श्रद्धांजली - ऋषि कपूर

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
30 Apr 2020 - 1:28 pm

काल इरफान गेला आणि आज सकाळी झोपेतून डोळे उघडेपर्यंत ऋषि कपूरच्या जाण्याची बातमी पुढ्यात उभी होती. आधीच करोनाच्या थैमानाने लोकांचा जीव अगदी मेटाकूटीला आला आहे. आणि त्यातून लागोपाठच्या दोन दिवसांत, दोन उत्तम अभिनेत्यांनी सोडून जाणे लोकांसाठी नक्कीच त्रासदायक ठरत आहे. मेरा नाम जोकरपासून ते अगदी अलीकडच्या द बाॅडीपर्यंत ऋषि कपूरची फिल्मी कारकिर्द, त्याच्या पिढीतल्या इतर कपूर्सपेक्षा नक्कीच उजवी होती.

व्यक्तीशः माझ्यासाठी ऋषि कपूर हा त्याच्या पुर्वार्धापेक्षा उत्तरार्धात अभिनेता म्हणून जितका समोर येत गेला तितकाच तो आवडत गेला. डी-डे, मुल्क, द बाॅडी, दो दुनी चार, कपूर अॅन्ड सन्स त्याच्या उत्तरार्धातल्या अशा अनेक न संपणाऱ्या सिनेमांची यादी घेता येईल, पण यातून माझ्यासाठी कायम स्मरणात राहणारी त्याची भुमिका ही 'रौफ लाला'ची आहे.

गेल्या दशकभरातही त्याचे अनेक सिनेमे आलेत, पण मला अजूनही ऋषि कपूरच्या कमाल अभिनयामुळे अग्निपथमधला त्याने साकारलेला रौफ लालाच आवडतो. अगदी गेल्या आठवड्यातच हा सिनेमा त्यातल्या त्याच्या निगेटिव्ह भुमिकेसाठी पुन्हा पाहिला. २०११ ला धर्मा प्राॅडक्शनचा आलेला अग्निपथ, सुरूवातीला ऋषी कपूरने नाकारला होता. त्याचे कारण त्यालाच ठाऊक असावं. पण त्याआधीची जवळपास चार दशकाची कारकिर्द, बाॅलीवूडचा चाॅकलेटी ब्वाॅय म्हणून मिळालेली उपमा, यातून बाहेर पडून नवीन प्रयोग करण्यासाठी अग्निपथचा रौफ लाला साकारण्याचे त्याने ठरवले.

मुद्राभिनय ही ऋषि कपूरच्या अभिनयातली जमेची बाजू. त्याचा वापर करून रौफ लालाची भूमिका त्याने अक्षरशः जिवंत करून लोकांपुढे आणली. याचा परिणाम असा झाला की, सिनेमा रिलिज झाल्यानंतर जेवढे कौतुक हृतिक आणि संजय दत्तच्या भुमिकेचे झाले, तितकेच किंबहुना किंचित जास्तच कौतुक ऋषि कपूरच्या 'रौफ लाला' या भुमिकेचे झाले होते. अग्निपथमधल्या अनेक प्रसंगामध्ये त्याच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन्स बघण्यासारखे आहेत.

गेली पाच दशके आपल्या अप्रतिम अभिनयाने रसिकांच्या मनावर खोलवर ठसा उमटवणाऱ्या या उमद्या नटास भावपूर्ण श्रद्धांजली !!

कलामुक्तकविचार

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Apr 2020 - 2:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकपूर आमच्या काळातला हिरो. हीना, नगीना, चांदणी असे ठळक आत्ता लिहितांना आठवत आहेत. ऋषिकपूरवर चितारलेलं देर ना जाये कही देर ना हो जाये... हे लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं जे अश्विनी भावे यांच्यावर आहे,अनेकदा ऐकलंय, आवडलं आहे. आज ऋषिकपूर आठवतांना हे गाणं खुपच आठवतंय.

इरफ़ारखानला लाइफ़ ऑफ पाय मधे पहिल्यांदा पाहिलेलं आठवतं. उत्तम अभिनय उत्तम सिनेमा होता. दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

30 Apr 2020 - 4:22 pm | प्रचेतस

राज कपूरच्या करिष्म्यातून बाहेर पडून खऱ्या अर्थाने कोणी वाटचाल केली असेल तर ती ऋषी कपूरने, अर्थात पदार्पण जरी आरके फिल्म्स मधून झाले असले तरी ह्या अभिनेत्याने लवकरच वेगळी वाट चोखाळली. अनेक वेगवेगळ्या बॅनर्स, दिग्दर्शक ह्यांच्या हाताखाली काम करून ऋषी कपूरने आपली प्रगल्भता दाखवली. ह्या बाबतीत त्याने काका शम्मी कपूरच्या पावलावर पाऊल ठेवले असे म्हंटले तरी चालेल.

इरफान खान आणि ह्या चतुरस्त्र अभिनेत्याला विनम्र आदरांजली.

Prajakta२१'s picture

30 Apr 2020 - 6:38 pm | Prajakta२१

श्रद्धांजली

चौथा कोनाडा's picture

30 Apr 2020 - 6:58 pm | चौथा कोनाडा

दोन्ही दिग्गज अभिनेते. इरफानचा पानसिंग तोमर अर्धवटच पाहिला गेलाय, तो आवर्जून पहायला हवा !
ऋषी कपूर यांचा तर बॉबी, अमर अकबर, प्रेम रोग, दिवाना पासूनचाच फॅन ! अलीकडच्या काळातील "मुल्क" या सिनेमातला दहशतवादी लोकांशी संबंध असल्याच्या तथाकथित पुराव्यामुळे संशयाच्या पिंजर्‍यात उभा केला गेलेला मुस्लीम वकील ही भुमिका त्यांनी अतिशय समर्थपणे उभी केली होती ! त्यातला अभिनय खुप आवडला.

दोन्ही दिग्गजांना भावपुर्ण श्रद्धांजली _/\_

चौकटराजा's picture

30 Apr 2020 - 7:31 pm | चौकटराजा

माझी त्याच्या सोबत एक आठवण अशी की मी वाई येथे असताना मी जिथे राहात होतो त्या घरासमोरच " रामजीकी निकली सवारी " या गीताचे शुटींग चालू होते.मी टेलेफोन खात्यात त्यावेळी नोकरीला असल्याने सिनेमा नटांशी आमचे बोलणे अगदी हटकून होत असे. त्यावेळी असराणी या नटाने मला शूटिंग च्या वेळी भेटण्याची परवानगी दिली . मी असराणी ,दिगदर्शक के विश्वनाथ व ऋषी कपूर असे काही काळ एकत्र बसले होते. त्यावेळी मागविलेले कोल्ड्रींक मी पीत असताना नय्यर यांच्या संगीत " हाय रिपीट " व्हॅल्यू असल्याचे ऋषी कपूर याने सांगितल्याचे आजही आठवत आहे.त्याने डफली गाण्याबरहुकूम वाजविण्यासाठी मेहनत घेतलेली मी स्वतः: पाहिली आहे. विशेष असे की त्याची पत्नी नीतू हिच्या बरोबर ही वार्तालाप फोनवरून करण्याची संधी मला मिळाली होती. सर्व कपुरना संगीताचा कान असल्याने संवादातील चढ उतार यावर यांची चांगली पकड होती. आमच्या पिढीचे रंजन त्याने केलेच पण करियरच्या उत्तरार्धात देखील अतिशय खोली असलेल्या भूमिका केलया ! या अशा गमतीशीर व्यक्तीला व समर्थ अभिनेत्याला आदरांजली !

अर्धवटराव's picture

30 Apr 2020 - 9:36 pm | अर्धवटराव

मोस्ट फेव्हरेट लिस्ट मधले दोन मोहोरे गळाले :(

अमिताभ बच्चनने पडदा झाकोळला असताना अनेकांना रसीकांकडुन पोचपावती मिळवायला फार झगडावं लागलं, अशी खंतवजा आठवण ॠषी कपूरने बोलुन दाखवल्याचं आठवतं. कपील शर्मा शो मधे ॠषी कपूर आला होता. कारकिर्दीच्या प्रथम चरणात आपण केवळ चॉकलेटी चेहेरा आणि स्वेटरच्या भरोषावर निभावुन नेलं, अभिनयाचा खरा चान्स तर उत्तरार्धात मिळालाय, हि त्याची कबुली. उत्तरार्धात तर त्याने अभिनयाची कमाल केलीच, पण मला तारुण्यातला ऋषी कपूर देखील तेव्हढाच आवडायचा. अमर-अकबर-अँथनी असो किंवा नसीब, ऋषी कपूर अगदी बच्चनसमोर देखील भाव खाऊन जायचा.

इरफान बद्दल काय बोलावे... मकबूल, हासील वगैरेची किती पारायणं झाली आहेत आता आठवत देखील नाहि.

गेले दोघेही :(

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

30 Apr 2020 - 11:20 pm | सौ मृदुला धनंजय...

भावपूर्ण श्रद्धांजली

दोघांनाही श्रध्दांजली, ॠषी कपूर खरं तर सेकंड इनिंगमधेच बहरला होता - नवीन अग्नीपथ बघितला नाही, पण एका मित्राने हा एक सीन दाखवला आणि त्याचा रौफ लाला बघितल्यावर शहारलो होतो. तसेच त्याचे नवीन मुल्क, डी-डे, Kapoor & Sons, दो दूनी चार (हा तर फार गोड अहे, अगदी तिसर्‍या पिढीतला कपूर असूनही भीड्स्त, मध्यमवर्गीय असा रंगवलाय की काय सांगावे) आवडलेत. असा अभिनयसंपन्न असतांना निव्वळ स्वेटर बदलून 'सोचेंगे तुम्हे प्यार करे के नही...' किंवा 'बोल राधा बोल...' (दोन्ही निरतिशय टुकार चित्रपट आहेत) करत राहिला असता तर कदाचित त्यालाच अपूर्ण वाटले असते. तरीही तो लवकर गेला असे वाटतेय...आता कुठे मजा यायला लागली होती. :(

इरफान विषयी काय बोलावे? त्याचे जवळ-जवळ सगळेच चित्रपट आवडतात, तरीही 'The Namesake' आणि 'The Lunchbox' हे खास मर्मबंधातली ठेव आहेत. त्याच्या एका जुन्या २००३ च्या 'द बायपास/The Bypass' शॉर्ट-फिल्मवर ब्लॉगवर InShort सिरीजमध्ये लिहिलंय. घाईत लिहलंय म्हणून इंग्लिश मधे आहे त्यामुळे इथे नाही टाकता येणार. इच्छा असल्यास इथे वाचता येईल - InShort 6 – The Bypass (Short Film)

किल्लेदार's picture

1 May 2020 - 2:19 am | किल्लेदार

नवीन अग्निपथ मध्ये रौफ लाला सोडला तर बघण्यासारखे काहीच नव्हते इतका दमदार अभिनय ऋषी कपूरचा होता. नुकत्याच येऊन गेलेल्या १०२ नॉट आऊट चित्रपटात अमिताभच्या तुलनेत ऋषी कपूरचा अभिनय जास्त नॅचरल आणि प्रगल्भ वाटला.

इरफानचा बिल्लू हा चित्रपट फारसा चालला नाही तरी इरफानचा अभिनय कमाल होता.

इतक्या लवकर आणि तेही लागोपाठ दोघांचे निघून जाणे खरंच दुःखद...

हेच म्हणणार होतो... ऋषीकपूरची कारकीर्द १०२ शिवाय पुर्ण होउच शकत नाही.
दुर्दैवाने तो खुप लवकर गेला. ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो.

वेदांत's picture

1 May 2020 - 11:35 am | वेदांत

माझ्या कडुन ऋषीकपूर यांना whistle songs ची श्रध्दांजली

https://youtu.be/IL-agg_i87Q

चौथा कोनाडा's picture

1 May 2020 - 11:42 am | चौथा कोनाडा

छान आहे !

दोघेही अंगभूत कौशल्याच्या मनाने कमी वापरले गेले.

अमिताभ ऐन भरात असताना आणि बाकी चित्रपट सृष्टी दे दणादण करत असताना स्वतःची (स्वतःच्या मर्यादा ओळखून) स्वतंत्र इमेज बनवणं नक्कीच सोपं नव्हतं.

पण ऋषी कपूरच्या कारकीर्दी चा कळस रौफ लाला च असू शकतो. चित्रपटात उप - खलनायक असून नायक अन् मुख्य खलनायक पेक्षा जास्त लक्षात राहतो तो रौफ लाला.
1