आठवणीतील श्रावण - कहाणी

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
12 Aug 2021 - 12:37 am

आता सगळं खुप जुनं झालंय , अन आपण आपल्या विकतच्या व्यापात इतके व्यग्र झालो आहोत की सगळ्या आठवणी कशा , दाट ढगांच्या आड अजिंक्यतारा धुसर होत जावा , तशा धुसर अस्पष्ट होत चालल्यात . पण असाच कधीमधी , कधी चांगल्या निमित्ताने तर कधी वाईट निमित्ताने , निवांत वेळ मिळतो , पुन्हा एकदा आठवणींच्या पेन्सिव्ह मध्ये डोकावुन पहायला उसंत मिळते तेव्हा अगदी आपल्या मनात बसलेल्या आपल्याच निरागस बाळस्वरुपाला गुदगुल्या केल्या सारखं वाटतं !

नेहमी प्रमाणेच नेहमीचाच दिवस म्हणुन सकाळी उठल्यावर व्हॉट्सॅप्प चेक केलें अन सगळीकडे धडाधड मेसेज कोसळले "सोमवारच्या शुभेच्छा" "हर हर महादेव " "शंभो" वगैरे वगैरे. हे व्हॉट्सॅप्प आल्यापासुन ही ऑनलाईन भक्ती चांगलीच उत्कर्षाला लागली आहे , इरव्ही सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा पार्वतीने महादेवांना तरी दिल्या असाव्यात का ह्याबद्दल शंकाच आहे . पण ते असो . कधीही स्टेटस न टाकणार्‍या मित्रानेही शिवमंदिरात दर्शन घेताना फोटो टाकलेला पाहुन कुतुहल चाळवले . म्हणलं "कैसे हो दोस्त , आज एकदम काशी विश्वनाथ के दर्शन ?!" त्याचा रिप्लाय आला - " क्या सर जी , मजाक कर रहे हो क्या ? काशी विश्वनाथ के दर्शन , वो भी सावन के पहले सोमवार को ? नामुम्किन है , इतनी भीड होती है के आप सोच भी नही सकते ! येह तो मेरे घर के पास वाला शिवालय है !"
तेव्हा डोक्यात ट्युब पेटली - अरेच्च्या श्रावण सुरु झाला !

लहानपणी श्रावण म्हणजे सुख असायचं , निखळ सुख ! म्हणजे एक दिवस असा नसायचा की काही सण उत्सव नाही काही कार्यक्रम नाही ! रोज काही ना काही नवीन. तेव्हा आम्ही चिल्लीपिल्ली असल्याने नोकरी धंद्याचे पाश नसायचे . शाळाही नुकतीच सुरु झालेली असायाची अन घटक चाचणी की सहामाही परीक्षा कसलेच टेंशन नसायचे. मस्तपैकी सकाळी उठावं, उबदार पांघरुन अंगाभोवती लपेटुन अन खिडकीत बसुन चहा पीत अजिंक्यतार्‍याकडे पहात बसावं . रिमझिम उन्ह पावसाचा खेळ पहावा , हिरव्या गार कड्याकपार्‍यातुन वाहणारा झरा पहावा. अंगणात अक्षरशः पारिजातकाचा सडा पडलेला असावा . इतकी फुलं की नंतर नंतर तर कोणी ते वेचायचे कष्टही करायचं नाही. बस्स त्या फुलांच्या मंद सुगंधाने घर भरुन जायचं अन अगदी रुक्मिणीच्या घरी असल्यासारखं वाटायचं ! बस्स काहीही गडबड नाही. सर्व अगदी सुखनैव ! त्यात तो रविवार असल्याने कोणीच मागेही लागायचे नाही. मामाची मात्र गडबड असायची , मस्त सोवळं नेसुन , कुठे फुलांचे हार कर की कुठे पुजेच्या साहित्याची जमवाजमव कर . नुसती धांदल असायची. देवघरात पुजा उरकुन तो "कहाणी" म्हणायला बसायचा . पहिली गणपतीची कहाणी :

ऐका परमेश्वरा गणेशा, तुमची कहाणी.
निर्मळ मळे, उदकाचे तळें, बेलाचा वृक्ष, सुवर्णाचीं कमळें, विनायकाचीं देवळें रावळें. मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधीं घ्यावा? श्रावण्या चौथीं घ्यावा. माही चौथीं संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडांव. अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहांचं सहकुटुंबी भोजन करावं. अल्प दान, महापुण्य. असा गणराज मनीं ध्याइजे, मनीं पाविजे; चिंतिलं लाभिजे; मनकामना निर्विघ्र कार्यसिध्दि करिजे.
ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ सपूर्ण.

मामा काय वेगळ्याच सुरात म्हणायचा ! ऐकत रहावसं वाटायचं . तसं काही कळायचं नाही , आम्ही सात भावंडं आपल्याच तंद्रीत असायचो , त्यात नेमकं पशा पायलीचं म्हणल्यावर सगळे माझ्या कडे बघुन हसायचे , तेव्हा राग यायचा पण आता हसु येतं ते सारं आठवुन , छोट्या छोट्या गमजा . बाकी तेव्हा काहीच कळायचं नाही. नुसता आनंद मिळायचा. "अरे ही कहाणी कुठली , त्याला काय वैदिक पौराणिक संबंध काय ? त्यातुन कळणारे सनातन वैदिक मुल्य काय ? " असले काहीच प्रश्न पडायचे नाही.
समर्थ म्हणाले - "भोळी भक्ती भोळा भाव | कैचा पाविजे देवाधिदेव ??" म्हणुन आम्ही आपलं सुसाट वाचत, अभासत गेलो पण त्या नादात हा निरागसपणा हरवला ! हे म्हणजे सुंदर इंद्रधनुष्य दिसावं , भारी वाटावं अन हे नक्की कसं पडलयं म्हणुन पहायला जावं अन ढगाआड दडलेला सुर्य दिसावा अन क्षणार्धात डोळे दिपुन जावेत अन इंद्रधनुष्य हरवावं तसं काहीसं झालं ! सुर्य पाहिल्याचा आनंद आहेच पण इंद्रधनुष्यही दिसायला हवं राव ! -

"जाणोनि नेणते | करी माझे मन | तुझी प्रेम खुण | देवोनिया || मग मी असेन | व्यवहारी वर्तत | जैसे जळात | पद्मपत्र ||"

बाकी गणपती नंतर सुर्यनारायणाची कहाणी / आदित्यराणुबाईची प्रदीर्घ कहाणी ! अगदी सगळं कसं साग्रसंगीत . विड्याच्या पानावर रक्तचंदनाने रेखलेला सुर्य ! सहा रेघांचं मंडळ सहा सुतांचा तांतु , त्याला सहा गाठी , साधासा गुळखोबर्‍याचा नैवेद्य ! प्रत्येकाच्या हातात तांदुळाचे ३ च दाणे , मन केवळ त्यावर एकाग्र ! कित्ती सोप्पा विचार होता हा मनाला एके ठिकाणी गुंतवुन ठेवण्याचा ! त्या तल्लीन अवस्थेत ऐकलेली वाक्य अगदी आजही आठवत रहातात -

" बाबा बाबा गुळ खा पाणी प्या , गूळ खात नाही पाणी पीत नाही , माझी कहाणी करायची आहे ती तु ऐक "
" अगं अगं दासींनो तुम्ही दासी कोणाच्या , आम्ही दासी प्रधानाच्या "
" काय रे बाबा मावशीने काद दिलं , दैवे दिलं कर्माने नेलं , कर्माचं फळ पुढे उभे राहिलं "
"करारे हाकारे पिटारे डांगोरा , नगरात कोणी उपाशी आहे का ह्याचा शोध करा "

मामा काय सुरेख आवाजात म्हणायचा ! संपुच नये असे वाटायचं !

" ब्राह्मणाला , मोळीविक्याला , राजाच्या राणीला , माळ्याला , म्हातारीला, कानाचा डोळा मासाचा गोळा इतक्यांना सुर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हां होवो | ही साठा उत्तराची कहाणी पाचां उत्तरी सफळ संपुर्ण ! "

आताही मामा तेवढ्याच भक्ती भावाने उठतो , तेवढ्याच श्रध्देने कहाणी म्हणतो, आता मात्र दंगा करायला चिल्ली पिल्ली गावी नसतात, सगळ्यांना पंख फुटले . कोणी मुंबईत, कोणी बंगळुरात, कोणी बडोद्यात, कोणी पुण्यात, . सगळे शिस्तीत आपापले पंख कापुन सोन्याचा पिंजर्‍यात सुखनैव कोडींग करत बसलेत. नातवंडांना तर कल्पनाच नाही , त्यांना डोरेमॉन पोकेमॉन पिकाच्यु माहीतीये . त्यांना आदित्य राणुबाई काय माहीती असणार?

मामा मात्र अजुनही गावी . घेतलेला वसा टाकायचं त्यांना पिढीला कधी जमलंच नाही . बाकी ढगांआड आदित्यराणुबाई निष्कामपणे त्याची परिक्रमा चालुच आहे. पारिजात कधीच तुटुन गेलाय आता त्याच्या जागी गाड्या उभा आहेत भर पावसात गंजत . अजिंक्यतारा आधी ढगांआड जायचा धुक्याआड जायचा , आता तो सिमेंटच्या बिल्डींगच्या आड गेला .

आणि श्रावण ? ,

श्रावणही तसाच आठवणींच्या पडद्याआड . पण कधीतरी एखादी वार्‍याची झुळक येते अन दाट धुकं अकस्मात हटतं अन त्या आडुन सोनेरी उन्हात चमकणारा हिरवागर्द अजिंक्यतारा मनाला सुखावुन जातो !

श्रावणाचंही तसंच काही !!

_________________________________________________________________
संदर्भ :

१) हिंदू सण,वार आणि देवांच्या कहाण्या
२) संपुर्ण चातुर्मास पुस्तक
३) अजिंक्यतारा

इतिहासअनुभव

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

12 Aug 2021 - 2:27 am | सौन्दर्य

अतिशय छान, तरल, हृदयाला भिडणारं लिहिलंत साहेब तुम्ही. आमची आजी देखील कहाण्या सांगायची, श्रावणातल्या प्रत्येक दिवशी काही तरी वेगळं खायला मिळायचं. भाताची खीर, दिंडं, मोदक, पुरणपोळी, दाम, वगैरे श्रावणातच मिळायचे. कहाण्यांचा जो सहज सुंदर साचा असायचा तो ऐकताना छान वाटायचे.

खरं आहे, शहराने आपल्यातील कितीतरी गोष्टी संपवूनच टाकल्या. उरल्या त्या फक्त आठवणी.

गॉडजिला's picture

12 Aug 2021 - 3:24 am | गॉडजिला

ऐका फलाना फलाना तुमची कहाणी. आटपाट नगर होतं तिथं....

नुसते शब्द कानी पडताच मन वेगळ्याच जगात रमून जायचं... आयुष्य किती सोपं सरळ असतं, फक्त आपलं वर्तन चांगले हवे आणि देवावर विश्वास हा भाव मनात कहाणी ऐकता आपसूक तयार व्हायचा..

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Aug 2021 - 8:56 am | ज्ञानोबाचे पैजार

आमच्या कडे जिवतीच्या फोटोची खरेदी झाली की श्रावणाची चाहूल लागते.

जिवत्या, नागोबा नरसोबा, बुध आणि बृहस्पती, यांच्या साठी मग आघाडा दुर्वा, फुले यांची रोज खरेदी होते.

नागोबाच्या कहाणील्या भावांची नावे लांडोबा-पुंडोबा असे आजी म्हणाली की आम्ही हसायला लागायचो. मग आजी उगाच आवाज वाढवून पुढची कहाणी वाचायला लागायची. मग दिंडे खायचा कार्यक्रम असायचा.

खुलभर दुधाची कहाणी तर इतकी रंगुन जायची की बस.. शेवटी गाभारा भरला की आम्ही सगळे जण टाळ्या वाजवायचो.

दर शुक्रवारी पुरणाचा नेवैद्य, नारळी पौर्णिमेला नारळी भात, शुक्रवारचे फुटाणे, दर सोमवारी साबुदाणा खिचडी, खजुर लाडू, अशी श्रावण स्पेशल खादाडी सुरु असायची.

संपूर्ण चातुर्मास हे माझे अत्यंत आवडते पुस्तक.

कोणतेही पान उघडून वाचायला सुरुवात केली तरी मस्त वेळ जातो, मग ते कोणते स्तोत्र किंवा श्लोक असो, आरती असो किंवा कहाणी.

यातल्या जवळजवळ सगळ्या कहाण्या पाठ झाल्या आहेत.

पैजारबुवा,

प्रसाद गोडबोले's picture

14 Aug 2021 - 11:44 am | प्रसाद गोडबोले

खुलभर दुधाची कहाणी ही माझीही आवडती कहाणी आहे , कित्ती सोप्प्या गोष्टीत सार सांगितलं आहे ! आधी माणसांना , सर्व जीवभुतांना तृप्त करा , देव आपोआप प्रसन्न होईलच ! माझ्या ओळखीचे एक ब्राह्मण आहेत सातार्‍यात . त्यांच्या कडे अशी अवाढव्य गीर गाय होती . ते म्हणालेले आम्ही वासराला आधी मनसोक्त दुध पिऊ देतो नंतर उअरले ते आपले. आधी त्याची आई आहे मग आपली ! आठ दहा लिटर दुध देणार गाय , आपल्याला काय करायचंय येवढं आपल्याला एक दोन लिटर पुष्कळ झालं ! ते ऐकुन माझ्या डोळ्यात पाणी आलेलं . ही अशी मोजकी लोकं आहेत जी आपली जुनी संस्कृती टिकवुन आहेत . म्हणजे ह्या कहाण्यांमध्ये वगैरे लिहिलेली . खुप छन वाटतं .
बाकी हे काय संपुर्ण चातुर्मास घेऊनच बसलो आहे शेजारी ! ह्या पुस्तकात दर वेळी काहीना काही नवीन भारी सापडतंच .

बाकी श्रावण उत्तम चालु आहे , काल नागपंचमी झाली ! सगळी मजा आहे !

गॉडजिला's picture

14 Aug 2021 - 12:16 pm | गॉडजिला

ही अशी मोजकी लोकं आहेत जी आपली जुनी संस्कृती टिकवुन आहेत . म्हणजे ह्या कहाण्यांमध्ये वगैरे लिहिलेली . खुप छन वाटतं .

ही दुर्लभताच गोडी द्विगुणित करते... सगळेच असे वागले तर...

हो माऊली अगदी मनातलं लिहलंय..ह्या कहाणींनी अख्खा श्रावण रंगमंच वाटायचा.
१.शुक्रवारच्या कहाणीचे नाटक आमच्या शाळेत दरवर्षी न चुकता व्हायचं..
"दादा हा मान माझा नाही,हा मान या दागिन्यांचा,त्यांना तू आमंत्रण दिलंय" असं म्हणून बहिण पाटावर मांडलेल्या दागिन्यांना घास भरवते..
२.खुलभर दुधाच्या गोष्टीने कधीच पिंडीवर दूध ओतावे नाही वाटल.
३.रविवारी आई सकाळी सकाळी का मौन पाळते म्हणून प्रश्न पडायचा.
४.नागपंचमीच्या कहाणीने नाग कसा बोलतो हे आश्चर्य वाटायचे...
गेले ते दिवस...

कंजूस's picture

12 Aug 2021 - 12:14 pm | कंजूस

घरात चातुर्मासाचे पुस्तक होते. त्यातल्या कहाण्या गोष्टी म्हणून वाचून काढल्या होत्या. व्रतं मात्र करत नव्हतो. मजा वाटायची.

सौन्दर्य's picture

12 Aug 2021 - 10:41 pm | सौन्दर्य

दिव्यांच्या अमावास्येच्या कहाणीत "उंदरांनी तिची चोळी पाहुण्यांच्या खोलीत टाकून दिली, सकाळी राजाने ती पाहिली व तिला महालातून हाकलून दिले' असं एक वाक्य होते. लहानपणी ती कथा ऐकताना 'चोळी जर पाहुण्यांच्या खोलीत दिसली तर त्यात राणीला हाकलून देण्यासारखे काय घडले ?' असा प्रश्न मनात येई. एकदा आजीला विचारले तर तिने उत्तर न देता फक्त डोळे वटारले. मोठा झाल्यावर कोणीही सांगितल्याशिवाय त्याचे उत्तर माहीत झाले.

खुलाभर दुधाची गोष्ट माझ्या देखील आवडीची आहे. देवाला मनोभावे जे अर्पण कराल त्याने देव प्रसन्न होतो हेच त्या कहाणीने मनावर बिंबवले.

बाय द वे - कहाण्या कोणी लिहिल्या ? त्यांचा उगम कधी झाला ? त्यामागचे उद्दिष्ट काय होते ? हे कोणी सांगू शकले काय ?

सस्नेह's picture

13 Aug 2021 - 9:24 pm | सस्नेह

श्रावणाच्या हिरव्याकंच आठवणींमध्ये माझ्या ही एक ठळक आहे. घरापासून फर्लांगभर अंतरावर एक खाजगी बाग होती. श्रावणात ती रंगीबेरंगी गुलाबाच्या फुलांनी गच्च भरुन जायची. आणि खाली मऊशार हिरवळीचा गालिचा. त्यावर मनसोक्त लोळून झाल्यावर गवतातले लालबुंद मखमलीचे किडे शोधून काडेपेटीत ठेवायचो.
ती मालकीण दहा पैशाला एक गुलाबाचे फूल देत असे. साठवलेल्या खाऊच्या पैशात येतील तितकी फुले घेऊन दर सोमवारी श्रावण साजरा होई.
बाकी लेख लहानपणात घेऊन गेला प्रसादभाऊ.

मदनबाण's picture

13 Aug 2021 - 10:46 pm | मदनबाण

आम्ही त्या बॅच चे आहोत, जेव्हा दर सोमवारी शाळा अर्धा वेळच भरायची ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - The Champs "Tequila"

सौन्दर्य's picture

13 Aug 2021 - 11:29 pm | सौन्दर्य

मी बी त्याच बॅचचा, सकाळी सात ते अकरा अशी वेळ श्रावणातल्या सोमवारची असायची. शाळेतून घरी परतताना हमखास एक हलकीशी सर येऊन भिजवून जायची, पण घरीच जायचे असल्याने त्या भिजलेल्या कपड्यांची चिंता वाटायची नाही. पुस्तके प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये गुंडाळलेली असल्यामुळे ती सुकीच राहायची.

सुर्य पाहिल्याचा आनंद आहेच पण इंद्रधनुष्यही दिसायला हवं राव !

आहाहा…क्या बात है! अगदी मनाला भिडणारं लेखन बालपणात घेऊन गेलं आणि चातुर्मासाच्या पुस्तकाच्या आठवणीने मन भरून आलं.

- (चातुर्मासातल्या कहाण्या आवडणारा) सोकाजी

प्रचेतस's picture

14 Aug 2021 - 7:16 am | प्रचेतस

सुरेख लिहिलंत प्रगोसर,
श्रावण म्हटला की बालकवींची श्रावणमासी हीच कविता डोळ्यांसमोर येते.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे;
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे.

त्या कहाण्या मात्र पहिल्यापासून सुमारच वाटत आल्यात मात्र, अर्थात लहानपणीसुद्धा वाचनाची आवड असल्याने चातुर्मासाच्या पुस्तकातल्या सगळ्या कहाण्या असंख्य वेळा वाचून काढल्या होत्या. त्यात ती साधुवाण्याची कहाणी पैल्या नंबरावर असायची.

अवांतर: तुम्ही श्रावणी शनिवार, सोमवारचा उपास करता का हो ? ;)

प्रसाद गोडबोले's picture

14 Aug 2021 - 11:50 am | प्रसाद गोडबोले

धन्यवाद वल्ली सर !

आपण लिहिलेले लोकांना , मित्रांना भावते , आपल्या अनुभवांशी ते देखील रिलेट करु शकतात हे पाहुन खुप सुखावलो ! अजुन खुप आठवणी आहेत श्रावणाच्या ! बघु जमेल तसे लिहित जावे असा विचार आहे, तुर्तास खूप मोकळा वेळ आहेच हाताशी ;)

अवांतर: तुम्ही श्रावणी शनिवार, सोमवारचा उपास करता का हो ? ;)

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ . आम्ही कोणताच उपास उपास म्हणुन करत नाही , केवळ शाबुदाण्याची खिचडी / थालपीठं / वरीचे तांदुळ अन शेंगदाण्याची आमटी खायला मिळते म्हणुन आमचे उपवास ! ही सुध्दा भारतात आलोय म्हणुन चैन चालु आहे , मागे मी हमेरिकेत होतो तेव्हा तेव्हा तर ताळतंत्रच सोडून दिलेले होते ;)
=))

छान लिहिलंय. ना कधी कहाण्या वाचल्या ना कधी ऐकल्या.

विवेकपटाईत's picture

14 Aug 2021 - 4:03 pm | विवेकपटाईत

गोष्टी आवडल्या.