शेर अफगाण- कथेनंतर, संदर्भ आणि नोंदी

विश्वनिर्माता's picture
विश्वनिर्माता in जनातलं, मनातलं
22 May 2021 - 9:25 pm

अली कुलीच्या मृत्युनंतर तीन वर्षांनी, १६११ साली, मेहरुन्निसाचा जहाँगिरशी विवाह झाला. द ट्वेंटीथ वाईफ या कादंबरीनुसार, जहाँगिर मेहरुन्निसाला उपस्त्री होण्याबाबत आग्रह धरुन होता, पण मेहरुन्निसाने लग्न करण्याचा आग्रह केला. मेहरुन्निसा ही जहाँगिरची विसावी आणि शेवटची पत्नी ठरली. मेहरुन्निसाचे लग्नानंतर नामकरण “नुर महाल”, म्हणजे, महालातला प्रकाश म्हणून केले गेले. पण इतिहासात ती आठवली जाते ते नुर जहाँ या नावानेच- जगताचा प्रकाश. नुरुद्दीन मुहम्मदची पत्नी- नुर जहाँ.
Noor Jahan Chitrashala Press.jpgBy Chitrashala Press - <a rel="nofollow" class="external free" href="https://chitravali.com/index.php?route=product/product&amp;product_id=1970">https://chitravali.com/index.php?route=product/product&amp;product_id=19..., Public Domain, Link
नूर जहाँ.

कुत्बुद्दीन कोकाचा अली कुलीच्या हातातून मृत्यु हा सलीमसाठी मोठा धक्का आणि दुःखद प्रसंग होता. कोका जहाँगिरचा बालपणीचा मित्र आणी दूध-भाऊ होता. अली कुली बद्दल जहाँगिरने आपल्या रोजनिषीत कोकाच्या मृत्युला कारणीभूत झाल्यामुळे अत्यंत त्वेषाने लिहिले आहे.
नूर जहाँ जहाँगिरची सर्वात प्रिय राणी तर होतीच, पण सोबतच ती अत्यंत कुशल शासक होती. जहाँगिर युद्धात गुंतला असताना सर्व राज्यशकट तिच्या हातात असे. स्वतःच्या नावे नाणी पाडणारी ती एकमेव मुघल साम्राज्ञी होती. जहाँगिर-मेहरुन्निसाला एकही मूल झाले नाही.
Silver coin of Nur Jahan, Patna mint.jpgBy <a href="//commons.wikimedia.org/w/index.php?title=User:Drnsreedhar1959&amp;action=edit&amp;redlink=1" class="new" title="User:Drnsreedhar1959 (page does not exist)">Drnsreedhar1959</a> - <span class="int-own-work" lang="en">Own work</span>, CC BY-SA 3.0, Link
नुर जहांचे नाव असलेली नाणी

जहाँगिरच्या मृत्युनंतर (१६२७) मध्ये पुन्हा वारसांचे युद्ध सुरु झाले त्यात मेहरुन्निसाने अत्यंत महत्वाची भुमिका बजावली. तिने आपल्या मुलीचा, लाडली बेगम उर्फ मिह्रुन्नीसा, हिचा विवाह जहाँगिरचा सर्वात लहान मुलगा शहरीयार ह्याच्याशी लावला, आणि सत्तेच्या स्पर्धेत त्याला पाठींबा दिला. जहाँगिरच्या मृत्युनंतर झालेली सत्तापर्धा रक्तपाताच्या बाबतीत अतिशय कुप्रसिद्ध आहे. ह्यात एकतर स्पर्धेत अनेक जण होते, किंवा येतील म्हणून मारले गेले. ते होतात- खुसरौची मुलं दावार बक्ष आणि गरशप, जहाँगिरच्या भाऊ दानियालची मुलं- तेहमुरास आणि होशांग, जहाँगिरची मुलं- परवीझ, शहरीयार आणि खुर्रम. ही स्पर्धा खुर्रम जिंकला, आणि त्याने यातील सर्व जिवंत स्पर्धकांना मारुन टाकले. भाऊ परवीझ आजारी पडून स्वतःच निर्वतला होता, इतर खुर्रमकडून मारले गेले. ह्यातल्या काही मुलांना, खासकरुन दानियालच्या मुलांना मारण्याइतके ते ताकदवान नक्की नव्हते. ह्या स्पर्धेत मेहरुन्निसाच्या विरोधात खुद्द तिचा भाऊच होता. तिचा भाऊ, असफ बेग, त्याच्या मुलीचा, म्हणजेच अर्जुमंद बानोचा विवाह खुर्रमशी झाला होता. त्यामुळे असफ बेग खुर्रमच्या बाजूने होता. आणि, खुर्रमचे सुद्धा अर्जुमंद बानोवर प्राणांतिक प्रेम होते. अर्जुमंद बानोला इतिहास मुमताज महल म्हणुन लक्षात ठेवतो, आणि खुर्रम-अर्जुमंद यांच्या प्रेमाचे प्रतिक ताज महल तर जगप्रसिद्धच आहे.

अर्जुमंद उर्फ मुमताज महलचा खुर्रम उर्फ शाह जहानशी लग्न ठरले तेव्हा तो विवाह शाह जहान साठी पहिलाच विवाह झाला असता. पण, पुढे, मुहम्मद शरीफने खुसरौसाठी जहाँगिरची हत्या करायचा प्रयत्न केला, आणि त्यानंतर काहीच वेळात इत्मदुदौलावर सुद्धा पैश्यांच्या अफरातफरीचे आरोप झाले. या कारणामुळे घियासच्या कुटुंबाचे नाव मलिन झालेले आणि अर्जुमंद-खुर्रमचा ठरलेला विवाह चार वर्ष झालाच नाही. तो झाला तो मेहरुन्निसा आणि जहाँगिरचा विवाह झाल्यावर, मेहरुन्निसाने त्यासाठी प्रयत्न केल्यावरच झाला. त्यादरम्यान खुर्रमचा एक विवाह आधीच झाला होता, आणि अर्जुमंद खुर्रमची दुसरी पत्नी झाली.
खुसरौचं आयुष्य त्याच्या बंडानंतर दुःखमयच राहीले. १६०७ मध्ये खुसरौने पुन्हा एकदा जहाँगिरचा काटा काढायचा प्रयत्न केला. त्यात मेहरुन्निसाचा भाऊ मुहम्मद शरीफ सुद्धा शामिल होता. तेव्हा मेहरुन्निसा आणि जहाँगिरचा विवाह झाला नव्हता. मुहम्मद शरीफ चे मुंडके उडाले, आणि खुसरौचे डोळे सांडशीने डागण्यात आले. जहाँगिरला या कृतीबद्दल नंतर वाईट सुद्धा वाटले, आणि खुसरौची शुषृषा करण्यासाठी त्याने नामवंत हकीम बोलवले. खुसरौची दृष्टी पूर्णपणे गेलीच नाही.
खुसरौची जबाबदारी जहाँगिरने आपल्या मुलांकडे दिली होती, ह्याचा सुद्धा त्याला पश्चाताप झालाच असावा. खुर्रमच्या ताब्यात असलेल्या खुसरौचा १६२२ साली छावणीतच वध झाला.

संदर्भ आणि नोंद:
हे पूर्णतः नवे लिखाण नाही आहे. कथा रचना, आणि घटनाक्रम इंदु सुंदरसेन यांच्या “द ट्वेंटिएथ वाईफ” या कादंबरीवर आधारीत आहे. संवाद आणि लिखाण अनुवादीत किंवा आहे तसे लिहिले नसले तरी मूळ कादंबरीच्या आधारावरच लिहिले आहे. कादंबरी उत्तम आहे, मेहरुन्निसाच्या गोष्टीत रस असल्यास जरुर वाचावी.
कथा लिहावी वाटली त्याचे मुळ कारण म्हणजे, कादंबरीचा मुख्य हेतू मेहरुन्निसा आणि जहाँगिर यांची प्रेमकथा सांगणे आहे. त्यामुळे अली कुलीला बदफैली, दारुडा, मारहाण करणारा, व्यभिचारी असा दाखवला आहे. मला हे शंकास्पद वाटलं. म्हणून वेगळ्या दृष्टीतून अली कुलीची गोष्ट सांगावी वाटली.
जहाँगिरने अली कुलीला मेहरुन्निसाला सोडण्यास सांगितलेले का- ह्या घटनेला सबळ ऐतिहासिक पुरावा नाही आहे. पण, कादंबरीमध्ये असे असल्याचे मानले आहे, आणि मी सुद्धा तेच केले आहे.
ऐतिहासिक संदर्भ चुकले असू शकतात. सफदर खान हे पात्र मी मनाने तयार केलेले आहे. कथेचा मूळ उद्देश ऐतिहासिक तथ्य सांगणे हा नाहीच, तर मनोरंजन करणे असा आहे.
संदर्भ ग्रंथ-
१. द एम्परर हू नेव्हर वॉज- सुप्रिया गांधी
दारा शुकोहचे चरित्र असे पुस्तकाचे स्वरुप असले तरी आधीचा इतिहास, खासकरुन शाह जहानचे सत्तारोहण सुद्धा समाविष्ट आहे.
२. अटेंडंट लॉर्ड्स- टी.सी.ए. राघवन.
बैरम खान आणि अब्दुलरहीम खान यांच्यावरचे पुस्तक,
३. अर्थातच विकीपिडिया. चित्रे तिथूनच घेतेली आहेत.

समाप्त.

इतिहासकथाविरंगुळा

प्रतिक्रिया

वेब सिरीज प्रमाणे सगळे भाग एकदम दिल्याने ‘बींज रिडींग‘ चा फील आला :)

खुपच प्रवाही लेखन, एकदम झक्कास.

एका वेगळ्याच प्रेम त्रिकोणाची कथा उलगडून सांगितल्याबद्दल धन्यवाद!

-(इतिहासप्रेमी) सोकाजी

विश्वनिर्माता's picture

23 May 2021 - 3:32 pm | विश्वनिर्माता

धन्यवाद ! कथेचे एकेक भाग हळूहळू टाकले असते तर "अली कुली" अस जालावर शोधून सगळा सस्पेन्स संपला असता.

मनिम्याऊ's picture

23 May 2021 - 3:02 pm | मनिम्याऊ

काही वर्षांपूर्वी EPIC CHANNEL वर इंदू सुंदरसेन लिखित The Twentieth Wife या कादंबरीवर आधारित एक सियासत नावाची मालिका प्रसारित करण्यात आली होती. अत्यंत सुंदर सादरीकरण व चित्रीकरण. या मालिकेचे भाग एपिसोड्स एपिक APP वर उपलब्ध आहेत.

विश्वनिर्माता's picture

23 May 2021 - 3:36 pm | विश्वनिर्माता

पुस्तकावर मालिका आहे माहीत नव्हते, धन्यवाद.
पुस्तकाचे अजुन दोन भाग आहेत- द फिस्ट ऑफ रोझेस आणि द शॅडो प्रिन्सेस म्हणून. तिसर्‍या पुस्तकात जहांआरा आणि रोशनआरा ह्यांनी अनुक्रमे दारा शुकोह आणि औरंगझेबला राजा बनवण्यासाठी केलेल्या पुस्तकांचे वर्णन आहे.

मनिम्याऊ's picture

23 May 2021 - 4:13 pm | मनिम्याऊ

https://youtu.be/DifPWH7AWiA
एकदा जरूर बघा सियासत..

'द फिस्ट ऑफ रोझेस' वर पण लिहा ही विनन्ती.

विश्वनिर्माता's picture

23 May 2021 - 9:14 pm | विश्वनिर्माता

व्हीडीओ पाहिला. सियासत चे सेट खूपच सुंदर आहेत.

'द फिस्ट ऑफ रोझेस' वर लिहिण्याचा प्रयत्न करीन, धन्यवाद.

या कथेसाठी संदर्भ म्हणून आलेल्या पुस्तकांपैकी 'द एम्परर हू नेव्हर वॉस' हे दारा शुकोहचे चरित्र मुघल घराण्याचा सर्वात भारी परिचय आहे. त्यावर मिपाकर बॅटमॅन यांचा लोकसत्तातला लेख-न झालेल्या बादशहाची कहाणी..

गॉडजिला's picture

23 May 2021 - 4:26 pm | गॉडजिला

दिल्ली दरबार अन एका संकेतस्थळाचा कारभार यात कमालीचे साम्य आढळले आहे...

असो, आपण असेच लिहीत राहा, तुमच्यामूळेच मिपा समृद्ध होत जातंय ज्याचा फायदा शेवटी समान्य वाचकांनाच मिळतो

विश्वनिर्माता's picture

23 May 2021 - 9:28 pm | विश्वनिर्माता

धन्यवाद, गॉडजिला. नक्की लिहीत राहीन.

सिरुसेरि's picture

23 May 2021 - 4:42 pm | सिरुसेरि

सुरेख लेखमाला . पुर्वी दुरदर्शनवर सिनेविस्टा या ख्यातनाम निर्मिती संस्थेने "नुरजहां" या हिंदी मालिकेची निर्मिती केली होती . त्यामधील नुरजहांला उद्देशुन असलेले "उसको कुदरतने बनाया था हुकुमतके लिये" असे काहिसे टायटल गीत लक्षात आहे . सलीमच्या बंदीवासात असलेल्या पोपटांपैकी एक पोपट नुरजहां पिंजरा उघडुन सोडुन देते . यावर संतापलेला सलिम तिला जाब विचारतो , तेव्हा ती अनवधानाने दुसरा पोपटही सोडुन देते , अशी त्यांच्या पहिल्या भेटीची दंतकथा ऐकली आहे .

विश्वनिर्माता's picture

23 May 2021 - 9:18 pm | विश्वनिर्माता

धन्यवाद!

हि कबुतरांची/पोपटाची कथा अगदी प्रसिद्ध आहे. इंदू सुंदरसेन यांच्या कादंबरीत सुद्धा हा प्रसंग आला आहे. पण, कादंबरीत हे त्यांच्या पहिल्या भेटीत नाही, तर अली कुली मेल्यावर एक-दीड वर्षानंतर होते.

चित्रगुप्त's picture

24 May 2021 - 1:10 am | चित्रगुप्त

ओघवत्या भाषेत लिहीलेले सगळे भाग खूप आवडले. असेच लिहीत रहा. शुभेच्छा.

तुषार काळभोर's picture

24 May 2021 - 11:56 am | तुषार काळभोर

आणि हा उपोद्घात लेखही छान.
इतिहासातील मुख्य पात्र व घटना आपल्याला माहिती असतात, त्याही अतिशय वरवर.
अशा उपकथा, सह-पात्रे देखील खूप रोचक असतात. दुर्दैवाने यांची ऐतिहासिक दस्तऐवज नोंद तुटक असतात. त्यामुळे त्यांच्याविषयी लिहायचं तर कल्पनाविलास करावाच लागतो. आणि तसं करताना हा कल्पनाविलास ऐतिहासिक वास्तवाशी विजोड किंवा फारकत घेणारा नसावा, याची खूप काळजी घ्यावी लागते.

तुम्ही केलेलं लेखन खूप आवडलं आहे.

विश्वनिर्माता's picture

24 May 2021 - 5:08 pm | विश्वनिर्माता

तुषार आणि चित्रगुप्त, खुप धन्यवाद !

मला नेहमी वाटायचं की आलमगीर ही मुघल बादशहाची जेनरिक पदवी आहे. नंतर लक्षात आले की बाबर ( वाघ), अकबर (महान), जहांगिर (जगाचा मालक, जग ज्याच्या ताब्यात आहे तो), शहाजहान (अखिल जगाचा पातशहा), आलमगीर (जगज्जेता), औरंगजेब (सिंहासनाचं रत्न) असं प्रत्येकालाच काही ना काही पदवी किंवा भूषण होतं. आणि मूळ नावापेक्षा तेच जास्त प्रसिद्ध आहे.

हो, मलासुद्धा हे आधी माहीत नव्हतं. आणि, औरंगझेबाचे खरे नाव औरंगझेब आणि पदवी आलमगिर अशी सुद्धा काही दिवस समजूत होती.