"या वर्ष-अखेरीच्या पार्टीसाठी एक नवीन कल्पना सुचली आहे, " परुळेकर मामा बाल्कनीत येत मला म्हणाले,
"नाही तरी 'व्हर्च्युअल गेट-टुगेदर' आहे, तर फक्त गप्पा मारुया. प्रत्येकानं २०२० मध्ये घडलेली एक तरी सकारात्मक किंवा आनंददायी घटना सांगायची."
"विचार करून सांगतो, " मी म्हणालो.
वास्तविक, गप्प बसून राहणे, गप्पा मारत बसणे किंवा अगदी गप्पी मासे पाळणे या 'गप्प' च्या बाराखडीत येणाऱ्या कुठल्याही क्रियेला माझा कधीच विरोध नसतो. मामांनाही हे माहिती आहे. आम्ही आपापल्या बाल्कन्यांमधून अशी चर्चा गेली वीस-बावीस वर्षं करत आलो आहोत. त्यामुळे त्याला 'सामाजिक दूरता' ('सोशल डिस्टन्सिंग') असं नाव कुणी देणार असेल तर देवोत, आमच्या समजात मात्र दूरता नाहीये. फक्त आम्ही कुठलाही नवीन व्याप किंवा उपद्व्याप मांडला की त्याचं रूपांतर ताप किंवा पश्चात्ताप यांत होतं (हे पूर्वीच्या 'कॅस'* किंवा 'व्हॅलेंटाईन डे'च्या अनुभवांवरून आम्हांला चांगलंच कळून चुकलंय*). कारण कधी कधी इतरांपासूनच आमची 'सामायिक दूरता' मात्र झालेली असते. म्हणूनच मामा या वेळेला काही करण्याआधी माझा सल्ला विचारत होते.
माझ्या मते सगळेजण आपापल्या घरी बसून जे हवं ते खातायत (शिवाय गरजेनुसार पितायत) ही गोष्ट पुरेशी समाधानकारक होती. नाही तर, पुलंनी म्हटल्याप्रमाणे 'यांच्यासारखा गोंधळ राजकारणीदेखील घालू शकत नाहीत' अशी आमच्याकडे परिस्थिती असते - अगदी दर वर्षी.
प्रथम मामा पार्टीचा प्रस्ताव आणतात. ती कोणत्या दिवशी करायची हा पहिला प्रश्न असतो. २४ डिसेंबर ते १ जानेवारी यातल्या प्रत्येक दिवसावरून चर्चा (आणि मतभेद) होतात. एक तर गुड फ्रायडे-ईस्टर संडे/मंडेंसारखा ख्रिस्ताच्या जन्मदिनाचा वार कुणी पक्का केलेला नाही. ती तारीख आठवड्यात कुठेही भरकटलेली असते आणि अनेकांच्या सोयीची नसते. ३१ तारखेच्या आपापल्या पार्ट्या प्रत्येकानं ठरवलेल्या असतात त्यामुळे तो दिवस रद्द होतो. एक तारखेला सगळ्यांना सुट्टी नसते. ज्यांना असते त्यांच्यातल्या काहींना आदल्या रात्रीच्या हँग-ओव्हरची चिंता असते. काहींनी एक तारखेपासून आपण अपेय-पान सोडणार असा एक संकल्प सोडलेला असतो. अर्थात, 'संकल्प' या शब्दालाच 'सोडणे' हे क्रियापद जोडलं गेलं असल्यामुळे त्यांना पुढच्या एक-दोन दिवसांतच अपेय-पान सोडणे किंवा सोडलेला संकल्प सोडणे असे त्यातून दोन विकल्प सापडतात!
पार्टी सोसायटीपुढच्या अंगणात करायची की गच्चीवर हा मुद्दा मग चर्चिला जातो. २०१८ च्या संपण्याच्या वेळी अंगणात झालेल्या पार्टीत 'मान ना मान, मै तेरा सलमान' असं म्हणत शर्मानं आपला टी-शर्ट फेकून देऊन नाच केला होता आणि रस्त्यावरून जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीची मेहमाननवाजी ओढवून आणली होती. सुदैवानं त्यांनी ते फक्त बघण्यावारीच नेलं होतं. त्यामुळे शर्माला झाकण्यासाठी गच्चीचे कठडे तरी कामी येतील असं वाटून मग गेल्या वर्षीची पार्टी गच्चीत करण्यात आली होती. त्यानं तिथे गच्चीच्या कठड्यावर उभं राहून 'टायटॅनिक'चा सीन करायची कल्पना आमच्यासमोर मांडून वात आणला होता. अर्थात, आधीच पुरेशी चढलेल्या शर्माला तितपत चढणंही अशक्य झालं असतं. पण तरी तो धोका न पत्करता आम्ही गच्चीत बऱ्यांच दिवसांपासून पडलेली एक वेताची खुर्ची त्याच्यासमोर आयत्या वेळी सारली होती. तो आणि सौ. शर्मा तिच्यावर टायटॅनिक पोज मध्ये उभे राहताच त्या खुर्चीचंच टायटॅनिक झालं होतं!
पार्टीतले गेम्स हा पुढचा मुद्दा येतो. भुजबळांचे पार्टी गेम्स हे आमच्या पार्ट्यांचं आकर्षण असतं. (निदान असा त्यांचा समज आहे.) त्यांना डोळ्यांना पट्टी लावणं (इतरांच्या) या गोष्टीचं अत्यंत अप्रूप आहे. त्यात (मुलांनी) गाढवाला शेपटी लावण्यापासून ते (मोठ्यांनी) ऐश्वर्याला बिंदी (किंवा अभिषेकला शेंडी) लावण्यापर्यंत सगळे सोपस्कार होतात. जसं वर्ष पालटतं, तसे गाढवाच्या ऐवजी हत्ती/घोडे आणि ऐश्वर्या/अभिषेकच्या ऐवजी दीपिका/रणवीर वगैरे येतात एवढाच काय तो बदल.
उमा मुलांचा नाच बसवते, काही मुलं गाणी म्हणतात. मीही कुणी तरी फर्माइश केल्याचं निमित्त करून एखादी गझल म्हणतो.
मामांची रॅफल तिकिटं, त्यातून जिंकलेली बक्षिसं (जी मला कधीच मिळत नाहीत), त्यानंतर बरोब्बर बारा वाजता त्यांचं सँटाक्लॉज होऊन येणं आणि मुलांना भेटवस्तू देणं, रॅफलचे उरलेले पैसे आपण कुठल्या संस्थेला देणार आहोत त्याची वाच्यता करणं हे बाकीचे नित्याचे कार्यक्रम होतातच.
मेनूवर मात्र पूर्वीच तोडगा निघालेला आहे. दिवाळीला साग्रसंगीत भारतीय जेवण तर नवीन-वर्षाला पाश्चात्य. त्यात पिझ्झ्याबरोबर बर्गर्स, शिवाय त्याआधी "कुछ तो स्पायसी स्नेक्स चाहिये" या दोशीच्या मागणीवरून समोसे (मग मराठी पदार्थ का नकोत म्हणून भुजबळांच्या इच्छेप्रमाणे बटाटेवडे), अगदीच कुणाची संकष्टी निघाली तर त्यानं कष्टी होऊन नये म्हणून साबुदाणे वडे (आणि बर्गरसोबत आलेल्या फ्रेंच फ्राईज) असतात. आता इतके सगळे पदार्थ आहेतच तर शेवटी भात खाल्ल्याशिवाय जेवण झाल्यासारखं वाटत नाही म्हणून मी, परुळेकर मामा-मामी त्या यादीत पुलाव घुसवतो. ब्लॅक फॉरेस्ट केक आणि त्याच जोडीला 'वॅनिला आईसक्रीम और गुलाबजामून का काँबिनेशन होना चाहिये' म्हणून तेही समाविष्ट झालेले असतात...
आता या सगळ्यांत परिस्थितीजन्य बदलांपेक्षा अन्य काही करणं मला अवघड वाटत होतं.
दुसऱ्या दिवशी मी पुनः बाल्कनीत आलो. मामांना म्हटलं,
"एक सकारात्मक गोष्ट सांगायची आहे. ती आपल्या पार्टीत चालेल का बघा. "
"म्हणजे ही कल्पना आवडली तर तुम्हांला. "
"थांबा, आधी गोष्ट तर ऐका, " मी सुरुवात केली, "अलीकडेच एक बातमी वाचली - 'हत्तीच्या सुटकेला 'शेर' धावून'...
"हो, वाचली आहे मी ती."
"सकारात्मक आहे की नाही? "
"प्रश्नच... "
मी मामांना मध्येच अडवत म्हटलं,
"थांबा. विचार करा. पाकिस्तानातल्या एकाकी हत्तीच्या सुटकेसाठी 'शेर' नावाची एक पॉप गायिका धावून आली. तिच्या मदतीनं त्या हत्तीला विमानात घालून कंबोडियात नेण्यात आलं. आता तिथे त्याला तीन हत्तिणी सांगून आल्या आहेत. अशी ती पूर्ण बातमी आहे." (https://www.bbc.co.uk/news/av/55122863)
मामा हसले,
"खरं आहे. वास्तविक तो हत्ती पाकिस्तानातला. म्हणजे भारतीय वंशाचाच असणार. मग त्याला भारतातलंच स्थळ का नाही बघितलं? इथे काय हत्ती नाहीत का?"
"नाही तर काय? शिवाय विमानानं पाठवायची काय गरज होती? भारतात तो चालत चालतही येऊ शकला असता. "
"पण तो आला नाही तेच बरंय. त्याला बाटवून त्यांनी हेर केला नसेल कशावरून? "
"आता असं केलं पाहिजे. निदान त्या कंबोडियातल्या अंकोर वाट मध्ये शुद्धीकरण करून त्याची चांगली मुंज लावली पाहिजे आधी. "
दोघेही हसलो. मामा म्हणाले,
"छे. छे. ही बातमी अजिबात सकारात्मक किंवा आनंददायी नाहीये."
"ठीक आहे. तुम्हांला दुसरी एक बातमी दाखवतो," मी म्हटलं.
'महाराष्ट्रातला एक एकटा वाघ तीन हजार किलोमीटर चालून शेवटी महाराष्ट्रातल्याच दुसऱ्या अभयारण्यात पोचला' अशी ती बातमी होती. (https://www.bbc.co.uk/news/world-asia-india-54973452)
"यात काय सकारात्मक किंवा आनंददायी आहे? "
"राष्ट्रच काय पण महाराष्ट्रदेखील सोडला नाही त्यानं. बायको करीन तर आपल्याच जातीची."
"खरं आहे. वाघाची नरभक्षक म्हणून ओळख होती, संस्कृतीरक्षक म्हणून आजच झाली. अगदी शिवसेना किंवा म. न. सेना यांच्या वाघांना जे जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं."
मामांनी लवकरच पार्टीची घोषणा केली. त्यात भुजबळांनी एक 'व्हर्च्युअल क्विज' घेतलं. उमानं 'झूम'वर मुलांचा एक 'सिंक्रोनाईज्ड डान्स' करवून दाखवला. शर्मा फक्त "इस बार वो मजा कहां' असं बार बार म्हणून घेत होता. (त्याचा फोन मात्र मधेमधे 'म्यूट' वर जात होता आणि कॅमेरा बंद पडत होता. )
मधल्या गप्पांमध्ये कोविडवरची लस, ब्रेक्झिट, शेतकरी, सर्वबाद छत्तीस असे अनेक विषयही चघळले गेले.
निरोप घेताना आम्ही एकमेकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
"आपण उगाचच आपल्या आवडीनिवडी जगावर थोपवायला बघतो. आहे ते उत्तमच आहे. " मामा दुसऱ्या दिवशी मला म्हणाले.
- कुमार जावडेकर
(*कॅस आणि व्हॅलेंटाइन डेच्या या कथा अनुक्रमे 'लोकसत्ता - हास्यरंग पुरवणी सप्टेंबर २००३' आणि माझ्या 'निवडक अ-पुलं' या इ-पुस्तकात पूर्वी प्रसिद्ध झाल्या आहेत. )
प्रतिक्रिया
10 Jan 2021 - 9:40 am | चौकटराजा
असे हल्ली फार कमी वाचायला मिळते ! आमची सोसायटी तर अशा पासून फार लांब आहे !!
10 Jan 2021 - 3:46 pm | टवाळ कार्टा
=))
10 Jan 2021 - 5:07 pm | सरिता बांदेकर
छान. लहानपणी आम्ही पार्टी कोजागिरीला करायचो पण ती कधी इतिहासजमा झाली ते कळलंच नाही.
आता फक्त ३१ डिंसें. चं प्लॅनिंग चालू असतं.
10 Jan 2021 - 6:05 pm | कंजूस
आवडलं लेखन.
पाचवी ते नववीपर्यंतच्या मुलामुलींना आपल्या सोसायटीत काही कार्यक्रम व्हावेत असं वाटत असतं.ते घडवले आमच्याकडे. नंतर आवड आणि उत्साह संपतो. मुलांच्यामुळे पालकही मजा करतात. पण आठवणी राहिल्या.
लेखन आवडलं.
11 Jan 2021 - 11:48 pm | सौंदाळा
मस्त लिहिलंय
सोसायटीत जेवण फक्त गणपतीत असायचे.
३१ डिसेंबरला टीव्ही वर मराठी, हिंदी प्रोग्राम त्या वर्षातली टॉप हिंदी गाणी, वर्षातल्या महत्वाच्या बातम्या बघणे याचच अप्रूप असायचं.
घरी आईने केलेला पुलाव किंवा पावभाजी किंवा डोसा वगैरे प्रकार. केक, आईस्क्रीम, गोड कधीच नाही.
रात्री 12 वाजले की फोन करायची धांदल उडायची. मामाचा फोन कायम पहिला यायचा. मग आम्ही आत्या, काका वगैरेना फोन झाले की खिडकीतून किंवा खाली येऊन फटाके उडवणारी मुलं बघत बसायचो पण स्वतः मात्र कधीच उडवले नाहीत. रात्री एकला झोपून जायचं. अजून आठवलं की मस्त वाटतं.
सध्या तर 31 ला कितीतरी वर्षांत काहीच केलं नाहीये. इट्स जस्ट अनादर डे.