कोरोनाने काय दिले? लॉकडाउनात सक्तीने घरी बसायची सजा आणि त्या सजेला सुसह्य करण्यासाठी दिले ओटीटीचे सर्व प्रकारच्या मनोरंजनाने खच्चून भरलेले तास. अर्थात ओटीटी करोनाच्या आधीच घरात आलेला जरी असला तरी कोरोनापूर्व आणी कोरोनाच्या काळातील ओटीटीवर खर्च झालेला वेळ ह्याचे गुणोत्तर ह्याच कालावधीतल्या फरसाणच्या खपातही असणार असा एक प्राथमिक अंदाज आहे. ज्या गोष्टी बाहेर उंडगून साजर्या सॉरी...सेलिब्रेट केल्या जायच्या त्या घरच्या घरी कराव्या लागल्या ना. असो.. ते नाही का मराठी म्हण 'नमनाला घडाभर तेल' तसं न करता आता प्रचंड ओळखीचे झालेले स्कीप इन्ट्रो बटन घेऊ आणि मुद्द्याकडे वळू.
.
आता इन्ट्रो स्कीप करायचा तर का आणि काय टाळायचे? कसला इन्ट्रो? कुणाचा इन्ट्रो?...तर हा इन्ट्रो म्हणजे टायटल्स, जरा सॉफिस्टेकेटेड भाषेत क्रेडिट्स, क्रेडेन्शिअल्स किंवा आपल्या पिटातल्या प्रेक्षकांच्या भाषेत पाट्या. सांगली कोल्लापुरातल्या कुठल्या थेटरात...सॉरी टाकीत थोड्याफार वर्षापूर्वी ३ च्या शोला ४ वाजता जरी गेलात आणि बिडी शिलगावणार्या डोअरकीपराला "किती वेळ झाला सुरु होऊन?" असा प्रश्न केला की "पाट्या पडायल्यात" हे कॉमन उत्तर मिळायचे. आपल्याला उशीर झाला तरी पाट्यापासून चित्रपट पाहायचा हा नेम प्रत्येक रसिकाचा. काही गावात लोकल दुकानानी बनवलेल्या त्यांच्या स्टील स्लाईड्स दाखवत पण कॉमन असे ते सुरुवातीची तंदुरुस्ती की रक्षा लाईफबॉय आणि विको टर्मेरिकची दुल्हन बन्नो पाहू झाली की सेन्सॉरबोर्डचे सर्टिफिकेट. सेन्सॉर करणारा कुणी ठक्कर असो की मुखर्जी त्याचे नाव न पाहता आरोळी उठायची ती रीळसंख्येची. १२-१५ पासून वाढणारी ही संख्या शोले, मुगले आझमसाठी प्रेस्टीज इश्शु असायची.
.
सेन्सॉरचे सर्टिफिकेट थरथरत अदृश्य झाले की चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसच्या लोगोने सुरुवात होई. काही मध्यमवर्गीय निर्माते त्यांच्य त्यांच्या कुलदैवतांचे सफोटोस्मरण करी. काहीजण मूर्तीला हार वगैरे वाहून हात जोडी. त्याखालीच ते नाव झळके. मोठ्या निर्मात्यांची गोष्ट और. अगदी लायटिंग वगैरे करुन फिरत्या पृथ्वीवरचे मूर्त्यांचे लोगो किंवा कमळात उभे राहून मागे झुकून पुढे फुले सोडणारी शांतारामाची राजकमल सारखी आयडीया अगदी कंपलसरी. त्यातले व्हेरिएशन म्हणजे आरकेचे व्हायलिन घेतलेले कपल. बरसात चित्रपटाच्या पोस्टरवरुन घेतलेले चित्र आरके फिल्म्सचा लोगोच बनले. विळा हातोडा आणि एम अक्शर असलेला मेहबूब स्टुडिओ, ब्रम्हा विष्णु महेशांचे हात असलेले त्रिमूर्ती फिल्म्स. अशा विविधरंगी लोगोने नटलेली बॉलीवूड इंडस्ट्री आता कार्पोरेट एक्सेल, इरॉस, युटीव्ही सारखे जायंट हाऊसेस ते धर्मा, यशराज, भन्साळी, टीसेरीज, टिप्स, आमीरखान, फॅन्टम सारखे वन मॅन इंडस्ट्री सारखे लोगो मिरवते.
जुन्या जमान्यात मात्र त्यानंतर येई पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. पवित्र आत्मांना श्रध्दांजली वाहून झाली की झळके चित्रपटाचे नाव. कधी त्यावर निर्मात्याचे नावही. आठवा सलिम्स आग किंवा जिगर. चित्रपट कोणत्या रंगात रंगलाय त्यालाही महत्व असायचे. ओरवो कलर, इस्टमन कलर हेही खाली नमूद केले जायचे. त्यानंतर कलाकार, त्यातही मुख्य कलाकार मग सहाय्यक मग व्हीलन व नंतर फुटकळ अशी भाजणी. काही आणि... सारखे बिरुद मिरवणारी मंडळी शेवटी. अर्थसहाय्य, लोकेशन आणि सौजन्य अशा फोर्म्यालिटि पार पडल्या की लेखन, पटकथा, नेपथ्य, छायांकन, गीत, संगीत, गायन असे मुख्य कलाकार आणि त्यांचे असिस्टंट झाले की निर्माता आणि दिग्दर्शक (त्यातही सही ठोकायची फॅशन मराठीत जास्त) असे साधारण मानांकन असे. ह्यात नवलाई म्हणजे काहीजण क्लासिकल अॅनिमेशन वापरीत तर काहीजण मुख्य व्यक्तीरेखांची कॅरीकेचर्स. पण बोल्ड पिवळ्या फॉन्टातली टायटल्स आणि रंगीत पार्श्वभूमी हा पार्ट कॉमन प्रॅक्टीस असे.
.
चित्रनगरींचे बॉलीवुड झाले अन व्यवसाय कसा बिझिनेसप्रमाणे चालू झाला. क्रेडीटस मधली नावे वाढली, जबाबदार्या वाढल्या. सुरुवातीपासूनच झळकणार्या विविध रंगबिरंगी लोगोमधून सुजाण लोक बरोबर अर्थ काढू लागले. चित्र्पटाची जाहिरात एफेमवर वाजू लागली की ते एफएम चॅनल हे मिडीया पार्टनर असते, चित्रपटात काही बातम्या किंवा टेलिव्हीजन कार्यक्रमाची दृष्ये असली की ते चॅनल सुरुवातीला आपली जागा राखून ठेवते, स्ट्रीमींग पार्टनर हे थिएटरशिवाय कुठे चित्रपट दिसणार हे सांगते. म्युझिक पार्टनर्स संगीताचे हक्क राखून ठेवतात. काही युट्युब चॅनेलही प्रमोशनच्या नावाखाली झळकून घेतात. अर्थसहाय्य करणारी बँक चित्र्पटातल्या कुठल्या तरी दृष्यात दिसणार ह्याची खात्री असते. मुख्य कलाकार काही उत्पादनांचे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर वगैरे असतात, ती उत्पादने घरचे कार्य असल्याप्रमाणे हजेरी लावतात. व्हीएफएक्स आणि पोस्ट प्रॉडक्शन करणारे मिडीया हाउसेस स्वतःला मिरवून घेतात. साउंड आणि डिस्प्लेचे प्रोसेसर्स त्यांचे लोगो घेऊन येतात. नंतर मात्र जुन्या परंपरेनुसार क्रम सुरु होतो. मात्र नव्यांची ही मांदीयाळी अगदी असिस्टंटस, युनिट, लोकेशन, केटरर्स, मेकप, कॉश्चुम, लोजिस्टिक्स, स्पॉटबॉय अशा विविध डिपार्ट्मेंटातील सर्व म्हणजे सर्व वर्हाडीसह श्रेयानुसार चित्रपट संपताना पुन्हा लहान अक्षरात काळ्या पार्श्वभूमीवर वर वर सरकत जात असते. अर्थात हेही बघायला थांबणारे रसिक असतात. त्यासाठी एखादे आयटम साँगही दान केले जाते ते एका बाजूला वाजत असते.
.
आता इतक्या सगळ्या माहितीजंजाळात कलात्मकता कुठे? आठवा तो चंद्रा बारोटचा डॉन. टायटलच्या पार्श्वभूमीवर पूर्ण चित्रपटातील निवडक प्रसंग निगेटिव्ह फिल्मच्या रुपात दिसतात, शोले च्या सुरुवातीचा घोड्यांचा प्रवास, अंगूर मधील संजीव कुमारासहीत सगळे द्राक्षाच्या घडात कार्टून रुपात, किंबहुना हृषिकेश मुकर्जींच्या टायटलात कार्टून्स हमखास डोकवयाचेच. हिच पध्दत सचिन पिळगावकरांनी मराठी चित्रपटात वापरली. कमल हसनच्या मेयरसाब मध्ये पूर्ण पडद्यावर एका माणसाचे रेखाचित्र दिसते. तशीच माणसांची रेखाचित्रातली गर्दी वाढत वाढत एका बाजाराचे चित्र साकारले जाते आणि त्याचे रुपांतर प्रत्यक्ष बाजाराच्या सीन मध्ये होऊन चित्रपट सुरु होतो. एका खेड्यातील बदकावर स्थिरावणारा कॅमेरा हळूहळू गावात फिरणार्या बदकाच्या थव्याचा पाठलाग करत राहतो आणि त्याला उधळत एका गुंडाची कार आणि त्यापाठोपाठ बुलेटवर इन्स्पेक्टर कमल हसन. ही शीर्षक सुरुवात आहे विचित्र सहोदरगल अर्थात अप्पूराजाची. रोजाच्या शीर्षकात कश्मीरी दहशतवाद्यासोबतच्या भारतीय जवानांची चकमक, धूमच्या शीर्षक सुरुवातीत रेसर बाईक्स आणि पिस्तुले दिसतात. देवडी सारख्या चित्रपटात अनुराग कश्यप पात्रांची ओळख पाट्या देऊन करतो तर मै हूं ना मध्ये शीर्षकासाठी स्वतंत्र गीत तयार करुन एका जत्रेत सर्वानाच आपला चेहरा दाखवायची संधी दिली जाते. पात्रांची थ्रीडी स्कल्प्चर्स तयार करुन घेऊन त्यावर शीर्षक रचले गेले बाहुबलीमध्ये. अर्थात हॉलिवूडचा प्रभाव इथेही होता. अॅव्हेंजर्स मध्ये ही स्टाइल वापरली गेली होती. हॉलीवूड टायटल्सच्या बाबतीत सुरुवात पटकन करतात पण शेवटाची लांबण संपता न संपणारी. त्यातल्या त्यात डिस्ने किंवा वॉर्नरचे पट असतील तर कमीत कमी १५ मिनिटे ग्राफिक्स, अॅनिमेशन, स्पेशल इफेक्ट्स, कलर्स, आणि साउंड ट्रॅकचे स्वतंत्र क्रेडीट्स घेतातच. आजकाल अॅनिमेशन आणि पोस्ट प्रॉड्क्शनमध्ये भारतीय नावेही दिसू लागली आहेत मात्र फक्त ह्याच डिपार्टमेंटात. बॉन्डपटातील शीर्षक आणि त्यासाठी खास तयार केलेले शीर्षकगीत हाही एक बॉन्डच्या ललनाइतकाच आकर्षक विषय. डिस्नेच्या कथातील चित्रे, पात्रे किंवा प्रसंग घेऊन केलेली शीर्षके हा चित्रपटाइतकाच आकर्षक भाग असतो. डिस्नेच्या मोआनाच्या शीर्षकात चित्रपटात वापरल्या गेलेल्या सार्या प्रॉपर्टीज कलात्मकरीत्या वापरल्या गेल्या होत्या. ३०० आणि राइज ऑफ एम्पायरची रक्तरंजीत शीर्षके ग्राफीक्सची वेगलीच ओळख करुन देतात.
.
आणि आता आपण काय करतो तर स्कीप इन्ट्रो. ह्या बटनासाठी नेटफ्लिक्साने फारच पैसे खर्च केलेले म्हणे. ओटीटी वरील वेबसिरिजा आणि त्यांचे बिंज वॉचिंग करताना प्रत्येक एपिसोडला येणारे शीर्षक भलेही बघण्याची लिंक तोडत असेल आणि त्यावेळी स्कीप इंट्रो दाबलेच जात असेल तरीही आता स्मार्ट टेलिव्हीजनावरील प्रत्येक चित्रपटालाही स्कीप इंट्रो उपलब्ध केले जातेय आणि ही कलाकृती तुमच्या समोर येताना त्यांचे पडद्यामागचे कलाकार स्कीप करताना आपण एक खूप मोठी आणि कलात्मक वारसा लाभलेली परंपरा स्कीप करतोय असे नाही वाटत तुम्हाला?
.
.
(लिहिण्याच्या कंटाळ्यामुळे आणि अर्थातच विषय प्रचंड मोठा, अभ्यास करुनच प्रकटण्याइतका असलेने बराचसा स्कीप करत लिहिला आहे हे वेगळे सांगणे नलगे. तुम्हाला आवडलेले आणि कायम स्मरणात राहिलेले इन्ट्रो देऊन तुम्ही ही कमी पूर्ण करणार इतकी माझी खात्री आहे. धन्यवाद)
प्रतिक्रिया
14 May 2021 - 7:05 am | आनन्दा
मला पटकन वाटलं फारएन्ड नि लिहिला आहे की काय हा लेख..
पण छान आहे, आवडला.
14 May 2021 - 7:45 am | फारएन्ड
सुंदर लेख आहे! चपखल निरीक्षणे आहेत. मराठीतील दिग्दर्शकाच्या सहीचे, विशेषतः
शोले, डॉन वगैरेंच्या इन्ट्रोज मस्त होत्या.
अजून एक आठवते ते म्हणजे अगदी १९७७-७८ पर्यंत अमिताभच्या अनेक चित्रपटांच्या टायटल्स मधे त्याचे नाव पहिले नसे. तो एक "इन अॅण्ड अॅज" प्रकार कधी सुरू झाला माहीत नाही. अमिताभच्या बाबतीत कदाचित डॉन पासून.
18 May 2021 - 7:51 pm | सुरिया
इन अॅन्ड अॅज बहुतेक डॉन पासूनच.
हिच परंपरा सध्या साउथ इंडीयन मुव्हीज मध्ये हिरोला असलेले विशेषण, फॅनमध्ये प्रचलित असलेले मोठ्या अक्षरात सुरुवातीलाच देण्याची सुरु झाली आहे. मेगास्टार चिरंजीवी, किंग नागार्जुन, रेबेलस्टार प्रभास, स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन, डान्सिंग स्टार पुनिथ, चॅलेन्जिंग स्टार दर्शन अशी नावे चित्रपटाच्या नावापेक्षा मोठ्या आकारात येऊन तिथली हिरो वर्शिपची परंपराच दाखवतात.
14 May 2021 - 8:32 am | चौकटराजा
चित्रपटाच्या शेवटी ज्या " पाट्या" दाखवितात त्याची शेवटची अन्तर्धान पावल्याखेरीज " एकझीट " च्या दरवाजा गाठायचा नाही हा नियम कसा वाटतो .... ? ))))
"पाट्या पडणे " या खेरीज आणखी दोन शब्द आठवले १. इंडेलनूज ( इंडियन न्यूज ) २. येण्टर ( इन्टर्व्व्हल ) . ))))
14 May 2021 - 11:29 am | आंद्रे वडापाव
सिम्सन ही कार्टून बघीतली तर गेली काही दशक , सातत्याने इंट्रो मध्ये ते चेंजेस करतात ...
व्हेरी इनोव्हेटिव्ह ...
14 May 2021 - 11:30 am | सिरुसेरि
छान लेख आणी आठवणी . अनेक प्रॉडक्शन हाऊस , त्यांचे लोगो दाखविताना ठराविक धुन , स्तोत्र किंवा संवाद ऐकवीत असत - जसे की - "मुद्दै लाख बुरा चाहे तो क्या होता है " , "फानस बनकर जिसकी हिफाजत " , "कर्मणे वा " . धर्मेंद्र यांच्या "आंखे" चित्रपटाची टायटल्सची सुरुवात "उस मुल्कको कोई छु नही सकता , जिसके सरहदकी निगेहबान हो आंखे " या डायलॉगने होते . त्रिदेव , गुप्त , शान , पा या चित्रपटांच्या इन्ट्रोज लक्षात राहिल्या आहेत .
मराठी संगीत नाटकांमधेही पडदा उघडण्यापुर्वी सुरुवातीला सर्व कलाकार स्टेजवर एकत्र जमुन नांदी गीत ( भगवान नटराजाची आराधना ) सादर करतात . हि नांदी गीतेही आपली स्वतंत्र ओळख टिकवुन आहेत .
14 May 2021 - 11:39 am | सिरुसेरि
काही नाटकांमधे , नाटक संपल्यावर सर्व कलाकार परत स्टेजवर एकत्र येउन रसिक मायबाप प्रेक्षकांना अभिवादन करतात .
एक लक्षात राहिलेली आठवण म्हणजे - इनसाईड मॅन या हॉलीवुडपटामधे टायटल्स दाखवताना बॅकग्राउंडला ए. आर. रहमानचे "छैया छैया " गाणे वाजते . त्यामुळे खुश झालेले प्रेक्षक / रहमान फॅन्स हे सिनेमा संपल्यावर दाखवल्या जाणा-या टायटल्समधे रहमानचे नाव दिसेपर्यंत मुद्दामुन थांबतात . आणी अखेर रहमानचे नाव दिसल्यावर मगच टाळ्या , शिट्ट्यांचा गजर करत हॉलच्या बाहेर पडतात .
16 May 2021 - 2:46 pm | चौकस२१२
काही नाटकांमधे , नाटक संपल्यावर सर्व कलाकार परत स्टेजवर एकत्र येउन रसिक मायबाप प्रेक्षकांना अभिवादन करतात .
हि प्रथा मलातरी कधी भावली नाही ... नाटक संपत तेव्हा
त्या कथेतून, त्या व्यक्तिराखेतून लगेच बाहेर पडायचे नसते मला.. त्याचा विचार चालू असतो .. हे असे बघितले कि ती तंद्री मोडते .. नको वाटते
14 May 2021 - 11:48 am | कपिलमुनी
निरीक्षण छान मांडले आहे, श्रेयनामावली सोबत गाणे पण मिस होते.
सुट्स या मालिकेचे टायटल सॉंग कॅची आहे.
14 May 2021 - 11:58 am | मराठी_माणूस
गेले काही वर्षे जुने चित्रपट पहात असतांना फक्त एका नावाकडे लक्ष असते ते म्हणजे "सहाय्य्क संगीत दिग्दर्शक". ते पटकन निघुन जाइल म्हणुन एकाग्रपणे पहावे लागते.
14 May 2021 - 12:04 pm | शा वि कु
Neon Genesis Evangelion नावाचे anime पाहत आहे, त्याचे जापनीज इन्ट्रो गाणे डोक्यात बसले आहे. शेवटच्या ओळी मधला:
Hotobashiru atsui patosu de
Omoide wo uragiru nara
O-zora wo daite kagayaku
Shonen yo, shinwa ni nare
बोल्ड भाग प्रत्येक भागाला ओरडून म्हणल्या जात आहे :)
https://youtu.be/nU21rCWkuJw
14 May 2021 - 12:28 pm | मुक्त विहारि
नाॅर्थ बाय नार्थवेस्ट ..
https://m.youtube.com/watch?v=1ON67uYwGaw
--------
The Silencers (Opening Credits)
ऐन (मोक्याच्या) जागीच आणि वेळीच, नावे येतात....
https://m.youtube.com/watch?v=R8hy1APzUUw
-----------
Speed , 1994
लिफ्टचा सुंदर वापर, सुरवात ते अंत, आणि काळाचे गणित सांभाळणारा वेग
https://m.youtube.com/watch?v=FZzeiXJ24cE
---------
REAR WINDOW Opening (Cinematography)
https://m.youtube.com/watch?v=I5It0nmoYE4
14 May 2021 - 3:16 pm | चौकटराजा
https://www.youtube.com/watch?v=oWCbhudsy8w गन्स ऑफ नॅवरॉन सन्गीत दिमित्री टोम्किन
https://www.youtube.com/watch?v=Dh7S7V-y500 व्हेअर ईगल्स डेअर सन्गीत रॉन गुड्विन
https://www.youtube.com/watch?v=-bTpp8PQSog रेडर्स ओफ लॉस्ट आर्क संगीत - जॉन विल्यम्स
14 May 2021 - 10:00 pm | मुक्त विहारि
Catch Me If You Can (2002) title sequence
https://m.youtube.com/watch?v=aN715Rp4L74
------------
Forrest Gump Opening Scene
https://m.youtube.com/watch?v=W7voy1vit6Y
-------------
Vertigo -- OPENING TITLE SEQUENCE
https://m.youtube.com/watch?v=4CZfSc6nJ8U
--------
Psycho
https://m.youtube.com/watch?v=OjMmN2tfubw
14 May 2021 - 1:50 pm | तुषार काळभोर
दोन्ही पाहायला आवडतात.
पटकन आठवणारी हिंदी टायटल्स म्हणजे शोले (म्युझिक सह)
डॉन (खतरनाक म्युझिक सह)
शारुख चा डॉन (मोटो रेझर उघडून एकच शब्द बोलतो ... डॉन!) अन् मग थोडी फायटिंग , नंतर आधुनिक डिजिटल टायटल पण म्युझिक तेच खतरनाक)
RHTDM मध्ये intro an टायटल एकाच वेळी चालू असतात. बॅकग्राऊंड ला मॅडीचे किडे.
सत्या मध्ये intro होतो तो मुंबई अंडरवर्ल्ड चा. आणि सोबत नावं.
मराठीत कार्टून टायटल चा एक उत्तम नमुना म्हणजे गुपचूप गुपचूप.
मला वाटतं गिरीश घाणेकर सुद्धा कार्टून चा वापर करायचे.
मागच्या दोन दशकात शेवटी क्रेडिट मध्ये पूर्ण यादी अन् सोबत एखादं गाणं यायला लागलं. सर्वात आवडलेला प्रकार फराह खान चा मैं हुं ना अन् ओम शांती ओम यांचे क्रेडिट्स.
मागील काही वर्षात एक सवय लागली आहे.
नावांची यादी सुरुवातीला किंवा शेवटी आली तरी पूर्ण वाचायची. आता मोठं झालेलं एखादं नाव वीस तीस वर्षांपूर्वीच्या यादीत कुठेतरी उप- सहाय्यक शीर्षकाखाली दिसतं.
अशीच उत्सुकता असते हॉलिवूड क्रेडिट्स मध्ये भारतीय नावे शोधायची. पण बहुतेकदा ही नावे तांत्रिक सहाय्य गटात असतात.
14 May 2021 - 2:10 pm | गॉडजिला
यामुळे बिंज इतके सुसह्य झाले आहे की स्किप इंट्रो शोधणार्याला माझा मानाच नमस्कार. एक तर सलग कथानक बघयाच्या काळात दर तिस चाळीस मिणीटानी उंत्कंठाचर्धक ठीकाणी आपला रिदम व मन मोडुन काहीतरी बंडल जबरदस्तीने बघण्यात आपली बँडवीड्थ खर्च करणे हे कमालीच्या मागासलेपणाचे लक्षण होती. भारताचीच न्हवे तर संपुर्ण जगाची बँड्वीड्थ परीणामी क्रयक्षमता, वेळ, खर्च आणी उर्जा वाचवायचा महान चमत्कार ज्या शोधाने लागला त्याला त्याचे ड्यु श्रेय न देउन आधुनीक समजाने फार मोठा अन्याव केला आहे.
14 May 2021 - 3:09 pm | ज्ञानोबाचे पैजार
दादा कोंडकेंच्या सिनेमाची श्रेयनामावली दाखवण्याची पध्दत सुध्दा मनोरंजक असायची, पडद्यावर श्रेयनामावली सुरु झाली की लगेचच पीटात दंगा सुरु व्हायचा.
पांडू हवालदारची श्रेयनामावली तर भारीच होती.
भालजींच्या गनिमी कावा या सिनेमाच्या श्रेयनमावली च्या पार्श्वभूमीवर "बहु असोत सुंदर संप्पन्न की महान, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा" हे गाणे ऐकू येते.
एकदा अशी झकास सुरुवात झाली की हे चित्रपट शेवटपर्यंत आपली पकड सोडत नसत.
पैजारबुवा,
14 May 2021 - 3:41 pm | चौकटराजा
चित्रपटाचा जसा आत्मा असेल तसे सन्गीत व तसे ग्राफिक्स इन्ट्रो साठी केले तर मजा येते. ड्राक्यूलाच्या सिनेमात एक विशिष्ट असा फॉन्ट वापरीत ,काळ्या पर्श्वभूमीवर रक्ताचा ओघळ दाखवीत. पिन्क पॅन्थर सेरीज ची टायटल्स अनिमेशन मधे असत. पाण्यासारखी हालणारी टायटल्स ,वरून आकाशातून न्यूयॉर्क ची सैर ,घाटातून जाणारी गाडी ,( द कार ) टाईपरायटर ने कागदावरील उमटलेली अक्षरे, हाय एन्ड ग्राफिक्स ( सर्व बॉन्ड मुव्हीज - बॅरल गन सिक्वेनस सह ) अतर्क्य ग्राफिक्स ( मॅट्रिक्स ) . तर कृष्णधवल मराठी सिनेमात , पुस्तक उघडलेले दाखवायचे , रांगोळी दाखवायची असे परवडणारे टायटल असे.
14 May 2021 - 5:33 pm | गॉडजिला
आओ म्हनुनच आतासा एंड क्रेडीट नंतर बी पाचधा सेकंदाची शीन अस्त्यात हालिवुडात काइ शिनुमात
आमी तेवडाले जाकीचान्चे पिक्चरमदे शेव्टाले बघत बघत लइ हसत असु त्याचे रीटेक, फ्लोप सिन्स लय भारी वाटाचे मग काळ्या पडद्याव पांढरी अक्षरे आले की थेटर रिकामे व्हयाला सुरुवात व्हई.
14 May 2021 - 5:57 pm | सर टोबी
हिंदी सिनेमांचे साधारण तीन गट पडतात: सामान्यतः गुलाबी पाश्र्वभूमीवर कलाकार, तंत्रज्ञ, आणि इतर नावं तसेच जोडीला सिनेमातील गाण्यांच्याच सुरावटी, काही तरी वैचित्र्यपूर्वक म्हणजे चालत्या गाडीच्या चाकातून भिरभिरत येणारी नावं आणि प्रयत्नपूर्वक प्रसंग निर्माण करून कलात्मकरीत्या श्रेयनामावली सादर करणे. शांतारामबापूंच्या श्रेयनामावल्या या तिसऱ्या प्रकारातील असत. बुंद जो बन गयी मोती मध्ये एक एक शिंपला उघडून त्यातून येणारी नावं , नवरंगमध्ये स्वतः बापूंनी येऊन मनोगत व्यक्त करणे आणि नंतर श्रेयनामावली सुरु होणे असा सुंदर अनुभव असायचा. पण या प्रकारात नंतर मसाला चित्रपटांची गर्दी होऊ लागली. कुठला तरी नाट्यमय प्रसंग फ्रिज करायचा आणि श्रेयनामावली कर्कश्य सुरावटींच्या साथीत दाखवायच्या असा प्रकार होऊ लागला.
श्रेयनामावली म्हटली कि काही ठळक सिनेमे किंवा निर्मिती संस्था डोळ्यासमोर येतात त्या अशा:
14 May 2021 - 6:08 pm | आंद्रे वडापाव
आयला अजून, गेम ऑफ थ्रोन बद्दल कोणीच कसं बोललं नाही , पूमिराना ...
गेम ऑफ थ्रोन च्या टायटल ऍनिमेशन मध्ये सध्याच्या कथानकाप्रमाणे बदल व्हायचे ..
विंटरफेल वर रामसे बॉल्टन ने बळकावला तर, 'सोलून उलटा टांगलेल्या' माणसाच्या चित्राचा ध्वज हे एक उदाहरण..
असे अनेक सूक्ष्म बदल दरवेळेस व्हायचे,...
20 May 2021 - 10:47 am | ॠचा
गमे ऑफ थ्रोन चे टायटल ऍनिमेशन आणि संगीत देखील अतिशय प्रभावी!!
14 May 2021 - 6:27 pm | कॉमी
१. देऊळचा सॅन्ड आर्ट वाला इंन्ट्रो मस्त.
२. हॅरी पॉटरचे इंट्रो पाहाणे म्हणजे थेट्रात आतुरतेने पाहाण्याची आठवण येते. सगळेच भारी असतात. पण गॉब्लेट ऑफ फायरचा सगळ्यात मस्त. ते म्युसिक ऐकून अजुनही एकदम भारी वाटते. आणि तो अंगावर येणारा वॉर्नर ब्रदर्सचा लोगो ! https://youtu.be/T9hwiTjHO5I
३.झिंग चिका झिंग चिका झिंगा, सुख घाली माझ्या दारी पिंगा- कायम आवडते. https://youtu.be/eNhvWnDY-hE
14 May 2021 - 8:00 pm | प्रचेतस
हॅरी पॉटरचे इंट्रो लैच खतरनाक होते.
27 May 2021 - 11:23 am | विजुभाऊ
देऊळ ची सँड आर्ट्स मस्तच होते.
टायटल्स लक्ष्यात राहिलेले सिनेमे म्हणजे
मराठी मधे " गुपचूप गुपचूप " आणि हिंदीत " चलती का नाम गाडी "
टायटल्स पासूनच सिनेमाचा अंदाज येतो
दुसरे म्हणजे टायटल्स ची गीते.
अमर प्रेम सिनेमातले टायटलसाठी वापरलेले गाणे " डोली मे बिटठाईके कहार..... " हे गाणे म्हणजे संपूर्ण चित्रपटातली नायीकेचे कथानकच आहे.
हिंदीत शान सिनेमात शॅडो डान्स वर चित्रीत केलेले जिते है शान से हे गाणे.
ही कायम आठवणीत आहेत
14 May 2021 - 8:29 pm | आग्या१९९०
छान निरीक्षण.
चित्रपट कोणत्या रंगात रंगलाय त्यालाही महत्व असायचे. ओरवो कलर, इस्टमन कलर हेही खाली नमूद केले जायचे.
ORWO कलर बघितल्याचे आठवत नाही, त्यांच्या ब्लॅक अँड व्हाइट फिल्मची क्वालिटी उत्तम असायची. सर्वात जास्त ORWO नाव हे x-ray फिल्मवरच बघीतले.
पूर्वी बहुतेक हिंदी चित्रपट फुजी किंवा ईस्टमन कलरमध्ये असायचे. सर्वसामान्य प्रेक्षक रंगीत चित्रपटाला ईस्टमन कलरच म्हणायचा.
14 May 2021 - 10:04 pm | चौकटराजा
रंगात मला आठवतात ते इस्टमनकलर , मेट्रोकलर ( एम जी एम ) ,टेक्निकलर,,गेव्हाकलर ,फुजिकलर ओरवो कलर ई . बाकी स्क्रीन मध्ये १६ एमएम ,३५ एमएम ,७० एम एम , वाईडस्क्रीन ,ए ओ टॉड ,पॅनॉव्हिजन , सुपर पॅनोव्हिजन ई .
15 May 2021 - 4:03 pm | बबन ताम्बे
नारबाची वाडी या चित्रपटातील टायटल सॉंग आणि त्यासोबतची कार्टून्स झकास आहेत.
एकंदरीत चित्रपटच खूप सुंदर आहे.
18 May 2021 - 7:53 pm | सुरिया
नारबाची वाडी आणि शाळा दोन्हींचे टायटल्स एकदमच सुंदर आहेत. रिलायन्स मिडीया वर्क्सची कमाल आहे. मला फार आवडतात.
15 May 2021 - 9:43 pm | सरनौबत
जबरदस्त निरीक्षण आणि उत्तम लेख. धन्यवाद.
मैने प्यार किया चा इंट्रो (टायटल सॉंग - आते जाते हसते गाते) प्रचंड आवडला होता. OTT च्या जमान्यात सलग ३-४ भाग बघायचे असल्यास स्किप इंट्रो फारच सोयीस्कर आहे
15 May 2021 - 9:56 pm | आग्या१९९०
ते टायटल साँग Stivie Wonder च्या "I just called to say I love you गाण्याची कॉपी होती.
16 May 2021 - 5:08 am | फारएन्ड
दो और दो पाँच ची इन्ट्रो सुद्धा भन्नाट आहे. अमिताभ व शशी यांची कार्टुन रूपात टॉम अॅण्ड जेरी गिरी दाखवली आहे. अमर अकबर अँथनी आणि सुहाग - दोन्ही चित्रपटांत इण्ट्रो थोडी नंतर सुरू होते व ती लहान बाळे बिछडतानाच्या पार्श्वभूमीवर रफीची गाणी आहेत.
16 May 2021 - 2:53 pm | चौकस२१२
आणि शेवटची श्रेयनामावली
काही आणि खास करून ऐतिहासिक घटनेवरील चित्रपटातील चित्रीकरण नक्की कुठे झाले असेल याचा अंदाज बांधणे आणि शेवटच्या श्रेयनामावलीत ते बघणे हा हे मी कधी कधी करतो
उदाहरण: दुसरया महायुध्दातील काठांवरील चित्रपट
आखाती देशातील कठेंवर आधारित चित्रपट
नुकताच पाहिलेला "द कुरिअयर " सोव्हिएट रशिया तील ब्रिटिश हेरगिरी वर
मागे एक इरफान खान च्या चित्रपट ( नाव विसरलो ) तो पाकिस्तानातील भारतीय हेर दाखवलाय .. चित्रीकरण बहुतेक अहमदाबाद ला झाले आहे
16 May 2021 - 3:23 pm | कॉमी
स्किप इन्ट्रो च्या संशोधकाच्या कौतुकात आमच्यासारख्या असंख्य Ctrl.+Right key व्हिएलसी (VLC) वीरांचे दुर्लक्ष होत आहे याची नोंद व्हावी.
18 May 2021 - 8:00 pm | सुरिया
धन्यवाद रसिकगणहो.
इन्ट्रोच्या सर्व प्रेमिकांना म्हणजेच आनन्दा, फारएन्ड, चौकटराजा, आन्द्रे, सिरुसेरी, चौकस, कपिलमुनी, मराठी माणूस, शाविकु, मुक्तविहारी, तुषार, गॉडझीला, ज्ञानोबाचे पैजार, सर टोबी, कॉमी, प्रचेतस, आग्या, बबन तांबे, सरनौबत ह्यांना आणि सर्व रसिक वाचकांना धन्यवाद. खूप नवीन इंट्रो कळल्या अजून.
19 May 2021 - 5:06 pm | चौथा कोनाडा
व्वाम सुंदर लेख !
खरंच, इन्ट्रो ही एक वेगळीच क्रियेटिव्हीटी आहे !
कशाला स्किप करायची ती ?
मला आवडते बुवा बघायला !
19 May 2021 - 6:51 pm | मराठी_माणूस
जसपाल भट्टी च्या फ्लॉप शो चा इंट्रो मस्त विनोदी
20 May 2021 - 10:44 am | ॠचा
संपूर्ण लेख तर आवडलाच; पण लेखाचे शीर्षक खूपच लक्षवेधी आहे ! ...अतिशय चपखल . लेख लिहिताना आपण वाचकांना सगळ्या चित्रपटांच्या सुरुवातीचा प्रवास फारच सुंदर पद्धतीने घडवून आणलात!! आपण कुठल्याही ओ टी टी वर कुठलीही वेब सिरीज बघत असताना इतक्या पटकन ' स्कीप इंट्रो ' ला क्लीक करतो..अगदी आपल्याही नकळत! आता हा लेख वाचल्यानंतर प्रत्येक वेळा 'स्किप इंट्रो ' क्लीक करताना या लेखाची आठवण येईल हे नक्की!! :)