माझं बेबी सीटिंग ........

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in जनातलं, मनातलं
26 Jul 2021 - 11:46 pm

त्याचं असं झालं की आमच्या सुनबाईंनी आम्हा दोघांना बेबी सीटिंगसाठी बोलावले. आमचा नातू, नायल चार महिन्याचा झाला होता व चेहरे, आवाज बऱ्यापैकी ओळखू शकत होता. तसेच बाटलीने दूध देखील प्यायला शिकला होता त्यामुळे आठ तासांसाठी त्याला सांभाळणे फारसे अवघड जाणार नव्हते. आणि तसेही आम्ही आमच्या मुलाला वाढवले होतेच त्यामुळे बेबी सीटिंगचा फर्स्टहँड अनुभव देखील गाठीशी होता.

तरी देखील नातवाला तो जागा असताना कशा न कशात गुंतवून ठेवणे गरजेचे होते नाहीतर रडारड व्हायची शक्यताच जास्त होती. गोष्टी सांगणे, गाणी म्हणणे, माकडासारखे हावभाव करणे ही शस्त्रे हाताशी होतीच पण म्हंटलं चला नातवाचा हा पहिलाच बेबी सिटिंगचा अनुभव देखील समृद्ध करू. मग सुनबाईला विचारले की ‘नायलला काय आवडते ?’ सुनबाई म्हणाल्या “त्याला नाच बघायला आवडतो व तो देखील क्लासिकल.” मग मी विचार करू लागलो, कोणता नाच त्याला दाखवूया ? कथ्थक, भारत नाट्यम, मोहिनी अट्टम, कुचिपुडी, मणिपुरी वगैरे आता ह्या वयात त्याला झेपणार नाहीत व ते प्रामुख्याने स्त्रियांचे नृत्य प्रकार आहेत. मी जर ते करून त्याला दाखवले तर ‘आजोबा कोण व आजी कोण’ हा बेसिक प्रश्न त्याच्या कोवळ्या मनावर आघात करेल म्हणून तो नाद सोडून दिला व लोकनृत्याकडे वळलो. त्याचा थोडा स्टडी केल्यावर कळले की लोकनृत्य त्यातल्या त्यात सोपे, मनोरंजक आहे तसेच त्याला फारशी शास्त्रीय बैठक नसल्यामुळे, आपण तो नाच नायल समोर सहज खपवू. मग थोडा अभ्यास कोळी नृत्य, बाल्या नृत्य, शिमगा नृत्य अश्या पारंपारिक नृत्यांचा करून पाहिला, पण त्यात काही मन रमले नाही. मग आपल्या समृद्ध परंपरेपासुन दूर इतर समृद्ध परंपरा शोधायला सुरवात केली. भरपूर शोधाशोध केल्यावर आफ्रिकन झाओली नृत्य प्रकार दृष्टीस पडला. त्यात अंगभर पिसे, तोंडावर मुखवटे व डोकीस बैलाची शिंगे किंवा मोराची पिसे लावतात. मनुष्य प्राण्याची उत्क्रांती आफ्रिकेपासून झाली त्यामुळे आमच्या नायलला आफ्रिकन नृत्य प्रकार आवडेल ह्यात शंकाच नव्हती. मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे त्यामुळे त्याची चार पिसे उपटून डोकीस बांधली तर आपली भारतीय संस्कृती पण जपल्यासारखी होईल, आणि बैल तर घरोघरी असतातच. अश्या द्वि-विचाराने शेवटी झाओली नृत्यच करून नातवाला हसते-खेळते ठेवायचा विचार मी मनात पक्का केला. आफ्रिकन आणि सिंधू संस्कृतीचे हे फ्युजन त्याला नक्की आवडेल ह्यात काही शंकाच नव्हती.

हा नृत्य प्रकार तसा बघायला गेला तर अगदी सोप्पा आहे. ह्यात फक्त पाय सतत हलत ठेवावे लागतात, मधून मधून भयानक आरोळ्या माराव्या लागतात व नृत्य बघणाऱ्याच्या अंगावर हातातला भाला उगारून धावून जावे लागते, बाकी काही नाही. युट्यूबवरच्या व्हिडियोत ती आफ्रिकन मुले आनंदाने सतत खिदळताना दिसत होती त्यामुळे नायल देखील हसेल ह्यात शंकाच नव्हती.

पत्नीला ही ग्रेट आयडिया सांगायला गेलो तर दोन मिनिटं ती स्तब्धच झाली, मग म्हणाली “डोकं ठिकाणावर आहे ना ? अरे तो घाबरेल तुझे हे चाळे बघून”
“काही नाही घाबरत, तो सोहोनी कुलदीपक आहे, माझा झाओली नाच बघून त्याला खूप मजा येईल”
“हे बघ पुन्हा सांगते, असले आचरट चाळे करणे हे तुमच्या सोहोनी कुटुंबाच्या अकलेचे प्रदर्शन असले तरी तू ते न करावेस असा माझा तुला सल्ला आहे. ऐक किंवा नको ऐकूस, पण एक सांगून ठेवते उद्या काही विपरीत घडले व सूनबाईने उग्रवातार धारण केला तर त्याला मी जबाबदार नाही. तू व तुझा झावळी नाच”
“अगं झावळी नाही काही, झा-ओ-ली, कळलं का ?”
“हो, हो, कळलं, पण मी ह्यात नाही हे आधीच सांगून ठेवते.”
“नवऱ्याने काहीही जगावेगळं करायला घेतलं की पाय कसे खेचायचे, हे तुम्हा बायकांकडूनच शिकले पाहिजे. नशीब त्या सिंदाबाद, कोलंबस, वास्को-डी-गामा वगैरेंनी त्यांच्या बायकांना भीक नाही घातली. जर कोलंबस घरातच बसून राहिला असता तर अमेरिकेचा शोधच कसा लागला असता आणि मग कसे आलो असतो आपण अमेरिकेत ?
“हे बघा, मोठी मोठी नावं घेऊन मला इम्प्रेस करू नका, नाचा, नाचा, जेव्हढं हवं तेव्हढं नाचा, मी कोण तुम्हाला अडवणारी ? नाचा”
पत्नी ‘अरे, तुरे’वरून एकदम ‘अहो, जाहो’वर आली की पुढच्या वळणावर धोका आहे हे मी माझ्या चाणाक्ष बुद्धीने ओळखतो व बोलणं थांबवून कृतीला लागतो.

लगेच ऍमेझॉनवर सांबर शिंगाची ऑर्डर द्यायला घेतली, तर कळले की तो रिस्ट्रिक्टेड आयटम आहे, पकडल्यास हातात काढण्या पडतात. मग इतर शिंगांचा शोध घेतला व रेड्याच्या शिंगांची ऑर्डर दिली. दोनच दिवसात शिंगे आली. रेड्याच्या डोक्याचे माप व माझ्या डोक्याचे माप एकच असल्याने ती एकदम फिट बसली व मी अर्धा झाओली नर्तक दिसू लागलो. पायाला बांधायचे पट्टे व रिंगा मिळवल्या, तोंडाला काळे फासायची, ओरिजिनल रंगामुळे गरज भासली नाही. शेवटी दोन केरसुण्या, काही निळ्या-जांभळ्या चिंध्या मिळविल्या व झालो एकदाचा तयार. माझे रूप आरशात बघून मीच एक-दोन वेळा दचकलो पण म्हंटलं होईल हळूहळू सवय.

झाओली नाचाचा व्हिडियो बघण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा - https://youtu.be/enlqib0GIlk

मग नाचायच्या प्रॅक्टिसला लागलो. कथ्थक नृत्यात जशी पायाचा ठेका धरण्यापासून सुरवात करतात तशी सुरवात केली. झाओलीमध्ये मिनिटाला २०० पेक्षा जास्त वेळा पाय वेगवेगळ्या कोनात थिरकत ठेवावे लागतात. त्याची हळूहळू इतकी सवय झाली की घरात, दारात, बाजारात मी झाओली स्टाइलनेच चालायला लागलो. तेव्हढंच कशाला अगदी झोपेत देखील पाय थिरकवू लागलो. दोन-चार वेळा घाबरून ही जागी झाली, “काय अंगात आलंय का फेफरं भरलंय ?” असं देखील विचारून झालं व शेवटी आमची रवानगी अडगळीच्या खोलीत एका सतरंजीवर झाली. आम्ही सोहोनी कुलदीपक फारच फोकस्ड असतो. एकदा एखादं कार्य हातात घेतलं की अंगात संचारल्याप्रमाणे आम्ही स्वतःला त्यात झोकून देतो. त्यामुळे असल्या विघ्नांना काडीची किंमत न देता अडगळीच्या खोलीत झोपू लागलो. एक-दोन वेळा झाओली वेषात दार उघडले तर दारात आलेल्या हिच्या बहिणी किंचाळून मागच्या मागे पळाल्या. सासूबाई तश्या खमक्या असल्यामुळे मला पाहताच हातातल्या वॉकिंग स्टिकने त्या पायावरच मारू लागल्या, झाओलीत पायालाच अनन्य साधारण महत्त्व असल्यामुळे, “अहो मी संजू आहे, तुमचा जावई” असं म्हणून त्यांचे पाय धरल्यावरच माझे पाय वाचले. पण तेव्हापासून सासूबाईंसमोर हा झाओली जातच नाही. आमच्या झाओली भाषेत अनेक म्हणी आहेत, त्यातल्या समर्पक म्हणी म्हणजे, “पाय सलामत तो झाओली पचास”, “झाओलीचे पाय पाळण्यातच दिसतात’ वगैरे. बघितलत मी किती झाओलीमय झालो ते की मी स्वतःला झाओलीच समजू लागलोय. पण ते असो.

बघता बघता बेबी सीटिंगचा दिवस उजाडला. पत्नी म्हणाली तुम्ही एकटेच पुढे व्हा मी मागून दुसऱ्या गाडीने येते. पण डोक्यावरच्या रेड्याच्या शिंगांमुळे मला गाडी चालवायला त्रास होऊ लागला. शेवटी मी तिच्या गाडीत मागच्या सीटवर बसेन असे कबुल करून आम्ही निघालो. वाटेत सिग्नलवर बाजूच्या गाडीचे चालक माझ्या अवताराकडे बघून दचकायचे व झर्रकन पुढे निघून जायचे. शेवटी एका पोलिसाने आम्हाला थांबवलेच व पिस्तूल रोखून गाडीतून उतरायला सांगितले. प्रसंगावधान राखून पत्नीने “वुई आर गोइंग टू अ फेन्सी ड्रेस कॉम्पिटिशन” असे सांगतिले तेव्हा कुठे त्याने मला सोडले, तरी अधूनमधून संशयाने बघत होताच.

शेवटी एकदाचे सुनबाईच्या घरी पोहोचलो. सुनबाई वाट बघत होतीच. पण मी तिला सरप्राईज देणार असल्यामुळे झाओली विषयी आधी सांगितलेच नव्हते, म्हणून हिला पुढे करून मी मागे उभा राहिलो. ही आत गेल्यावर “सासूबाई, सासूबाई, तुमच्या मागे कोणीतरी राक्षस आलाय” म्हणत सुनबाई किंचाळत आत पळाली. मी शिंगं सावरत कसबसा आत शिरलो तर सुनबाई, ९११ डायल करीत होती. सिचुएशन हाताबाहेर जाऊ बघत होती म्हणून मी शिंग काढली व मी तिचा सासरा आहे हे तिला पटवू लागलो. त्यावर ती थरथर कापू लागली. मी नायल कुठे आहे म्हणून विचारले तर “मी तुमच्या पाया पडते, हवं तर पदर पसरते पण नायल समोर असे जाऊ नका” म्हणून विनवणी करायला लागली. पत्नी हा सगळा तमाशा मख्खपणे पाहत उभी होती. तिला सुनेच्या हातूनच सासऱ्याचा विंचू मारायचा होता असे दिसले. पण आम्ही सोहोनी कुलोत्पन्न अश्या छोट्या-मोठ्या अडथळ्यांना जुमानत नाही.

मी सरळ नायलच्या पाळण्याजवळ गेलो व त्याला उचलून घेतले. क्षण दोन क्षण तो माझ्याकडे टकामका बघायला लागला. सुनबाई व पत्नीने पण श्वास रोखून धरला व नायल आता किती जोराने भोकांड पसरणार हे बघू लागल्या. आणि काय आश्चर्य, नायल माझा तो अवतार बघून खुदुखुदू हसू लागला, हवेत पाय झाडू लागला. मग मी त्याला त्याच्या बेबी सीटरमध्ये ठेवले व झाओली नाच सुरु केला. पाचच मिनिटात धाप लागली म्हणून थांबलो आणि नायलने जोरात भोकांड पसरले. मग पुन्हा नाचू लागल्यावर तो खुदुखुदू हसू लागला. और यह सिलसिला दिनभर चलता रहा. रात्रीपर्यंत पाय केळीच्या खांबासारखे सुजले. पुढचे तीन दिवस पाय हवेत टांगून झोपावे लागले.

बेबी सिटिंगच्या ह्या दैदिप्यमान यशानंतर सर्व परिचितांकडून झावली नाचाच्या सुपाऱ्या येऊ लागल्या, पण नायलने ह्या नाचाचे पेटंट्स घेतले आहेत असे सांगून सर्व सुपाऱ्या परतवल्या.

आता मी बेबी सिटिंगची स्ट्रॅटेजी बदलली आहे. नायल समोर मी कुंभकर्ण बनतो, घोरण्याचे विविध आवाज काढतो व तो खुदुखुदू हसू लागतो. थोड्याच वेळात माझा खराखुरा कुंभकर्ण होतो, नायल खुदुखुदू हसत राहतो मी मात्र कधीचाच झोपी गेलेला असतो.

कथालेख

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

27 Jul 2021 - 12:11 am | श्रीरंग_जोशी

रोचक अनुभव आहे हो.
नायल भाग्यवान आहे असे आजोबा मिळायला :-).

लेखनशैली नेहमीप्रमाणेच खुसखुशीत.
बेबीसिटिंगच्या पुढच्या किश्शांची प्रतिक्षा करतो.

कंजूस's picture

27 Jul 2021 - 8:32 am | कंजूस

आता आठ बारा महिन्याचा नाच कोणता?

सुखी's picture

27 Jul 2021 - 8:53 am | सुखी

फोटो पायजे एक तर...

छान उद्योग आहे :D

Bhakti's picture

27 Jul 2021 - 9:18 am | Bhakti

किती गोड!
:)

गॉडजिला's picture

27 Jul 2021 - 1:21 pm | गॉडजिला
चौथा कोनाडा's picture

27 Jul 2021 - 8:47 pm | चौथा कोनाडा

लै भारी
😂

एकदा मिपा ऑनलाईन कट्ट्यावर तुमचा झाओली डान्स करून दाखवा !
🏃

श्रीगुरुजी's picture

27 Jul 2021 - 10:50 pm | श्रीगुरुजी

मस्त लिहिलंय.

सुक्या's picture

27 Jul 2021 - 11:55 pm | सुक्या

“त्याला नाच बघायला आवडतो व तो देखील क्लासिकल.”
चार महिन्याच्या मुलाला इतकी आवड आहे हे वाचल्यावर पुढे नक्कीच काहीतरी मिश्किल वाचायला मिळणार आहे हे ताडले होते :-)
झकास .. तुनळी वर व्हीडो टाका ...

कासव's picture

28 Jul 2021 - 12:23 am | कासव
कासव's picture

28 Jul 2021 - 12:23 am | कासव
कासव's picture

28 Jul 2021 - 12:23 am | कासव
कासव's picture

28 Jul 2021 - 12:26 am | कासव

तुमच्या तूनळी च्या दुव्यात एअरटेल ची जाहिरात बघून भारती(य) कंपनी ची प्रगती पाहून अभिमान वाटला. तिकडे तरी सेवा चांगली असेल अशी आशा करूया

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

28 Jul 2021 - 2:20 pm | ॲबसेंट माइंडेड ...

गमतीदार लेखन आवडले.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार. सर्व प्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. मला एक नातू आहे, ज्याचे नाव नायल आहे हे सोडून इतर सर्व तपशील काल्पनिक आहे. मी व पत्नीने त्याचे बेबी सिटिंग केले ते पूर्णपणे आपल्या नेहेमीच्या पारंपारिक पद्धतीने.

मात्र बेबी सिटिंग करताना यु ट्यूबवर हा झाओली नाच पाहिला, विचारचक्र सुरु झाले व त्यावर आधारित हा लेख लिहिला. कोणाची फसगत झाली असल्यास क्षमस्व.

श्रीरंग जोशी, कंजूस, सुखी, भक्ती, श्रीगुरुजी, चौथा कोनाडा, अबसेन्ट माईंडेड, तुम्ही सर्वानी लेख आवडल्याचे कळविल्याबद्दल धन्यवाद.
गॉडजीला, मांजरांचा झाओली डान्स बघून हसूच आले.
सुक्या, तुमच्या अंदाजाबद्दल तुमचे कौतुक.
कासव, युट्युबच्या लिंकमध्ये कित्येक वेळा वेगवेगळ्या जाहिराती असतात, त्यामुळे एअरटेलची जाहिरात मी मुद्दाम लावली नव्हती, ती बाय डिफॉल्ट दिसत असावी.

पुन्हा एकदा सर्वांचे मन:पूर्वक आभार.

मात्र बेबी सिटिंग करताना यु ट्यूबवर हा झाओली नाच पाहिला, विचारचक्र सुरु झाले व त्यावर आधारित हा लेख लिहिला. कोणाची फसगत झाली असल्यास क्षमस्व.
अजिबात नाही,उलट असं खुसखुशीत वाचताना आनंदच वाटला,वाढला आणि नकळत माझ्या मुलीचे वेगळ्या पद्धतीने बेबी सिटींग करणार्‍या वडिलांचा आदर आणखी वाढला.आजी आजोबा म्हणजे ब्लेसिंग :) येऊ द्या अजून.

चौथा कोनाडा's picture

29 Jul 2021 - 12:16 pm | चौथा कोनाडा

भक्ति +१

फसगत काय उलट मजा आली !
स्वयंखिल्ली उडवणारा हा (फॅण्टसी) लेख सुखद झुळुक होता.

सौन्दर्य, येऊ द्या अजुन असे लेखन !

सुमो's picture

29 Jul 2021 - 10:55 am | सुमो

आवडलं खूप. लिहिते रहा.

गॉडजिला's picture

29 Jul 2021 - 12:08 pm | गॉडजिला

जो पर्यंत मी झाओली चा व्हिडिओ पाहिला न्हवता... तो पहिल्या पहिल्या जाणवले हा नाच सलग पाच मिनिटे करणे म्हणजे डोक्यावरून पाणी...

पण एकूण लेखाची भट्टी इतकी सुरेख जमली होती की हे सत्य आहे की कल्पनारंजन याची उकल करायला मन रमेना....

टर्मीनेटर's picture

29 Jul 2021 - 4:35 pm | टर्मीनेटर

मस्त खुमासदार लेख! सगळेच काल्पनिक असावे असे वाटले होते, पण प्रत्यक्षात तुमच्या नातवाचे नाव 'नायल' (यापूर्वी कधीही ऐकले/वाचलेले नसल्याने थोडे विचित्र वाटलेले) असल्याचे प्रतिसादात वाचून त्या नावाचा अर्थ जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण झाली आहे.

सौन्दर्य's picture

31 Jul 2021 - 10:12 pm | सौन्दर्य

आयरिश भाषेत नायल म्हणजे चॅम्पियन.

सौन्दर्य's picture

31 Jul 2021 - 10:39 pm | सौन्दर्य

भक्ती - नातवंडं म्हणजे दुधावरची साय असते, अत्यंत लोभस, हवीहवीशी वाटणारी. त्यांच्या सान्निध्यात सर्व स्ट्रेस निघून जातो.
चौथा कोनाडा, सुमो, गॉडजीला, टर्मिनेटर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. चांगले प्रतिसाद हे लेखकाला उत्साहित करतात तसेच परखड प्रतिसाद आपले लेखन सुधारण्यास मदत करतात त्यामुळे दोन्ही प्रकारचे प्रतिसाद हे नेहेमीच स्वागतार्ह आहेत.

आजोबांनी मायकल जॅक्सनला देखील धोबी पछाड़ दिला असता हा दावा त्यांची कलासक्ती पाहुन, आय मीन वाचुन मी करु शकतो ! :)
आजोबांच प्रेम असचं नातावाला अखंड मिळत राहो, ही प्रभु [ देवा ] चरणी प्रार्थना करतो. :)

जाता जाता :- काही काळा पूर्वी मी फार भक्तीमय आणि आध्यात्मिक अनुभुती देणार असं ऐका आजीनी गायलेल गाणं ऐकलं होत... समाधी लागली की त्यातुन बाहेर आलो हे मला नक्की त्या वेळीही कळलं नव्हत ना आज. तुमची नृत्य शिकण्याच्या जिद्दी बरोबर अशी गायन कला देखील आपण साध्य करावी. :)
https://www.youtube.com/watch?v=egzufQ1ZDCk

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Kathalikkum Pennin Kaigal | RajheshVaidhya | Ramya Nambessan

श्रीरंग_जोशी's picture

2 Aug 2021 - 11:48 pm | श्रीरंग_जोशी

मदनबाण तुम्ही दिलेल्या दुव्यावरचं गाणं एकदम श्रवणीय आहे. भाषा सोडल्यास गोवन संगीत ऐकत आहोत असं वाटतं.

खरं तर मी सगळं विनोदी धाटणी ने लिहलं होत, पण काय म्हणतात ते... दिल से गाया हुए गीत दिल हो छु ही जाता है... :) आजीचे गाणे तसेच आहे, मधेच किंचीत भुवया वर करणं, अगदी छोटसं हसणं... अस बरच काही पाहण्या सारखं देखील आहे. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Din mahine sal gujarte jayenge... :- Avtaar

गॉडजिला's picture

3 Aug 2021 - 12:02 am | गॉडजिला

आजुन कोणी चोरले कसे नाही भारतात ;)

गॉडजिला's picture

3 Aug 2021 - 12:05 am | गॉडजिला

ऐ दिल मुझे बता दे तू किसपे आ गया है
वो कौन है जो आकर ख्वाबों पे छा गया है

या गाण्यासारखी चाल वाटत आहे