पुस्तकं की Audio Books?

आगाऊ म्हादया......'s picture
आगाऊ म्हादया...... in जनातलं, मनातलं
19 Mar 2021 - 10:40 am

Storytel, Amazon audible बुक्स ह्या गोष्टी आपल्याला फारशा नवीन राहिलेल्या नाहीत, किमान ऐकून तरी माहित झाल्या आहेत. मी उत्सुकतेपोटी हे प्रकरण नेमकं आहे तरी काय हे बघावं म्हणून किमान ६ महिने वापरून बघितलं आहे. अनेकांनी मला विचारलं की “कसं वाटतं रे audio book ऐकताना?”, मी ही तेव्हा नेमका ह्याच प्रश्नावर विचार करत होतो. काहीतरी राहून जातंय असं काहीतरी जाणवायचं मला पण audio book ही सोय चांगली वाटायची. म्हणूनच मला त्याबद्दल नेमकं काय वाटतं हे ठरवायला बराच वेळ लागला.

आपण पुस्तक वाचतो नेमकं काय करतो? सुरुवात होते मुखपृष्ठ न्याहाळण्यापासून. चित्र, लेखक आदी गोष्टी मनात साठवत आपण मलपृष्ठ बघतो. तिथे लिहिलेली उत्कंठावर्धक माहिती वाचून आपण पहिलं पान उघडावं की नको हे ठरवतो. मग छानपैकी विचार करत, मनात आडाखे बांधत प्रस्तावनेपर्यंत पोहोचतो. ती वाचून झाली की आपल्याला भुकेची जाणीव होते. मग आपण फ्रीज/कपाटामधून वाडगाभर खाऊ घेऊन ते पुस्तक अनुभवायला बसतो.

त्यानंतर मात्र सुरु होतो प्रवास स्वप्नांचा, देशांचा, इच्छांचा आणि भावनांचा. हाताच्या स्पर्शाने उलटलेल्या प्रत्येक पानात त्या पुस्तकाची गोडी जाणवते. नवीन पुस्तकाच्या कागदाचा, छपाईचा, बांधणीचा तसेच जुन्या पुस्तकाच्या पिवळ्या पानांचा गंध, नाकाला सुरसुरणारी धूळ हे सगळे अनुभव अजाणतेपणी मनाच्या कप्प्यात दडलेले असतात. क्वचितप्रसंगी हातातील चकली पानावर पडून राहून गेलेला डाग बऱ्याचदा पुढल्या प्रत्येक वेळी मनाला डागण्या देतो. काही बहाद्दर वाचनालयाच्या पुस्तकांवर कसल्याशा खुणा करतात, छपाईतील त्रुटी सुधारतात; त्यांच्या त्या तसल्या समाजसेवेला (?) शिव्या घालत परत पुस्तकात डोकं खुपसणंसुद्धा आपल्याला नवीन नाही. असं करत दिवसच्या दिवस आणि रात्रीच्या रात्री कशा सरतात ते ही आपल्याला कळत नाही.

जेव्हा आपण पुस्तक हातात घेऊन वाचतो ना तेव्हा त्या कथेला आकार देणारे आपण असतो. एक साधं वाक्य घेऊन माझं म्हणणं स्पष्ट करतो. “त्याने तिच्या डोळ्यात बघितलं आणि आश्वासानार्थ हसला” हे ते वाक्य. आता ह्या वाक्यात असलेलं आश्वासानार्थ हास्य, कुणाच्या लेखी बत्तीशी दिसण्याइतकं असेल, कुणासाठी फक्त स्मित असेल. एखादाच्या लेखी गाल नुसते हलले असतील मात्र आश्वासन डोळ्यातून दिलेलं असेल.
तर हे between the lines जे आहे ना, ते आपण लिहितोय कुणीतरी आधीच लिहिलेल्या पुस्तकात. कधी हा विचार आलाय डोक्यात? माझ्या तर आत्ता आला Audio Book ऐकताना. प्रत्येक जण आपापल्या अनुभवाप्रमाणे समजुतीप्रमाणे, जडणघडणीप्रमाणे पुस्तक समजून घेतो, त्यात रंग भरतो. आणि हे असं आहे म्हणूनच प्रत्येकाला भावणारं पुस्तक वेगळं आहे.

Audio Book ऐकताना हे जे कथेला आकार देणं आहे, ते आपल्यासाठी कुणीतरी वेगळा माणूस करतोय. हे किती विचित्र आहे. त्यामुळे प्रत्येकासाठी ते पुस्तक सारखंच असणारे. लेखकाला काय म्हणायचं आहे ते निर्विवादपणे पोहोचेल आपल्यापर्यंत, पण आपल्याला मिळणाऱ्या अनुभवाचं काय? तो मूळ छापील पुस्तकाइतका युनिक आहे का? माझ्यामते नक्कीच नाही. मी लहानपणी वाचलेला लंपन आणि आज पुन्हा वाचतो तेव्हा मला मिळणारी अनुभूती वेगळी आहे. ती दर वेळी नवी मिळते म्हणून छान वाटतंय, आणि अजाणतेपणी त्या वेगळेपणात माझाच सहभाग आहे. श्रवणीय साहित्य मात्र मला पुन्हा पुन्हा एकंच अनुभव देतंय, देणार आहे.

प्रमाणभाषेत पुस्तक लिहिलेलं असताना भेटणं, मिळणं, न, ण अशा चुका मनातल्या मनात सुधारून आपण पुढे जातो पण Audio Book रेकॉर्ड करणाऱ्यांना लेखकाच्या परवानगीशिवाय असे बदल करता येत नाहीत म्हणून ही रेकोर्डिंग बऱ्याचदा सदोष (!) असू शकतात (अर्थात सर्वांसाठी नाही).

पुस्तक आणल्या आणल्या ते चोरीला जाऊ नये म्हणून त्यावर तुम्ही नाव टाकता? मी तर माझं हस्ताक्षर फार सुंदर नसल्यामुळे stamp बनवलाय तोच मारतो त्यावर. मग मित्र आले की आपला खजिना त्यांच्यासमोर उघडा करणे, त्यांना एखादं पुस्तक देऊ करणे, ते परत मिळण्याविषयी चिंता करणे, ते आल्यावर मित्रासोबत चर्चा हे सगळं कसं घडणार हो Audio Book पद्धतीत. जुनाट म्हणेल कुणी मला पण आहे हे असं आहे. मुखपृष्ठ न्याहाळण्यापाशी सुरु झालेला प्रवास आत्ता एक आवर्तन पावला असं म्हणू, ते चालूच राहणारे.

आपण एखाद्याच्या घरी पहिल्यांदा जातो तेव्हा शेल्फ वर ठेवलेल्या पुस्तकांना बघून कळतं की ह्याचं आणि आपलं जमणारे की नाही? एखादं पुस्तक कॉमन दिसलं किंवा अनेक वर्ष हवं असलेलं दिसलं आणि त्याबद्दल चर्चा झाली की हाहा म्हणता तारा जुळतात. Audio Books च्या बाबतीत ही गम्मत कशी घेणार आपण? ती पुस्तकं दडली आहेत प्रत्येकाच्या lock केलेल्या फोनमध्ये.

इथवर तुम्हाला मी Bias वाटलेला असू शकतो Audio Bookच्या बाबतीत. पण तसं नाहीये. अशा पुस्तकांची उपयोगिताही आहेच. मला जेव्हा कामाच्या गडबडीत माझं वाचन कमी झाल्याचं जाणवलं तेव्हाच मी Audio Bookचा विचार करण्याचा निर्णय घेतला. मग मी सावरकर ऐकले, शिरवळकर ऐकले आणि विवेकानंदसुद्धा ऐकले. Storytel खास करून बऱ्याच लेखकांना पैसे देऊन लिखाण करायला लावून उत्तम अभिनेतांकडून ते वाचून घेत आहे. ह्या माध्यमातून मिळणाऱ्या आनंदात तडजोड नाहीये, ती आहे अनुभूतीत. आठवणीत. हे माध्यम ह्या दोन्ही गोष्टी तयार करत नाहीये. मी व्यायाम करताना, वाहन चालवताना पुस्तक ऐकलं तर बऱ्याचदा मला ते पुन्हा ऐकावं लागतं त्याशिवाय बारीक तपशील डोक्यात शिरत नाहीत असा अनुभव आला. पण किमान पक्षी नवीन काहीतरी डोक्यात तर शिरलं.

त्यामुळे वाचन नाही जमलं तरी पुस्तक वाचल्याचा आनंद ज्याला घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त ठरू शकतं, जुनी गाणी ऐकून कंटाळलेल्या मनाला नवी उभारी देण्यासाठी हा पर्याय उपयुक्त असूही शकेल. नजर अधू झालीय, हात थरथरतायत अशा वृद्धांसाठी हा तर खजिना असू शकेल. मनोरंजनासाठी पुन्हा त्यांच्यासाठी पुस्तकाची दारं उघडली आहेत हे ही खरंच.

तर अशा माझ्या मनातील गोष्टी तुमच्या समोर ठेवल्यावर मलाही छान वाटतंय. त्या देखील मी लिहिल्या आहेत आणि तुम्ही वाचता आहात!! ऐकत नाही आहात. वाचन संस्कृतीतील वर उल्लेख केलेल्या अनेक अनुभवांच्या प्रेमात गुरफटलेला मी प्राणी आहे जो नव्याने उदयास येणाऱ्या श्रवण संस्कृतीत स्वत:ला adjust करण्याचा प्रयत्न करत आहे. श्रवणीय साहित्याची उपयोगिता पटलीय पण परिपूर्ण अनुभव न मिळाल्याने तिथे मन काही अजून रमलं नाहीये. ते कधी रमेल असंही सध्या वाटत नाही.

माझ्यासारख्या कागदी पुस्तकात रमलेल्या सगळ्यांना हा लेख अर्पण करून थांबतो.
आपल्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.

वाङ्मयअनुभव

प्रतिक्रिया

आणि

वाचलेली कथा असेल तर, कथाकधन ऐकायला...

डोळे थकले तर मात्र, बोलक्या पुस्तकांना, पर्याय नाही...

आगाऊ म्हादया......'s picture

19 Mar 2021 - 12:13 pm | आगाऊ म्हादया......
आगाऊ म्हादया......'s picture

19 Mar 2021 - 12:13 pm | आगाऊ म्हादया......
आगाऊ म्हादया......'s picture

19 Mar 2021 - 12:55 pm | आगाऊ म्हादया......
कुमार१'s picture

19 Mar 2021 - 11:15 am | कुमार१

प्रत्येक जण आपापल्या अनुभवाप्रमाणे समजुतीप्रमाणे, जडणघडणीप्रमाणे पुस्तक समजून घेतो, त्यात रंग भरतो. आणि हे असं आहे म्हणूनच प्रत्येकाला भावणारं पुस्तक वेगळं आहे.

>>> +१११

वाचानातल्या कल्पनाविलासाला तोड नाही.
श्रवणीयचा अद्याप अनुभव नाही.

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 11:24 am | मुक्त विहारि

घेऊन बघा ....

फरक जाणवेल...

आगाऊ म्हादया......'s picture

19 Mar 2021 - 12:57 pm | आगाऊ म्हादया......

:)

छान!!
----------------
मी केव्हाच adjust झालो आहे.
ओडियो बूक्स म्हणाल तर - ओडिओ apps मध्ये रस नाही.
पिडिएफ/इपब बूक्स छोट्या मोबाइलवरही धडाधड वाचतो. ती ऐकण्याचीही सोय त्या apps मध्ये असतेच. फरक एवढाच की उगाचच नाटकी आवाजात चढ उतार करून ऐकवली जात नाहीत. फोनच्या गूगल text to speech ने जे पर्याय असतात तेवढेच. पण तेही जमतं.

ऐकण्यासाठी podcast आहेतच. त्यातून बरीच गाजलेली, ऐतिहासिक,पौराणिक मिळतात. त्यातला ओडिओ मात्र चांगला असतो. वीस - तीस मिनिटांचे भाग असतात.

आगाऊ म्हादया......'s picture

19 Mar 2021 - 12:58 pm | आगाऊ म्हादया......

आनंद मिळत असेल तर छानच आहे मग

सौंदाळा's picture

19 Mar 2021 - 12:59 pm | सौंदाळा

सारे प्रवासी घडीचे हे अत्यंत आवडते पुस्तक, त्याचे ऑडीओ बुक ऐकत होतो पण काहीच मज्जा आली नाही.
का ते इतके सुंदर शब्दबद्ध करणे मला जमले नसते.
तंतोतंत असंच वाटलं होतं.

आगाऊ म्हादया......'s picture

19 Mar 2021 - 1:03 pm | आगाऊ म्हादया......

:)

असा मी असामी's picture

19 Mar 2021 - 5:37 pm | असा मी असामी

मला पण audible वर ऐकताना मज्जा नाही आली. storytel app चांगले आहे असे ऐकले आहे.

आगाऊ म्हादया......'s picture

19 Mar 2021 - 7:23 pm | आगाऊ म्हादया......

असं म्हणता येईल, कंटेंट जास्त उपलब्ध आहे

माझा रोजचा दोन तासाचा प्रवास आहे. सुट्टीच्या दिवशी पण वैयक्तिक कारणासाठी बराच प्रवास घडतो. ह्या सर्व प्रवासावेळी मी गाडीमध्ये बहुतांश वेळी एकटा असतो. सुरुवातीला रेडिओ ऐकायचो. मग त्यातले RJ चे आवाज, त्या न संपणाऱ्या जाहिराती, वेळेच्या बंधनामुळे पटपट बोलून जास्तीतजास्त शब्द आपल्या पर्यंत पोचवण्यासाठी केलेल्या कसरती अशा कारणांमुळे वैतागून रेडिओ ऐकणे बंद केले. मग youtube वर शरद आढाव यांचे कादंबरी वाचन ऐकणे सुरू केले. ते आवडायचे. त्यातल्यात्यात नारायण धारप आणि चित्तमपल्ली यांच्या कादंबरीचे वाचन त्यांनी सुरेख केले आहे. पण सध्या त्यांच्या चॅनेल वर नवीन काही व्हिडिओ नाही आले. मग मी storytel कडे वळालो. आधी काही दिवस ट्रायल app वापरून पाहिले आणि आता सहा महिन्यांचे subscription घेतले आहेत. मला हे app प्रचंड आवडले आहे. जयवंत दळवी, भैरप्पा, हृषीकेश गुप्ते, माडगूळकर यांच्या बहुतांशी app वर असलेल्या कादंबऱ्या ऐकून झाल्या आहेत. सचिन खेडेकर मला अभिनेता म्हणून फार आवडत नसला तरी काही कादंबऱ्यांसाठी त्याने दिलेला आवाज अफलातून आहे. तसेच संदीप खरेचा घोगरा आवाज पण काही गूढ कथानकांना फार suite होतो. सोनाली कुलकर्णीच्या (Senior) आवाजतली गुप्तेंची "हाकामारी" जबरदस्त जमली आहे . एकंदरीतच storytel ने प्रवास फार सुखकर केला आहे. कधी कधी एखादी कथा रोमांचक वळणावर आली असेल तर प्रवास संपू नये असे ही वाटते. सध्या वेळे अभावी वाचना वेळ मिळत नसला तरी प्रवासात नवीन प्रकारे हा छंद जोपासला जातोय आणि चार क्षण आनंदाचे उपभोकतो आहे हे ही नसे थोडके.

आगाऊ म्हादया......'s picture

19 Mar 2021 - 1:28 pm | आगाऊ म्हादया......

म्हणूनच खरं तर ही कल्पना आली डोक्यात Audio book ऐकण्याची. पण फलनिष्पत्ती तुमच्यासारखी आनंददायी नाही झाली अजून. :)

ज्ञान मिळणे महत्वाचे, माध्यम किंवा स्त्रोत बघत बसू नये...

आगाऊ म्हादया......'s picture

19 Mar 2021 - 7:24 pm | आगाऊ म्हादया......

डोंबोलीकर महाराजांना, आठवड्यातून एकदा चक्कर असते डोंबोलीत.

दर्शन घेऊन येईन, हाहा

मुक्त विहारि's picture

19 Mar 2021 - 8:14 pm | मुक्त विहारि

शनिवारी दरबार असतो .... 7 ते 8

जपमाळ आपापली ....

सध्या महाराज, कुणा कडून काही घेत नाहीत आणि आशीर्वादा शिवाय, कुणाला काही देत नाहीत...

आगाऊ म्हादया......'s picture

19 Mar 2021 - 9:04 pm | आगाऊ म्हादया......

खिक

चौथा कोनाडा's picture

22 Mar 2021 - 5:18 pm | चौथा कोनाडा

व्वा, सुंदर लेख. छापील पुस्तकांबाबत लिहिलेले म्हणजे जणू माझाच अनुभव !

छापील पुस्तकांची मजा काही औरच पण तरी देखिल आगामी काळ हा ध्वनीपुस्तकांचाच असणार आहे हे नक्की.
माझाच गेल्या काही वर्षांचा अनुभव लिहायचा झालाच तर मला हळूहळू ध्वनीपुस्तके आवडू लागली आहेत.
मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये बरीच उत्तमोत्तम अभिवाचने ऐकली आणि ध्वनीमाध्यमाची गोडी वाढू लागली.
सध्या यूट्यूबवर ऐकतो. लवकरच स्टोरीटेल घेणार आहे.

आगाऊ म्हादया......'s picture

24 Mar 2021 - 5:25 pm | आगाऊ म्हादया......

हो हो ,नक्कीच. आगामी काळ असू शकेल ध्वनी पुस्तकांचाच. स्तोरीटेल घेतलंत तर कंटेंट बराच मिळेल हे नक्की. flipkart वर सुपरकॉईन कमावली असतील तर त्या बदल्यात मिळू शकतं स्टोरीटेल ३ महिन्याचं.

मुक्त विहारि's picture

24 Mar 2021 - 6:16 pm | मुक्त विहारि

साठवून ठेवता येते का?

आगाऊ म्हादया......'s picture

25 Mar 2021 - 6:45 am | आगाऊ म्हादया......

पण app मध्ये डाउनलोड होते. ऑफलाईन ऐकण्यासाठी. त्या फाईल्स फाईल मॅनेजर मध्ये शोधल्या तर सापडणार नाहीत.