वेळ पहाटे साडे चार वाजता..
स्थळ : महाराष्ट्रातील / विदर्भातील/ मराठवाड्यातील कुठलेही एक घर
पण या घराचं वैशिष्ठ्य असं की या घरातल्या सु(?)पुत्राचं लग्न ठरलेलं आहे. आज सकाळी त्याचा चौक न्हाणाचा कार्यक्रम आहे. चौक न्हाण म्हणजे काय ते मला वाटतं स्पष्ट करण्याची गरज नाहीये. बहुतेक मराठी माणसाला (विशेषत: विवाहित व्यक्तीला चौक न्हाण हा शब्द चांगलाच माहीत असतो.) तरीही काही अज्ञानी पुरुषांसाठी म्हणुन सांगतो. आयुष्यभर येता जाता मोठ्या भावाच्या टपल्या, बोलणी , मार, शिव्या वगैरे वगैरे खाल्लेल्या लहान बहिणींसाठी या सगळ्यांचा वचपा काढायची सुवर्णसंधी म्हणजे चौक न्हाण. महाराष्ट्राच्या काही भागात आपल्या परंपरानुसार लग्नाआधी प्रत्येक व्यक्तीला स्त्री असो वा पुरुष चौक न्हाण घातले जाते. आई, वडील, भाऊ, बहिणी यांच्या बरोबर एकत्रित स्नानाची ही शेवटची वेळ. (या नंतर व्यक्ती बदलते...) परिस्थितीही बदलते. लग्नाआधी होणारा अत्तरे, परफ़्युम्स यांचा वापर कमी होतो. आंघोळ करावीच लागते हो. बायकोच्या शिव्या खाण्यापेक्षा ते परवडलं.
मग जावु या या घरात..चला तर.....
वरमाई पहाटे पहाटे उठून कामाला लागलेली आहे.....
'कसे पसरलेत बघा एकेक जण ! जणु माझा लेक, यांचा कोणीच नाही. माझ्या मुलाच्या लग्नाला आलेत म्हणजे अगदी पाहुण्यासारखंच वागायला हवं का ?
रुपे, उठ गं बाई ! कुणी येणार नाही ये आपल्या मदतीला....(हे थोड्या जास्तच मोठ्या आवाजात) किमान झोपेचं सोंग घेवुन पडलेल्या नणंदबाईंना ऐकु जाइल एवढ्या तरी नक्कीच !
आणि हो त्या दिपीला सुद्धा उठव गं...तुमच्या भावाचं लग्न आहे, त्यांच्या थोडीच कुणाचं आहे. बघ कशा पसरल्यात.
तुम्हाला सांगते...(हे तुम्हाला म्हणजे मंडळी, तुम्हाला बरं का......!), आम्हा बायकांचा जन्मच असा ! आयुष्य सगळं रांधा, वाढा आणि उष्टी काढा यातच जायचा. तुम्हाला म्हणुन सांगते , कुणाला बोलु नका..पण मेल्या बायकाच बायकांच्या शत्रु असतात हो. आता हेच बघा ना. आमच्या ह्यांच्या बहिणाबाई..कशा पसरल्यात..जणु पाहुण्याच घरच्या......नाही, नाही..झोपलेल्या नाहीत काही राणी सरकार....!
सगळं कळतं हो मला...पण काय करणार, आमचे हे म्हणजे बहिणीसाठी श्रीकृष्ण आणि बायकोसाठी................जमदग्नी.
राजन. उठ रे बाबा, चौक न्हाण आहे तुझ्याच लग्नाचं ? तु तरी उठ आणि तुझ्या परमपुज्य पिताश्रींनापण उठव. रुपे, उठलीस का नाही तु..आणि तिच्या कंबरेत एक लाथ हाण , अगं दिपीच्या म्हणले मी! हाणशील दुसरीलाच कणालातरी....(याला म्हणतात खाज असणं)
हो, तर मी काय सांगत होते....
(कुणाला सांगताय ?) ....अरे हो मंडळी, पुन्हा आपल्याकडे वळलेल्या दिसताहेत मातोश्री..!
"तर, गेल्या वर्षी त्यांच्या मुलाचं लग्न झालं. कुणाच्या म्हणुन काय विचारताय..एवढं सुद्धा कळत नाही. तर त्यांच्या मुलाचं लग्न झालं..महिनाभर आधी फोन. वहीनी, चांगले पंधरा दिवस आधी राहायलाच यायचं बरंका ! का नाही, फ़ुकटची मोलकरीणच ना ! तुम्हाला सांगते, पंधरा दिवस राबत होतो हो मी आणि माज़्या पोरी.......! आता स्वत: बघा कशी पसरलीये, सटवी. तुम्हाला सांगते....
"राजा, उठलास की नाही का घालु कंबरेत लाथ...तुला बसवला भिंतीला टेकुन. " (हे बोलताना नजर मात्र दुसरीकडेच असते हो..आपण समजुन घ्यायचं.)
दिपाराणी, उठ बाई...मी एकटी कुठं, कुठं म्हणुन पुरी पडणार.
"माझ्या लहानग्या, लेकींना कामाला लावावं लागतंय. पण मेलीच्या नाकावरची माशी उडतेय का बघा...झोपलेल्यांना उठवणं सोपं असतं हो...झोपेचं सोंग घेणार्यांचं काय करणार..? (इथे टोन बदललेला..!)
ऊठलीस का रुपे, हे बघ शेगडीवर पाणी तापत ठेव चांगलं हंडाभर. काय म्हणालीस ?..हो..हो..दुसरं पण भांडं ठेव. पाणी तापवायला जरी कोणी नसलं तरी चौक न्हाणाला बघ लगेच "मानापमान" पाहायला मिळेल. "दिपी उठली का गं ? काय म्हणालीस, झोपु दे तीला...? तु बघतेस सगळं..असं म्हणतेस ...?.गुणाची गं माझी बाय..! एवढी अक्कल तुझ्या बापाला आणि राजाला असती तर सटवाईला अभिषेक केला असता गं मी."
राजा, आता उठतोस का..आणि काय हो तुम्हाला काय वेगळं सांगायला हवं का? उठा की आता...! माझी पोर एकटी काम करतीय, थोडी मदत करा तिला...!
(ते काय म्हणतात ना..नवर्या बोले, नणंदे लागे. ..एखादा शब्द इकडे तिकडे हो..चालायचंच.!)
"पण खरं सांगु , लग्नाआधी अशी नव्हती हो. माझं लग्न होवुन या घरात आले तेव्हा कायम मला चिकटुन असायची. काहीही नविन पाहिलं, नविन शिकली की माझ्याकडे धावत यायची....
" वैनी, बघ मी काय केलंय ? खुप गोड होती हो. लग्न झाल्यावर माणसं बदलतात ? इतकी ?"
"नशिब गं बाई माझं ! उठलास रे बाबा....चल तुझं आटपुन घे....! चहा ठेवलाय रुपीनं......तेवढा घे....तुझ्या वडीलांना पण उठव !"
"चहाचं नाव काढलं, आता उठेल बघा....आणि साळसुदपणे म्हणेल...वैनी, मला का नाही उठवलंस गं ? सगळी कामं एकटीनेच आटपलीस !........ डुचकी....!
"रुपे, परसात चार पाट मांड गं. त्याच्या चारी बाजुला चार तांबे ठेव आणि चारी तांब्याला दोरा गुंडाळुन घे. चारी पाटांना सामावुन घेइल असा चौक तयार करायचाय !" ,काय म्हणालीस, ...हो..हो..तांब्यावर स्वस्तिक काढ आणि प्रत्येक तांब्यात थोडं थोडं पाणी घालुन ठेव. पाणी तापलं असेल तर त्यात विसण घालुन बाहेर नेवुन ठेव...चौका पाशी."
"बघितलंत, कामं सगळी संपली, आता एकेक जण उठायला सुरुवात झाली. आता सगळे स्वयंपाकघरात जमा होतील, चहा ढोसायला......!"
एवढ्या वेळात "राजा" सगळे विधी आटपुन चहाच्या पातेल्यापाशी हजर झालेला असतो. चहा झाल्यानंतर मातोश्री त्याच्या हातात पानाचा विडा देतात. (इथे विडा म्हणजे दोन पाने आणि त्यावर ठेवलेली सुपारी, जी आपण देवापुढे नैवेद्य दाखवताना ठेवतो ते अभिप्रेत आहे.)
हे बघ विडा हातात धरुन ठेव, आधी उजवा पाय चौकात ठेवायचा....."
"ए संज्या, किमाम लावला नाही का बे आणि १२० नाही घातली...सुपारी बारीक करत जा बे ....." राजाने झोपेच्या भरात विडा तोंडात टाकलेला असतो....! (त्याचे शब्द ऐकुन पाठीत पडलेल्या आईच्या धपाट्याने उरली सुरली झोप उडुन जाते)
तुला बशिवला भिताडाला टेकुन ...
पुन्हा एक विडा त्याच्या हातात ठेवला जातो. "खाऊ नकोस....!" मागोमाग आईसाहेबांचा दम.
"तर मी काय म्हणत होते, आधी उजवा पाय चौकात ठेवायचा....."
"आई, उजवा पाय कुठचा, राजन आता मात्र चांगलाच जागा झालेला असतो. चेष्टेच्या मुडमध्ये आलेला असतो.....!
"चिरंजीव, तुमचा डावा पाय आहे ना, त्याच्या शेजारचा पाय म्हणजे उजवा पाय....!" मागुन खणखणीत आवाजात पिताश्रींची सुचना मिळते. राजन बिचारा गपचुप चौकात शिरतो.
"पहिला तांब्या ओतायचा मान कुरवलीचा, इतका वेळ झोपलेली दिपाराणी जागी झालेली असते..बदल्याच्या मुडमध्ये ती पहिला तांब्या ओतते.....
"दिपे, भाजलं की..कसलं कढत - कढत पाणी ओतलंस....! थांब बघतो तुला......
हे ऐकायला दिपाराणी थांबलेलीच नसते, ती कधीच स्वयंपाकघराकडे पळालेली असते.
विवाहाच्या शुभ दिवसाची प्रसन्न सुरुवात चौकन्हाणाने............
विशाल.
प्रतिक्रिया
3 Apr 2009 - 12:29 pm | सुप्रिया
चौक न्हाणाची पहाट अगदी डोळ्यांपुढे साकारलीत.
--------------------
देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.
3 Apr 2009 - 12:33 pm | दिपक
मस्त जमलायं चौक न्हाण. :)
"ए संज्या, किमाम लावला नाही का बे आणि १२० नाही घातली...सुपारी बारीक करत जा बे ....." राजाने झोपेच्या भरात विडा तोंडात टाकलेला असतो....! (त्याचे शब्द ऐकुन पाठीत पडलेल्या आईच्या धपाट्याने उरली सुरली झोप उडुन जाते)
=))
3 Apr 2009 - 12:43 pm | विशाल कुलकर्णी
ठांकु मंडळी !!
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
3 Apr 2009 - 12:55 pm | दवबिन्दु
किरिस्ताव लोकांन्च्यात अंडी फोडतात डोक्यावर. तिच त्यांची हळद आनि अंघोळ.
3 Apr 2009 - 12:55 pm | मराठी_माणूस
मस्त
3 Apr 2009 - 1:08 pm | नरेश_
अवांतरः विकुभौ हे चौक न्हाणं कोणाचं हो?
तुझं तर नव्हे :?
जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
3 Apr 2009 - 2:18 pm | विशाल कुलकर्णी
नाय रे भौ, माह्यावाल्या मेव्हण्याचे !!
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
3 Apr 2009 - 1:26 pm | दशानन
लै भारी !
3 Apr 2009 - 2:58 pm | सुमीत
काय मस्त वर्णन केले आहेस, मजा आली
3 Apr 2009 - 3:48 pm | लिखाळ
मस्त ! छान आहे. चौकन्हाण हा प्रकार मला माहित नव्हता. माहितीत भर घातल्याबद्दल आभार.
या लेखात लेखकाचे आणि वडिल-मुलाचे जे एक्दोन लहानसे संवाद आले आहेत ते वगळून लेखन अजून घोटिव केले तर दिवाकरांच्या नाट्यछटेसारखी सुंदर रचना होईल असे वाटले.
पुलेशु.
-- लिखाळ.
3 Apr 2009 - 5:33 pm | रेवती
चौकन्हाण काय असतं हे उडत उडत ऐकलं होतं.
आता नीट समजलं. आईचे संवाद व स्वगत मस्तच!
"ए संज्या, किमाम लावला नाही का बे आणि १२० नाही घातली...सुपारी बारीक करत जा बे ....."
हे भारीच आहे.;)
रेवती
3 Apr 2009 - 8:04 pm | प्राची
आमच्या गावी शेजारच्या दादाच्या चौक न्हाणाला त्याची आंघोळ झाल्यावर शेवटी बर्फ टाकलेली एकदम गारेगार कळशी त्याच्यावर उपडी केली होती.आधीच हिवाळ्याचे दिवस,त्यात त्याची बेक्कार हालत झाली होती.
3 Apr 2009 - 8:47 pm | प्राजु
चौक न्हाणाचा प्रसंग छान उभा केला आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Apr 2009 - 8:52 pm | शितल
मस्त लिहिले आहे :)
4 Apr 2009 - 5:09 pm | क्रान्ति
=)) =)) =)) =)) वरमाईचे स्वगत वाचून कै. लक्ष्मणराव देशपांडेंच व-हाड आठवलं . वाचता वाचता हसून हसून पुरेवाट झाली. एकदम झक्कास!क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
5 Apr 2009 - 3:10 am | पक्या
मस्त. मजा आली वाचताना. येऊ द्यात अजून असे लेखन.
5 Apr 2009 - 4:08 am | मदनबाण
मस्त वर्णन... :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
6 Apr 2009 - 6:28 pm | चतुरंग
उडतउडत कानावरुन शब्द गेलेला पण नक्की काय ते माहीत नव्हते. आईचे स्वगत मजेशीरच. :)
(वरती लिखाळ म्हणतात तसे थोड्या सुघटपणाने दिवाकरांच्या नाट्यछटेचे रुप देता येईल.)
चतुरंग