मुखवटा (गूढकथा)

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जनातलं, मनातलं
28 Apr 2021 - 6:55 pm

मुखवटा (गूढकथा)

खरेतर मी हे असे, घटनांचे ओझे घेऊन मिरवायला नको होते. किती वेळ! किती काळ! मी हे ओझे वागवणार होतो? शेवटी प्रत्येक गोष्टीला एक सीमा असतेच ना. मलाही आता त्या घटनांचा, त्या घटनांभोवतीच्या त्या बऱ्या वाईट जाणिवांचा त्रास व्हायला लागलाय. माझ्या सहनशक्तीच्या बाहेर, त्या जाणीवा जाऊ लागल्या आहेत. माझ्यासारखा सामान्य माणूस, या घटनांचा काय अर्थ लावू शकणार आहे? एका बंदिस्त वर्तुळापुरते मर्यादित असणारे माझे मन, त्या घटनांवर मंथन करण्याएवढे प्रौढ होते का? खरे तर माझ्या आसपास घडणाऱ्या घटना, त्या वर्तुळाच्या एकदम बाहेरच्या असाव्यात. म्हणुन तर त्यांचे धागेदोरे असे सहजासहजी माझ्या हाती लागत नव्हते. त्या घटनांचा बरा-वाईट अर्थ लावण्याचा, कितीही प्रयत्न करत असलो, तरी त्यात मी सपशेल फोल ठरत होतो. माझ्या मनात अनेक प्रश्न होते, पण आत्तातरी माझ्याकडे त्यांची उत्तरे नकारात्मकच होती.
        गेल्या पाच-सहा दिवसांपासून मी त्यासाठी धडपड करतोय, पण हाती काही लागले का? काहीच नाही. त्यातल्या त्यात मानवला याविषयी मोठ्या प्रयासाने, काहीतरी विचारायचा प्रयत्न केला, आणि तिथेही निराशाच झाली. उलट त्याच्या त्या गंभीर उत्तराने, त्या घटनांचे जाळे अजूनच गुंतागुंतीचे बनून गेले. माझ्या निराशेत अजूनच भर पडली. काय करावे, काहीच कळत नव्हते. एवढी दीर्घ हतबलता, यापूर्वी मला कधीच जाणवली नव्हती. नुसते स्वस्थ बसून चालणार नव्हते. काहीतरी हालचाल केल्याशिवाय, मला हवी ती स्वस्थता लाभणार नव्हती. मी आता ठरवून टाकले, जे काही करायचे ते आपणच करायचे. मानवला याविषयी काहीही सांगायचे नाही. किंवा आपल्या कृतीत त्याला सामील करून घ्यायचे नाही. हे जे काही आपल्या अवतीभोवती घडत आहे, ते काय आहे? कसे आहे? याविषयी मला काहीही माहीत नव्हते. त्या बाबतीत मी पूर्णपणे अज्ञानात होतो. माझी उत्सुकता आता कमालीची ताणली गेली होती. काहीही होवो, या प्रकरणाचा छडा लावायचा, हे मी मनोमन ठरवून टाकले होते‌. खरेतर हे जे काही मी करत होतो, किंवा पुढे करणार होतो, त्याच्याशी माझा काही घनिष्ट असा संबंध नव्हता. मला त्याहून काहीही देणे घेणेही नव्हते. मानवने मला त्याबाबतीत, स्पष्टपणे विरोध केल्यावर, मी त्या प्रकरणात, विनाकारण तोंडही खुपसायला नको होते. पण एकदा एखाद्या गोष्टीची उत्सुकता लागल्यावर, ती अशी सहज थोडीच शांत होणार होती! हातातल्या रिकाम्या वेळात  मी काहीतरी हालचाल नक्कीच करणार होतो.
  
आत्ताच शहरात उतरलोय.
काहीच अवधी झालाय.
खरेतर गावातून असा रागारागाने निघुन आल्याने, मी प्रचंड विषण्ण मनस्थितीत होतो. आणि आता हा शहरी गजबजाट, ही रहदारी, हा भोवतालचा भपकेबाजपणा माझ्या सहनशक्तीच्या बाहेर जात होता. मी पुरता गोंधळून गेलो होतो. कशाला येथे तडफडायला आलो, असे झाले होते. पण एवढ्या तावातावाने गावातून शहरात आलोय, तर हे सहन करावेच लागेल ना! त्याला काही इलाज होता का? काहीच नाही. आता जे जे वाट्याला येईल, ते ते गपगुमान सहन करण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
                हातातील पिशवी सावरत पुढे निघालो. मानव नेमका कुठे राहतो, हे निश्चितपणे मला सांगता आले नाही. पण हातातल्या कागदावर पुन्हा दोन-तीनदा नजर टाकल्यावर, मला त्याच्या पत्त्याचा काहीसा अंदाज लागला. प्रथमच अशा शहरात आलो असल्याने, थोडा गोंधळ उडणे सहाजिक होते. त्यात पुन्हा गावातील एकमेव व्यक्ती शहरात होता, तो म्हणजे मानव. त्याला येथे येऊन किती वर्ष झाले, हे सांगणे तसे कठीण. पण तो एकमेव व्यक्ती होता, जो या शहराचा आणि गावाचा दुवा होता. आता मीही त्याच्याकडे निघालो होतो.
                रिक्षावाल्याने शहरापासून काहीशा दूर अंतरावर मला आणून सोडले. आजूबाजूला सगळीकडे एकदम शांतता दिसत होती. कसलीच रहदारी कुठे नजरेस पडत नव्हती. मी काहीशा प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिल्यावर, त्याने अगदी नेमकेपणाने मला उत्तर दिले,
        
  " तुमच्या हातातल्या कागदावरचाच हा पत्ता आहे. येथून आत काही अंतरावर तुमचे ते घर असेल.
त्यामुळे अशा विचित्र नजरेने माझ्याकडे बघू नका."

त्याच्या त्या उत्तराने, मला जरा समाधान वाटले. पत्ता चुकला की काय? अशी भीती आता नाहीशी झाली. मी माझ्या इप्सित स्थळी पोहोचलो होतो. मानव नुसता म्हणायला शहरात असतो. पण तो असा शहरापासून एवढा दूर असेल, असे वाटले नव्हते. पण एकंदरीत ठीकच होते. शहरी गजबजाटापासून येथे कमालीचे शांत वाटत होते. मला हे असे वातावरण आवडले होते.
माझ्या समोर दिसते ती दुमजली इमारत, मानवचीच असावी, असे काहीसे अंतर्मनात उमटून गेले. इमारतीवर काही नाव वगैरे नव्हते. पण माझा एक अंदाज होता की, हीच ती इमारत असावी. मी हातातील पिशवी सावरत, इमारतीच्या खालच्या खोलिजवळ उभा राहिलो. खोलीचे दार लावलेले होते. पिशवी खाली ठेवत, मी दारावर टकटक केली. दारात मानव उभा दिसला.मी त्याला लगेच ओळखले. खूप वर्ष झाली असली तरी, चेहरा लगेच ओळखीचा जाणवला.
आधी त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव उमटले. मग लगेच एक ओळखीचे हसू आणत, त्याने मला खोलीत घेतले. त्याने मला ओळखले होते, याने मला बरे वाटले. आम्ही जास्त परिचयाचे नव्हतो. पण आता कित्येक वर्ष उलटून गेल्याने, जो अल्प परिचय होता तोही आता कमी झाला होता. पण तरीही त्याने मला असे लगेच ओळखल्याने, मला मोठे अप्रूप वाटले.
                  मला येथील सगळा भोवताल, चांगलाच भावला होता. आसपास घरांची गर्दी नव्हती. कुठला गजबजाट नव्हता. विरळपणे वस्ती विखुरलेली होती. बऱ्याच अंतरावर एखादे घर नजरेस पडायचे. मानव राहतो ती खोली चांगली ऐसपैस वाटली.त्याच्यावर जी खोली होती, ती बंद असावी. खालूनच तिला अडकवलेले भलेमोठे कुलूप नजरेस पडत होते. वर जायला अकरा- बारा पायऱ्यांचा जिना दिसत होता. वरची एक आणि खालची एक खोली सोडता, बाकी काही विशेष दिसत नव्हते तेथे. नवीन वसलेल्या उपनगराचा हा भाग असावा. नेमकीच वस्तीकरणाला सुरुवात झाली असावी. म्हणून अशी विखुरलेली घरे, नजरेस पडत होते. एकंदरीत शांत, सूनसान आणि स्थिर वसाहत जाणवली मला ती.
               तो दिवस काहीसा उदासपणे गेला. नेमकाच गावातून आल्याने, हे स्थित्यंतर भलतेच उदास वाटू लागले. पण एक तरी बरे होते, मानवची वागणूक चांगली होती. अतिशय अदबीने तो मला वागवीत होता. माझ्याप्रती त्याचा व्यवहार एकदम निर्मळ होता. मी पुढे काय करणार होतो? हे काहीच माहीत नव्हते. पण काहीतरी कामधंदा करूयात, असे मनोमन ठरवून टाकले होते. मानवला विचारून एखादे काम बघू, किंवा मग तो जेथे काम करत असेल, तेथेच एखादे काम बघू, असा काहीसा विचार करून, मी मनातले सारे विचार काढून टाकले.
        दिवसापेक्षा आता रात्रीची जाणीव, कमालीची शांत जाणवत होती. आजूबाजूचा भोवताल निपचित पहुडला होता. कुठलाही आवाज कानावर पडत नव्हता. सूक्ष्म हालचालीही कानापर्यंत येत होत्या. झोप अशी लागत नव्हती. शेजारीच मानव झोपला होता. मला ही शांतता खायला उठू लागली. क्षणभर मानवशी काहीतरी बोलावे, असे वाटून गेले. पण तो झोपला होता. त्याला उठवणे मला जमले नाही. त्याला उद्या कामावरही जायचे असेल, त्यामुळे त्याची झोपमोड करण्यात काहीही अर्थ नव्हता. मी तसाच पडून राहिलो. वर छताकडे एकटक बघत, मनातल्या विचारांना वाट मोकळी करून देऊ लागलो.
        कालपासूनच्या सगळ्या घडामोडी डोळ्यांपुढे तरळून जाऊ लागल्या. सगळ्या घटना कशा अनपेक्षितपणे घडतं गेल्या होत्या. कालच्या सकाळचा तो प्रसंग. गावातील देवकी आबा सोबत झालेली भांडणे, त्या भांडणात त्याने माझ्यावर उगारलेला, तो भला मोठा चाकू, तो चाकू पाहूनच मी कसा गर्भगळीत झालेलो? पुन्हा देवकी आबा बरोबर नादाला लागायचे नाही, असे ठरवून आता कुठेतरी शहरात जाऊन, काहीतरी कामधंदा करू, असा विचार करून गावातून असा येथे आलो. येथील सुरुवातीचा तो प्रचंड कलकलाट, त्यानंतरची येथील ही अशी घनघोर शांतता आणि पुन्हा उद्याचे काही प्रसंग, काही घडामोडी, सगळे कसे अनपेक्षित आणि अचानक घडले, असेच वाटत राहिले.
              कितीतरी वेळ मी असा निवांतपणे विचारात घालवला. शांततेत हजारो विचार मनात उलथापालथी घालत होते. डोक्यातले ते बरे वाईट विचार डोळ्यापुढे दृश्यमान होऊन, मन:पटलावर उमटत होते. किती वेळ गेला, काही कळले नाही. पण कसल्यातरी आवाजाने माझी ती विचारांची समाधी भंग पावली होती. कसलातरी आवाज झाला होता. पण कशाचा झाला, हे कळले नाही. श्वास रोखून मी पुन्हा काही आवाज होतो का, हे बघू लागलो. पुन्हा आवाज झाला. आवाज अगदी जवळून आल्यासारखा वाटला. खोलीच्या बाहेर कोणाचीतरी पावले वाजली होती. मी सावध झालो. पावलांचा आवाज आता, खोलीककडून जिन्याकडे वळाला होता. जिन्यावरून कोणीतरी वर जात होते. पाठोपाठ आता ते भलेमोठे कुलूप काढल्याचा आवाज झाला. नंतर दार आत ढकलल्याचा. वर कोणीतरी आले होते. म्हणजे वर राहणारा व्यक्ती आला होता तर! मला प्रथमच आमच्या दोघां व्यतिरिक्त, तीसरेही येथे कोणीतरी आहे, याची जाणीव झाली. माझ्या मनात संमिश्र भावना उमटून गेल्या. चला, म्हणजे कोणीतरी तीसराही आपल्याला येथे सोबती आहे, या जाणिवेने मला बरे वाटले. पण तो व्यक्ती एवढ्या रात्री कसा आला? हा प्रश्न मनात उमटून गेला. कदाचित रात्रीचे काम संपवून तो घरी आला असेल. हो, तसेच असेल. काम करायचे म्हटल्यावर, दिवस काय आणि रात्र काय? काम हे करावेच लागते. थोड्यावेळ वरतून पावलांचा आवाज आला. आणि मग काही वेळानंतर तोही शांत झाला. बहुतेक तो व्यक्ती आता झोपला असावा. मघापासून रोखलेला माझा श्वास मोकळा झाला. त्यानंतर मात्र मी मनातून सगळे विचार झटकून टाकले, आणि झोपेच्या अधीन झालो.
               आपल्या अवतीभोवती काय घडतं आहे? कसे घडतं आहे? याकडे आपण सजग दृष्टीने पाहणे जेवढे गरजेचे असते, त्यापेक्षा जास्त हे गरजेचे असते की, काही घटनांकडे दुर्लक्ष करणे. ज्या घटनांशी आपला प्रत्यक्षपणे संबंध येत नसेल, तर त्या घटनांच्या मुळाशी जाण्यात काय अर्थ असतो? विनाकारण कोणाच्या आडवाटेने जाण्याने, स्वतःलाच प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. ढळढळीत दुपारी कोणी, धुळीच्या रस्त्यावरून जात असेल तर, वर मान करून सूर्याकडे पाहण्यात कोणता शहाणपणा असतो? त्याने काही साध्य होणार आहे का? उलट काही क्षण दृष्टी क्षीण होऊन जाईल, डोळ्यांत उन्हाचे भाले शिरतील, आणि काही क्षण डोळे निपचित केल्याशिवाय काही गत्यंतर उरणार नाही. अगदी माझेही तसेच नव्हते का? विनाकारण त्या वरच्या खोलीचे विचार मनात घोळत होते. त्यावाचून मला काही देणे घेणे नव्हते. उगाच त्या विचाराच्या गर्तेत मी गंटाळ्या खात होतो.     सकाळी मुळात जाग आली, ती खूप उशिराने. रात्री बराच वेळ जागत असल्याने, सकाळी लवकर उठता आले नाही. मी उठलो, तेव्हा आठ वाजून गेले होते. मानव कदाचित लवकर उठून, कामावर निघून गेला असावा. मी झोपेत असल्यामुळे, मला तो कधी गेला काही कळले नाही. उन्हाचे कवडसे खोलीभर पसरून गेले होते. खोलीच्या बाहेर येऊन मी एकदा सर्वत्र नजर फिरवली. आसपास काहीच हालचाल जाणवेना. आसपास कोणी माणूस दृष्टिपथात पडत नव्हता. कसे एकदम भकासवाणे वातावरण अवतीभोवती पसरले होते.
               आपसूकच माझी नजर, वरच्या त्या खोलीकडे  गेली. खोलीला आता ते भले मोठे कुलूप अडकवलेले होते. म्हणजे कालचा माणूसही कामावर निघून गेलेला असावा. आपल्या उठण्याआगोदर, कुलूप लावून तो कामावर गेला होता. कुठे जात असेल तो कामाला? कोणते काम करत असेल? मुळात तो व्यक्ती कसा असेल? स्त्री असेल की पुरुष असेल? तरुण असेल की वृध्द? मनात उगीचच असे प्रश्न उमटून जात होते. मी उगाचच त्या व्यक्तीचा, नको तितका विचार का करत होतो? का करतोय मी त्याचा एवढा विचार. कदाचित नुसता रिकामा वेळ असल्याने, मनात हे असे विचार घोळत असतील. किंवा मग कदाचित कालच्या मध्यरात्रीच्या, त्याच्या त्या हालचाली आठवल्यामुळे असे होत असेल. पण एक गोष्ट मात्र पक्की होती, मी त्या व्यक्तीचा जरा जास्तच विचार करत होतो. कदाचित त्याची सोबत आपल्याला मिळावी, म्हणूनही तेच ते विचार डोक्यात येत असतील. असो!
      त्याच्या त्या कुलूपावरून नजर हटवून, मी खोलीत आलो. मनातले विचार बाजूला केले. दिवसभर आता खोलीत लोळत पडण्याशिवाय, दुसरे कुठलेच काम नव्हते. दोन घास कसेतरी पोटात टाकले. आणि अंथरुणात अंग टाकून दिले. पुन्हा आता वरचे छत डोळ्यांसमोर दिसत होते. त्या छताच्या वर तो राहत असेल. आत्ता ती खोली रिकामी असली तरी, रात्री येऊन तिथे तो झोपत असतो. मध्यरात्री त्याच्या त्या हालचालींचा आवाज येत असतो. मला हलकेच हसू आले. मी पुन्हा त्याच विचारात गुंग झालो होतो. भरकटलेल्या मनाला मला ताळ्यावर आणायला, थोडा वेळ लागला, पण मी एकदाचा शांत झोपी गेलो होतो.
          

   मला नव्हते वाटले की, माझ्या या अशा साध्या सरळ प्रश्नाने, मानव एवढा गंभीर होऊन जाईल. त्या प्रश्नाने, त्याच्या त्या चेहऱ्यावरचे संमिश्र भाव पाहून, मला एकदम नवल वाटले. भीती, गोंधळ, आश्चर्य आणि विषण्ण झालेला त्याचा चेहरा पाहून, मी त्याला तो प्रश्न का विचारला असेल, असे मला वाटून गेले. सायंकाळी तो कामावरून नेमकाच आला होता. दिवसभराच्या रिकाम्या वेळेमुळे, अंगभर शिण पसरून गेला होता. एकतर कोणी सोबतीला नसल्याने, एक शब्दही कोणाशी बोलता आला नव्हता. त्यामुळे आल्या आल्या मानवशी बोलायला मी सुरुवात केली. तो काहीसा थकलेला दिसत असला तरी, त्याच्याशी बोलायचा मोह मला आवरला नाही.

 "आज उशीर झालाय तुला?
माझ्या कामाची कुठे चौकशी केलीस का नाही?"
मी मोठ्या अपेक्षेने त्याला विचारले.
      
  "नाही!"

असे अतिशय त्रोटक उत्तर त्याने दिल्याने, मला काहीसे आश्चर्य वाटले. त्याचा नुर बहुतेक चांगला नव्हता. त्यामुळे तो असा बोलत असेल. मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. काही विषयांतर करावे म्हणून, मी पुन्हा सहज प्रश्न केला.

"वर कोण असतो रे राहायला?"
मध्यरात्री मला बाहेर पावलांचा आवाज आला होता.
नंतर कुलूप उघडल्याचा, आणि त्यानंतर दार उघडल्याचा. शेवटी वरून काही वेळ आवाज आला आणि नंतर एकदम शांतता झाली. नेमके कोण आहे वर राहायला?"

मला तर मी काय चूक केलीय, काहीच कळाले नाही. माझ्या तो प्रश्न विचारल्याबरोबर, तो एकदम चवताळून माझ्या अंगावर धावून आला. त्याचा चेहरा कमालीचा गंभीर झाला होता. त्याचा नूर बिघडलेला होता, हे मान्य! पण तो असा अक्राळविक्राळ होईल असे वाटले नव्हते.
 
"हे बघ, तू नसत्या भानगडीत पडू नकोस.
कोण कुठे राहतो? कसा राहतो? याच्या चौकश्या करू नकोस. याकडे जेवढे दुर्लक्ष करशील, तेवढे तुझ्यासाठी चांगले राहील. तुला लवकर काहीतरी काम मिळवून देतो.नीट कामाला लाग!"

मला हे सगळे अनपेक्षित होते. तो एवढा आकांडतांडव करेल, असे माझ्या कल्पनेतही आले नव्हते. कदाचित त्याने मला अगदी सौम्य भाषेत, हे असे सांगितले असते, तर कदाचित मी त्याकडे कधीच दुर्लक्ष केले असते. माझ्या मनातही काही शंका कुशंका आल्या नसत्या. पण आधीच अती उत्सुक असलेले माझे मन, आता कमालीचे अधीर बनले होते. डोक्यात नुसते प्रश्नच प्रश्न उमटून जात होते.
               मानव एवढा का आकांडतांडव करतोय? किती साधा सरळ प्रश्न होता माझा. मग त्यासाठी एवढी आदळआपट कशासाठी? असा काय अतार्किक होता माझा प्रश्न. तो एवढा हवालदिल झालाय, त्या अर्थी नेमके काय गूढ होते, त्या प्रश्नामागे . कोणती गूढ, रम्य कारणमीमांसा असावी त्याच्या मागे. मला काहीच कळत नव्हते. त्याच्या या अशा बोलण्यावर काय व्यक्त व्हावे, हेच मला समजेना.
              मी हलकेच मान खाली घातली. आणि शांत बसून राहिलो. तो बराच वेळ तसाच उद्विग्न मनस्थितीत होता. आम्ही दोघेही एकमेकांना काहीच बोललो नाही. पण मी आता मनात पक्के ठरवले होते की, आता याविषयीच्या संदर्भात मानवला काहीच विचारायचे नाही. तो विषयच काढायचा नाही. त्याला जर तो विषय वेदनादायी वाटत असेल तर, कशाला तो विषय काढून त्याला मनस्ताप द्यायचा?
          रात्र झाली होती. आमच्या दोघांत जास्त काहीच संभाषण झाले नाही.तो कदाचित अजूनही माझ्यावर नाराज होता. त्याच्या जागी तो योग्य होता. त्याच्या रागाच्या पाठीमागचे कारणही काहीतरी संवेदनशीलच असेल. त्यामुळे तर तो असा बेचैन झाला होता. कालच्या सारखीच मला आजही झोप येत नव्हती. तो कधीच झोपेच्या अधीन झाला होता. तोंडावर पांघरून घेऊन तो निपचीत पडला होता. मला उगीचच हसू आले. त्याला मनस्ताप होईल, असे त्याच्या देखत तरी वागायचे नाही, असे ठरवून मीही झोपेच्या अधीन होऊ लागलो. तोच कालचा तो आवाज आला. कालचीच वेळ झाली असावी. मध्यरात्र उलटून काहीच अवधी झाला होता. कालच्या वेळेला तो आला होता. आता मला नेमकेपणाने नाही सांगता येणार तो, तो आहे की ती, पण कदाचित तोच असावा. आवाजाचा क्रम कलच्यासारखाच आला. आधी पावलांचा आवाज आला, पुन्हा तो आवाज जिण्याकडे वळाला, त्यानंतर तो कुलूप उघडल्याच आवाज झाला. पुन्हा दार ढकलल्याचा  आणि शेवटी वरून काहीवेळ पावलांचा इकडून तिकडून फिरल्याचा आवाज येऊ लागला. आणि त्यानंतर ती शांतता. सगळे काही जवळपास कालच्या सारखेच घडले होते. कदाचित त्याचा तो नित्यक्रम असावा. म्हणून त्याच्या कृतीत रोज एवढी समानता येत असावी.
                   माझी उत्सुकता चांगलीच चाळवली होती. असेच ताडकन उठावे आणि वर खोलीत जाऊन पहावे, तो नेमका कोण आहे? त्याला विचारावे तू कोण आहेस? काय करतो? एवढ्या रात्री का येतोस? पण यापैकी मी काहीच करू शकलो नाही. उत्सुकता तर फार होती. पण, लगेच मघाचे ते मानवचे बोलणे आठवले. मी सहज त्याच्यावर नजर टाकली.  तो आपला आरामात झोपलेला होता. त्याने मला नसत्या भानगडी करायला स्पष्टपणे विरोध केलेला होता. त्यामुळे त्याचा विरोध डावलून मी असा त्याला बघायला वर कसा जाऊ शकलो असतो?
              मनात नाना विचार पिंगा घालत होते. मन अस्थिर झाले होते. नेमके अवतीभोवती काय घडतं आहे, काहीच कळत नव्हते. ते मानवचे विक्षिप्त बोलणे, त्याचा तो गंभीर चेहरा, सगळे कसे अचंबित करणारे होते. अगदी कोड्यात टाकणारे होते. नित्य व्यवहारापेक्षा एकदम निराळे. माझ्या विचारांना मर्यादा येत होत्या. मला अपेक्षित असे उत्तर  मिळत नव्हते. ज्याअर्थी मानव एवढा विचलित झाला होता, त्याअर्थी त्याच्या पाठीमागे काहीतरी मोठी पार्श्वभूमी असावी. कारणमीमांसा असावी. पण ती नेमकी काय असावी, याचा काहीच अंदाज लागत नव्हता. माझी उत्सुकता आता एकदम टिपेला पोहोचली होती. एकदम अस्वस्थ वाटायला लागले होते. मनात चलबिचल चालली होती. त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाल्याशिवाय मला चैन पडणार नव्हती, हे मला आता समजले होते. पण नेमके काय करावे? हा प्रश्न होता. त्याचे नेमके असे उत्तर, आतातरी माझ्याजवळ नव्हते. डोक्यात नुसते काहूर माजले होते. आणि त्या विचारांच्या गर्दीत माझा डोळा कधी लागला, हे समजले नाही.
मी कधी झोपलो आणि पुन्हा कसा जागा  झालो, काहीच समजले नाही. सकाळचा पाच साडे पाचचा सुमार झाला असावा. एवढ्या सकाळी मला कधीच जाग येत नसे. पण आज कशी आली, काही समजले नाही. कुठल्यातरी आवाजाने ती आली होती, हे नक्की. आणि आवाजही नेहमीप्रमाणे वरूनच आलेला होता. पण आता आवाज अगदी उलट पद्धतीने आला. वर आधी थोड्यावेळ काही पावले इकडून तिकडे फिरले. त्यानंतर दार ओढून घेतल्याचा आवाज, आणि त्यानंतर कुलूप लावल्याचा आवाज. मी एकदम सावध झालो. झटदिशी मानवकडे नजर टाकली. तो झोपलेला होता. तो अजून अर्धा पाऊण तास उठण्याची शक्यता नव्हती. मला चांगलीच संधी चालून आली होती. माझ्या हातात जास्त वेळ नव्हता. तो वरचा व्यक्ती काहीच अवधीत खाली येणार होता. त्याला पाहण्याची ही संधी मी सोडणार नव्हतो.
                 कोवळा अंधार आजूबाजूला पसरलेला होता. प्रकाश अपुरा असला तरी, आठ- नऊ फुटांवरचे स्पष्ट दिसेल, एवढा गडद होता. गार वारा अंगाला झोंबून जात होता. एक प्रकारची शांतता सगळीकडे अवतरलेली होती. मी हळूच अंथरुणातून उठलो. हलकेच दरवाजा उघडला. आवाज होणार नाही, याची दक्षता घेऊन, मी हलकेच दरवाज्यातून डोके बाहेर काढले. आणि अशा पवित्र्यात उभा राहिलो की, वरून खाली येणाऱ्या, जिन्याच्या सगळ्या पायऱ्या दृष्टिपथात येतील. श्वास एकदम एका लयीत सुरू होता.   
            संथपणे ते दोन पावले पायऱ्यांवरून खाली येत होते. काळया गडद रंगाचे ते उंच पोटरीपर्यंतचे बूट, तशाच काळया रंगाची घट्ट विजार आणि तसाच गडद काळया रंगाचा गुडघ्यापर्यंत खाली आलेला कोट, हे सगळे क्रमाक्रमाने माझ्या नजरेसमोर  येत होते. आणि सगळ्यात शेवटी नजरेस पडला, त्याचा तो पांढरा चेहरा. चेहरा नव्हताच तो! चेहऱ्यावर पांढरा मुखवटा चढविलेला होता. विदूषक वापरतात तसा. सगळा पांढरा आणि त्याच्यावर डोळ्यांच्या जागी दोन लाल खोबण्या. सरसर करत माझ्या अंगावर काटा उमटून गेला. अशा निरव शांततेत, हे असे काही नजरेस पडेल, याची कल्पनाही माझ्या मनात आली नव्हती. शेवटच्या पायरीवर येईपर्यंत, त्याचा तो सगळा देह माझ्या नजरेस पडला. सगळा देह काळया कपड्यात झाकला गेला होता. चेहऱ्याच्या जागी तो पांढरा मुखवटा, त्यावरचे ते दोन लाल डोळे, ते दृश्यच भयंकर दिसत होते. एकतरी बरे झाले, मी दरवाजाच्या आडून त्याला बघत होतो. मी जर आत्ता त्याच्या प्रत्यक्षपणे समोर असतो तर, माझी अवस्था कशी झाली असती, याचा विचार न केलेलाच बरा!
              त्याचा सगळा अवतार कोड्यात टाकणारा होता. त्याची येण्या जाण्याची वेळही, अगदी नित्य व्यवहारापेक्षा निराळी होती. हे नेमके प्रकरण काय आहे? याचा काहीच संदर्भ लागत नव्हता. एका वेगळ्या मितीच्या सापेक्षतेने, मी त्याच्या त्या व्यक्तिमत्वाची चाचपणी करू लागलो. पण तरीही हाती काही लागेना गेले.
                 त्याच्या अंगावरचा तो काळा कोट, त्याचे ते घोट्यापर्यंतचे बूट आणि चेहऱ्यावरचा तो मुखवटा, कदाचित तो एखाद्या सर्कशीत काम करत असावा. हेही असू शकते. कदाचित सर्कशीचे प्रयोग सकाळी लवकर सुरू होत असावेत, आणि रात्री उशिरापर्यंत चालत असावेत. म्हणून हा असा अवतार परिधान करून जात असावा. ते काहीही असो, त्याने मला चांगलेच अचंबित केले होते. त्याच्याविषयी मनात एक अधीरता दाटून राहिली होती. मी अजूनच त्याच्या व्यक्तिमत्त्वाजवळ पोहोचलो होतो. त्याच्याविषयी ओढ आता कित्येक पटींनी वाढली होती. ती ओढ कशी होती? हे मला सांगता आले नसते. चांगली, वाईट ती कशीही असो, पण त्याच्याविषयी आता मला प्रचंड कुतूहल निर्माण झाले होते.
                  त्याने मला आता संभ्रमात टाकले होते. त्याच्या मुखवट्या आडचा, तो चेहरा मला पहायचा होता. त्याने मला भुरळ घातली होती. माझ्या मनात चाललेल्या, त्या अनेक उलथापालथी, मला मानवपासून लपावायच्या होत्या. कारण, त्याला या गोष्टी समजल्या असत्या तर, तो माझ्यावर प्रचंड चिडला असता. रागाच्या भरात, त्याने मला येथून जायला सांगायलाही कमी केले नसते. त्यामुळे मी त्याला यातले काहीच सांगणार नव्हतो.
                 मी येथे या शहरात आलो होतो, तो कशासाठी? हा प्रश्न आता कधीच मागे पडला होता. माझा सगळा मनोव्यापार  आता त्या मुखावटाधारी व्यक्तीने व्यापला होता. माझे कशातच लक्ष लागत नव्हते. मनातील बेचैनी सारखी वर उफाळून येत होती. मी असा का वागत होतो? हे माझे मलाच समजत नव्हते. मी माझ्याच आवाक्याबाहेर जात आहे, अशी काहीशी जाणीव मला व्हायला लागली होती. कशाचातरी हळूहळू परिणाम माझ्या एकूण व्यक्तिमत्वावर होत चाललाय, ही अनुभुती मला आता प्रकर्षाने होत होती. किती ही उत्सुकता? मी कशासाठी ही धडपड करत होतो? तेही मानवने असा प्रखरपणे विरोध केल्यावरही. मला माझ्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते. पण माझ्या या अवती भोवतीच्या घटनेचे कोडे मात्र  हळूहळू सुटत चालले होते. आधी एकदम अपरिचित असलेला तो, आता निदान दृष्टीसमोर तरी आला होता. भले त्यावर मुखवटा चढविलेला असेल, पण त्याचे एकूण आकारमान तरी, आता मला ठाऊक होते. प्रकरणाची सुरुवातीची उकल तरी मला झालेली होती.
             

आजची सायंकाळ काहीशी आनंदाची वाटून गेली. मानव मुळात आज खुश दिसत होता. कामावरून आल्या आल्या, त्याने मला ती बातमी सांगितली. मला एका ठिकाणी काम मिळाले होते. एवढ्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर का होईना, पण एकदाचे ते मिळाले होते. मला त्या गोष्टीचा आनंद होता, पण त्याहीपेक्षा मानव आज खुशीत होता, याचे मला मोठे अप्रूप वाटत होते.
त्याच्या कालच्या त्या माझ्याप्रती व्यवहाराने, माझा चांगलाच हिरमोड झालेला होता. पण त्याच्या आजच्या या आनंदाने, मला बरे वाटून गेले. दुसरी गोष्ट म्हणजे, मी आज तो मुखवटा पहिला होता. एकंदरीत आजचा दिवस चांगलाच सुदैवी ठरला होता.
            आता फक्त एक काम बाकी होते. तेवढे झाले की, मग मी मोकळा होणार होतो. मग निवांतपणे कामाला लागून, या सगळ्या भानगडीतून मुक्त होणार होतो. आज सगळ्या गोष्टी चांगल्या घडल्या होत्या. त्यामुळे आजच ते काम पूर्ण करू, असा काहीसा विचार मनात घोळू लागला. नेहमीप्रमाणे सगळे नित्यानियम उरकून आम्ही दोघे अंथरुणात पडलो होतो. मानवने आज मला काहीच वेडेवाकडे बोलणे केले नाही. तो आज भलताच खुश होता. मला काम मिळाले, याचा आनंद त्याला माझ्यापेक्षा जास्त झालेला होता. काही वेळातच तोंडावर पांघरून घेऊन, तो निवांतपणे झोपी गेला. मला हायसे वाटले. तो झोपला म्हणजे, मी माझे काम करायला मोकळा होतो.
                आता सगळा वेळ रिकामा होता. फक्त मध्यरात्र होण्याची वाट बघत बसावे लागणार होते. अजूनही मनात तो प्रश्न उमटत होता. आपण हे सगळे का करत आहोत? खरेतर त्याचे एकच उत्तर होते, 'केवळ उत्सुकतेपोटी.' बस्स! एवढेच! बाकी काही नाही.
     हळूहळू रात्र धीम्या गतीने पुढे सरकत होती. वर छताकडे बघत, मी एक एक क्षण मागे टाकत होतो. पलापलाने अधीरता वाढत होती. घड्याळाच्या काट्याबरोबर, माझी स्पंदने गोल गोल फिरू लागली. श्वास स्थितिज उर्जेसारखा देहात सामावला जाऊ लागला. मी प्रचंड उत्सुकतेने मध्यरात्रीची वाट बघू लागलो. असे एकदम उठावे, हा काळाचा प्रहर, दोन्ही हाताने जोर लावून पुढे  ढकलावा, तो मध्यरात्रीच्या आसपास आणून सोडून द्यावा, असे हास्यास्पद विचारही मनात तरळून जाऊ लागले. शरीरातील हजारो लाखो पेशी ताठपने उभ्या राहून, त्याची येण्याची वाट बघू लागल्या. माझे शरीर या अंथरुणात पहुडलेले असले, तरी त्याच्या अंतर्गत उत्सुकतेच्या किती किती बंडाळ्या माजु लागल्या, हे माझे मलाच माहीत.
               अखेर तो क्षण नजीक येऊन ठेपला होता. घड्याळांचे दोन्ही लहान मोठे काटे एकमेकांवर आले होते. मध्यरात्र झाली होती. आता कोणत्याही क्षणी, त्याच्या पावलांचा आवाज, माझ्या कानात शिरला असता. हळूहळू कानाच्या संवेदना सावध होऊ लागल्या, सगळे लक्ष पावलांच्या आवाजाकडे लागले होते.
              त्यानंतर क्षण दोन क्षणच गेले असतील. काहीतरी सूक्ष्म हालचाल बाहेर जाणवली. कोणीतरी इकडे येत असल्याची जाणीव, सरसर करत मेंदूपर्यंत गेली. माझे सर्व अंग ताठ झाले. शरीराने आपोआप पूर्वतयारीचा पवित्रा घेतला. आणि तो आवाज कानावर पडला. बाहेर पावले वाजली होती. एक.. दोन.. तीन.. चार... अशी पावले पडली होती. सरळ पडणारी पावले, आता डावीकडे वळून, जीन्याकडे निघाली होती. एकेक पायरी पार केली जात होती. खोलीपर्यंतचे अंतर कमी केले जात होते.
             ' खड्खड्' असा कुलूप उघडल्याचा आवाज झाला. म्हणजे त्याने एकदाचे कुलूप उघडले होते. आता ते दार हळूहळू आत जाणार होते. मी स्तब्धपणे दार ढकलण्याची वाट बघत होतो. अखेर त्याने दार आत ढकलले होते. आता तो खोलीत गेला होता. पुन्हा दार आतून बंद केल्याचा आवाज आला.
                 आता येथून पुढे माझी बारी होती. माझे काम सुरू होणार होते. मी झट्दिशी पांघरून बाजूला केले. एकवार मानवकडे नजर टाकली. तो पांघरून डोक्यावर घेऊन, निपचित पडला होता. मी दाराजवळ आलो. हलकेच दार उघडले. माझा श्वास आता वाढला होता. हृदयाची स्पंदने आता गतीने पडत होती. मी जिन्यावर आलो. त्या जिन्याची एकेक पायरी चढताना, मला मोठे प्रयास पडू लागले. श्वास थांबवून मी वरची चाहूल घेऊ लागलो. वर कमालीची शांतता जाणवू लागली. अखेर मी सगळ्या पायऱ्या चढून, दाराजवळ पोहोचलो होतो. आता केवळ त्याच्या आणि माझ्या मध्ये, तेवढे दार होते. तो दाराआत होता आणि मी दाराबाहेर.
            आतून आता काहीतरी आवाज येत होता. तो कदाचित इकडून तिकडे खोलीत फिरत असेल. मी आजूबाजूला नजर टाकली. माझ्यापुढे काही अंतरावर खिडकी होती. मी पावलांचा आवाजही न होऊ देता त्या खिडकीजवळ गेलो.
         एव्हाना आता रात्र गडद जाणवायला लागली होती. आजूबाजूला फक्त घनघोर शांतता पसरली जात होती. हे सगळे बदल माझ्या विरोधात जात आहेत, असे जाणवू लागले. रात्रीचे रूप पालटले जात होते. तिच्यातला नैसर्गिकपणा कमी कमी होत होता. आजूबाजूचा तणाव वाढू लागला. सजीव हालचाली हळूहळू कमी होत होत्या. हजारो- लाखो श्वास एकदम रोखले गेले आहेत, अशी जाणीव मनात उमटू लागली. वारा कधी थांबलाय, हेही कळले नाही.
            मी खिडकीतून आत नजर टाकली. आता ती काळी आकृती अस्थिरपणे हलत होती. तोच तो सकाळचा पोशाख तिच्या अंगावर होता. तिची ती पाठमोरी आकृती, त्या काहीशा मंद उजेडातही, मला स्पष्टपणे दिसत होती. आता तो आपल्या अंगावरचे कपडे काढत होता. त्याने बूट काढला. ती घट्ट विजार काढली. आणि तो काळा कोटही काढून टाकला. आता मला अस्पष्ट दिसू लागले. धूसर हालचाल जाणवू लागली. त्याच्या शरीराचा भाग दृष्टिपथात येत नव्हता. तोंडावरचा मुखवटा मात्र त्याच्या त्या, पांढऱ्या रंगामुळे दिसत होता. माझा श्वास स्थिर होता.
           त्याने उजवा हात वर केला होता. तो तसाच चेहऱ्याजवळ आणत, त्याने एकदम तो मुखवटा बाजूला केला. आणि क्षणात ते घडले गेले. त्याने कधी तो मुखवटा काढला, आणि कधी तो मागे वळून, सरकन माझ्या अगदी चेहऱ्याजवळ आला, हेच कळाले नाही. आमच्या दोघांच्या चेहऱ्यामधे, त्या खिडकीच्या गजांचे माध्यम असले तरी, तो एवढ्या चपळाईने माझ्याजवळ आला होता की, मला क्षणभर कशाचाच बोध झाला नाही.
                दोन तीन क्षण निघून गेले, आणि एकदम मला ती जाणीव झाली. अंगावर हजारो काटे तत्क्षणी उभे राहिले. शरीरातील रक्त उकळते झाले. मी शेकडो मैल वेगाने, पायऱ्यांवरून खाली धावत येत होतो. पाय विजेच्या गतीने खोली जवळ करत होते.
            मी धाड्दिशी दरवाजावर आदळलो गेलो. मला त्याची पर्वा नव्हती. मला सुरक्षित जागी जायचे होते. आणि माझ्या खोलिशिवाय दुसरी कुठली जागा, मला त्या क्षणी सुरक्षित जाणवली नाही. माझ्या मेंदूतले विचार ठप्प झाले होते. भीती सोडता, सगळ्या संवेदना लोप पावल्या होत्या. मी तोंडावर पांघरून घेऊन अंथरुणात शिरलो होतो. स्वतःभोवती त्या पांघरूनाचे कवच निर्माण करत होतो. पण दुसऱ्याच क्षणी पुन्हा ती जाणीव झाली. मी एका झटक्यात पांघरून बाजूला केले. आणि थरथरत्या हाताने मानव झोपला होता, तेथील पांघरून दूर करू लागलो. मला माहित होते. त्या पांघरुणाखाली मानव नसणार आहे. ती जागा रिकामी असणार आहे. मुळात मानवची ही जागा कधीच मोकळी झालेली होती. फक्त ती मला आज जाणवली. तो कधी या खालच्या खोलीत नव्हताच. त्याची जागा तर वर होती. वरच्या खोलीत. तो तिथेच राहत होता. त्या मुखवट्याआड.
              हळूहळू आता या खोलीचे, रूप दृश्यमान होऊ लागले. इथे सर्वत्र पांढरी धूळ पसरलेली होती. पालापाचोळा सर्वत्र विखुरलेला होता. खोलीत असणाऱ्या मोजक्या वस्तूंवर, पांढरे सफेद कापड झाकलेले होते. कित्येक वर्षांपासून तिथे सजीव राहत असेल, याचे काहीच निशाण दिसत नव्हते.
         मी धडपड करून, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न म्हणून, खोलीबाहेर पडायचा प्रयत्न करू लागलो. पण मला माहित होते, आता माझ्या दृष्टीस, चैतन्य असे काहीच दिसणार नाही. तो मुखवटा, त्या मुखवट्याआड असणारा चेहरा बघण्या आगोदरच, मी सगळे चैतन्य बघू शकत होतो. आता मला ते कधीच जमणार नव्हते.
    मी जड पावलांनी खोलीबाहेर आलो. बाहेर सगळीकडे तशीच धूळ, पालापाचोळा पडलेला दिसत होता. कुठेच सजीव हालचाल जाणवत नव्हती. मी वरच्या खोलीकडे नजर फिरवली. मी हलकेच हसत वर गेलो. तिथे वर टांगलेला तो काळा बूट, ती काळी घट्ट विजार आणि तो कोट अंगात घातला आणि हो, तो मुखवटा चेहऱ्यावर लावायला मात्र विसरलो नाही.
               त्या दिवशी दुपारी हलकेच दारावर टकटक झाली. मी दार उघडले. मी एकदम ओळखीचे हसत त्याला आत घेतले.  तो सांगत होता,
" मी गावाकडून आलोय आपल्या.
काहीतरी कामधंदा करावा म्हणतोय.
तुही मानवकडे आला. कामाला लागलास.
आता मलाही लाव."
तो असे म्हणत होता आणि मी मात्र मनातल्या मनात हसत होतो. का नको हसू? माझी जागा घ्यायला कोणीतरी हवे ना?

समाप्त.
वैभव नामदेव देशमुख.

कथालेख

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

29 Apr 2021 - 1:37 pm | विजुभाऊ

अरे बापरे......
रत्नाकर मतकरींची आठवण झाली

रंगीला रतन's picture

29 Apr 2021 - 2:32 pm | रंगीला रतन

जबरी!

मार्गी's picture

29 Apr 2021 - 6:03 pm | मार्गी

खूपच जबरदस्त आणि उत्तम मांडणी!

nanaba's picture

29 Apr 2021 - 6:16 pm | nanaba

मस्त जमलीये!

vaibhav deshmukh's picture

29 Apr 2021 - 6:48 pm | vaibhav deshmukh

सर्वांचे मनापासून आभार.
असे अभिप्राय आले की, लिहिण्याची उमेद अजून वाढते.

गॉडजिला's picture

29 Apr 2021 - 6:57 pm | गॉडजिला

पण जर थोडी काटछाट केली असती तर दुधात साखर पडली असती.

पण मग कथेची लांबी खूपच छोटी झाली असती.
आणि कदाचित, वाचताना मनात हळूहळू जे गूढ निर्माण होत जाते, ते झाले नसते.

अभिजीत अवलिया's picture

29 Apr 2021 - 7:09 pm | अभिजीत अवलिया

जबरदस्त.

सुरसंगम's picture

29 Apr 2021 - 8:05 pm | सुरसंगम

आवडली

सौंदाळा's picture

29 Apr 2021 - 9:59 pm | सौंदाळा

खतरनाक एकदम

योगी९००'s picture

29 Apr 2021 - 11:17 pm | योगी९००

अरारारा... खतरनाक..

कथा आवडली..