सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


लघु गुरु कसे ओळखावेत - सूक्ष्मभेद आणि बारकावे

Primary tabs

धष्टपुष्ट's picture
धष्टपुष्ट in जे न देखे रवी...
24 Aug 2020 - 11:59 am

कळीचा नियम: ज्या अक्षराला उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो ते लघु, आणि जास्त वेळ लागणारं अक्षर गुरु.
.

पण अनेक वेळेला नियम खूप संक्षिप्त असेल तर तो पुरत नाही. पुढे आलेले उपनियम या एकाच नियमाहून ओघाने आलेले आहेत. त्यातले सूक्ष्मभेद आणि बारकावे थोड्या विस्तारानं पुढे देतोय.
.

१) आपण शुद्धलेखनात जे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहितो ते ढोबळमानानं लघु किंवा गुरु असतात.
मुले आणि भिणे या शब्दांची पहिली अक्षरे ऱ्हस्व आली आहेत म्हणून ती लघु.
मूल आणि भीत-भीत या शब्दांची पहिली अक्षरे दीर्घ आहेत म्हणून ती गुरु.
.

२) काही वेळेला वृत्तात बसावं म्हणून नेहमीच्या लेखनात असलेलं ऱ्हस्व अक्षर दीर्घ आणि दीर्घ अक्षर ऱ्हस्व केलं जातं.
.

'गीताई माऊली माझी तीचा मी बाळ नेणता' या ओळीमध्ये विनोबांनी 'तिचा' हा शब्द वृत्तात बसण्यासाठी 'तीचा' असा लिहिला आहे. म्हणून 'ती' अक्षर गुरु गणलं जाईल.
.

'भंगु दे काठिन्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे' या ओळी मध्ये 'भंगू दे' असं न लिहिता मर्ढेकरांनी 'भंगु दे' असं वृत्तात बसवलं आहे. म्हणून 'गु' हे अक्षर लघु आहे.
.

३) काळ, केळ, कोळ आणि कौल या शब्दांची पहिली अक्षरं उच्चारायला दुसर्‍या अक्षरापेक्षा जास्त वेळ लागतो म्हणून आ, ए, ओ आणि औ-कार असलेली अक्षरं गुरु असतात.

टीप - ही अक्षरं मराठीमध्ये गुरू असतात पण हिंदीमध्ये वेगळी हाताळली जातात. त्याच्यावर पुढे लघुलेख लिहायचा विचार आहे.
.

४) आता थोडासा अवघड नियम: जोडाक्षर उच्चारताना आधीच्या अक्षरावर जोर पडत असेल तर *आधीचं* अक्षर गुरू होतं. (जोडाक्षराच्या लघु किंवा गुरुत्वामध्ये फरक पडत नाही)
.

भव्य हा शब्द उच्चारताना आपण भव् + य असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात 'भ' वर जोर पडतो आणि उच्चार करायला जास्त वेळ लागतो. म्हणून या शब्दात भ गुरु आहे. व्य हे अक्षर लघु आहे म्हणून लघुच राहतं.
.

तसंच अर्थ, लक्ष, जन्म, प्रश्न या शब्दांचा उच्चार अर् + थ, लक् + ष, जन् + म, प्रश् + न असा करताना पहिल्या अक्षरांवर जोर पडतो आणि उच्चार करायला जास्त वेळ लागतो. म्हणून या शब्दांची पहिली अक्षरं गुरु होतात.
.

५) पण जपून रहा -
* 'गुण्यागोविंदानं' हा शब्द उच्चारताना आपण गु वर जोर देऊन गुण्+ ण्यागोविंदानं किंवा गुण्ण्यागोविंदानं असं करत नाही. गु चा उच्चार करायला जास्त वेळ लागत नाही, म्हणून ण्या हे अक्षर जरी जोडाक्षर असलं तरी आधीचा गु हा लघुच राहतो.
.

पण 'गुत्त्यात' या शब्दांमध्ये गु या अक्षरावर जोर पडतो. म्हणून या शब्दांमध्ये गु गुरु आहे.
.

भल्या, बुऱ्या, पुऱ्या, कुण्या ही आणखी उदाहरणं. यांच्यामध्ये पहिल्या अक्षरावर जोर पडत नाही आणि ती लघुच राहतात.
.

स्पष्टीकरणासाठी अजून एक उदाहरण देतो. 'लावण्यासाठी' या शब्दांमध्ये आपण 'व' या अक्षरावर जोर देत नाही, पण 'लावण्य' शब्दांमध्ये 'व' वर जोर येतो. म्हणून 'व' हे अक्षर पहिल्या शब्दात लघु आणि दुसर्‍या शब्दात गुरु आहे.
.

६) कधीकधी गझलसारख्या प्रकारांमध्ये मात्रावृत्तात बसवण्यासाठी नेहमीच्या सुट्या दोन अक्षरांचं जोडाक्षर बनतं. तेव्हा त्याला वरच्या #४ नियमाप्रमाणे हाताळावं.
.

उदा. सदानंद डबीर यांची 'एकेक याद माझी' ही गझल:
एकेक याद माझी डोळ्यात पाझरू दे
ओठात नाव माझे हलकेच थर्थरू दे
.

'थरथरू' हा शब्द वृत्तात बसवण्यासाठी 'थर्थरू' असा लिहिला आहे. त्यामुळे या शब्दाचं पहिलं अक्षर थ गुरु होईल.
.

७) विशेष प्रकरण
कधीकधी वृत्ताच्या चालीत बसवण्यासाठी आपण ऱ्हस्व अक्षरं लांबवून उच्चारतो. "यदा यदाहि धर्मस्य" ह्या श्लोकाचं मराठी रूपांतर करताना विनोबांनी असं केलं आहे
.

गळूनि जातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना ।
अधर्म उठतो भारी तेंव्हा मी जन्म घेतसे ॥
.

आता आपण श्लोकाच्या चालीत म्हणताना धर्म हा शब्द आपण धर्मऽ असा लांबवून उच्चारतो. म्हणून 'र्म' हे अक्षर गुरु गणलं जाईल.
.

माफक विस्ताराने द्यायचा प्रयत्न होता पण लेख बराच सविस्तर झाला आहे. असो.

वृत्तबद्ध कवितावृत्तबद्धकविता

प्रतिक्रिया

Gk's picture

24 Aug 2020 - 5:15 pm | Gk

छान

चित्रगुप्त's picture

24 Aug 2020 - 5:27 pm | चित्रगुप्त

@धष्टपुष्ट साहेब, आधुनिक काळात मागे पडलेले, पण अतिशय मौल्यवान, अर्थपूर्ण आणि वृत्तबद्ध काव्य हे मराठी भाषेचे अपूर्व वैभव आहे. यात रुचि असणार्‍या, परंतु जेमतेमच माहिती असणार्‍या मजसारख्या वाचकांसाठी ही लेखमाला चालवत रहा. (प्रतिसाद कमी मिळत असले तरी-) असे लेख हे भाषेचे गतवैभव टिकवून ठेवण्यासाठी फार महत्वाचे आहेत.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

कंजूस's picture

24 Aug 2020 - 8:13 pm | कंजूस

लेख आवडला.
लघुगुरू हे प्रकरण काव्यासाठी हवे तिथे फिरवतात हे पटलं.
सुधीर फडकेंचं ' ला--जून हा--सणे ' त्यातलंच असावं.

Gk's picture

24 Aug 2020 - 9:16 pm | Gk

ते मंगेशकरांचे आहे

इतिहासकार राजवाडे ही त्यांची ओळख असली तरी त्यांनी व्याकरणातही लक्ष घातलं होतं. आणि सावरकर.

मराठी व्याकरण शास्त्राची छान माहिती . या खालील ओळी लक्षात आहेत .

"मना सज्जना तु कडेनेच जावे ,
न स्वतःहुन कोणासही दुखवावे ,
कुणी दुष्ट लावील अंगास हात ,
तरी दाखवावा भुजंग प्रयात ."

नास्तिक's picture

25 Aug 2020 - 12:38 am | नास्तिक

नमस्कार धष्टपुष्ट
छान माहिती दिलीत
वेलांटी, उकार (पहिला, दुसरा) कधी कसा वापरावा याविषयी माहिती हवी आहे

चौकटराजा's picture

25 Aug 2020 - 12:38 pm | चौकटराजा

वृत्तांची लक्षणे लक्षात राहावीत म्हणून चारॊळी करीत असत पण एक गद्यात केलेले लक्षण असे
ननमयय गणांनी मालिनी: वृत्त होते !!!

Gk's picture

25 Aug 2020 - 5:02 pm | Gk

य ये चार वेळा भुजंग प्रयात
मुहोब्बत कीझूठी कहानी पेरोये

Gk's picture

25 Aug 2020 - 5:58 pm | Gk

य ये चार वेळा भुजंग प्रयात

मुहोब्बत कीझूठी कहानी पेरोये
बडीचो टखायी जवानी पेरोये

Gk's picture

25 Aug 2020 - 8:39 pm | Gk

य ये चार वेळा भुजंग प्रयात

मुहोब्बत कीझूठी कहानी पेरोये
बडीचो टखायी जवानी पेरोये

हिंदी मधील की , पे वगैरेंच्या मात्रा उच्चारा नुसार बदलतात , ब्बत दोन्ही मिळून 2 मात्रा होतात
की असा लिहिला तरी उच्चर थोडा र्हस्व आहे म्हणून 1 मात्रा
पे देखील तसेच , 1 मात्रा

भुजंग प्रयातात हिंदीत कितीतरी गाणी आहेत ( मराठी संस्कृतात हे अक्षरगण वृत्त आहे , उर्दूत काही ठिकाणी 2 ऐवजी 1,1 घेऊन मात्रा तितक्याच ठेवून वापरतात)

ललाला ललाला ललाला ललाला
ललाला ललाला ललाला ललाला
पढा है मेरी जा नजर से पढा है
बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है