१. रस्त्यावर वाढलेलं कुत्रं चुटकी वाजवून बोलावलं की लगेच शेपूट हलवत पायाशी येतं.. झोंबाळतं.. त्याच्या उचंबळून येण्याचा प्रवाह चहुदिशांना मुक्त असतो..
पण पाळलेल्या कुत्र्यांच्या प्रेमाचा ओघ त्यांच्या मालकांपुरताच वाहतो..
२. आकाशाने भुरकट ढग धरून ठेवले आहेत..
समोर स्तब्ध पाण्याच्या पृष्ठभाग.. तलम पापुद्र्यासारखा.. थरथरतोय अधूनमधून.. बहुतेक वाऱ्याच्या झुळकीचा हलका स्पर्श होतोय तिथे..
झाडाला विचारलं की हे खरंय का? तर त्यानंही होकारार्थी फांदी डोलावली...
३. डोअर बेलच्या आवाजामुळे झोपमोड होण्याच्या दु:खाची, उड्डाणपुलाखाली झोपलेलो असताना कुणीतरी काठीनं ढोसून उठवल्यामुळे होणाऱ्या दु:खाबरोबर तुलना होऊ शकते का?
४. रिक्षा स्टँडवर जर रिक्षा उभ्या असतील तर त्यांच्या शेजारून जपून जावं... कधी आरेमडीची लिटरभर पिचकारी बाहेर येईल सांगता येत नाही..
५. घार आहे ती..! तुमच्या पारिजातकावर गप्पा छाटत थोडीच बसणार... मानवी गोंगाट नसलेली ठिकाणंच बरी वाटत असणार तिला बसण्यासाठी..
६. बॉस म्हणतो "तुम्ही शनिवारी रविवारी सुद्धा काम करताय हे खूप चांगलं आहे पण तुम्ही नंतर बदली सुट्टी मागितली नसती तर मला आणखी प्राऊड फील झालं असतं."
आम्ही म्हणतो, "आम्हाला प्राऊड फील करण्याबाबतचं तुमचं विवेचन वाया गेलं सर.. कारण आम्हाला तर बदली सुट्टया घेण्यातच प्रचंड प्राऊड फील होतं..!"
७. हिंदू असण्यात एक बरं आहे.. कुठल्याही प्रकारच्या धार्मिक कर्मकांडांचा, सनातनी पुजाऱ्यांचा किंवा कट्टर धर्मांधांचा जबरदस्ती करणारा गलिच्छ हात माझ्यापर्यंत सहजासहजी पोचत नाही..!
तसेच 'हे करच' किंवा 'अमुक केलं तर तुझं काही खरं नाही' अशा प्रकारच्या जबरदस्तीला ह्यामध्ये फारसा स्कोप नाही..
८. पिल्यावर आत दबलेली सगळी दुःखं, ठसठस बाहेर यायला लागते.. ती ऐकवत नाही... त्यामुळे न पिणाऱ्यांनी पिलेल्यांच्या बैठकीत फार वेळ बसू नये..
९. शब्दांचा द्वेष/ टवाळी करू नये.. ते शब्द शतकांचा प्रवास करत कुठून कुठून आले असतील इथपर्यंत.. कितीतरी लोकांनी स्वतःला व्यक्त करायला ते शब्द वापरले असतील..!
१०. मला आत्ता रिलॅक्स वाटत नाही, मला तुझ्याशी बोलल्यानंतर रिलॅक्स वाटेल..मला आत्ता रिलॅक्स वाटत नाही, मला शॉपिंग करून आल्यावर रिलॅक्स वाटेल.. मला आत्ता रिलॅक्स वाटत नाही, वायफायची रेंज आल्यावर मोबाईलच्या स्क्रीनवर सगळे नोटिफिकेशन्स बदाबदा कोसळल्यानंतर मला रिलॅक्स वाटेल..
मला आत्ता या क्षणी रिलॅक्स वाटत नाही, मला नंतर कधीतरी रिलॅक्स वाटणार आहे..!
११.सार्वजनिक टॉयलेटमध्ये गुप्तरोगावर किंवा मर्दाना कमजोरीवर वगैरे गॅरंटेड इलाज कुठं मिळेल यासंबंधी मार्गदर्शन म्हणा किंवा आशेचा किरण म्हणा गरजूंना दाखवलेला असतो.. अशा जाहिराती चिकटवणाऱ्या अदृश्य मनुष्याचा जॉब प्रोफाइल तुला आवडेल का? करिअर म्हणूनही विचार करून बघ.. कारण ह्या धंद्याला मरण नाही..
१२. तुमच्या डोक्याला इतर काही व्याप नाहीत... त्यामुळे हे असं एखादं चिल्लर कारण घेऊन त्यावर विचार करत बसायची चैन परवडते.. एकाच वेळी खूप सारे व्याप लावून घ्यायला पाहिजेत..
१३. "ऐक नाss आपण जाता जाता भाजी घेऊया का कोपऱ्यावरून ??"
'जाता जाता नको.. येता येता घेऊ..!'
१४. आमच्या दहावी-बारावीच्या वयात 'मास्ट्रुबेट करावे की नाही' हा एक महत्त्वाचा नैतिक प्रश्न असायचा... आता तसलं काही राहिलं नसेल ना..? बरंय..!
१५. वाजपेयींचं सरकार एका मताने पडलं तेव्हा मी आठवीत होतो. पुढचे काही दिवस मी एकटाच गुप्तपणे तणावाखाली होतो की सरकार 'पडलं' म्हणजे देशावर कायतरी मोठं संकट बिंकट आलं की काय..! मग नंतर हळूहळू कळत गेलं की ह्या बदमाश लोकांचे नेहमीच कुठेना कुठे तरी असले पाडापाडीचे धंदे चाललेले असतात आणि त्यात आपण बरं किंवा वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नसतं..!
१६. 'माझा मुलगा काही चुकीचं वागूच शकत नाही', अशा प्रकारचा ठाम आत्मविश्वास आयांकडे कुठून येतो, ह्यासंबंधी ताबडतोब एक सर्व्हे करायला पाहिजे..
१७. सायकीयाट्रिस्टला पैशे देऊन आपलं म्हणणं ऐकायला बसवावं... आपली दु:खं आळवून आळवून भरघोस बोअर करावं त्याला.. मग तो अक्राळविक्राळ जांभया द्यायला लागला की आपण लाजून थांबावं.. मग जगाबद्दल चांगलं वाटायला लावणाऱ्या गोळ्या देईल तो...!
१८.यादी करता येईल. काहीच अडचण नाही. पण प्रॉब्लेम असा आहे की त्या भन्नाट पुस्तकांच्या प्रभावाखाली एखादा आलाच तर त्याचं आयुष्यात काही भलं होण्याऐवजी, तो उलटा 'डाव घोषित करून' हरी हरी करत बसणंच योग्य आहे, अशा मूडपर्यंत पोहचला तर चांगल्या अर्थाने बरबादच व्हायचा..!
प्रतिक्रिया
15 Aug 2021 - 10:36 pm | गॉडजिला
हा हा हा...
15 Aug 2021 - 11:03 pm | पाषाणभेद
कुत्रे, पाळीव कुत्रे व त्यांचे मालक डोक्यात जातात.. त्यामुळे मुदा १ शेवटी घातला असता तर लेख माचला असता.
(आता खालून वर वाचत जावे लागेल.)
अन सटरफटर का लिहीले आहे?
हे काय रिमायंडर नोट्स आहे का? तुमच्यासाठी असेल तत खाजगीत लिहा.
15 Aug 2021 - 11:06 pm | पाषाणभेद
हे संस्थळ काही कचरा कुंडी नाही की काहीही टाकावे.
काल पण एकाने अर्धवट धागा टाकला होता.
साहित्य असेल तर पूर्ण लिहा.
ॲडमिन, मॉडरेटर, नोट अबव्ह पॉईंट ॲन्ड एडीट थीस थ्रेड.
16 Aug 2021 - 12:29 am | पाटिल
साहित्य वगैरेबद्दलच्या आपल्या ज्या कल्पना आहेत, त्याच्या कक्षेत सदर लिखाण बसत नाही, हे लक्षात आल्यानंतर आपणास सात्विक संताप आलेला दिसतो आहे.. त्याचंही तसं काही नाही एवढं पण आपल्या संतापाचं व्होल्टेज एवढं जबरदस्त आहे की त्यामुळे आमच्या एरियात जोरजोरात वीजा कडाडण्यास सुरूवात झाली आहे..! रात्रीतून आभाळ कोसळू नये म्हणजे झालं..!
- (आपल्या आदेशवजा अपेक्षांचं ओझं खांद्यावर घ्यायला असमर्थ असणारा) पाचपाटील.
16 Aug 2021 - 1:51 am | सुरिया
चिल्ल पाषाणभेद मालक,
इतके नका हायपर होऊ. घरी चालत असेल. बाहेर नाही चालणार.
नाही आवडले लिखाण तर तसे सांगा. कचरा तसा प्रत्येकाचा सापेक्ष असतो. तुम्हालाही सहन केले तसे ह्यांनाही सहन करू. चांगले वाटल्यास कौतुक ही करू.
हाकाणाका?
16 Aug 2021 - 6:42 am | गॉडजिला
हलकेच घ्या..._/\_
16 Aug 2021 - 11:00 am | सामान्यनागरिक
जर तुम्ही रा गा ची भाषणं शेवट्पर्यंत ऐकु शकत असाल तर हे सुद्धा सहन करु शकाल.
कचरा दिसला तर वळसा घालुन जावं. उगीच तिथेच थांबुन तोंडाला रुमाल लावुन 'कोणी व का टाकला बरे ' असा विचार करीत बसुन नये.
15 Aug 2021 - 11:07 pm | सुखी
वपुर्झा ची आठवण आली
16 Aug 2021 - 4:53 am | चौकस२१२
कहि कळल , कहि डोक्यावरुन गेले कहि स्वतचे वेग्ले सन्धर्भ लावून अजुन जास्त भावले ... कहि असम्बध वाट्ले एकुन धग्याच्या शिर्शक प्रमाने तुतक तुतक विचार एकत्र मनचा स्वैर फेरफट्का अनि त्याचे शब्द्न्कन .. मह्नुन ठिक आहे अगदि कचरा नहि हे नक्किच
16 Aug 2021 - 6:47 am | सुरसंगम
पाषाण भेद,
तुमच्या हातात रिमोट आहे ना मग नका येऊ ना धाग्यावर.
आणि तुम्हाला काय वाटतं आत्ता पर्यंत तुम्ही जो तुटक तुटक सुमार मन की बात कवितांचा रतीब मिपावर घातलाय तो काय सर्वांना आवडला आहे.
पण अशी सुमार दर्जाची प्रतिक्रिया कोणी दिली आहे काय?
चला आता ऍडमिनला सांगून तो कचरा आधी हटवायला हवा. एक काम हाती लागलं.
बाकी पाटील साहेब लिहा तुम्ही खूप आवडलं.
खूप दिवसांनी व.पु.आठवले.
आम्हालाही असंच सुचतं पण टंकाळा म्हणून राहतं.
आने दो और भी. हम बैठे हय पढणे के लिये.
16 Aug 2021 - 11:12 am | राघव
चांगलंय पाटीलसाहेब. आवडलं.
छोट्या छोट्या वाक्यांत, थोडासा का होईना, विचार करायला लावायची ताकद आहे.
मुक्त असलेत तरीही छान आहेत. :-)
17 Aug 2021 - 12:57 pm | सिरुसेरि
छान . चाणक्य नीती आठवली .