कोवॅक्सिन
फेज १ - या मध्ये ३७५ व्यक्ती (वय १८-५५ ) ४ गटात विभागण्यात आल्या. प्रत्येकी १०० चे तीन गट करण्यात आले आणि त्यांना ३ निराळ्या प्रमाणात कोवॅक्सीन देण्यात आले आणि उरलेले ७५ लोक हे प्लेसिबोवर होते.
लसीचे प्रत्येकी दोन डोस १४ दिवसांच्या अंतराने देण्यात आले. लस मिळालेल्या गटांत प्रतिपिंड तयार होण्याचे प्रमाण (seroconversion rate) ८२% ते ९२% असे ३ निराळ्या मात्रांमध्ये आढळले (१०० पैकी ८२ लोकांमध्ये प्रतिपिंडे निर्माण झाली). लस घेतल्यावर व्यक्तींवर होणारे परिणाम तपासण्यात आले. ताप, डोकेदुखी, इंजेक्शन घेतलेल्या जागी वेदना अशा घटना एकूण ५%-१४% व्यक्तींमध्ये आढळून आल्या. या तक्रारींचे परिमार्जन २४ तासात झाले. आणखी छुपे आणि थोडे उशिराने दिसणारे परिणाम जाणून घेण्यासाठी या व्यक्तींच्या रक्तातील साखर, हिमोग्लोबिन इत्यादी घटकांची मोजणी लस घेण्यापूर्वी आणि २८ दिवसांनी करण्यात आली. या घटकांमध्ये झालेले वाईट बदल हे प्लॅसिबो गट आणि लस घेतलेला गट यांच्यात फार वेगळे नाहीत. हे सर्व काम १३ जुलै 2020 पासून पुढे करण्यात आले.
फेज २ आणि फेज १ मधील व्यक्तींचा अधिक अभ्यास - यामध्ये ३८० (वय १२-६५) नव्या व्यक्तींना २ गटात विभागले (१९०) आणि त्यांना फेज १ मधून निवडलेल्या दोन प्रमाणानुसार २८ दिवसांच्या अंतराने दोनदा लस देण्यात आली .तसेच फेज-१ मधील व्यक्तींची परत एकदा तपासणी केली. फेज २ मधील नवीन व्यक्तींमध्ये प्रतिपिंड तयार होण्याचे प्रमाण प्रमाण जास्ती आहे आणि वाईट परिणाम पहिल्या फेज प्रमाणेच आहेत. १०४ दिवसांनी फेज १ मधील लोकांना तपासले असता ७०-८०% व्यक्तींमध्ये प्रतिपिंड आढळले. ५ सप्टेंबर 2020 पासून पुढे हे काम करण्यात आले.
फेज ३- फेज ३ चा प्राथमिक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. या फेज मध्ये २५,८०० व्यक्तींना २ गटात विभागले (अर्ध्यांना लस आणि अर्ध्यांना प्लेसिबो). या फेज मध्ये लसीचा सामना थेट विषाणूशी आहे असे दिसते. प्राथमिक अहवालात ८१% प्रभावी ठरलेली लस यचा अर्थ आहे असा आहे की लस घेतलेल्या लोकात लसीमुळे आजार होण्याचे प्रमाण ८१% कमी होते. सध्या या २५८०० मधील ४३ व्यक्तींना लागण झाली. त्यातील ३६ व्यक्ती या प्लेसिबो गटातील आहेत आणि ७ व्यक्ती लस घेतलेल्यांपैकी आहेत . (१ - ७/३६ = ०. ८०५६ किंवा ८०.५६%)
तसेच या लसीमुळे तयार होणारे प्रतिपिंड UK स्ट्रेन आणि भारतातच मिळालेला आणखी एक स्ट्रेन यांनाही निष्प्रभ करण्यात उपयुक्त असल्याचे सांगितले आहे.
कोविडशिल्ड
फेज १ आणि २ - या चाचण्या UK मध्ये १००० व्यक्तींवर केल्या. एक फरक म्हणजे प्लेसिबो ऐवजी इथे अर्ध्या व्यक्तींना MenACWY नावाची UK मध्ये आधी पासून वापरात असलेली लस देण्यात आली. ही लस घेतल्यावर ताप, डोकेदुखी इत्यादी त्रास होतात असा अनुभव आहे. तसेच दोन्ही गटातील काही व्यक्तींना prophylactic paracetamol देण्यात आले. प्रतिपिंड तयार करण्यात ही लस यशस्वी आहे. ताप डोकेदुखी इत्यादी तक्रारींचे प्रमाण कोवॅक्सीन पेक्षा जास्ती आहे. मात्र prophylactic paracetamol घेतलेल्या व्यक्तींमध्ये ते कमी आहे. prophylactic paracetamol चा प्रतिपिंड निर्माण करण्यात अडथळा होत नसल्याचे म्हटले आहे. आणि कोविड लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये काहींना एकदाच लस दिली आणि काहींना २८ दिवसांनी दुसऱ्यांदा लस दिली.
फेज ३- या फेज मध्ये ११६३६ व्यक्तीवर चाचणी घेतली (ब्राझील आणि UK येथील). एकूण उपयुक्तता ७०% अशी दिली आहे. या फेज मध्ये मात्र सर्वांना दोनदा लस देण्यात आली आणि यातील अंतर मात्र ६ आठवडे ते १२ आठवडे असे निरनिराळे आहे.
प्रतिक्रिया
14 Mar 2021 - 1:00 pm | केदार भिडे
सध्या भारतात कोविड-१९ लसीकरण मोहीम चालू आहे. मी स्वतः सध्या त्याकरता पात्र नाही. मित्रांशी बोलत असताना असे जाणवले की ते ही सध्या उपलब्ध असलेल्या लसींबद्दल थोडे साशंक आहेत. त्यामुळे मी या लसींच्या चाचण्यांबद्दल जर्नल्स मध्ये उपलब्ध असलेले संशोधन-लेख वाचले आणि लसींच्या चाचणी प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. ती माहिती आपल्या समोर ठेवण्याचा हा माझा प्रयत्न आहे. https://vaccine.icmr.org.in/covid-19-vaccine येथे चाचणी अवस्थेत किंवा वापरात असलेल्या सर्व लसींबद्दल माहिती उपलब्ध आहे. मला वैद्यक किंवा औषध निर्माण या शाखांचे कोणतेही शिक्षण नाही.
kool.amol यांनी या आधीच कोरोना लसीबद्दल (http://misalpav.com/node/47989) लिखाण केलेले आहे आणि त्याखालील चर्चेत विविध मुद्दे उपस्थित झालेले आहेत.
समरी किंवा गाभा इथे लिहिलेला हा भाग दिसत नाहीये.
14 Mar 2021 - 1:22 pm | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद
14 Mar 2021 - 3:26 pm | तुषार काळभोर
Covaxin फेज 3
लस न घेतलेल्या १२९०० पैकी ३६ लोकांना कोविड हा आजार झाला का?
लस न घेतलेल्या १२९०० पैकी १२८६४ लोकांना कोविड हा आजार झाला नाही, असं आहे का?
कोविड हा आजार होऊ नये म्हणून इतर काही काळजी घेतली गेली होती का? म्हणजे लस घेतल्यावर आजार झाला नाही, यासाठी लसच कारणीभूत होती हे नक्की आहे का?
टीप : मी थोतांडवादी नाही. मी माझं नाव पण बदलून घेतलय :)
घरातील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करायच्या आधी ते किती उपयुक्त व धोकामुक्त आहे, हे जाणून घेण्यासाठी काही शंका आहेत.
15 Mar 2021 - 6:55 pm | केदार भिडे
सध्यातरी कोवॅक्सीनचा केवळ प्राथमिक अहवाल उपलबध आहे (https://www.bharatbiotech.com/images/press/covaxin-phase3-efficacy-resul...). आजार झालेले आणि न झालेली यांची संख्या आपण लिहिली आहे तशीच आहे. सांख्यिकी दृष्टीने किमान १३० जणांना कोविड होईल (लस घेतलेले आणि न घेतलेले अशा दोन्ही गटात मिळून) तेव्हा लसीचा प्रभाव हे आणखी स्पष्ट होईल.
कोविडशिल्ड मध्ये ७०% उपयुक्तता एकूण रुग्णसंख्या १३१ झाल्यावरचीच आहे.
कोवॅक्सीन फेज १-२ मध्ये ६५+ वयाच्या व्यक्ती नाहीत, मात्र फेज ३ मध्ये आहेत.
काळजी घेण्याबद्दल - व्यक्तींना लस की प्लेसिबो दिलाय हे माहित नसल्याने सर्वांनीच सामान्यपणे घेतली जाणारी काळजी घेतली असावी असे वाटते, मात्र याबद्दल ठोस माहिती माझ्याकडे नाही.