1

तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं.

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
23 Jan 2021 - 6:33 am

लहानपणी पुस्तकात राजाराणीची गोष्ट असायची. राजकुमार पांढर्‍या शुभ्र होड्यावरून दौडत कुठेतरी जंगलात निघायचा. तेथे तो रस्ता चुकायचा.
कोण्या जादुगाराने त्याच्या राज्यात जायचा रस्ताच पुसून टाकलेला असायचा. राजकुमार घरी जायचा रस्ता शोधत बसायचा. आणि इकडे घरी त्याची राजकुमारी वाट पहात असायची. कोणीतरी त्याचा परतीचा रस्ताच पुसून टाकला असेल हे तीच्या ध्यानीमनीही यायचे नाही. तीला वाटायचे की राजकुमार हे मुद्दाम करतोय. तीची थट्टा करण्यासाठी. ती रुसून बसायची .राजकुमार बिचारा कसाबसा नवा रस्ता शोधत घरी यायचा.
रुसलेली राजकुमारी मनातुन खुश व्हायची. पण तीला वाटायचे की राजकुमाराने आपली मनधरणी करावी.
मग ती खुदकन हसेल . डोळ्यात चमक येईल. आणि राजकुमार तीच्या डोळ्यातील हसणारे चांदणे पाहून पुन्हा कधीच तीला सोडून जाणार नाही.
ही गोष्ट एकदा अशीच तुला गप्पा मारताना ऐकवली होती. आणि विचारले होते तीचे चुकलेच ना जरा ?
बराच वेळ त्या नंतर आपण गप्प होतो. गोष्टीतली राजकुमारी तू होतीस असे तुला उगीचच वाटत राहिले. आपण न बोलताच तेथून परतलो.
दुसर्‍या दिवशी तू मला फोन केलास . फोन नुसताच केलास. तीन मिनीटे दोघेही फोन नुसते हातात धरुन होतो. काहिही न बोलता. नुसते हॅलो सुद्धा म्हणालो नाही एकमेकांना. तुला मी अगोदर हॅलो म्हणायला हवं होतं आणि मला तू.
मग दुपारभर मी तुझ्या फोनची वाट पहात राहिलो. संध्याकाळ होईपर्यंत.
मग दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा भेटलो. जणू अगदी ठरवून ठेवल्यासारखे. तुला आवडत्या त्या प्राजक्ताच्या झाडाखाली.
पाने फुले नसलेले ते झाड कसेतरीच वाटत होते. पावसाळ्यात पांढर्‍या केशरी फुलांची रांगोळी काढणार्‍या फांड्याच्या जागी नुसत्या शुष्क तुराट्या राहिल्या होत्या.
त्या सुकलेल्या झाडाशी कसलेसे अनामिक नाते असल्यासारखी तू झाडाच्या खोडाला हाताने सारखा स्पर्ष करत होतीस. एखाद्याच्या पाठीवरुन मायेने हात फिरवावा तसा हात फिरवत होतीस.
मग अचानक तू माझ्या कडे पाहिलस. तुझे डोळे भरून आले होते. ... काही बोलली नाहीस . मग माझा हात हातात घेतलास. आणि खूप वेळ नुसतंच पहात राहीलीस. अनिमीष पणे. तुला खूप काही बोलायचं होतं. शब्दांच्या पलीकडचं "ते" मी न सांगताच समजून गेलो.
माझे हे काही तू समजून घेतले असावेस.
खरंच ग राजकुमाराला कधीच इच्छा नसते त्याच्या राजकुमारीला सोडून जायची. पण राजकुमार जातो दूरदेशी . व्यवहार, जाबाबदार्‍या हे जादूगार त्याच्या परतीची वाटच पुसून टाकतात. बिचारा राजपुत्र राजकुमारीला हे कधीच सांगत नाही. आपण कशापुढे तरी पत्करलेली हार त्याला उघड करायची नसते.
राजकुमारी ला हे मनातुन उमगते. तीही काही बोलत नाही. राजकुमाराचा हात हातात घेते. आणि थोपटते. तीला ही राजकुमार हरलाय हे आपल्या समजलंय हे सांगायचे नसते. ती तीचा हीरो असतो.
कुठेतरी मनात शब्द उमटायला लागतात.
जग ने छीना मुझसे
मुझे जो भी लगा प्यारा.
तुम हार के दिल अपना
मेरी जीत अमर करदो.
राजकुमार या ओळी त्याच्या मनातच ठेवतो.
राजकुमारी मग स्वतःशीच बोलू लागते.
हे प्राजक्ताचे झाड बघ ना. कसं रुसलंय. त्याने पाने फुले सोडून दिली आहेत.वठलंय जणू.
एक दिवस मग सोसाट्याचा वारा येईल, ढग दाटून येतील.सगळीकडे धूळ उडत असेल. आकाशाला कंठ फुटून ढग गडगडायला लागतील.
मग टपोरे थेंब येतील. अगोदर एक दोन. मग सात आठ आणि मग मुसळधार बरसेल. पहिला पाऊस येईल. मातीच्या गंधासोबत हा प्राजक्तही मनातून फुलेल.
आतून हिरवा कच्च होईल. मनात ल्या मनात फांद्यांवर डहाळ्यांवर ती नाजूक फुले फुलताना दिसतील.
पावसाला भेटलं की प्राजक्त फुलेल आतून आणि बाहेरुनही.
मला तुझ्या त्या प्राजक्ताच्या शुष्क खोडावरुन तुझं हात फिरवत त्याच्या स्पर्ष अनुभवण आता समजतं.
तुझं त्याचं नातं उमजतं.
तू मला विचारत असतेस " येशील ना रे या पावसा साराखा. बरसून जाशील ना .या वेड्या पारिजातकासाठी"
माझ्याकडे काहीच उत्तरे नसतात. मी कसनुसा हसतो.
तुझ्या डोळ्यातल्या पाण्यात मी हळू हळू विरघळत जातो.
तुला ते जाणवते. तु हसायला लागतेस. अगोदर डोळ्यांच्या कडांतून , मग ओठांवर थोडे स्मित. मग अगदी मनापासून. तुझं हसू चेहेराभर पसरत जातं. ते माझ्या चेहेर्‍यावरही उमटतं प्रतिबिम्बासारखं.
अबोल्याची रेषा पुसली जाते.
मी कॉफीचा कप घेऊन येतो आणि म्हणतो. मी का आलो माहिती आहे? काल फोनवर विसरलो होतो. हॅलो म्हणायचं. ते सांगायला....

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........
..................... चकोर शाह.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

NAKSHATRA's picture

23 Jan 2021 - 8:05 am | NAKSHATRA

विजुभाऊ तुमची लेखनशैली अतिशय चांगली आहे
खूप छान.

चौथा कोनाडा's picture

24 Feb 2021 - 1:20 pm | चौथा कोनाडा

वाह, मस्त विजूभाऊ !