माझं नाशिक

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
6 Jul 2020 - 10:39 pm

माझा जन्म नाशिकचा. अशोकस्तंभाजवळच्या कुठल्याश्या हॉस्पिटलात माझा जन्म झाला. ४१२, वकीलवाडी हे माझं आजोळ. तिथं मामाचं कुटुंब आणि आजी आजोबा राहायचे. ४१२ चं घर भाड्याचं. जुन्या पद्धतीचं वाडावजा घर. त्यात बरेच भाडेकरु असंत. मुख्य दरवाजातून आत शिरताच एक अंधारा बोळ, त्यातून बाहेर पडल्यावर चौक, तिथून करवादत्या लाकडी जिन्याने वर जाताच दुसर्‍या मजल्यावर मामाचं घर. पुसटसं आठवतंय आता. बाहेरची मुख्य खोली, माजघर आणि रस्त्याकडेला उतरत्या कौलांनी निमुळती झालेली एक माडी. दिवाळीत, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी नाशिकला जायचा. कधी आईवडीलांबरोबर तर कधी मामांसोबत. त्या घरातली माडी ही माझी आवडती जागा. माडीसमोरच अशोकस्तंभाकडे जाणारा रस्ता होता. रस्त्याच्या कडेलाच मारुतीचं लहानसं देऊळ. माडीतल्या खिडक्यांतून ते लहानसं देऊळ थेट दिसायचं, समोरच्या रस्त्यावरची वर्दळ रात्री अगदी शांत होऊन जायची. दिव्यांच्या पिवळट झिरपणार्‍या प्रकाशात रात्री खिडकीतून ते देऊळ बघत बसायला मौज वाटायची. उन्हाळ्याच्या दिवसांत मामा कधीमधी कुल्फ्या घेऊन यायचा.

४१२ च्या डावीकडील रस्ता काटकोनात एक वळण घेऊन वळायचा तो पंचवटी हॉटेलच्या गल्लीत यायचा. तिकडून बाहेर पडलं की मेहेरसमोरुन येणारा मुख्य रस्ता आणि तिथेच हुतात्मा स्मारक. पंचवटीत आम्ही कधीकधी जेवायला जात असू. ४१२च्या उजवीकडील रस्ता निघायचा तो तांबट आळीत, भांड्याची असंख्य दुकाने तिथे असायची, तांब्याची भांडी मिळणारी तर अधिकच, तिथे सदान् कदा तांब्यांच्या भांड्यांना ठोके मारत असलेला घण्ण घण्ण असा आवाज येत असे. तांबट आळीतून रविवार कारंजाला जायचा रस्ता होता. वाटेत माधवजी का बढियाचे चिवड्याचे दुकान होते. त्याच्या जवळच माझी मोठी मावशी राहायची. पुढे गेल्यास दुकानांच्या रांगेतच वणीच्या सप्तशृंगीची प्रतिकृती असलेली मूर्तीचे दुकानातच निर्माण केलेले देऊळ होते, अजूनही असेल. ही भव्य मूर्ती काच लावून बंदिस्त केलेली होती. तिथून पुढे जाताच येई रविवार कारंजा अर्थात आर के. हा नाशिकचा प्रसिद्ध चौक. शहरातला अगदी मध्यवर्ती भाग. दुसरा मध्यवर्ती भाग असे तो म्हणजे पंचवटी कारंजा. रविवार कारंजाला जरी आर के हे नाव पडले होते तरी पंचवटी कारंजा मात्र पंचवटी ह्या नावानेच ओळखला जाई.

माझा दुसरा मामा पंचवटीच्या जवळ मखमलाबाद नाक्याजवळ हेमकुंज इथ राहात असे. ती पण एक लहानशी अशी कॉलनीच होती. सुरुवातीला एक लाकडाचा वखारवजा कारखाना, मग मालकाचा बंगला आणि चाळीसारखी काही भाड्याची घरे आणि मध्ये मोकळी झाडोर्‍याने भरलेली जागा. तिथं मी नेहमीच जायचा. मामेभावाबरोबर गेलेले ते दिवस अजूनही आठवतात. जवळच्याच एका गोठ्यात आम्ही दूध आणायला जात असू, तिथं एक वर्कशॉपवजा कुठल्याश्या रसायनांचा एक कारखाना होता. त्याच्या पाठीमागेच एक खड्डा केलेला असे आणि काळपट चिकट रसायनांनी पूर्ण भरलेला असे. त्याला आम्ही डांबराचं तळं म्हणत असू. तिथून अजून थोडं पुढं गेल्यावर मावशीचं घर येई. मावशीच्या घरासमोरच भोकराचं एक झाड आणि त्यापलीकडे शेत. मी आणि भाऊ भोकर्‍याच्या झाडावर चढत असू आणि एखादं भोकर उचलून तोंडात टाकत असू. दिसायला बोरासारखं असल्याने आम्हाला त्याचं आकर्षण असे मात्र तोंडात टाकताच त्याच्या कडवट चवीने आम्ही तोंड वेंगाडत असू.
मावशी कधीमधी भोकरांची भाजी करे. विशेष म्हणजे ह्या घरात माझ्या दोन मावश्या राहिल्या. तांबट आळीतील घर सोडल्यावर मोठी मावशी काही वर्षे इकडे होती, तिने ते भाड्याचे घर सोडल्यावर त्याच जागेत माझी दुसरी मावशी राहायला आली.

४१२ वकीलवाडीजवळच होते शालिमार. सीबीएस अर्थात सेन्ट्रल बस स्टॅण्ड वरुन सरळ येणारा रस्ता ह्याच चौकात येत असे. इथं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे. आम्ही मात्र त्याला जॅक्सन गार्डन ह्याच पूर्वाश्रमीच्या नावाने ओळखत असू. ह्याच कलेक्टर जॅक्सनचा वध हुतात्मा अनंत विष्णू कान्हेरे यांनी केला होता. ही बाग मोठी होती आणि दोन भागांनी मिळून बनलेली होती. एका भागात हिरवळ, फुलझाडे असंत, तिकडे आमचे आईवडील, मामा, मावश्या गप्पा मारत बसंत आणि आम्ही पोरं खेळण्यांच्या ठिकाणी हुंडदत, जंगल जिम, घसरगुंड्या, झोपाळे, जिराफ, झुलता पूल अशी नानाविध खेळणी तिथं होती. बरोबर मध्यभागी रॉकेट होते. ते दोन तीन थरांनी बनलेले होते. पहिल्या थरात घसरगुंडी होती, नंतर आतलीच शिडी चढून रॉकेटच्या अग्रभागी आम्ही येत असू. आतमध्ये दोन लोखंडी बाकडी होती. हा भाग आम्हाला खूपच उंच वाटत असे. इथून सगळ्या बागेचे विहंगम दृश्य दिसे. खेळून झाल्यावर भेळभत्ता आणलेला असे, तो खाल्ल्यावर काही वेळा तिथं जवळच असलेल्या उसाच्या गुर्‍हाळातला रस आम्ही पीत असू.

कालांतराने ४१२, वकीलवाडीतले भाड्याचे घर मामाने सोडले व त्याने सिडकोत त्याने स्वतःचे घर घेतले. दुसरा मामाही तिथून जवळच राहायला आला. सिडकोतल्या घरापासून पांडवलेणे जेमतेम पाचेक किमी अंतरावर होते. गॅलरीतून कोरीव लेण्यांची माळ अगदी सहजच नजरेस पडे. तिथल्या विहारांचे स्तंभ देखील अगदी स्पष्ट दिसत. आम्ही बरेच वेळा पांडवलेणीच्या बसने तिथं जात असू. खूप नंतर पायथ्याला दादासाहेब फाळके स्मारक बांधलं गेलं, इतकं देखणं स्मारक पण दोन तीन वर्षातच देखभालीअभावी त्याची दुरवस्था होत गेली. मी आणि मामेभाऊ काहीवेळा सायकलले तिथे जात असू. एकदा तर पाथर्डी फाट्यामार्गे देवळाली आणि तिथून भगूरला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान बघायला गेलो होतो.

नाशिकला गेलो आणि रामकुंडात डुंबलो नाही असे सहसा होत नसे. . तेव्हा रामकुंड खूपच स्वच्छही असे. कमरेइतक्या पाण्यात आम्ही डुंबत असू. रामकुंडाच्या मागील बाजूस गांधी तलाव मात्र खोल असे, तिथे आम्ही अभावानेच डुंबलो. गांधीतलावातूनच रामकुंडाच्या पुढील पात्रात एक मोरी काढली होती. तिथून पाण्याचा फुफाटणारा प्रवाह बघण्यात मौज वाटे. रामकुंडातच पोहत असताना पायात काहीतरी टोकदार वस्तू घुसली होती तेव्हा मुंदडांच्या दवाखान्यात दोन टाके घातले होते हे आजही आठवते. दसर्‍याच्या दिवशी रावणदहनाचा कार्यक्रम गंगाघाटावर असे, ती फटाक्यांची रोषणाई एकदा पाहिली होती. नंतर गोदावरी अस्वच्छ होत गेली आणि आमचे गंगाघाटावर जाणेही कमी होत गेले. घाटावर अनेक मंदिरे होती. गंगा गोदावरी मंदिर, सांडव्यावरची देवी, दुतोंड्या मारुती, नारोशंकर मंदिर आणि तिथली भव्य घंटा. ही भव्य घंटा चिमाजीअप्पांनी वसईच्या स्वारीत जिंकून आणली होती. नारोशंकराचे मंदिर अतिशय देखणे आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेवर पाणी आले म्हणजे पूर आला तर नारोशंकराच्या घंटेला पाणी लागल्यास महापूर आला असे नासिककर म्हणतात. महापुराचे अजून एक परिमाण म्हणजे सरकारवाड्याच्या पायर्‍यांना पाणी लागणे. रविवार कारंजा आणि पंचवटी कारंजा ह्यांना जोडणार्‍या नाशिकच्या प्रसिद्ध व्हिक्टोरिया पुलाला लागूनच सुंदरनारायणाचे अप्रतिम मंदिर आहे. तिथं आम्ही बरेचदा जात असू. व्हिक्टोरिया पूल ओलांडल्यावर एक रस्ता नाशिकच्या सुप्रसिद्ध काळाराम मंदिरात जाई. वाटेत सीतागुंफा असे. अरुंद अशा दगडी जिन्याने बसत बसत गेलं की सीतामाईच्या मंदिरात प्रवेश होई. दर्शन घेऊन वर आलं की रस्ता सरळ काळाराम मंदिराच्या आवारात जाई. जवळच कपालेश्वर मंदिरही होते. काळाराम मंदिर हे चहूबाजूंनी दगडी भिंत असलेले भव्य मंदिर. मंदिराचे दगड दुधात उकळून मंदिर बांधले असे म्हणतात. मंदिर अतिशय देखणे. मंदिराच्या पुढ्यातच हनुमान मंदिराचा मंडप. हनुमानाची मूर्ती थेट रामाच्या समोर. हनुमानाच्या मूर्तीच्या बाजूने पाहिल्यास मंदिरातील काळा राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती दिसत. रामाच्या मंदिरात जायला १४ पायर्‍या असंत, ते म्हणजे १४ वर्षाच्या वनवासाचे प्रतिक. नाशिकला गेलो आणि काळाराम मंदिरात गेलो नाही असं सहसा होत नसे.

नाशिकहून बरेचदा वणीच्या सप्तशृंगीला जाणं होई. सप्तशॄंगीच्या पायथ्याशी नांदुरी हे गाव, तिथून वणीला जायला मिनीबस असंत, एकदोनदा नांदुरीहून पायवाटेनेही सप्तशृंगीला गेलो होतो. मिनीबसने जात असतात पायवाट तीनचार ठिकाणी रस्त्याला छेदून जात असे. सप्तशृंगी देवी कड्यात वसली होती. सरळसोट उत्ताल कडा, कड्यातच मातेचं मंदिर. पाचेकशे पायर्‍या चढून आम्ही जात असू. देवीची शेंदुर लावलेली मूर्ती अतिशय भव्य, तिरकी मान, ताणलेले डोळे, अठरा हात. देवीच्या समोरच मार्कण्डेय गड होता, त्याच्या बाजूला रवळ्या जवळ्या, धोडपच्या खाचेचे दर्शन होई. आख्खी अजिंठा सातमाळ रांग तिथून खूपच सुंदर दिसे. खाली गावात बरेचदा बकरे बळी द्यायला आणलेले दिसत, हल्ली हे होत नाही. दर्शन घेऊन आल्यावर शीतकड्यावर जात असू, तिथून मार्कंण्डेय अगदीच समोर दिसे. तिथूनच एक अवघड पायवाट सरळसोट कड्याला लगटून खाली उतरे आणि सप्तशृंगी आणि मार्कंण्डेयाच्या खिंडीत जाऊन मार्कंण्डेय गडावर चढे.

नाशिकचं खास वैशिष्ट्य म्हणजे तिथली म्हसोबाची स्थाने. नाशिक अतिशय जुनं असल्याचा फिल ही स्थानं देतात. सुरुवात होई नाशिकरोडच्या घंटी म्हसोबा देवस्थानाने. एसटीतून येता जाता दिसणारे मंदिर त्याच्या मंडपात बांधलेल्या शेकडो, हजारो घंटांमुळे लक्षवेधी असे, इथे असंख्य भाविक नवस करीत आणि नवसाची पूर्तता घंटादानाने होई. ह्या असंख्य घंटा ह्या मंदिरात टांगलेल्या असंत. तुलनेने हे मंदिर मात्र अलीकडचे मात्र जुन्या नाशकात रस्त्यालगत म्हसोबाची असंख्य स्थाने दिसत, आजही दिसतात. भिंतीवर कोरलेले रेड्याचे मुख आणि त्याच्या आजूबाजूला त्रिशुळ, दंड. इतर कुठल्याही शहरात अशी स्थानं मी पाहिली नाहीत. म्हणजे म्हसोबा तसे सर्वत्रच दिसतात पण रेड्याचे मुख फक्त नाशकातच.

नाशिकला गेलो की बरेचवेळा सोमेश्वरला जाणं व्हायचं. सर्व नातेवाईक निघत. घरुन आणलेला डबा सोबत असे. वाटेत गोदावरीकाठचे नितांत सुंदर नवश्या गणपतीचे मंदिर असे. मंदिरात जाऊन आम्ही पुढे सोमेश्वरला जात असू. तिथं मग दर्शन मग वेगवेगळे खेळ खेळणे आणि सोमेश्वरचा धबधबा पाहणे असे कार्यक्रम होत. नदीच्या प्रवाहाने दगड कातून सोमेश्वरच्या घळी निर्माण झाल्या होत्या. पावसाळ्यात याचे अत्यंत रौद्र दर्शन होई. बरेचदा देवळाई कॅम्पलाही जाणे होत असे. तिथं गेलो की खंडोबाच्या टेकडीवर चढून सूर्यास्त बघणे आणि नंतर कॅम्पात फिरणे होत असे. देवळाई कॅम्प एकदम आखीवरेखीव होता. सरळ रेषेत दुकाने आणि त्याला छेदणारे समांतर रस्ते. स्वस्त आणि चित्रविचित्र वस्तूंच्या दुकानांमुळे इकडेतिकडे बघत कॅम्पात फिरायला मजा येई.

मी आणि भाऊ बरेचदा नाशिकच्या मेनरोडवरुन हिंडत. नाशिकचा मेनरोड म्हणजे एकदम भारी. दुतर्फा विविध दुकानं व त्याला लंबाकार असणारे सर्व रस्ते गंगाघाटावर जात. एकदा असेच कुठलातरी सिनेमा पाहू म्हणून मेनरोडच्याच मधुकर टॉकिजला आम्ही टर्मिनेटर-जजमेन्ट डे पाहिला तो ९० च्या दशकात. क्वचित अशोकस्तंभाजवळच्या चित्रा, विकास या थिएटर्समध्ये देखील सिनेमे पाहणे होई. रविवार कारंजापासून सुरु होणारा मेनरोड भद्रकालीजवळ संपे, तिथून रस्ता वळून शालिमारला येई.

नाशिकची खाद्यसंस्कृती हा वेगळाच विषय. नुसत्या मेनरोडवरही खाण्यापिण्याची चंगळ असणारे स्पॉट्स असंत. सुरुवात होई ती आरकेवरील अननसाच्या सरबताने. तिथं एका हातगाडीवर हे सरबत मिळे. अत्यंत चविष्ट,सरबतात अननस आईसक्रीमचा गोळा टाकला जाई. आता ह्या हातगाडीचे दुकान आले आहे. पुढेच सुरती मिठाईवाल्याचे दुकान असे. आतल्या बाजूस बसायला बाकडी टाकलेली असंत, तिथे कढीभेळ मिळे. हा एकदम स्वादिष्ट प्रकार होता. मेनरोडवरच माधवजी, मकाजी, कोंडाजी अशा चिवडेवाल्यांची दुकाने असंत मात्र खरी मजा यायची ती भद्रकालीजवळच्या मकाजी पहिलवानाच्या दुकानात. इकडचे वैशिष्ट्य म्हणजे इथे जागेवर बसून चिवडा खाता येई. दुकानात खुर्च्या टेबलं होती. अर्धाशेर गरमागरम ताजा चिवडा मागवायचा. सोबत कांदा, लिंबू, कोथिंबीर असे. लैच जबरी लागायचा तो. भद्रकालीलाच बुधाची फेमस जिलेबी मिळायची. जिलबी मात्र विशेष आवडता प्रकार नसल्याने मी त्याच्या वाटेला फारसा जात नसे. तिथून जळच सायंतारा साबुदाणावड्याचे दुकान होते, अजूनही आहे. इथल्याइतका खुसखुशित साबुदाणावडा मी दुसरीकडे कुठेही खाल्ला नाही. इथे कायम वड्यांसाठी रांगा असतात. एका प्लेटीत दोन वडे घेऊन वडेवाला शेंगदाणा, तिखट आणि दह्यापासून बनवलेली भरपूर चटणी प्लेटीत ओतायचा. ती चटणी प्लेटभर पसरत असे. तिचा आकार आणि रुप पाहून आम्ही त्या वडा प्लेटीला उलटीवडा म्हणत असू मात्र ती भयंकर टेस्टी असे.

मेनरोडलाच पांडे मिठाईवाल्याचे दुकान होते. त्याची अजून एक शाखा पंचवटीत आहे. लस्सी प्यावी ती पांडेचीच. इथली लस्सी पिता येते हे तिचे वैशिष्ट्य. इतर ठिकाणांसारखी ती चमच्याने खावी लागत नाही, पातळ श्रीखंडासारखी ती लागत नाही, जेलीसदृश दिसत नाही. इथला जंबो ग्लास जवळपास अर्ध्या लिटरचा असावा. लस्सी किंचित अगोड वर मलईचा गोळा. पांडेकडची मलई बर्फी तर लैच जबरी. केळीच्या पानावर बर्फी वाढून तो द्यायचा. शालिमारपासून जवळच असलेल्या नेहरु उद्यानाच्या समोर असलेली शौकिन भेळपुरी तर लाजवाब. शौकिनइतक्या वेगाने भेळ बनवणारा अजून कोणी मी तरी पाहिला नाही. पातेल्यात भेळ झटपट तयार करुन विद्युतवेगाने तो कागदाच्या पुड्यात भरे व त्यावर बारीक शेव पसरे. मात्र भेळेपेक्षाही इथली पाणीपुरी जास्त भन्नाट असे. बर्फ टाकून बनवलेले चिंचेचे थंडगार पाणी आणि त्यावर बटाटा कुस्करुन केलेला मसाला. सर्वसामान्यांसाठी नॉर्मल पाणीपुरी मिळे मात्र पट्टीच्या खवय्यांसाठी इथली झटका पाणीपुरी खूपच फेमस असे. शौकिनने त्याचे मायक्रो, मिनी आणि मेगा असे तीन प्रकार पाडले होते. बटाटा कुस्करुन तो त्याचा खास चाट मसाला त्यात मिसळे आणि भरपूर लाल तिखट टाकत असे. तो गोळा एकत्र करुन पुरीत चिंचेचे थंडगार पाणी करुन त्यावर त्या ढिगाचा डोंगर पसरे. डोंगराच्या चढत्या आकाराप्रमाणे त्याचे मायको, मिनी, मेगा असे प्रकार होत. मेगा झटका भलतीच जहाल असे. एक पाणीपुरी खाल्यावरच नव्यांचे कान अगदी बधिर होत जात. मेगावाल्यांना तो आधी विचारे ,"तुम्ही उद्या गावाला तर जात नाही आहात ना? तरच खा". भलेभले एका पाणीपुरीतच गारद होत असत. मग तो स्वत:हून सौम्य पाणीपुरी देई. काही पट्टीचे मात्र सहाच्या सहाही मेगा झटका पुर्‍या खात. माझ्यासाठी एक झटका पुरे होई. हा झटका बसल्यानंतर ह्याचे परिमार्जन करण्यासाठी राउतला जाणे गरजेचे होई. भद्रकालीच्या समोर असलेल्या राउतकडे सोड्याचे विविध प्रकार मिळत. त्यातला डबल जीरा मसाला सोडा आमच्या खास आवडीचा. हा एकदम सुपरस्ट्राँग सोडा होता. नाकातून झण्ण्ण् झिणझिण्या निघत. ते फिलिंग एकदम जबरी वाटे. मेनरोडलाच अकबर सोडेवाल्याचेही हॉटेलवजा दुकान होते, त्याच्याकडेही सोड्याचे भरपूर प्रकार मिळत पण राऊत सोडेवाल्याची चव त्याला नाही.

नाशिकला जाणे आणि अंबिकाची मिसळ चुकवणे म्हणजे महापाप. ही नाशिकची प्रसिद्ध काळ्या मसाल्याची मिसळ. अगदी सकाळपासून मिसळीसाठी तिथं रांगा लागत. जागा तुलनेने खूपच लहान. कशीबशी जागा मिळे, एका ताटलीत शेव, फरसाण, कांदा येई त्यावर काळा रस्सा पसरलेला असे शिवाय एक वाडगा भरुन रस्साही सोबत येत असे. एकदम चवदार मिसळ. ह्याच्या चवीमुळे हा मिसळीत झिंगे/सोडे घालतो अशी वदंता होई. म्हणून ह्याने नंतर चक्क दुकानात मिसळीच्या बोर्डावर शुद्ध शाकाहारी असे लिहिले होते. सातपूरला श्यामसुंदरची मिसळ फेमस असे, त्याकाळी तिथे मिसळीसोबत येणारे पाव भाजून मिळत, मिसळीपेक्षा ते आकर्षण जास्त असे. पाथर्डी फाट्यालगतच्या एका हॉटेलातही मिसळ चांगली मिळत असे. नाशिकचा कॉलेजरोड हा तिथला उच्चभ्रू परिसर, तिथल्या समोरासमोरील दोन मिठाईंच्या दुकानांत कचोरी-समोसा छान मिळत. सिडकोतल्या मामाच्या घराजवळ स्टेटबॅन्केच्या बाजूला चौपाटी होती. तिथला आदर्श समोसा खूपच भारी. बॅन्केसमोर वडापाववाल्याची एक हातगाडी होती, त्याचा धंदा इतका वाढत गेला की त्याने समोरील आख्खी बिल्डिंगच बिकत घेऊन टाकली होती. इथली कापसेकी बादशाही कुल्फी लैच भारी असे. प्युअर बासुंदीची कुल्फी तो देई.

नाशिकला असताना त्रंबकेश्वर, अंजनेरीलाही जाणे होत असे. तिकडील डोंगर एकदम कड्यासुळक्यांचे. अंजनेरी तर प्रचंड मोठा डोंगर खालून त्याची भव्यता नजरेस येत नसे. अंजनेरीलाच १२ व्या शतकातली जैन, हिंदू मंदिर संकुले आहेत. ब्रह्मगिरीवर जाणे फार आवडत असे. गंगाद्वार सततच्या पायर्‍यांमुळे उगाच दमछाक करणारे वाटे मात्र ब्रह्मगिरी उंच असूनही तिथल्या अद्भुत द्वाररचनेमुळे, आजूबाजूच्या खड्या कातळसुळक्यांमुळे जाणे मोठे आनंददायक होई. तिथे माकडांचा भयानक उपद्रव असे. ब्रह्मगिरीच्या पश्चिम कड्यावर जटामंदिर आहे, ज्वालामुखीजन्य खडकांची ही रचना. ह्या अशा रचनेमुळे तिथे शंकराने जटा आपटून गंगेला मुक्त केले असे भाविक मानतात. पलीकडे उतरणारी एक अवघड वाट ह्याच कड्यातून जाणारी. समोर हरिहरचा त्रिकोणी सरळसोट कातळकडा अगदी नजरेत भरे. ब्रह्मगिरीपेक्षाही काकणभर अधिकच भव्य असलेला बाजूचा ब्रह्मा पर्वत अधिकच भव्य दिसे.

बालपणीचे दिवस सरले, नंतर नोकरीच्या व्यापामुळे हळूहळू नाशिकला जाणे कमी होत गेले. माझ्या तिकडे जाण्यापेक्षा मामांचेच इकडे येणे अधिक होते. गेल्या चारसहा वर्षात नाशिकला जाणे झाले नाही. शेवटचे गेलो होतो ते नाशिकच्या एका मामेभावाच्या घरी सरसंघचालक मोहनजी भागवत आले होते तेव्हा. ते त्याच्याकडेच मुक्काम्/इ होते. नाशिकला त्यांची एक मोठी सभा आणि कार्यकर्त्यांसोबत अनेक बैठका होत्या. एकदम साधा माणूस. त्यांच्यासोबत संध्याकाळी टेरेसवर शाखा करुन चक्क 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे' ही संघप्रार्थना मीही म्हटली होती. शाखेत अगदी लहानपणी गेल्यानंतर दोनेक दशकांनी पुन्हा एकदा खुद्द सरसंघचालकांसोबत शाखा करण्याचा योग आला. त्यानंतर मात्र नाशिकला अजूनही गेलो नाही, दरवर्षी जाऊ म्हणतो पण काही ना काही कारणाने जाणे लांबतच जाते. ह्यावर्षी बाईकने जायचा प्लान होता तर लॉकडाउनमुळे राहिले. मात्र जाणे जरी होत नाही तरी तिथल्या आठवणी थोडीच पुसता येतात, त्या तर मजसोबत कायम आहेतच.

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

6 Jul 2020 - 11:13 pm | सौंदाळा

छान लिहिलंय,
नाशिकला एकदाच गेलोय, 10 वर्षांपूर्वी मित्राच्या लग्नाला, त्यामुळे फिरणं अस झालंच नाही. परत जायचा योग कधी येईल काय माहीत.
लेखात फोटो असते तर अजून मज्जा आली असती.

प्रचेतस's picture

7 Jul 2020 - 7:03 pm | प्रचेतस

धन्यवाद,
केवळ आठवणी लिहायच्या असल्याने फोटोविरहीत धागा लिहिला, तसेच जुन्या नाशकातले फोटोही मजकडे नाहीत. आता जाईन तेव्हा खास फोटो काढून आणेन.

कंजूस's picture

7 Jul 2020 - 9:38 pm | कंजूस

खरंय.

केवळ आठवणी लिहायच्या असल्याने फोटोविरहीत धागा लिहिला,

शाम भागवत's picture

6 Jul 2020 - 11:33 pm | शाम भागवत

लहानपणापासूनच देवळांची, गुंफांची आवड निर्माण झालीय तर. छान.

प्रसाद गोडबोले's picture

7 Jul 2020 - 1:51 am | प्रसाद गोडबोले

फोटो असते तर मजा आली असती अजुन !

कंजूस's picture

7 Jul 2020 - 6:26 am | कंजूस

झकास!
आता जाल तेव्हा आताचे फोटो टाका. जुने मिळणार नाहीत पण चालतील.
एक रेखानकाशा हवा. म्हणजे कुठे काय। शिवाय नाशिकदर्शन कसे करता येइल एक / दोन दिवसाचे हे सुद्धा सहल आराखडा.

तसा सहलआराखडा सहज करून देता येईल.

चांदणे संदीप's picture

7 Jul 2020 - 7:17 am | चांदणे संदीप

क्या बात है. सुरेख सफर घडवलीत वल्लीदा. मजा आली.

सं - दी - प

जेम्स वांड's picture

7 Jul 2020 - 7:26 am | जेम्स वांड

तर आमचे कोणच पाहुणे नाहीत पण अशा लेखनामुळे त्याचे वैषम्य नक्कीच वाटते :)) , खादाडी वर अजून लिहा! नाशिक पूर्ण गाव शाकाहारी आहे का ? नॉन व्हेज वर पण लिहा.

प्रचेतस's picture

7 Jul 2020 - 7:14 pm | प्रचेतस

माझ्यासकट बहुतेक सर्वच नातेवाईक शुद्ध शाकाहारी असल्याने नॉनव्हेजकडे कधीच गाडी वळाली नाही मात्र स्टेट बँकेच्या चौपाटीवर मामाज अंडाभुर्जी फेमस असे, शिवाय मुंबई नाकाच्या पुढे काकादा ढाबा वगैरे नॉनव्हेज ढाबे प्रसिद्ध होते. पण तांबडा पांढरा रस्सा, सावजी मटण अशासारखी नाशिकची खास प्रादेशिक मांसाहारी कृती प्रसिद्ध असल्याचे ऐकिवात नाही, काळे मटण म्हणून एक प्रकार तिथं आहे असे ऐकले होते पण खात्री नाही.

प्रमोद देर्देकर's picture

7 Jul 2020 - 8:15 am | प्रमोद देर्देकर

+१ आम्हाला मुंबई आणि पुणे याच्या पलिकडे कधी गेलेलोच नाही म्हणुन काही माहितीच नाही. आता हा लेख वाचल्यावर जेव्हा वणीच्या देवीला जाणे होईल तेव्हा बहुतेक या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येईल. बघु कधी जमंतय ते.
मस्त लेख.

मराठी_माणूस's picture

7 Jul 2020 - 10:10 am | मराठी_माणूस

थोडीशी झलक आधुनिक नाशिक ची ह्या गाण्यात. वाइनरी, कॉलेज रोड इत्यादी
https://www.youtube.com/watch?v=jBQ758Vy_l4

सतिश गावडे's picture

7 Jul 2020 - 10:16 am | सतिश गावडे

वाह, सुरेख लिहीलं आहे प्रचेतस तुम्ही. आजोळच्या आठवणी तशाही रम्य असतात. त्याला तुमच्या ओघवत्या लेखन शैलीची जोड मिळाली आहे.

प्रशांत's picture

20 Jul 2020 - 3:50 pm | प्रशांत

फोटो नाहित तर स्केच काढ आणि टाक धाग्यात.

चौथा कोनाडा's picture

20 Jul 2020 - 10:20 pm | चौथा कोनाडा

अरे व्वा, स्केचिंग पण करतात का ? बेष्टच म्हनयचं !
टाका हो लवकर स्केच !

प्रचेतस's picture

20 Jul 2020 - 10:35 pm | प्रचेतस

नाही हो :)
ते नाही जमत.

महासंग्राम's picture

7 Jul 2020 - 10:30 am | महासंग्राम

वल्लीशेठ इस बॅक !

शा वि कु's picture

7 Jul 2020 - 10:34 am | शा वि कु

.

मूकवाचक's picture

7 Jul 2020 - 10:56 am | मूकवाचक

प्रचेतस यांच्या खवैय्या, इतिहास प्रेमी आणि भटकंती प्रेमी या तिन्ही पैलूंचे विलोभनीय प्रतिबिंब पडले आहे लेखात. थोडक्यात पण नेमकेपणाने जुन्या आठवणींना उजाळा देत त्या शब्दबद्ध करणे वाटते तितके सोप्पे नाही. प्रचेतस यांना धन्यवाद.

रातराणी's picture

10 Jul 2020 - 12:12 pm | रातराणी

असेच म्हणते, सुरेख लेख!

कुमार१'s picture

7 Jul 2020 - 11:06 am | कुमार१

सुरेख लिहीलं आहे

सस्नेह's picture

7 Jul 2020 - 11:37 am | सस्नेह

शालेय जीवनात ली काही वरषे नाशकात गेली. रविवार कारंजा ते पंचवटी ते सिडको मेरी रोजची पायपीट. मकाजीनो बढिया चिवडा जवळच बसस्टॉप होता. तिथे बसून कित्येकदा खाल्लेला चिवडा, सगळं डोळ्यासमोर आलं..!

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jul 2020 - 11:47 am | ज्ञानोबाचे पैजार

वल्ली म्हणजे लेणी, वल्ली म्हणजे लेखात अनेक नयनरम्य फोटो, वल्ली म्हणजे इतिहास, त्याच अपेक्षेने लेख उघडला होता.
यातले लेखात काही नसताना सुध्दा शेवटपर्यंत वाचावासा वाटला यातच सगळे आले
पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

9 Jul 2020 - 6:11 am | तुषार काळभोर

वल्ली म्हणजे लेणी, वल्ली म्हणजे लेखात अनेक नयनरम्य फोटो, वल्ली म्हणजे इतिहास, त्याच अपेक्षेने लेख उघडला होता.
यातले लेखात काही नसताना सुध्दा शेवटपर्यंत वाचावासा वाटला यातच सगळे आले

+१

विनिता००२'s picture

7 Jul 2020 - 1:31 pm | विनिता००२

नासिक माझे माहेर! आता परत तिथे जाणार आहे. गेले की सांगेन. मग या नासिक फिरायला :)

एरन्दोल्कर's picture

7 Jul 2020 - 1:43 pm | एरन्दोल्कर

आवडले. खुपच छान लिहलय.

आमच्या गावची स्टोरी मस्तच सांगितली....

बेकार तरुण's picture

7 Jul 2020 - 2:02 pm | बेकार तरुण

नाशिकशी फारसा कधीच काही संबध आला नाही, तरी लेख आवडला....

नाशिकला खूप लोक नासिक असे उच्चारतात? याचे काय कारण?

प्रचेतस's picture

7 Jul 2020 - 7:22 pm | प्रचेतस

मूळ शब्द तसा नासिकच,
'सालाहण कुले कन्ह राजिनी नासिककेन' हा पांडवलेणीतील शिलालेख प्रसिद्धच आहे.

नाशिकचे पूर्वीचे नाव जनस्थान होते. येथेच लक्ष्मणाने शूर्पणखेच्या नासिका छाटल्या म्हणून नासिक नाव पडले. मात्र सर्वसामान्य नाशिककर नासिकला नाशिक ह्याच नावाने ओळखतो.

आंबट चिंच's picture

11 Jul 2020 - 7:52 pm | आंबट चिंच

अहो असं काय करताय पाव्हणं इथे लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक नाही का कापले.

नाकाला नासिक म्हणतात म्हणुन कालांतराने नाशिक झालं.

पांडवलेणीत एका लेखात 'नासीक' असा या गावाचा उल्लेख आहे म्हणून नासीक

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jul 2020 - 2:37 pm | अत्रुप्त आत्मा

आगोबाचे नाशिक! http://www.sherv.net/cm/emoticons/smile/cute-3d-smiling-smiley-emoticon.gif

शाम भागवत's picture

7 Jul 2020 - 2:56 pm | शाम भागवत

:)

गोरगावलेकर's picture

7 Jul 2020 - 3:29 pm | गोरगावलेकर

छान माहिती दिली नासिकाबद्दल.
लॉक डाउनच्या थोडेसे आधीच माझी नासिक परिसरात भटकंती झाली.

वणीची सप्तशृंगी
सप्तशृंगी देवीला पायऱ्या चढून जायला मजा येते. पण आता 'फ्युनिक्युलर ट्रॉली" सुविधा सुरु झाली असल्याने जेष्ठ नागरिकांना सुद्धा दर्शन सहज शक्य होते.

त्र्यंबकेश्वर मंदिर
दर्शनासाठी कुठलेही शुल्क नाही पण रांग टाळायची असल्यास रु.२००/- भरून प्रवेश मिळतो.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या अलीकडेच दुबईच्या मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर 'नाशिक फ्लॉवर पार्क' ची निर्मिती करण्यात आली आहे. अतिशय कल्पकतेने फुलांचा वापर करून विविध आकार साकारले आहेत.
प्रवेश फी रु.३००/- प्रति माणशी आहे थोडी जास्त वाटते पण प्रवेश केल्या केल्याच आतील दृश्य पाहून आपण हरखून जातो. नैसर्गीक फुले, वनस्पती जपण्यास/निगा राखण्यास खर्च येतच असणार.
फुलांचा बहर जानेवारी ते मार्च असतो. या काळात नाशिक भटकंती कोणी करणार असेल तर चुकवू नये असे हे ठिकाण.

थोडे वेगळेपण म्हणून "सुला वाईन यार्ड " ला भेट देऊ शकतो.
वेळ: सकाळी ११.३० ते संध्याकाळी ६.३०
प्रवेश फी : रु २००/- प्रत्येकी (आतमध्ये आपण खाद्य पदार्थ अथवा काही विकत घेतल्यास याची वजावट मिळते)
वेगवेगळ्या वाईनची चव चाखायची असल्यास त्याचे अतिरिक्त रू २००/- भरावे लागतात.

मराठी_माणूस's picture

7 Jul 2020 - 3:45 pm | मराठी_माणूस

फोटो अतिशय सुंदर. अफलातुन क्लॅरिटी.

प्रचेतस's picture

7 Jul 2020 - 7:23 pm | प्रचेतस

फोटो एकदम सुरेख आहेत.
अजून सुला वायनरीला जाणं झालं नाही, पुढच्या खेपी नक्कीच.

चौथा कोनाडा's picture

10 Jul 2020 - 12:44 pm | चौथा कोनाडा

पुढचा मिपा कट्टा सुला वायनरीलाच करायला हवा ! :-)

चौथा कोनाडा's picture

21 Jul 2020 - 1:10 pm | चौथा कोनाडा

खुप छानसुंदर फोटो आणि माहिती गोरगावलेकर !
फ्युनिक्युलर ट्रॉलीत तर बसायचंच आहे अन नाशिक फ्लॉवर पार्क, सुला वाईन यार्डला जावं लागेल आता !

गोरगावलेकर's picture

21 Jul 2020 - 1:59 pm | गोरगावलेकर

धन्यवाद सर्वांना.
सप्तशृंगी देवी आणि त्रंबकेश्वर मंदिराच्या आतील भागात फोटो काढण्यास परवानगी नाही.
देवीचा फोटो दुरून रांगेत असतांनाच घेतला!

सिरुसेरि's picture

7 Jul 2020 - 5:22 pm | सिरुसेरि

छान माहिती .

मस्त लेख आहे रे वल्लीशेठ.

रुपी's picture

7 Jul 2020 - 11:29 pm | रुपी

सुंदर लेख! छान आठवणी.

जयंत कुलकर्णी's picture

8 Jul 2020 - 10:52 am | जयंत कुलकर्णी

मस्त...

प्राची अश्विनी's picture

8 Jul 2020 - 11:19 am | प्राची अश्विनी

छान लिहिलंय.

सुमो's picture

8 Jul 2020 - 11:24 am | सुमो

लेख.नाशकातील आठवणी मस्तच.

MipaPremiYogesh's picture

8 Jul 2020 - 7:06 pm | MipaPremiYogesh
MipaPremiYogesh's picture

8 Jul 2020 - 7:06 pm | MipaPremiYogesh
MipaPremiYogesh's picture

8 Jul 2020 - 7:06 pm | MipaPremiYogesh
MipaPremiYogesh's picture

8 Jul 2020 - 7:07 pm | MipaPremiYogesh
MipaPremiYogesh's picture

8 Jul 2020 - 7:07 pm | MipaPremiYogesh
सोत्रि's picture

9 Jul 2020 - 6:41 am | सोत्रि

आता नाशकास जाणे झाल्यास ह्या सर्व ठिकाणांचा मागोवा घेणं आलं...

- (भटक्या) सोकाजी

एका समारंभास जाणे झाले होते नाशकात तेव्हा काही ठिकाणी एका दिवसात जमेल तेवढं पाहिलं होतं. खादाडी केली नाही.
--------

पलाश's picture

9 Jul 2020 - 10:23 am | पलाश

लेख आवडला.
जानेवारी महिन्यात नाशिकला गेलो होतो. तेव्हा काळाराम मंदिर दर्शन झाले. फारच सुंदर मंदिर आहे. त्या दर्शनानंतर गंगाघाटावर जायला नको होते हे घाट पाहिल्यावरच कळले. बुधाची जिलेबी आवडली आणि नाशिक चिवडा चांगला वाटला. पुढच्या वेळी ह्या माहितीचा उपयोग होईलच.

चौथा कोनाडा's picture

9 Jul 2020 - 12:51 pm | चौथा कोनाडा

अप्रतिम लेख ! मलाही माझ्या बालपणातून फिरवून आणलं !

जुन्या पद्धतीचं वाडावजा घर. त्यात बरेच भाडेकरु असंत. मुख्य दरवाजातून आत शिरताच एक अंधारा बोळ, त्यातून बाहेर पडल्यावर चौक, तिथून करवादत्या लाकडी जिन्याने वर जाताच

असंच माझ्या मामाचा ही पंढरपुरला, पंढरपुरला माझं शालेय शिक्षण झालं !
इतर ही बरेचसे तपशिल माझ्याबाबतीत जुळणारे, वाचताना मी लिहिलेलंच वाचतोय की काय असं वाटायलां लावणारं !

माझ्या लहानपणी कुस्ती अन कुस्तीगिरांचा प्रचंड बोलबाला होता, पानाच्या टपर्‍या अन इतर काही दुकानं यात कुस्तीगिरांचे शड्डू पोझ मधले फोटो टांगलेले असत !
गणपतीच्या दिवसात होणारे जिवंत देखावे हा मोठ्या आनंदाचा भाग !
आपले बालपण समृद्ध गेले याचं समाधान वाटत राहतं !

नाशिकला माझे नातेवाईक राहतात तिकड्म कधीतरी येणं होतं, त्रंबकेश्वर, वणी इथं आवर्जून जाणं होतं, सोमेश्वरला एकदा गेलेलो, फारच भारी आहे, खुप आवडलं.

एका वर्षी त्रंबकेश्वरला संस्कारभारतीच्या एका शिबिराला दोन दिवस आलेलो, तो ही अनुभव खास होता !
भावाच्या नारायणनागबळी पुजे निमित्त एके वर्षी भर पावसात त्रंबकेश्वरला राहणं झालं तो अविस्मरणीय अनुभव होता !
वेळ काढून ब्रम्हगिरी जवळ फिरलो, काय सुंदर पाऊस आहे त्रंबकेश्वरचा !

दादासाहेब फाळके चित्रनगरीला देखिल भेट दिलीय, उदासवाणं वाटलं, याचं काही मारकेटींग नाही, पब्लिसिटी नाही, इव्हेंटस नाहीत, बंद पाडण्यासाठीच काढलयं की काय असं वाटून गेलं ! पांडवलेणी मात्र पाहिली गेली नाहीत अजून !

व्वा, प्रचेतस, एकदम सुंदर सफर घडवली !

वाह, सुरेख लिहीलं आहे प्रचेतस तुम्ही.

प्रचेतस's picture

10 Jul 2020 - 9:11 am | प्रचेतस

सर्वांचे धन्यवाद.

मदनबाण's picture

10 Jul 2020 - 12:02 pm | मदनबाण

सुरेख लेखन !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oh China | Oh Corona | :- The Truthist

चौकस२१२'s picture

10 Jul 2020 - 5:31 pm | चौकस२१२

नाशिकचया जवळील तीन बघण्यासारखी ठिकाणे
१) गारगोटी संग्रहलाय https://gargoti.com/nashik/
२) देवळाली तोफखान्याचे संग्रहालय
३) सिन्नर चे गोंदेश्वर मंदिर ( ११-१२ शतकातील , अजिबात बाजारू नाही )

चौथा कोनाडा's picture

12 Jul 2020 - 1:21 pm | चौथा कोनाडा

चौकस२१२ साहेब,
प्रचेतस (या धाग्याचे लेखक) यांनी सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर यावर नितांत सुंदर लेख लिहिलाय, नक्की वाचा:
https://www.misalpav.com/node/36112

पाषाणभेद's picture

11 Jul 2020 - 4:36 am | पाषाणभेद

आपल्या नाशिकाचे मार्केटींग करणारा लेख आहे ना भावा हा.
एक नंबर द्राक्षे, कांदा, ऊस, भाज्या.
मुंबईची परसदार असलेले नाशिक.
मुंबई पुण्याची धावपळ नसलेले पण तेथल्या सार्‍या सुविधा उपलब्ध असलेले नाशिक.
मिसळवाले नाशिक.

अन मुख्य म्हणजे पाणीदार नाशिक.
सांगतो, नाशिक जिल्ह्यातल्या सर्व नद्या नाशिक जिल्ह्यातच उगम पावतात अन नाशिक जिल्ह्यात दुसर्‍या कोणत्याही जिल्ह्यातून किंवा राज्यातून एकही नदी वाहत येत नाही.

श्वेता२४'s picture

11 Jul 2020 - 8:10 pm | श्वेता२४

नाशिकची छान ओळख करुन दिलीत.

श्वेता२४'s picture

11 Jul 2020 - 8:10 pm | श्वेता२४

नाशिकची छान ओळख करुन दिलीत.

चैदजा's picture

12 Jul 2020 - 7:09 pm | चैदजा

अगदी अगदी !!!!! अहो तुम्ही माझ्या मामाबद्दल सांगताय असेच वाटत होते. माझा मामा तिथुन जवळच देवधर गल्लीत राहयचा. स्तंभावरुन आर के ला जाणारा रोड, शनि मंदिरा समोर.
वाड्याचे वर्णन, कुल्फी, बुधा, जॅक्सन गार्डन, भेळभत्ता अगदी मिळतजु़ळत वर्णन. पंचवटीत जेवायला जायची चैन तेव्हा परवडणारी नव्हती. माझे मामेभावंड देखिल नासिक असाच उच्चार करतात. पुढे माझा मामा पण जेल रोडला बंगल्यावर शिफ्ट झाला. तिकडची मजा वेगळी होती.

वणीच्या सप्तशृंगीची प्रतिकृती असलेल्या दुकाना समोरील गल्लीत माझी मावशी राहयची. तिकडे अग्रवाल मिठाईवाला होता/आहे ? त्याच्याकडे खुरचंदवडी मिळायची, तशी मिठाई मला दुसरीकडे कुठेच मिळाली नाही. नाशिकला मिळणारा पेढा देखिल जास्त माव्याचा, जरा कमी गोड, जिभेवर ठेवताच विरघळणारा असतो. आम्ही गणपती साठी हे पदार्थ नाशिकहून मागवायचो.

प्रचेतस's picture

13 Jul 2020 - 8:53 am | प्रचेतस

धन्यवाद.
अग्रवाल मिठाईवाला आता अजिबातच आठवत नाही. इथल्या म्हैसुरपाकाला नाशकात खुरचंदवडी म्हणतात. आवडत नसल्याने फारसे खाणे झाले नाही कधी.
बाकी रविवार कारंज्यावर तेली गल्लीतले दगडू तेल्याचे दुकान अजूनही फेमस आहे. तिकडे मामाबरोबर आम्ही बरेचदा जात असू.

नाही हो !!!!! इथला म्हैसुरपाक कडक असतो. म्हैसुरपाक मला पण कधीच आवडला नाही. पण खुरचंदवडी एकदम पेढयासारखी, तोंडात ठेवताच विरघळणारी. लोक दोनदा मागुन खायचे. असो. मामी कडे अजुन मिळ्णारी गोष्ट म्हणजे शेवया, सातुचे पीठ, चिकवड्या, पापड्याच्या लाट्या यांची रेलचेल असायची.
मामा बंगल्यावर गेल्यावर, त्याने ईथे बांधुन ठेवलेला पुस्तकाचा खजिना मला मिळाला. खूप ऐतिहासिक पुस्तके वाचायला मिळाली.

प्रचेतस's picture

2 Aug 2020 - 8:34 pm | प्रचेतस

हा प्रकारच फारसा आवडत नसल्याने खाल्ली नाही फारशी.

बाकी शेवया, चिकवड्या वरून अजून एक आठवले ते म्हणजे नाचणीचे पापड जे नाशिकला प्राधान्याने केले जातात, त्या गरमागरम लाट्या खायला फार आवडायचे.

लॉरी टांगटूंगकर's picture

12 Jul 2020 - 10:00 pm | लॉरी टांगटूंगकर

तुफान लिखाण वल्ल्लीशेठ.
काही शहरे अगदी विशेष आवडतात, भावना नेमकी शब्दबद्ध करणे फार अवघड. लेख खूप आवडला.

अनिंद्य's picture

13 Jul 2020 - 7:08 pm | अनिंद्य

@ प्रचेतस, लेखन आवडले ! लहानपणीच्या त्यातून आजोळच्या आठवणी फार सुखद असतात आणि स्पष्ट आठवतातही, अगदी रंग-रूप-गंध-चवीसकट :-) स्थानिक नाशिक म्हणत नाहीत नासिक म्हणतात हे मला फार नंतर कळले.

नासिक मला थोडे आडवाटेचे पण जितक्यांदा गेलो तितक्यांदा फारच छान अनुभव आले या शहराचे आणि तेथील लोकांचे. पाहिली भेट साधारण १० वर्षाचा असतांना आजीसोबत धार्मिक सहलीसाठी. तेव्हा बिटको जवळ एका धर्मशाळेत राहिलो होतो, अनेक देवळे पाहिली ते स्पष्ट आठवते. हिरवेगार शहर !

एकदा HAL ओझरच्या हिरव्याकंच परिसराला भेट देण्याचा योग्य आला - नव्याकोऱ्या मिग विमानात बसता आले, रशियन चमूशी मोडक्यातोडक्या इंग्रजीत गप्पा मारल्या. एकदा अंबडच्या ग्लॅक्सो कंपनीला, एकदा सुला वायनरीला भेट (त्यांची वाईन यथातथाच पण रेस्तराँ, वाईन टूर, आथित्यशील कर्मचारी, रिसॉर्ट आणि परिसर झकास), पुढे नासिक विमानतळाच्या उदघाटन सोहळ्याला (अगदी स्थानिकांच्या टिपिकल 'मंत्रशक्ती-तंत्रशक्ती' भाषणांसकट :-), देवळाली कॅम्पच्या हिरव्यागार परिसराला, दोनदा शिवभक्त पत्नीसह त्र्यंबकेश्वरी खास पावसाळ्यात... अशा काही संस्मरणीय नासिक भेटी तुमच्या लेखामुळे ताज्या झाल्या. अनेक आभार !

Swasti's picture

13 Jul 2020 - 9:34 pm | Swasti

Mi MiPa var navin ch aaley agdi, tyamule ajun mala marathi typing ch tantra kahi jamla nahiye (arthat tevdhi 'DHA' aahech mi ya babtit!!). Tyamule he asa lihitey tya baddal manapasun sorry!!

Mi Nashik chi aahe, n ha lekh vachun asa vatla ki tumhala saglyana ajun andar ki baatein sangavi ithli. Area pramane mi baghnya sarkhi n khayachi thikana denyacha praytana karte, aasha aahe ki saglyana aavdel.

Ashok Stambha
Khaycha kay kay -
1. Krushnai cha vadapaav aani batata bhaji
2. Maazda bakery che kheema pattice
Baghaycha kay -
1. tasa faar kahi nahi ithe, ek prasiddha Ganpati mandir aahe ' Dholya Ganpati' mhanun.

Ithun rasta jato to Ravivar Karanja (RK) kade, jithe Chivda Mithai vali dukana aahet barich.

Ravivar Karanja
Khayla kay-
1. Samarth juice center - Pineapple juice with icecream (he nahi kela tar paap lagel!!!)
2. RK var ratri ushira masala dudhacha gadya lagtat. Kesar, Malai marke, without malai, kadhai cha kathacha komat...ase anek prakar customize karta yetat. Ha maamla pan khaas aahe.
3. Sanap bandhu yancha bhelbhatta
4. Khaycha nahi- Dagdu Teli kade anek Ayurvedic goshti miltat (Utsahi lokana ek suggestion - kesana lavaycha Mehandi cha masala milto ithe)
Baghayla kay -
1. Chandicha Ganpati

RK var Ganpati kade tond karun ubha rahila ki ujavi kade Main road la jata yeta. Tithe valun sarkar vada kade gela ki saraf bajjar aani Fulbajaar lagto (sakali sakali ja aani atishay bhari ashi fula ghya, Mumbai Pune peksha faar swasta miltat Nashik la)

Saraaf bajaar, Bhandi bajaar, Ful Bajaar
Baghayla Kay -
1. Sarkar vada
2. Pitali bhandi aani antiques chi dukana
3. Sarkar vada cha agdi samorun Nadi cha disheni jo rasta jato,tithe eka vadyat Murlidhar mandir aahe, Sundar aahe he suddha.
4. Durga Mangal karyalay cha gallit Savarkar yanche 'Abhinav Bharat' karyalay aahe (aata aahe ki nahi mala nakki mahit nahi, asava bahutek)

Ya area madhun aata Dahipulavar jauya, mhanje fulbajar paar karun sarkar vada cha viruddha dishela.

Dahipool, Bhadrakali aani aaspaas
Khayla kay-
1. Ramesh dugdhalay
2. Prakash supari kadun mukhvaas
3. Budha Halvai - Jilebi, Pakka Pedha, Raghavdas ladoo, Gulabjam.
Yancha ek vishesh prakar mhanje Kachcha pedha, mhanje nusta bhajlela khava pedhya sathi, APRATIM prakar aahe. Utsahi mandali na salla no. 2 - yancha khava gheun ghari gulabjam kara, ithe mhane khava Dhodap killya varun yeto (jo Saptashrungi samor aahe to killa ha)
4. Sayantara - Sabudana vada. Khara tar Batata kachori jast aavdte yanchi, donhi try kara.
Baghayla kay -
1. June vade

Ithun pudhe Masjid aahe, tithe 'Haji darbar' hotel madhle non-veg famous aahe.

Godavari kath aani aaspaas
Khayla kay -
1. Pande mithai - Lassi tar mast aahech, pan ithla Gulabjam kha rao. Mast jumbo Gulabjam asto, paak agdi aatmadhe murlela asto!
Baghayla kay -
1. Naroshankar ghat
2. Ganga-Godavari mandir - kumbhmela special, 12 varshani ughdata he mandir.
3. Ramkund, Gandhi talaav
4. Goraram Mandir
5. Kartikeya mandir
6. Kapaleshwar mandir

Sundar-Narayan aani Kalaram ya baddal ajun kahi mi sangat nahi, saglyana tya baddal mahit aahech.

He sagla zala Juna Nashik. Aata baki kahi famous goshti (jevdhya lakshat yetay aata tevdhya!)

Misal
1. Panchvati Karanja var Ambika misal
2. PaSa natya mandir samor kala rassa misal (ithech Shoukin bhel aahe)
3. College road var Tushar misal
4. Satpur MIDC madhe Shamsundar Misal
5. Someshwar road la Sadhana misal (jithe sagla chulivar kelela milta!!)
6. Personal choice - Mumbai naka bus stand baher ek gadi aahe, tyanchi misal pan khas!

College road che ajun kahi famous food joints
1. Nandan chi panipuri
2. Viju chi dabeli
3. Saleem chaha
4. Raju cha barfacha gola

Saddhya itkach sangun thambte, Thank you!

प्रचेतस's picture

16 Jul 2020 - 3:51 pm | प्रचेतस

दुर्गा मंगल कार्यालय वाचून खूप जुन्या आठवणी जागा झाल्या. कित्येक नातेवाईकांची लग्न दुर्गा मंगल लाच झालीत. अगदी मध्यवर्ती ठिकाणचे हे कार्यालय. जुन्या पद्धतीचे.
बाकी तुम्ही दिलेल्या माहितीतली कित्येक ठिकाणे माहितीची आहेत.
मुंबई नाक्यावरील हॉटेल साहेबा छान आहे, विल्होळीतील जैन मंदिरात सकाळी नाश्ता एकदम मस्त मिळतो, त्याच्या पुढे महामार्गावरचा हरिओम ढाबा पण भारी.

कंजूस's picture

14 Jul 2020 - 6:36 am | कंजूस

@ Swasti, masta mahiti aahe.

दुर्गविहारी's picture

17 Jul 2020 - 11:56 pm | दुर्गविहारी

अतिशय छान लिखाण आणि खादाडीसाठी उत्तम माहिती ;-)

गणेशा's picture

19 Jul 2020 - 10:27 am | गणेशा

अप्रतिम.. अप्रतिम..

लेखन आवडले... जन्मस्थळ भारीच.. चाफ्याचा सुगंध आलाय शब्दा शब्दात असे वाटले.. मस्त..

चाफ्यावरून आठवले..
कवी बी नाशिकचेच.. चाफा बोलेना.. चाफा चालेना.. वा मस्तच..

लिहित रहा वल्ली असेच.. मी इतकेच म्हणेल..

मी पुन्हा वाचेल.. मी पुन्हा वाचेल.. मी पुन्हा वाचेल...

विंजिनेर's picture

23 Jul 2020 - 10:03 am | विंजिनेर

वा! काय छान लेख आहे! आमच्या मामाचं गाव नाशिक, त्यामुळे सगळे मामा+मावशी-लोक नाशिकमध्ये, "रोड"ला आणि देवळाली क्यांपात राहायचे - त्यामुळे जवळ जवळ प्रत्येक उन्हाळ्याची सुट्टी नाशकात - सगळ्या मामा लोकांत विभागून जायची.
प्रेस जवळचे क्वार्टर्स, देवळाली क्यांपातल्या निवांत संध्याकाळी, वणि/त्र्यंबकेश्वर मधली मंगलकार्ये - सगळ्याच रम्य आठवणी आहेत

प्रचेतस भाऊ - खाऊ विभागात बटर-बिस्किट, खुर्श्चंद वडी, खीमा पॅटीस आणि करवंदे इ. चा उल्लेख राहिला अंमळ!

प्रचेतस's picture

30 Jul 2020 - 9:01 am | प्रचेतस

धन्यवाद.
खरं तर लिहायचे बरेच होते पण बर्‍याच गोष्टी उल्लेखायच्या राहून गेल्या. जसे की चामराज लेण्यांना सायकलने दिलेली भेट, राऊचा ढाबा, ब्रह्मगिरीवरची त्रासदायक माकडं, दहीपुलावरच्या गमतीजमती, राऊचा ढाबा, नाशिकच्या कुठल्यातरी हॉटेलात खाल्लेला घमेल्याच्या आकाराइतका पापड, मखमलाबादची मिसळ, भक्तीधाम, मुक्तीधाम इत्यादी अनेक. त्याविषयी पुन्हा कधीतरी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jul 2020 - 10:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्लीसेठसेठ, नाश्काच्या सुरेख आठवणी लिहिल्या आहेत आवडल्या. आपला जन्मच नाश्कातला म्हटल्यावर नाशिक तुमच्या शब्दा-शब्दातून ओघळतंय. आपलं असं बालपण आठवणे तो एक रम्य काळ असतो, आयुष्यातल्या कोणत्याच कटकटी तेव्हा नसतात म्हणून एकदम नवीन व्हर्जनचा तो काळ. आपण लेखात उल्लेखलेल्या खादाडीचा काही अनुभव नाही. पण नाश्कात आम्हीही सुटीच्या काळात जायचो, त्यामुळे आपलं बालपण आणि त्या सर्व आठवणी आवडल्या.

नाश्काचं आर्कर्षण मलाही आहे. माझे एक काका, जुन्या कथड्यातले आजही तिथेच राहतात. पंचवटीला कितीतरीवेळा गेलेलो तिथेच, ती मंदिर, पोहणारी पोरं, ते सगळं मलाही आठवतं. कोणत्या तरी सिनेमाची शुटींग झालेली म्हणून कोणत्या तरी खडकाळ भागात की कुठेतरी मी आणि माझा भाऊ सायकलवर गेलेलो त्याची आठवण झाली. स्थळ आता आठवत नाही. माझे काका जुन्या कथड्यातलं एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व. माझ्या काकू नगरसेविका म्हणूनही निवडून आलेल्या होत्या. . काकूच्या मतदानावेळीही असेच खूप फिरलेलो. आज काकू नाहीत, पण त्यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाची आठवण आजही आहे.

नाशीक अधून-मधून असं मनात वसलेलं आहेच. आपल्यामुळे अनेक आठवणी टवटवीत झाल्या. वल्लीसेठ, मनःपूर्वक आभार. आपण छान लिहिताच, पुढेही असं नियमित लिहिते राहाच.

-दिलीप बिरुटे
(वल्लीसेठचा जालफ्रेंड)

प्रचेतस's picture

30 Jul 2020 - 9:02 am | प्रचेतस

धन्यवाद सर,
तुम्ही गेलेलात तो खडकाळ भाग म्हणजेच सोमेश्वर असणार :)