मी घरात सर्व मुलांमध्ये मोठा. माझ्यामागे पाठच्या दोन बहिणी आणि सर्वात धाकटा भाऊ. वडिल कामगार. त्यामुळे परिस्थिती बेताचीच. त्यामुळे थोडा जाणता होताच जबाबदारीची जाणीव होऊ लागलेली. मग फक्त अभ्यासावरच सर्व लक्ष केंद्रित केलेले. त्यातून पहिल्यापासूनच शाळेत हुशार असल्याने, मार्क्सही चांगले पडत गेले.बारावीनंतर चांगल्या साईडला अॅडमिशन मिळाले, तेही फ्री सीट मध्ये. माझ्या शिक्षणाचा म्हणावा असा काहीच खर्च आला नाही. नंतर कर्ज काढून उच्चशिक्षणही पूर्ण केले. नोकरीला लागून दोन वर्षातच मी सर्व कर्ज फेडले. तोपर्यंत बहिणी लग्नाच्या झाल्या होत्या. वडिलांनी थोडीफार रक्कम जमा केली होती मात्र खर्चाच्या मानाने अगदीच तुटपुंजी होती. मग पुन्हा कर्ज काढून बहिणींची लग्ने लावून दिली. ती फेडण्यात तीन वर्षे गेली. तोपर्यंत मलाही स्थळे येत होती पण डोक्यावर कर्ज असल्याने मीच नकार देत होतो.
एकदाचे माझ्यासाठी वधूसंशोधन सुरू झाले. इकडे दोन्ही बहिणींना कुठेकुठे पैसे भरून आईवडिलांनीच नोकरीला चिटकवले अन्यथा त्यांच्या घरच्या मंडळींनी त्यांना घरीच बसवले असते. त्यांच्या नोकरीसाठी कुणीच पुढाकार घेतला नव्हता. मात्र त्यांचा पगार पगार चालू झाला आणि दोन्ही जावयांचा रूबाब अन ऐतखाऊपणा, दोन्ही वाढू लागले. ते दोघेही व्यवसाय करत असल्याने त्याची कमाई तशीही बेभरवशी होती. त्यात बायकांचे पगार दर महिन्याला मिळू लागल्याने मन लावून मेहनत करायची गरजच त्यांना वाटेनाशी झाली. अश्या परिस्थितीत आईवडिलही मुलींसाठी अगदी धान्यापासून कपड्यांपर्यंत जमेल ते अगदी सढळ हाताने पुरवू लागले. दोन्ही बहिणींचे सासर जवळचे असल्याने जावयांचे आणि लेकींचे अगदी छोट्या कारणानेदेखील घरी येणेजाणे दर आठ दिवसांनी होतच असे. आणि आईवडिल कधीच त्यांना 'रिकाम्याहाती' पाठवत नसत. माझा जवळपास सर्व पगार या 'पाठवणीतच' जाई. त्यातून मला जी स्थळे येत होती ती उच्चशिक्षित मुलींची येत. ती कटाक्षाने टाळण्यात येत होती आणि कमी शिकलेल्या मात्र 'मोठ्या मालदार' स्थळांची चर्चा माझ्यापुढे होई. एकूण परिस्थीती बघता शिकलेली 'हुशार' मुलगी घरात कुणालाच नको होती. पण मी शिकलेल्या मुलीचा हट्ट धरला होता. शेवटी माझे लग्न ठरले. माझ्या मनाप्रमाणे शिकलेली, नोकरी करणारी बायको मिळाली. मात्र तिच्या माहेरची परिस्थिती बेताची अन लग्नात 'काहीच' न मिळाल्याने आई, दोन्ही बहिणी आणि जावई नाराज झाले होते. मला कल्पनाही आली नाही, इतक्या लवकर ही नाराजी सतत डोके वर काढू लागली. आई नव्या सुनेला नीट वागवेना! एकच महिना झाला आणि नविन लग्न असतानाच माझे आणि बायकोचे यावरून खटके उडू लागले. आई त्यात भरच घाले. मला वाटले तरी बायकोसमोर मी आईला काही बोलू शकत नव्हतो जरी तिची चूक असली तरी. याचाच तीही फायदा उठवत असे. सुनेला गलिच्छ भाषेत बोलत असे अन भांडण कसे विकोपाला जाईल हेच पाहत असे. अशावेळी मी अगदी हतबल होऊन जाई. पण शेवटी म्हणतात ना, बायको ही नेहमी नवर्यापेक्षा हुशार असते. ते खरेच असावे. तिने मी काम करत होतो त्याच शहरात नोकरी मिळवली! मग काय, नोकरीचे निमित्त करून मी लगेच बायकोबरोबर शहरात शिफ्ट झालो. जरी घरात कुणालाच हा निर्णय आवडला नाही तरी कुणीच काही बोलू शकले नाही. मात्र आईने लगेच एक अट घातली मोठा मुलगा असल्याने मी निम्मा पगार दरमहा खर्चासाठी तिच्या स्वाधीन करायचा. वर धाकटा भाऊ शिकत होता,त्याचा सर्व खर्च मीच करणार. खरेतर वडिलांचा पगार आणि शेतीचे उत्पन्न यासाठी पुरेसे होते. याउप्परही सणवार, जावयांचे मानपान हे सर्व होतेच. बायकोचा पगारही जास्त नव्हता. माझा सर्व पगार अशा त-हेने जबाबदार्या पार पाडण्यातच जाऊ लागला.शिल्लक तर सोडाच पण दोघेजण कमावते असताना बेताच्याच परिस्थितीत रहावे लागे. तरी बायको आणि मी, दोघेही खूश होतो. कारण मानसिक शांतता, जी आम्हाला मिळत होती त्याचे मोल कशातच करता येणार नव्हते.
काही दिवसांनी मला मुलगा झाला. मी खूप खूश होतो. आता बायको नोकरी सोडून मुलाचा सांभाळ करू लागली. आईने मुलाचा सांभाळ करायला स्पष्ट नकार दिलेला. तुमचे तुम्ही पहा म्हणाली. मात्र दरमहा नियमितपणे ठराविक रक्कम ती घेत असे. तरी आम्ही दोघे आमच्या संसारात खूश होतो. बायकोचा पगार बंद अन मुलाची जबाबदारी वाढलेली अशा परिस्थितीत असताना इकडे जावयांची आणि बहिणींची 'मुलाला पाहायच्या' निमित्ताने येजा वाढली. बरे आले की, हे लोक चारचार दिवस राहत. मुलाचे करून बायकोला त्यांची ऊठबस करावी लागे. बहिणी मदत तर करीत नसत, पण वसूल केल्यासारखे बायकोला आज खायला हे कर, ते कर, अमुक आणून दे, तमुक काम कर असा छळ मांडू लागल्या. त्यामुळे बायकोत आणि माझ्यात पुन्हा धुसफूस सुरू झाली. 'पाहुणे' परत गेल्यावर मी सुटकेचा निश्वास सोडी. जसा मुलगा मोठा होऊ लागला तसा बायकोचा जीव पाहुण्यांच्या ऊठबशीने आणि माझा खर्चाने मेटाकुटीला येऊ लागला. अलिकडे तर पाहुणे जरा कुठे जोडून दोनतीन दिवस सुट्टी मिळाली की, फिरायला जायचा प्लान करून आमच्याकडे उतरू लागले. आम्हा तिघांना जरा कुठे फिरून येऊ,सिनेमाला जाऊ, मुलाला अमुक ठिकाण दाखवू यासाठी उसंतच मिळेना.
वडिल कधीतरी समजावत मला, 'अरे आपला हात दगडाखाली आहे. मुली दिल्यात आपल्या त्याघरी.'
काही दिवसांनी मला दुसरा मुलगा झाला.बायकोला काम आणि मला जबाबदारी अजून वाढली. आणि इकडे दुसर्या मुलाला ' पहायला' आणि कौतूक करायला पाहुण्यांना नुसता ऊत आला. जरी मुलांसाठी म्हणून एखादी भेटवस्तू किंवा खाऊ त्यांनी आणला नाही तरी पाहुण्यांचे मानपान सांभाळावे लागत. गेली कित्येक वर्षे आम्ही नवराबायको मुलांसोबत कुठेही निवांत फिरायला म्हणून गेलो नव्हतो की ,कसली उसंत मिळाली नव्हती. दोन मुले झाली, पण त्यांच्यासाठी कसलीच गुंतवणूक केली नव्हती. ना जास्त शिल्लक रक्कम होती. स्वतःचे घर तर दूरच! आला दिवस ढकलंत होतो. खरेतर मला बर्यापैकी पगार होता. माझ्या धाकट्या भावाचे शिक्षणही संपले होते. माझ्या कंपनीत ईतर मित्रांचे स्वतःचे फ्लॅट झाले होते. कुणाच्या गाड्या होत्या. पण माझा हात अजून 'दगडाखालीच' होता.
अशातच धाकटा मुलगा दोन वर्षांचा झाला. त्याचा वाढदिवस सर्व 'पाहुण्यांच्या' उपस्थितीत जोरात साजरा करण्यात आला. रात्री जेवण झाले. मी घोषणा केली, "मला परराज्यात अमुकअमुक शहरात नविन नोकरी मिळाली आहे. पगार इथल्यापेक्षा बराच जास्त आहे. आणि पुढच्या महिन्यात मला जाॅईन व्हावे लागेल. त्यामुळे पंधरावीस दिवसांतच मी बायको आणि मुलांसोबत तिथे शिफ्ट होत आहे."
पाहुण्यांचे चेहरे थोबाडीत मारल्यासारखे झाले. मी 'दगडाखालून' हात बाहेर काढला होता!
प्रतिक्रिया
26 Jun 2020 - 9:14 pm | वीणा३
चांगलं लिहिलंय. बघितलीयेत अशी भिडस्त लोकं, वाईट वाटतं पण प्रत्येकाचा स्वभाव असतो. काही लोकांना खरंच जमत नाही दुसर्यांना दुखवायला, अगदी स्वतःचा गैरफायदा घेतायत हे कळत असलं तरीही.
27 Jun 2020 - 3:13 am | नेत्रेश
> मी 'दगडाखालून' हात बाहेर काढला होता
नक्की का? नाहीतर पर राज्यात पाहुणे १५ दीवसांच्या मुक्कामाला यायचे :) :)
29 Jun 2020 - 8:53 am | प्राची अश्विनी
हेच वाटलं!
27 Jun 2020 - 7:32 am | जेम्स वांड
म्हणजे लैच त्रास, आमच्याकडे असाच सीन होता, सुदैवाने मी मधला भाऊ , मला थोरला दादा बहीण अन धाकटी बहीण, दाद्या आमचं खमका एकदम, एकदा थोरलीचे पंत आले असेच कायबाय बडबडून गेले..
परत आक्का काय जास्त शिकलेली नाही, दादानं मला बोलवलं अन सांगितलं फक्त मी म्हणतो त्याला होकार दे, सरळ करू पाहुण्यास म्हणलं बरंय, परत एकदा आमच्याघरी आले अन उगाच आकांडतांडव करत सुटले पंत
"मी यांव करीन अन मी त्यांव करीन, कसली अडाणी बायको दिली आहे असं नाही न तसं"
"जेवला का?" दादा शांतपणे
"ऑ!?"
"भाकरी गिळलीत का?"
"ही काय बोलायची रीत झाली ?!"
"जेवला असाल तर बॅग उचला अन चालते व्हा, अक्की सोडा इथंच, येतो परवा कापडं अन इतर सामान न्यायला, सुटा लगेच"
"नाही पण मी काय म्हणतो, तोडगा काढा, काहीतरी समजवून सांगा की तुमच्या बहिणीला, कसं ?"
"नकोच, खुळी आहे म्हणताय न , सोडा परत, तू आक्काला घेऊन जा रे पुण्याला" (मला)
तितक्यात आक्का एकदम म्हणाली
"अहो, तुम्ही तर म्हणत होतात तुझे भाऊ घाबरतील.."
त्या दिवसापासून आजतागायत
"मस्त चाललंय आमचं "
27 Jun 2020 - 9:24 am | सोत्रि
:=))
- (दगडाखालचा हात निघालेला) सोकाजी
27 Jun 2020 - 10:25 am | ज्योति अळवणी
हे झक्कास!
बाकी दगडाखालून हात निघाला हे मस्त
27 Jun 2020 - 10:26 am | ज्योति अळवणी
हे झक्कास!
बाकी दगडाखालून हात निघाला हे मस्त
27 Jun 2020 - 10:26 am | ज्योति अळवणी
हे झक्कास!
बाकी दगडाखालून हात निघाला हे मस्त
27 Jun 2020 - 10:26 am | ज्योति अळवणी
हे झक्कास!
बाकी दगडाखालून हात निघाला हे मस्त
29 Jun 2020 - 12:14 am | संजय क्षीरसागर
हे सुरुवातीला आणि एकदाच करावं लागतं, मग पुढे अजिबात स्टोर्या होत नाहीत.
29 Jun 2020 - 12:18 am | संजय क्षीरसागर
.
27 Jun 2020 - 10:19 am | गणेशा
जुन्या काळात असे चित्र जास्त असे... अजूनही असावे बऱ्याच ठिकाणी.. वातावरण.. कुटुंबं.. नाती.. पार कुचंबणा होत असेल..
27 Jun 2020 - 11:30 am | Cuty
खेड्यातच कशाला, जरा मोठ्या गावात किंवा शहरातही बर्यापैकी परिस्थिती असेल तर, कर्त्या पुरूषाला अशा सग्यासोयर्यांचा किती त्रास असतो ते, तोच सांगू शकेल. असल्या घरातील गोष्टी बाहेरून कोणाला सहज दिसून येत नाहीत, उलट यांच्याकडे नेहमी लोकांचा किती राबता असतो असेच वाटते, पण कर्त्या पुरूषाला आणि त्याच्या बायकोला मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो.
27 Jun 2020 - 1:11 pm | प्रमोद देर्देकर
पहिले दोन भाग तुम्ही मुलीला कशी वागणूक मिळते म्हणून रंगवला आणि आता लगेच तुम्ही भिडस्त मुलगा म्हणून सांगताय तुम्ही ही स्व कहाणी सांगत असाल तर काही तरी चुकतंय.
का या तीनही कथा वेगवेगळया आहेत आणि काल्पनिक आहेत.
27 Jun 2020 - 2:19 pm | Cuty
प्रमोदजी या तिन्ही कथा वेगळ्या आहेत. एकदा 'जब I met मी :-2' च्या खाली दिलेले डिस्क्लेमर वाचा.
28 Jun 2020 - 11:33 pm | संजय क्षीरसागर
मात्र सर्व परिस्थिती अनुकूल असताना आपल्याच लोकांनी केलेले स्वार्थी कटकारस्थान किंवा डावपेच किंवा छुपा दबाव या गोष्टी सहज बाहेरील लोकांना दिसूनही येत नाहीत. मग मदत मिळणे दूरंच. अशावेळी आपणच धडाडीने यावर मात करावी लागते.
_______________________________________
ही धडाडी सुरुवातीलाच दाखवली तर असे प्रसंग येणारच नाहीत.