मुक्काम पोस्ट कॉरन्टाईन सेंटर

लेखनवाला's picture
लेखनवाला in जनातलं, मनातलं
13 Jul 2020 - 11:10 am

******

जसं रामाने रावणाला मारलं, ओबामाने ओसामाला मारलं, अगदी तसचं कोरानाला जर एकूण समाजाने मारायचं म्हणजे संपवायचं असेल तर मग ‘कॉरन्टाईन’ होणं हाच जालीम उपाय, करोनापूर्वी ‘कॉरन्टाईन’ या शब्दाचा तसा काही परिचय नव्हता पण आता हा जीभेवर रेंगाळला, ते शुदध मराठीत ‘विलगीकरण’ बोलायला मजा नाही येत… ते जीभेवरुन विरघळल्यासारखं वाटतं….

******

काळाचं मनुष्याच्या शरीररुपी अस्तित्वाला आपल्या कवेत घेणारं कोरानाच्या स्वरुपातलं अदृश्यरुप आता मात्र थोडसं का होईना प्रत्येकाच्या मनात काहूर माजवत होतं. नाही म्हणता म्हणता मुंबईतल्या करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत होती, पूर्वीची ‘बेरीज’ आता ‘गुणाकार’ बनून परिस्थिती भयाण होत चालल्याची जाणीव करुन देत होती. मी राहात असलेला भाग काहीसा उंचावरच्या डोंगराळ वस्तीवरच्या दहा-पंधरा हजाराच्या लोकवस्तीचा, खूप सारे कोकणी चाकरमानी राहत असलेला, यंदा म्हणावी तितकीशी लोक गावी गेलीच नव्हती, त्याला कारण गावी सेपरेट घर नसल्यामुळे चौदा दिवस करावा लागणारा शाळेतला मुक्काम, मुबंईवरुन गावी खाजगी वाहनासाठीचा जास्तीचा प्रवासीखर्च, घरात बसून असल्यामुळे हातात नसलेला पैसा त्यामुळे गावी जाऊन खाणार काय? हाही प्रश्न अनेकांना सतवत होता. त्यामुळे लोकसंख्या होती तशीच्या तशी होती. या भागात एकदा का कोराना शिरला की तो लागोलाग पसरण्याची शक्यता खूप जास्त होती. साधारण एप्रिलच्या सुरवातीपासूनच लोक मास्क आणि सॅनिटायझारच्या बाबतीत पहिल्यापेक्षा अधिक सजग दिसत होती. सोशल डिस्टनस जितका पाळता येईल तितका पाळला जात होता, भाजीपाला आणण्यासाठीच काय तेवढी लोक बाहेर पडत होती. याव्यतिरिक्त सार्वजनिक संडासाला पर्याय नव्हता तिथं तर जावच लागत होतं, आता तिथं येताना मास्क घालण्याची सक्ती केली गेली, याशिवाय लोकांनी पहिल्यासारखं एकमेंकाच्या घरी जाणं बंद केलं, उन्हाळी भरदुपारी घरात बसून काढणं जिकरीचं होऊ लागलं, घरात असतील नसतील तेवढे पंखे चालू केले, कुलर लावले, पण गरमी काही कमी होतं नव्हती. बाहेर पडून रस्त्यावर चालणं कारणाशिवाय शक्यचं नव्हतं, पोलीसाच्या गस्ती आता कधी नव्हे झोपडपटटीच्या गल्लीच्या दिशेने येऊ लागल्या होत्या.

******

आज ना उद्या करोना आपल्यापर्यन्त येईल, अशी मनाची तयारी झालीच होती. त्यासाठी आजच्या घडीला त्यांच्यापासून जितकं सावध राहता येईल तितके प्रयत्न चालू होते, त्यात मग येता-जाता मास्क वापरणे, सतत हात सॅनिटायझारने धुत बसणे, सहजासहजी नाका-तोंडावर हात जाणार नाही यांची काळजी घेणं…. हे ओघाने आता सुरू झालं होतं, पण असं प्रामाणिकपणे एरियात प्रत्येकजण वागेल यांची काही शाश्वती नव्हती, किमान आपल्यापुरता सुरवात करून मी मोकळा झालो होतो, या शिवाय चाळीच्या सूचना फलकावर “संडासला येताना मास्क घालून येणं सक्तीचं आहे” असं लिहिलं होतं, पण तसं तंतोतंत वागणं फार कमी लोकच करत होती. जोपर्यन्त आपल्यावर किंवा आपल्या घरातल्यावर तशी परिस्थिती येतं नाही तोपर्यन्त लोक गंभीर होत नाहीत…

******

काही चाळीमधून म्हणजेच चिंचोळ्या गल्या-गल्यामधून जिथे दोन्ही हात थेट आडवे पसरवताना मुश्किल होतात अश्या दाटीवाटीच्या वस्तीमधून मोठं मोठाले बांबू क्रॉस आकारात प्रवेशाच्या ठिकाणी लावण्यात आले होते. याशिवाय काही चाळप्रमुखांनी एकमेकांच्या घरी लोकांना जाण्यास बंधन घालण्याची तयारी सुरू केली होती. काही ठिकाणी यांचा जोरदार विरोध झाला, या सगळ्या बंधनाची उभारणी आमच्या चाळीत देखील सुरु झाली पण मुळात आमची चाळ मुख्य रहदारीची त्यामुळे असे बांबू क्रॉस उभारण्यास इतर चाळीतून विरोध होऊ लागला त्यात प्रमुख कारण म्हणजे आमच्या चाळीत असणारे सार्वजनिक संडास जिथे ही बाकी चाळीतली मंडळी संडासला येतात.

******

बाकी मुंबईत आपण राहत असलो तरी खूप अश्या मोठ्या लोकसंख्येच जगणं हे एका ठराविक परिघाच्या बाहेर जात नाही, घर ही निव्वळ जेवण्यासाठी आणि झोपण्यासाठीच असतात असाच साधारण माहौल असतो. फक्त कामावरून घरी आल्यावर आणि एक सुट्टीच्या दिवशी त्या ‘ दहा बाय दहा ‘ च्या खुराड्यात राहत असल्याची जाणीव आता मात्र लोकांना पदोपदी जाणवत होती, खूप साऱ्या लोकांना आपल्या कामावर जाण्यासाठी रेल्वे हा एकच पर्याय असल्यामुळे घरी राहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. यांत ही काही धडपड्या धंदेबाज लोकांनी ग्राहक लोकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेत आपले पारंपारिक न चालणारे व्यवसाय बंद करत भाजीपाला ह्या एकमेव चलनी उद्योगात स्वतःला गुंतवून घेतले, यांची परिणीती अशी झाली की दर दहा पावलांवर भाजी विकणारे दिसू लागले, यांचा वाईट परिणाम ज्यांचा मूळ बिझनेस भाजीपाला विकणे हा होता त्यांच्यावर झाला. काही लोकांनी पूर्वीपासून आणून ठेवलेली कडधान्य खाऊन बाहेर जास्तीच जास्त संपर्क टाळता येईल यावर भर दिला, पण अश्या लोकांची संख्या फार तुरळक होती.

यांत ही काही लोकांचं वर्क फ्रॉम होम सुरू होतं, आमचा समावेशही त्यात होत होता. कंपनीने दिलेल्या लॅपटॉपवर दिवसभर बसून बसून कमरेचा पार भुगा होत होता. यावर व्यायामाचा उपाय नियमित न होता कधीतरी एखाद्या दिवशी होत होता कारण त्याला आजूबाजूच्या निराश वातावरणामुळे मनावर आलेली मरगळ आणि त्याला आळशीपणाची झालरही तितकीच कारणीभूत होती.

******

वन बीचके हिरानंदानी

आयुष्यात एक एक रुपयासाठी झिक-झिक करणं सुरू असताना, सतत उद्याची भ्रांत पडलेली असताना, शहरात बनत असलेल्या मोठया मोठया उंचच उंच इमारतीतल्या एखाद्या फ्लॅट मध्ये राहण्याचं फक्त स्वप्नच बनून राहणार अशीच जीवन जगण्याची तऱ्ह्या बनून राहिलेली असताना अचानक दुस-या दिवशी तुम्ही तिथं मालकी हक्काने नाही पण निदान राहू लागाल असं स्वप्नातही कधी येत नाही, त्यातही पवई हिरानंदानी म्हणजे शहरातला पॉश एरियापैकी एक. तिथं राहण्यासाठी खूप श्रीमंत असावं लागतं, किमान मासिक उत्पन्न सहा-सात आकडी असल्याशिवाय ते शक्य नाही. मी राहत असलेल्या झोपडट्टीवासीयांना इतकं उत्पन्न कमावणं शक्य नाही त्यामुळे त्यांची सारी स्वप्न आपली झोपडपट्टी कधी एकदा एस आर ए म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या एखादया प्रकल्प योजनेत जातेय का या एकाच आशेवर अवलंबून असतात. त्या योजनेमध्ये दहा बाय दहाच्या घराचं तीनशे स्क्वेअर फुटांच का होईना बिल्डिंग मध्ये घर होतं. आणि आपण त्या श्रीमंताच्या जगण्याचा छोटा फाँट साईज् का होईना जगतोय असं स्वतः स वाटवून घेता येतं. गेलाबाजार एखादा त्यातल्या त्यात दिवा-डोंबिवली परिसरात इमारतीत रहाण्यासाठी इथलं घर विकून मुंबईतला मराठी टक्का कमी करण्यास कारण बनतो तो भाग वेगळा.

******

सकाळी अकराच्या सुमारास दोन बायका माझ्या घरासमोरच्या खोलीच्या दाराशी येऊन उभ्या राहल्या. त्यांनी तो समोरच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्या घरातल्या बाईचा नवरा साधारण पाच दिवसांपूर्वी एका खाजगी रुग्णालयात भरती झाला होता, त्याला काही दिवसापासून खोकला आणि ताप येत होता, जरा जास्तच झाल्यावर तो स्वतःहून रात्री बारा वाजता सात दिवसापूर्वीं भरती झाला होता. सध्या ती आणि तिचा अकरा वर्षाचा मुलगा असे दोघचं इथं राहत होते. बाई नवऱ्याच्या तब्येतीची खुशाली मोबाईलवरून घेत होती, काल सहज बोलता बोलता तिच्या अकरा वर्षाच्या मुलाने शेजारांशी बोलता बोलता ‘कोराना टेस्ट’चा उल्लेख मोठ्याने केल्यावर तिने जोरदार रपाटा त्यांच्या पाठीवर घातला होता, आणि यांचं कारणामुळे आजूबाजूच्या शेजाऱ्यात हलकीशी कुजबूज ऐकु येत होती. आणि आज सकाळी त्या बाईने दरवाजा उघडताच त्या दोन्ही बायका काहीश्या मागे येऊन उभ्या राहिल्या.

“तुम्हाला फोन आलाच असेल, तर चौदा दिवसाचे कपडे आणि बाकी जे काय गरजेचे सामान आहे ते घ्या….. तयारीत रहा…. अडीच वाजता गाडी येईल….” त्या बाईला या दोन्ही बायकांनी सूचना केल्या आणि आता त्यांनी आपली नजर आसपासच्या भागावर एकदा फिरवली.

बाजूची दोन्ही घर आपल्या नजरेने त्या बायकांनी टिपली. आणि समोरच घर माझं असल्याने त्याचा रोख आमच्या दिशेने सुरू झाला, त्या दोन्ही बायका या बीमसी म्हणजेच सरकारी यंत्रणेचा भाग होत्या. त्याच्या पद्धतीनुसार हाय रिस्क मधली घर त्या टिपत होत्या. त्यात आजूबाजूची दोन आणि समोरची दोन घर त्यांनी टिपली. त्यावेळी थोडक्यात कळलं की दोन-एक दिवसापूर्वी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना घेतलेली त्या बाईच्या नवऱ्याची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, आणि तिला व तिच्या मुलीला ते घेवून जाणार होते…..कोठे तर?….. पवई कॉरन्टाईन सेंटर.

आता अधिकची लोक जमू लागली. आजूबाजूची घर त्या करोना बाधित घरातल्यांना हलक्या आवाजात का होईना वाईट साईट बोलू लागले.

आता त्या सरकारी कर्मचारी बायकांनी आपला रोख माझ्या घराच्या दिशेने वळवला, त्यांनी स्वतःच्या बॅगेतून पेपर काढत त्यावर पेनाने कुटुंबातली नाव नोंदवून घ्यायला सुरवात केली, मला वाटलं हा त्यांच्या सोपस्काराचा भाग असेल, नाव लिहतील आणि जातील निघून, पण आता त्यांनी हात पुढे करायला सांगत आपल्या बॅगेतून आणलेला स्टॅम्प मारला….होम कॉरन्टाईन (Home Quarantine) चा….. आता त्यांनी आम्हाला ही सांगण्यास सुरवात केली की तुम्हीं बॅगा भरा… आता मात्र हे ऐकून धक्का बसला….. इतक्यात इथं नेमक काय चालयं बघायला चाळीतली लोक जमा झाली…. मुळात लॉकडाऊन आणि करोनाचा वाढता प्रभाव यांमुळे कोणी कोणाच्या घरी सहजासहजी पूर्वी सारखं जाणं टाळतं होते . चाळीतल्या लोकांचा संपर्क हा केवळ सार्वजनिक संडासापुरता मर्यादित होता. त्यात ही ज्याला करोना झाला तो कुठे ही कामाला वैगेरे जात नव्हता, मग त्याला करोना कसा झाला यांचाही काही पत्ता नव्हता. की त्याला या करोनाची लागण इस्पितळात भरती झाल्यावर झाली होती यांचाही मागमूस नव्हता… त्यामुळे विनाकारण कोणा दुसऱ्याच्या हलगर्जीपणामुळे चौदा दिवसाचा वनवास भोगण्यास मन तयार होत नव्हतं…. यांत माझ्या आजूबाजूच्या शेजारी पण होते, त्यांचाही हाच सूर होता…… अश्या पद्धतीचा स्पष्ट नकार दर्शवताच त्यांनी मला “तुम्ही स्वतः हून होम कॉरन्टाईन होत असून तुमच्या संडासची व्यवस्था तुम्ही करत असल्याचं लेटर” बीएमसीच्या दवाखानात लेखी देण्यास सागितलं, पण चाळवाल्या बाकी रहिवाश्यांनी संडास वापरण्यास हरकत घेतली, त्यात एका दिवसापूर्वी गावावरून आलेल्या महाभागांचा ही समावेश होता, परिस्थिती पाहता मग नाईलाजाने पवई कॉरन्टाईन सेंटरला जाण्यासाठीची तयारी सुरू केली. त्या सरकारी बायकांनी अडीच वाजता तयार राहण्यास सांगितले.

या सरकारी बायकांनी आपल्या नेहमीच्या हिशोबाने हाय रिक्सची घर बघत त्यांना जे योग्य वाटत होतं ते त्यांनी केलं, यांत ही हाय रिक्समधल्या घरामधल्या सगळ्या घरातल्या सगळ्याच जणांना नेणं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कारणामुळे शक्य नव्हतं, कुणाच्या घरात पोटुशी बाई होती, कुणाच्या दर तीन दिवसाआड नियमित डॉक्टरकडे तपासण्या चालू होत्या, कुणाचं तीन-चार वर्षाचं लहान मुलं होत. त्यामुळे हो-नाही करत चार घरची…आजूबाजूची… मिळून अकरा माणसं ज्यात दोघं ज्यांच्या घरात पॉझिटिव्ह सापडले होते ती आणि बाकी इतर नऊ शेजारी जाण्यासाठी निघणार होते.

काही वेळानंतर त्यांनी त्या गल्लीत कंटेन्टमेंट (containtment) झोन चा बॅनर झळकवला, आता त्या बॅनरनें अशी दहशत तयार केली की लोक त्या दिशेने येणं आपोआप बंद झाले. संडासला जाण्यासाठी वेगळा रस्ता शोधू लागले. लोक एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पाहू लागले.

“कॉरन्टाईन सेंटरला प्रॉब्लेम नाहीयेत असं नाही पण तसंच जर काही वाटलं तर आम्हाला कॉल करा, आपल्या इथल्या मंडळातली लोक काहीनाकाही मार्ग जरूर काढतील”अशी आरोळी ठोकीत त्या सरकारी बायका निघून गेल्या. प्रॉब्लेम म्हणजे नेमकं काय यांची काही कल्पना न येणं स्वाभाविक होतं. काय होईल ते होईल चा आटिटयूट कामी आला. आता तिकडे काय नेता येईल यांचा विचार करण्यात खूप वेळ गेला, त्यात कपडे, टूथपेस्ट, साबण, चादर आणि वर्क फ्रॉम होम करण्यासाठी लॅपटॉप घेतला.

दुपारी अडीचच्या सुमारास मेन लाईन च्या रस्त्याला आलो, आज जवळजवळ दोन महिन्यानंतर रस्ता बघत होतो, निव्वळ सामसूम. त्यात रणरणतं ऊन, एखादं दुसरा माणूस नजरेस पडत होता. साधारण पंधरा मिनिटानंतर लाल रंगाची covid-19 लिहलेली बस आली. आमच्या शिवाय बाकी एरिया मधली अजुन तिघंजण गाडीत बसली, गाडी सुरू व्हायला अवकाश होता, बीएमसी दवाखानातून आलेल्या बाईने खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा सेटरला जाण्या-याची संख्या मोजली. घरून निघताना कुणीच ‘त्या’ माणसामुळे आपल्याला करोना झाला असू शकतो अशी कल्पनाही करत नव्हता हे विशेष, सगळेजण ठाम होते की त्यांनी पाहिजे तेवढी काळजी घेतली असल्याने त्यांना काही करोना होणे शक्य नाही. ज्या घरात करोनाचं पेशंट सापडला ती बाई म्हणत होती की आम्हाला वाटलं साधा खोकला आहे, आमच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास भोगावा लागतोय वैगेरे… वैगेरे… सांगू लागली….. तिची अवस्था शाहरुख खानच्या चक दे इंडिया सिनेमाच्या सुरवातीच्या घर सोडतानाच्या प्रंसगासारखी झाली होती.

आणि जिथे रोजच जगण्याचं मढ घेऊन फिरणाऱ्या लोकांना असं एका नवीन गोष्टीमुळे कितीसा फरक पडणार होता. आणि लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या लोकांना नवीन अनुभव भेटणार होता त्यांचीच तेवढी उत्सुकता होती, सगळे त्या गाडीत शांतपणे बसले होते, पण आतून कुठेतरी चाळीतल्या रहिवाशांनी संडासला जाण्याची नाकरलेली परवानगी काही डोक्यातून जात नाही, त्याला कारण म्हणजे तो पेशंट तर त्या संडासात जात होता आणि तिथं जर सगळेचं येत होते तर मग फक्त बाजूवाल्यानाच का घेवून जातायतं… हा तो वाद होता… सगळं काही मनात धुमसत होतं पण बोलत मात्र कुणीच नव्हतं…. इतक्यात तिथं आपल्या कुंटूबासकट गाडीत बसलेल्या एका लहान मुलीने, त्या पॉझिटिव्ह सापडलेल्या घरातल्या आई-मुलाकडे बोट करत याचे वडील कुठे आहेत असा निरागस प्रश्न विचारला. याचं उत्तर देताना तिच्या घरच्यांच्या डोळ्यात एकाच वेळी राग आणि हसू दिसून येतं होतं.

या बस प्रवासात काही जणांनी आपले कॉरन्टाईन च्या शिक्काचे हाताचे फोटो व्हॉट्सअँप स्टेटस म्हणून टाकले होते, त्यामुळे त्यांना आता फोन येणं सुरु झालं होतं. माझा होम कॉरन्टाईन (Home कॉरन्टाईन)चा शिक्का दोन तासही टिकला नाही, दुपारच्या जेवणानंतर हात धुतले आणि त्याबरोबर तो शिक्काही नाहीसा झाला.

रस्त्यावरच्या लोकांची गाडीकडे कुतूहलाने बघ-ण्याची नजर दिसून येत होती. मुख्य हायवेला लागून असलेल्या डी मार्ट मध्ये लांबच लांब रांगा दिसल्या. एकदाची बसगाडी पवई विलगिकरण कक्षात दाखल झाली, गाडी आत प्रवेश करत असताना सगळ्यात पहिले दिसले ते पहा-यासाठी असलेले पोलिस… गाडीतून उतरून बाहेर पडताच आता कुणीतरी आपली स्वतःहून विचारपूस करेल असं वाटतं होतं पण तसं काही झालं नाही, बाहेर तिथंच काही चौदा-पंधरा वयाच्या मुलं-मुली मास्क लावून अगदी घरच्या सारख्या फिरताना दिसल्या, एक नजर टाकली या बाजूला…. इथे कुणी पोलीस दिसत नव्हते… आम्हाला गाडीतून उतरताना बघून त्या मुलं-मुली यांनी आमच्याकडे येत “टेंशन नका घेऊ!, जेवण नाश्ता सगळं भेटत टायमावर, तिथं समोर नोंदणी करा…“ म्हणत….बोटाने इशारा केला…. हे जे आम्हाला सांगत होते त्यांना पण कॉरन्टाईन केलंय हे मागाहून कळलं, कारण त्यांचा तिथला तेव्हाचा अभिर्भाव कुठे तरी पिकनिक स्पॉटला आल्याचा होता ज्यामुळे आम्ही काहीसे जे बावरलेलो होतो तो मनाने थोडेसे का होईना रिलॅक्स झालो. मग तिथे नोंदणी कक्ष्याच्या इथे बसलेल्या माणसाने सात-आठ मिनिटांनी नाव मोबाईल नंबर, पत्ता यांची डिटेल्स तिथल्या कागदी रजिस्टर मध्ये नोंदवून घेतली, हे सगळं आपण आजच्या जगात लॅपटॉपवर अजून जलद रीतीने करु शकत नाही का? असा प्रश्न पडला उगाच… आम्हाला त्या बावीस मजली म्हाड्याच्या इमारतीच्या पार वरच्या मजल्यावरल्या एका वन बीचके फ्लॅटचा नंबर देत लिफटने जाण्यास सांगितले. इथे कुणाला काही दुखत असेल किंवा त्रास जाणवत असेल तर सकाळी अकरा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत डॉक्टर अव्हलेबल असल्याचं सांगितलं .

Night View

आता संध्याकाळचे चार वाजले होते, मनात आता पुढचे चौदा दिवस कसे जाणार याचं तंद्रीत त्या फ्लॅट मध्ये जाण्यासाठी लिफ्ट मध्ये घुसलो. त्याचवेळी इथे सगळे पॉझिटिव्ह पेशंट(positive patient) सापडला त्यांच्या आसपासचे लोक घेवून आलेत, त्यामुळे आपल्याला इथे राहून करोना होणार नाही ना असं वाटू लागलं. आम्ही अकराजणामध्ये करोना पेशंटच्या घरातल्यांना एक फ्लॅट, आणि बाकी नऊ लोकांना अजून दोन फ्लॅट राहण्यासाठी दिले.

ज्या नंबरचा फ्लॅट सांगितला, तिथे पोचलो, तिथल्या फ्लॅट च्या दरवाज्याला फक्त कढी होती, ती खोलली, आत प्रवेश केला, चपल्या काढल्या, तीन बिछाने पडले होते आणि तेवढ्याच उश्या पडल्या होत्या. सुरवातीच्या रूम मध्ये खूप सारे चिलटे खालती लादी वर पडलेले दिसले, झाडू घेऊन आधी त्या साफ-सफाईला लागलो, लाईट-पंखा चालू केलं. बाहेरचा हॉल, मग किचन तिथे लागून बेसिन म्हणजे पाण्याचा नळ होता, त्यांच्या थेट समोरचं बाथरूम होतं, त्यात दोन दिशेला दोन बादल्या होत्या. दोन पाणी घेण्यासाठी ‘मग’ होते. त्यातच संडास… तो इंग्लिश पध्दतीचा होता, पण पार्श्व भाग साफ करण्यासाठी पाणी वापरण्याची पद्धत मात्र भारतीय होती. आणि तिसरा बेड रूम, तिथं देखील तीन बिछाने आणि उश्या होत्या. बाहेरचा हॉल, किचन आणि बेडरुम तिन्ही ठिकाणी खिडक्या होत्या.

Building Height

त्या खिडक्या मधून समोर बांधकाम सुरू असलेली इमारत नजरेस पडत होती, इतक्या उंचावरून डोळ्यास जे जे काही टिपता येईल ते अधाशासारखे पाहत होतो. समोर काही अर्धवट टेकडीचा हिरवट भाग नजरेस पडत होता. त्याशिवाय हिरानंदानी परिसरातल्या काही एकाच तऱ्हेच्या बांधकामात बांधलेल्या पाच सहा इमारती नजरेस पडत होत्या. आता तशीच नजर खाली डोकावली, मघाशी जिथून आलो तो रस्ता, आणि तो गेट, तैनात केलेले पोलिस सगळं काही एकाच नजरेत मावत होतं. त्या खिडक्या जास्तच खुल्या होत्या, त्यांना काही एक लोखंडी आधारकवच असं काहीचं नव्हत. जास्तच जर कोणी उळकबण्याचा किंवा नकळतपणे बाहेर जास्तच डोकावण्याचा प्रयत्न केला तर तोल जाण्याची दाट शक्यता आहे. दरवाजा आतून लॉक करण्याची पद्धत कशी आहे हे समजून घेण्यात दोन-तीन मिनिटं गेली. थोड्याच वेळात दरवाजाची बेल वाजली आणि दरवाजा खोल्यावर बिसलेरीच्या बाटल्या दिसल्या, इथं नाश्ता- जेवणं हे मजल्या मजल्यावर पोचवण्यासाठी सरकारनं पगारी माणसं नेमलीयत, ती पीपीई किट घालून, प्रत्येक दार ठोठावत ट्रॉली मधून आणलेला पॅकबंद पदार्थ, जेवणं देतात. त्या पीपीईकिटधा-याने घरात माणसं किती आहेत विचारली, आणि माणशी बॉटल देवून गेला.

Window View

आता संध्याकाळचे सात वाजले आणि पुन्हा बेल वाजली , पॅकबंद जेवणं आलं होतं, जेवणाच्यावेळी समोरासमोरचे दरवाजे खोलले जायचे, सगळ्याच्या चेहऱ्याला मास्क असायचा, आणि जेवण घेतलं की सगळे निमूटपणे दार लावत. पहिला दिवस होता, जेवण कसं असेल या बदल उत्सुकता होती, पॅकिंग तर भारी दिसत होतं. इतक्यात काही लगेच कुणाला भूक लागली नव्हती, त्यामुळे नेहमी घरी ज्यावेळेला जेवतो त्या वेळी म्हणजे साडेनाऊ वाजता जेवायचं निश्चित झालं. इथं माझ्या सोबत राहणारा माझा शेजारी हा बॉक्सटाईप किक्रेट खेळण्यातला चॅम्पियन होता, त्यांचा मित्र परिवार खूपच मोठा होता, त्यांने व्हाट्सअँपवर ठेवलेल्या शिक्काच्या स्टेटस बघून त्यांच्या मित्रांचे फोन येत होते, बोलणं झाल्यावर कळालं की, तो पण इथेच कॉरन्टाईन आहे, तो म्हणाला जर पुलाव हवा असेल तर साडेआठला खाली ये… सुरवातीला याला ही गोष्ट मजाक वाटली, आणि त्यांला वाटत होतं की पॅकीग जेवण असताना कशाला उगाच खाली जा… आणि तिथं खाली कोण जेवण देणारं आहे…. आता साडेनाऊ झाले… पॅक जेवणावरचं प्लॅस्टिकचं झाकण काढलं… आत भात, डाळ, चपाती आणि भाजी होती. जेवणाचा पहिला घास तोंडात घातला आणि एकूण चव कळून आली, डाळीत नुसतीच हळद होती, भाजीला नीटशी चव नव्हती, चपाती प्रचंड पातळ होती, चपात्याचा तुकडा जीभेवर राहूसाच वाटत नव्हता की तो घश्याखाली उतरत होता…. यावर कहर म्हणजे भात शिजलाच नव्हता. पण येवढं असून देखील जेवण फेकून देण्यास मन तयार होईना शिवाय पोटात भूक होती. कसंबसं करत ते जेवण संपवल… जेवण असं निकृष्ट दर्जाचं का बनवलं असेल… हे जेवण बनवणारे तरी असं जेवणं जेवतील का? अधिकारी लोकं लक्ष देत असतील की नाही… याचाचं विचार येतं होता… विचार करता करता आता टयूब पेटली की सकाळी ती बाई अशी का म्हणाली की कॉरन्टाईन सेंटरला प्रॉम्ब्लेम नाहीत असं नाही… तर हेच प्रॉम्ब्लेम…

आता आमच्या सोबत राहत असलेल्या क्रिकेटरने स्वतःहून त्यांच्या मित्राला फोन केला, “कसं आहे जेवण” असं उलट त्यांच्या मित्राने विचारताच, याने दुखी चेहरा करत सगळी हकीगत सांगितली…पलीकडून मित्र जोरदार हसत होता आम्हाला आता आठ दिवस झालेत ईथे राहून, आम्हाला पण अजिबात आवडत नाही जेवण म्हणून तुला सांगत होतो पुलाव घ्यायला ये साडे आठ वाजता… पण तू काय आलास नाय… खास आपल्या पब्लिकसाठी सोय केलीय दादांनी… आता उदया सकाळी ये साडेअकराला खाली… स्थानिक राजकीय पक्षांच्या एका नेत्याने लोकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेत स्व:खर्चाने येथे दोन टाईम भाजींची, एक टाईम पुलावचीं सोय केली होती. त्यांना व्हाट्सअँपवर आपली किती माणसं आहेत ते सांगायचं, जेणेकरुन दररोज दुपार-रात्री कोणती भाजी किंवा इतर कोणता पदार्थं येणार आहे ते तुम्हाला व्हाट्सअँपवर कळवतील, आणि माणसांचा अंदाज घेत त्यांना जेवण बनवणं सोपं जाईल. आता त्या वरच्या पॅक जेवणाला या सुटया भाजीचाच आधार होता दुस-या दिवशी थेट तो सकाळी जाऊन त्यांना तो खालती भेटला, आपल्या ओळखीची लोक पाहून त्या क्रिकेटरला थोंड हायस वाटलं… तो आता त्याला रात्रीच्या जेवणावरुन टोकत होता…चपाती चे वाभाडे काढणं चाललं होतं… आता विषय पाण्याचा निघाला… ती काल आलेली बिसलरी फक्त कधी तरी येते… कुणी ट्रस्टी किंवा गरजूने दिली तर…… नाहीतर…… त्या किचनमधल्या बेसिनमधलं पाणी प्यावं लागणारं…. इथली अधिकारी मंडळी सांगत होते की पाणी फिल्टर होऊन येतं तर ही मुलं सांगत होती की पाणी विहिरीतलं आहे ते टॅकरने येतं…. जर पाहिजे असेल तर अडीचशेला बॉक्स भेटतो बिसरलीचा… इथली यांचीच माणसं आणून देतात…तोच बॉक्स घे… असं सांगण झालं… आता काल दिलेली बिसलेरी संपली, घाबरत घाबरतच त्या बेसनमधलं पाणी प्याललो, पाणी मचूळ लागतं होतं… पुन्हा या पाण्यामुळे काही आजार होवू नये म्हणजे झालं असं सतत वाटतं होतं… आता तिथे त्या होमोपॅथीच्या गोळ्या आणि काढयाच्या गोळ्या वाटल्या राजकीय पक्षांनी… लेबलासकट… यांचा काही एक साईट इफेक्ट नव्हता, त्यामुळे त्याही घेणं चालू होतं.

kada

******

नवीन जागेवर झोप न लागणं साहिजकचं होतं, त्यात मनात नाही नाही ते विचार येतं होतें, याशिवाय असं वन बीएचके फ्लॅटमध्ये कधी बापजन्मात झोपलो नव्हतो… राहिलो नव्हतो.., इतरवेळी घरी डोक्यावर लटकलेला पंखा, वरच्या सिमेंटच्या पत्र्यावरून येणारा कुत्र्याचा आवाज ईथे सतवत नव्हता. फक्त गावी ऐकू येणारा रातकिडयाचा आवाज कितीतरी दिवसानंतर कानाला साद घालत होता. जर येथे येवून करोना झाला तर काय करतील, कुठे एडमिट करतील, करोना झालेला पेशंट मी जात असलेल्या संडासमध्ये जात होता, जर त्यामुळे अख्ख्या एरियात पसरला तर… इथे जेवण असचं भेटत राहिलं आणि प्रतिकारशक्ती कमी झाली तर…., बेसिनमधलं पाणी पिऊन काही विपरित झालं तर…. मन काय काय विचार करु पाहत होतं… मन अश्या विचारापासून डायव्हर्ट करण्यासाठी इयरफोनवर गाणी ऐकू लागलो…. तरी रात्री दोनदा अचानक जाग आली, डोक्यात “आपण कॉरन्टाईन सेंटरला आहोत” यांचा हुंकार मेंदूने दिला आणि तसेच डोळे मिटले.

आता दुस-या दिवशी सकाळी आंघोळीसाठी थंड पाण्याशिवाय पर्याय नव्हता, कपडे वाळत घालण्यासाठी दांडीची कमतरता जाणवत होती, काही कपडे खिडकीपाशी वाळत घातले. बाकी दररोज सकाळी संडाससाठी लावावी लागणारी लाईन येथे लावावी लागत नव्हती की जास्ती बसून राहिल्यावर दरवाजा ठोकवणं नव्हतं. योगा-व्यायामासाठी ऐसपैस जागा होती. सुरवातीला तीन दिवस जेवणाबाबतच्या तश्याच कमी-अधिक तक्रारी होत्या, खालती नोंदणी कक्षात आमच्यापैकी एकाने व्हिडिओ शूट करत तक्रार नोंदवली. पाणी तर बेसिनमधलचं पित होतो… सरकारचं आयुष मंत्रालय गरम पाणी पिण्याचा सल्ला देतं पण इथं तर सगळचं उलट होतं…. लोकं गमतीने म्हणत एकवेळ करोना झालेला परवडेल पण हे कॉरोन्टाईन सेंटर नको… तसं सध्यातरी हे पाणी पिऊन काही एक वाईट परिणाम जाणवत नव्हता… दिवसभरातून तीन-चार वेळा खाली-वर जाण्यासाठी लिफटचा वापर होत होता, तिथं मग बटण दाबण्यासाठी एका बारकश्या लाकडी काडीचा वापर होऊ लागला जेणे करुन जमेल तसा कोरोनांचा संपर्क टाळता येईल. सकाळी आठ वाजता नाश्ता येई, सकाळी नाश्ताला दररोज वेगवेगळा मेनू असे, कधी कांदापोहे… कधी शिरा… कधी उपमा आणि रविवारी इडली सांबार असल्याचं आता तिथे इतके दिवस राहत असण्या-याकडून कळालं होतं. नाश्ताबाबत तक्रारी नव्हत्या पण जेवण काही घश्याखाली उतरत नव्हतं. माझ्या सोबत राहणारा मुलगा घरुन एकाला बोलवणार होता ईथे खाली… का तर… याला सॅनिटाईजर हवं होतं….आणि त्याशिवाय त्यानें लोणच्याची बॉटल, बिस्कीटचे पुडे, वेपर, फरसाण, डेटॉल लिक्विड मागवलं. तसं अंतर सहा-सात किलोमीटरचं होतं….बाईक घेवून येणा-यांची संख्या जास्त होती….. पण रोज रोज कुणी येईल याची शाश्वती नव्हती. तिथं खालती गेटपाशी कोणीही येऊन आतल्या माणसाला वस्तू देऊ शकत होतं…. ज्यांना शक्य होतं त्यांनी जेवणसुदधा आणून देत होती त्यांच्या आप्तेष्ठांना…आमचे मात्र जेवणाचे हाल काही थांबत नव्हते…..

Food

आता तिस-या दिवशी पण तसचं जेवण होतं, टाकायचं का टिविटवर जेवणाचे फोटो, असा अन्याय का सहन करायचा, असाच विचार करत असताना जेवण देत असलेल्या स्थानिक राजकीय नेत्याच्या फेसबुक अंकाऊटवर गेलो, त्यांच्या पोस्ट पाहिल्या, त्यात ते दररोज करत असलेल्या अन्नदानाचे फोटो होते, त्याशिवाय काही त्यांनी फेसबुक लाईव्ह केलेले व्हिडिओ देखील पाहिले, प्रशासन दखल घेत नसल्यामुळे त्यांनी स्वतः लोंकाना जेवण आणून दयायला सुरवात केली तेव्हापासूनच्या व्हिडिओ पाहण्यातून मागील एक महिन्यांपासून अश्या तक्रारी येत असल्याचं दिसून आलं, त्यात काही वेळा जेवणचं भेटलं नसल्याचं कळालं, त्यापेक्षा आपल्याला जेवणं भेटतयं ते किती बरयं असं वाटू लागलं. ठरवलं अजून एक दिवस वाट बघू… नाहीतर टिविटर झिदांबाद आणि शेवटी चौथ्या दिवशी कॅटरसवाला चेजं झाला…सुखद धक्का बसला…त्या दिवशीच्या जेवणात, भातावर ताजा ताजा कापलेला लिंबू, पु-या, गोडी बटाटयाची भाजी, घरच्या सारखी डाळ होती. आज इथल्या मुक्कामात चौथ्या दिवशी पहिल्यांदा ताटात पडलेलं सगळं पोटात गेलं होतं. आशा करत होतो की उरलेले दिवस ही असचं जेवणं भेटावं.

******

लोकशाहीत सगळी लोकं समान असतात फक्त काही विशेष असतात. एखादा राजकारणी येथे राहत असता तर त्यांना असं जेवण भेटलं असतं का? तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्हाला ही अशी वागणूक का? तुमच्या असण्या-नसण्याची काही किंमत आहे का नाही… इथली सरकारं कुणासाठी आहेत? गरीबाला वाली नसतो म्हणतात तेच खरं आहे का? का… आम्ही काळजी घेतोय हा देखावा सरकार करतयं? कधी कधी वाटायचं जर आपण श्रीमंत असतो तर या सगळ्या लफडयात पडलोच नसतो… अशी परिस्थती आली असती तर कोणत्यातरी ब-या हॉटेलात राहिलो असतो…. आणि मुळात श्रीमंत असतो तर झोपडपटटीत का राहत असतो. एक ना अनेक विचार मनात येत होते…. राहून राहून यावर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं ऑस्कर जिंकलेल्या ‘पॅरासाईट’ची आठवण येतं होती… त्यांच्या कथानकातलं श्रीमंताच घर… आणि त्या घरात कावेबाजपणे प्रवेश करणारे गरीब कुंटूब…

******

आमच्याच बापजादयाच्या स्वप्नाची राखरांगोळी करत, मिलच्या भोंग्यासकट मुस्कटदाबी करत… मॉलसंस्कृतीचा पाया रचण्यासाठी कामगाराच्या आयुष्याची थडगी रचून त्यावर आपल्या ‘चालू’ राजकीय अस्तित्वाची पोळी शेकणारी ही जमात… राजकारण्याची….. यांच्या राजकीय हव्यासापोटी ज्यांनी आम्हाला या शहरावर बलात्कार करण्यासाठी जमेल त्या इंचइंच मोकळ्या जागेवर झोपडं वसवण्याची मुभा दिली… पाणी पुरवलं… रेशनकार्ड दिलं… वोटिंग कार्ड दिलं… लोकशाहीचा उत्सवाचा भाग बनवलं… अश्या वस्त्याच वस्ता बनवल्या… त्यानाचं आज ‘शाप’ बनून ही अशी बजबजपुरी….वाढीव पेशंटसंख्या… पायाभूत सुविधाची वाणवा… यागोष्टीतून अतोनात सतवत आहे का?…. याला आपण या शहराने… इथल्या निर्सगाने… बदला घेतला असं म्हणायचं का?…

Building view 1

******

कधी कधी जगत असताना अचानक वाटत की हा जो प्रंसग आता माझ्या आयुष्यात आलायं याचं मला काही दिवसापूर्वीं स्वप्न पडलं होतं, आता तुम्ही स्वप्न आठवू पाहता पण ते तितकसं ठळकपणे आठवतं नाहीयं, पण डोकं बोलत असं काही स्वप्नच पडलं नव्हतं….. तुम्हाला भास होतोय…. तुम्हाला अशी स्वप्न मोठया संख्येने सततच पडत असतात… यातली काही-एक स्वप्न प्रत्यक्ष घटना बनल्यावर किंवा तसा भास झाल्यावर… पुढच्यावेळी आपण प्रत्येक स्वप्न लिहून ठेवू म्हणजे हा भास नव्हता असं डोकं जे सांगत ते खोटं ठरवता येईल असा निश्चय करतो…. पण अजून तसं प्रत्यक्ष करुन बघितलं नाही… आता जो मी या वनबीएचके रुम मध्ये आहे… त्याचं पण मला स्वप्न पडलं होतं…. असं सारखं वाटतयं.. त्यावेळी पडलेलं ‘वनबीएचके रुम’चं स्वप्न मी लिहून ठेवायला पाहिजे होतं असं वाटतं… मुळात स्वप्न हा काही गंभीरपणे घेण्याचा विषय नाही पण सारखे सारखे भास तरी कसे असतील असं वाटत राहतं. पण आता पुढच्यावेळी खरचं लिहिणं असा निर्धार केलाय.

******

सहाव्या दिवशी एरियातल्या एका ज्येष्ठ नागरिकाचं निधन झाल्याचं लोकांनी ठेवलेल्या व्हाट्सअँपच्या स्टेटसवरुन कळालं, दुस-या दिवशी कळालं त्यांच्या फॅमिलीला इथं आणून ठेवलयं…. बाप स्वर्गवासी…. आणि कुंटूब इथं कॉरन्टाईन सेंटरमध्ये… मरण्याअगोदर तोबा लोकं आले होते बघायला पण जसं कळलं… मेलेला माणूस करोना पॉझिटिव्ह होता…. मयत उचल्यायला माणूस भेटत नव्हता. आसपास राहणारे गायब झाले जेणेकरुन आपल्याला उचलून कॉरन्टाईन सेंटरला नेतील म्हणून…असं सगळं कानावर येतं होतं….

******

आता काही मित्रांना कळवलं इकडे पवईला आलो ते, काही जणांनी म्हटलं बरं झालं घरचं चौदा दिवसाचं रेशन वाचलं, लाईट बिल वाचलं….. मस्त वनबीचकेमध्ये राहायला भेटतयं… मजा कर… काही मित्रांनी त्यांच्या एरियात सुदधा असाच एकजण करोना पेंशट सापडला पण त्यांनी महानगरपालिकेच्या दवाखान्यात लेटर लिहून दिलं… की आम्ही स्वतःला होम कॉरोन्टाईन करुन घेतो… संडासची सोय…त्यांनी करतो म्हणून लिहलं लेटरमध्ये… पण कशी होणार नाहीयं हे त्या लेटर स्वीकारण्या-यांना पण माहित होतं… सगळीजण कागदी सोपस्कार पार पाडत होते… मित्र सांगत होता एके ठिकाणी पोलीसांना बोलवलं तरी देखील लोक सेंटरला गेले नाहीत…

******

आयुष्य अनुभवासाठी असतं, एकाच टाईपचं आयुष्य जगण्यात काय मतलब आहे, काही कारणामुळे का असेना हा जो अनुभव आला तो गाठीशी बांध… पुढे कुठेना कुठे… जरुर उपयोगी येईल. मनाला थारा देण्यासाठी मी हे असं सकारात्मक घोळायचा प्रयत्न करत होतो. जमेल तसा तिथल्या खिडकीतून बाहेर डोकावत मन रिजवत होतो…सरकारही काही जाणूनबुझून इथे आणून ठेवतयं का?.. नाही ना?.. त्यांच्याही काही मजबूरी असतीलच ना.. यंत्रणेवरचा ताण वैगेरे…वैगेरे…

******

मूळात आपण राहतोय त्या फ्लॅटची किंमत एक करोडच्या वरती असल्याचं ध्यानात आलं, आणि या जागेचे खरचं इतके असायला हवेत का असा प्रश्न पडू लागला, त्यापेक्षा कल्याण-डोबिंवलीत तीन बीएचके येईल् शिवाय पैशे उरतीलचे सल्ले येऊ लागले…. तिथं असलेली बहुतेक लोक म्हणत होती एवढी जरी जागा मालकीची झाली तरी मुंबईत आयुष्य काढल्याचं सार्थक होईल….

******

त्या खिडकी बाहेरच्या जागेवर कठडा टाईप जागेवर पान खाऊन थुकल्याचे डाग दिसून येत होते, इथ आपल्याला आणायला कश्याला यांची जरी जाणीव ठेवली असती तर हे असं करण्याची हिंमत झाली नसती, ईथे जर करोना पसरला तर हे असं खिडकी बाहेर थुकूंन नक्की एक कारण असणार…

Builidng View 2

******

इकडे आम्ही कॉरन्टाईन सेंटरला येऊन तीन दिवस झाले तरी ती करोना पेशंट सापडलेली रुम सॅनिटाईज झाली नव्हती, सार्वजनिक संडास देखील… महानगरपालिकेने ते करायला हवं होतं…इकडे सेंटरला आलेल्या लोकांनी यावरुन तिकडे चाळीतल्या पदाधिका-यांना खडसवायला सुरवात केली… तुम्ही ते गावावरुन आलेल्यांना काय चौकशी करुन चाळीत घेतलं.. असे सवाल उपस्थितीत करु लागले… यापुढे होणारी चाळीचीं मिटीगं तुफानी… आणि खंडाजंगीवाली होणारं यांत शंका नाही….

******

घरून लॅपटॉप आल्यामुळे वर्क फ्रॉम होम सुरू होतं. खऱ्या अर्थानं वेळ जात होता. घरी बघायला मिळणारे टीव्ही शो इथे शक्य नव्हतं. मोबाइलचा दोन जीबी कामावरच्या कामात आणि बाकी व्हॉटसअप, फेसबुक यांत संपून जाई. रात्रीची झोप ही इथे लवकर लागे आणि सकाळी उठणं ही लवकर होई…

******

आता सात दिवस झाले आणि लगेच खाली बोलवण्यात आलं करोना टेस्टसाठी, यांची तशीही उत्सुकता होतीच…नाकात काहीतरी टाकतात हे एवढया दिवसात ऐकून होतो.. खाली गेल्यावर एक फॉर्म भरण्यास सांगितला..तो भरला… आणि टेस्ट घेण्यासाठीच्या लाईनीत उभा राहिलो.. सोशल डिस्टनस लोक आपल्या आपल्या हिशोबाने पाळत होती. तरी पाऊण तास गेल्याच लाईनीत… टेस्ट म्हणजे काय तर नाकपुडीच्या टोकावरुन घशाजवळच्या भागाला टच करणारी काडी घुसवतात नाकातून, हे करण्यास एक सेकंद हा कालावधी लागतो. पण फॉर्मला बारकोड चिटकवणे सेम बारकोड काडी ठेवलेल्या परीक्षानळीला चिटकवणं या एकूण प्रकियेला साधारणत: एक मिनिटं इतका वेळ लागतो.. जर टेस्ट पॉझिटिव्ह निघाली तर लगेच फोन येईल जर निगेटिव्ह आली तर काही फोन येणारं नाही..तशी काही एक धाकधूक नव्हती… लक्षणचं नव्हती… फक्त ते नाकात घुसवल्यावर लोक कसं रिअक्ट करतात हे बघण्यात वेळ जात होता…शेवटी नंबर आला.. नाकातून केस काढल्यावर कसं डोळ्यातून पाणी येतं तसं फील झालं…

front view

******

हल्ली लॉकडाऊनमुळे ‘वर्क फ्रॉम होम’च्या कृपेमुळे मस्त दुपारची झोप घेता येते… आणि ईथल्या बिछान्यावर पडल्या पडल्या झोप लागते…. असाच डोळा लागला.. आणि बाजूच्या रुममधून क्रिकेटर सहज म्हणाला सुशांत गेला.. आत्महत्या केली…..मी म्हटलं केली असेल कुणीतरी… कानावर नुकतचं आलं…डोळ्यावर झापड होती… थोडयावेळाने जागा झालो आणि व्हाट्सअँप खोललं… आणि लोकाचें स्टेटस बघू लागलो… ज्यांच्या जगण्याचा हेवा वाटत होता आता त्यांचीच कीव येवू लागली… त्या एशियन पेटसच्या व्हेअर इज द हार्ट इज च्या सेकडं सिजनमध्ये त्यांच्या घराची झलक दाखवली होती, आपल्याला कधी असं घर स्वतःच्या हिमंतीवर घेता येईल, असा प्रश्न पडला होता, त्यांच्या घरात आकाशातले ग्रह-तारे बघण्यासाठी महागातली दुर्बीण होती… धक्का बसला.. सतत वाटत होतं असं नाही होऊ शकत.. मग मात्र त्यांच्या त्या चेह-याचे फोटो येऊ लागले…मनासारखं दुश्मन कोण नाय.. मनाचा काय थागपत्ताच नाय…..

******

दिवस नववा उजडला, आता ज्या कोरोना पेशंटमुळे आम्ही ईथे कॉरन्टाईन सेंटरला आलो होतो, तो बरा होऊन चाळीत आला होता, चाळीतल्या इतर लोकांच्या प्रतिक्रिया काहीश्या उग्र होत्या पण तसं कोणी बोलून दाखवत नव्हतं. आता दिवस दहावा उजाडला, आणि सकाळी दहाच्या सुमारास चाळीतून खबर आली की, ज्यांच्या घरात करोना पेशंट सापडला होता त्या बाई आणि तिचा मुलगा घरी आलेत. म्हणजे ज्यांच्यामुळे आम्ही ईथे होतो ते घरी पोचले आणि आम्ही मात्र चौदा दिवस ईथे राहायचं… हे अन्यायकारक होतं… मुळात त्या पेशंटची देखभाल करायला कोणी नव्हतं त्यामुळे तिने खाली बसलेल्या अधिका-याकडे टेस्टच्या रिपोर्टबाबत चर्चा केली, त्यांनी त्यांना जायची परवानगी दिली… यांचा अर्थ त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह होता. मग आमचा पण रिपोर्ट बघा आणि निगेटिव्ह असेल तर घरी जाऊ दयाची मागणी आम्ही खालती जाऊन केली. त्यांनी आम्हाला सांगितलं त्या बाईच्या घरी अरजन्सी होती, तुम्ही संध्याकाळपर्यंत थांबा आम्ही डाटा सोर्टिग करतोय, मग तुम्हाला कॉल येईल घरी जाण्यासाठी.

नंतर संध्याकाळी सहा वाजता कळालं की आम्ही ईथून जाऊ शकतो, पण बस गाडी जी आम्हाला घेवून जायला आली होती ती कधी येईल ते सांगू शकत नाही, जर स्वतःहून जायचं असेल तर जाऊ शकतो. आता कशाला वाट बघायची गाडीची….. जायचं निघून.. ठरवलं.. पक्क् झालं… सगळं सामान घेतलं.. खिडक्या बंद केल्या… दाराला कढी लावली… घरी जायची उत्सुकता प्रचंड होती, खालती आलो, आता एक नवीन प्रश्न उभा राहिला, तुम्ही फोन करुन किंवा अन्य मार्गानें म्हणजे ओला-उबर करुन इथें खालती नोंदणी कक्षासमोर गाडी आणायची, मग तुमच्या नावासमोर रुम नंबरसकट सगळी माहितीची पडताळणी झाली की, पुन्हा एकदा होम कॉरन्टाईनचा स्टॅम्प मारणार… तो कश्यासाठी ते सांगितलं गेलचं नाही….. तुम्ही गेटच्या बाहेर जाऊन आत गाडी आणू शकत नाही, किवां तुम्ही गेट बाहेर चालतही जाऊ शकत नाही… हा कोणता तुघलकी नियम बनवून ठेवला होता देव जाणे.. मुळात एखादयाला उबर ओला वापरता येत नसेल त्यांने काय करावं… फोन करुन असं घरुन कोणता रिक्षावाला इथं येणारं लगेच… आणि का म्हणून यांची बसगाडी येण्याची वाट बघत थांबायचं….त्यात ही ओला-उबरच्या गाडयामध्ये फक्त दोनच पॅसेजर घेऊ शकत होते… तो अजून एक लोचा.. पाऊण तास झाला ओलाच भेटत नव्हती… आता नुसतं तिथं खालती तातकळत उभं राहणं चाललं होतं.. संध्याकाळचे सात वाजले होते, जेवणाचे ट्रे आलेले दिसले.. एक तिथंच खाली सहज आलेल्या माणसाला बोलवून त्या तिथल्या नोंदणी कक्षातल्या अधिका-याने त्या एका जेवणाचा ट्रे खोलून या माणसासं जेवण चाखण्यास सांगितलं.. आणि जेवण कसं आहे असं विचारलं.. आणि त्यांच्या उत्तराचा व्हिडिओ बनवून.. तो बहुतेक त्यांच्या वरिष्ठांना पाठवला.

इकडे ओलाच्या डाईव्हरला इथलं लोकेशनच कळतं नव्हतं.. त्यात आपण गेटबाहेर जाऊ नये हा यांचा नियमही पाळायचा होता.. शेवटी एकदाचा तो ओलावाला आला..मग त्यां नोदणी कक्षातल्या अधिका-यांनी आम्हाला स्टॅम्प मारला आणि आम्ही तिथून निघालो.. साठा उत्तराची कहाणी सुफळ झाली.. एकदाचा मुक्काम संपल्याची जाणीव झाली.. आज कितीतरी दिवसानंतर… बाहेरची माणसं, गाडया बघत होतो.. मेट्रोची काम सुरु होती… जून महिना मध्यावर असून देखील पाऊसाचा मागमूस नव्हता.. रस्ते त्यामानाने ओसाडच होते… अर्ध्या तासाने घ्ररी पोचलो.

******

आल्यावर काही लोकांनी चौकशी करायच्या उददेशाने आपुलकीने विचारताच, तुम्ही आम्हाला सेटरला असताना का नाही एकदा पण फोन केलात अश्या उलटया प्रतिप्रश्नाने केला. आता होऊ दे ना चाळीची पुढची मिंटिग नाय ना एक-एकला झाडून काढतो बघाच.. इतक्या दिवसाचा सगळा राग निघू लागला… आता तो बरा झालेला पेशंट आपली कहाणी अजून रंगवून सांगू लागला.. कसा त्याला मलेरिया झाला होता.. त्याने टेस्ट केली वैगेरे… वैगेरे…

******

त्यानंतर या उपनगरात करोना अजूनच वाढला, हे आता मुंबईतला चौथ्या क्रंमाकाचं उपनगर करोना पेशंटच्या बाबतीत झालं…लोकांचे खाण्या-पाण्याचे वांदे अजून वाढले… मुलांच्या आनलाईन शाळा, त्यासाठीचं इंटरनेट, वाढती लाईट बिल… रोजचे प्रश्न अजूनच गुंतागुंतीचे बनत गेलेत…

आणि तसंही तो काही तितकासा गंभीर आजार नव्हता, फक्त मधुमेह आणि दमा पेशंटना काळजीच कारण होतं असं सांगितलं जात होतं. तरीदेखील मनात येणारी अकारण भीती काही केल्या रोखता येत नाही. सतत हा प्रश्न मनात येतचं राहतो.. मला करोना झाला तर….?

******

जगणं म्हणजे काय? आपली जगण्याची नेमकी धडपड कश्यासाठी?

काही दिवसापूर्वी फेसबुकवरील एका ‘सिनेमा’ला वाहिलेल्या ग्रुपवर जेष्ठ समीक्षक अशोक राणे यांच्या ‘फेसबुक लाईव्ह’ सेशन मध्ये त्यांनी ‘Turin Horse’ नावाची युटयूबवर उपलब्ध असलेली एक फिल्म पाहण्यासाठी रेकमेंड केली. 2011 ची फिल्म असूनही ती ब्लॅक अँड व्हाईट मध्ये होती, वादळामुळे घरात बंदिस्त झालेल्या वयोवृद्ध बाप आणि त्याच्या मुलींची, एकसारखेच वाटणा-या पाच दिवसांच्या एकूण दिनक्रमाची ही गोष्ट. नेहमी मसालेदार व्यवसायिक सिनेमा पाहण्याची आवड असलेल्यांच्या संयमाचा अंत पाहणारी, माझा ही, मला फिल्म डोक्यावरून गेली, मग विकिपीडिया वर फिल्मबदल वाचलं, त्यात माणसाच्या रोजच्या त्याचं त्याचं पद्धतीने जगण्याच्या निरर्थक धडपडी बदल भाष्य करण्यात आलं होतं असं समजलं. एका क्षणाला चित्रपट प्रचंड बोअरिंग वाटला आणि दुसऱ्या क्षणाला आपण देखील असचं तर जगतोय या साक्षात्कारनं अंगावर काटा उभा राहिला.

फिल्मची लिंक :-Turin Horse

******

कसे आहात जगताय ना!… जगायलाच पाहिजे… जगताना येणारा बरा-वाईट प्रत्येक अनुभव मला घ्यायचायं… मला माहितयं मी इथलाचं आहे आणि इथेच राहणार आहे.. फक्त माझ्या अस्तित्वाच्या खुणा बदलतील.. मी जीव नसेन… मला ही जी जाणीव आता आहे…स्वतः बदलची.. जगा बदलची… अवकाशाबदलची… ती नसेल…मी मेल्यानंतर…… कुणी सांगितलं मरणाचा अनुभव नाही घेता येतं….मी अनुभूती घेत आहे. हा जो मी श्वास घेतोय…ती संधी मला नंतर नाही…मग मी का अंत करु असा स्वतःचा….पण अंत असं काही नाहीच आहे.. सगळं अंनत आहे…. मग मी का वाईट वाटून घेवू.. स्वतःला संपवून टाकून… पण असं स्वत: असा नाहीच आहे… फक्त शरीर तर राहणार नाही… मी वेगळाच राहीन तरीसुदधा….

जगात असचं का होतं की जे तुम्ही अपेक्षित केललं नसतं ते… जर मी वाईटातली वाईट गोष्टीची अपेक्षा केली तर जगात सगळं चांगल होईल का?… त्या माईन्स प्ल्स माईन्स ईक्वल टू प्लसच्या नियमासारखं… खरचं कोणी विधाता आहे का.. आपण नुसतेच अकारण आहोत का? सगळं पहिल्यापासून ठरलेलं आहे का?

मला हे स्वप्न पडलं होत का? त्यांचा तो आता शेवटचा रिलिज झालेला सिनेमा पाहिल्यावर…मी आठवू पाहतोय… मन म्हणतयं… स्वप्न आहे… डोकं म्हणतयं… भास आहे…. खरचं लिहायला हवं होतं…स्वप्न

******

समाप्त

https://lekanwala.home.blog

–लेखनवाला

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )

जीवनमानलेखबातमीअनुभवमतशिफारस

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

13 Jul 2020 - 1:32 pm | चौथा कोनाडा

वाचताना अंगावर काटा आला ! जबरदस्त ओघ आहे ! वाचताना काय वाटलं शब्दात सांगणं अवघड आहे ! सुन्न व्हायला झालं !
‘Turin Horse’ नक्की पाहीन, संयमाने, तास माझा संयम बरा आहे असे सिनेमे पाहण्याच्या बाबतीत !
एक डॉक्टरीण युवती पॉसिटीव्ह सापडली म्हणून आमची बिल्डिंग सील केली. वाहने बाहेर काढता येत नाहीत या व्यतिरिक्त काही त्रास झाला नाही, खूप अर्जन्सी झाल्यावर थोड्या क्लुप्तीनं दुचाकी बाहेर काढून सोय केली ! इतरांनाही आमची दुचाकी वापरण्याची मुभा दिली !


कधी कधी जगत असताना अचानक वाटत की हा जो प्रंसग आता माझ्या आयुष्यात आलायं याचं मला काही दिवसापूर्वीं स्वप्न पडलं होतं, आता तुम्ही स्वप्न आठवू पाहता पण ते तितकसं ठळकपणे आठवतं नाहीयं, पण डोकं बोलत असं काही स्वप्नच पडलं नव्हतं….. तुम्हाला भास होतोय…. तुम्हाला अशी स्वप्न मोठया संख्येने सततच पडत असतात… यातली काही-एक स्वप्न प्रत्यक्ष घटना बनल्यावर किंवा तसा भास झाल्यावर… पुढच्यावेळी आपण प्रत्येक स्वप्न लिहून ठेवू म्हणजे हा भास नव्हता असं डोकं जे सांगत ते खोटं ठरवता येईल असा निश्चय करतो…. पण अजून तसं प्रत्यक्ष करुन बघितलं नाही… आता जो मी या वनबीएचके रुम मध्ये आहे… त्याचं पण मला स्वप्न पडलं होतं…. असं सारखं वाटतयं.. त्यावेळी पडलेलं ‘वनबीएचके रुम’चं स्वप्न मी लिहून ठेवायला पाहिजे होतं असं वाटतं… मुळात स्वप्न हा काही गंभीरपणे घेण्याचा विषय नाही पण सारखे सारखे भास तरी कसे असतील असं वाटत राहतं. पण आता पुढच्यावेळी खरचं लिहिणं असा निर्धार केलाय.

हे वाचल्यावर वाटलं, मी घराच्या बाबतीत किती नशीबवान आहे !
लेखनवाला, तुमच्या लेखनप्रतिभेला सलाम _/\_

लेखनवाला's picture

13 Jul 2020 - 4:25 pm | लेखनवाला

प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

रातराणी's picture

14 Jul 2020 - 12:44 pm | रातराणी

हा स्वप्न भासाचा भाग लिहलात त्याला _/\_

इतकं वास्तवदर्शी काही बरेच दिवसात वाचलं नव्हतं. धन्यवाद.

तुषार काळभोर's picture

14 Jul 2020 - 6:38 pm | तुषार काळभोर

+१
लेखन अतिशय उत्कृष्ट ...
हा अनुभव मिळू नये, अशी प्रार्थना करतो.

मुंबईच्या चाळीचा अनुभव काही दिवस घेतल्याने तुमची अडचण लगेच समजली. तुमच्या घरातील इतर व्यक्तींचा उल्लेख नाही. का तुम्हाला एकट्यालाच क्वारंटाईन केले होते?

पुण्यातही थोड्याफार फरकाने क्वारंटाईन सेंटरचा असाच अनुभव एका मित्राकडून ऐकायला मिळाला होता. त्याच्या घरातले सगळे लोक वेग वेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन झाले होते. म्हणजे आई वयस्कर असल्याने आणि पॉझिटीव असल्याने हॉस्पिटल मधे, बहिण वेगळ्या सेंटर मधे आणि तो स्वतः एका वेगळ्या ठिकाणी होता. सुदैवाने सगळेजण १४ दिवसांनी सुखरुप परत आले. पण त्या काळात त्याची चाललेली तळमळ ऐकवत नव्हती. बिचारा रोज फोन करायचा आणि तासभर बोलत बसयचा, फोन कटही करवायचा नाहीआणि त्याचे ते रडगाणे ऐकवायचे पण नाही. पण मी दिलासा देण्याशीवाय काहीही अधिक करु शकत नव्हतो.

बाकी हा सगळा खेळ अजून किती दिवस चालणार आहे कोण जाणे

तुमची लेखन शैली आवडली लिहीत रहा.

पैजारबुवा,

लेखनवाला's picture

13 Jul 2020 - 4:25 pm | लेखनवाला

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. एकटा नव्हतो,पण ते जरा जास्तचं पर्सनल होईल म्हणून टाळलं किंवा मग त्यावर वेगळा लेख लिहावा लागेल.

जरासा उशिराने का होईना मिपावर प्रत्यक्ष अनुभवाचा लेख आला. -लेखन अर्थातच भावले. अशी प्रत्यक्ष अनुभवांची माहिती अधिक कव्हर होण्याची गरज होती आणि आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jul 2020 - 6:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन अतिशय तपशीलवार केलंय. एखादं डॉक्युमेंट्री पाहतोय असा भास झाला इतकं उत्तम चित्रण. भारतातंल अगदी वास्तवातलं अगदी थेट स्वरुप आपल्या अनुभवामुळे पाहता आलं. आपण सुखरुप आहात हे वाचून छान वाटलं. आजूबाजूचा परिसर, लोकांचं वर्तणू़क, अडचणी, सरकारी कारभार पण तरीही व्यवस्था काहीतरी करीत आहे, असे वाचून वाटले. शहरातली भरमसाठ लोकसंख्या, अपुर्‍या आरोग्याच्यासोयी हे सर्व असून एक व्यवस्था आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करीत आहे असे वाटले. इतक्या लोकांची सोय करायची म्हटलं की असंख्य अडचणी या येणारच.

आजही घरोघर जाऊन सर्व्हे करणार्‍यांना लोक सहकार्य करीत नाही. माझे काही प्राध्यापक सध्या शहरात सर्व्हे करीत आहेत. लोक माहिती देत नाहीत. खोटे माहिती देतात हेही होत आहेच. टेष्ट करायला नकार देतात.दवाख्यान्यात गेलो तर आपल्याला संसर्ग होणार तर नाही ना, असे अनेक प्रश्न असतात आणि असे प्रश्न मनात येणे आपली सर्व व्यवस्था पाहता चूक नाही असे वाटते.

आपलं लेखन वाचून अनेक प्रश्नांचं काहून मनात उमटलं. आपण उत्तमपणे चित्रण करुन लेखन अनुभव शेयर केल्याबद्दल मन:पूर्वक आभार. काळजी घ्या. लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

अनिंद्य's picture

13 Jul 2020 - 7:24 pm | अनिंद्य

आवडले असे तरी कसे म्हणू ?
प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागला पण सुखरूप आहात, इथे लिहिलेत त्यामुळे एकूण व्यवस्थेची कल्पना आली.

माझी एक मैत्रीण सध्या आजारी सासरे एकटे दवाखान्यात, सासू दुसरीकडे, नवरा, मुलासह स्वतः घरातच स्थानबद्ध असा अनुभव घेत आहे. करोनाची विपत्ती कधी आटोक्यात येईल कोण जाणे.

स्वतःची काळजी घ्या आणि लिहिते राहा.

प्रमोद देर्देकर's picture

13 Jul 2020 - 9:43 pm | प्रमोद देर्देकर

जबरदस्त अनुभव.

भीमराव's picture

13 Jul 2020 - 10:26 pm | भीमराव

संपादक, हे वर शिफारशी मधे टाका राव.

लेखक महाशय, तुम्ही समोर बसून सांगितले आहे असं वाटलं वाचताना.

सिरुसेरि's picture

14 Jul 2020 - 7:20 pm | सिरुसेरि

वास्तवदर्शी अनुभव कथन .

एखादं डॉक्युमेंट्री पाहतोय असा भास झाला इतकं उत्तम चित्रण.

बिरूटेसरांशी सहमत! वास्तवदर्शी लेखन आहे!!

- (एकेकाळी चाळीत राहिलेला) सोकाजी

झेन's picture

14 Jul 2020 - 12:19 pm | झेन

प्रा. डॉं. शी सहमत, पुढे जाऊन असे म्हणेन की डिझ्यास्टर मॅनेजमेंटसाठी सरकारी किंवा गैरसरकारी संस्थाना संदर्भासाठी उपयोगी पडेल असे चित्रण. वास्तवदर्शी आणि खोटा अभिनिवेश नसलेले शब्दचित्र.
स्वतःची काळजी घ्या आणि वरचेवर लिहा तुमची शैली आवडली.

तिमा's picture

14 Jul 2020 - 7:05 pm | तिमा

लेख उत्कृष्ट झालाय. पण सुरवातीचं वाक्य एडिट करायला हवं आहे.

जसं रामाला रावणाने मारलं,

हे जरा नजरेला त्रास देतंय!

लेखनवाला's picture

14 Jul 2020 - 8:22 pm | लेखनवाला

लक्षातच नाही आलं, बरं झालं निदर्शनास आणून दिलंत. करतो. मिपावर लेख एडिट कसा करायचं?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2020 - 8:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपणास लेखनात काही बदल करायचे असल्यास प्रशांत सर यांना व्य.नि. करा.
आपणास मदत करतील.

-दिलीप बिरुटे

कुमार१'s picture

14 Jul 2020 - 9:05 pm | कुमार१

वास्तवदर्शी अनुभवकथन .

वीणा३'s picture

15 Jul 2020 - 1:37 am | वीणा३

पहिल्यांदीच कोणाचातरी प्रत्यक्ष अनुभव वाचत्ये करोना सेंटर बद्दल, आवडला म्हणवत नाही, पण तुमची लेखनशैली छान आहे. लिहीत राहा.

अनुभव मांडल्याबद्दल धन्यवाद पु ले शु
माझ्या नातलगाचा अनुभव थोडाफार सारखाच आहे पण त्याला करोना झालेला होता त्यामुळे थोडाफार फरक
स्वच्छतागृहाचा त्याचा अनुभव चांगला नव्हता पण जेवण सर्व वेळेचे व्यवस्थित होते

सुमो's picture

15 Jul 2020 - 4:43 am | सुमो

छान.