सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


व्हिलेज डायरी

Primary tabs

लेखनवाला's picture
लेखनवाला in जनातलं, मनातलं
29 Jun 2020 - 1:15 pm

इतरवेळी करतो तसा जनरल डब्यातून कोकणरेल्वेचा प्रवास यावेळी मुददामून टाळला, हा इतरवेळचा प्रवास म्हणजे धावत जात गाडी पकडणं नव्हे किमान कोकणरेल्वेसाठी तरी नाही….म्हणजे अजून इतरवेळचा प्रवास म्हणजें काय तर….इथं जर रात्री अकराची मंगलोर गाडी आणि त्यातही जनरल डबा ठाणे रेल्वेस्टेशनवरुन पकडायचा असेल तर लोक नंबर कधी लावतात फॅल्टफार्म नंबर पाच वर…… आदल्या दिवशी रात्री अकरा वाजता…. होळी, दिवाळी, उन्हाळ्यातली सुटटी आणि अजून काय बरं विचारता…गणपती येतात ते दिवस…ते सगळ्यात महत्तवाचं……जशी रात्री मंगलोर गाडी गेली की दुस-या दिवशीच्या गाडीसाठी नंबर लावतात… हो चोवीस तास अगोदर…..म्हणजे तिथं नंबर लावण्यासाठी आलेल्यापैकी कुणीतरी फुलस्केप, पेन घेवून तयार असतं…तो फुलस्केप पेपरवर एक-एक करतं नाव लिहून घेतो… नावासमोर आपली किती माणसं प्रवास करणारं ती सांगायची….जवळचं राहणारी माणसं नंबर सांगून घरी निघून जातात…लांब कल्याण-डोंबिवली, घाटकोपरपासूनची माणसं तिथंच थांबतात… मग हा सगळा टाईमपास रात्री एक वाजेपर्यंत चालतो….. गाडीच्या सध्याच्या वेळ्या, कोकणात न थांबणा-या नवीन गाडया, जमिनीचे भाव, दिव्याला किंवा विरार-नालासोपा-याला नवीन रुम स्वस्तात भेटतात का? या शिवाय अजून इतर विषय म्हणजे, राजकारणी लोकांनी कशी कोकणची वाट लावलीय, नोक-या कश्या शिल्लक नाहीयतं, कुणाचं लग्न जमणं बाकी आहे?, गावातलं सध्याचं नवीन लफडं, सत्यनारायणाची पूजा” इत्यादीबदल चर्चा होते… कुणी तरुण पोरं असतील तर मोबाईलवर टाईमपास करत बसतो. मग हळूच कोणतरी पत्तांचा कॅट काढतो…. मग पत्ते पिसणं चालू होतं… तिथं फलाटावर लोकल येणं बंद होतं….एक्सप्रेस मेल आणि फलाटावरचे दिवे तेवढे चालू असतात….सगळे तिथंच झोपतात….सकाळी सातला वापस एकदा हजेरी होते…. तिथं क्रमाने नाव पुकारली जातात जो हजर नसेल त्यांच्या नावापुढे फुली मारली जाते… आता पुढची हजेरी सकाळी अकरा वाजता…. तोपर्यंत त्या फुलस्केपचा एक मागचा-पुढचा पेज नावाने भरत येतो…. रात्रीपासूनचे हजेरीला आलेले लोक सकाळी सातची हजेरी लावून निघून जातात….. कुणालातरी दुस-याला दुपारच्या अकराच्या हजेरीला पाठवून देतात….. त्यातही एखादा रात्रीपासून तिथंच असतो…. अकराच्या हजेरीसाठीची माणसं पार दुपारचे बारा वाजले तरी येतचं असतात… काही नवी नाव भर घालतात… रात्रीपासुनच्या नावातली काही नाव जी सकाळी सात वाजता आलेली नसतात त्यांच्यावर काट मारली जाते, ती आता दुपारी बारा वाजता हजर होतात… नावासमोरची काट पुसायची विंनती करतात… सगळा गोंधळ उडतो… नंतरची हजेरी संध्याकाळी चार वाजता…. आता त्या पाटपोट चार पानी फुलस्केपची तीन पान भरत येतात…. चार नंतर संध्याकाळी सात वाजता प्रत्यक्ष लाईन लागते, त्या फुलस्केपवरच्या नावाप्रमाणे लोक लाईनीत उभे राहतात… अजून घरुन प्रवासाला येणारी बाकीची मंडळी यायला अवकाश असतो… लाईनीवरुन कमाल गर्दीचा अंदाज येतो…. जसं जसे नऊ वाजू लागतात तशतशी सगळी प्रवासाला येणारी घरची मंडळी येऊ लागतात, कपडयाच्या सुटकेसींचा बोजा घेवून चाकरमानी निघतात कोकणात जाण्यासाठी, यात कुणाकुणाकडे नारळाचं म्हणजे माडाच्या झाडाचं एक बांधलेलं रोपटं नक्की दिसतं. रात्रीचे नऊ वाजले की मग…घरुन आणलेले जेवणाचे डबे काढतात…तिथंच त्या फलाटावर चपाती-भाजी खाल्ली जाते… काहीवेळेला लोकं घरुनच लवकर जेवून येतात.

त्याच सुमारास उत्तर भारतीयाचीं एक ट्रेनसुदधा त्यांच फलाटावरुन जाते…तिकडे पण माणसं अशीच संमातर लाईन लावतात……यांतली काही जण कोकणात जाणारी सुदधा असतात…..मध्ये पाच-सहा वर्षापूर्वी यांच्या अश्या कोकणात जाण्यावरुन वाद होतं… लाईनीत उभे असणा-या उत्तर भारतीयांना वेगळं काढून मुस्काटात मारुन बाहेर काढलं जाई….आता तसं होतं नाहीत…. बाकी या सगळ्यात मुंबई-ठाण्याला येणा-या जाणा-या माणसांचा दिवसभराचा ‘कामकाजा’चा कार्यक्रम संपत आलेला असतो….. सकाळी मुंबईच्या दिशेने तुफानी भरुन गेलेल्या लोकलस आता संध्याकाळच्या वेळेलाही तश्याच भरुन येताना दिसत असतात….आपण या सा-याला एक दिवस का होईना साक्षी होतो… रात्रीचे दहा वाजतात… जेवण करुन पोट भरलेलं असतं…. घरच्या ब-याच मंडळीना या रोजच्या ट्रेनच्या प्रवासांची आणि रेल्वेस्टेशनवरच्या वातावरणाची ओळख नसते त्यामुळे हे संगळ अप्रूप होतं पाहत बसतात…. बाकी मनातून कधी एकदा गावाला पोचतो असं होतं असतं…..आता फक्त एक तास उरलायं गाडी यायला….काही माणसं हातात फुलस्केप घेवून उभेच असतात….ही नवी माणसं…. ही उदयाच्या अकराच्या गाडीसाठी आतापासूनच लाईन लावायला आलेली माणसं… काल आपण होतो….कालचाचं दिवस रिपीट.. आपलं चोवीस तासाचं सर्कल संपेल थोडयावेळात… पावणेअकरा वाजतात… लोक बॅग्या, सुटकेसी, माडाचं रोपटं आणि इतर सामान जवळ करतात, इथं ठाण्याला दोन डबे असतात जनरल साठी… खूप माणसं असतात… यात खूप सारीजण ऐन मोक्याला गावाला जायला तयार झालेली…. “घुसू डायरेक्ट लाईनीत… भेटेल कोणतरी गाववाला…. एकच तर बॅग आहे…. एका माणसाला कितीशी जागा लागतेय….” सगळं मनाशी ठरवून फलाट क्रंमाक पाचवर येतात….. कधीकधी निमूटपणे कुणाच्याही मागे उभे राहतात…. मग लगेच मागचे-पुढचे सावध होतं त्यांची चौकशी करतात… मामला जमला तर ठीक…. नाहीतर मग लाईनीतून बाहेर होतात…. शेवटला जावून लाईनत उभं राहायला धीर होतं नाही…. काहीजणं तेही करतात…. राहतात उभे शेवटी…… आता इंडिकेटरवर लिहून येतं….. बरोबर अकराला गाडी आलेली असते…. उदघोषक घोषणा करतात…. मंगलोर गाडी येत असल्याची…. पोलीस लावलेत डयुटीला कुणी घुसू नये म्हणून…. तेही आपलं काम शिस्तीत पार पाडतात…. सगळ्यांना लाईनीत सोडायची व्यवस्था चोख बजावली जाते… कोबूंन कोबूंन माणसं भरतात…. एकामागोमाग नुसती माणसाचं माणसं…. आत पार संडासात पण माणसं शिरतात…. वरती.. खालती… जिथं भेटेल तिथं माणसं थपकान घालून बसतात… माणसाचा हाच कल्लोळ सुरु होतो… मालवणी, कोकणी म्हणजे कोकणात बोलल्या जाणा-या बोलीभाषा…… यांत संवाद सुरु होतो…..काही यांत नुसतेच जागा पकडण्यासाठी आलेले असतात…. त्यांची मात्र यांत पंचाईत होते….दरवाजे पॅक होऊन जातात… गाडी ईथून पुढे पनवेलाला थांबणार…. पण पनवेलवरुन रिटन गाडी कुठेय अपरात्री ठाण्याला यायला…. कसं कसं करत ही फक्त गाडीत जागा पकडण्यासाठी आलेली मंडळी बाहेर येतात… बाहेरुन खिडकीपाशी येतं आत आपली मंडळी नीट बसलीयतं ना यांची खातरजमा करतात…. जवळजवळ काही मिनिटातचं गाडी भरली जाते…. अगोदरपासुन कन्फर्म तिकीट झालेल्या प्रवासाच्या डब्यात आता ही ‘लाईन न लावलेली मंडळी’ शिरु पाहतात…. टीसी जर आला तर त्यांच्याशी मांडवली करायची तयारी ठेवत… काही जण पार एसी डब्यात घुसण्याचीही तयारी ठेवतात…. लोकं पटापट आत शिरतात… फक्त दहा मिनिटं गाडी थांबते….आत जागा भेटलेल्या माणसांना आता कधी एकदा ट्रेन सुरु होतेयं असं वाटू लागतं… इकडे जशी गाडी अकराला सुटली की लगेच पुढच्या क्षणाला उदयाच्या रात्रीच्या गाडीसाठी फुल स्केप काढत पेनाने नाव लिहायला सुरवात करतात…. इकडे ज्यांना गाडीत बसायला भेटलं नाही….. म्हणजे हेच की एवढं करुन सुदधा जर गाडीत जागा मिळाली नाही तर मग रात्री बाराची कोकणकन्या गाडी आहेच… .ही झालीं एका गाडीची त-हा……

अश्या वेगवेगळ्या गाडयासांठी वेगवेगळी कसरत करतात लोकं… का तर प्रवास सुखाचा होवो… नाही….! तर कमी पैशात कोकणात पोचता यावं यासाठी…. तो तर होणारचं… कोकणात आठ-नऊ तासात पोचतो सांगणा-या लोकांचा प्रवास प्रत्यक्षात आताही पार चोवीस-चोवीस तास अगोदरपासून प्रवास सुरु होतो…आणि ही परिस्थिती सध्या वर्षाच्या बारा महिने असते…लोक आता मिनिटामिनिटाला कोकणात जातात…कुणाचा फोन आला…. अडल्यानडल्याला, कुणाचं मयतं असो, कुणाचा बारसा असो… कुणाचा वाढदिवस असो……चला कोकणरेल्वेने…. एवढं असूनही खाजगी बसगाडया आणि एसटी यातूंन जाणा-याची संख्या प्रंचड आणि वाढत जाणारी…. आणि त्याचें ही दर चढेच… प्रवास रात्रीचा असला आणि गाडी मंगलोर असली की गप्प डोळे मिटायचे कारण गाडी कुठे थांबणारच नाही..नुसती हा बोगदा ….. तो बोगदा.. नुसती सुसाट… याउलट जर कोकण अनुभवतच जायचं तर दिवा सांवतवाडी पॅसेजरं सकाळची आठ वाजताची पकडा… याला ही लोक परिक्रमावाला प्रवास करतात….. तर रात्री दिव्याला गाडी येते सांवतवाडीहून हीच गाडी पुन्हा पनवेलला जाते… आणि तिथून पुन्हा सकाळी दिव्याला येते…. सांवतवाडीला जायला…. कळलं… .म्हणजे रात्र गाडीत बसून काढायची…. आणि उन्हाळात प्रवास करणारं असाल तर मग दिव्य वैगरे आयुष्यात काय असतं याचा प्रत्यय येईल…. तुम्हाला अनुभवायचं असेल तर नक्की करा प्रवास…. हो प्रवास जनरल डब्यातूनच करा…. जायची यायची वाट माणसांनी बसून बसून नाहीशी केल्यावर वाट कशी काढावी…. संडासात मोठा बोझा ठेवत त्यात कसा प्रवास करावा….तर असो… पण डब्यात खायची पायची रेलचेल असते…. मिनिटामिनिटाला समोसे, वडापाव, काकडी…पेप्सी…थंड पाण्याची बॉटल, हल्ली चायनीज भेळ…. सगळं भेटतं… कधी काळी भाऊच्या धक्कयावरुन मालवणच्या किना-याला बोटीने बोचकी घेऊन येणारा चाकरमानी… त्यानंतर…..एसटीच्या नागमोडी वळणाचा घाट उतरणाचा थकवा आणणारा प्रवास करणारा तोच चाकरमानी….. आता रेल्वेनं येता खरो…. पण तेका हे .दिवस दाखवल्यानं कुणी… बॅरिस्टर नाथ पै, दंडवते साहेबांनी स्वप्नं बघितलानी म्हणून हे दिवस… बाकी काही म्हणा…. पण हे ही खरचं त्यांनी इथला माणूस चांगला चोवीस चोवीस तास अगोदरपासून वेळ वाया घालवत निव्वळ कमी पैशातल्या तिकीटापायी कोकण रेल्वेने प्रवास करेल असा विचारदेखील केला नसेल ही खरी शोकांतिका आहे.. हेच आजचं वास्तव आहे…कसला ठोस विचार नाही… कुठला विचार पकडून ठेवावा… कुठला ठेवून न दयावा याबदलचं ठाम मत नाही… ठैवले अंनते तैसेची राहावे… जे खरचं पुढे गेलेत ते एकटेच पुढे गेले…. जे शहाणे झाले… ते स्वतःपुरतेच….काय बोलावं….विषय भरकटतात..

यावेळी हे असलं काहीच केलं नाही….मे महिन्यासाठीच्या स्पेशल गाडीची दोन दिवस अगोदरच घोषणा झाली…. आठवडयाचाचं मधला दिवस होता…. पण तरी तीन तासात गाडी बुक होऊन वेटिगं पण सुरू झाली…. भेटली तिकीट कन्फर्मवाली…. प्रिंट काढली तोच कागद म्हणजे तिकीट… सिल्पर क्लासने प्रवास….गाडी पनवेल स्टेशनवरुन रात्री पावणेबाराची…. बसलो गाडीत… तरी गाडी सुटायला वाजले… साडेबारा…. अपेक्षेप्रमाणे गाडीला सिग्नल भेटले…. नुसतेच बोगदे… प्रवास रात्रीचा असल्यामुळे खाण्याची रेलचेल कमी होती… पण बहुतेक सगळी लोकं गाढ झोपेत होती… सिल्पर क्लासच तो…. मी मात्र नुसतीच ती पळणारी झाड त्या अंधारात पाहत होतो… समोरच्या त्या खिडकीबाहेर… कुठेतरी नुसताच मिणमिणारा बल्ब दिसतो…. कुठेतरी रेल्वेशी संमातर जाणारी नक्कीच गावाकडे निघालेली भलीमोठी सामानाचीं गर्दी टपावर घेतलेली चार चाकी दिसते…. कधीकाळी वर्ल्ड बॅकनेसुदधा नाकारलेला प्रोजेक्ट….आणि आज या रेल्वेमार्गचं मूर्त स्वरुप….एकदा का दुहेरीकरण झालं की प्रवास अजून जलद होईल…. हल्ली उन्हाळी सुटटीच्या काळात गावाला जाणा-याची संख्या जास्त त्यामुळे गाडया जास्त… मग सिग्नल जास्त… आमची गाडी लेट झाली… तळकोकणात एकदाची ट्रेन पोचत आलीय…… कोकणची माती…. लांबलांबपर्यंत दिसणारं रानोमाळं…. मध्येच नजरेस पडणारी…. नारळाची झाडं…. अजूनही साखरझोपेत असलेली गावं…. तिथली ती कोबंडयाची बांग…. मंदिराच्या कळसावरचा फडकता झेंडा, फारच लवकर उठत शेतकामासाठी आलेली माणसं… हलकाच येणारा अजानचा आवाज…. सगळं काही डोळे आणि कान अधोरिखित करत चाललायं… रेल्वेप्रवासात जे काय समोर दिसत चालयं ते मन साठवून घेत होतं…… सकाळचे सहा वाजलेत…. जी चार स्टॉप गाडी घेणार होती म्हणजे आमचा स्टॉप येईल त्यांपैकी तीन झाले होतें… गाडीने रत्नागिरी पार करुन एक तास झालायं…. पुढचा स्टॉप कणकवली…. डोक्यात तेच होतं… राजापूर सोडलं…गाडीने….आणि काय….??? गाडी वैभववाडीला थांबली… अनपेक्षित… इथूंन उतरुन पुढे गावाला जाणं अधिक सोपं होतं…आणि आम्ही उतरलो…आणि बाकीचे खूप जण उतरले….आता खूप दिवसांनी गावाला आलो होतो….नाही खूप वर्षांनी….तिथूंन त्या रेल्वेस्टेशनवरुन पुढचा प्रवास तळेरे एस.टी स्टँड गाठणं…

तसं वैभववाडी रेल्वेस्थानकात उतरलो तसं…तो मातीचा वास….कोकणात आल्याचं फील देतं….लाल लाल माती….झाडाचं झाडं….चि-याची कौलारु घर… वैभववाडी रेल्वेस्टेशनवरुन…. एसटीस्टॅड गाठणं…. गरजेचं होतं… तीन सीटर जिला ‘तीनचाकी’, ‘टमटम’ म्हणतात…. ती पकडायची होती…. अशी मध्येच सात वाजता रेल्वे वैभववाडी स्टेशनला येणारं आहे यांचा कुणालाही अंदाज नव्हता. त्यामुळे एक दोघेचं टमटमवाले उभे होतें…माणसं भराभरा भरली जातं होती टमटममध्ये… सामानाचे बोझा टमटमच्या वरती टाकले जातं होते…. जागेपेक्षा जास्त माणसं भरली जातं होती…. एकदाची टमटम निघाली…. माझी जागा ड्राईव्हरच्या बाजूची…. ”फाटफटी दोनदा येवूंन गेलयं….गरमी काय होता हा….अंगात पाणी रहोकाय नाय…” ड्राईव्हर आपला सांगत सुटला….रस्ता सगळा मोकळा होता… फक्त चौदा किलोमीटरचं अंतर… रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाड.. मागे-पुढे दुसरं कोणी नाही….सगळं शांत….त्या टमटमचा एकसुरी आवाज आता कानात घुमू लागला… कधी एकदा गाव गाठतोय असं वाटतं होतं… प्रवास ट्रेनचा असल्यामुळे असं काही विशेष ताणतणाव आता इथं टमटममध्ये बसल्यावर वाटत नव्हता… आलं तळेरे… कोल्हापूर एकशे पंचवीस किलोमीटर…. मुबंई पाचशे चाळीस किलोमीटर….. निपाणी एकशे ऐशीं किलोमीटर आणि पणजी एकशे दहा किलोमीटर… तळेरेच्या त्या रस्त्यावरच्या चौकातल्या मोठाल्या फलकावर लिहलं होतं…तळेरे आलं…टमटमचा प्रवास संपला… गावाकडे जाणारी एस टी याच एसटीस्टॅडवरुन जाणारी….. टमटममधून बाहेर आलो म्हणजे संगळेच उतरले……प्रत्येकी तीस रुपयांची मागणी झाली….सगळीच लोकं कमी करायला सांगत होती…”अहो काय परवडत नाय माका….मुंबईवाल्यानी उलटा खुशून होऊन दयेवक हवास…माझा डिझेल पण सुटोचा नाय हेच्यात” एकदाचा व्हवहार संपला…. झालं आता ते सगळेच बोझ्या आणि बाकी सामान घेवून तिथं मिनिटावर असलेल्या एसटी स्टॅडपाशी आलो… तिथं एक मोठा बॅनर लावला होता… कसला तरी महायज्ञ होणार होता जवळचं… सगळे कार्यक्रमस्थळावरच्या विधीची माहिती लिहिली होती…. बाजूलाच मोठा डेक लावला होता… अजून तो सुरु झाला नव्हता… चौकशी केली बसडेपोमध्ये जात….. गाडी कधीची आहे गावाला जाणारी म्हणून…..आठ दहाची डायरेक्ट गावाला जाणारी गाडी होती…. हायसं वाटलं… खूप सारी लोकं खाजगी बसने जाणं या करता पंसत करतात…… का तर डायरेक्ट गावात गाडी जाते… असा रेल्वे…टमटम…..एसटीचा प्रवास करावा लागत नाही…

एसटी आली… डेपोतून घोषणा झाली….पटापट आत जागा पटकावली आणि सामान ठेवलं… गरमी खरचं वाढत चालली होती… एकतर खूपच पाठीमागे बसलो… हो जिथं खालती चाक असतं तिथंचं…. आणि त्यात गरमी वाढत होती…. वारा यायचा प्रश्नचं नव्हता… रुमाल भिजत आला….आठ वाजता गाडीत बसलो…. गाडी आठ वीसला निघणार…..तळेरे- विजयदुर्ग गाडी हा चला….चला चला…कंडक्टर बेल वाजवत होता… वैताग आला होता… पण पर्याय नव्हता…. निघाली एकदाची एसटी… पार माणसाचं माणसं… गाडी निघेपर्यंत साडेआठ झाले… गाडी एसटी स्टॅडमधून बाहेर पडताना निवृत्ती महाराजाच्या कीर्तनाचा कार्यक्रम असल्याचा बॅनर दिसला… सध्या युटयूबमुळे सगळ्यांच्या परिचयाचं नावं… राजकीय पक्ष निवडणुक जिकंण्यासाठी यांचे कीर्तनाचे कार्यक्रम भरवतात…..पब्लिक पण खूश आणि नेतेही…..कोकणात कश्यासाठी आलेत कुणास ठाऊक…… कोकणात येऊन हुंडा, आत्महत्या, संसार, मोबाईल, नातेवाईक…असं बरचं काही सांगणार होतें…. चला गाडी निघाली….. वळणावळणाची नागमोडी वाट आणि त्यातून वाट काढत जाणारा एसटी चालक… त्याला रस्त्यावरच्या खडडाची कोणतीच पर्वा नव्हती…. मी आणि बाकी त्या सीटवर बसणारे उडतच होतो……आणि जोरात बसत होतो…पुढच्या सीटवर एक उत्तर भारतीय बसला होता तो विजयदुर्गला जाणारा होता…. तिथं त्यांच्या शेठने बेकरी टाकलीय…. तो तिथं काम करतो…. बाजूला बसलेला माणूस सगळी माहिती गोळा करत होता… सगळ्या संवादातले सवाल मालवणीमिश्रित हिंदीत आणि जबाब भोजपुरीमिश्रित हिंदीत चालू होती… वो आटा कहासे आता है…. वो कोल्हापूरसे लाते है…. इत्यादी इत्यादी…..राहून राहून वाटत होतं… आपण पोटयापाण्यासाठी…. शिक्षणासाठी… मुंबईला… खुराडयात जगतोय… इथं असा स्वर्ग असताना आणि कुणीतरी पार पंधराशे किलोमीटर आपल्या या कोकणभूमीत येतं…. पोटापाण्यासाठी… आपलं खरचं काही चुकलं का….नेमकं काय चुकलं….

काही ठिकाणी आंब्याच्या कॅनिगसाठीचे बॅनर लागले होते….काही ठिकाणी सहर्ष स्वागताचे बॅनर होते…आंब्याच्या कलमाच्या बागाच बागा….काजूची झाडं… नारळा पोफळीच्या बागा… एका ना एका रस्त्याला हे लागतचं होतं….याशिवाय कुठे कुठे नसुतचं दूरदूरवर मोकळ रानं…… तिथं सिनेमात दाखवतात तशी बंगलाटाईप ‘चि-यातच’ बांधत सिमेंटचा मुलामा दिलेली ‘स्लॅप’ची घर बांधली होती…. त्यांला आपल्या खापरपणजोबा, पणजोबा, आई-वडीलाची पुण्याई त्यांच्या नावापुढे लिहेलेली दिसत होती… घराघरावर कोणत्या ना कोणत्या डिशटीव्ही कंपनीचा एटिना दिसत होता…. पार सकाळचे साडेनऊ वाजत आले… एसटीच्या खिडकीतून दत्तमंदिर दिसलं.. अजून थोडाच वेळ उरला होता गावाकडचा तिठाला जाण्यासाठी … प्रत्येक थांब्यापाशी सरकारनं शेड बांधल्यायत….. प्रवाशांना गाडीची वाट बघत बसण्यासाठी….बसण्याची जागा पण सिमेंटची… वरचं छप्पर पण सिमेंटचं… आता तिठयावर आली गाडी….इथूनं आतमध्ये खालती गाव पाच किलोमीटरवर…..सगळीकडे उघडा माळ… दूरदूरवर काहीचं नाही… उन्हामुळे फिकट सफेद झालेलं गवतं… जाभ्यां दगड… आणि काही ठराविक ठिकाणी नव्याने लावलेली चार वर्षात उत्पन्न देणारी नव्या जातीची आंबाची कलम…. तिठयापाशी मागच्या वेळी नसलेल्या दोन गोष्टी दिसल्या… एक गॅरेज…आणि दुसरं चायनीजचं दुकान… आणि अजून एक राहिलं सुटं पेट्रोल आणि डिझेलचं दुकान…. जे जे शहरात आहे ते गावात हवं म्हणून आलेल्या गोष्टीपैकी सध्या या गोष्टीं प्रकर्षाने जाणवल्या…. त्या तिठयावरुन गावात प्रवेश करायच्या रस्त्यावर खूप मोठा फलक लावलाय…. बाळशास्त्री जांभेकर याचं जन्मस्थान…आणि प्रसिदध धबधबा…..शाळेत असताना…. मराठीतले पहिले वृत्तपत्र कोणी काढलं असा प्रश्न विचारला…..तेव्हा हे नाव लक्षात राहिलं….. एवढया मोठया माणसाचं जन्मस्थान आपल्या गावात…. कधी ऐकलंच नव्हतं….मला याबदल शंका होती…..एवढां मोठा विदवान माणूस आपल्या गावात… मनात विषय घोळत राहिला…. आणि गावात प्रसिदध धबधबा आहे…पावसाळी….धबधब्याचा उल्लेख मागच्या दोन-तीन वर्षापासून सुरु झाला…..या दोन्ही गोष्टीबदल कधीच याअगोदर अभिमानाने सांगितलंच नव्हतं…..म्हटलं नेटवर बघू तर… नेटवर्क गेलं होतं….गावी आल्याचं ख-या अर्थाने जाणवू लागलं…..

………………………………………………………

तिठयापासूनच्या गावाकडच्या रस्त्याची नुसती चाळण झालेली… गाव सुरु होत होता….काही लोकांनी आता वेगळं होतं बाहेर रानमाळावर एकटयाचचं घर बांधायला सुरवात केली होती…त्यातलंच एक घर दिसलं…एकदम बंगला टाईप…..गावात फक्त काही सण-संभारभ असेल तेव्हाचं येतात…..हळूहळू इथंही वस्ती वाढेल… नंतर लागतो तो हा उतरंडीचा रस्ता… एसटी एकदम थाटात चालली होती… आता उंचावरुन गावाकडची नदी साफ दिसत होती….रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा वेगळी करणारी…वाघोटण नदी….हे आठवलं की मग माजी मुख्यंमंत्री अंतुले आठवतात….बॅरिस्टर अंतुले….पोलीसांची हाफ पॅन्ट फुल पॅन्ट करणारे, कुलाबाचं नाव रायगड जिल्हा करणारे… सिमेंट घोटाळयात नाव आल्यामुळे राजीनामा दयावा लागलेले…. निधनाअगोदरच्या मंत्रीपदावेळी अल्पसंख्याक खांत दिल्याबदल नाराज असलेले, बाळासाहेब ठाकरेच्या तोंडी झटपट निर्णय घेणारा मुख्यंमंत्री म्हणून ऐकलेले…असे अंतुले….त्यांनीच या रत्नागिरी जिल्हांची विभागणी करत नवा सिंधुदुर्ग जिल्हा तयार केला… त्याला विभागणारी ही नदी…. त्यांला लागून असलेली शेकडोच्या संख्येनी असलेली नारळाची झाड…. सगळं काही अस्सल जातीवंत निसर्ग सौंदर्य…..तर आता या एसटीच्या खिडकीतून वाडीतली घर, मळाशेती इतकं उंचावरुन एवढं तळहाताएवढं दिसत होतं… गावठणवाडी, बौदधवाडी आणि नंतर आमची वाडी… पुन्हा उतरडीचा रस्ता…. देवीचं मंदिर… आलं…. घर दिसलं….एसटी थांबली… सामनं उतरवलं…. सकाळचे दहा वाजले….सगळचं शांत…शांत…बाकी शहराकडचा कोणताही गडबडीचा माहौल ईथे नाही… संगळ काही सुशेगादी माहौलात… होतयं…जातयं…कश्याची घाई नाही… सगळीकडे शांतता… काल रात्री पनवेल स्टेशनवरचा माणसांचा गोंगाट कुठे…. आणि हा त्यांच्या अगदी विरोधातला कानाला सवय नसलेला शांततेचा आवाज…… इथूंनच जग बनवायला घेतलयं की काय इतकी शांतता… अश्या शांततेची कानाला सवय नसते शहरात राहिल्यामुळे…..एकदम शांत शांत….बाकी दुनिया अगदी पेटलेली असेल-नसेल तरी त्याचें पडसाद पडणार नाही इतकं शांत… एकदम खालती आतल्या बाजूला नदीकाठची गावं बाकी जगाचा कुठलाचं थांगपत्ता लागू न देणारी……. आपण काल कुठे होतो आणि आज कुठे…. प्रवास……अस्तित्व….स्थिंत्यातंर.. यांची जाणीव असण्यासाठी फक्त तुम्ही जिवंत असणं गरजेचं… मनात काही-बाही विचार येतात…. रस्त्याच्यासमोर घर असल्यामुळे वाहनाची वर्दळ चालूच असते. गावातून तीन रस्ते गेलेत…एक विजयदुर्गला जातो…..दुसरा नदीपाशी येऊन थांबतो….त्याला सगळे बंदर अस म्हणतात…त्या भागात मुस्लीमांची वस्ती आहे….एक मोठी मशीदही आहे…..इथेचं आठवडयाचा बाजार रविवारी भरतो… खास गावची सुकटा, खारें बांगडे या बाजारातच भेटतात… नदीच्या पलीकडे राजापूर तालुका लागतो… नदीच्या दोन्ही किना-याला नाराळाची झाड…. तिकडे पलीकडे होडीने जाता येतं….आणि तिसरा रस्ता विरोधी बाजूचा तो खारेपाटणला जातो…..खारेपाटणवरुन राजापूरला जात मुंबईला जाता येतं…. पूर्वी घरासमोरुन थेट दिसणा-या देवीच्या मंदिरासमोर आता काहीजणांनी मोकळ्या जमिनीवर घर बांधलेली दिसत होती…

इतरवेळी घर बंद असतं… सगळं धूळीने, कोळीष्टानानें माखलेलं…चिराचं घरं…. चार खणात व्यापलेलं.. बाहेरची पडवी….ओटी.. एक जेवणाची खोली त्यातचं न्हाणीघर…..आणि एक अडगळीची खोली….अजूनही चिरे शाबूत आहेत… कौलं मात्र थोडीशी व्यस्कळीत झालीयतं… पावसाळ्यात बंद घरात पाणी येतं ….…घरासमोर खळं… खळ्यात माडाचं एक झाड… वरच्या विजेच्या तारेला घाबरुन बाजूला सरकलेलं…..झाडात जीव असतो हे तेव्हा पहिल्यादा कळालं होतं…. मोरीतलं पाणी या माडात जातं…. पूर्वी आबोली, गुलाबाची झाडं होती… सतत पाणी नसल्यामुळे मग जातात कोमेजून…..नुसत्या आठवणी जाग्या होतात… इतक्यात समोरच्या रस्तावर अजून एक एसटी आली…. देवगडला जाणारी… घरासमोरुन सतत एक-एक तासाने कोणती ना कोणती एसटी जात राहते… आजच्या घडीला गावातून सहा गाडया संध्याकाळी पाचवाजेपर्यंत जातात… कोल्हापूरला जाणारी, पंढरपूरला जाणारी…. याशिवाय मुक्कामाची गावातून तालुक्याला सुटणारी देवगड एसटी….. ती संध्याकाळी शेवटी येते….त्या एसटीचे चालक-मालक वस्तीला गावातच असतात….कुठे जेवतात..कुठे झोपतात….काय माहितं….. खास मुंबई स्पेशल बोरीवलीला जाणारी गाडी गावातून जातें… विरार-नालासोपा-याला जाणारी लोकं यानें जात नाही… खाजगी बस थेट पोचवतात विरारला… सीझनला हजार रुपये घेतात…. एका माणसाचें.….

घरातल्या मोठया खिडकीतून…. गाडीसाठी वाट पाहणारी लोक आणि गाडीतून उतरणारी लोक यांना पाहत बसायचं….. हा मघासपासून शांत-शांत असणारा माहौल का आहे हे थोडयावेळाने कळतं..लाईट गेलीय… आठवडयातला एक दिवस लाईट जाण्याचा असतो… आज तो होता… संध्याकाळी लाईट येणारं…. त्याने विशेष काही अडत नाही… रस्त्याच्या अलीकडे पूर्वी एकच किराणामालाचं दुकान होतं…. आता तीन झालीयतं…… दार उघडलं…. दिसलं की रस्त्यावर घर असल्यामुळे कोणीनाकोणी येतं राहतं…… असं मुबंईवरुन कोणी आलं की आपली मुलं मुबंईला असलेले गाववाले चौकशी करायला येतात “आमच्या झिल्यानं काय भॅट दिल्यानं हा की….उतार दिलान हा की….”, ”भेटलो हूतो की”…..तरी फोनवर बोलणं झालेलं असतं पण कुणीतरी प्रत्यक्ष भेटून बरं आहे सांगितलं की खरं समाधान वाटतं….

आता गावात प्रत्येकाच्या घरात मोबाईल आहे…पोस्टमन आता रिकामी असतो….तो आता केवळ….पोस्टातली खात्यात रक्कम गुंतूवणुकीची काम करतो… गावात एक जिल्हा बॅक देखील आहे….त्यांच्या अगदी लागून रस्त्यापलीकडे…. शाळा आहे….पण जिल्हा परिषदेची आहे का ती माहित नाही …..ती दहावीपर्यंत…. इंजिनिअरीगं वैगेरे करायचं असेल तर… जिल्हा सोडावा लागतो….मुंबई नाहीतर सगळ्यात जवळचा म्हणून रत्नागिरी जिल्हा गाठतात …..एका घराआड टी.व्ही आणि दारासमोर दुचाकी दिसते… घरात लादी दिसते…..चूल अजूनही पेटते….पूर्वी लाकडं सडयावरुन, मोळी डोक्यावर घेत दहा-पंधरा खेपा घालत आणायचे…. आता सडयावर चार चाकी जाण्याइतपत रस्ता केलायं…. छोटा टेम्पो भाडयाने घेत लाकडाच्या मोळ्या आणल्या जातात…. पण शेगडी असणारी घरही वाढलीयतं…….खूप सारी जण आता रिटायर होऊन नुसतेच गावाला येऊन बसलेयत…. त्यांनी हा गाव थोडा बदलायं…. बाकी भाऊबंदकी आहे….. वाडीवाडीतले वाद-विवाद आहे….जमीनीवरुन वांदग आहेत…. देव-देवस्कीच्या नावाने भंडावून गेलेली कुंटूब आहेत….. पाण्यासाठी विहीरवर आता कुणी जात नाही…एकमेकांची जात मात्र लक्षात ठेऊन आहेत…. रोटीसाठी आता जात शिथील आहे….. बेटीसाठी नाही…..एकमेकांपेक्षा एकमेक वरचढ आहेत हे डोक्यात शाबूत ठेवलयं….ते सगळं जातीत मोजलं जातं…..बौदध लोकं आता गणपती आणत नाहीत…. ही लोक आपल्यापेक्षा कमीच आहे असा मानणारा खूप मोठा वर्ग आहे…. महाराष्ट्रातल्या पुरोगामी लोकांची पंरपरा, समाजसुधारक सगळे कमी पडतील एवढे ते या गोष्टींत अडून बसलेत…. आपलं गाव हेच जग असल्यासारखे वागणारे….. जात देवाने तयार केले सांगणारे….आपण आपल्या जातीतच राहायला हवं सांगणारे….. देवळ्यातल्या उत्सवात त्यांना सहभाग म्हणून बोलवं जातं पण मान देण्याची पदधत आतून येतं नाही हे त्यांनाही कळ्तं त्यामुळे बौदधवाडीचा वावर यात नगण्य असतो…..यांना प्रबोधकार ठाकरेंची पुस्तक घोकून घोकून वाचून काढायला लावली पाहिजे…..च्यायला….

एकेकाळी देवळात विशिष्ट जागेवरुनच त्यांना देवाचं दर्शन करण्यास दिली जाई…. करवंटीतून पाणी दिलं जाई….. काही नालायक लोकांनी आजही त्या जागा, रीती तश्याच त्यांच्यासाठीच्या म्हणत मोकळ्या ठेवल्यात… च्युत्याया साले… शहरातं सगळीकडे जात संपली म्हणून टाहो फोडणारे इथं मात्र सपशेल मार खातात…..कोणीही विरोध करत नाही….इथल्याही बाईक, गाडयावर जातीची अभिमानीत उल्लेख सगळीकडच्यासारखे सापडतात….

वाडीत कोंबडी, बक-याचं मटण खाल्लं जात नाही, कोबंडी, अंडी यांचा स्पर्श निषिदध मानला जातो…. देवाला चालत नाही त्यामुळे कुणी खात नाही, पिढयानपिढया रीत चालत आलीयं…. कुणी खाल्लं तर अनुभव वाईट येतो… नवविवाहीत म्हणून आलेल्या वधूस ही हा नियम लागू होतो…. तिला सासरच्या कुळातले खाण्याचे नियम पाळणं बंधनकार आहेत…. कोणी ते मोडतही नाही…… साळींदर, डुक्कर, भेकरं, ससा, कवडे, बगळे, घोरपड याचं मटण खाण्यास मुभा आहे. यात डुक्कर प्रामुख्याने खाल्ला जातो…. आता पहिल्यासारखी शिकार होतं नाही….सरकारच्या आणि पोलीसाच्या पाळतीने बंदूका जप्त होतात….पण शिकारीच्या रंजक कथा मात्र साठवून साठवून आठवणीने सांगितल्या जातात. मुंबईत येऊन खूप लोकांनी हे कोंबडी बकरीच्या मटणाचे आणि अंडया संबधितचे नियम तोडल्याचें बोलले जाते…..त्यांची घरदारं, संसार उदधवस्त झाल्याचं सांगितलं जातं…..

नळ्यानं पाणी येतं वाडीत….. पाईपलाईन टाकलीय वरच्या तलावापासून… इतरवेळी विहीरवर पाण्यासाठी असलेली बायकांची गर्दी आता केवळ कपडे धुण्यासाठी असते… या अगोदर उन्हाळ्यात पाण्यासाठी प्रचंड वणवण व्हायची… बोरीगंवर रांगा लागायच्या….. मुंबईतले लोक मे महिन्यात गावाला यायला टाळायेच… त्या आटलेल्या विहिरीची पूजा केली जायची…..विहिरवर पाच दिवसही कावळा शिवलेल्या बायका जातात त्यांचमुळे भष्टकार होतो त्यामुळे पाणी आटत असं सांगायचे लोक….पण आता विहिर तशीच भरलेली असते… त्यामुळे पूजाही होत नाही…. बाकीच्या वाडीची परिस्थिती मात्र वाईट आहे…. तिकडे ही पूजा होते अजूनतरी…..

ती गेलेली लाईट जशी आली तशी मोठया डेकवर गाणी सुरु झाली.. सध्या लग्नाचा माहौल होता…. ”गीता होती दूरन पाहत……. नितीन होता मंडपात, आणि मुलगी दयाला का हो आम्हाला, नको तो हुंडा” सारखी गाणी रिपिट रिपिट वाजवली जातात…’राज’, ’दिल’, ’जिगर’, ’दिवाना’ चित्रपटांतली सगळी गाणी वाजवणारा एक तरुणपणा ओसरलेला गट इथं आहे… याशिवाय सकाळी आंघोळ करायला तेवढे घरी जात बाकी दिवस-रात्र गावातल्या देवळात तिथल्या त्या मंडपात मस्त पंख्याखाली लोळत बसतं दिवस घालवणारी एक पिढीही ईथे आहे….. नुसत्या जीन्स पॅन्टी घालून गावगजाली करणारे हेच ते….. यांना चि-या तासण्यात कमीपणा वाटतो…. फार-तर-फार कलमाच्या शिपण्यांच्या कामाला जातात….. तिथंही कधी नियमितपणा नाही…. शिक्षणाच्या नावाने तालुका गाठवा लागतो किंवा मग निमशहर….आणि दवाखाना….दवाखाना म्हटलं की ओरस किंवा थेट मुबंई….कोकणातली बहुतेक माणसं…..शिक्षण आणि नोकरीसाठीचं स्थलांतरित होतात….यातली फारजण शाळा सोडल्यावर थेट मुबंईत कुण्या ओळखीच्याकडे राहत हाऊसकिंपिगची, छोटी मोठी मेहनतीची काम सुरवातीला करायला लागतात…. एकदा का सवय झाली की विरार-नालासोपाराच्या लोकलची भिती राहत नाही…..मग या पसरलेल्या मुंबईत घर हवं म्हणून…..गावच्या जमिनीचा एखादा तुकडा विकायला किंवा एखादी कलमाची बाग दहा वर्षासाठी गहाण ठेवायला घरच्या म्हाता-या वडीलधा-यां माणसांना सांगतात…. सध्या लोकं हे असं जमीन विकायला मागे पाहत नाही… एकदा का मुंबईत खोली झाली की लग्न होणं सोपं होऊन जातं…. एवढं सगळं होत असेल तर उत्तर भारतीयांना कोकणातल्या मातीत लाल डब्याच्या एसटीत बघून दचकण्याची काही गरज उरतं नाही…. साला आपलं काय चुकतं तेच कळतं नाही…..त्यातले काही असतात त्यानां तिथं मुंबई रुचत नाही….. मग ते गावाला येतात…. आता शेती कोणी करायला मागत नाहीत…..केली तरी नांगरणी वैगरे सगळं ट्रक्टरने होतं…..त्यासाठी देखील माणसं शोधावी लागतात….. आंबा बागायदाराजवळ गडी माणसं टिकत नाहीत… बाहेरुन नेपाळवरुन लोक बोलवतात…. ती त्यामानाने स्वस्तात आणि चोवीस तास हजर असतात…. वर्षाला तीन-तीन लाख रुपये नेपाळला नेत असल्याच्या बातम्या येतात कानावर….

दरवर्षी प्रमाणे आंबा पिकवणारा हया ही खेपेस….”यावेळका काय आंबो येवक नाय जसो मागच्या टाईमक इलो होतो….सगळा पावसानं धुवून निघाला…..आणि फळ तरी येवंक हवाना….सगळो आंबो आता कल्हाटावरचो…शिरापडो देत ती….कुणा पावण्याक दोन फोडा कापून देऊक नको की आपली मान खाली जाता लाजेन….सगळी आतून कापा खराब….” भरघोस पिकांच्या हव्यासापायी जादा खत झिपारत आलेलं फळ नुसतचं आंबा बनून येतं नाही….तरीदेखील आंबा असतो….तरीदेखील यंदाचा आंबा कमी येण्याचा गजर काही संपत नाही…..मुंबईत वाशीला, दलालाकडे हापूस पाठवण्याइतपत धीर किंवा आंब्याची पत राखली जात नसेल तर किलोवर आंबे घ्यायला कोल्हापूर, पुण्यापासूनची छोटया टॅम्पोत वजनावर आंबे घेत रोख पैसे देणारे कॅनिगवाले….ते या आंब्याचं काय करतात हे असले प्रश्न पडत नाहीत….

लग्नाच्या जेवणात पहिला मान हा नवरीकडच्या पाहुणे मंडळीना दिला जातो… लग्नात अक्षता टाकल्यापासूनचं जेवण्याकडे पाय वळू लागतात…. जेवण्यापासूनचं श्लोक म्हटले जातात… अख्खं जेवण संपेपर्यंत श्लोक सुरुच असतात…. बृहस्पतिदेव हर हर महादेव… एकामागोमाग एक-एक जण म्हणतचं सुटतं…. तोंड चालू असताना कान ऐकण्याची तसदी घेत नाही….

हरीच्या घरी शेवया तूप पोळ्या… हरी वाढितो ब्राम्हणां वेळोवेळा…. असे ब्राम्हण जेवुनि तृप्त झाले… विडा दक्षिणा देवुनि बोळविले….”

जेवणात फणसाची भाजी कोणी खातं नाही, कोबी आवडीने खातात….चवळीला आता कॅप्सुल म्हणतात….गोडी डाळ वाढून झाल्यावर त्याच जेवण्यास बसलेल्याने भात मागितला की पुढच्या खेपेस तिखट सांबार वाढण्याची पदधत आहे जेणेकरुन जेवणारा आटोपशीर जेवेल… याशिवाय जेवणात हल्ली जिलेबी किवां बुंदीची प्रथा वाढत चाललीय…. जेवण पत्रावळीतच वाढलं जातं… काही लोक मुंबईवरुन थर्माकोलची ताट आणतात… वाढपी म्हणून वाडीतलेच लोक एकमेकांना जेवण वाढतात… एवढं असूनसुदधा तालुकाच्या ठिकाणी मंगलकार्यासाठीच्या हॉलची संख्या वाढलीय… लोक आता जेवण बनवण्यासाठी एकमेकांकडे मदत करायला पहिल्यासारखे उत्सुक नसतात… शहराकडे आइसक्रीमवर आटोपणारा लग्नाचां खर्च करण्याच्या विचारात आता गावाकडचीही लोक दिसतात …..पण तूर्तास तसं होणं दिसतं नाही… नवरीमुलगी आजही लग्नाच्या शेवटी निरोपसंभारभात बेफाम रडते….. अख्खी वाडी तिला आणि नव-याला बघायला रस्त्यावर गर्दी जमते…..थरमाकॉलवर नाव लिहेलेल्या कारमध्ये ते दोघं बसले रे बसले की तसेच लोकं वापस आपआपल्या घरी जातात…. बाकी लग्नाचं व-हाड हे मोठया ट्रकऐवजी छोटा हत्ती टाईप टेम्पोने हल्ली नेतात….बरं पडतं….न्यायला आणायला….

साखुरपडयाला नव-यामुलाकडच्या माणसांना खळ्यात बसवलं जातं…. नवरीकडचे लोक समोर पलीकडे बसतात…. पुढारी आणि नव-या मुलालां खुर्च्या दिल्या जातात बसायला…..… हिरव्या पानाचे विडे मांडले जातात… समईत तेल टाकून पेटवली जाते… आतल्या खोलीत बायका नवरीमुलीची तयारी करत असतात…. सोपस्कार म्हणून कुणी एक जण नवरीच्या बाजूचा विषय काढतो “….अरे अमक्या अमक्याची पोरगी लग्नासाठी हा, तेव्हा कोण पोरगो असलो तरं सांगा…”. मग समोर नव-याकडे बसलेला पुढारी “हा तर एक जण……अमक्या अमक्याचो…पोरगो हां“ अशी बोलणी सुरु होते…. “देवघेवचा काय…म्हणजे दागदागिने काय देणारं….नव-यामुलाकं अंगठी पोशाख काय देणारं…“…मग लगेच उत्तर येतं…..“तेची बोलणी झालेली हंत…“ “मग असा हा ना तर मग पोरगीगं बोलवा…“ मग नवरीमुलगी येते….तिथं असलेल्या पुढा-याच्या पाया पडते..काय प्रश्न असतील तर विचारा सांगितलं जात….नवरा मुलगा प्रश्न विचारायला लाजतो….तिथं बायका मागच्या खिडकीतून हे संगळ बंघत असतात….नव-याकडचा पुढारी मग विचारतो, “शिक्षण किती झालयं….बारावी पास…“ नापास असले तरी हेच सांगतात..कुणी रिझल्ट मांगत नाही….“आणि शिक्षण काय करुचा हा ?… कामाक माणूस भेटला बसं झाला.. जेवण येता काय विचार…“ नव-या मुलाकडच्याचीं टेर खेचतात…..या सा-यांत ते देवाचे विडे काढणारे दोन्हीकडचें प्रमुख चाचपणी करत सगळे रितीरिवाज पार झालेत ना यांची खातरजमा करतात… मग नव-या मुलाच्या भावाने नव-या मुलीलां अंगठी घालायची प्रथा आहे ती आता बदलीयं, आता नवरामुलगासुदधा अंगठी घालतो नवरीला…आता चाय नी खडखडे लाडू वाटले जातात….आणि काही राहिलं का यांची खातरजमा करतात…यांत तो एकजण असतो तो व्हिडोओ शूट करत असतो….. हल्ली या मंडळीशिवाय लग्न विधी सुरु आणि संपत नाहीत…..याशिवाय बाकी हौशी मंडळी मोबाईलवरुन हे शूट करतच असतात….नवरा मुलगा हा मुंबईला असणा-यालाच अरेज मॅरेजच्या स्थळात मुलींच्या बाजूने होकार येतो…..मुंबईचं स्वर्ग आहे….तेच अंतिम ध्येय आहे असं इंथला खूप मोठा समाज मानतो… मुंबईला असलं की शेतीतलं काम, शेण, गोठा, शेती ही हलकी काम करायला आपल्या पोरीला लागणार नाहीत यांसाठी…..नुसते गावात कमवणा-या तरुणांना मुलगी भेटणं मुश्कील झालयं…..मुंबईला खोली असणा-याचं तर पायघडी घालूनच स्वागत करतात नवरीमुलीकडली लोकं…..

वाडीतल्या देवीच्या मंदिरात आता देवीचा वर्धापन दिन

देवीच्या वाढदिवस करण्याची प्रथा काही वर्षांपूर्वी सुरु झाली, यंदाही वर्धापन दिनांचा कार्यक्रम होता….देवीची विधीवत पूजा केली जाते, काही सांस्कृतिक कार्यक्रमदेखील असतात…रेकार्डडान्स वैगरे वैगेरे…यंदा फेसबुक लाईव्ह करणार आहेत खास न येऊ शकलेल्या चाकरमान्यासाठी……या सांस्कृतिक कार्यक्रमात डबलबारी असणं कम्पलसरी असतं… त्यातही महिल्यांच्या डबलबारी भजनानां प्रचंड मागणी आहे….. वर्धापन दिनांचा कार्यक्रम या वर्षीही जोमानं आणि कोणतहीं विघ्न न होता होणं गरजेचं आहे कारण या कार्यक्रमला काही लोकांनी आक्षेप घेतला… ती एका वाडीची लोकं आहेत….. त्याचं म्हणणं होतं हे देऊळ त्यांच्या वाडवडिलाचं आहे…..आणि बाकीचे लोकं म्हणजे आमच्या वाडीतले लोकं म्हणतं देऊळ आमचयं…..वाद वाढत गेला…..हे सगळं कश्यासाठी तर सण-संभारभात निशाणी घेवून फिरवण्यासाठी, आणि देऊळात दर्शनासाठी आलेल्या भाविकाने देलेल्या दानावर होणा-या उत्पन्नाच्या हिश्यासाठी… तर नाही…. आपलचं वर्चस्व असावं…. या हटापायी चाललेला निरर्थक वाद…. वाद खूपच वाढत गेले…. सांगा काय झालं असेल…. वाद कोर्टात गेला…. देव, देवपण, स्वत्व, बंधुभाव, आपुलकी राहिली बाजूला….. आणि काहीतरी अजून भलतचं एकमेकांची पार आय-माय काढली…एकमेकाला इंडिया-पाकिस्तान म्हणत एकमेकांसमोर मारामारी करण्यासाठी उभे ठाकले…..यात मग त्या एका वाडीतल्या कोणत्याही माणसांशी न बोलणं, पैशाचे आणि कामाबाबतीचे व्हवहार बंद करायचे ठरले…. त्या वाडीत पिठाची गिरणी होती… त्यांला या वादाचा फटका बसला…. त्यांचा भरवशाचा रोजगार बुडला…. आणि या वाडीतली एकाची पिठाची गिरणी जोरात चालू लागली…. याशिवाय काही इकडचे लोक तिकडच्या लोकांकडे काम करत होते…ते बंद झालं…. केस अजूनही तशीच कोर्टात…. पण देवीचा वर्धापन दिन होणार होता….. तयारी जोरात होती…… पार कर्नाटकवरुन होम करायला भट मांगवले होते…. त्यांच्याच खर्चचं जवळजवळ पन्नास हजार होता…. या वाडी-वाडीतल्या भांडणात गाव विभागला गेला… राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतली… मुंबईतल्या ओळखीच्या आमदाराकडेसुदधा गा-हाण मांडलं…. लोकांच्या प्रश्नावर असं होताना दिसत नाही तत्परतेने…… सोहळा सुरु व्हायला एक दिवस बाकी होता… आता तो ही संपला…. देऊळाच्या पंटागणात सकाळपासून लोकं येऊन बसलयेत….. ते कर्नाटकवाले भट होमहवन, मंत्रपठण म्हणत होते, देऊळाच्या परिसरात माणसांची रेलचेल चालू होती, सकाळपासूनच स्पीकरवर आवाज ऐकू येतं होता…..”आज ईथे मातेच्या वर्धापन दिनाला माहेरवाशणी बायका आल्या आहेत….आज पंढुरपरातल्या विठठलासाठीच्या प्रंचड गर्दीचा प्रत्यय येईल” एकजण माईकवर बोलत होता…. जसं जसं कादेपोहे देणं सुरु झालं तसं झुबंड वाढली….दोन दोनदा प्लेटी घेणारेही होते….कचरा पेटीतच टाकायची व्यवस्था होती ती खरचं कौतुकास्पद होती…..पान-सुपारी-तंबाखूची ताट सारखी फिरवली जात होती…. तोंड चांगलीच लाल झाली होती….. गावातली म्हातारी माणसं एक एक कोपरा बघत ओळखीच्या लोकांचा घोळका करत गजाली करत बसले होते, त्यांना फक्त लोक उत्सव म्हणून एकत्र आलेत ना अजून काय हवं असाचं एकूण आविर्भाव….. ग्रामीण मंडळाचे कार्यकर्ते म्हणवणारी पोरं पार झोकून देऊन काम करत होते….बायकाही कौतुकाने हे सारं पाहत होते…. त्या एका वाडीचं सोडलं तर बाकी गावाचं पब्लिक त्या देऊळापाशी येऊन ठेपलं होतं…. तिथं चाललेल्या मंत्रपठणाकडे कुणाचचं विशेष लक्ष नव्हतं….भट म्हणतायतं ना म्हणून देत…. नुसती पान खाऊन खाऊन लालबुंद झालेल्या जिभा मग थुकायं साठी जागा शोधु लागतं…. काही तरुण पोरं खायल्या आंब्याच्या कलमा खाली बसली होती… कश्यासाठी तर……इथं जिओचं नेटवर्क येतं म्हणूनं….. नेटवर्क येत होतं…. जात होतं….रात्री बारानंतर खूप स्पीडनं नेट चालायचं…..आता दुपार टळली….. आता ढोल वाजवायचा कार्यक्रम सुरु झाला….एका लयीत वाजवणारे आणि गोलाकार रिगंण करत….नाचणारे…. एक नंबर होतं ते….खूप लोकं बघत होती…व्हिडोओ बनवणं चालू होतं….काहीजण बेभान होत ढोल बडवत होते…. तोंडात तंबाखू किंवा गुटखा खात कोणतहीं काम करायची अशी पदधत असलेली तरुण पोर….. तर या वाजवण्याला लगाम नव्हता… तितक्यात काही माणसं पत्रक घेवून आली होती…. माईक जवळच्या समवयन्काशीं त्याचं बोलणं झालं….जसं ढोल वाजवणं थाबलं तस ती पांगणारी गर्दी माईकने थांबवण्याचा प्रयत्न सुरु होता… इकडं तो मघाचा माणूस प्रत्येकाच्या हातात ते पत्रक पोचेल या त-हाने लगबगीने वाटत होता…. “कोणीही देऊळाचा मंडप सोडून जाऊ नये….इथें नाणार प्रकल्प विरोधी गटाचीं काही माणसं आलीयतं….तर सगळ्यांनी इथंच थांबा…. कुलकर्णीचं बोलणारं आहेत ना….” माईकवाला कन्फर्म करत होता….. तिथं जमलेल्या बायका-पुरुषांना यांच काही नव्हतं…. कुलकर्णी बोलायला उठले….वयाने पन्नाशीच्या पुढे असलेल्या त्या गृहस्थाचा आवाज मोठा होता… म्हटलं नाणार होणार तिकडे राजापूरात ईथं येऊन हे लोकं काय सांगणारायत….. “तर तुम्ही संगळ्यानी गंभीरपणे घ्यायला हवं….यांचा विरोध करायला हवा….तिकडे आपले अशोक वालाम मुंबईतून लढतायतं…..कोकणाचा भस्मासुर करायचा राजकारणाचां डाव दिसतोय….या तुमच्या खाडीकडच्या गावानांही या प्रकल्पाचां फटका बसणार….ईथे….वरच्या सडयावर कच्चा तेलाच्या प्रकियेचा प्रकल्प होईल…. अहो अगदी पाकिस्तानने नाकारलेला प्रोजेक्ट आहे हा….इथं हिरव्यागार कोकणात कशाला असा दळभ्रदी प्रोजेक्ट…. अहो तिथं वाळवंटात कराना….. आणि रोजगाराचं कुणाला सांगताय…अहो इथं एका-एका बागायतदाराकडे वीस-वीस नेपाळी पोरं कामाला आहेत….आणि इंथला कोकणी माणूस स्वाभिमानी आहे….तो काय शेतीसाठी कर्ज काढतं नाही….की आत्महत्या करत नाही….” तिथें आलेले काही कार्यकर्ते कमालीचे त्वेषाने बोलत होते…. आता ते पत्रक माझ्याकडे पण आलं…या येत्या काही दिवसातच मोर्चा काढणारं होते….राजापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कुठेतरीं… त्यासाठीची तयारी….. “आज असे सण-संभारभ व्हततं….हे अशे ढोल वाजवूक भेटती काय एकदा प्रकल्प ईलावर…. हे जमिनीचे पैशे खाऊन अरब होती आणि आमका लावती ढाणकाक…..” वातावरण बघून वाटत होत की नाणार या जन्मात तरी शक्य नाही… ती नाणारविरोधी प्रकल्पवाली लोकं गेली…..लोक वापस तिथल्या दुस-या एका वाडीतल्या ढोल पथकात सामील झाली…..अजून एक दिवस बाकी होता देवीच्या उत्सवाचा …

………………………………………………….

या सगळ्या चांगल्या पवित्र माहौलातही एखादा पावशेर घेत तिथं आलेला असायचा, “तुझ्या मायची मुतना मोडो देत, मायझव्याक आधी बाहेर काढा, राडेंच्याक….हयं चालला काय देवाधिकाचा नि यो रांडेचो दारु पिऊन ईलो….मेलोंनो भष्ट्रकार होईत तो बघा…आधीच त्या वाडीयतल्यानी काय कमी सळवाद चालू केलेत…आधी हयो देवीचो वाढदिवस होवदे व्यवस्थित….मग दाखवतयं…..” एक ना अनेक मग राग दाखवत सुटतात….त्या दारुडयाला तिथूंन ओढत ओढत उत्सव मंडपातून बाहेर काढलं…. माईकवरुन दर पंधरा मिनिटाला देणगीदाराची नाव वाचून दाखवली जात होती……

तरुण आणि मुंबईला राहण्या लोकांच्या ग्रुपला मुबंई-ग्रामीण असं म्हणतात हे कळालं. त्यांनाही टी- शर्ट छापली होती देवीच्या नावाने…..ते सगळे वेगळे उठून दिसत होते…. या उत्सवासाठी खास माणसं मुंबईवरुन, बायका माहेरावरुन सासरा आणि सासरहुन माहेरला आल्या होत्या….दुपार झाली तशी काही भारी चार चाकी गाडया आल्या त्याचं जंगी स्वागत झालं…ती संगळी वकील मंडळी होती….तेच तर केस लढतायतं देवळाची….

………………………………………………….

गावात एक स्वयंभू शंकराचं मंदिर आहे….तिथं एकटयादुकटयाने दुपार-तिपारचं जाण्यास मज्जाव केला जातो….आजूबाजूचा परिसर एकदम शांत…..नुसती चोहोबाजूनी झाडं….एकाबाजूला सागाची झाड….तिथूनंच जवळ वहाळ सुटलेला….मंदिर….. लाकूड आणि चि-यानं बांधलेलं….जीर्णोद्धार करायच्या अवस्थेतं आलेलं…तिथं आत कितीतरी घंटा बांधलेला….आसपास सतत उंदीर फिरताना दिसत होते….दानपेटी बरीच जुनी दिसत होती… आत गांभा-यात पुजा-याशिवाय कुणाला प्रवेश नाही…आत बोललं की आवाज घुमतो…बाहेरचं विहिर आहे….उन्हाळयामुळे पाणी आटत आलयं….खूप भाविक येतात सुटटीच्या दिवसात…गा-हाणी, नवस घेवून….पुजारी खूश असतो…

………………………………………………….

कधी कधी वाटत सरकार काहीच करत नाही…पण यावेळी अंदाज चुकला….गावातला धबधबा आता टी.व्हीवरच्या वर्षासहलीचा एक पांईट ठरत चालला होता… हा केवळ पावसाळी धबधबा….. आता निंवात कोरडा पाषाण परिसर… सरकारने तीन करोड खर्च करत कपडे बदली करण्यासाठी रुम आणि धबधब्यापर्यंत जाण्यासाठीचा पायवाट बनवलीय….. राज्यातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर गावापर्यंत पर्यटनाची जागा शोधतील असं वाटलं नव्हतं…. तिथं एक मोठा लोंखडी फलकसुदधा रोवलाय…. तिथं बाकी पर्यटनाची ठिकाणंदेखील सांगितली होती….. इथल्या मोठाल्या उंचीवरुन लक्षात येत होतं की पावसाळ्यात केवढया उंचीवरुन धबधबा कोसळत असेल….

………………………………………………….

तळकोकणातली काही गावं स्वर्गाला मागे काढतील येवढी भारी….कुणाच्याच नजरेस न पडलेली….बाकी लोकांना माहित नसलेली….तिथं गेल्याशिवाय ते जाणवणं होत नाही….एक गाव….गावातून जाणारी एकसथं नदी…नदीच्या बाजूने एकजात घर…..नारळीपोफळीच्या बागा…..कसलं हवा प्रदूषण नाही….की ध्वनी प्रदूषण नाही….तरी इथं बहुतेक वाडया….तिथंली घर ही केवळ गणपती आणि मे महिन्यात खुलतात….ही अशी गाव कधीच बाकी जगाच्या नजरेस न पडावी असंच वाटत राहतं…नाहीतर अख्खा जग हौदोस घालेल…मग विचार येतो….की खरचं नाणार आलं तर…..

………………………………………………….

कुणकेश्वरला जाणं झालं नव्हतं….जामसंडेवरुन नवीन रस्ता सुरु झाला होता..तारामुंबरी…व्हाट फील…एका बाजूला समुद्र….मध्ये रस्ता…आणि अजून आत आत करत येत चाललेला…..समुद्र…..कधी-कधी वाटतं बरं चालयं हे मोठयाप्रमाणावर लोकांना माहित नाही…..मोकळाच मोकळा समुद्रकिनारा…तितक्यात काही राईडस लोक फुल तयारीने हातात ग्लोव्हस, शूज घातलेले दिसले…लोक शोधतात अशी ठिकाणं…मंदिर परिसरात पोचलो…..समुद्र अगदी समोर….त्या देवाचं अस्तित्व न मानणाराही एका क्षणाला त्यांच्या स्वाधीन होईल इतपतं तिथलं वातावरण भारी होत….मंदिरात थेट गाभा-यापर्यंत प्रवेश होता… बाहेरच्या बाजूला बोर्ड होता…रजस्व असलेल्या स्त्रियांना प्रवेश नाही असं काहीसं लिहिला…..वाटतं होतं हे बदलायला हवं…..तिथल्या बाहेरच्या बाजूला काही लोक आंब्याच्या पेटया घेवून विकायला बसले होते…..खाली थेट समुद्र होता….खेकडे दिसत होते….फारच बुळबुळीत शैवाळाने भरलेला पायाखालची खडक लागतं होती…. पाणी मात्र पारदर्शी होतं सगळं…लाटाचं येणं काही कमी होतं नव्हतं…..पावसाळ्यात पाणी भरतीच्यावेळी मंदिरात कितपर्यंत येतं असेल यांचा अंदाज घेत होतो…..समुद्र हा नेहमीचं दोन्ही हात मागे लपवून चालाखी करत असल्यासारखाच दिसतो….का कोण जाणे…..भयानक काहीतरी कट शिजत कायतरी घडवून आणणाराच असाच वाटत आलायं…. कधीकाळी पुरशुरामाची गोष्ट वाचली ती आठवली…..जिथंपर्यंत बाण जाईल तिथंपर्यंत समुद्र आत जाईल्…आणि तो भाग म्हणजे कोकण…वैगेरे… वैगेरे

………………………………………………….

गाव. हा एकूण प्रदेश कधी काळी खोताच्या अख्यारितेतला त्यामुळे या गावाचा काही तसा वेगळा उल्लेख ब्रिटिशाच्या कागदोपत्री होत नसे….म्हणून पोभुरल्यातले जाभेंकर आमच्या गावचे…….पण आतच्या….नियमाप्रमाणे….ते आमच्या गावचे नायं…..तिकडे खयतरी नदी पल्याडच्या गावचे अजून एक फेमस माणूस म्हणजे विंदा करंदीकर….लय बरां वाटता असा काय आपल्या गावचा नाव नसला तरी आसपासचो माणूस मोटो झालेलो कलं की….

………………………………………………….

आता वाट परतीची होती, गावाकडून खूप सा-या आंब्याच्या पेटया, तांदळाच्या दोन गोण्या, याशिवाय इतर कपडयांच्या आणि बाकी सामान्यांच्या बॅग्याच बॅगा….त्यामुळे थेट गावच्या तिठयावरुन सुटणा-या खाजगी बसने प्रवास करायचं ठरवलं…तिकीट दर साधारण आठशे होते फक्त मुंबईसाठी …. विरारसाठी हजार रुपये दर होता…संध्याकाळी सहाला गाडी सुटली…मध्ये दोनदा खाण्या-पिण्यासाठी थांबली….तरी मुंबईत प्रवेश करायला उशीरच झाला…गाडीने पनवेल गाठलं सात वाजता…आणि मग सकाळीच सकाळी सायन-पनवेल महामार्गावर प्रचंड ट्राफिक होतं…आता गाव…. गावचं वातावरण सुटत चाललं होतं… शहर..शहरीकरणं…आणि तिथलं जगणं आवासून उभं होतं… तो वाशी खाडीचा पूल कसाबसा ओलाडला… सकाळीच सकाळी बगळ्याचे थवे दिसत होते…. आपल्या खाजगी बससारखीच.. अजून बसेस दिसत होत्या…. त्यांतली माणसं दिसत होती… मुंबईच मायवीपण तुम्हाला सोडवत नाही… आता मुंबईच्या हददीत प्रवेश केला…. तिथं छत्रपती शिवाजी महाराजाचां पुतळा आपलं स्वागत करतो…. मग आरके स्टुडिओ…लागतो…. आठ-साडेआठ होतात… चेंबूरला एका ठिकाणी ती बसगाडी थांबते… पुढे गाडी दादरला जाणार असते… मग अंधेरी…गोरेगाव…करत…शेवटी विरार…मग चेंबूरलाच उतरणं होतं… जरा जास्तच बोझा उतरवला गाडीतून….इंथून टॅक्सी भेटून कधी एकदा घरी जाऊन झोपतोय असं वाटतं… त्या बारा-तेरा तासाच्या बसच्या प्रवासात पाय पार आखडून जातात.. एकजण तयार झाला… टाकला सगळां बोझा टॅक्सीत…. आता त्या टॅक्सीतल्या खिडकीत बसून बाकी जगाकडे पाहणं सुरु झालं… मुंबई चांगलीच कामाला लागलेली असते… सकाळच्या नऊच्या ठोक्याला… गाडी नाही म्हटलं तरी एकूण लोकप्रवाहाच्याविरुदध दिशेलाच प्रवास करत होती… त्यामुळे सुसाट होती… मानखुर्द रेल्वेस्टेशनवरची प्रचंड गर्दी दिसत होती… झाला आता हाच प्रवास रोजचा…. गावाकडची सुटटी कधी संपली कळलंच नाही… झालं पुन्हा तसचं जगणं… रोजचं धावणं-पळणं..धकाधकीचं आयुष्य…टॅक्सी पुढे सरकली….शरीर थकत आलेलं…गाडीने कांजुर गाठलं…तशीच लोकं लागोलाग लागणा-या बसस्टॉपपाशी होती…टॅक्सी थांबली…पैसे दिले त्यांचे…बोझा उतरवला…घर गाठलं…आणि मग सगळं आटपून पुन्हा दुपारी साडेअकराला झोपलो….इतक्या दिवसात जगलेला गाव आता लगेच लागलेल्या झोपेतल्या स्वप्नात तरळत होता….

-लेखनवाला
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

29 Jun 2020 - 2:47 pm | प्राची अश्विनी

अख्ख कोकणायन उभं केलंत. नदीपलीकडे कुंभवडे का??

लेखनवाला's picture

30 Jun 2020 - 9:33 am | लेखनवाला

बरोबर. नदी पलीकडे कुंभवडे, उपाळे (ज्याचा उल्लेख उपळे असा करतात) ही गावं लागतात, याशिवाय राजापूरची गंगा बघायला हीच नदी पार करतात.

Marathi_Mulgi's picture

29 Jun 2020 - 5:43 pm | Marathi_Mulgi

तळकोकण सार्या वैशिष्ठ्यांसहीत उभं केलंत.

लेखनवाला's picture

30 Jun 2020 - 9:35 am | लेखनवाला

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

शाम भागवत's picture

29 Jun 2020 - 6:04 pm | शाम भागवत

सगळं डोळ्यासमोर उभं राहतंय.

लेखनवाला's picture

30 Jun 2020 - 9:42 am | लेखनवाला

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

29 Jun 2020 - 6:06 pm | चौथा कोनाडा

बाप रे केवढा मोठा लेख !


बसलो गाडीत… तरी गाडी सुटायला वाजले… साडेबारा…. अपेक्षेप्रमाणे गाडीला सिग्नल भेटले…. नुसतेच बोगदे… प्रवास रात्रीचा असल्यामुळे खाण्याची रेलचेल कमी होती… पण बहुतेक सगळी लोकं गाढ झोपेत होती… सिल्पर क्लासच तो…. मी मात्र नुसतीच ती पळणारी झाड त्या अंधारात पाहत होतो… समोरच्या त्या खिडकीबाहेर… कुठेतरी नुसताच मिणमिणारा बल्ब दिसतो…. कुठेतरी रेल्वेशी संमातर जाणारी नक्कीच गावाकडे निघालेली भलीमोठी सामानाचीं गर्दी टपावर घेतलेली चार चाकी दिसते….


व्वा, रेल्वे प्रवास काय जिवंत केलात ! क्या बात है !

(अवांतरः सुरुवातीला परिच्छेद केले असते, काही फोटो टाकले असते तर छान झाले असते, एवधा मोठा लेख विभागून टाकला असतात तर छान झाले असते)

लेखनवाला's picture

30 Jun 2020 - 9:38 am | लेखनवाला

प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. मुळात आता हा लेख मी एडिट करू शकतो का ? मग फोटो वगैरे टाकू शकतो.

चौथा कोनाडा's picture

30 Jun 2020 - 5:17 pm | चौथा कोनाडा

बहुधा हो. संपादक मंडळ / जुन्या जाणकार मिपाकरांची मदत घ्यावी लागेल !

लेख छान झालाय. कुणकेश्वर प्रचंड आवडीचं. दार वर्षी शाळेत सुट्टीला मामाकडे गेले कि तिकडे जायचंच असायचं. देऊळ पण प्रशस्त बांधलंय, एकदम मोकळं स्वच्छ. मी जेवढी कोकणातली देवळं सगळी स्वच्छ, एकदम प्रसन्न वाटतं. वर्णन छान आहे, कामाला माणसं मिळतं नाहीत हे अगदी खरं, सगळी गावाकडची उठून नोकरीला शहरात जातात, अगदी घरचं भरपूर असलं तरीही.

पण त्यांचं चूक म्हणवत नाही, नोकरी ५-६ दिवस करून १-२ दिवस आराम करता येतो. पण गावाला आराम हा प्रकार नाही, रात्री झोपेपर्यंत कामं चालू राहतात. एक दिवस कामं चुकली कि दूध वाया, दारातल्या भाज्या वाया. प्रत्येक माणूस आहे त्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत राहायला बघतो. ते कदाचित तिकडे आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीत राहत असतील, त्यामुळे इथे येऊन कामं करायला त्यांना काही वाटतं नसेल.

राहिली गोष्ट नेपाळी बिहारी (किंवा कोणीही), ते सगळे आपल्यापेक्षा कष्टाळू आहेत असं काही नसावं. तिकडे पण आळशी लोक असणारच पण आपल्याकडे येणार्यांची कष्ट करायची तयारी असावी म्हणूनच घरातून बाहेर पडले असावेत. अगदी मराठी (एकूणच भारतीय) लोकांना परदेशात कष्टाळू, नम्र समजतात. पण आपल्याला माहितीये कि सगळेच मराठी (भारतीय ) कष्टाळू / नम्र नक्कीच नाहीयेत.

अगदी परदेशात राहणारे सुद्धा इकडे नम्र राहतात पण परत भारतात गेले कि सगळेच तसेच वागतील असाही नाहीये. तुम्ही दुसऱ्याच्या घरी गेलात कि कायम चांगलं वागायचं, चांगली छाप पडायचा प्रयत्न करता. त्यात तुम्ही मुळात नम्र नसलात तरी दुसरीकडे एक प्रकारची उपरेपणाची, असुरक्षिततेची भावना असते. लोकं जोडण्याकडे कल असतो.

लेखनवाला's picture

30 Jun 2020 - 9:41 am | लेखनवाला

तुमच्या मताशी पूर्ण सहमत.

महासंग्राम's picture

30 Jun 2020 - 1:54 pm | महासंग्राम

लेख सुंदर झालाय फक्त वाक्य संपल्यानंतर येणारे ....... खटकतात त्याचं पहा फक्त एकदा

प्रमोद देर्देकर's picture

30 Jun 2020 - 2:25 pm | प्रमोद देर्देकर

अहाहा लेखनवाला अगदी एकटाकी लेख लिहुन काढलात की काय?

अगदी सगळे मुद्दे १०० % सगळ्या कोकणातल्या गावांशी मिळते जुळते. आणि हो ते क्रमशः लिहुन थोडे थोडे भाग लिहले असतेत तर चविने वाचता आले असते.

मला माझ्या कोकणातल्या गावाकडच्या लेखनाची आठवण झाली ते इथे आहे. http://www.misalpav.com/content/mycontent?page=1

मी आतापर्यंत चिपळुणच्या पुढे कधी गेलोच नव्हतो पणा मागील २०१९ च्या मे महिन्यात मी मित्राच्या गावी मालवणला वरचा बाग या गावी जावुन ४ दिवस राहिलो. मग मालवण तालुक्याला येवुन आजुबाजुकडिल सगळी ठिकाणं पाहिली समुद्रकिनारी मनसोक्त फिरलो. स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतला.
कुणकेश्वर तर चांगलंच लक्षात राहिल कारण तिथे गेलो आणि परत मालवणला यायला ३.३० तास गाडीच नव्हती तेव्हा त्या देवळाअ समोरच्या तिठ्यावर बसुन राहिलो होतो. त्यातुन गाववाल्यांचे सल्ले असे करा तसे करा काय विचारु नका. टपरीवाले आणि रिक्षावाले म्हणजे सगळी १०/१२ झालेली पोरे सगळ्या कोकणात तेच चित्र.
मग एकाने सांगितले की तुम्ही देवगडला जा. तिथुन गाडी हमखास मिळेल.
तर देवगडच्या आगोदर जी नदी लागते त्या पुलावर तिथे कंडक्टर ने उतरवले म्हाणाला इथे तुम्हाला दु. २ ची देवगड मालवण एस. टी मिळेल पण कसचे काय तिथेही १ तास अडकुन पडलो. शेवटी मुंबई लक्झरी बस आली तिने पुन्हा कुणकेश्वरला आलो . आणि मग १.३० तासाने एक एसटी आली तिने मालवणला आलो.

तुम्ही अजुन लिहा. मला तर इथे मिलिंद शिंदे याची जगी जिवनाचे सार, चंद्रभागेच्या तिरी ही सगळी गाणी लागली की कोकणातल्या प्रत्येक वाडी चरच्या मे महिन्याच्या पुजेला आलोय असा भास होतो. मस्त दिवस.

लेखनवाला's picture

1 Jul 2020 - 12:05 pm | लेखनवाला

तुमची लिंक ओपन होत नाहीय

प्रमोद देर्देकर's picture

1 Jul 2020 - 2:26 pm | प्रमोद देर्देकर

कोकणातील परिस्थितीचे अस्वस्थ करुन सोडणारे वास्तववादी लेखन .

विजुभाऊ's picture

30 Jun 2020 - 3:11 pm | विजुभाऊ

रॅगिंग कॉमेंट्री इतकं छान लिहिलंय.
सुंदर शैली

अभिजीत अवलिया's picture

30 Jun 2020 - 4:02 pm | अभिजीत अवलिया

लेख मोठा झालाय पण वर्णन आवडले.

फारएन्ड's picture

1 Jul 2020 - 12:52 am | फारएन्ड

मस्त लेख!

सौंदाळा's picture

1 Jul 2020 - 2:24 pm | सौंदाळा

अतीव सुंदर,
कोकणातला गाव हूबेहुब डोळ्यासमोर उभा केलात.
गावातली जत्रा, शिमगा, गणपती याबद्दल पण लिहा.
कोकण असून माशांचे वर्णन काही झाले नाही ते पण येऊ दे.
खरं म्हणजे लेखातल्या प्रत्येक परिच्छेदावर एक लेख यायला पाहिजे तेव्हाच मन तृप्त होईल.