कोरोना लस: प्रश्नांची मालिका
ब्रिटनमध्ये Pfizer कंपनीच्या लशीला मान्यता मिळाली आणि तिथे लसीकरण सुरू देखील झालं आहे. कोरोना लसीकरण करणारा ब्रिटन हा जगातला पहिला देश ठरला आहे. यथावकाश इतर देशात देखील लसीकरण सुरू होईल. पण ह्या निमित्ताने काही बाबींची चर्चा सुरू आहे, लसीकरण ह्या विषयावर विविध प्रश्न विचारले जात आहेत, काही स्वाभाविक आणि योग्य अशा शंका देखील आहेत. काय काय प्रश्न विचारले जात आहेत? काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न…
कोरोना लस ब्रिटनमध्ये आली, भारतात केव्हा उपलब्ध होणार?
ब्रिटनमध्ये मान्यता मिळालेली लस ही Pfizer या कंपनीची आहे तर भारतात ऑक्सफर्ड, Astra Zeneca आणि serum institute ह्यांच्या संयुक्त प्रयत्नांनी बनणारी, रशियाची स्पुटनिक तसेच भारत बायोटेक ह्या विविध लशी सध्या मानवी चाचण्यांच्या विविध टप्प्यावर आहेत. त्यातली ऑक्सफर्डची लस पुढच्या महिन्यात भारतात उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. इतर लशी त्यानंतर उपलब्ध होतील.
Pfizer ची लस भारतात उपलब्ध होईल का?
जरूर होऊ शकते. Pfizer ही mRNA प्रकारची लस आहे. ह्या लशीच्या बाबतीत असणारी मर्यादा किंवा मुख्य अडचण तिच्या साठवणुकीची आहे. -७०℃ इतक्या तापमानाला ह्या लशीची साठवण आणि वहन करावे लागते. ही एक खर्चिक बाब आहे. त्यातही भारत हा आकाराने प्रचंड मोठा देश आहे इथे सर्वत्र ही सुविधा मिळणे कठीण आहे. त्यामुळे भारत सरकार तातडीने ह्या लशीला मान्यता देणार नाही असे म्हणता येईल. पण कंपनीने तसा अर्ज सरकारकडे केला आहे. ह्या विषयातले तज्ञ ह्यावर मार्ग काढतील आणि मगच येणाऱ्या काळात ही लस देखील भारतात उपलब्ध होऊ शकते.
कोरोना लस घेणं सक्तीचं आहे का?
मुळीच नाही. अशी सक्ती करणं सध्या शक्य देखील नाही. नजीकच्या भविष्यात भारतात तरी अशी सक्ती होणार नाही. इतर देश, विशेषकरून युरोपियन, सर्वांना देता येतील इतके डोस उपलब्ध करतील पण सक्तीची शक्यता तशी कमीच आहे. ह्याउलट लोकं स्वतःहूनच लस घेतील.
कमी कालावधीत उपलब्ध झालेली लस सुरक्षित आहे का?
उपलब्ध होणाऱ्या सर्वच लशी ह्या कमी कालावधीत तयार झाल्या आहेत हे खरं आहे. पण असं असलं तरी जवळपास प्रत्येक देशातल्या औषध नियमन करणाऱ्या सरकारी संस्था सुरक्षेच्या बाबतीत कुठेही तडजोड करत नाहीत. ह्याची कल्पना लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांना देखील असते. त्यामुळेच सर्व नियम पाळून आणि समाधानकारक आणि पुरेसा data असल्याशिवाय कोणालाच लस मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्याची आणि ती वितरीत करण्याची परवानगी मिळत नाही, अगदी आपात्कालीन परिस्थितीत देखील. ह्याच ताजं उदाहरण म्हणजे नुकतंच सिरम आणि भारत बायोटेक ह्या कंपन्यांनी भारत सरकारकडे आपत्कालीन परिस्थितीसाठी लस उपलब्ध करण्याची परवानगी मागितली होती. परंतु ह्या दोन्ही कंपन्यांना मानवी चाचण्यांचा अजून विस्तृत विदा (data) सरकारने मागितला आहे (ह्याचा अर्थ त्यांना परवानगी नाकारली आहे असा होत नाही). ब्रिटनमध्ये लशीच्या वितरणाची मान्यता मिळालेल्या Pfizer ह्या कंपनीने 43 हजार लोकांवर चाचण्या घेऊन त्याची माहिती आणि इतर वैज्ञानिक विदा दिल्यानंतरच त्यांना मान्यता देण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर लस बाजारात आल्यानंतर देखील आढळणाऱ्या कुठल्याही side effects किंवा ज्याला adverse events म्हणतात त्यावर सरकार आणि ह्या कंपन्या लक्ष ठेवून असतील. इंग्लंडमध्ये लस दिल्यानंतर काही लोकांमध्ये तीव्र स्वरूपाची काही लक्षणं आढळली त्यानंतर ज्यांना ऍलर्जी आहे अशा लोकांना सध्या लशीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा स्पष्ट सूचना तिथल्या FDA ने दिल्या आहेत.
कोरोना लस इतक्या कमी कालावधीत निर्माण कशी काय झाली?
असं होण्यासाठी बरेच घटक कारणीभूत आहेत. मुख्य घटक म्हणजे तातडीची गरज. जागतिक साथ, वाढत जाणारा संसर्ग आणि होणारे मृत्यू ह्यामुळे शब्दशः युद्ध पातळीवर ह्यासाठी संशोधन झालं. ह्याच्या जोडीला उपलब्ध झालेलं प्रगत असं तंत्रज्ञान. Pfizer ची लस ही mRNA प्रकारची आहे. म्हणजे संपूर्ण विषाणू लस म्हणून न वापरता फक्त रोगप्रतिकारक प्रतिसाद निर्माण करणारा जनुकीय घटक ह्यात वापरला आहे. हा घटक निर्माण करणे आणि तोदेखील इतक्या प्रचंड प्रमाणात हे तंत्रज्ञानामुळेच शक्य होऊ शकले.
जेव्हा हजारो मानवांवर चाचण्या होतात तेव्हा निर्माण होणारा data हा महाकाय असतो. ह्या अवाढव्य data चं पृथकरण करणं हे प्रचंड वेळखाऊ आणि तितकंच किचकट असं काम असत. हे काम देखील अद्ययावत तंत्रज्ञानामुळे शक्य होऊ शकलं. ह्याच्या जोडीला औषध नियामक संस्थांनी देखील संपूर्ण प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी ह्यासाठी सहकार्य केले आणि अजूनही करत आहेत. ह्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे इतक्या कमी वेळेत लस उपलब्ध होऊ शकली आणि उर्वरित देखील होतील.
लस उपलब्ध नसताना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर लशीची गरज आहे का?
हा एक अत्यंत महत्वाचा आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. गरज समजून घेण्यासाठी काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. गेल्या वर्षभरात ह्या विषाणूविषयी आपलं ज्ञान टप्प्याटप्प्याने वाढलं आहे. सुरवातीच्या काळात गोंधळाची परिस्थिती होती. त्यामुळे खुद्द जागतिक आरोग्य संघटनेकडून बरेचदा परस्परविरोधी सूचना देण्यात आल्या. नंतर विषाणू बाबतीत काही बाबी स्पष्ट झाल्या. अनेक रुग्णांना तपासल्यानंतर, त्यांच्या लक्षणांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता उत्तम आहे त्यांना ह्या विषाणूपासून जीवघेणा धोका नाही त्यामुळे कित्येक रुग्ण हे कुठलंही लक्षण दाखवत नाहीत. कित्येकांमध्ये अगदीच माफक अशी लक्षणं दिसतात. पण वृद्ध लोकं, ज्यांना दीर्घकाळ कुठलेतरी आजार आहेत, ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कुठल्या ना कुठल्या कारणाने कमी झाली आहे अशा लोकांमध्ये ह्या विषाणूचा धोका खूपच जास्त आहे. त्यामुळे सध्या कोरोना विषाणूचा मृत्युदर हा ढोबळमानाने 3% मानला जातो. इतर लोकांमध्ये देखील मृत्यू ओढवला नसला तरी गंभीर परिस्थिती नक्कीच निर्माण होते. असे रुग्ण बरे झाले तरी त्यांच्या फुप्फुसांची प्रचंड हानी होते जी भरून यायला किती वेळ लागेल हे सांगणे कठीण आहे. येणाऱ्या काळात डॉक्टर त्यांच्या निरीक्षणांवरून काही निष्कर्ष नक्की काढू शकतील. त्यामुळे साधारणपणे 10% लोकसंख्येला लशीची नितांत गरज आहे. लशीमुळे मृत्युदर कमी होण्यास नक्कीच मदत होईल ह्यात शंका नाही. ह्या विषाणू विरोधात आपली रोगप्रतिकारक संस्था जो प्रतिसाद देते तो अवाजवी म्हणावा असा आढळला आहे. ह्याच कारण काय असावं ह्यावर अजून पूर्णपणे प्रकाश पडलेला नाही पण कदाचित विविध मार्गांनी ह्या विषाणूला निष्प्रभ करण्याच्या प्रयत्नात असा प्रतिसाद निर्माण होत असावा. लशीमुळे हा प्रतिसाद नेमका होण्यास मदत होईल म्हणजे ज्या प्रकारच्या पेशींची गरज आहे त्याच पेशींचा प्रतिसाद निर्माण होईल. अनावश्यक पेशींची गर्दी आणि त्यातून निर्माण होणारी गोंधळाची परिस्थिती टाळता येईल. हे अगदी निरोगी लोकांमध्ये देखील उपयोगाचे असेल.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे संसर्ग करण्याची आणि वेगाने पसरण्याची ह्या विषाणूची क्षमता अफाट आहे. हे लक्षात घेता कोरोनाची साथ जगात कुठे ना कुठे येणाऱ्या काही वर्षात अस्तित्वात असेल आणि ती जर परत जागतिक झाली तर काय होईल ह्याची कल्पना एव्हाना आपल्याला आली आहे. त्यामुळे कमी मृत्युदर, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ह्या बाबी जरी असल्या तरी सध्या काहीसं दिलासादायक असणारं चित्र कधीही बिघडू शकतं. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण होणं हे आवश्यक आहे.
लशींची परिणामकारकता 70% किंवा 90% असताना अशी लस घेणे योग्य आहे का?
इथे ह्या विधानाचा योग्य अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. एखाद्या लशीची परिणामकारकता समजा 80% आहे. ह्याचा अर्थ त्या लशीची चाचणी जितक्या लोकांवर केली त्यापैकी 80% लोकांमध्ये सकारात्मक निकाल दिसले. पण ह्याचा अर्थ चुकीने असा घेतला जातो की एखाद्या व्यक्तीवर केलेल्या चाचणीमध्ये फक्त 80% च सकारात्मक निकाल आले. त्यामुळे लशीच्या परिणामकारकतेवर शंका घेण्यात येते. अमेरिकन FDA ने कोरोना लशीची ही मर्यादा 50% इतकी निश्चित केली आहे म्हणजे Placebo च्या तुलनेत 50% किंवा जास्त इतका सकारात्मक परिणाम दाखवणे हे लशीच्या निर्मात्यांना गरजेचे असणार आहे. खरं तर ह्या टक्केवारीच्या बाबतीत तज्ञामध्ये एकवाक्यता नाही. परंतु सध्या चाचण्या सुरू असलेल्या लशी 70% पेक्षा जास्त परिणामकारक आहेत. त्यामुळे ह्या मुद्द्यावर लस उत्तीर्ण होते असे म्हणता येईल.
एकदा लस घेतल्यानंतर कोरोनाच्या संसर्गाची भीती कायमची निघून जाईल का?
मुळीच नाही. कोरोना संसर्ग आपल्याला अजून पूर्णपणे समजलेला नाही. हीच बाब लशीच्या बाबतीत देखील लागू आहे. लशीमुळे निर्माण होणारी प्रतिपिंडे म्हणजेच Antibodies किती काळ शरीरात राहतील ह्याची संपूर्ण कल्पना आपल्याला अजून यायची आहे. एकाच व्यक्तीला दोन वेळेस कोरोना झाल्याची काही उदाहरणं आहेत, अगदी कमी असली तरीही. ह्याचा अर्थ नैसर्गिकरित्या निर्माण झालेली प्रतिपिंडे एकदा का नाहीशी झाली की व्यक्तीला परत एकदा संसर्ग होऊ शकतो, असे रुग्ण कमी असले तरी ह्याकडे कानाडोळा करता येणार नाही. लशीमुळे निर्माण होणारा प्रतिसाद हा एका डोसमध्ये अल्प असल्यामुळे 2 डोस घेऊन जास्त काळापर्यंत प्रतिपिंडे शरीरात राहतील असा कयास आहे. त्यामुळे लस घेतली म्हणजे परत कधीच संसर्ग होणार नाही असं सध्यातरी ठामपणे म्हणता येणार नाही. लस काही काळापर्यंत तरी संरक्षण देईल इतकं मात्र नक्की सांगता येईल.
लस हा आपत्कालीन उपाय आहे. येणाऱ्या काळात लशीचे परिणाम दिसतील आणि त्यानुसार उपचारांची दिशा निश्चित होईल. त्यामुळे ज्या लोकांना संसर्गाचा धोका जास्त आहे त्यांना तसेच जे रुग्णांच्या संपर्कात जास्त आहेत अशा लोकांना ही लस देऊन मृत्युदर आटोक्यात आणणे ही तातडीची गरज आहे. लसीमुळेच हे साध्य होईल इतका विश्वास मात्र बाळगणं गरजेचे आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लस घेतल्यानंतर कोरोनाच्या
सध्या तरी 2 डोस घ्यावे लागतील
माझी एक शंका ..
ह्यात दोन्ही प्रकार असतात.
हे नवीन कळाले
उपप्रश्न ..
हा फरक जैवरासायनिक पद्धतीने
चांगला लेख.
माहितीपूर्ण लेखन
धन्यवाद
> इथे ह्या विधानाचा योग्य
गोऱ्या लोकांना आधी vaccine घेऊ द्या
https://www.prnewswire.com
योग्य प्रश्न
एक काल्पनिक प्रश्न
थोडक्यात तो आपल्या शरीरात
मला राहून ..
थोडे समजून घेऊ
ऑटोंतीबोडीज म्हणजे काय