चार
उदयपूरच्या राणासोबत मुघल सत्ता पुढे अनेक वर्षे लढली. या युद्धात, बर्याच वर्षांनंतर मुघल साम्राज्य पराजयी ठरले. त्यावेळेस पादशहा अकबर मृत होऊन आणि जहाँगिर सत्तेवर येऊन अनेक वर्षे लोटली होती. पराजयाची नैतिक जबाबदारी घेत खान-ई-खाना अब्दुर्रहीम खान सेनापती पदावरुन निवृत्त झाले. निवृत्त जीवनात त्यांनी पुष्कळ लिखाण केले. हिंदू महाकाव्य, विशेषतः रामायण हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी “रहिम” नावाखाली भरपूर साहित्यरचना केली. ब्रिजभाषेत सामन्यजनांना सहजगत्या समजतील असे दोहे त्यांनी रचले. संस्कृतमध्ये सुद्धा त्यांनी काही ग्रंथ रचले. त्यांच्या साहीत्यावर हिंदू तत्वज्ञानाचा प्रभाव होता. त्यांचे छगाती, फारसी, संस्कृत आणि ब्रिजभाषा ह्या भाषांवर प्रभुत्व होते.
नीज कर क्रिया रहीम कहि सीधी भावी के हाथ
पांसे अपने हाथ मे दांव न अपने हाथ.
मेवाड मोहीमेच्या मध्यात शहजादा सलीमने पातशहा अकबराकडून सिंहासन घेण्याचा प्रयत्न केला. त्यातली पहीली पायरी होती साम्राज्याचा खजिना हिसकावणे. त्यात अनेक सरदारांसोबत अली कुली सुद्धा आग्र्याला सलीमसोबत गेला. पण तिथे अली कुलीने सावधगिरी पत्कारुन स्वतःला सलीमपासून योग्य अंतरावर ठेवल. राजनितीक अंतर, जेणेकरुन अकबर आणि सलीम दोघान्च्या डोळ्यात आपण खुपू नये.
आग्र्या शहराचा सुभेदार किल्च खान सलीमसाठी बोजड ठरला, आणि सलीमचा बंड फसला. सलीमचे दरबारतले वर्चस्व यामुळे बरेच खालावले. अली कुली मात्र सावधगीरी बाळगल्याने यातून सहीसलामत सुटला.
पण इथेच अस्थिरता संपायची नव्हती. त्यानंतर अनेक वर्षे लोटली आणि ईसवी सन १६०५ उजाडले. (अली कुलीच्या लग्नाचे ११ वे वर्ष). पातशाह अकबरची तब्येत खालावत चालली होती. आणि, सलीमने अकबरचा भ्रमनिरास केला असला तरी, पादशाहाला आपल्या दुसर्या जिवंत मुलावर आणखी कमी विश्वास होता. शहजादा दानियाल व्यसनी आणि अकार्यक्षम होता. त्यातुलनेत सलीम बंडखोर असला तरी तो दानियाल पेक्षा उत्तम शासन करेल हे स्पष्ट होते.
सलीमने ह्या दरम्यान आणखी एक गुन्हा केला, तो म्हणजे दख्खनमधून आग्र्याला परतणार्या अबु फजलचा मृत्यु घडवुन आणला. अबुल फजल अकबरचा चरित्रकार आणि लाडका मित्र होता. त्याचे सलीमबद्दलचे मत प्रतिकूल होते, त्यामुळे सलीमने त्याचा मृत्यु घडवुन आणला. ही गोष्ट पादशहाँच्या जिव्हारी न लागली तर नवल.
पादशहांच्या दुःखात भर घालणारी आणखी एक घटना घडली, ती म्हणजे शहजादा दानियालचा मृत्यु. पादशहांसोबत दानियाल सुद्धा दख्खनेत होता. पादशहा सलीमच्या बंडामुळे आग्र्याला परतले, पण दानियाल बुर्हाणपुरातच राहीला. त्याचे दारुचे व्यसन फारच वाढले असल्याने, त्याच्या आरोग्याच्या चिंतेत त्याला दारु पिण्याची बंदी केली होती, आणि त्याला दारु मिळणार नाही अशी व्यवस्था केली होती. पण बंदुकीत भरलेली लपवून आणलेली दारु पिताना, त्यातले बारुद मिसळले असल्याने, शाहजादा दानियालचा मृत्यु झाला, आणि अकबराच्या तीन मुलांपैकी फक्त सलीमच जिवंत राहीला. आणि, ह्याच दरम्यान, अली कुली आणि मेहरुन्निसाला त्यांचे पहिले आपत्य प्राप्त झाले- लाडली बेगम. हे त्यांच्या लग्नाचे ११वे वर्ष होते.
वास्तविक, अकबरचे सलीम वर खुप प्रेम होते. पण सलीम आता लहानपणीचा “शेखु बाबा” राहीला नव्हता. आता कोणत्याही भावनांपेक्षा सत्ता मह्त्वाची होती.
पण सत्तेसाठी आणखी एक दावेदार होता- खुसरौ.
सलीमची पहीली पत्नी- मानभवति उर्फ मान बाईने ईसवी सन १५८७ मध्ये सलीमच्या पहिल्या आपत्याला जन्म दिला. सलीमकडून कडून वारंवार दुखावल्या गेलेल्या पादशहाँनी सतरा वर्षिय खुसरौचा आपला उत्तराधिकारी म्हणून विचार केला असण्याची शक्यता नाकाराता येत नाही.
खुसरौ वयाने आणि अनुभवाने लहान असला तरी त्याची राजकीय महत्वकांक्षा आपल्या बापासारखीच तीव्र होती. आणि, त्याची राजकीय ताकद सुद्धा दुर्लक्ष करण्याजोगी नव्हती. त्याचे दोन ताकदवान शुभचिंतक होते-पहीला- त्याचा मामा, म्हणजे मान बाईंचा भाऊ, अंबरचा राजा मान सिंह.
दुसरा- त्याचे सासरे, मिर्झा अझीज कोका. यांच्या नावावरुन लक्षात येते, की हे अकबरचे दूधभाऊ होते. त्यामुळे आपल्या सासर्या आणी मामाच्या मदतीवर तो विसंबून राहू शकत होता. खासकरुन, राजा मान सिंह निष्णात सेनापती होते.
दानियालच्या मृत्युनंतर अकबरची तब्येत बिघडतच गेली, आणि अंतःकाल जवळ आला आहे हे खुसरौ-सलीम दोघांना समजले. मुघल साम्राज्यात सलीमपासून सुरु झालेली परंपरा- बापाविरुद्ध उठाव करण्याची- पुढे सुद्धा चालूच राहीली. अकबराविरुद्ध सलीम, सलीम विरुद्ध खुसरौ आणि पुढील काळात खुर्रम (ज्याला इतिहास शाह जहान म्हणून ओळखतो), आणि खुर्रम विरुद्ध औरंगझेब ह्या मुलांनी बंड केले. ह्याचे कारण असे की साम्राज्याचे वारसदार हे ताकद आकर्षित करत. भावी सम्राटाशी संबंध ठेवण्यासाठी अनेक ताकदवान माणसे आपल्या मुलींचा हात देण्यास उत्सुक असत. तरुण शाहजाद्याच्या मागे बसून आपल्याला सत्ता मिळवता येईल असे मनसूबे काही बाळगत. शाहजाद्यांकडे जमा झालेल्या ताकदीमुळे पादशहाला सुद्धा मुलांवर करडी नजर ठेवावी लागे. जास्तकरुन दोन मुलांचा एकमेकांशी संबंध येऊ नये अशी काळजी पादशहा घेत असत.
पादशहाने फजलच्या मृत्यनंतर सलीमला रागावून पुन्हा अजमेरला जाण्यास फर्मावले होते. सलीमला अंतिम क्षण जवळ आलेत माहीत होते, म्हणुन तो आग्र्यापासून फार लांब गेला नाही. दानियालच्या मृत्युनंतर सहाच महिन्यांनी, ईसवी सन १६०५ साली पादशहा अकबरचा मृत्यु झाला. तेव्हा सलीम आपल्या वडिलांच्या मृत्युशय्येजवळच उभा होता.
वडिलांच्या मृत्युनंतर सलीमने स्वतःचा राज्याभिषेक करुन घेतला, आणि स्वतःचे नाव “नुरुद्दीन मुहम्मद जहाँगिर पादशाहा गाझी” असे ठेवले. नुरुद्दीन म्हणजे ‘जगताचा प्रकाश’ आणि जहाँगिर म्हणजे ‘सगळे जग जिंकणारा’.
अकबरच्या मृत्युआधी खुसरौने हालचाली करून काही समर्थक मिळवले होते. त्यातला एक समर्थक होता- अली कुली इस्तज्लू. अली कुलीने खुसरौच्या बाजूने पैज लावली हे खरे आहे, पण त्यामागची कारणीमिमांसा करणे आज शक्य नाही. मात्र, अंदाज लावले जाऊ शकतात. खुसरौ तरुण होता, उसळत्या रक्ताचा होता. न घडवलेले, न आकारात आलेले पात्र- असे खुसरौचे वर्णन होऊ शकते. खुसरौ सम्राट झाला तर त्याच्यावर नियंत्रण करणे हे पाहाण्यासारखे स्वप्न होते. त्याविरुद्ध, राजकारणात मुरलेल्या जहाँगिर वर असा प्रभाव टाकणे अशक्य होते. पण, इथे आणखी एक महत्वाचे कारण असेही असू शकते की अली कुलीला पितासमान असणार्या अब्दुर्रहीम खान यांचा सुद्धा कल खुसरौ कडे होता, हे पुढे झालेल्या घटनांमध्ये दिसून येते. अब्दुर्रहीम खान जन्मभर अकबराची चाकरी करत होते. अकबराविरुद्ध बंड करणार्या जहाँगिर बद्द्ल त्त्यांना घृणा असणे समजण्यासारखे आहे.
अली कुली खुसरौच्या बाजूने होता, ह्या साठी त्याला मृत्युदंड होणे सहज शक्य होते, पण शेर अफगाणला शिक्षा झाली ती फक्त महत्वहीन होण्याची. त्याचे अजमेरचे कर्तुत्व कामी आले. त्याची थत्त्याची मनसब काढून अली कुलीला बंगाल मधल्या बर्दवान किंवा बर्धमान प्रांताचा सुभेदार बनवले. पूर्ण बंगाल प्रांताचा शासक म्हणून कुत्बुद्दीन कोका नेमला होता. सैन्याच्या आयुष्यापासून दूर खेडेगावामध्ये जाणे ही अली कुली साठी शिक्षाच होती.
सिंहासनावर येताच जहाँगिरने खुसरौ बाबत तातडीने पाऊले उचलली. त्याने तत्काळ खुसरौला नजर कैदेत ठेवले. जहाँगिर या बाबतीत इतका कडक होता, की जेव्हा तो आग्रा सोडून इतर कुठे जाई, तेव्हा खुसरौला त्याचा मनोरा सोडून बाहेर जाण्याची सक्त मनाई असे. पण खुसरौ गप्प बसला नव्हता, ना त्याचा मामा आणि सासरा गप्प होता. मिर्झा अझीझ कोका आणि राजा मान सिंह दोघेपण खुसरौ साठी लपून समर्थन करत होते. जहाँगिरने त्या दोघांचे सुद्धा कारस्थान लागलीच ओळखले आणि तिथेच कापले. राजा मान सिंह अतिशय ताकदवान आणि किमती सेनापती असल्याने, जहाँगिरने मोठ्या दिलाने मान सिंहाला माफ केले, आणि, खुसरौचे मामा म्हणून मान सिंहाचे वागणे समजण्यासारखे आहे, अशी पुस्ती सुद्धा जहाँगिरने जोडली. एकूण काय, मान सिंहाचे महत्व इतके होते की त्याचे पाप पदरात पाडून घेणे पादशहांना भाग होते. मिर्झा अझीझ कोका त्या बाबतीत इतके भाग्यवान नव्हता. जहाँगिरने मिर्झा कोकावर दुहेरी आरोप केला- राजद्रोह आणि मुलाला वडिलांविरुद्ध भडकावणे. पादशहांनी मिर्झा अझीझ कोकाला मृत्युदंड दिला. पण...
... मिर्झा अझीज कोका साठी एक दुसरा गट सहानभूती बाळगून होता! जहाँगिरला चिकाच्या पडद्याआडील शक्तींनी मिर्झा अझीझ कोकाचे प्राण न घेण्यास प्रवृत्त केले. ह्यात खुसरौची पत्नी, कोकाची मुलगी, हीचा हात तर होताच, पण जहाँगिरच्या सावत्र आया- सलीमा सुलतान आणि रुकैय्या बेगम- ह्यांचा सुद्धा हात होता. अकबरच्या इतक्या जवळच्या मित्रास, आणि दूधभावास मृत्युदंड नको, ही त्यांची इच्छा होती. त्यामुळे, मिर्झा अझीज कोका या प्रकरणातून आपला जमीन जुमला आणि सत्ता गमावून बसला, पण गर्दन बचावली.
नव्या सत्तेमध्ये मध्ये घियास बेगचे दरबारातले वजन आणखी वाढले. जहाँगिरने घियास बेगची दरबारातला प्रमुख दिवाण म्हणून नेमणूक केली, आणि त्याला ‘इतमदुदौला’ (साम्राज्याचे खांब) अशी पदवी दिली.
एक वर्ष सरले.
आणि, एका निर्णायक क्षणी, आजोबांच्या कबरीला भेट देण्याचे कारण सांगून खुसरौने आग्र्यातून पोबारा केला.
एकोणीस वर्षांचा खुसरौ- आपल्या हितचिंतकांच्या बळासहीत जहाँगिरला आव्हान देणारा खुसरौ- त्याला आपले समर्थन देणे म्हणजे मुघल दरबारी आणि सरदारांसाठी एक भलीमोठी पैज होती. जर खुसरौने विजय मिळवला तर त्याला मदत करणारे ताकदवान होतील हे स्पष्ट होते. पण खुसरौ हरला तर ? सत्त्तेच्या स्वप्नांवर पाणी फिरणार, असलेली सत्ता जाणार...
... गर्दन उडणार.
खुसरौला आता आपला मामा आणि सासरा या दोघांचा सुद्धा आधार नव्हता. खुसरौच्या मागे आता खान-ई-खाना अब्दुर्रहीम खान आणि एक मोठा सरदार हुसैन बेग हे होते. खुसरौ पळून तर्ण तरण साहिब या अमृतसर जवळच्या ठिकाणी गेला. तिथे श्री गुरु अर्जन देव जी ह्या शिख गुरुंनी त्याला आपले आशिर्वाद दिले. अर्जन देवजींची राजकारणाच्या पैजेत सहभागी होण्याची चूकच झाली, हे नंतर समोर आले. गुरु अर्जन देव जींनी आदी ग्रंथाचे संकलन केले होते, जो पुढे जाऊन गुरु ग्रंथ साहीब म्हणुन ओळखला जाऊ लागला. गुरु अर्जन जींना ईस्लाम स्विकारणे किंवा असा पर्याय दिला गेला, तर त्यांनी अनेक यातना भोगून मृत्युचा स्विकार केला (ईसवी सन १६०६). पण याबाबतीत शिख साहीत्य आणि मुघल बखरींमध्ये तफावत आहे. मुघल बखरींप्रमाणे, गुरु अर्जन जींची हत्या खुसरौच्या हिंदू आणि मुस्लिम समर्थकांच्या हत्येपैकी एक होती. जहाँगीर स्वतः आपल्या दैनंदीनीत, तुझुक-ई-जहांगिरी मध्ये म्हणतो- “...खुसरौ ने आपल्या बोलण्याचालण्याने अनेक सरळसोट हिंदू आणि मुस्लिम लोकांच्या मनावर आपली भुरळ घातली, आणि आपल्या चार पिढ्यांच्या पुण्याईमुळे खुसरौ कडे ही कुवत आली आहे....” यातून हे दिसते की जहाँगिर ला गुरु अर्जन देव हे साधारण हिंदू व्यक्ती नसून, शिख सम्प्रदायाचे प्रमुख आहेत, हे जाणवले नव्हते. मात्र, शिख साहीत्याप्रमाणे, गुरु अर्जन देवांची हत्या शिखांवर होणार्या राजकिय अन्यायाचा भाग होता, मुघल साम्राज्य शिखांच्या वाढत्या ताकदीस दबून अशी पावले ऊचलत होती. यातले सत्य जे असेल ते असेल, अर्जन देवांची हत्या आणि पुढे (१६१५ मध्ये) त्याने तोडलेले अजमेर जवळचे वराहमंदीर हे त्याच्या आयुष्यातील काळे भाग, आणि त्याच्या एकंदरीत चरीत्राशी विसंगत म्हणुन आठवले जातात.
अमृतसर नंतर खुसरौने आपल्या समर्थकांसोबत लाहोर शहराला वेढा दिला. लाहोर दिलावर खान या सरदाराने अत्यंत ताकदीने बचावून ठेवले. पुढे जहाँगिर आपल्या सामर्थ्यशाली सैनेसोबत खुसरौच्या सैन्यावर तुटून पडला आणि खुसरौला बच्याखुच्या सैन्यासकट पळून जावे लागले. तिथून पळून खुसरौने काबूलचा मार्ग पकडला, पण रस्त्यात चिनाब नदी पार करताना जहाँगिरच्या सरदारांनी खुसरौला पकडले. खुसरौचे बंडखोर पर्व जितक्या लवकर सुरु झाले तितक्यातच, म्हणजे, काही महीन्यांच्या अंतरात संपले.
आणि मग सुरु झाले- पैजेत हारणार्यांच्या धरपकडीचे सत्र. आणि त्यानंतर बंडखोरांना शिक्षा.
प्रमुख बंडखोर अर्थातच होते- शहजादा खुसरौ, हुसैन बेग- आणि खान-ई-खाना अब्दुर्रहीम खान.
पाच: अली कुली- (ईसवी सन १६०६) III
अली कुलीने सभोवताली खेदाने पाहिले. कुठे येऊन पडलो ! सैन्यापासून, आपल्या माणसांपासून दूर, ह्या खेड्यात आपले आयुष्य वाया जाणार. खुसरौला पाठिंबा देण्याची चूक झाली, हे खरे असले तरी अजुनसुद्धा त्याला खुसरौचा चेहरा आठवत होता. खुसरौच्या तारुण्यामुळे मुळे बंडाचा धोका घेण्यासाठी अली कुलीला स्फुर्ती मिळाली होती. खुसरौ सलीमला मात देईल अशी अर्धमेली आशा खुसरौ चनाब काठावर पकडला गेला हे ऐकून संपली होती. खुसरौने आग्र्यातून पळ काढला त्याआधीच बरेच सरदार खुसरौला शामील आहेत हे जहाँगिरला समजले, आणि त्यांचे पंख त्यांनी बंड करण्याआधीच कापले गेले. अली कुली त्या सरदारांमधला एक होता. जर तसे झाले नसते, तर आज मी इथे लांबवर खितपत पडलो नसतो, खुसरौच्या जोडीने लाहोरच्या वेढ्यात लढत असलो असतो... आणि कदाचित तिथेच मेलो असतो. असूदे, मृत्यु तर मृत्यु ! अली कुलीने आवेशाने विचार केला. असं कंटाळवाणं आयुष्य जगण्यापेक्षा रणांगणावर लढता लढता मेलेले कधीही चांगलेच !
तो बर्दवानच्या वेशीपाशी वाट पाहात होता सफदर खानाच्या भेटीसाठी. सफदर आता कुत्बुद्दीन कोकाच्या हाताखाली होता. कुत्बुद्दीन कोका म्हणजे पादशहा जहाँगिरचा उजवा हात. त्यामुळे सल्तनतमध्ये होणर्या घटना कोकाच्या कानावर सर्वप्रथम पडत. त्यामुळे सफदर सुद्धा साम्राज्यातील घडामोडींबद्दल माहितगार असे. तो बर्दवानजवळून काही कामासाठी चालला होता, म्हणून त्याने अली कुली कडे निरोप्या पाठवून खबर दिली. मात्र, आता अली कुली त्याचा अधिकारी नव्हता, फक्त मित्रच होता.
सफदरची वाट पाहताना त्याने आपल्या आयुष्याबद्दल विचार केला. मेहरुन्निसा. त्याच्यासाठी ती लग्नाच्या दिवशी सुद्धा एक कोडेच होती आणि आजसुद्धा कोडेच आहे. तिच्या नावासोबत त्याच्या हृद्यात उठणारे तरंग हळूहळू गंभीर स्वर घेऊ लागले होते.
मेहरुन्निसा त्याच्या सोबत अनोळख्यासारखेच आणि तितक्याच औपचारीकतेने वागे जसे लग्नाच्या पहिल्या दिवशी वागत असे. ती कर्तव्यदक्ष होती, शय्यासोबत आणि घर संभाळणे हे ती ईमानईतबारे करत असे, पण यापुढे काहीच नाही. आणि, ह्यात परिस्थीती आणखी खराब झाली ती म्हणजे वारंवार गर्भ धारण करुन दोघांना लग्नाची ११ वर्षे एकही अपत्य झाले नाही, ती मुलं जन्माआधीच मृत असत. ११ व्या वर्षी, सन १६०५ मध्ये त्यांना एक मुलगी झाली, जिचे नाव ठेवले- लाडली बेगम. अली कुलीला वाटलेले की निदान लाडली मुळे तरी मेहरुन्निसा आपल्या जवळ येईल, पण तसे झाले नाही. मेहरुन्निसाने स्वतःला लाडलीच्या संगोपनात पूर्ण वाहून घेतले आणि, अली कुलीला टाळण्याचे कारणच तिला मिळाले. अली ला आपल्या बदनशीबीचे कारण समजत नसे. दुखावला जाऊन तो पुन्हा वेश्या आणि दारुकडे वळला, पण मेहरुन्निसाचे आकर्षण त्याचा पाठलाग सोडत नसे. तिच्या वागणुकीला कितीही समजायचा प्रयत्न केला तरी अली कुलीला काहीच समजत नव्हते. या धुळकट गावात आल्यापासून तर मेहरुन्निसाचे वर्तन आणखीनच दुरापास्त झाले होते.
मेहरुन्निसाबद्दल ऐकलेली कथा त्याच्या डोक्यात आली. मेहरुन्निसाचा जन्म वाळवंटाच्या काठावर एका झोपडीत झाला. तिथे अशी चर्चा होती, की तिला सांभाळणे कफल्लक घियासला परवडण्यासारखे वाटतं नव्हते, म्हणून तिला वाळवंटी रात्रीत रस्त्याच्या बाजूला सोडून देऊन तो घरी आला होता, रस्त्याकडेचं ते बाळ त्याला आश्रय देणार्या मलिक मिर्झा मसूद या व्यापार्याला सापडली, आणि त्याने घियास बेगकडे तिला पुन्हा सोपवले, आणि काही पैसे सुद्धा दिले. वाळवंटात सोडलेल्या मेहरुन्निसाचे अंतःकरण तिथल्या रात्रींसारखेच थंड आहे, असा विचार अली कुलीच्या मनात आला.
समोर धूळ उठताना पाहून अली कुली ने मान झटकून मेहरुन्निसाबद्द्लचे कडवट विचार थुंकून दिले. काही वेळातच सफदर आणि आणखी दोन घोडेस्वार बर्दवानच्या वेशीपाशी दौडत दाखल झाले. अली कुलीने सफदर ला कडाडून मिठी मारली. सफदर सुद्धा आपल्या जुन्या स्वामींना पाहून आनंदीत झाला होता. दोघांनी आपापल्या आयुष्याबद्दल किस्से कहाण्या एकमेकांना ऐकवल्या. काही वेळ बोलणे झाल्यावर अली कुली गंभीर झाला.
“सफदर ?”
“जनाब.”
“खुसरौचे काय ?”
सफदर स्तब्ध झाला. “त्याचे काय होणार जनाब? पुन्हा त्याच मनोर्यात चोवीस तास सडायचे आयुष्य आहे आता त्याच्या वाट्याला. पण तितकेच नाही. आता जिथे कुठे शाही डेरा असेल, त्याच्या मागोमाग कुत्र्यासारखं जावं लागणार त्याला. पादशाह आता त्याला कधीच एकटे सोडणार नाहीत. पादशहांनी खुसरौचा ताबा शहजादे परविझ आणि शाहजादे खुर्रमकडे एकत्रित पणे सोपवला आहे. ते दोघेपण खुसरौचा द्वेष करतात. त्यामुळे आता खुसरौच्या भाग्यात अपमानाचे जीणे आहे.”
“अरे, पण राजा मान सिंघ आणि मिर्झा अझीझ...?”
“मान सिंहाँनी खुसरौचा पक्ष सोडला आहे. आणि मिर्झा अझीझ कोका स्वतः शाही झनान्याबदौलत जिवंत आहे, तो कसला खुसरौची मदत करणार? दोघेही युद्ध सुरु होण्याअधीच पादशहांकडून चिरडले गेले. आणि स्वतः खुसरौ...” सफदर ने आकाशाकडे नजर वळवली.
“काय झालं? खुसरौचे काय ?”
सफदरने अली कुली कडे पाहीले. “खुसरौचा आत्मा पादशहांनी असा भंग केलाय की पुन्हा खुसरौची आकांक्षा डोके वर काढेल असे वाटत नाही.”
“काय केलं पादशहाँनी ?”
अली कुलीची नजर चुकवत सफदर सांगू लागला.
शाही हत्तीखान्यातल्या एका भव्य हत्तीवर पादशहा जहाँगिर आणि खुसरौ स्वार होते. खुसरौला पुढे काय होईल याबद्दल काहीही कल्पना नव्हती. त्याला उलट हत्तीवरची सवारी म्हणजे आपल्या वडिलांच्या दयेची निषाणी असेच वाटत होते. पण त्याचा समज काही वेळातच दूर झाला. त्यांच्या मार्गात रस्त्याच्या बाजूला खुसरौला युद्धात मदत करणारे किंवा त्याच्या बाजूने लढणारे अनेक सरदार, मंत्री आणि सैनिकांना तलवारीच्या जोरावर उभे केले होते. आणि हत्ती जेव्हा बाजूने जाऊ लागे तेव्हा त्या माणसांना जवळच्या झाडांवर सुळी चढवण्यात येत होते. हत्तीवर बापलेकांसोबत बसलेला महाबत खान प्रत्येक मरणार्या माणसाची खुसरौला ओळख करुन देत होता. वार्यामध्ये लोंबकाळणार्या प्रेतांकडे बोट दाखवत महाबत खान कुत्सितपणे खुसरौला म्हणाला- सुलतान, तुमचे शूर शिपाई कसे वार्याशी लढतायत पहा !
हे वर्णन ऐकून अली कुलीचा चेहरा तप्त झाला. संतापाचे अश्रू रोखत त्याने सफदर ला विचारले-
“आणि रहीमचाचा ?”
सफदरचा चेहरा वेदनांनी पिळवटला. त्याला माहीत होते अली कुलीला खान-ई-खानांबद्द्ल किती प्रेम आणि आदर आहे ते.
“जिवंत आहेत, जनाब. इतकेच. त्यांची आणि हुसैन बेगची गाढवाचे आणि बैलाचे धड आणि डोके त्यांच्या डोक्याला आणि धडाला बांधून दिल्लीच्या रस्त्यांवर धिंड काढण्यात आली. हुसैन बेग त्यातच घुसमटून आणि उकडून मेला. पण रहीमचाचा बद्दल दिल्लीच्या लोकांना खूप प्यार, ते चाचांवर मधूनमधून पाणी शिंपडत राहीले, त्यामुळे चाचा जिवंत राहीले. बादशहांनी त्यांना त्यानंतर माफ केले. पण त्यांच्या दोनीही मुलांना खुसरौच्या समर्थनासाठी ठार केले.”
अली कुलीला ते ऐकणे अशक्य झाले, आणि त्याने घाईघाईने सफदरचा निरोप घेऊन आपला चेहरा वळवला.
अली कुलीच्या डोळ्यात कढत अश्रू आले होते. त्याला बांधून ठेवणारी एकेक गोष्ट तुटत चालली होती. सैन्याचे आयुष्य संपले. खुसरौ मध्ये गुंतवलेल्या आशा संपल्या. आता तर खान-ई-खानांचे छत्र सुद्धा राहील की नाही खात्री नव्हती. आणि मेहरुन्निसा... ती तर कायमच मृगजळासारखी राहीली.
त्या रात्री झोकांडे खात अली कुली मेहरुन्निसाच्या खोलीत पोहोचला. त्याच्या घश्यामध्ये आरोपाची यादी एकत्र होत होती, शिव्या-शिव्या-शिव्या... पण लाडलीला मांडीवर घेऊन झोपलेली मेहरुन्निसा पाहताच त्याला ती जुनी प्रतिमा पुन्हा पुन्हा आठवू लागली- चिकाचे वार्यात सरसरणारे पडदे...
त्या जुन्या प्रतिमेला वरमून अली कुली काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेला.
भाग २ समाप्त
By Attributed to <a class="external text" href="https://en.wikipedia.org/wiki/Abu%27l-Hasan_(artist)">Abu al-Hasan</a> (1589-1630) - <a rel="nofollow" class="external text" href="http://images1.bonhams.com/erez4/erez?src=Images/live/2011-01/21/8242176...">Bonhams</a>, Public Domain, Link
जहांगिर.
प्रतिक्रिया
23 May 2021 - 7:35 am | चित्रगुप्त
हा दुसरा भागही छान आहे. प्रवाही भाषेमुळे वाचताना केंव्हा शेवट आला हे कळलेही नाही. अतिशय सुंदर.
23 May 2021 - 9:21 am | गॉडजिला
भारतातही घडले की... अत्यन्त ओघवते आणी वाचनीय
23 May 2021 - 3:30 pm | विश्वनिर्माता
कथा आवडली हे ऐकून खुप आनंद झाला. धन्यवाद !
24 May 2021 - 10:28 am | तुषार काळभोर
हजार वर्षांपासून लोक मध्य आशिया, पश्चिम आशिया, युरोप असे जगभरातून येऊन इथे राज्य करत राहिले.
वाळवंटात खाण्यापिण्याची आबाळ झालेल्या व्यक्ती सिंधूच्या अलीकडे येऊन सरदार, सेनापती, पातशहा झाल्या.
आपण अजूनही घर सोडायला फारसे उत्सुक नसतो.
असो,
या भागातील चित्र खूप सुंदर आहे. नूर-उद-दिन मुहम्मद सलीम जहांगिर दिसायला एकदम रुबाबदार होता.
अवांतर: मला नेहमी वाटायचं की आलमगीर ही मुघल बादशहाची जेनरिक पदवी आहे. नंतर लक्षात आले की बाबर ( वाघ), अकबर (महान), जहांगिर (जगाचा मालक, जग ज्याच्या ताब्यात आहे तो), शहाजहान (अखिल जगाचा पातशहा), आलमगीर (जगज्जेता), औरंगजेब (सिंहासनाचं रत्न) असं प्रत्येकालाच काही ना काही पदवी किंवा भूषण होतं. आणि मूळ नावापेक्षा तेच जास्त प्रसिद्ध आहे.