार/पन्नास हजार/पाच लाख लढाई कधी झाली होती?

भारताने कोणत्याच देशावर कधीच आक्रमण केले नाही.भारतीय लोकांचे साम्राज्य पूर्ण जगात असावे म्हणून युद्ध केली नाहीत.
भारतावर फक्त आक्रमण झाली .
ब्रिटिश,मोघल हे पूर्वीचे आक्रमक आणि चीन पाकिस्तान आताचे आक्रमक.
चीन नी भारताचा पूर्ण पराभव केला होता.
पाकिस्तान कधी भारतावर विजय मिळवू शकला नाही आणि पुढे पण शक्य नाही.
ब्रिटिश लोकांशी एकजूट होवून भारताने लढाई केलीच नाही.एक ब्रिटिश समर्थक तर एक ब्रिटिश विरोधी हीच अवस्था .
मराठा ,आणि राजपूत ह्यांनी च काही लढाया परकीय शक्ती शी केल्या.
त्या मधील पानिपत लढाई हीच मोठी होती.
बाकी किरकोळ .

अभिमानास्पद भारतीय विजय अशी मालिका करावी - पराभव कशाला?