सगळ्यांत जास्त काय वाईट?
सवय..!
जागेची माणसांची झाडांची रस्त्यांची
बारची वाईन शॉपींची
पानटपऱ्यांची थिएटरांची जगण्याची..
शहर सोडताना अवघड जातं मग
शहर काही वाईट नसतं..
पण नाही जमत एखाद्याला मूळं रूतवायला
किंवा झगडायची उमेद खलास होत जाते हळूहळू
आणि कळतं की आता जावं लागेल..
निरवानिरव करावी लागते मग
दूधवाला गॅसवाला पेपरवाला
आवराआवर बांधाबांध
भांडी गाद्या चादरी पडदे कपडे बॅगा सगळंच..
बडवायजरच्या साचलेल्या कॅन्सची विल्हेवाट
ॲशट्रेचा कधी नव्हे तो मोकळा श्वास
रिकाम्या कपाटांच्या तळाशी कसल्याशा जीर्ण पावत्या बिलं
नाही नाही म्हणता म्हणता काय काय जमवलेलं असतं
ह्या डायऱ्याही संध्याकाळी नदीत सोडून दिलेल्या बऱ्या
त्यांच्यासोबत ही सगळी वर्षंही वाहूनच गेलेली बरी..
त्याच लायकीची होती ती..!
पुस्तकांना निरोप..
खूप दिलं बाबांनो तुम्ही.. माझ्यात आजही जे काही चांगलं असेल, शुभ असेल, ते सगळं तुमच्यामुळेच आहे..
तुमच्यापासून काय लपलंय माझं..! सगळंच माहितीय तुम्हाला..
आणि मी भिकारी.. मजबूर.. तुम्हाला सोबत नेऊ शकत नाही.. मला तुम्हाला सांभाळता येत नाही यापुढे..
ही शरम घेऊन जगता येतं का बघावं म्हणतो...
शेवटी रिकामा भकास फ्लॅट..
दार बंद.. किल्ली ओनरकडे जमा..
'चलता हूं भैय्या'.. हे वॉचमनसाठी.
गाडीच्या काचांमधून शहर मागे मागे पडत जाताना दिसत
राहतं..
डोळे मिटून घेतले तरीही फरक पडत नसतो..
मनाची व्हायची ती मोडतोड होतच असते..
शिवाय सोबतीला 'पुढं काय' हा रक्त काढणारा प्रश्नही...
प्रतिक्रिया
28 May 2021 - 10:01 am | खेडूत
आवडलं!
पण व्यवहारात ही स्थिती नेहेमी सकारात्मक असते कारण आपण काही प्रगती होत असते म्हणूनच गाव, शहर सोडतो, त्यामुळे ( बऱ्याचदा) आनंददायक असतात.
(साताठ गावं सोडलेला) खेडूत.
28 May 2021 - 11:55 am | गॉडजिला
अजून दीर्घ अन सखोल असते तर मजा आली असती
30 May 2021 - 9:04 pm | सुहास चंद्रमणी ...
हा नास्टेल्जिया प्रत्येकाच्या आयुष्यात असतो.काहींना ते प्रकर्षाने जाणवते तर काही दुर्लक्ष करतात एवढच!
2 Jun 2021 - 6:51 pm | प्राची अश्विनी
आवडलं.
2 Jun 2021 - 9:11 pm | प्रमोद देर्देकर
आवडली रचना.
2 Jun 2021 - 10:35 pm | चौथा कोनाडा
खुप भारी
+ १ नंबर !