सांग दर्पणा

ज्येष्ठागौरी's picture
ज्येष्ठागौरी in जनातलं, मनातलं
1 Sep 2020 - 1:54 pm

सांग दर्पणा...
एका अगदी प्रिय दुकानात चक्कर मारताना अतीव सुंदर आरसा दिसला,एकदम स्वच्छ चकचकीत आणि सागवानी लाकडाची सुंदर किनार.मन थबकलं तिथंच,मनात विचार करूनही त्या क्षणी घरात योग्य जागा सापडेना त्याच्यासाठी. मग पुन्हा येण्याचा निश्चय करून वळले.
शास्त्रात शिकवलंय की आरसा ही एक प्रकाश परावर्तित करणारी चमकदार वस्तू असते. प्रतिमा छोटी किंवा मोठी करायला अंतर्वक्र किंवा बहिर्वक्र आरसेदेखील वापरले जातात.इतकी गद्य व्याख्या पण आपल्या आयुष्यातले आरसे किती काव्य घेऊन येतात.
पूर्वी फणी करंड्याची पेटी असायची ,तिला एक झाकणाच्या आतल्या बाजूला आरसा बसवलेला असायचा.त्याचा पेटीशी असणारा कोन एकदम योग्य.आतल्या सामानात तेलाची झारी, पिंजर, आगवळ, मेण अशा वस्तू असायच्या. नवरा सांगतो की त्याची आजी दुपारी चहा झाला की ती पेटी समोर ठेवून आरशात बघून अतिशय सावकाश केस विंचरून अंबाडा घालायची.हा तिचा रोजचा कार्यक्रम होता आणि त्यात कधीही खंड पडला नाही.त्याकाळी तो सगळ्या बायकांचा टापटीपीचा , व्यवस्थित राहण्याचा भाग होता.
माझ्या आरशांच्या वेडाला प्रतिसाद म्हणून अशीच एक पेटी माझ्याकडे आलीये,
किमान ऐंशी वर्ष जुनी, अतिशय देखणी,अजूनही पारा घट्ट टिकलाय.बिजागऱ्या चांगल्या न कुरकुरता चालल्यात.अगदी जुन्या माणसांसारख्या.माझं अगदी pride possession आहे ते.तसाच अजून एक आहे, पन्हाळ्याला एका दुकानात मिळालेला ,बांबूच्या बारीक धाग्यांनी केलेली किनार, तळहाताएव्हढाच पण विलक्षण देखणा.तोही माझ्या आवडत्या वस्तूंपैकी एक.तसेच आरसे लावलेले कपडेही फार आवडतात मला.कारण ठाऊक नाही.पण आवडतात.माझी दाक्षिणात्य मैत्रीण अकिलानी मला सांगितलं का त्यांच्या दाक्षिणात्य परंपरेत मला वाटतं विशु सणात, सकाळी उठल्यावर लहान मुलांना डोळे मिटून हाताला धरून घेऊन जातात आणि एका आरशासमोर उभं करतात, ज्याच्या समोर समृद्धीच्या अनेक गोष्टी ठेवलेल्या असतात.त्यात पिवळी फुलं, धान्य,दागिने असं पिवळ्या रंगाचं बरंच काही असतं. ते आरशासमोर ठेवल्यानं दुप्पट दिसतं.फारच गोड परंपरा आहे ही.फेंगशुईमध्येही जेवणाच्या टेबलाजवळ आरसा ठेवावा म्हणतात म्हणजे,सगळं दुप्पट दिसतं, समृद्धीचं द्योतक म्हणून.
आमच्याकडे एक मोठा आरसा होता, जवळजवळ पूर्णाकृती छबी दिसेल असा, आणि एक होता जुन्या हॅट स्टँडचा, काळा कुळकुळीत, त्यात बघायचं तर उंची वाढेपर्यंत स्टँडला धरुन उडी मारायला लागायची आणि आमच्या दिवाणखान्यात जुन्या बंगाली घरांमध्ये असायचं तसं कोरीव नक्षीदार कॅबिनेट,तीन वेगवेगळे युनिट्स असलेलं. तिघांना सुंदर छोटे छोटे अनेक आरसे,सरळ आणि काही काटकोनात असणारे. पण त्यात काही पूर्ण दिसायचं नाही.मग त्यासाठी घरातल्या गोदरेजच्या कपाटाच्या आरशाचा आधार घ्यायला लागायचा. सगळ्यांच्याच घरी असायची ती कपाटं, गोदरेजचं म्हणायचं पण असायची लोकल ब्रँडची पण त्याला एक पूर्ण किंवा एक अर्धा आरसा असायचा त्यावर हमखास एक पडदा,घरच्या बाईनी भरलेला गणपती,एअर इंडियाचा महाराज किंवा कमनीय बांध्याची नर्तकी असायचीच असायची. आम्ही जिथे रहायचो तिथे आजूबाजूला भरपूर फर्निचरची दुकानं होती, तिथं ऑर्डर देऊन कपाटं तयार करुन मिळायची,तिथे कोणीतरी ऑर्डर दिलेलं एक कपाट बरेच दिवस पडून होतं, जुन्या , दिवाणजी असलेल्या पेढीसाठी तयार केलेलं पण त्यांनी न नेलेलं. मग शेवटी ते विकायला काढलं,ते माझ्या एका वहिनींनी विकत घेतलं तर, त्या कपाटाचा छोटा आरसा खालच्या बाजूला होता,पण एवीतेवी पडदा लावायचा होताच म्हणून तिनं ते घेतलं.तो आरसा खाली का असावा याबद्दल उहापोह झाला तेंव्हा दिवाणजी बसून काम करायचे त्यांना त्यांची छबी दिसावी म्हणून ही व्यवस्था असावी या निष्कर्षाप्रत आम्ही आलो पण माझा भाऊ म्हणाला नाही,तसं नाहीये वहिनीकडे शेरा नावाचं कुत्रं होतं त्याला बघण्यासाठी तो आरसा खाली लावलाय.
आमच्याकडे अजून एक आरसा होता मोठ्या उंचीचा, फिकट पिवळ्या रंगाची लाकडी किनारीचा पण त्यात बघून घरातली पुरुष मंडळी दाढी करायची. आजीच्या खोलीतल्या chest of drawers ला पण एक आरसा होता. अशी ही आरसे मित्र मंडळी.नंतर नाटकात काम करताना पहिल्यांदा मोठे मोठे आरसे ज्यांना बाजूनी तीन किंवा पाच मोठे मोठे दिवे लावलेले, पिवळ्या रंगाचे.चेहरा अगदी लख्ख दिसेल अशी व्यवस्था असणारे.त्यात आपले कपडे,चपला,आपली उभं राहायची ढब,केशरचना सगळं सगळं अगदी व्यवस्थित दिसायचे.ह्याच आरशापुढे निवृत्तीदादा रंगरंगोटी करायचे.आपल्या प्रतिमेच्या प्रेमात आपणच प्रेमात पडू असा पारा आणि प्रकाशदिवे ~ एकदम आवडून गेलं हे साहचर्य.याच नाटकाच्या दरम्यान एक वेगळाच किस्सा घडला,दिल्ली दौऱ्याच्या वेळी आम्ही जिथे उतरलो होतो तिथे बंक बेडस होते.मी वरच्या मजल्यावर होते रात्री चादर झटकायला गेले तेंव्हा मीच त्याच्यावर आधी ठेवलेला माझा आरसा खाली पडून फुटला.मला एकदम कसतरीच वाटलं ,मी काचा गोळा करणार एवढ्यात आमच्या नाटकात एक अगदी जरा वेगळ्या स्वभावाची मुलगी फटकन म्हणाली की अगं हे असं आरसा फुटणं चांगलं नसतं ,अशुभ असतं. मी तिच्यापेक्षा बरीच लहान होते,घरापासून आणि घरच्यांपासून पहिल्यांदाच लांब आले होते.मला खूप घाबरल्यासारखं झालं,घसा दाटून आला,घरची आठवण यायला लागली,सगळे जण घरी सुरक्षित असतील ना अशा शंका यायला लागली आणि ती पूर्ण रात्र मी अस्वस्थ काढली,तेंव्हा एवढी फोनची सुविधा नव्हती पण ट्रंक कॉल लावून बापूंचा आवाज ऐकला आणि मग शांत वाटलं.घरी येऊन आईला सांगितलं तेंव्हा ती म्हणाली की अगं असं नसतं, उलट काच फुटणं शुभ मानतात आणि आपण शुभ अशुभाचा विचारच करू नये. माझा आरसा लगेच स्वच्छ झाला.आणि नंतर असले कुठलेही संदर्भ कशालाही जोडू नयेत हे मनात पक्कं झालं. जोडले तर सकारात्मक जोडावे आणि नेहमी दुसऱ्याच्या मनाचा विचार करावा हेही कळलं.
आमचं लग्न झालं त्याआधी नवऱ्यानी हौसेनं पूर्ण आरशाचं ड्रेसिंग टेबल आणि त्याच्या समोरचं स्टूल असं घेतलं.माझ्या सासूबाई जाऊन काही काळ झाला होता आणि त्याला बहीण नसल्यानं अशी काही वस्तू घरात नव्हती आणि त्याची गरज कधी भासली नव्हती.पण मिलिंदनी तो आरसा घेतला. नवीन येणाऱ्या व्यक्तीचा मनापासून विचार करण्याची ही त्याची कृती एकदम आवडून गेली.आणि पुढच्या आयुष्यात कोणासाठी काहीतरी आतून विचार करून मनापासून करायची प्रेरणा देऊन गेली.
मुलं झाल्यानंतर मिलिंदनी दोन मोठे मोठे आरसे आणले, त्यांनी रोज स्वतःला आरशात नीट निरखून पाहिलं पाहिजे ह्या विचारानी.त्या आरशांवर मोठा दिवेही लावले.मुलं खूष.शाळेत जाताना,बाहेर जाताना घरातून निघताना एक नजर स्वतःवर टाकावी असा एक रिवाज़ पडून गेला.आपल्या शरीरात होणारे सूक्ष्म बदल आपले आपल्याला सर्व प्रथम कळले पाहिजेत असं आम्हाला वाटत असल्यानं मुलांनाही ते सांगितले.कित्येक घरांमध्ये असं स्वतःकडे निरखून बघणं हे वर्ज्य समजलं जातं.खरंतर आपल्या शरीरावर लक्ष ठेवणं हे अजिबात गैर नाही आणि त्यात दिसणारं आपलं शारीर रुप हे आहे तसं स्वीकारणं हे अगदी योग्य. मुलं त्या त्या वयात तेवढी तेवढी रमतात त्या आरशासमोर,आणि ते स्वाभाविक आहे.माझा धाकटा विशिष्ट वयात प्रत्येक आरशात म्हणजे रस्त्यातून जाताना, वाहनांच्या आरशात डोकावून पहात आपले केस नीट करायचा,आता आपसूकच बाहेर पडला त्या चक्रातून.आता आरशात अजिबात न बघण्याचं वर्तुळ चालू आहे.तशी आपली तरी कुठं दोस्ती कमी झालेली असते आरशाशी,आपण बघतोच की वारंवार आरशात.माझी लेक जिच्याकडे नृत्य शिकायची त्या प्रेरणा देशपांडेनी तिच्या स्वतःच्या वास्तूत नवीन वर्ग सुरु केला तेंव्हा तिनं असेच मोठे मोठे आरसे बसवले आणि मला खात्री आहे की तिच्या विद्यार्थिनींच्या डौलात आणि नृत्यकौशल्यात नक्की भर पडली असणार आहे.एका शाळेनं प्रवेशद्वारात एक मोठा आरसा बसवला होता,मुलांना स्वतः कडे नीट बघता यावं म्हणून.मुलांनी चांगलं नीटनेटकं टापटीप यावं शाळेत,हाच चांगला उद्देश असणार. आरशाचं आकर्षण सगळ्यांनाच असतं. पण राजेरजवाड्याना जरा जास्तच. जयपूरला आरसेमहाल पाहिला ,अनेक जुन्या वास्तूंमध्ये आरसे मोठ्या प्रमाणात दिसतात. आणि राणी पद्मिनीची गोष्ट ऐकताना मनात ठसतो तोही आरसा.सिनेमांना तर आरशाचं खूप वेड. मुघल- ए- आझम मध्ये आरसे महालात नाचणारी अनारकली,किंवा बॉबीमधला आरशात सूर्यकिरण टाकून बोलवणारा डिब्बा, बर्फीमधला बर्फी ज्याला शब्द आवाज यांचं सानिध्य नाही तोही असाच प्रकाश परिवर्तित करणारा आरसा वापरणारा.
हिमगौरीच्या कथेतली दुष्ट राणी सगळ्या जगात गोरी कोण आहे तर ती खुद्द हे ऐकल्यावर खूष होत असते आणि हिमगौरीचं नाव ऐकल्यावर पेटून उठत असते ही परीकथा असली तरी सत्यकथा अशी आहे की तो आरसा खरं बोलत असतो जसे सगळे आरसे बोलतात.जशास तसे असेच उत्तर देत असतात.एक आभासही असतो आणि एक पूर्णसत्यही! त्याच्या किती आहारी जायचं हे आपल्याच हातात असतं.शारीर गोष्टी तर तो अगदी तंतोतंत दाखवतो.आपल्याला सहज न दिसणाऱ्या गोष्टी तो अगदी साफ साफ दाखवतो.पण मला असं वाटतं की आपल्या मनातलं तो असंच दाखवत असेल.कारण कधी कधी आपली प्रतिमा आपल्यालाच आवडत नाही ,नक्कीच त्यावेळी आपल्या मनात कुठल्यातरी न्यूनानी प्रवेश केला असणार,किंवा कुठल्यातरी नकारात्मक विचारांनी शिरकाव केलेला असणार आणि ज्या वेळी आपण आनंदात असतो त्यावेळी आपलीच प्रतिमा आपल्याला जास्त आवडते हे अगदी सत्य आहे, एवढंच कशाला मला मी घरच्या आरशात बारीक दिसते आणि बाहेरच्या कुठल्या आरशात जाड.म्हणजे बघणाऱ्याच्या नजरेतच सौंदर्य असतं तसं आपल्या आवडत्या आरशाच्या नजरेत असतं हेही खरंच. तसं असल्यामुळे सांग दर्पणा मी कशी दिसते याचं उत्तर माझा आरसा असेल तर मला हवं तसंच मिळणार.नुकताच मी एक ओशोंची चित्रफीत पहिली त्यात त्यांनी एका मुलीची गोष्ट सांगितली आहे की,ती एका गुरूंकडे येते आणि म्हणते की माझं मन अहंकाराने भरुन जात आहे,मी काय करु? गुरूंनी विचारलं काय झालं.त्यावर ती म्हणते की मी आरशात जेंव्हा पाहते,मी स्वतः इतकी सुंदर दिसते की माझ्या मनात अहंकार येतो.गुरू म्हणाले "बेटा काळजी करु नकोस,गैरसमजूत हा गुन्हा नाही!
आरसा खरंतर शारीर आपण जसे असतो तसं दाखवतो पण विचार केला तर त्याच्यापुढंचही काही मौजूद असतं त्यात. मी आरशात बघताना आरशातली व्यक्ती ही माझी सगळ्यात जवळची असते. माझी सगळ्यात जवळची आणि माझी अगदी अटीतटीची स्पर्धकही असते.माझं कौतुक करणारी आणि माझी टीकाकारही.
गुलजारजी म्हणतात तसं
"आईना देख के तसल्ली हुई
हमें इस घर में जानता है होई"
असं हुबेहूब वाटत राहतं!कधी अगदी परक्या लोकांच्यात मिसळताना आधार फक्त आरशात दिसणाऱ्या स्वप्रतिमेचाच असतो.पण मलाही फक्त प्रतिबिंबाच्या पलीकडं जाता आलं पाहिजे.
एका सौन्दर्यस्पर्धेत भाग घेणाऱ्या युवतीला प्रश्न विचारला होता की या स्पर्धेत भाग हेण्यापूर्वी तुम्ही किती लोकांचा सल्ला घेतला होतात. त्यावर त्या स्पर्धक महिलेनं उत्तर दिलं की एकाच आणि ती व्यक्ती मी स्वतः होते.खरं खोटं माहिती नाही पण उत्तर फार चांगलं आहे.आपण स्वतः कुठलाही निर्णय घेताना पहिल्यांदा स्वतःला विचारात घेतो का.निर्णय घेताना आरशात बघतो का.हा आरसा अगदी प्रत्यक्ष असतो असा नाही पण तो प्रत्येकाच्या मनात मात्र नक्की असतो,त्या आरशाला सगळं ठाऊक असतं. आपल्या अधिक उण्याची जाणीव आपल्याला असतेच,पण कधी होत नसेल तर ह्या आरशाचा फार उपयोग होतो.कधी कधी अपरिहार्य खोटेपणा चेहऱ्यावर येतो,तेंव्हा
आईना आज फिर रिश्वत लेता पकड़ा गया
दिल में दर्द था और चेहरा हंसता हुआ पाया गया।
गुलजारांचे हे शब्द कितीदा प्रत्यक्ष अनुभवलेत आपण.अहाहा!
पण सुरुवातीला आपली स्वयंप्रतिमा तयार करायला आरशाचा उपयोग होतो पण तो चांगला व्हायला हवा हे नक्की, आणि फक्त त्या आभासी प्रतिमांमध्ये फार गुंतून पडायला नकोच नको.आपण आरशासारखं प्रामाणिक असावं,त्या परमशक्तीचा, "त्याच्या" प्रेमाचा आणि प्रकाशाचा आरसा व्हावं. आयुष्याचा आरशाशी कोन अगदी चांगला असावा.पारा अगदी घट्टमुट्ट असावा कारण तो सुटला की हातात येतंच नाही मग.आपलं आपल्याला चांगल्या वाईटासकट सर्व दर्शन व्हावं.त्याला जसं आहे तसंच स्वीकार करावं. दुनियेनं, परिस्थितीनं आपल्याला घासलं तरी आपण आपलं चमकावं आरशासरखंच.
Mirror mirror on the wall
I will get up after having a fall
And whether I run walk or have to crawl
I will set my goals and achieve them all..
इतकं कणखर उत्तर त्या यदाकदाचित ढेपाळलेल्या प्रतिमेला द्यावं असं वाटतंय.
नुकताच लेकीने एक मोठा म्हणजे मोठं दिसणारा आरसा आणला. त्यात बघितल्यावर जाणवलं की बऱ्याच खुणा दिसताहेत की वयाच्या, शारीर अडचणींच्या, त्यापल्याड असणाऱ्या भल्या बुऱ्या अनुभवांच्या, संघर्षाच्या,आणि प्रेमाच्या,मायेच्या आणि काही नकारात्मक लक्षणही दिसताहेत हे अमान्य करून चालणार नाही ,पण त्यातूनच मार्ग काढायला हवा. तसंच दुसऱ्यांच्या वागण्याचा आपल्या मनाच्या पाऱ्यावर फार परिणाम होऊ नये आणि आपल्याला आतल्या प्रवासात हा आरसा वारंवार स्वच्छ करता यायला हवा.आरसा पुसताना तो आतला प्रवास असल्यानं सफाईही आतून व्हावी असं अगदी मनातून वाटतंय.आणि अगदी पूर्ण समजत नसले तरी,आचरणात आणणं कठीण असलं हे चपखल शब्द मनात खूप खोल खोल शिरताहेत....
ए गालिब तू उमरभर गलती करता रहा,धूल चेहरे पे थी और आईंना साफ करता रहा।
ज्येष्ठागौरी

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

1 Sep 2020 - 2:04 pm | तुषार काळभोर

छान लेख.

Mirror mirror on the wall
I will get up after having a fall
And whether I run walk or have to crawl
I will set my goals and achieve them all..

हा attitude भारिये!
हे आपलं असेच..
1

मला दहा वर्षांपूर्वीचे दिवस आठवतात.
मी पहिल्यांदा चेन्नई वरून घरी गेलो तेव्हा आवर्जून मरिना बीच वर खरेदी केली होती. त्यात असा एक आरसा होता.
.

घरी आलेल्या प्रत्येकाला तो इतका आवडायचा की पुढचे सहा महिने मी दरवेळी घरी येताना 3-4 आरसे आणायचो.

हे आरश्या चं दुकान.
.

केदार पाटणकर's picture

1 Sep 2020 - 2:01 pm | केदार पाटणकर

हा एक चांगला ललित लेख आहे. ललित लेखनाला भरपूर मोठा पैस असतो, हे पुन्हा एकदा दिसून आले.

नीलस्वप्निल's picture

1 Sep 2020 - 2:19 pm | नीलस्वप्निल

एक चांगला लेख.

ज्येष्ठागौरी's picture

1 Sep 2020 - 2:23 pm | ज्येष्ठागौरी

खूप खूप धन्यवाद! आरसा फार देखणा आहे,

टर्मीनेटर's picture

1 Sep 2020 - 4:18 pm | टर्मीनेटर

वाह! मस्तच लिहिलंय.
आरशाशी रोजच संबंध येत असला तरी अशा व्यापक दृष्टीकोनातून त्याच्याकडे कधी बघितले नव्हते.
आता विषय आरशाचा आहे म्हणून एक किस्सा लिहिण्याचा मोह टाळता येत नाहीये.
काही वर्षांपूर्वी एका कुख्यात गुंडाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाची निवडणूक अपक्ष लढवली होती. त्याच्या प्रचार साहित्याच्या डिझाईनींग आणि छपाईचे काम माझ्या मित्राच्या प्रिंटींग प्रेसला मिळाले होते. काही samples दाखवण्यासाठी मी त्या मित्राबरोबर त्या उमेदवाराच्या घरी गेलो होतो तेव्हा भिंतभर आरशा समोर उभा राहून कितीतरी वेळ त्याला भाषणाचा सराव करत असलेला पहिला होता. त्यावेळी तो प्रकार बघून हसू आले होते. प्रयत्न पूर्वक आत्मसात केलेल्या ह्या कलेच्या जीवावर त्याने प्रभागातील सोसायट्यांमध्ये जाऊन प्रभावी भाषणे ठोकली होती. त्या निवडणुकीत तो उमेदवार अपक्ष असूनही बहुमताने विजयी झाला आणि त्याने ह्या विजयात त्याच्या समाजात असलेल्या दहशतीपेक्षा भाषणाची कला शिकवणाऱ्या आरशाचा वाटा मोठा असल्याची कबुली दिली होती. काही काळाने प्रतिस्पर्धी टोळीने त्याची हत्या केल्यावर crime never pays ह्या वचनाची प्रचीतीही आलीच म्हणा!

Bhakti's picture

1 Sep 2020 - 4:33 pm | Bhakti

सुंदरच!
**आरसा पुसताना तो आतला प्रवास असल्यानं सफाईही आतून व्हावी असं अगदी मनातून वाटतंय.
आवडलं.. मस्त..

गणेशा's picture

1 Sep 2020 - 5:27 pm | गणेशा

अतिशय सुंदर लेखन..

फिलॉसॉफीकल विचारांचे प्रतिबिंब प्रत्येक वाक्या वाक्यात जाणवते आहे..

पुन्हा पुन्हा वाचावा असा सुंदर लेख.. खुप आवडला.

वामन देशमुख's picture

2 Sep 2020 - 9:30 am | वामन देशमुख

ज्येष्ठागौरी , तुमचं ललित लिखाण आवडलं आणि मग उगीच गालिब आठवला.

उम्र भर हम यही गलती करते रहे..
धूल चेहरे पे थी और हम आईना साफ करते रहे..!
धूल आईने पे थी और हम चेहरा साफ करते रहे..!

सुधीर कांदळकर's picture

8 Sep 2020 - 7:17 am | सुधीर कांदळकर

असे वाटले. धन्यवाद.

माझ्या आजोळी दरवाजाशी चपलाबुटांचे तीनेक फूट उंचीचे नक्षीदार अलीशान कपाट होते. त्यावर उभ्या ओव्हल आकाराचा नक्षीदार फ्रेमचा आरसा होता. टेबलावरच्या दोन बाजूंनी उभ्या असलेल्या खांबावरील मध्यभागी असलेल्या सपोर्ट पिनाभोवती फिरवून तो आपल्या उंचीशी जुळवून घेता येई. आम्हा दोन अडीच फुटी छोट्यांसाठी उभे राहून आरशात पाहायला स्टूलही होते. हा आरसा अर्थातच हळव्या आठवणींचा कोपरा आहे.

ज्येष्ठागौरी's picture

11 Sep 2020 - 12:21 pm | ज्येष्ठागौरी

मनापासून धन्यवाद