मला हवी तशी उशी मला अजूनही मिळालेली नाही.
माझ्याकडे माझ्या खास बघून आणलेल्या अशा सात उशा आहेत, पण त्यांतली एकही उशी नंतर मला कंफर्टेबल वाटत नाही. मला त्यांतली एकही फायनली पसंत नाही.
काही उशा फारच जाड तर काही फारच पातळ. उंच उशी फार उंच होते आणि पातळ उशी फार पातळ होते. दोन पातळ उशा एकमेकांवर ठेवूनही बात बनती नहीं.
"मध्यम" उशीही मानेला कंफर्टेबल वाटेलच असं नाही. कुशीवर झोपलं की डोकं आणि खांदा यांत अंतर पडतं आणि मान लटकत राहाते. मान आणि डोकं दोन्ही उशीवर ठेवावं तर खांदा मधे येऊन दुखू लागतो (तसाही म्हातारपणी कुठला कुठला अवयव दुखत असतोच.) डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपलं तर उशी हवी असं वाटतं आणि उताणं झोपलं तर उशी नको वाटते. कुशीवर झोपलं की हात कुठं ठेवावेत प्रश्न पडतो. उशीवर हात ठेवून झोपलं की जड डोकं हातावर टेकवल्यामुळं हाताला मुंग्या येतात. काही उशा इतक्या टणक असतात की मान आणि डोकं दुखायला लागतं. काही उशा इतक्या फोपशा असतात की डोकं टेकलं की ते डायरेक्ट गादीलाच लागतं. काही उशांचा डोकं टेकलेला भाग तेवढा चपटा होतो आणि दोन्ही बाजूचा भाग फुगीर होतो. दोन जाड उशा घेऊन पाहिल्या. दोन पातळ उशा घेऊन पाहिल्या. एक जाड एक पातळ उशी घेऊन पाहिली. मानेखाली मऊ साडीची एक गुंडाळी घेऊन पाहिली, पण छे. नो कंफर्ट! मानेला सुख देणारी उशी ज्याला मिळाली तो भाग्यवान.
उशीच्या वर डोक्याखाली आपला हात आपण ठेवतो आणि मनगट कानाजवळ येतं तेव्हा तेव्हा ह्यदयाचे ठोके ऐकू येतात. ते ऐकलेच असतील तुम्हीही. लबडब लबडब अशा एका संथ लयीत ते पडत असतात. ते ठोके कधी जलद पडलेले ऐकू येतात तर कधी ऐकूच येईनासे होतात. तेव्हा वाटतं हे काय? ठोके का ऐकू येत नाहीत? वाटतं इतकी वर्षं न थांबता ठोके पडताहेत. मधेच बंद झाले तर! मग मी ठोके ऐकायचे बंद करते. मग माझ्या मनात विचार येतात, ही पृथ्वी फिरायची थांबली तर? उद्या सूर्य उगवलाच नाही तर? मग मी उताणी झोपते. माझ्या निद्रानाशाचं उशी हे एक कारण आहे. माझी आई असती तर म्हणाली असती कसला आलाय डोंबलाचा निद्रानाश! चांगलं अंग मोडून काम करावं, भरपूर दमावं की छान झोप लागते. मलाही अशी छान झोप काही वेळा लागते. मग मी सकाळी बघते तर माझ्या डोक्याखाली उशीच नसते.
जी कथा उशीची, तीच चपलेची. चपलांच्या दुकानात गेलं की मला कधीही चपलेची निवड करता येत नाही. मला सँडल्स हवेत की चप्पल तेही मला ठरवता येत नाही. माझी उंची नॉर्मल आहे, पण मला अजूनही उगाच वाटतं आपण आणखी थोडं उंच दिसावं. म्हणून मी किंचित उंच बेस असलेल्या चपला पसंत करते. त्या घालून दुकानदार मला चालून बघायला सांगतो. तसं चालताना उंच टाचेवरुन माझं पाऊल सटकतं आणि दुखावतं.
मग मी मुकाट्यानं सपाट चपलांकडं वळते. पण अगदी नंबर वगैरे बघून घेतलेली चप्पल सुद्धा मला कधी सैल होते तर कधी घट्ट होते. दुकानदार म्हणतो वापरुन, वापरुन होईल सैल. तो चप्पल घालून चालून बघायला सांगतो. बाहेर रस्त्यावर चप्पल घालून चालता येत नाही. चप्पल घाण होईल ना! पण दुकानाच्या मर्यादित जागेत चालून काहीच अंदाज येत नाही. चप्पल पायाला कंफर्टेबल वाटतच नाही.
मला चप्पलची खरेदी मनासारखी झालीय असं वाटत नाही. मला नेहमीच ती महाग पडली असं वाटतं. (तसं तर मला प्रत्येक खरेदीनंतर वाटतं. वाटतं उगीच एवढे पैसे खर्च केले.) समाधान मिळत नाही. मी नव्या चपला पायांत घालते. माझ्या जुन्या चपला मला टाकवत नाहीत. मी त्या बांधून बरोबर घेते. मी नव्या चपला घालून घरी येते. रस्ताभर त्या मला टोचत तरी असतात किंवा सैल तरी वाटत असतात. अंगठा ,करंगळी दुमडते पण टाचेला सैल होते.
मग काही दिवस जातात. असेल त्या उशीची आणि असेल त्या चपलेची सवय होते. मग तेच सवयीनं "कंफर्टेबल" वाटायला लागतं.
एकूण काय तर "सवय" होणं महत्त्वाचं.
मग रोजचं तेच ते रुटीनही कंफर्टेबल वाटायला लागतं.
अशावेळी विंदा करंदीकरांच्या "तेच ते आणि तेच ते "या कवितेची आठवण येते.
प्रतिक्रिया
14 May 2020 - 12:01 pm | आनन्दा
आज्जे, ज्जे बात!!
खरंच शेवटच्या एका परिच्छेदात सार आहे..
एकूण काय तर "सवय" होणं महत्त्वाचं.
मग रोजचं तेच ते रुटीनही कंफर्टेबल वाटायला लागतं.
14 May 2020 - 1:16 pm | खेडूत
मस्त लेख आजीबाई..अगदी पटलं.
हेच इतर अनेक पदार्थ, वस्तू, माणसे.. यांना लागू पडेल.
अवांतर..
विंदांची आठवण काढलीत त्यामुळे आनंद झाला.
(ते विं.दा. नसून गोविंद.. नावामुळे विंदा आहेत.)
ज्यांनी अद्याप वाचली नसेल त्यांच्यासाठी कविता इथे देतो.
विंदा शतकातले महान कवी आहेत!
तेच ते नि तेच ते - विंदा करंदीकर
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !!
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच रंजन
तीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासुन रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते
खानावळीही बदलून पाहिल्या
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.
काकू पासून ताजमहाल,
सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला,
तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी,
तेच ते आंबट सार
सुख थोडे दु:ख फार
संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे
त्या स्वप्नाचे शिल्पकार,
कवि थोडे कवडे फार
पडद्यावरच्या भूतचेष्टा;
शिळा शोक, बुळा बोध
नऊ धगे एक रंग,
व्यभिचाराचे सारे ढंग
पुन्हा पुन्हा तेच भोग
आसक्तीचा तोच रोग
तेच ' मंदिर ' तीच ' मूर्ती '
तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती '
तेच ओठ तेच डोळे
तेच मुरके तेच चाळे
तोच पलंग तीच नारी
सतार नव्हे एकतारी
करीन म्हटले आत्महत्त्या
रोमिओची आत्महत्त्या
दधीचिची आत्महत्त्या
आत्महत्त्याही तीच ती
आत्मा ही तोच तो
हत्त्याही तीच ती
कारण जीवनही तेच ते
आणि मरणही तेच ते
15 May 2020 - 1:17 pm | चौथा कोनाडा
व्वा, सुरेख ललित लेखन !
आजीबाई _/\_
बाकी, आमचं ही तुमच्या सारखंच आहे, उशी, चप्पल, कपडे, (विशेषतः टी शर्ट अन जीन्स) चष्मा यांचा कधीच कम्पफरटेबल योग नसतो
(कधी कधी डोक्याची कंटींग सुद्धा या सदरात मोडते )
आपल्या नशीबी "तेच ते" आहे अशी मनाची समजूत घालून निभाऊन नेतो मग !
15 May 2020 - 1:25 pm | गवि
उशी, चप्पल यांप्रमाणे कार्यालयातील खुर्ची हा एक भाग असतो.
आपली खुर्ची आपल्या अनुपस्थितीत कोणी ओढून नेली आणि नंतर त्याजागी दुसरी ठेवली, किंवा हाऊसकिपिंग स्टाफकडून खुर्ची बदलली गेली तर लोक (मी !!) काम बाजूला ठेवून आधी अस्वस्थपणे संपूर्ण फ्लोअरवर माझी खुर्ची, माझी खुर्ची असं पुटपुटत शोधत राहतात.
एकदाची ती सापडली की आत्मा शांत.
लोक याकरिता खुर्चीवर गुप्त खुणा करणे, टेप चिकटवणे, नाव कोरणे वगैरे करतानाही दिसतात. हरवलेली खुर्ची ते त्यावरून शोधतात.
आपल्या खुर्चीत आपण सेट झालेले असतो. अगदी तंतोतंत एकसारख्या दिसणाऱ्या शेकडो खुर्च्या ऑफिसात असतात, पण खुर्ची आपली नाही हे तीत बसताक्षणी जाणवतं.
15 May 2020 - 1:38 pm | मन्या ऽ
रोजच्या धबडग्यातल जगण आपलं.. थोड जरी खुट्ट वाजल तरी अस्वस्थ होतो आपण सारे.. लॉकडाऊन मुळे ते जरा जास्तच खोलवर जाणवतंय.. कधी परत रुटीन सुरळीपणे सुरु होतंय. अस झालंय..
15 May 2020 - 1:58 pm | नूतन
लेख आवडला आणि पटला देखील
15 May 2020 - 2:57 pm | Sanjay Uwach
अज्जी, आपल्या लेखनाची आम्हाला आता इतकी सवय झाली आहे की ते वाचायला खूप आवडतात. छान लिहिले आहे.
15 May 2020 - 9:52 pm | संजय क्षीरसागर
मान आणि खांदा यामधली गॅप भरणारं एक सुखद कुशन घेऊन तुमचा प्रश्न सोडवता येतो.
चपले ऐवजी सॅंडल्स वापरायला लागून जमाना झाला ( त्यात क्रॉक्सनी तर कमालच केलीये !). चप्पल दोन बोटात धरुन, दरवेळी उचलणं हा छळ आहे.
गाविशी खुर्चीबाबतीत एकमते. आयुष्यातला प्राईम टाईम जिच्यावर बसायचं आणि ज्या कामातून तुफान मजा आणायची, ती खुर्ची अत्यंत आरामदायी हवी. माझी खुर्ची हाय-बॅक विथ नेक सपोर्ट आहे आणि फ्लेक्सी हँडल्समुळे खुर्चीवर मांडी घालून शांतपणे बसता येतं. मग कामाची मजाच काही और असते!
15 May 2020 - 10:36 pm | मोदक
तुमची खुर्ची नक्की कोणत्या ब्रँडची आणि कोणते मॉडेल आहे हे प्लीज सांगाल का..?
मला १ आरामदायी खुर्ची घ्यायची आहे.
हाफिसात स्टीलकेसची चेअर वापरली जाते. पण ती प्रत्यक्षात लैच महाग आहे.
हॅवॉर्थ वाले ऑर्डर नंतर २ ते अडीच महिन्यांनी डिलिव्हरी देणार म्हणत आहेत.
त्यातल्या त्यात फेदरलाईट बरी वाटत आहे.
आधीच धन्यवाद देतो.
16 May 2020 - 9:17 am | संजय क्षीरसागर
अशोक पवार > ९३७ ३९३ ७७९२ > ८५८ ८८७ ४०४०
फोनवर काँटॅक्ट झाला नाही तर कंपनीचं नांव + कँप + पुणे असा सर्च कर
30 May 2020 - 3:07 pm | आजी
आनंदा-माझं लिखाण तुम्हांला आवडलं हे वाचून आनंद झाला.
खेडूत- खरंच की. गोविन्दा चं विंदा झालं हे मलाही माहीत होतं खरं तर. पण विसरून विं.दा. असं चुकून माझ्याकडून टाईप झालं.सॉरी. सजगपणे चूक दाखविल्याबद्दल धन्यवाद.विंदांची कविताही दिलीत.मला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.
चौथा कोनाडा-"सुरेख ललित लेखन"हा तुमचा अभिप्राय मनाला समाधान देऊन गेला.डोक्याची कटिंग सुद्धा ह्या सदरात मोडते हे तुमचं म्हणणं ती करणाऱ्यांना पटेल.
गवि-खुर्चीचीही सवय होते ह्या तुमच्या अनुभवाशी एकदम सहमत.
मन्या-अभिप्राय पोहोचला.धन्यवाद.
नूतन-"लेख आवडला आणि पटला देखील."थँक्यू नूतन.
संजय उवाच-"आजी,तुमच्या लेखनाची इतकी सवय झाली आहे, की ते वाचायला खूप आवडतं"-लेखकाला दुसरं काय हवं?धन्यवाद.
संजय क्षीरसागर-तुमचा अभिप्राय आवडला.तुम्ही 'गविंशी' खुर्चीबाबत सहमत दिसताय!
मोदक-तुम्हीही खुर्चीबद्दलच लिहिलंयत.
30 May 2020 - 3:08 pm | आजी
तुमच्या अभिप्रायांना उत्तर द्यायला "कार्यबाहुल्य"वगैरे नसतानाही उशीर झालाय.क्षमस्व.