घात (कथा)
एक चांगला माणूस बनणे, यापेक्षा जगात दुसरी कोणती मोठी गोष्ट असू शकते? मी तर म्हणेन चांगला माणूस बनणे हीच जगातील सर्वात कठीण गोष्ट असेल. तशी ती कठीण गोष्ट साध्य केल्याचा मला मोठा अभिमान आहे. आणि अभिमान असायलाही हवा. एकदम वाईट प्रवृत्तीचा माणूस जेव्हा, पूर्णपणे चांगला बनतो तेव्हा, त्याच्या त्या परिवर्तनाचा अभिमान वाटायलाच हवा. आणि मला तसा वाटतोही.
मी गुरुदत्त. एक चांगला माणूस. आधी नव्हतो. पण आता आहे. पाच वर्षांपूर्वी, एकदम टोकाचा वाईट प्रवृत्तीचा माणूस, आज चांगला कसा झाला? याचे खुद्द मलाच आश्चर्य वाटते. एखाद्या अट्टल दारूड्या माणसाने अचानक, पूर्णपणे मदिरा सेवन सोडून, रात्रं-दिवस कीर्तनात दंग व्हावे, तसे काहीसे माझे झाले होते. पाच वर्षांपूर्वी या आसपासच्या परिसरात, साधे माझे नाव घेतले तरी लोक नाक मुरडायचे. गुंडगिरी, चोरी, छेडछाडी, पाकीटमारी, टपोरीगिरी हे माझे रोजचे धंदे. दिवसातून एखादी पाकीटमारी, आठवड्यातून एखादी टपोरीगिरी, किंवा मग महिन्यातून एखादी घरफोडी ठरलेली असायची. आणि हे कामही एवढ्या सफाईने करायचो की, बस विचारायची सोय नाही. एखादा कुशल कारागीर, ज्या चलाखीने आपले काम करतो, तसे माझे हे काम असायचे. एखाद्याचे पाकीट एवढ्या अलगत उडवायचो की, त्या माणसाच्या खिशाला केवळ एखाद्या मुलायम पिसाचा स्पर्श व्हावा, एवढा हलकासा स्पर्श व्हायचा. तो स्पर्श त्याला जाणवायचाही नाही. पण तेवढ्या वेळात त्याच्या खिशातून त्याचे पॉकेट गायब असायचे. घरफोडी म्हणजे माझा आवडता प्रकार. चोरी करण्याचा सगळ्यात सोपा आणि स्वस्त प्रकार. एखादे चांगले घर गाठायचे, त्यावर पाळत ठेवायची, सर्व माणसे घराबाहेर गेले की, जवळच्या कौशल्याने कसल्याही प्रकारचे कुलूप उघडायचे, आणि घरात घुसायचे. सगळे घर साफ करायचे आणि पसार व्हायचे. मागे काहीच पुरावा ठेवायचा नाही. एकदम कसे सूत्रबद्ध करायचे. हे असे आयुष्य मस्त वाटायचे. पण ते मस्त मुळीच नव्हते. ते आता जाणवते. कारण ती एक प्रकारची धुंदी होती. एक मोह होता. लोकांच्या चोरीच्या पैशावर स्वतःचे पोट भरायचे, हाच दैनंदिन व्यवहार बनला होता. आणि वरून त्याचा मला खेदही वाटायचा नाही. मी त्या अज्ञानी आनंदात मजेत होतो. पण ती एक घटना घडली, आणि माझ्यातला तो चोर मेला. आणि मी एक चांगला माणूस बनलो.
एक म्हातारी आणि तिची पंचवीस तीस वर्षांची नात, रस्त्यावरून जात होत्या. म्हातारी जरा थकल्यासारखी वाटत होती. नात तिच्या हाताला धरून, रोडच्या एका कडेने चालत जात होती. बहुदा त्या म्हातारीला दवाखान्यात घेऊन जात असावी. तिच्या खांद्यावर तिची पर्स लटकलेली होती. मी ती पाहिली. माझ्यातला चोर लगेच जागा झाला. खिशातून माकडटोपी काढली, चेहऱ्यावर चढवली आणि मी तयार झालो. जरा इकडे तिकडे नजर फिरवली. अनुकूल वेळ साधली, आणि वेगाने पळत जात तिचा खांद्यावरची पर्स ओढली. पर्सची दोरी मजबूत असावी, ती लवकर तूटलीच नाही.त्यामुळे ती तिच्या खांद्यालाच अडकून बसली. मी जरा चेकाळलो, आणि त्या पर्सला एक जोरात हिसका मारला. त्या हिसक्याने ती पर्स माझ्या हातात आली. पण त्या झटापटीत आणि हिसक्यात, तिची म्हातारीच्या हातावरची पकड सैल झाली.आणि ती म्हातारी रोडवर पडली.तिचे दुर्दैव तेवढ्यावरच थांबले नाही. म्हातारी रोडवर पडायला आणि पाठीमागून एक ट्रक यायला, एकच वेळ झाली. ट्रक म्हातारीच्या डोक्यावरुन पुढे निघून गेला. तिच्या डोक्याचा जोरात फट्sss असा आवाज झाला. म्हातारी जागीच गेली. ते समोरचे दृष्य माझ्या डोळ्यादेखत घडत होते. त्या म्हातारीची ती अवस्था पाहून मी संपूर्णता गलिगात्र झालो. मुळापासून हादरलो. तिच्या मृत्यूला सर्वस्वी कारणीभूत आपणच आहोत, ही जाणीव मला झाली. तिची नात मोठ्याने आक्रोश करत होती. ती खूप घाबरली होती. तिच्या रडण्याचा आवाज सगळ्या परिसरात घुमत होता. ते सगळे दृश्य पाहून मी सुन्न झालो. शरीर जाग्यावर स्थिर झाले. काय करावे काहीच कळेना. ती तुटलेली पर्स तशीच अजून हातात होती. हळूहळू मी भानावर येऊ लागलो. आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव मला होऊ लागली. काहीतरी निर्णय घ्यावा लागणार होता. आजूबाजूला काहीतरी आवाज येऊ लागले.
"धरा! मारा! तो तिथे थांबला आहे.चोर! चोर!! तो तोच आहे. त्याच्या हातात ती पर्स आहे."
असा आवाज वेगाने माझ्या कानात शिरला. म्हणजे लोक माझ्याकडे येत होते. लोकांच्या हातात सापडलो तर आपला मृत्यू येथेच होणार. लोक मारून मारून इथेच जीव घेणार. त्यापेक्षा येथून निसटलेले बरे. जीव वाचवायला हवा. जी चूक झाली ती झाली. पण जीव वाचविणे महत्त्वाचे आहे असे म्हणत, मी तिथून पळ काढला. सुरक्षित जागी पोहोचलो.
माकडटोपी मुळे माझी ओळख खुली झाली नाही. ओळख पटली नाही. मी वाचलो होतो. हळूहळू ते प्रकरणही मागे पडून गेले. पण माझ्या डोळ्यासमोरून, त्या म्हातारीच्या मृत्यूचे ते चित्र हटेना. मला क्षणाक्षणाला तिचा तो मृत्यू आठवू लागला. तिच्या मृत्यूला आपणच कारणीभूत आहोत, ही जाणीव मला स्वस्थ बसू देईना. सगळे शरीर, मन अशांत बनून गेले होते. शांतता, स्वस्थता काही लाभेना. मला त्या गोष्टीचा पश्चाताप होऊ लागला. आणि शेवटी मी तो निर्णय घेतला. त्या गोष्टीचे प्रायश्चित्त घेण्याचे ठरवले. हे सगळे उद्योग, हा चोरीचा धंदा बंद करायचा, आणि एक साधे सरळ आदर्श जीवन जगायचे असे ठरवले. समाजासाठी काही तरी चांगले करायचे. असा विचार करून त्या धंद्याला लाथ मारली. त्याला कायमचा रामराम ठोकला. चांगला माणूस बनण्याच्या मार्गाला मी लागलो. आणि तब्बल पाच वर्षांनी मी तो बनलोही. एक चांगला माणूस. एक सज्जन माणूस.
आता सगळे काही सुरळीत होते. पाच वर्षांचा काळ लोटला होता. एक चांगला माणूस मी तयार झालो होतो. स्वतःचे नाव कमावले होते. समाजात एक मानसन्मान होता. पूर्वीचा सगळा इतिहास पुसला गेला होता.
हे असे विचार चक्र मनात नेहमीच असे फिरते. मन भूतकाळात जाते. तो भूतकाळ राहून राहून आठवत राहतो. पण मला तो नकोसा वाटतो. कारण त्यात सगळे काही वाईट आहे. चांगले असे काहीच नाही. केवळ वाईट आणि वाईटच! हळूहळु भूतकाळातून मी वर्तमान काळात आलो. म्हणजे चांगला भानावर आलो. आताच्या या चालू क्षणावर आलो.
आज वातावरण हलकेफुलके वाटत होते. दुपारची वेळ होती. रस्त्यावरची रहदारी शांतपणे कमी-जास्त होत होती. लंच टाईम असल्याने हॉटेल, धाबे, खानावळी माणसांनी फुलून गेल्या होत्या. मी दुकानात आरामशीर बसलेलो होतो. मोजकेच येणारे ग्राहक किराणामाल घेऊन जात होते. दुपारी ग्राहकांची वर्दळ तशी कमीच असते. त्यामुळे मी जरा निवांत होतो.
अचानक लँडलाईनची रिंग वाजली. पलीकडून एक स्त्री बोलत होती. कदाचित मालाच्या ऑर्डरसाठी फोन असावा.
"हॅलोss
मी यांत्रिकपणे म्हणालो.
"अहो, मला वाचवा! मी संकटात आहे. मला मदत करा. लवकर या! कोणीतरी मला मारण्याचा प्रयत्न करत आहे. माझा जीव घेत आहे. मी संकटात आहे."
ती स्त्री भयग्रस्त आवाजात बोलत होती.
"अहो बाई, कोण आहात तुम्ही? कुठल्या संकटात आहात? असा अचानक फोन का केलात? काय झालं ते शांतपणे सांगा."
मी जरा आश्चर्याने विचारले.
"मला कोणीतरी घरात डांबून ठेवले आहे. सगळा अंधार आहे. कसलातरी आवाज येत आहे. काळोख वाढत आहे. आजूबाजूचे सगळे वातावरण भयग्रस्त होत आहे. वाचवा मला!"
ती पुढे बोलत म्हणाली.
"पण तुम्ही कुठे आहात? कोणी डांबले तुम्हाला?"
मी पुन्हा विचारले.
"कोणी डांबले माहीत नाही. कशासाठी डांबले तेही माहीत नाही. पण कोणीतरी एक माणूस होता. रिक्षातून मला बेशुद्ध करून, इथे या बंगल्यात आणले. आणि इथे डांबले. मला इथे आणत असताना, मी थोडीशी शुद्धीत होते. त्यामुळे एक गोष्ट आठवत आहे, शहरातील त्या माधवबागेच्या बाजूला, एक पांढर्या रंगाचा मोठा बंगला आहे, त्या बंगल्यात मी असेल. कारण तेवढीच काहीशी पुसट आठवण स्मरणात आहे. नंतर बेशुद्ध पडल्याने काही आठवत नाही. पण आता शुद्धीवर आल्यावर सभोवताली सगळा अंधार जाणवत आहे. काहीतरी करा! पण मला वाचवा!"
ती काकुळतीला येऊन म्हणाली. तीच्या स्वर रडका झाला होता.
”बाई, तुमच्या घरी फोन करा ना. मला का फोन करताय."
मी जरा साशंक होऊन विचारले.
"नवर्याचा फोन बंद येतोय. आता कोणाचा नंबरही पाठ नाही. येथील लँडलाईनच्या बाजूला तुमच्या दुकानाचे कार्ड पडलेले आहे. म्हणून तुम्हाला फोन केलाय. मला मदत करा! येथून माझी सुटका करा. तुमचे खूप उपकार होतील."
ती आता रडत होती. रडतच बोलत होती. तिचा स्वर कंप पावत होता. ती खर बोलत होती, यात आता कोणतीच शंका उरली नव्हती.
"तुम्ही घाबरू नका. मी काहीतरी करतो. तुमची सुटका करण्याचा प्रयत्न करतो."
मी काहीशा निर्धाराच्या स्वरात तिला म्हणालो.
मी घडीकडे नजर टाकली. दुपारचे साडेबारा वाजले होते. त्या अचानक आलेल्या फोनने, माझा लंच करण्याचा सगळा उत्साह मावळला होता. तिला मदत करावी की नाही? हा प्रश्न मला पडला. डोक्यात नुसती कालवाकालव चालली होती. तिच्या बोलण्यावरून ती संकटात आहे, हे जाणवत होते. ती संकटात आहे हे नक्कीच. खूप आशेने तिने फोन केलेला आहे. मदत तर करावी लागेल.
मी तसाच उठलो. माधवबाग येथून जवळच होती. त्याच्या शेजारचा तो पांढऱ्या रंगाचा बंगलाही मला माहीत होता. तो नक्की कोणाच्या मालकीचा आहे? हे मात्र मला माहीत नव्हते. मी वेगाने माधवबागकडे निघालो. तो पांढरा बंगला नजरेच्या टप्प्यात आला. मी लगबगीने बंगल्याजवळ पोहोचलो. बंगला चांगलाच मोठा होता. समोर मोठी बाग आणि त्याच्या पाठीमागे, बंगला मोठ्या प्रशस्त आकारात पसरलेला होता. बंगल्याच्या आसपास कोणीच नव्हते. सगळीकडे सामसूम होती. रोडपासून थोडा आत असल्यामुळे, बंगल्याजवळ कमालीची शांतता जाणवत होती. मला थोडी भीती वाटली. आपण चुकीच्या तर बंगल्यात आलो नाही ना, असे वाटत होते. पण नाही बंगला बरोबर होता. मी आजूबाजूची चाहूल घेतली. बंगला बाहेरून बंद होता. मोठ्या दरवाजावर, एक आधुनिक पद्धतीचे कुलूप होते. ते खोलल्याशिवाय आत जाता येणार नव्हते. कुलूप तर खूप किचकट पद्धतीचे दिसत होते. ते खोलने सोपे नव्हते. यांत्रिक पद्धतीने ते घडविलेले असावे, चावीशिवाय दुसऱ्या कोणत्या साधनांनी, ते खुलेल असे वाटत नव्हते. ते कसे खोलावे हाच प्रश्न माझ्यासमोर होता. माझे जुने कौशल्य मनःपटलावर उमटू गेले. पाच वर्षांपूर्वी अनेक घरफोड्या याच कौशल्याने केल्या होत्या. हाताची हालचाल कौशल्याने होऊ लागली. बाजूला एक छोटीशी तार पडलेली होती. तिचा उपयोग होणार होता. एक टोकदार खिळाही तेथेच पडलेला दिसला. साधने अपुरे होते. पण त्यातच काम भागवावे लागणार होते. जुने कौशल्य, ज्ञान वापरले. थोडे जास्त श्रम पडले. पण शेवटी ते कुलुप उघडण्यात ,मी यशस्वी झालो. एक हलकेच स्मित ओठांवर उमटुन गेले. स्वतःचा उगाचच अभिमान वाटून गेला.
बंगला आतून मोठा होता. सगळीकडे शांतता होती. ती स्त्री कोठे असेल? मी जोरात आवाज दिला.
" कोणी आहे का?"
पण माझ्या आवाजाला काहीच प्रतिसाद आला नाही. मी पुन्हा एकदा आवाज दिला. पण आताही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अचानक वरच्या खोलीतून काही तरी आवाज आला. मी भरभर पायऱ्या चढत वरच्या खोल्यांकडे गेलो. सगळ्या खोल्या बंद होत्या. पण एका खोलीचे दार थोडे उघडे दिसले. मी हळूच त्या खोलीजवळ गेलो. खोलीत अंधार होता. एव्हाना सगळ्या बंगल्यातच काहीसा मंद अंधार जाणवत होता. मी खोलीत पाऊल टाकले. खोली चांगलीच मोठी दिसत होती. मी पुढे सरकू लागलो. आणि अचानक कशाला तरी अडखळून मी खाली पडलो. कशाला तरी पाय लागला होता. मी धडपडून उठलो. वेगाने दरवाज्याकडे वळालो. दिवा लावावा हा विचार डोक्यात आला. त्या विचाराने थोडे हायसे वाटले. भिंतीवरचे दिव्याचे बटन दाबले. खोली प्रकाशाने न्हाऊन निघाली. मी पाठीमागे वळालो आणि जागीच हादरून गेलो. मती गुंग झाली. शरीर निष्प्राण झाल्यासारखे जाणवले. समोर एका पन्नाशीच्या स्त्रीचा मृतदेह पडलेला होता. तिच्या डोक्यावर कोणीतरी प्रहार केला असावा. तिच्या डोक्यातून रक्त वाहत होते. कदाचित याच स्त्रीने फोन केला असावा. तो घाबरून गेला. त्याने तिला हलवून पाहिले, पण ती मृत झाली होती. तो प्रचंड हादरून गेला. या अशा बंगल्यात, या मृतदेहाजवळ आपण एकटेच आहोत. हा खून दिसत होता. तो आपल्या माथ्यावर आला तर? तो गांगरून गेला. काय करावे काहीच कळेना. पण सगळ्यात अगोदर येथून निसटुन जावे लागेल.कारण कोणाच्या नजरेत जर आपण पडलो, तर पुढे आपल्यालाच अडचण येईल. येथून क्षणात निघावे. त्यातच आपले भले आहे. मी लगबगीने खाली आलो. खाली हॉलमधून दरवाजाकडे निघालो. अचानक काहीतरी हालचाल जाणवली. कोणीतरी वेगाने आपल्याकडे येत आहे, अशी पुसटशी जाणीव मला झाली. मी पाठीमागे वळून बघण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्याच अवधीत, काहीतरी टणक वस्तू माझ्या डोक्यावर आदळली. कोणीतरी डोक्यावर प्रहार केला होता. प्रहार चांगलाच मोठा होता. डोक्यात झालेल्या वेदना मेंदूपर्यंत गेल्या. मोठे टेंगुळ डोक्यावर भरकन उमटून आले. आणि काही कळायच्या आत मी शुद्ध हरवून बसलो.
पण एक गोष्ट होती. मी पूर्ण बेशुद्ध झालो नव्हतो. काहीसा शुद्धीत होतो. थोड्याशा संवेदना अजूनही जाग्या होत्या. आजूबाजूच्या परिस्थितीची थोडी थोडी जाणीव होत होती. आजूबाजूच्या घडामोडी डोळ्यांनी, कानांनी, स्पर्शांनी, गंधांनी जाणवत होत्या. काही पावलांचे आवाज येत होते. काही चित्र विचित्र आवाजातले अस्पष्ट बोलणे ऐकायला येत होते. पण त्या बोलण्याचा बोध होत नव्हता. कोणीतरी भेसूरपणे हसत होते, खिदळत होते. कशाचातरी जोरजोरात आवाज येत होता. काहीतरी सरपटत होते. ओढले जात होते. उचलले जात होते. कोणीतरी वेगाने वरच्या खोल्यांकडून खाली येत होते. धावपळ, गोंधळ माजल्यासारखी आजूबाजूची परिस्थिती जाणवत होती. काय होत आहे काहीच कळत नव्हते. उठून बसण्याइतके त्राण शरीरात उरले नव्हते. साधी डोळे किणकिणे करण्याइतकीही शक्ती शरीरात शिल्लक नव्हती. आता माझ्या शरीराला काहीतरी स्पर्श होत होता. कोणीतरी अंगावरून हात फिरवत आहे, असे वाटत होते. छातीजवळ, मांडीजवळ काहीसे गार गरम हाताचे स्पर्श जाणवत होते. काहीतरी टणक, कठीण छातीला लागत होते. मांडीला लागत होते. पण मी त्याला विरोध करू शकत नव्हतो. कारण विरोध करण्या एवढी शक्ती माझ्या अंगात उरली नव्हती. मी आता एकदम स्थिर झालो होतो. एकदम स्तब्ध. एखाद्या भरभक्कम जड मूर्तीसारखा.
किती अवधी निघून गेला, हे काहीच कळाले नाही. पण मी काही काळानंतर पूर्णपणे बेशुद्ध झालो होतो. पण आता थोडी थोडी शुद्ध येत होती. आजूबाजूचे ज्ञान होत होते. भोवतालच्या वस्तूंचा बोध होत होता. संवेदना पुर्ववत होत होत्या. गेलेले भान परत येत होते. डोके थोडे जड पडले होते. ते चांगलेच ठणकत होते. डोके हातात धरून, मी उठायचा प्रयत्न केला. कसातरी धडपडत उठलो. दरवाजाकडे जाऊ लागलो. आणि अचानक काही आवाज कानावर आले. कोणाच्यातरी बुटांचे आवाज येऊ लागले. काही मोठ्याने बोलण्याचे स्वर ऐकू येऊ लागले. त्या मोठ्या दरवाजातून खाकी कपडे घातलेले, दहा-पंधरा पोलीस आत आले. त्यातील दोघांनी माझे दोन्ही हात धरले. दोन-तीनजण वेगाने पळत त्या वरच्या खोलीकडे गेले. काही बंगल्याच्या इतर भागात निघून गेले. काय होतेय, काहीच कळेना. अचानक वरच्या खोलीकडे गेलेल्या त्या दोन पोलिसांचा आवाज आला,
"सर, इथे एका स्त्रीचा मृतदेह आहे. तिच्या डोक्यावर कोणीतरी प्रहार केल्यासारखा वाटतोय. सगळीकडे रक्त सांडलेले आहे. खून असावा कदाचित."
त्याचे ते बोलणे ऐकून मी गर्भगळीत झालो. तो इन्स्पेक्टर माझ्याकडे आला. त्याच्या नजरेत संशय होता. तो क्रोधात होता. त्याने माझ्यावर नजर फिरवली. माझ्या शर्टच्या वरच्या खिशात, काही सोन्याचे अलंकार होते. त्याने वरचा खिसा भरलेला होता. खालच्या पॅन्टच्या दोन्ही खिशात काही नोटांचे बंडले होते. माझ्या पासून पाच सहा फुटावर एक मोठा लोखंडी गज पडलेला होता. त्याला रक्त लागलेले होते. पण माझ्या डोक्यातून तर रक्त निघालेच नव्हते. मला आश्चर्य वाटले. हे सोने, हे अलंकार, हे पैसे माझ्या खिशात कसे आले? हा गज येथे कुठून आला? आणि अचानक मला त्या गोष्टींचा उलगडा झाला. मी प्रचंड हादरलो. वरच्या खिशातले सोने, खालच्या खिशातल्या नोटा, बाजूचा रक्ताने माखलेला गज, जो कदाचित त्या स्त्रीला मारण्यासाठी वापरलेला असेल. माझ्या शरीरावर फीरणारे ते हात, हा ऐवज खिशात ठेवण्यासाठी फिरवलेले असतील. मी गर्भगळीत झालो.
वरून पुन्हा एका पोलिसाचा आवाज आला.
" सर, तिजोरीतील अलंकार, पैसे गायब आहेत. तिजोरी फोडलेली आहे."
आता मात्र माझे होते नव्हते, तेवढे सगळे त्राण संपले.
"मिस्टर, त्या बाईच्या खुनाच्या आरोपात, आणि या सगळ्या ऐवजांच्या चोरीच्या आरोपात, आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. मृतदेह आणि मुद्देमालासह तुम्हाला अटक करत आहोत. तुमचे सगळे मागचे रेकॉर्डही आमच्या जवळ आहे. तुम्ही कुख्यात गुन्हेगार आहात, हे त्या रेकॉर्डवरून कळते."
इन्स्पेक्टर मला बेडी घालत म्हणाला. पोलिसांची बेडी, माझ्या हातात पडली होती. मी स्तब्ध होतो. मला माहित होते, आता आपण कितीही खरे सांगायचा प्रयत्न केला तरी, ते कुणालाही पटण्यासारखे नाही. सगळे पुरावे आपल्या विरुद्ध आहेत. त्यात पुन्हा आपली सगळी जुनी पार्श्वभूमी, पोलिसांना कळालेली आहे. तो खून, ती चोरी आपणच केली आहे, हे ढळढळीत सत्य त्यांना दिसणार आहे. ते कितीही असत्य असले तरी, ते त्यांना सत्यच वाटणार. कारण सगळी परिस्थिती आपल्याविरुद्ध आहे.
आम्ही सगळे बंगल्याबाहेर आलो. माझ्या हातात बेडी होती. मी आता आरोपी होतो. खुनाचा, चोरीचा आरोपी. सगळे पोलिस जीपकडे जात होते. अचानक माझी नजर बंगल्याच्या गेटच्या डावीकडे गेली. आणि मला ती दिसली. एक तीस पस्तीस वर्षांची तरुणी. ती हसत होती. ती आनंदी दिसत होती. तिच्या चेहर्यावर कमालीचे समाधान चमकत होते. तिला कुठेतरी पाहिले आहे, असे वाटत होते. आणि अचानक मला ते आठवले. ती त्या म्हातारीची नात होती. हो! हो!! तीच होती! खात्रीने सांगतो, तीच होती. ती आता जोरजोरात हसत होती. उजव्या हातातील फोन कानाला लावून, मला काहीतरी खुणवत होती. आणि पुन्हा जोरजोरात हसत होती. मला सुरुवातीला काहीच बोध होईना. आणि मग डोक्यात लख्ख प्रकाश पडला.
सगळे प्रकरण डोळ्यासमोर सूत्रबद्ध पद्धतीने चमकून गेले.
खुनाच्या आणि चोरीच्या गुन्ह्यात आपण पकडलो गेलो आहोत, त्याला केवळ पाच वर्षांचा उशीर झाला आहे. फरक फक्त एवढाच आहे की, ती म्हातारी आणि पर्स होती.
आता ती पन्नशीची स्त्री आणि अलंकार, पैसे आहेत.
ती तरुणी त्याच्याकडे बघत, समाधानाने हसत बाहेर निघून गेली. अगदी समाधानाने.
(समाप्त)
प्रतिक्रिया
8 Sep 2020 - 10:13 pm | Gk
छान
8 Sep 2020 - 10:47 pm | कानडाऊ योगेशु
कथेच्या शेवटाचा साधारण अंदाज आला होता.
इथे प्रथमपुरुषातुन लिहिलेले बेअरिंग सुटले आहे.
पण ती मृत झालेली स्त्री कोण होती. म्हातारीच्या नातीने तिने ह्याला फसवण्यासाठी हकनाकच मारले म्हणायचे का?
8 Sep 2020 - 11:22 pm | Gk
आता ह्या मेल्या मढ्याची नात तिचा बदला घ्यायला अजून एक खून करेल
इनफायनाइट लूप
10 Sep 2020 - 4:25 pm | दुर्गविहारी
चांगली लिहिली आहे कथा.