बळी तो कान पिळी

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 Oct 2020 - 2:03 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

एवढ्यात तीन बातम्या ऐकण्यात आल्या. दर्जेदार वृत्तपत्र आणि राष्ट्रीय चॅनलवरुन या बातम्या ऐकल्या असल्याने या अफवा नसाव्यात, त्यांत तथ्य जरुर असावं :
बातमी क्रमांक एक : ‘तयार होऊ घातलेली करोनाची लस (अनेक असल्या तरी) जगातल्या काही श्रीमंत देशांनी आधीच बुक करुन ठेवल्या. म्हणून अशा काही लसींना अधिकृत मान्यता मिळताच त्या श्रीमंत देशांना आधी पुरवल्या जातील.’ विसनशील आणि गरीब देशांपर्यंत ही लस पोचायला म्हणून खूप उशीर होणार आहे. तोपर्यंत अनेक लोक आपला प्राण गमावू शकतात. (यावर जागतिक आरोग्य संघटनेने काय मार्ग काढला?)
बातमी क्रमांक दोन: ‘अनेक श्रीमंत लोकांनी खाजगी हॉस्पिटलचे बेड (करोना होण्याआधीच) बुक करुन ठेवल्या.’ (बातमी नागपूर, महाराष्ट्रातील होती.) म्हणजे यदाकदाचित पुढे केव्हातरी करोना झालाच तर वैद्यकीय सेवेची कोणतीही अडचण स्वत:ला यायला नको. बेड शिल्लक नाहीत तर अॅडमिट कसं व्हायचं हा प्रश्न अशा लोकांना करोना झाल्यावर भेडसावणार नाही. रेल्वे वा बसमधील आरक्षणासारखं हे आरक्षण म्हणता येईल. प्रवास निश्चित झाल्यानंतर आपण असं आरक्षण करतो. करोना होणार की नाही हे नक्की माहीत नसूनही हे आरक्षण आहे.
बातमी क्रमांक तीन: ‘भारताच्या राजधानीत- दिल्लीत एका खाजगी करोना चाचणी केंद्रात करोना नसलेल्यांनाही पॉजिटीव्ह दाखवून रुग्णालयात पोचवलं जात होतं. काही खाजगी रुग्णालयांशी या केंद्राचा तसा करार होता म्हणे.’ (असे उद्योग करणार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं). आणि ‘उत्तर भारतातील एका खेड्यात चाचणी न घेताच बर्‍याच लोकांना करोना पॉजिटीव्ह ठरवून, बळाचा वापर करुन रुग्णालयात नेण्यात आलं.’
अशा या प्रतिनिधीक तीन, खरं तर चार बातम्या. या व्यतिरिक्‍त (1) ‘बिहारच्या निवडणुकीसाठी सुशांतसिंह राजपूत प्रकरण हा प्रचाराचा मुद्दा होत असल्याचं’ एका खासदाराचं प्रतिपादन. (2) निवडणुकीसाठी एक लालूच म्हणून ‘बारावी पास मुलींना 25 हजार तर पदवीधर मुलींना 50 हजार देण्याची बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची घोषणा.’ (3) निवडणुकीपूर्वी ‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोबाईल- टॅब देण्याची चाचपणी’ अशा काही ‘अफवा कम कुजबूज बातम्या’ही ऐकण्यात आल्या.

या आणि इतर अशा सगळ्या बातम्या सत्य असतील तर कठीण आहे. (या बातम्या खोट्या ठरल्यात तर आनंदच होईल.) संपूर्ण जग आज मानवतावादी असण्यापेक्षा स्वार्थी होत असल्याचं लक्षात येतं. (करोनाच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट ठळकपणे समोर येत आहे.) देशाची आर्थिक स्थिती खड्ड्यात गेली तरी चालेल, पण आपली सत्ता कशी भक्कम होईल याकडे काही राजकीय पक्ष पहात आहेत. (जगातील सगळेच घटक- सामान्य माणसंही स्वत:च्या आर्थिक कमाईबद्दल जागृत असतात. तसं असावंही, पण मानवतेचा बळी देऊन नव्हे. ज्यांना जगण्याव्यतिरिक्‍त कुठलीच महत्वाकांक्षा नाही, अशांचं काय?) जगातल्या ज्या त्या देशातील सत्ताधीश आपलीच सत्ता त्या त्या देशात कशी टिकून राहील यावर लक्ष केंद्रीत करताना दिसतात. (मग ती सत्ता कोणत्याही देशाची असो, लोकशाही पध्दतीने निवडून येणार्‍यांची असो की हुकुमशाही परंपरेने सत्ता काबीज केलेली असो.) श्रीमंत देशांना वाटतं, आपल्या देशाला पुरुन उरलं की मग इतर देशांना मदत करु. ज्या देशांकडे अफाट संपत्ती आहे, अफाट शस्त्रास्त्रसाठा आहे, अफाट सैन्य आहे त्या देशांना जगातील इतर देश आपल्या सत्तेचे बटीक असायला हवेत असं वाटतं.
श्रीमंत म्हणजे ज्यांच्याकडे पैशांचं बळ आहे, त्या बळावर ते काहीही विकत घेऊ शकतात. म्हणून अजून करोना झाला नाही तरी असे लोक रुग्णालयांतील बेड अडवतात आणि ज्यांना आज गरज आहे अशांना बेड- म्हणजेच योग्य ती वैद्यकीय सुविधा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने ते तडफडून मरताहेत. यांत शास्त्रज्ञ, डॉक्टर, लेखक आणि पत्रकारही आहेत. सामान्य माणसाची काय कथा?
कोणाला कितीही मानसिक त्रास होवो, (अशा मानसिक त्रासाने अनेकांना जिवाला मुकावं लागतं) कोणाला कितीही आर्थिक झळ बसो, पण आपली तुंबडी भरण्यासाठी- करोनाच्या संधीचं सोनं करण्यासाठी निगेटीव्हला पॉजिटीव्ह करणं हा व्यवसायही आपल्यातल्याच काहींनी सुरु केला आहे.
ज्या देशात नशेबाज, लफडेबाज (सामाजिकतेशी काडीचाही संबंध नसलेल्या) अशा नटा- नटींच्या आडोशाने या करोना काळात निवडणुका लढवण्या- जिंकण्याचे मनसुबे आखले जातात, नाहीतर राजकारण तरी करतात, त्या देशाचं काय भवितव्य असेल? (त्याला महासत्ता होण्याचं स्वप्नं पाहण्याचा तरी अधिकार आहे का?) त्या देशातल्या राजकीय नेत्यांची प्रगल्भता काय? ते लोकांचं काय भलं करणार आहेत? आणि जे नागरीक अशा लोकांना निवडून देतात, त्या मतदारांच्या जागृततेबद्दल- देशप्रेमाबद्दलही प्रश्न उपस्थित होतात. असे हे सर्वांगिण प्रश्न निर्माण करणारे सत्ताकारण.
निवडून येण्यासाठी मतदारांना राजरोसपणे उघड रोख लाच देता येत नाही म्हणून पायाभूत रोजगार निर्मितीऐवजी बारावी पासला पंचवीस हजार वा मोबाईल- टॅबचं सवंग अमिष दाखवलं जातं. (याचा अर्थ, सत्ता उपभोगत असताना अशांनी कोणती लोकाभिमुख धोरणं राबवली याची स्वत:च दिलेली कबुली.) देशाच्या नाजूक आर्थिक स्थितीसह रोजगार, आरोग्य, पाणी, पर्यावरण, रस्ते, स्वच्‍छता, कला, भाषा, ज्ञान आदींबद्दल सत्ताधार्‍यांना देणंघेणं नाही आणि केवळ मतदार असणार्‍या नागरीकांनाही. तरीही असे दोन्हीकडचे लोक पोटतिडकीने ‘देशभक्‍ती’च्या गप्पा मारताना दिसतात. शिक्षणाचं धोरण सरकारने जाहीर करायचं, पण ते राबवायचं (विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या) पैशांच्या बदल्यात खाजगी संस्थांनी. भ्रष्टाचार, काळाबाजार, भेसळ, फसवेगिरी, नफेखोरी विरुध्द कोणी लढायचं? अशी चिकित्सा मीडियावर का होत नाही. (का तो विकला गेलाय?)
बळ हे फक्‍त शारीरिक नसतं. पैसे फेकून काहीही मिळवण्याची श्रीमंती म्हणजे बळ. चलनी अस्मितेचा बाजार मांडणं म्हणजे बळ. अफाट- अमर्याद- प्रचंड अशी भक्कम सत्ता म्हणजे बळ. (ज्यांनी निवडून दिलं, त्यांच्याच खच्चीकरणाचा कायदा बहुमताच्या बळावर केला जातो.) असं बळ ज्याच्याकडे आहे तो इतर कमकुवत कान कायम ‍पिळत आपला स्वार्थ साधत राहणार. इथं डार्विनची आठवण होणं अपरिहार्य. जो सक्षम आहे, तो पुढं जात राहणार. जो कमकुवत आहे, तो संपत जाणार. आज एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धाजवळ पोचतानासुध्दा ‘बळी तो कान पिळी’ ही म्हण सार्थ ठरत असेल तर आपण खरंच आधुनिक ज्ञानी जगात वावरत आहोत की पुन्हा मागे पाषाण युगाकडे चाललोत?
(अप्रकाशित लेख. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

समाजलेख

प्रतिक्रिया

भ्रष्टाचार, काळाबाजार, भेसळ, फसवेगिरी, नफेखोरी विरुध्द कोणी लढायचं? अशी चिकित्सा मीडियावर का होत नाही. (का तो विकला गेलाय?)

पत्रकार खिशात किंवा मालकच गुंतलेले.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Oct 2020 - 2:09 pm | डॉ. सुधीर राजार...

बरोबर

सुबोध खरे's picture

1 Oct 2020 - 7:33 pm | सुबोध खरे

संपूर्ण जग आज मानवतावादी असण्यापेक्षा स्वार्थी होत असल्याचं लक्षात येतं.

चुकीचं विधान आहे.

माझ्या मुलाला राज्य आणि श्रीरामाना १४ वर्षे वन वास या वाक्यामुळे रामायण झाले

सुईच्या अग्रावर राहील एवढीसुद्धा जमीन देणार नाही या वाक्यामुळे महाभारताचे युद्ध झाले.

तेंव्हा स्वार्थ हा सर्व प्राणीमात्रात जन्मजात आहेच.

"आजकाल लोक स्वार्थी झाले आहेत" हे घासून गुळगुळीत झालेले पण चुकीचे वाक्य सर्वत्र वापरले जात आहे.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Oct 2020 - 2:11 pm | डॉ. सुधीर राजार...

म्हणजे शिक्षणाचा उपयोग नाही असं म्हणायचंय

सुबोध खरे's picture

1 Oct 2020 - 7:36 pm | सुबोध खरे

लेख भाबड्या पण चुकीच्या गृहितकावर आधारित असल्यामुळे मुळातूनच गंडला आहे.

सर्व: गुण: कांचनम आश्रयते.

म्हणजे आपल्या खिशात पैसे असतील तर सर्व गुण आपल्यात येतात हि वस्तुस्थिती.

हि वस्तुस्थिती नाकारली तर निराशा पदरी येते.

लोक चांगले का नाहीत

खिशात माल असेल तर सर्व मॉल सारखेच.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Oct 2020 - 2:13 pm | डॉ. सुधीर राजार...

सहमत

दादा कोंडके's picture

2 Oct 2020 - 3:14 pm | दादा कोंडके

भूतदया जाउद्या समस्त मानवजातीचे कल्याण ये सबके बस की बात नाही. त्यामुळे त्यातल्या त्यात करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे एक बाउंड्री आखून कोणतेही बेकायदेशीर कृत्य न करता जवळच्या माणसांच्या जिवांची काळजी घेणं. कुटुंबापासून ते देशापर्यंत सगळे हेच करत असतात. आफ्रिकेत किंवा आपल्याच भारतात दरवर्षी हजारो जण मृत्युमुखे पडतात म्हणून आपण घरात भरलेलं रेशन वाटत नाही.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

3 Oct 2020 - 11:23 am | डॉ. सुधीर राजार...

पण अशा लोकांना मदत करतोच

दादा कोंडके's picture

4 Oct 2020 - 10:31 pm | दादा कोंडके

पटलं नाही. तुम्ही नक्की कुणाला मदत करता? आणि किती? प्रत्येक दहा सेकंदाला भुकेमुळे एक मूल मरते. तुमच्याकडे पुढच्या दोन वर्षासाठी अन्न-धान्य खरेदी करण्याएवढे पैसे आहेत का? असतील तर पुढच्या दोन वर्षांची तरतूद करून ठेवण्यापेक्षा या आठवड्यात हजारो मुलं वाचवण्यासाठी ते पैसे दान (किंवा स्वतः खरेदी करून देणे) का नाही करत?

डॅनी ओशन's picture

2 Oct 2020 - 4:19 pm | डॅनी ओशन

त्याला महासत्ता होण्याचं स्वप्नं पाहण्याचा तरी अधिकार आहे का?

लिष्ट द्या की एक, काय काय अटी पूर्ण करायला लागतात, हा अधिकार मिळवायला. :)

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

4 Oct 2020 - 9:56 am | डॉ. सुधीर राजार...

अटी नाहीत

माणूस हा जन्म जातच स्वार्थी आहे, त्या मध्ये नवीन काही नाही.
स्वार्थी पना आणि लालसा आहे म्हणूनच प्रगती होत गेली हे पण सत्य आहे.
नाही फक्त अन्न मिळवायचे असते तर ते ह्या पृथ्वी वर विपुल आहे काहीच जास्त मेहनत न घेता आरामात ते मिळेल.
मीच श्रेष्ठ ही जी भावना आहे ती माणसाला हैवान बनवते.
काही उद्योगपती कडे एवढी संपत्ती आहे की त्या संपत्ती चा त्यांना पण काही उपयोग नाही फक्त मी पना मुळे अजुन संपत्ती गोळा करत आहेत आणि ती कुजवत आहेत.
ना त्यांच्या कामाला येत आहे ना लोकांच्या.
श्रीमंत लोकांचे हॉस्पिटल ठरलेली आहेत ती पंच तरांकित आहेत तिथेच त्यांनी बेड रिझर्व केले असतील ती हॉस्पिटल अशी पण गरिबांना परवडत नाहीत.
त्या मुळे श्रीमंत लोकांनी बेड बुक केले म्हणून त्याचा परिणाम सामान्य लोकांवर होत नाही.
ऍपल मोबाईल हा ब्रँड आहे तो श्रीमंत लोकांचा आहे त्याची किती ही किंमत वाढली तरी त्या मुळे गरिबांना दुःख होण्याचे कारण नाही.
पण सामान्य लोकांना पण हाव कमी नाही जमीन विकातिल पण ऍपल चाच मोबाईल घेतील.
मग दोष कोणाचा.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

4 Oct 2020 - 10:04 am | डॉ. सुधीर राजार...

दोष नागरीकांचाच

सतिश गावडे's picture

4 Oct 2020 - 11:58 am | सतिश गावडे

१. बरोबर
२. म्हणजे शिक्षणाचा उपयोग नाही असं म्हणायचंय
३. लोक चांगले का नाहीत
४. सहमत
५. पण अशा लोकांना मदत करतोच
६. अटी नाहीत
७. दोष नागरीकांचाच

सर, तुम्ही इतरांच्या धाग्यावर तर प्रतिसाद देत नाहीच, पण स्वतःच्या धाग्यावर उत्तरे देतानाही शब्दांची कंजूसी करता :)

Gk's picture

4 Oct 2020 - 10:33 pm | Gk

अमर्त्य सेननि सिद्ध केले होते की रिसोर्सेस कमी आहेत हे दारिद्र्याचे कारण नव्हे , डिस्त्रीबुशन नीट होत नाही , हे कारण आहे

मराठी कथालेखक's picture

6 Oct 2020 - 11:32 pm | मराठी कथालेखक

लेखकाची मानवतेबद्दलची तळमळ आणि वंचित घटकांबद्दलची सहानुभूती , संवेदनशीलता स्पृहणीय आहे.
लेख गंडला आहे असे म्हणण्यापेक्षा लेखकाच्या संवेदनशीलतेची नोंद घ्यावी असे मला वाटते.
स्वतःचे काढून दुसर्‍याला द्या आणि समाजसेवा करा असे म्हणणे नाहीच पण दुसर्‍याचे ओरबाडून घेण्याची लालसा नसावी.. आणि अशा लालसेचे "सगळे हेच करतात" असे समर्थनही संवेदनाहीनता दर्शवते.
असो.

सुबोध खरे's picture

9 Oct 2020 - 10:13 am | सुबोध खरे

आणि अशा लालसेचे "सगळे हेच करतात" असे समर्थनही संवेदनाहीनता दर्शवते.

चुकीचे विश्लेषण

बळी तो कान पिळी हा निसर्गाचा न्याय आहे. सिंह( सिंहच काय पण कोणताही प्राणी) सुद्धा जेंव्हा जमेल तेंव्हां इतर प्राण्यांनी मारलेली शिकार पळवतात.

मानव अजूनही इतका निस्वार्थी झालेला नाही आणि आपल्या आयुष्यभरात होणार नाही तेंव्हा उगाच दुसर्यांना संवेदनाहीन म्हणणे हे चूक आहे

भारतीय लोक भावनिक आहेत.परिस्थिती नुसार विचार न करता भावनिक विचार करतात.
कोणी ह्यांना सांगितले हिंदू खतरों mai हैं
हे झाले भावनिक 80% असून सुद्धा.
कोणी सांगितले मुस्लिम खतरों mai
हैं
हे झाले भावनिक 18% असून सुद्धा.
भावनिक आव्हान करून भारतीय नागरिकांना कोणी ही मूर्ख बनवू शकते.
आणि भारतीय लोकांच्या ह्याच दुर्गुण मुळे त्यांचे शोषण 1% असलेला सधन समज एकदम आरामात करतो.
मूठ भर भर ब्रिटिश राज्य करून स्वतः कंटाळून गेले ते गेले नसते तर भारताला कधीच स्वतंत्र मिळाले नसते..
कोणत्या लहान देशातील मुघल बादशाह भारतावर किती तरी वर्ष राज्य करून ब्रिटिश मुळे गेले .
ब्रिटिश नसते आले तर तेच राज्य करते झाले असते.

गामा पैलवान's picture

9 Oct 2020 - 11:33 pm | गामा पैलवान

Rajesh188,

१.

कोणी ह्यांना सांगितले हिंदू खतरों mai हैं
हे झाले भावनिक 80% असून सुद्धा.

जेव्हा हिंदू ७७% होते, तेव्हा फक्त २३% मुस्लिमांनी पाकिस्तान ओरबाडून काढलाच ना? मग हिंदूंनी भावनिक व्हायलाच पाहिजे.

२.

मूठ भर भर ब्रिटिश राज्य करून स्वतः कंटाळून गेले ते गेले नसते तर भारताला कधीच स्वतंत्र मिळाले नसते..

ब्रिटीश कंटाळून गेलेले नाहीत. त्यांना दुसऱ्या महायुद्धामुळे व सुभाषबाबूंच्या सशस्त्र आझाद हिंद सेनेमुळे भारत सोडवा लागला.

३.

कोणत्या लहान देशातील मुघल बादशाह भारतावर किती तरी वर्ष राज्य करून ब्रिटिश मुळे गेले .
ब्रिटिश नसते आले तर तेच राज्य करते झाले असते.

मग मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवेपर्यंत हे तथाकथित बादशहा काय करीत होते?

आ.न.,
-गा.पै.

nutanm's picture

24 Oct 2020 - 5:03 am | nutanm

डाॅ.सुधीर राजार. ‌ ‌‌‌‌अगदी सहमत. ‌‌‌‌‌‌‌‌‌‌नूतन जोशी

nutanm's picture

24 Oct 2020 - 5:09 am | nutanm

डाॅ.सुधीर राजार. अगदी सहमत. नूतन जोशी