ती रात्र (भयकथा)

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जनातलं, मनातलं
10 Aug 2020 - 9:06 pm

ती रात्र (भयकथा)

ते उपनगर हळूहळू पाण्याखाली येत होते. पाच दिवसांपासून संथपणे पडणारा पाऊस, आता मुसळधार बनला होता. सगळे उपनगर पावसाने झोडपले होते. जिकडे तिकडे पाणीच पाणी साचले होते. रस्ते, मैदाने, इमारती, महामार्ग, हमरस्ते जलमय झाले होते. पाणी रस्त्यांच्या मर्यादा ओलांडून सखल भागाकडे वळू लागले. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. चहाच्या रंगाचे ते पाणी सगळ्या मैदानात साचू लागले. हळूहळू मैदाने, सखल रस्ते, खोलगट जागा, इमारतींच्या खालचे मजले, तलाव, विहिरी पाण्याखाली येऊ लागल्या. एक एका भागात पावसाचे पाणी अतिक्रमण करू लागले. वरून जोरात कोसळणारा पाऊस, जोडीला प्रचंड वारा, त्या वार्‍याने छोटे मोठे वृक्ष, जुन्या इमारती, ब्रिज, चौकातले होर्डिंग उन्मळून पडत होते. अडगळीच्या बिळात, जमिनीत, घरात पाणी वेगाने शिरू लागले. साप, बेडूक, उंदीर, किटके पाण्यावर तरंगताना दिसू लागले. बेवारसपणे अडगळीत पडलेले छोटे वाहने, सायकली, मोटारसायकली पाण्यासोबत तरंगत जावू लागल्या. मोठ्या रस्त्यांवर काही वाहने अडकून पडले होते. तिथे मोठी वाहतूक कोंडी झाल्याने, बरेचजण आपापल्या वाहनांत अडकून पडले होते. रस्त्यांवर वृक्ष कोसळले होते. रस्ता अडवला गेला होता. वाहनांना मागे पुढे हलण्याची संधीच मिळेना. रस्त्यांवरून आपापल्या घराकडे जाणारे, काही पादचारी दिसत होते. वरून पडणारा जोरात पाऊस, खाली नदीसारखे वेगाने वाहणारे पाणी या सगळ्यातून कसरत करत, जो तो आपल्या निवार्‍याकडे जात होता. अशा या भयानक वातावरणात स्वतःच्या निवाऱ्यापेक्षा, दुसरी सुरक्षित जागा कोणती असेल? जो तो आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण काहींना ते जमेना. कोणी मोठ्या पाण्यात अडकुन पडले होते. कोणी वाहतुकीच्या कोंडीत अडकले होते. पण जिथे असेल तिथे प्रत्येकजण सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करु लागला. आता पाऊस, वारा वेगाने वाहू लागला. उपनगराचे वातावरण क्षणाक्षणाला धोकादायक बनत होते. सूर्य कधीच काळ्या ढगांआड लुप्त झाला होता. प्रकाशाचे साम्राज्य कधीच मागे पडले होते. काळा अंधार चोरपावलांनी उपनगरावर कोसळू लागला. आकाशातील अंधाराचा राक्षस त्या उपनगराला गिळंकृत करत होता. आता त्या उपनगरात सगळीकडे अंधार आणि त्याच्या जोडीला मुक्तपणे सगळीकडे घोडदौड करत जाणारे पाणी होते. त्या पाण्याला संरक्षित करणारे आता काहीच कवच उरले नव्हते. सगळे अडथळे पार करून पाणी एक एक जागा काबीज करत होते. त्याचा शेवट काय होईल? कसा होईल? याचा काहीच पत्ता नव्हता.
लक्ष्मीतारा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर, ती चिंताग्रस्त चेहऱ्याने बसली होती. ती उमा! तीस वर्षांची एक सुंदर तरुणी. हुशार आणि तेवढीच घाबरणारी. चार वर्षांपूर्वी लग्न होऊन ती उपनगरात आली होती. आता ती तिच्या नवर्‍याची वाट पहात होती. हम रस्त्यावरच्या त्या मोठ्या वाहतूक कोंडीत तो अडकला होता. गाडीतून बाहेर पडणे शक्यच नव्हते. मग घरी तरी कसा पोहोचणार? त्याला घरी बायकोची चिंता आणि तिला स्वतःची आणि नवऱ्याची चिंता लागली होती. ती या अशा वातावरणात एकटीच घरात होती. पण परिस्थिती आता अनुकूल नव्हती. कोणी काहीच करू शकणार नव्हते. घरी पोहोचणे त्याला आता अशक्य होते. तिलाही घराबाहेर पडणे अशक्य होते.
लक्ष्मीतारा इमारत हळूहळू अंधारात बुडू लागली. तिसरा मजलाही अंधाराखाली येऊ लागला. एवढा मोठा तो फ्लॅट अंधारात बुडू लागला. वीज कधीच गेली होती. त्यामुळे आजूबाजूच्या अंधाराची दाहकता जास्त जाणवत होती. एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये ती एकटीच बसली होती. आता चिंतेची जागा हळूहळू भीतीने घेतली होती. पावसाचा घनगंभीर आवाज, त्याच्या जोडीला मोठे वाद्य वाजत असल्यासारखा वाऱ्याचा आवाज, सोबतीला तो अंधार आणि त्या अशा वातावरणात ती एकटीच होती. अंधार हळूहळू घराचा एकेक कोपरा व्यापत होता. त्या अंधारापासून वाचण्यासाठी ती खिडकीकडे जाण्याचा प्रयत्न करू लागली. पण जाऊन जाऊन जाणार कुठे?
हळूहळू अंधार सगळे घर व्यापणार होता. काही गोष्टींची पूर्वतयारी करून ठेवायची असते. कारण कधी कधी त्या गोष्टी संकटात मदत करतात.पण आता तिला त्या गोष्टींचा पश्चाताप होऊ लागला.घरात मेणबत्ती नव्हती,मोबाईल मध्ये चार्जिंग जेमतेम होती,पर्यायी विजेचे घरात कुठलेच साधन उपलब्ध नव्हते. वीज येण्याची शक्यता तर दूरदूर पर्यंत नव्हती. आता अशा परिस्थितीत, या रात्रीचा सामना कसा करायचा? हाच प्रश्न तिच्यापुढे होता. एक तरी चांगले होते, घरात गोडेतेल भरपूर होते. तेलाचा दिवा लावता येणार होता. थोडासा संधिप्रकाश वातावरणात अजून शिल्लक होता. भीतीचा मोठा स्पर्श अजून तिला झाला नव्हता.तिने नवर्‍याला फोन लावला. पण कदाचित त्याचा फोन बंद झाला असावा. फोन बंद लागत होता. तीने पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा तो बंदच दाखवत होता. तिचा चेहरा पडला. तीला कसेतरी झाले. नवऱ्याशी संपर्क तुटला होता. तो कधी येईल याची आता शाश्वती उरली नव्हती. कदाचित पाणी ओसरेपर्यंत त्याची येण्याची शक्यता नव्हती. तो वाहतूककोंडीत अडकला असावा. म्हणजे तो नाही आला तर! तर तीला एकटीला रात्र काढावी लागेल. या विचाराने तिच्या अंगावर सरसरून काटा आला. भीतीचा स्पर्श तिच्या मनाला झाला. एवढ्या अंधारात एकटीने रात्र काढायची हा विचारच कल्पने पलीकडील होता. भिंतीवरच्या पालीला घाबरणारी ती! त्या काळ्याकभिन्न अंधाराला, त्या पावसाच्या आवाजाला, वाऱ्याच्या वेगाला किती घाबरेल? या सगळ्या संकटापुढे आपला टिकाव लागेल का? हा विचार वेगाने तिच्या मनात चमकून गेला. विचारांचे चक्र डोक्यात फिरू लागले. पाऊस, वारा, अंधार, पाणी या सगळ्या गोष्टी नैसर्गिक भीतीचे स्त्रोत होते. त्यांची भीती सहन होते. पण या अंधाराच्या साह्याने काही अनैसर्गिक घरात घुसले तर?
सरसर करत एक भीतीची सनक तिच्या मेंदूत घुसली. मेंदूत आता वेडेवाकडे विचार येऊ लागले.
काहीतरी फिदीफिदी हसणारे, जमीनीवर सरपटणारे, भिंतीवर रेंगणारे, छताला लोंबकळणारे, अंधारात खरडत खरडत चालणारे, थंड आणि लिबलिबीत शरीराचे आपल्याकडे हळूहळू चालत आले तर? आता काही क्षणात अंधार होईल. दारे-खिडक्या बंद असतील. सगळे घर शांततेत बुडालेले असेल. आणि अचानक एखाद्या कोपर्‍यात ते लिबलिबीत, थंड, बाहुलीच्या आकाराचे शरीर अचानक आपल्यावर झडप घालायला तयार झाले तर? वरच्या छतावरून काही उलटे चालत येऊन आपल्या गळ्यात पडले तर? तिच्या अंगावर काटा उभा राहीला. डोळ्यात मूर्तिमंत भीती दाटली. असले अमंगळ विचार अशा या अभद्र वेळी मनात का येताहेत? हेच तिला कळेना. अशा विचारांना घेऊन ती या घरात थांबणे शक्य नव्हते. स्वतःला सावरावे लागेल. हिंमत जुटवावी लागेल. असं भीतीने खचून गेले तर हृदय बंद पडूनच आपला मृत्यू व्हायचा! त्यासाठी मनातील भीती बाहेर काढावी लागेल. काहीतरी हालचाल करावी लागेल. सगळी रात्र या अंधारात काढायची आहे, हे मनाला समजावून सांगावे लागेल. भीती घालवण्याची काहीतरी व्यवस्था करावी लागेल.
सातच्या आसपास वाजले असतील, मंदसा संधिप्रकाश अजूनही वातावरणात शिल्लक होता. त्या प्रकाशाचा फायदा घेऊन, काही संरक्षण आपल्याभोवती निर्माण करू, असा तिने विचार केला. तिने एकदा मोबाईलवर नजर टाकली. वीस टक्के मोबाईलवर चार्जिंग शिल्लक होती. चार्जिंग जपून ठेवावी लागेल.आपत्कालीन परिस्थिती आलीच तर, निदान आपला संदेश कोणापर्यंत तरी पोहोचवता आला असता. आशा मोठ्या पावसात, घरातून बाहेर आवाज नेणारा तोच एक दुवा होता. बाहेरून मदत बोलवायला उपयोगी ठरणारा घटक मोबाईलच होता. ती लगबगीने उठली. संधीप्रकाशात सगळी जुळवाजुळव करावी लागणार होती. ती किचनमध्ये आली गॅसजवळ ठेवलेली काडीपेटी हातात घेतली. गॅस व्यवस्थित बंद करून ठेवला. रात्रभर प्रकाशाची व्यवस्था करण्यासाठी साहित्य जमा करावे लागणार होते. तिने गोडेतेलाची मोठी कॅन बाहेर काढली. भांडेघरातून छोट्या छोट्या तीन वाट्या बाहेर काढल्या. त्या तिन्ही वाट्यात तीने तेल टाकले. अगदी भरपूर, शिगोशीग तेल भरले. ते रात्रभर पुरवायचे होते. पण कापसाच्या वाती होत्या का? त्या कधीच संपल्या होत्या. उरलेली एक वात मघाशीच देव्हाऱ्याच्या दिव्यात लावली होती. ती तशीच उठली. एक जुने कापड फाडून, त्याच्या तीन मोठ्या मोठ्या आकाराच्या वाती तीने तयार केल्या. त्या तेलात चांगल्या भिजवल्या. आणि त्या वाटीत ठेवल्या. आता प्रकाशाची सोय झाली होती. अंधाराची जाणीव थोडी तरी कमी होणार होती. तिने एक वाटी किचनमध्ये, एक हॉल मध्ये आणि तिसरी बेडरूम मध्ये ठेवली. तिने वाती पेटवल्या नव्हत्या.ती आधी तशीच देव्हाऱ्याजवळ आली. देव्हाऱ्याजवळ छोटासा दिवा जळत होता. माणूस जेव्हा संकटात असतो, तेव्हा त्याला आपल्या श्रद्धांचे स्त्रोत आठवतात. मानसिक शांतीच्या शोधात तो देवाकडे येतो. किंवा मग आपल्याला कुठेतरी जाणीव व्हायला लागते की, आपल्या समस्येचा शेवटचा विकल्प परमेश्वरच आहे, मग आपला देवावर विश्वास असो वा नसो, किंवा तुम्ही कितीही नास्तिकतेचा टेंभा मिरवत असाल, तरी तुम्ही देवाकडेच साकडे घालता. तिचा देवावर विश्वास होता. श्रद्धा होती. ती देवघरात आली. दिव्याची वात पुढे करत, तिने मनोभावाने देवाला हात जोडले. ओठातल्या ओठात कुठलातरी मंत्र पुटपुटला.
''ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।। प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।।''
हात जोडण्याने, त्या कृष्णाच्या सोनेरी मूर्तीला बघितल्याने, ओठातल्या ओठात तो पवित्र मंत्र पुटपुटल्याने, तीला मोठे मानसिक समाधान मिळाले. एक आंतरिक ऊर्जा मिळाली.
देव मदतीला येऊ वा ना येऊ. पण त्याच्या मनोभावाने केलेल्या प्रार्थनेने तिला मोठे आत्मिक बळ मिळाले. मनात एक निनाद निर्माण झाला.ऊर्जेचा एक आंतरिक स्फोट झाला. तिच्या चेहऱ्यावर एक मोठे समाधान उमटून गेले. हळूहळू रात्र पुढे सरकू लागली. तिने तिन्ही वाट्यातील वाती पेटवल्या. त्या घनघोर अंधारात प्रकाश उमटून गेला. तिला तो प्रकाश पाहून आनंद वाटला. ती बेडरुमच्या खिडकी जवळ असलेल्या पलंगावर बसली. सगळ्या खिडक्या, दारे तिने चांगले बंद केले. पुन्हा पलंगावर येऊन बसली. क्षणभर निवांत बसल्यावर, आता पुढे काय करावे? हा प्रश्न तिला पडला. रिकाम्या डोक्यात  काहीही विचार येतात. तिने स्वतःला कशाततरी गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला. ती खिडकीबाहेर बघू लागली. पण बाहेर काहीच दिसेना.
तिने खिडकी अलगद उघडली. खिडकी उघडताक्षणी, पावसाचा आणि वार्‍याचा गतीने घुमणारा आवाज तिच्या कानात शिरला. सोबत एक थंडीची लहर अंगावर धावून आली. शरीरावर असंख्य सुया टोचाव्यात, अगदी त्या सारखी ती थंडीची लहर सर्वांगावर टोचून गेली. एवढी बोचरी थंडी ती प्रथमच अनुभवत होती.अगदी शरीरातील रक्ताचे तापमान कमी झाल्यासारखे जाणवत होते. थंडीची तीव्रता वाढतच होती. जास्त वेळ खिडकी अशीच उघडी ठेवली तर, थंडीने गोठून आपण जागेवर कलेवर होऊ, असा विचार करत ती खिडकी लावू लागली. आणि अचानक ते घडले. एक गरम लहर खिडकीतून आत येत, तिच्या कानाजवळून घरात आली. एवढ्या थंड वातावरणात गरम लहर! एकदम उबदार! पण काहीशी कुबट उबदार! तिला आश्चर्य वाटले. ती लहर कानाच्या अगदी जवळून गेली होती. हो खूप जवळून. बंदुकीची गोळी क्षणात जावी तशी. पण एक गोष्ट होती. त्या लहरीत काहीतरी ध्वनी होता. आवाज होता. काहीतरी शब्द होते. जे अस्पष्टपणे तीला ऐकू आले होते. काय शब्द होते? याचा लवकर बोधच होईना. आणि अचानक तिला त्याचा बोध झाला. मेंदूत ते शब्द उमटले गेले. तो ध्वनी तीच्या मनःपटलावर उमटून गेला. आणि तिच्या तोंडातुन अस्पष्ट किंचाळी बाहेर पडली.
अरे देवाssssss ते शब्द नव्हते. ते वैरी होते. हो वैरी!
"उमाsssमी आलोयssssss!"
हे तीन शब्द तीच्या काळजाचे पाणी पाणी करून गेले. भीतीचे असंख्य भाले तीच्या हृदयात घुसत गेले.  "उमाsssमी आलोय!" हे कशाचे घोतक होते? हे शब्द चांगले निश्चितच नव्हते. याचा अर्थ कोणीतरी घरात आले होते. त्या लहरीवर स्वार होऊन काहीतरी अगुंतक घरात घुसले होते. अंधारात कुठल्यातरी कोपऱ्यात, भिंतीवर, छतावर कोणीतरी बसले होते. माणसाच्या कक्षेबाहेरील एखाद्या अमानवी शक्तीचा प्रवेश झाला घरात झाला होता. तिने खिडकी बंद केली.पण खिडकी बंद करायला उशीर झाला होता. घरात ते आले होते. कुठल्यातरी अडगळीत ते पहुडले होते. जोपर्यंत प्रकाश होता तो पर्यंत ते दिसणार नव्हते. मात्र अंधार झाला की, ते सक्रिय होणार. तिथून पुढे त्याचे राज्य सुरू होणार.
तिने भीतभीत घरभर नजर फिरवली. आजूबाजूला दिव्याचा उजेड आणि त्या उजेडा पलीकडील परिघात अंधार दिसत होता. तिने भिरभिरत सगळीकडे नजर फिरवायला सुरुवात केली. कोणी दिसतय का याचा शोध घेत होती. पण ते काही नजरेला पडू नये हीच मनोमन प्रार्थना करत होती. दिव्यांच्या प्रकाशातला भाग दिसत होता, पण त्याच्या पलीकडील अंधाराचे काय? त्या अंधारात कोणीतरी बसले असेल. कदाचित कोणत्या तरी कोपऱ्यातून ते आपल्याकडे बघत असेल. आपल्याला न्याहाळत असेल. आपल्याकडे पाहून फिदीफिदी हसत असेल. तिची भीती हळूहळू वाढू लागली. जागेवरून हलण्याची तिची हिम्मत होईना. पण अशे कितीवेळ बसून राहणार. काहीतरी करावे लागणार होते.
'उमा मी आलोयsss'  हे शब्द सारखे तिच्या कानात घुमू लागले. तिने तोंडावर पांघरून ओढून घेतले.
बाहेर पाहिले की भीती वाटत होती. अचानक हॉलमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला. तिच्या अंगावर सरसरून काटा आला. भीतीने तिचे अंग थरथर कापू लागले. तिने झटकन डोक्यावरून पांघरून काढले. आणि गडबडीत बेडरूमचा दरवाजा जोरात बंद केला. तो दरवाजा बंद करताना दरवाजाच्या बाहेर काहीतरी सरपटत असल्याचा तिला आवाज आला.तिने वेळेवर बेडरूमचा दरवाजा बंद केला. काहीतरी तिच्याच दिशेने येत होते. पण दरवाजा बंद केल्याने ते बाहेरच थांबले. तिला भीतीने रडू कोसळले. तिला नवऱ्याची आठवण होऊ लागली. काय करावे काहीच कळेना. मेंदू काहीच काम करेना. मेंदू भीतीने काम करायचा बंद झाला. सगळे शरीर असंवेदनशील झाले. शरीरात फक्त भीती हीच एकमेव संवेदना उरली. तिने पुन्हा एकदा डोक्यावरुन पांघरूण ओढून घेतले. अंगाचे मुटकुळे मारून ती तशीच बसून राहिली. ओठात देवाचे नाव घेत ती तशीच पडून राहिली. पण त्या देवाच्या नावाने खूप काही फरक पडला नाही. स्वतःवरचा विश्‍वास डळमळीत झाल्यावर, तुम्हाला कोणतीच शक्ती उर्जा देऊ शकत नाही. तसेच देवाच्या नावाचा केवळ जप करून, काही लाभ तिला मिळणार नव्हता. तिने स्वतःवरचा विश्वास त्या प्रचंड भीती पुढे कधीच गमावला होता.
कितीवेळ ती त्या पांघरुणात बसून होती हे कळालेच नाही.बराच वेळ पुढे सरकला होता. ती अजून त्या पांघरुणात डोळे गच्च मिटून तशीच बसलेली होती.आपण डोळे झाकले म्हणजे, बाहेरच्या घडामोडी थांबतात असे नाही. बाहेर कमालीची शांतता जाणवत होती. एकदम घनघोर शांतता! डोळे गच्च मिटल्यामुळे सगळा अंधार तिला जाणवत होता. तिने अलगद डोळे उघडले. पण तरीही पुढे अंधारच जाणवत होता. तिने हळूच पांघरून बाजूला केले. आणि पुन्हा एकदा भीतीची सनक तिच्या मेंदूत गेली. बेडरूम मधला दिवा विझला होता. सगळे बेडरूम अंधारात बुडून गेले होते. म्हणजे आतापर्यंत ती अंधारातच बसली होती. तिने गडबडीने दिवा पेटवायचा प्रयत्न केला, पण दिवा पेटवायला काडीपेटी कुठे होती? ती हॉलमध्ये असावी.
कारण शेवटचा दिवा तिथला पेटवला होता. ती तिथेच राहिली होती. तिला आता त्या अंधाराची भीती वाटू लागली. दिवा पेटवणे गरजेचे होते. तिला स्वतःचाच राग आला. काडेपेटी हॉलमध्ये आपण विसरावे, याचाच तिला खूप राग येऊ लागला. सगळीकडे तो काळा अंधार दाटला होता. पण बेडरूमचा दरवाजा उघडायचा तिची हिम्मत होईना. मघाशी दरवाजा बाहेर काहीतरी सरपटत होते. ते अजून तिथे असले तर? तिला काय करावे काहीच कळेना. आतला अंधार खायला उठत होता. तिची घुसमट वाढत होती. मनातील भीती वाढत होती. अंधारातून काहीतरी बाहेर येऊन, मानगुटीवर बसेल अशी काहीशी जाणीव तिला होऊ लागली. ती हळूहळू दरवाजाजवळ आली.बाहेरच्या हॉलमधील कानोसा घेऊ लागली. कदाचित घरातील सर्व दिवे विझले असावेत. नाहीतर कोणीतरी ते विझवले असावेत. तिला कसेतरी झाले.सगळीकडे अंधार दाटून आला होता. तीने दरवाजाला कान लावला. बाहेरचा कानोसा ती घेऊ लागली. दरवाज्याच्या बाहेर काहीच हालचाल जाणवली नाही. फक्त शांतताच सगळीकडे पसरली होती. 'दरवाजा उघडून, पळत जाऊन ती टेबलावर ठेवलेली काडीपेटी उचलून आणायची, आणि पुन्हा दरवाजा लावून पांघरून घेऊन बसायचे.' अशी तिने मनातल्या मनात योजना आखली. खूप कमी अवधीत हे करावे लागेल. ते सरपटणारे कुठेतरी दडून बसलेले असेल. आपलीच वाट बघत असेल. त्याला चकवून काडेपेटी आणावी लागेल. इथला दिवा त्या काडेपेटीने पेटवावा लागेल. तिचे हृदय जोर-जोरात धडधड करू लागले.
      तिने देवाचे नाव पुटपुटले. एकदम दरवाजा उघडून ती वेगाने हॉलमध्ये आली. पण तिची योजना फसली. हॉलमध्ये सगळा काळाकुट्ट अंधार होता. दिवा कधीच विझला होता. गडबडीत मोबाईल बेडरूमध्येच राहिला होता. आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते. ती गडबडली. अशी अपेक्षा तिला नव्हती. काडीपेटी घेऊन लगेच बेडरूममध्ये परत यावे अशी तिची अपेक्षा होती. एक क्षण तीला वाटले असेच मागे फिरावे. पण आता एवढ्या जवळ आलो आहोत, तर कडीपेटी घेऊनच जावे. तिने हॉलमधील टेबलाच्या दिशेने जायला सुरुवात केली. टेबलावरच काडेपेटी असावी. चाचपडत, अंदाज लावत ती हळूहळू टेबलाकडे सरकू लागली. सगळीकडे कमालीची शांतता जाणवत होती. तिला भीती वाटू लागली. तिच्या श्वासांचा आवाज तिला स्पष्ट जाणवु लागला. त्या आवाजाने आपली जाणीव कोणाला तरी होईल याची तिला भीती वाटू लागली. श्वास रोखत ती हळूहळू टेबलाकडे जाऊ लागली. काही अंतरावरच टेबल होता. टेबलाची एक बाजू हाताला लागली. ती तसाच हात पुढेपुढे नेत काडेपेटी शोधू लागली. हाताला कशाचातरी स्पर्श झाला. थंड आणि लिबलिबीत. तो स्पर्श हलत होता. प्रसरण, आकुंचन पावत होता. श्वास घेताना, सोडताना जसे पोट आत बाहेर होते, तसा तो स्पर्श आत बाहेर जाणवत होता. एखाद्या चिकट द्रवाला हात लागावा, तशी काहीशी जाणीव तिला झाली. तिने झटकन हात बाजुला घेतला. ती जोरात पाठीमागे पळायचा प्रयत्न करू लागली.परंतु पाठीमागील सोफ्याला धडपडून ती खाली पडली. वेदना आणि भीती अंगभर पसरत गेली. तिला लवकर उठताच येईना. तिच्या कानावर काहीतरी आवाज यायला लागला. टेबलावर काहीतरी सरपटत होते. ते तिच्याकडेच येत होते. काहीतरी मिळमिळीत वस्तू सरपटत येत होती. मऊ रबर जमिनीवर घासावे तसा काहीसा आवाज त्या सरपटण्याचा येऊ लागला. तो आवाज सलगपणे येऊ लागला. क्षण दोन क्षण तो आवाज थांबला. आणि तिच्या पायाजवळ एकदम
बद्दssssss असा आवाज आला. एखादा पाण्यात बुडवलेला स्पंज जरा उंचीवरून खाली पडावा, तसा आवाज आला. टेबलावरून कोणीतरी खाली उडी मारली होती. ते सरपटत आता तिच्या दिशेने येऊ लागले. तिच्या पायाला पुन्हा तो थंड आणि लिबलिबीत स्पर्श झाला. ती धडपडून उठली. कुठे पळावे काहीच कळेना. तिच्या हाताला टेबल लागला. तिने टेबलावर  चाचपडून पाहिले. सुदैवाने काडीपेटी तिच्या हाताला लागली. तिने ती उचलली. धडपडत काडी शिलगावली. क्षणात मोठा उजेड पसरला. काही क्षण अंधार लुप्त झाला. आणि तिला काडीच्या उजेडात ते दिसले. तिच्यापासून चार पाच फुटांच्या अंतरावर. तिच्या मेंदूत भीतीने जोरात धक्के द्यायला सुरुवात केली. तिचे ओठ थरथर कापू लागले. सर्वांगावर भीतीचे काटे उभे राहिले. हृदयाची धडधड कित्येक पटीने वाढली.
समोर ते उभे होते. अगदी तीन फुट उंचीचे. मोठ्या बाहुलीच्या आकाराचे. नुसत्याच मासाचे. शरीराला कुठल्याच हाडांचा आधार नव्हता. सगळे शरीर नुसतेच मासाचे. पवासातल्या शिदाडासारखे. छोटे छोटे हात, पाय, चेहरा, डोळे, नाक, कान.  गोगलगायीचे ओलेओले शरीर असावे, तसे त्याचे सगळे शरीर ओलेओले दिसत होते. ते सरपटत चालायचे, तेव्हा त्याचे सगळे शरीर लदलद करायचे. मोठ्या आकाराचा शिदाड जमिनीवर चालत आहे, अशे बीभत्स दृश्य, ते चालताना दिसायचे. ते आता सरपटत होते. तिच्याकडे संथपणे येत होते. तिला भीतीसोबतच मोठी शिसारी आली. असे अघोरी शरीर ती प्रथमच पाहत होती. एवढे भयानक दृश्य आपल्याच वाट्याला का यावे?हा विचार तिच्या डोक्यात चमकून गेला. हातातील काडी विझायच्या आत,येथून निघून जावे लागेल. नाहीतर ते सरकत सरकत आपल्या अंगावर येईल. जाण्याच्या रस्त्यावरच ते होते. त्याला ओलांडून जावे लागणार होते. तिच्या अंगावर शहारे आले. तिने आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न केला. सोफ्याच्या पलीकडून उडी मारून बेडरूमकडे जाता येणार होते. एव्हाना काडी विझली होती. सगळीकडे पुन्हा अंधार झाला होता. ती धडपडत सोफ्यापलीकडे गेली. तेथून बेडरूममध्ये जाऊ लागली.
पण हे काय? बेडरूमचा दरवाजा लागलेला होता. तिने तर दरवाजा उघडा ठेवला होता. मग दरवाजा बंद कोणी केला? तिच्या अंगावर सरसरून काटा आला. तिच्या सर्वांगाला घाम सुटला. दरवाजा बंद होता. सगळीकडे अंधार होता.तिने दरवाजावर धडका द्यायला सुरुवात केली. तिच्या डोळ्याला धार लागली. डोळ्यातून भळाभळा अश्रू गळू लागले. भीती, दुःख, वेदना या सगळ्या भावना तिच्या मनात दाटून आल्या. दरवाजा काही उघडेना. ती दरवाजावर जोरजोरात धक्के मारू लागली. हळूहळू ते सरपटत येत होते. आपला मृत्यु आला आहे, तो जवळ येत आहे, अशी जाणीव तीला होऊ लागली. एक मोठा दुःखाचा उमाळा तीच्या तोंडातून बाहेर पडला. दरवाजावर धक्के मारून ती थकून गेली. तो घट्ट बसला होता. अचानक तिला भेसूर हसण्याचा आवाज आला. हसू कसले? लोखंडी पत्रा दगडावर घासावा तसे ते हास्य तिच्या कानात शिरत होते. पण त्या हसण्याचा आवाज वर छताकडून येत होता. अगदी तिच्या डोक्यावरून. छतावर काहीतरी सरपटत होते. सरपटण्याचा, हसण्याचा आवाज अगदी वर डोक्यावर आला होता. तिने पळण्याचा प्रयत्न केला. पण पाऊल जागेवरून हलेना. खाली फरशीला पावले चिटकून बसले होते. क्षणभर अचानक सगळी शांतता झाली. सरपटने, हसणे बंद झाले. ती श्वास रोखून तशीच जाग्यावर थांबली. तीला काहीतरी जाणीव होऊ लागली. काहीतरी समीप येत असल्याची जाणीव. तिच्या गालाला काहीतरी ओलेओले लागले. एखाद्या नवजात बालकाचा हात गालावरुन फिरतोय, असे तिला वाटू लागले. एकदम छोटासा हात. पण एकदम थंड आणि ओलाओला. आता दुसरा हातही तिच्या गालावरुन फिरू लागला. त्या छोट्या-छोट्या गार हाताचा स्पर्श, तिच्या हळूहळू गळ्याकडे येऊ लागला. ते लिबलिबीत हात कसे नाजूक वाटत होते. एकदम नरम, लुसलुशीत. अगदी नाजूक गवती पात्यासारखे. ते हात हळूहळू तिच्या गालावरून खाली सरकत होते. ते आता गळ्यावर आले. त्यांची पकड घट्ट झाली. त्यांच्यात मोठे बळ आले. ते छोटे छोटे हात तिचा गळा घट्ट अावळु लागले. तीने ते हात सोडवायचे खूप प्रयत्न केले, पण ते जास्तच घट्ट आवळत गेले. तीचा श्वास गुदमरू लागला.
त्या हाताची पक्कड अजून मजबूत होऊ लागली. तिला आता आपला मृत्यू दिसू लागला.  पण अगोदर जीव वाचवायचा थोडा प्रयत्न करावा लागणार होता. त्या मृत्यूला विरोध करावा लागणार होता. अचानक तिला हातातल्या काडीपेटीची आठवण झाली. तिचे दोन्ही हात मोकळे होते. तीने कशीतरी हातातली ती काडीपेटी पेटवली. क्षणात उजेड पडला. उजेडात तीने समोर पाहिले. छताला ते  तीन फुटाचे उलटे लटकलेले होते. त्याचे दोन्ही हात तिच्या गळ्याभोवती होते. तीने अचानक ती पेटती काडी त्याच्या चेहर्‍यावर फेकली. चर्रsss असा आवाज झाला. त्याच्या तोंडातून एक खर्जातल्या आवाजाची किंकाळी बाहेर पडली.
त्याची गळ्यावरची पकड सैल झाली. तेवढ्या वेळात तिने त्याचे हात, स्वतःच्या गळ्यापासून बाजूला केले. ते तीन फुटाचे खाली जमीनीवर पडले. ती तिथून पळत थेट देवघरात गेली. देवाच्या समोरचा दिवा क्षीण होत आला होता. तीने वात समोर केली. आजूबाजूला थोडासा प्रकाश पसरला. देवघरातून हॉल दिसू लागला. पण दिव्याचा प्रकाश कमी असल्याने, हॉलमधील दृश्य स्पष्ट दिसेना. तिचे सर्वांग भीतीने थरथरत होते. तिच्या मनातील भावनांचा बांध फुटला. तिला एकटेपणाची जाणीव झाली. तिला तिच्या मर्यादा कळू लागल्या. ते तीन फुटाचे आपल्याला मारणार. आपली शक्ती त्याच्यापुढे फार तोकडी आहे. ही जाणीव तिला झाली. ती जाणीव तिला भाल्यासारखी टोचू लागली. आपला
बीभत्सपणे मृत्यू होणार, ते आपल्या नरडीचा घोट घेणार, असे विचार तिच्या डोक्यात पिंगा घालू लागले. तिला रडू कोसळले. मोबाईल जवळ नव्हता. तो बेडरुममध्ये होता. काहीही करून कोणाला तरी संपर्क करावा लागणार होता. पण अशा मुसळधार पावसात, बाहेर नदीसारखे पाणी साचलेल्या अवस्थेत मदतीला तरी कोण येणार? आपल्याला स्वतः या संकटाशी लढावे लागणार. त्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. पण अशा या अमानवी शक्तीला संपवणार तरी कसे? सामान्य मार्गांनी त्याचा विनाश शक्य नाही.त्याला मारण्यासाठी काहीतरी तंत्र-मंत्र गरजेचे होते. पण ते तंत्र मंत्र आपल्याला कसे मिळणार. पण काहीतरी मार्ग काढावाच लागणार होता. आणि अचानक तिच्या डोळ्यासमोर ते नाव आले, जय देशमुख! तोच आता या संकटातून आपल्याला वाचू शकतो. त्याच्याशी संपर्क होणे गरजेचे होते. आता काहीही करून मोबाईल मिळवावा लागणार होता.

जय देशमुख. उमाचा जिवलग मित्र. भौतिकशास्त्राचा पदवीधर. 'प्रत्येक गोष्ट ही एका मूलभूत कणांनी बनलेली असते. निर्जीव गोष्टीत त्याला अनु आणि सजीव गोष्टी त्याला पेशी म्हणतात. याचा अर्थ प्रत्येक वस्तूची, जीवाची एक मूलभूत संरचना असते. ती संरचना समजून घेतली तर, प्रत्येक गोष्टीच्या समस्येचे उत्तर मिळते. जगात न सुटणारी अशी कोणतीच गोष्ट नाही. कोणतीच समस्या नाही. फक्त ती गोष्ट, समस्या मूलभूतपणे समजून घ्यायला हवी. प्रत्येक समस्येवर मात्रा असतेच. फक्त तिचे यथोचित ज्ञान हवे.'
अशी सर्वसाधारण धारणा असणारा. तो विज्ञानाचा पदवीधर असूनही नैसर्गिक, अनैसर्गिक दोन्ही गोष्टींचे अस्तित्व मान्य करायचा. देव-राक्षस, ईश्वर-भूत, सज्जन-दुर्जन, पाप-पुण्य, प्रकाश-अंधार या दोन्ही विरोधी गोष्टी अस्तित्वात आहेत, यावर त्याचा ठाम विश्वास होता. प्रत्येक गोष्टला एक वैज्ञानिक उत्तर असते, मग ती गोष्ट या जगातली असो वा अन्य जगातील. तिची मूलभूत संरचना समजून घेतली तर तिचे समर्पक उत्तर मिळू शकते. पाणी, अग्नी, जमीन, आकाश यातच प्रत्येक सजीव, निर्जीव अस्त पावतो. सगळ्या समस्यांचे उत्तर या चार घटकांतून मिळते. तो या गोष्टी सिद्धही करून दाखवे. विविध प्रयोग, थेअरीज, प्रात्यक्षिके दाखवून तो त्याचे म्हणणे सिद्ध करून दाखवे. अ‍ॅबनॉर्मल ऍक्टिव्हिटी या विषयावरही त्याने अभ्यास केला होता. अनेक कादंबर्‍या, लेख, प्रबंध, पुरातन साधने यांच्या वाचनातून त्याने मानवी मर्यादे बाहेरील जगाचा अभ्यास केला होता. त्याच्या मते प्रत्येक गोष्टीला उत्तर असते. प्रत्येक समस्येला उपाय असतो. याच तत्वांनी त्याला प्रसिद्ध केले होते. कॉलेजात तो चांगलाच प्रसिद्ध होता. उमाचा अगदी जिवाभावाचा मित्र!!अनेक अडचणींमध्ये या आधीही त्याने उमाला मदत केली होती. अॅबनॉर्मल अॅक्टिविटी या विषयावरही त्याने अभ्यास केला होता.अनेक कादंबऱ्या, लेख, प्रबंध, पुरातन साधने यांच्या वाचनातून त्याला मानवी मर्यादेबाहेरील जगाचा अभ्यास होता व  तो या गोष्टींवर विश्वास ठेवायचा.
जयचे नाव डोळ्यांसमोर येताच, तिला थोडा धीर आला. जय आपली मदत नक्कीच करू शकेल. त्याला इथल्या सगळ्या घडामोडी सांगितल्या, की तो त्यावर नक्कीच काहीतरी उपाय सांगेल.पण त्याला संपर्क करायला मोबाईल मिळवायला हवा. देवघरातून बाहेर पडणे म्हणजे मृत्यूला स्वतःहून ओढवून घेण्यासारखे होते. बेडरूम मधला मोबाईल काहीही करून हस्तगत करावा लागेल, पण बेडरूमचा दरवाजा बंद होता. नाही! नाही! तो बंद नव्हता, तो त्या शक्तीने बंद केला होता. कदाचित तो आता उघडा असेल. त्याच्या चेहऱ्यावर जळती काडी फेकली, तेव्हा त्याचे हात सैल झाले होते. म्हणजे त्याच वेळी दरवाजावरील त्याची शक्तीही, सैल झाली असेल. दरवाजा आता उघडा असेल. हो असणारच. आता काहीही करून मोबाईल मिळवावा लागेल. देवघरातील दिवा संथपणे जळत होता. त्या उजेडाचा परीघ आजूबाजूला पसरला होता. पण त्या परिघाबाहेरील काहीही डोळ्यासमोर दिसत नव्हते. बेडरूमचा दरवाजा हॉलला खेटूनच होता. कसेही करून बेडरूममधे जावे लागेल.
एव्हाना पावसाचा जोर अजून वाढला होता. साऱ्या वर्षभराचा पाऊस जसा काही आजच कोसळत होता. या सगळ्या समस्येला कारणीभूत हा पाऊस आहे. सगळ्या घडामोडी मागे या पावसाचाच हात आहे. तोच आज वैरी बनला आहे. पाऊस सृष्टीला नवचैतन्य देतो, असे आजपर्यंत वाटत होते, पण तोच पाऊस मला अचेतन करण्यावर टपला होता. याच पावसामुळे नवरा अडकून पडला. बाहेर कुठे मदत मागता येईना. सगळ्या समस्यांचे कारण हा पाऊस बनला आहे. लोकांना जीवन देणारा पाऊस, आज माझ्या मरणाचे कारण बनत आहे. तिच्या डोक्यात कसेही विचार येऊ लागले.
देवघरातील दिवा जळत आहे तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत. तोच एकमेव प्रकाशाचा स्रोत आहे. तो स्त्रोत विझला की, पुन्हा तो घनघोर अंधार. ते भितीदायक वातावरण. ते सरपटणारे. तेच ते तीन फुटांचे. तिच्या अंगावर सरसरून काटा आला. देवाचा धावा करण्याचा तिने, कसोशीने प्रयत्न केला. परंतु जीचा स्वतःवरचा विश्वास डळमळीत झाला आहे, तिला देव तरी कसा विश्वास देणार. कृष्ण मंत्राची मिळालेली ऊर्जा कधीच आटून गेली होती. ती आता केवळ साधा मानवी देह उरली होती. बेडरूममध्ये जाण्यासाठी काहीतरी मार्ग शोधावा लागणार होता.
पण सर्वात मोठा प्रश्न होता, तो म्हणजे बेडरूममध्ये कसे जाणार? देवघर सोडले तर सगळीकडे अंधार होता. आणि सर्वात मोठे संकट बेडरूमच्या दाराजवळ होते, ते तीन फुटाचे! हे सगळे अडथळे पार करून बेडरूममध्ये पोहोचावे लागणार होते. पण आता येथून बेडरूम मध्ये कसे जायचे? तिची भीती जरा दडपली होती. तिचा मेंदू काम करू लागला. तिला आश्चर्य वाटत होते, एवढ्या अशा प्रचंड भीतीतही ती अजून टिकून आहे. अजून स्वतःच्या पायावर सही सलामत उभी आहे. माणूस संकटात अजून मजबूत बनतो, याचा तिला आज प्रत्यय आला. बेडरूम मध्ये जाण्याचा काहीतरी मार्ग नक्की असेल. काहीतरी गोष्ट असेल, जी आपल्याला त्या संकटातून वाचवत, सहीसलामत बेडरूम मध्ये पोहोचवेल. त्यासाठी आधी त्या शक्तीची काहीतरी कमजोरी शोधावी लागेल. अशी काहीतरी गोष्ट, ज्याने  त्याची शक्ती थोडी क्षीण होईल, तिचा दबाव थोडा कमी होईल, ते भीतीने मागे सरकेल, पण अशी कोणती गोष्ट असेल?
अचानक तिला त्या गोष्टीची जाणीव झाली. जेव्हा तिने प्रथम काडीपेटी पेटवली होती, तेव्हा त्या पेटत्या काडीचा उजेड, त्या तीन फुटाच्या शरीरावर पडला, तेव्हा त्याचा तिच्याकडे येण्याचा वेग कमी झाला होता. त्याच्या चेहर्‍यावर क्रोध दाटला होता. ते त्रासिक नजरेने तिच्याकडे पाहत होते. कदाचित ते त्या उजेडाला घाबरले होते. त्या उजेडाचा त्याला त्रास होत असावा. कदाचित ते उजेडात अनुकूल होत नसावे. त्याला अंधाराची सवय असावी. अंधारातच त्याचे अस्तित्व सक्रिय होत असावे. म्हणजे प्रकाश त्याची कमजोरी आहे. प्रकाशात ते थोडेसे निष्क्रिय होत असावे. त्याने जेव्हा तिचा गळा पकडला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर तिने जळती काडी फेकली, तेव्हा काहीतरी जळाल्या सारखा चर्रर्रssss आवाज झाला होता. त्याने वेदनेने एक मोठी किंकाळी फोडली होती. म्हणजे नक्कीच त्याला प्रकाश सहन होत नसावा. प्रकाश जवळ असेल तर तो नक्कीच आपल्याला इजा करणार नाही. आपल्यापासून थोडेतरी दूर राहील. ती विचारचक्रात तशीच बुडून गेली. तिने मनात एक पक्का निर्धार केला. काहीही करून बेडरूममध्ये पोहोचावे लागणार होते.
तिने एकदा देव्हाऱ्यातील त्या देवाकडे नजर टाकली, मनोभावे हात जोडले. दिव्याची वात थोडी पुढे केली. वात संपत आली होती. काहीच क्षणांची ती  सोबती होती. ती कधीही विझू शकते. तेवढीच एक आशा हातात होती. ती एकदा विझली, की मग तिचा पराजय नक्की होता. तिने गडबड केली. दिवा अलगद उचलून हातात घेतला. एकदा हॉलकडे नजर टाकली. काही दिसते का ते बघू लागली. पण आता हॉलमध्ये शांतता पसरली होती. कदाचित ते कुठेतरी लपून बसले असावे. तिची देवघरातून बाहेर पडण्याची वाट बघत, कुठल्यातरी कोपऱ्यात दबा धरून बसले असावे.
तिने अलगद देवघराबाहेर पाऊल टाकले. एका हाताने दिवा झाकत, ती अलगद पावले टाकत, बेडरूमकडे जाऊ लागली. दिव्याच्या उजेडाचे वर्तुळ आजूबाजूला पसरू लागले. जिथपर्यंत प्रकाश जात होता, तिथपर्यंत काही हालचाल जाणवत नव्हती. पण त्या उजेडाच्या बाहेर त्या अंधारात काहीतरी इकडून तिकडे फिरू लागले. ते चिडलेले होते. ते क्रोधीत झाले होते. ते त्वेषाने फुत्कार टाकत होते. वेगाने इकडून तिकडे सरपटत होते. त्याची ती मिळमिळीत हालचाल तिला जाणवत होती. त्याची अनुभूती तिला येत होती. आपल्या हातात दिवा आहे, म्हणून आपण सुरक्षित आहोत, याची जाणीव तिला झाली. ती बेडरुमच्या दरवाज्याजवळ आली. तिने एकदा आजूबाजूला नजर टाकली. अचानक कोपर्‍यात तिला काहीतरी हालचाल जाणवली. कोणीतरी त्या कोपऱ्यातून, वर भिंतीवर चढत होते. वर छताकडे जात होते. तिला भीतीने घेरले. लवकर आत जावे. दिवा विझत आला होता. त्याचा उजेड मंद होत होता. जसा जसा दिव्याचा प्रकाश मंद होत होता, तसे तसे ते तिच्याजवळ येत होते. ते छताकडे जात होते. तेथून ते तिच्यावर झडप घालायच्या तयारीत होते. दिवा काही क्षणात विझणार  होता. तिने झटक्यात बेडरूमचा दरवाजा उघडला, आत गेली, आणि वेगाने तो आतून बंद केला. दिवा विझला होता. दाराबाहेर धडका बसत होत्या. त्याचे छोटे छोटे हात त्या दारावर धक्के मारू लागले. तिला आता भीतीने घेरले. दरवाजा तोडून ते आत आले तर? या प्रश्नाने तिला हैराण केले.
वातावरण क्षणाक्षणाने घनघोर होत होते. भीतीचा संसर्ग आजूबाजूला पसरत होता. तिच्या मनातील भय वाढत होते. आता त्याच्याशी प्रत्यक्ष सामना होणार होता. पण त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी, अजून तिच्यात आत्मविश्वास आला नव्हता. किंवा तिच्यात तेवढी शक्तीही नव्हती. ती खूप सामान्य होती त्याच्यापुढे. आता साधनेही कमी उरले होते. तिने काडेपेटी उघडून पाहिली. केवळ एक काडी त्यात शिल्लक होती. तिने पटकन मोबाईल उचलला. त्यात जेमतेम दहा टक्के चार्जिंग उरली होती. सगळं काही संपत आले होते. तिचा कंठ दाटून आला. सगळेच काही तिच्या विरोधी घडत होते. तिची भीती वाढू लागली. तिने मोबाईलच्या  उजेडात तेलाच्या वाटीवर नजर टाकली. वाटीतले तेलही संपत आले होते. एकच काडी काडीपेटीतील शिल्लक होती. आता वेळ घालवण्यात काहीच अर्थ नव्हता. जय ला फोन करावाच लागेल.
 तिने क्षणाचाही वेळ न दवडता जयला फोन केला. एवढ्या रात्री तो झोपेत असेल तर? पण नाही! आपला फोन तो उचलणारच. असे विचार तिच्या डोक्यात फिरू लागले. पाचव्या रिंगलाच जयने फोन उचलला.

"उमा, एवढ्या रात्री फोन केलास?"
त्याने फोन उचलल्या उचलल्या तिला प्रतिप्रश्न केला.

" जय! जय! मी खूप मोठ्या संकटात सापडले आहे रे. मरणाच्या दारात उभी आहे मी. खूप कमी वेळ आहे रे माझ्याकडे. काय करावे काहीच कळेना.प्रचंड घाबरले आहे मी."

" उमा! उमा! आधी शांत हो. काय घडले ते आधी सांग. आपण मार्ग निश्चित काढू. फक्त तू आधी शांत हो. काही कळाल्याशिवाय आपण मार्ग तरी कसा काढणार? आणि असा धीर सोडू नकोस. काय झाले ते नीट सांग."

" जय, अरे मानवी संकट असते तर मी लढले असते. पण हे मानवी संकट नाही. काहीतरी अमानवी, एकदम अघोरी आहे ते. अवघ्या तीन फुटांचे संकट. एकदम थंड आणि लिबलिबीत."

" उमा, तुझ्याकडे किती वेळ शिल्लक आहे असे तुला वाटते?"

" जय, खूप झाले तर, अजून एक तास मी त्याच्यापासून वाचू शकेल. एकदा का माझ्या जवळचे प्रकाशाचे साधन संपले की, माझा अंत झालाच म्हणून समज!"

" उमा, आता एक काम कर.मला प्रथम पासून सगळं काही सांग. अगदी एकही गोष्ट टाळू नकोस. सगळं सांग. पण अगदी कमी वेळात. आपल्याकडे वेळ कमी आहे."

"जय, याला सुरुवात संध्याकाळच्या सात-आठ च्या सुमारास झाली."
तिने जयला सगळे काही सांगायला सुरुवात केली. त्या गरम लहरी पासून, आत्ताच्या क्षणापर्यंत तिने सगळ्या घडामोडी जयला सांगितल्या. जय तिकडे शांतपणे ऐकून घेत होता. तिने एकेक छोट्यात छोटी गोष्ट त्याला सांगितली.काहीही सोडले नाही.

"जय, काहीतरी मार्ग काढ. तुझ्यावरच आशा आहे आता. खूप कमी साधने हातात उरली आहेत. एक काडी, दिव्यात थोडेसे तेल आणि मोबाईलमध्ये दहा टक्के चार्जिंग."

"हे बघ उमा, ते हवेद्वारे आतमध्ये आले, म्हणजे सूक्ष्म रूप धारण करणारा जीव आहे तो. तो मानवी नक्कीच नाही. ब्रह्मसमंध, प्रेत, पिशाच, गिर्‍हा, क्षेत्रपाल, शाकीनी, चेतन, जिन्न या कुठल्यातरी योनीतील ते असावे. पण ते खूप शक्तिशाली असावे. स्वतःला सूक्ष्म रुपात परिवर्तीत करू शकणारे ते, इतर अनेक शक्तीने परिपूर्ण असावे. तु ज्याप्रमाणे सांगितले कि, ते तीन फुटांचे उंच आहे. थंड आणि लिबलिबीत शरीराचे आहे. म्हणजे हेही रूप त्याने धारण केलेले असावे. ते त्याचे मूलभूत रूप नसावे. पण कुठल्यातरी रुपात दृश्यमान होण्यासाठी, त्याने ते बीभत्स रूप धारण केलेले असावे. मानवी दृष्टीला त्याचे ते रूप बिभत्स वाटत असेल. पण त्याच्या दृष्टीने ते सामान्य शरीर आहे. त्याच शरीरात राहून ते तुला मारण्याचा प्रयत्न करेल. स्वतःचे संरक्षण आणि त्याच्याशी निर्भीडपणे सामना, या दोन गोष्टी तुला त्यापासून वाचू शकणार आहेत."

" पण जय, हे माझ्याच वाट्याला का यावे? मी त्याचा काय अपराध केला आहे?  पुन्हा वरून त्याने,  उमा मी आलोयss हे शब्द का उच्चारावे? "

" उमा, तोच प्रश्न मी तुला आता विचारणार होतो. ते तुझ्याकडेच का आले? किंवा त्याने तुझे नाव का घेतले? याला काहीतरी कारण असावे. काहीतरी घटना त्याच्या पाठीमागे असावी. अशी काहीतरी घटना तुझ्या आजूबाजूला घडली असेल, की तिच्याशी तुझा काहीतरी संबंध आला असावा. दुरून किंवा जवळून, काही तरी संबंध आला असावा. अशी एखादी घटना जी मृत्यू, अपघात, घातपात क
संबंधी असावी. कोणाचातरी या पद्धतीने तुझ्या आसपास मृत्यू झाला असावा. या काही दिवसांमध्ये, तुझ्या आसपास कोणी मृत्यू पावले आहे का? तुझ्याशी काहीतरी त्याचा संबंध असावा, असे कोणी या काळात गेले आहे का? तो संबंध चांगला, वाईट कसाही असू शकतो. काहीतरी आठव. काहीतरी नक्कीच कारण असेल. ते तुला आठवावे लागेल."

तीने काहीतरी आठवायचा प्रयत्न केला. आपल्या संबंधित कोणाचा मृत्यू, अलीकडील काळात झाला, हे तिला त्या भीतीमुळे काहीच आठवेना. आणि अचानक तिला आठवले.
तिच्या इमारतीचा तो वॉचमन! तिच्या अंगावर सरसरून काटा आला.

"जय, आता मला आठवले. तो वॉचमन आहे. हो तोच! तोच असणार! आमच्या इमारतीखाली असायचा तो. जाता-येता माझ्याकडे बघायचा. हपापल्या नजरेने. त्याच्या नजरेत नेहमी वासना असायची.  एकदा संध्याकाळच्या वेळी, मी इमारतीत जात असताना, त्याने मला मुद्दाम धक्का दिला. माझ्या डोक्यात सणक गेली. मी त्याच्या गालात दोन तीन फटके ठेऊन दिले. आजूबाजूच्या माणसांनीही त्याला बेदम चोप दिला. पण त्याने हात पाय जोडून माझी माफी मागितली, तेव्हा ते प्रकरण तिथेच मिटले. पण त्याच्या नजरेतील ती वासना कधीच मिटली नाही. त्या दिवसापासून त्याच्या नजरेत माझ्याविषयी प्रचंड क्रोध दिसत होता. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. पण अचानक पाच दिवसांपूर्वी, जेव्हा नुकताच पाऊस सुरु झाला होता, तेव्हा इमारतीच्या खालील विजेच्या सब स्टेशनला स्पर्श होऊन तो मृत्यू पावला. याच इमारतीच्या खाली त्याचा मृत्यू झाला. तो कुठला होता, कुठून आला होता, हे काहीच माहीत नव्हते. या इमारतीच्या पाठीमागील बाजूस स्मशानभूमी आहे, तिथे त्याला पुरले होते. दफन केले होते. पाच दिवसांपूर्वीच तो मेला होता."

"उमा,आता ऐक! हे जे काही आहे, ते वॅाचमनचेच मृत सत्त्व आहे. मरणानंतरचा अंश आहे. त्याची इच्छा अतृप्त आहे. तू त्याला मारले, तेव्हा त्याची वासना क्रोधात परिवर्तित झाली. तो तुझ्यावर चिडला होता. तुझ्या मारण्याचा सूड घेण्यासाठी तो आला आहे. पाच दिवसापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याला दफन केले होते. पावसाचा जोर वाढल्याने, त्याला ज्या ठिकाणी दफन केले असेल, तिथे पावसाचे पाणी शिरले असेल. त्या पाण्याने त्याचा अंश मोकळा झाला असेल. पाणी त्याला कदाचित अनुकूल असेल. त्या पाण्याचा आधार घेऊनच, तो त्याच्या थडग्यातून बाहेर आला असेल.
आपल्या पुरातन शास्त्रानुसार, प्रत्येक गोष्टीचा एक विधी असतो. तो विधी ती गोष्ट करताना पूर्ण व्हायला हवा. नाहीतर काहीतरी अघटीत घडण्याची शक्यता असते. विधी म्हणजे एक प्रकारे, त्या प्रत्येक गोष्टीचे समाधान असते. त्या विधीने ती प्रत्येक गोष्ट समाधान पाहते. लग्नात विधिवत मंत्रपठण केले जाते, नवीन घर बांधल्यावर वास्तुदोष राहू नये म्हणून सत्यनारायणाची पूजा केली जाते, काही विशिष्ट वयात मुंज केली जाते, या सगळ्या विधी त्या त्या घटकांच्या समाधानासाठी असतात. जेणेकरून त्यात कुठले विघ्न येऊ नयेत.त्यातील घटक त्या विधींनी संतुष्ट होतात. अगदी तसेच, माणूस मरण पावतो तेव्हा, त्याचा अंत्यविधी व्हायला हवा. सामान्य पद्धतीने का होईना पण तो व्हायला हवा. तरच मरणानंतर त्या माणसाला समाधान मिळते. तो अतृप्त राहत नाही. तृप्त मनाने तो जगाचा निरोप घेतो. काही इच्छा असेल, तर ती अंत्यविधी त्याची इच्छा पूर्ण करते. तो समाधान पावतो. परंतु हा वॉचमन मेला तेव्हा, असा कुठला विधी केलाच नसेल. तो परका आहे, तो साधारण माणूस आहे म्हणून त्याचा काहीच अंत्यविधी न करता, त्याला तसेच दफन केले असेल. त्यामुळे तो असमाधानात मृत्यू  पावला. त्याची इच्छा अतृप्त राहिली. आणि आता तो ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझ्याकडे आला आहे. त्या तीन फुटाच्या रूपात त्याच्या त्या शरीरात आता वासना, क्रोध, सूड या भावना उसळत असतील. तुझ्यावर तो प्रचंड क्रोधित असेल. आता त्याचा सामना तुला खंबीरपणे करावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचे, तुला त्याच्यासोबत लढताना त्याची कमजोरी शोधावी लागेल. त्या कमजोरीचा शोध घे. त्या कमजोरीच्या सहाय्याने आपण त्याचा अंत करू शकतो."

"जय, त्याची कमजोरी काय आहे, ते मी ओळखलेय. ते अग्नीला घाबरते. उजेडात ते थोडे थोडे निष्क्रिय होते. अंधार त्याला अनुकूल आहे. पण प्रकाश त्याची कमजोरी आहे."

"उमा, प्रत्येक गोष्ट अग्नी, पाणी, आकाश, जमीन यातच नष्ट होते. यालाही अग्नीत मरण आहे. स्वतःवर विश्वास ठेव. स्वत:वर विश्वास ठेवणाऱ्या माणसालाच, ईश्वर मदत करतो. तो कधीच डळमळीत होऊ देऊ नकोस. स्वतःवर, अग्नीवर, देवावर विश्वास ठेव. तो अग्निच तुझे शस्त्र बनणार आहे.
"अग्नये स्वाहा अग्नये इदं न मम ! प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम."
अग्निहोत्र विधी हेच सांगतो.आगीत सगळे अस्त पावते. तुझा शत्रूही नष्ट पावेल. विश्वास ठेव."

फोनने मान टाकली. चार्जिंग संपली होती. आतापर्यंत आधार देणारा, जयचा आवाज थांबला होता. तिला कसेतरी झाले. एकदम एखादा आधार काढून घ्यावा तसे झाले. पण जयने मोठा विश्वास दिला होता. लढण्याचे बळ दिले होते. हा स्वतःवरचा विश्वास आता डळमळून चालणार नाही.तो तसाच ठेवावा लागणार.
''ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।। प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।।''
तिने मंत्र पुटपुटला. तिला थोडे समाधान वाटले .ती जरा सावरली. मनात काही आकडेमोड केली. काहीतरी योजना बनवली. काही साधने, हत्यारे बनवावे लागतील. आहे त्या वस्तूंचा वापर करावा लागेल. फक्त हिम्मत कायम ठेवायची. काही होऊ.
हॉलमधील अंधारात ते बसले होते. या कोपर्‍यातून त्या कोपऱ्यात हालचाल करत होते. त्याच्यातील क्रोध, वासना वाढत होती. सूडाने त्याच्या अंगात शक्ती निर्माण केली. जोपर्यंत अंधार होता तोपर्यंत ते शक्तिशाली होते. ते वाट बघत होते तिच्या बाहेर येण्याची. नाहीतर दरवाजा तोडून आत जाण्याची संधी शोधत होते. ते स्वस्थ नव्हते. त्याची हालचाल सुरू होती. त्याचीही योजना होती. तेही सक्रिय होते.
बेडरूम मध्ये अंधार होता. दिवा पेटवायचा होता, पण काडेपेटीत एकच काडी होती.ती काडी व्यर्थ घालवावी असे तिला वाटेना. त्या काडीचा आपल्याला काहीतरी उपयोग होऊ शकतो, असे तिचे मन तिला सांगत होते. अचानक तिला काहीतरी जाणवल. काही तरी सूक्ष्म हालचाल जाणवली. काहीतरी खर्जातला आवाज अस्पष्टपणे येऊ लागला. तो आवाज, ती गरम हवा जाणवू लागली. गरम हवेचा झोत चोहोबाजूंनी अंगाला झोंबू लागला. हसण्याचे, रडण्याचे, हेल काढण्याचे, किंचाळण्याचे, चिडवण्याचे आवाज येऊ लागले. आणि बेडरूमचे दार किलकिले झाले. सरपटण्याचा आवाज येऊ लागला. फक्त आवाज. अंधारात काहीच दिसेना. पण तिला माहित होते ते तेच होते. ते तीन फुटाचे. आपल्या इवल्याशा पावलांनी ते सरपटत येत होते. आता ती मुळापासून घाबरली. बेडरूम तिला सुरक्षित वाटत होते पण, ते बेडरूम मध्ये आले होते. आता ती हताश झाली. लवकर काय करावे कळेना. बेडरूमचा दरवाजा पुर्ण उघडला होता. ते तिच्याच दिशेने येत होते. आता त्याला आवाज होता. शब्द होते.

"मला मारतेस. माझ्यासारख्या पुरुषाने तुझ्यासारख्या मादक तरुणीकडे पाहणे पाप आहे का ? ते पाप असेल तर, मला ते पाप करायचे होते.तेव्हा ते करण्याचा प्रयत्न केला. पण तू मारलेस मला. त्या सगळ्या लोकांनी मारले मला. नाही सोडणार मी तुला. तेव्हा जे जमले नाही ते आता करणार. त्यानंतर तुझा जीव घेणार. मी आलोय. आता माझे रूप बघ. शरीर बघ. केवढे सुंदर आहे! अतिसुंदर! बघ बघ ! जरा ये, इकडे ये ये. नाहीतर थांब मीच येतो! अगदी सरपटत, सरपटत येतो!"

त्याचे शब्द शिशासारखे तिच्या कानात गेले. तो वॉचमनच होता. तो मृत्यू देणार होता. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. सगळे शांत झाले. अचानक तिच्या कमरेला त्या इवल्या इवल्या हातांनी मिठी मारली. ते पाठीमागून आले होते. तिच्या सर्वांगावर शहारा आला. ते आनंदाने फुत्कारत होते. त्याचे हात कमरेभोवती घट्ट होते. तिने एक मोठा झटका मारला. त्याचे हात ढिले पडले. तेवढ्यात ती त्याच्या मिठीतून सुटून दरवाज्याकडे पळाली. पण हे काय, आता ते तिच्या पाठीमागेच पळत होते. त्या दुडूदुडू पळण्याचा आवाज तिला येऊ लागला. ती हॉलमध्ये आली. इकडून तिकडे पळू लागली. तेही तिच्यापाठी मागे पळू लागले. ते आता भिंतीवर चढू लागले. छताला लटकू लागले. तिला भीती दाखवू लागले. तिला काहीच कळेना. काय करावे? पण तिला काहीतरी आठवले. जयचे शब्द आठवले. त्याचे ते धीराचे बोलणे आठवले. 'स्वतःवर विश्वास ठेव. तोच तुला या लढाईत जिंकून देईल.' हे शब्द तीच्या मनःपटलावर उमटले.
ती तशीच किचनकडे धावली. वाटेत देवघर होते. ती त्या देवघराजवळ थांबली, पण देवघरात अंधार होता. तिला वाटले आता ते देवघरात येणार नाही पण, ते देवघराकडे येत होते. तिला जाणीव झाली, आपली शक्ती क्षीण होत आहे. देवही आता आपल्या मदतीला येणार नाही. देवघर सुन्न पडले होते. त्यातील देवही निष्क्रिय झाले होते. ते तसेच पुढे होत देवघरात आले. आता मात्र तीचे ञाण गळाले. ती हतबल झाली. ती पुन्हा देवघरातून तशीच किचनमध्ये आली. तेही किचनमध्ये आले. आता पळायला कुठेच जागा उरली नव्हती. किचनच्या दरवाज्यावर ते होते. अगदी अंधुक अंधुक दिसत होते. अंगावरच्या पांढऱ्या मांसामुळे दिसत तरी होते. ती मागे मागे सरकत होती पण, पाठीला पाठीमागची भिंत लागली. आता मागे सरकायला जागा उरली नव्हती. पाठीमागे भिंत, पुढे ते आणि त्या दोन्हीमध्ये अडकलेली ती! ती हताश झाली. नकारात्मक विचार मनात पिंगा घालू लागले. ते फिदीफिदी हसत होते. आपले छोटे छोटे हात ते पुढे करू लागले. तिच्यावर झडप घालण्याची तयारी करू लागले. आता मात्र निर्वाणीचा क्षण होता. हीच शेवटची संधी होती. काहीतरी हालचाल करावी लागणार होती. असं मरण त्याच्या हातात देण्यापेक्षा, त्याच्याशी दोन हात करून मरू. तिचे मन हळूहळू ताळ्यावर येऊ लागले. जयचे शब्द आठवू लागले. स्वतःवरचा विश्वास वाढू लागला. देवावरची श्रद्धा साथ देऊ लागली. स्वतःची शक्तिस्थाने कळू लागली. त्याची कमजोरी दिसू लागली. देवघर प्रकाशमान होताना दिसू लागले. ते हळूहळू पावले टाकत तिच्याकडे येत होते. ती झटक्यात डावीकडे सरकली. मनात तीने काही अंदाज बांधले. गॅसच्या जवळ मघाशी ठेवलेली, ती गोडेतेलाची कॅन तिने उचलली. एव्हाना ते जवळ आले होते. अगदी दोन फूटांवर. त्याचे ते हिडीस शरीर हलत होते. फुत्कारत होते. आणि अचानक ते गडबडले. त्याच्या अंगावर गोडेतेल पडले होते. तिने ती सगळी गोड्या तेलाची कॅन, त्याच्या त्या तीन फुटाच्या शरीरावर ओतली होती. हातात काडेपेटी होती. पण त्यात केवळ एकच काडी होती. ती एक काडीच तिचे सर्वात मोठे शस्ञ होते. तिने पुन्हा एकदा विचार केला आणि झटक्यात गॅस फिरवला. गॅस सुरू झाला. पटकन ती एकमेव काडी तिने पेटवली. गॅसवर धरली. गॅस पेटला होता, त्याची संथ जळणारी ज्योत दिसत होती. ते अजूनही गडबडलेले होते. तिने मघाशी वात करायला घेतलेले कापड हातात घेतले. ते गॅसवर धरले. क्षणात ते पेटले.तिने ते तसेच हातात घेतले. ओठात श्रीकृष्णाचा मंत्र पुटपुटला. जयचा चेहरा डोळ्यांसमोर आणला.तिच्या चेहर्‍यावर आत्मविश्वास आला. डोळ्यांत अंगार फुलला. आणि तिने ते कापड त्याच्या अंगावर फेकले.
चर्रर्रssssss  असा जोरात आवाज झाला. त्या पाठोपाठ एक मोठी किंकाळी बाहेर पडली. ते तीन फुटाचे पेटले होते. त्याला वेदना होत होत्या. ते तडफडत होते. चर्रर्रssअसा आवाज वाढत होता. अग्नीवर मांस  भाजावे तसा आवाज येऊ लागला. गंध येऊ लागला. ते जळत होते. ते भाजत होते. ते मरत होते. त्याच्या किंकाळ्या वाढत होत्या. पण त्या  किंकाळीला ती आता घाबरली नाही. ती आता खंबीर होती. तिच्या ओठात कृष्णाचा जप सुरू होता.
एक मोठा फट्sssssss असा आवाज झाला. त्याचे शरीर संपले होते. शरीरातून काहीतरी धुसर आकृती बाहेर पडून त्या हवेत ती विरून गेली. त्याचा अंश असावा. तो हवेत विरून गेला होता. त्याला अग्नी मिळाला होता. तो मुक्त झाला होता. खाली काहीच अवशेष शिल्लक राहिला नाही. ते संपले होते. अगदी कायमचे!!
       सकाळ प्रसन्न करणारी होती. पाऊस, वारा थांबला होता. फटफटीत कोवळे ऊन पडले होते.तिचा नवरा घरी आला.आल्याआल्या त्याच्या मिठीत पडून ती मनसोक्त रडली. ती का रडते हे तिच्या नवर्‍याला कधीच कळले नसते.

*(समाप्त)

अभिप्राय नक्की कळवा.

वैभव नामदेव देशमुख.

कथालेख

प्रतिक्रिया

Gk's picture

10 Aug 2020 - 10:26 pm | Gk

छान

Gk's picture

10 Aug 2020 - 10:26 pm | Gk

छान

काहीतरीच लिबलिबित होती कथा!

vaibhav deshmukh's picture

11 Aug 2020 - 6:39 am | vaibhav deshmukh

जरा स्पष्टीकरण सांगाल का?

Gk's picture

11 Aug 2020 - 5:06 pm | Gk

मी परत आलोय

मला वाटले होते तिचा नवरा आलाय भूत होऊन

शब्दानुज's picture

11 Aug 2020 - 8:58 pm | शब्दानुज

चवीने खाणे आणि रवंथ करणे यात एक 'मुलभूत' फरक आहे. कथेमद्धे नको त्या वर्णनांचे , नको एवढे रवंथ झाले आहे. सगळ्या गोष्टी समजावत बसणे टाळा. वाचकांवर काही गोष्टी सोडा समजावून घेण्यासाठी. पुढील लेखनास शुभेच्छा.

दुर्गविहारी's picture

11 Aug 2020 - 11:12 pm | दुर्गविहारी

कथा थरारक आहे. पण घरात तेल नाही. शेवटची काडी इतकी आणीबाणीची परिस्थिती पटत नाही. पण तरीही चांगला प्रयत्न.

वीणा३'s picture

12 Aug 2020 - 1:58 am | वीणा३

चांगला प्रयत्न !!!

Gk's picture

12 Aug 2020 - 7:55 am | Gk

आणि तिसऱ्या मजल्यावर पूर आला म्हणे
आणि चार तासात पूर ओसरून नवरा घरीपण आला म्हणे

Gk's picture

12 Aug 2020 - 7:55 am | Gk

आणि तिसऱ्या मजल्यावर पूर आला म्हणे
आणि चार तासात पूर ओसरून नवरा घरीपण आला म्हणे

महासंग्राम's picture

12 Aug 2020 - 10:05 am | महासंग्राम

चांगला प्रयत्न केलाय, कथा थोडी अजून टाईट पाहिजे होती असं वाटतं.

आपण नारायण धारप किंवा IT वाल्या स्टिव्हन किंग च्या कथा वाचल्या आहेत का ? नसल्यास अवश्य वाचा असे सुचवेन

नारायण धारप यांच्या वाचल्या आहेत. तसा लिहिण्याचा प्रयत्न करतोय. नवीन आहे, हळूहळू जमेल अस वाटतय.

vaibhav deshmukh's picture

13 Aug 2020 - 10:13 am | vaibhav deshmukh

पूर तिसर्‍या मजल्यावर आला नाही.. डोळ्यात मोतीबिंदू झाला आहे का?

विनिता००२'s picture

14 Aug 2020 - 3:15 pm | विनिता००२

अश्यक्य हसतेय :)

Gk's picture

15 Aug 2020 - 12:12 am | Gk

मोटार सायकली तरंगत वाहत होत्या, होर्डिंग पडले म्हणजे एखादं मजला तरी बुडाला असेलच की

vaibhav deshmukh's picture

15 Aug 2020 - 6:57 am | vaibhav deshmukh

gk जी,
कथेत प्रत्येक गोष्टीची मांडणी तोलून मापून, फुटपट्टीवर माप घेऊन मांडलेली नसते. जरा इकडे तिकडे होतेच.
आणि राहिला भाग मोटरसायकली, होर्डिंग्ज गळ्याइतक्या पाण्यात पण वाहून जाऊ शकतात. त्याला तीन मजली इतक्या पाण्याची गरजच नाही...
बाकी लोभ असावा...

चिगो's picture

13 Aug 2020 - 12:53 pm | चिगो

प्रयत्न चांगला आहे, पण काही गोष्टींचं अनावश्यक रवंथ-वर्णन झालं आहे. लिहीतांना कमी शब्दांत जास्त परीणामकारक भाष्य करण्याचा प्रयत्न करा. किंवा कथा लिहून झाल्यावर, काही दिवस तिला बाजूला ठेवून द्या. काही दिवसांनी पुन्हा वाचा. तुम्हालाच त्यातले रिपीटेशन, अनावश्यक भाग जाणवतील. ते टाळून किंवा कमी करुन पुन्हा लिहा.

पुढील लेखनास शुभेच्छा..

बोलघेवडा's picture

13 Aug 2020 - 8:08 pm | बोलघेवडा

छान कथा. काही काही ठिकाणी तो थरार जाणवत आहे.

मी आधी म्हणाला होतो तेच परत सांगतो की कथाबिज दमदार आहे पण मांडणी आकर्षक करा. कमी शब्दात जास्त परिणाम. वाचकाला विचार करायला थोडी जागा ठेवा.

चिगो यांनी म्हणल्यानुसार करून बघा. मुख्य म्हणजे लिहीत रहा.

बाप्पू's picture

13 Aug 2020 - 8:34 pm | बाप्पू

तुमची कथा आवडली.
कथा बहुतांश वेळ एकाच पात्राभोवती फिरतेय.. पण छान वातावरण निर्मिती केलीत. कन्सेप्ट लहान असुन पण त्यामध्ये बरेचसे ट्विस्ट्स आलेत. मस्तच.. !!

पुढच्या कथेमध्ये अजुन कॅरॅक्टर्स आणि सस्पेन्स निंर्माण करण्याचा प्रयत्न करा.
पुढील लेखनास शुभेच्छा.

vaibhav deshmukh's picture

13 Aug 2020 - 9:14 pm | vaibhav deshmukh

सगळ्यांचे मनापासुन आभार. तुम्ही सांगितलेल्या मुद्द्यांचा नक्की विचार करेल. पुढील कथेत त्या दृष्टीने बदल करण्याचा प्रयत्न करेल.

विनिता००२'s picture

14 Aug 2020 - 3:17 pm | विनिता००२

पावसाचे वातावरण निर्मिती छान झालीये.

काही वाक्ये परत परत येतात, रिपिटेशन टाळावे.
धारपांची शैली अभ्यासा, पण कॉपी करु नका ही विनंती! तुमची शैली विकसित करा.